लेखणी सुवर्ण क्षणांची ( संदीप राक्षे )
Sunday, 19 September 2021
पेडगावचा धर्मवीर गड
Tuesday, 31 August 2021
त्रिशूंड गणेश मंदिर
अद्भुत त्रिशूंड गणेश मंदिर,
पुण्याचे अपरिचित वारसास्थळ. संदीप राक्षे ✍🏻
भारतातील प्राचीन अद्भुत मंदिरात अतिशय तरल असा एक लोहचुंबकीय आकर्षण भाव असतो, आपण जर मनाच्या आध्यात्मिक कलानं चाललो तर, ज्या वाटेने जाण्याचा आंतरिक ध्यास आपण घेतलेला असतो त्याच ठिकाणी आपण पोहचणार याचा प्रत्यय आज पुन्हा मला आला. २८ ऑगस्ट २०२१ सुट्टीचा हा दिवस, साखर झोपेतून आज पहाटेच जाग आली होती, फेसबुक चाळीत पडलो होतो. तिथे त्रिशूंड गणेश मंदिराची सुंदर शिल्पाकृती असलेली एक व्हिडीओ पोस्ट दिसली, त्या पोस्टवर मी क्लीक केले. पुण्यातील दुर्मिळ अशा मी अपरिचित असलेल्या त्रिशूंड मंदिराची पोस्ट पाहून अक्षरशः भारावून गेलो होतो. पुण्यातला असूनही या मंदिराच्याविषयी अनभिज्ञ राहिलो याचे मला आश्चर्य वाटले. वेळ आली की स्वर्ग सुद्धा पायाशी लोळण घेतो, मला खूप आनंद वाटला. अंथरूणावरून चटकन उठलो, पटकन आवरून तयार झालो. आज पी एम पी एल च्या बसने प्रवास करून पुणे गाठायचे असे ठरवले होते. भोसरीहून पुणे कार्पोरेशनला जाणा-या बस मध्ये बसलो, पुणे कार्पोरेशनला उतरून पुढे रिक्षाने पुण्यातील सोमवार पेठेत पोहोचलो. रिक्षावाल्यांना सोमवार पेठ माहित होते, परंतू जगातील एकमेव असणारे त्रिशूंड गणेश मंदिर माहिती नव्हते. रिक्षावाल्याने मला कमला नेहरू हाॅस्पीटलच्या तिथे उतरवून दिले. तिथे असणा-या पानपट्टीच्या दुकानातील व्यक्तीला त्रिशूंड गणेश मंदिर कुठे आहे असे विचारले? तो म्हणाला सरळ जाऊन डावीकडे वळण घ्या, पुन्हा उजव्या बाजूला वळण घ्या तिथे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक दिसेल त्या बँकेच्या बाजूलाच त्रिशूंड गणेश मंदिर आहे. त्यांनी सांगितल्या प्रमाणे मी बरोबर त्रिशूंड मंदिराजवळ पोहचलो...
छत्रपती शिवरायांनी पुण्याच्या भूमीवर सोन्याचा नांगर फिरवला आणि ही भूमी पवित्र, पावन केली, अशा ऐतिहासिक पुण्यनगरीतील हे त्रिशूंड गणेश मंदिर. जलपर्णीने व्यापलेल्या एखाद्या तलावात कमलपुष्प उमलावे त्याचप्रमाणे सिमेंटच्या जंगलात अडकलेली काळ्या सुवर्णपाषाणातील त्रिशूंड गणेशाची ही शिल्पवास्तू उमललेली दिसत होती.
मुख्यप्रवेशव्दारावर भव्य गजलक्ष्मीचे शिल्प, ललाटबिंबावर गणेशाचे शिल्प गजलक्ष्मी शिल्पाच्यावरती शेषशायी विष्णू, प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस व्दारपालांचे शिल्प, त्यावर गजव्याल शिल्प, प्रवेशव्दाराच्या उंब-यावर दोन किर्तीमुख शिल्प. दोन्हीबाजूला घडीव दगडी खांब कुशलतापूर्वक कोरलेले दिसतात त्यावर घंटा धरलेले भारवाही यक्ष शिल्प पण दिसते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला देवकोष्ट कोरलेली दिसतात त्यामध्ये मुर्ती नाहीत. देवकोष्टकाच्या खाली दोन्ही बाजूस इंग्रज अधिकारी एका गेंड्याला साखळदंडाने जखडत आहे असे प्रतिकात्मक शिल्प कोरलेले दिसते, हे शिल्प या मंदिराचे एक आकर्षण आहे. याच शिल्पाच्या खाली, दोन्ही बाजूस हत्तींची झूंज चाललेली असे शिल्प कोरलेले दिसते. मुख्यप्रवेशव्दाराच्या दोन्ही कडेला खांबांचे शिल्प उजव्या बाजूला श्रीकृष्ण व डाव्या बाजूस श्रीविठ्ठलाचे शिल्प कोरलेले दिसते, याच खांबाच्या बाजूस दक्षिणेला व उत्तरेला रूक्मिणी मातेचे शिल्प कोरलेले पाहिले. प्रथम दर्शनीची ही अद्भुत शिल्पकला पाहून मंदिराला प्रदक्षिणा घालून मग मंदिरात प्रवेश करायचा असे ठरवले. मंदिराच्या दक्षिण बाजूस एक देवकोष्ट होते, त्यामध्ये नटराजाची सुबक मुर्ती कोरलेली होती तिचे दर्शन घेऊन मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आलो होतो. देवकोष्टात एक दुर्मिळ शिवलिंग पाहिले, त्या शिवलिंगावर शेषनागाने छत्र धरलेले होते, त्याच शिवलिंगावरील हंस आकाशात झेपावतानाचे शिल्प व खालच्या दिशेने मुसंडी मारणारा वराह असे दुर्मिळ शिल्प पाहून अक्षरश: थक्कच झालो होतो. शिवलिंग पाहून मंदिराच्या उत्तर दिशेला भैरवाचे शिल्प पाहून मंदिरात प्रवेश केला. सभामंडपातून मंदिराच्या अंतराळ भागात आल्यानंतर गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस देवकोष्ट, एका देवकोष्ठावर पोपट तर एकावर हत्ती अशी शिल्प कोरलेली दिसतात. गर्भगृहाच्या बाहेर दगडी कमान, त्यावर सुंदर नक्षीकाम, दोन्ही बाजूला साधू वेषातील व्दारपाल होते. कमानीच्या मध्यभागी एक शिल्प कोरलेले होते, एका बाजूला नंदी व एका बाजूला सिंह पण ते शिल्प कशाचे याचा उलगडा होईना. त्यासाठी मी इतिहास संशोधक व लेखक आशुतोष बापट सरांना त्या शिल्पाचे फोटो फेसबुकवर शेअर केले व त्या शिल्पाविषयी माहिती विचारली. त्यांनी दुस-या मिनिटाला मला त्या शिल्पाची माहीती पाठवली ती अशी, त्या शिल्पाला शिव पार्वती आलिंगन मुर्ती म्हणतात. शिव बसले असून त्यांच्या डाव्या मांडीवर पार्वती दिसतेय. एका बाजूला शिवाचे वाहन नंदी आणि दुसर्याबाजूला पार्वतीचे वाहन सिंह. शिल्पाबाबतची ही माहिती माझ्यासाठी अनमोल होती, मी आशुतोष बापट सरांचे आभार मानले. याच शिल्पाच्या वरती दोन संस्कृत व एक फारशी भाषेतला लेख दिसतो उंचावर असल्याने मी त्याचे फोटो काढले. हे सारे पाहून मी निवांत अंतराळातील गर्भगृहाच्या बाहेर बसलो. अंतराळ म्हणजे मंदिराचा मुख्य मंडप आणि गर्भगृह या दोघांच्या मधली चिंचोळी जागा. अंतराळात घटकाभर थांबून चित्त एकाग्र करायचं असतं. अंतराळातून त्रिशूंड गणेशाची मुर्ती अगदी स्पष्ट दिसत होती. जगाच्या पाठीवर कुठेच न आढळणारी ही दुर्मिळ त्रिशूंड गणेशाची मुर्ती पाहून मंत्रमुग्ध झालो होतो.
आवडे हे रूप गोजिरे सगुण!
पाहता लोचन सुखावले!!
आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे!
जो मी तुज पाहे वेळोवेळा!!
लाचावले मन लागलीस गोडी!
ते जीवे न सोडी ऐसे झाले!!
मयुरेश्वरला पाहून संत तुकाराम महाराजांची ही रचना, पं. आदिनाथ सटले यांचे शिष्य रामेश्वर सुपेकर यांनी मिश्र किरवानी या रागात गायलेला अभंग चाली सहीत आठवला. तीन सोंड असलेली मोरावर बसलेली बाप्पांची मूर्ती, मोराच्या चोचीत नाग, मुकुटावरसुद्धा नागाचे वेटोळे दिसत होते. गणेशाला सहा हात आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीत सुद्धा या सहा हातांचे वर्णन येते..
देखा षढ्दर्शने म्हणीपती! तेचि भुजांची आकृती!!
म्हणऊनी विसंवादे धरिती! आयुधे हाती!!
तरी तर्क तोचि परशु! नीतीभेदु अंकुशु!!
वेदांतु तो महारसु! मोदकाचा!!
गणेशाच्या वरच्या उजव्या हातात अंकुश धारण केलेला दिसतो, मधल्या उजव्या हातात शूल, खालच्या उजव्या हातात मोदकाचे पात्र दिसते. वरच्या डाव्या हातात परशु, मधल्या डाव्या हातात पाश दिसतो, खालच्या डाव्या हाताने मांडीवर बसलेल्या शक्ती देवतेला आधार दिलेला आहे. त्रिशूंड गणेशाची एक सोंड मांडीवर बसलेल्या शक्तीच्या हनुवटीला स्पर्श करीत आहे, दुसरी सोंड मोदकाच्या भांड्याला स्पर्श करताना दिसते, तिसरी सोंड मोराच्या डोक्यावर दिसते. गणेशाच्या आसनस्थानी रिद्धी व सिद्धी तसेच उंदीर मामा पण दिसत होते. त्रिशूंड गणेशाच्या पाठीमागे शेषशायी विष्णू शिल्प व गणेश यंत्राचे शिल्प कोरलेले दिसत होते. हे सार पहात असतानाच मंदिराचे पुजारी शिरीष शेंडे गुरूजी हे गणेशाची दुपारची आरती करण्यासाठी आले होते. त्यांना नमस्कार केला आणि या मंदिराची थोडी माहिती द्याल का? असे विचारले शेंडे काका हो म्हणाले आणू सांगू लागले. हे मंदिर मध्यप्रदेशातील धामपूर गावचे धनिक भीमगिरीजी गोसावी यांनी २६ ऑगस्ट १७५४ साली बांधले होते. राजस्थानी माळवा व दाक्षिणात्य वास्तुशैलीचा समिश्र वापर करून हे त्रिगुणात्मक गणेशाचे मंदिर उभारले. त्रिशूंड गणपतीच्या खाली एक तळघर आहे, तिथे दत्तगुरू गोसावी यांची समाधी आहे. दररोज गणेश मूर्तीला जो अभिषेक होतो त्या मूर्तीवरचे पाणी समाधीवर पडते आणि आपोआप त्या समाधीचा सुद्धा अभिषेक होतो. त्या तळघराचे वैशिष्ट्य म्हणजे तळघरात एक जिवंत पाण्याचा झरा असून तो झरा पाच मीटर खोल आहे. हे तळघर दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त उघडले जाते तिथे जाण्यासाठी मुख्यप्रवेशव्दारापासून एक भुयारी रस्ता आहे व दुसरा त्रिशूंड गणेश मुर्तीच्या उजव्या बाजूने एक भुयारी रस्ता आहे. हे ऐकतानाच माझ्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला होता. खरच सारंच अद्भुत पहायला व ऐकायला मिळत होत इतकी दुर्मिळ वास्तू आपल्या इतक्या जवळ असेल हे स्वप्नातही वाटले नव्हते. शेंडे काकांना श्रावणतल्या घरच्या पुजा असल्याने त्यांनी माहिती देण्याचे मध्येच थांबवून आपण आरती करूयात मला पुढे जायचे आहे. मी होकार दिला शेंडे काकांनी आरती म्हणायला सुरवात केली व मला बाजूची असणारी घंटा वाजवायला सांगितली...
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची!
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची!!
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची!
कंठी झळके माळ मुक्ताफळांची!!
जय देव जय देव जय मंगलमूर्ती!
आरती संपल्यावर शेंडे काकांनी गुळ खोब-याचा प्रसाद दिला. पुजेसाठी दुसरीकडे जायची तयारी करीत असतानाच त्यांना काही इतिहास आठवला ते पुन्हा सांगू लागले, पुर्वीच्या काळी त्रिशूंड गणपतीच्या तळघरात योगविद्येची साधना केली जायची त्यासाठी विशिष्ट खोल्यांची रचना तळघरात केलेली दिसते. धुम्रपान नावाची साधना इथे होत असे, हठयोगाचे साधक स्वतःला छताला उलटे टांगून घेत व खाली निखा-यामध्ये काही औषधी वनस्पती टाकल्या जात व त्यापासून निघालेला धूर ते नाकावाटे घेत असत. जे जे ऐकावे ते ते नवलच होते. खरतर अशा अद्भुत मंदिराचे, योग स्मारकाचे संवर्धन होणं गरजेचे आहे. या वास्तूला खरतर जागतिक दर्जा मिळायला हवा. एखाद्या वास्तूला जेव्हा जागतिक दर्जा प्राप्त होतो तेव्हा तो संपूर्ण मानवजातीच्या दृष्टीने महत्वाचा वारसा असतो. त्याचे जतन होते संरक्षण होते. खरतर आपल्या भारत देशात कोणत्याही देशात नसतील इतकी पर्यटनस्थळ आहेत, ऐतिहासिक वास्तू आहेत. परंतु भारतातील व जगातील पर्यटक त्यावास्तूपर्यंत आणण्यासाठी आपण तेवढे यशस्वी होऊ शकलो नाही ही शोकांतिका आहे. आपल्याला लाभलेला हा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीसाठी शिल्लक ठेवायचा असेल तर त्याचे काटेकोर पणे जतन होणं गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी जागृत होऊन प्रयत्न करायला हवेत...
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१
Saturday, 8 May 2021
नरनाळा अभयारण्य
वन्यजीवांचे माहेरघर "नरनाळा अभयारण्य"
संदीप राक्षे. ✍🏻
चैत्र पाडव्याचा साडेतीन मुहूर्ताचा दिवस, माझ्यासाठी एक पर्वणीच घेऊन आला होता. नरनाळा किल्ला पाहून मी अभयारण्य पहाण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी शून्य होती. मी एकटाच पर्यटक व सोबत गाईड आणि फाॅरेस्ट शिपाई असे तिघेच जण नरनाळा अभयारण्याच्या परिसरात होतो. हीच संधी होती मनसोक्त हुंदडायची, जंगलाच्या निसर्गरम्य वातावरणात रमण्याची. पाय मोकळे करण्यासाठी थोडा गाडीच्या खाली उतरलो आणि गवतावर चालू लागलो. चालत असताना कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या कवितेच्या चार ओळी आठवल्या..
तरूवरची हसतात त्यास पाने
हसे मूठभर ते गवतही मजेने
वाटसरू वाट तुडवीत त्यास जात
परी पाचोळा दिसे नित्य शांत..
असाच काहीसा भास मला येथील वातावरणात आल्यावर झाला. चैत्राची नवी पालवी फुटल्याने झाडावरची लुसलुशीत छोटी पानेही आज हसताना दिसत होती. आज वाराही मंद असल्याने पाचोळाही शांत होता. आवाज न करता. सुकलेले गवतही आनंदाने डूलत होते, बदललेल्या ऋतूंचे स्वागत करीत ताठ मानेने डोलत होते. या विचारात मग्न असतानाच सागाच्या वाळलेल्या पानांचा कर-कर आवाज येऊ लागला. मी आजुबाजूला पाहिले. तो पर्यंत गाईडने आवाज दिला, साहेब" ते पाहा सांबर. माझी नजर गाईडच्या बोटाच्या दिशेने वळली. भले मोठे मादी जातीचे सांबर उभे होते. गाईडने मला गाडीत बसण्यासाठी नजरेनेच खुणावले. मी क्षणाचाही विलंब न करता गाडीत बसलो. गाडीत बसून मी त्या सांबराचे मनसोक्त फोटो काढले. मला गाईड आणि शिपाई यांनी सक्त ताकीद दिली, या पुढे आपण गाडीतून उतरायचे नाही. कारण अशा प्राण्यांच्या मागावर हिंस्त्रप्राणी असतात. जंगल सफारीच्या सुरवातीलाच सांबराच्या दर्शनाने सुखावलो होतो. अरुंद रस्त्याने आम्ही धारगडच्या दिशेने निघालो होतो. वाटेत जाताना फुलपाखरं, विविध पक्षी न्याहाळत होतो. मोर-लांडोर तर क्षणाक्षणाला दिसत होते, पण ते आमच्या वा-यालाही थांबत नव्हते. कितीतरी वेळा फोटो काढण्यासाठी मोबाईल हातात घेतला की गायब. सतत निराशा व्हायची, पण नेत्रसुख मिळायचे हे महत्वाचे. एका कड्याच्या ठिकाणी, गाईडने गाडी उभी करायला सांगितली. गाडीतून आम्ही खाली उतरलो. कड्याच्या काठावरून गाईडने खाली पहायला सांगितले. इतका सुंदर देखावा पाहून मी थक्कच झालो. एका पाणवठ्यावर हरणांची जोडी आपल्या पाडसा समवेत पाणी पीत होती. आमची जास्त हालचाल चटकन त्यांच्या लक्षात आली. ते पाणी प्यायचे सोडून तिघेही आमच्याकडे पाहू लागले. बराच वेळ आमची नजरानजर झाली. त्यातले एक हरीण ओरडायला लागले. आम्ही आल्याचा संदेश कदाचित ते इतर प्राण्यांना देत असावेत. आम्ही गेल्याशिवाय ते पाणी पिणार नाहीत हे मलाही जाणवले. पुन्हा एकदा मन भरून त्या हरणाचे कुटुंब पाहिले आणि मागे सरलो. पुन्हा गाडीत येऊन बसलो आणि नलदमयंती तलावाच्या जवळ पोहचलो. तिथेही सांबरांच्या दहा-बारा जोड्या मस्त लुसलुशीत हिरवे गवत खाताना नजरेस पडल्या. ते मनोहारी दृष्य पाहून पुढे निघालो. जरा दाट जंगल लागले होते आणि वाट जरा अरुंदच होती, अचानक झाडीतून चार रानडुक्करांची झुंड गाडीला आपले शरीर घासून पुढे निघून गेली, खरंतर मला तो एक प्रकारचा दमदाटीचा प्रकारच वाटला. "जानेवालो जरा होशियार यहा के हम है राजकुमार" अशा तो-यात जाणारी ती झुंड दिसेनाशी होईपर्यंत गाडी बंद ठेवून पहात होतो. ते जाई पर्यंत मनात खूप भिती होती. त्यांचे सुळे दात पहातानाच माझी दातखिळी बसली होती. तशातही एकाचा फोटो मी टिपलाच. तेथून थोडे अंतर कापल्यानंतर रस्त्यावरच भले मोठे सांबर उभे होते, जोरात ब्रेक दाबून गाडी थांबवली. दहा ते पंधरा मिनिटं ते रस्त्यावरून हललेच नाही. ते आमच्याकडे पाहात आणि आम्ही त्यांच्याकडे पाहात राहिलो. बराच वेळ ते रस्ता अडवून उभे होते. काही वेळाने ते बाजूच्या झाडीत गेले आणि आमचा रस्ता मोकळा झाला. त्यानंतर गुलरघाटाकडे चला असे गाईडने सांगितले. गाडी वळवली आणि गुलरघाटाकडे निघालो. जिथे वाघांचे साम्राज्य आहे. दुपारच्या वेळेस ते तेथील तलावात भिजण्याचा आनंद घेत असतात. असे फाॅरेस्ट शिपायाने सांगितले. ते ऐकून जरा मनातून चरकलोच. गुलरघाटाच्या मुख्य गेटवर गाडी थांबवली आणि "तलावाकडे लक्ष दया" असे गाईडने सांगितले. तोपर्यंत तलावातून एक प्राणी जमिनीकडे झेपावून दिसेनासा झाला होता. खूप दूरचे अंतर असल्याने नेमके काय होते हे सांगता येणार नाही, पण नक्कीच वाघ किंवा बिबट्या असणार याची खात्री दोघांनी पण दिली. अभयारण्यात फिरताना ससा, कोल्हा, रान कोंबडा, अस्वलांच्या पायांचे ठसे पहायला मिळाले.
एकदा केरळच्या जंगल सफारी साठी गेलो असताना अनुभवास आले, तिथे सफारीसाठी एका माणसाचे प्रत्येकी तीन हजार आकारले जातात. दिवसभर फिरूनही त्या जंगलात साधी खारूताई पण दिसत नाही. त्याउलट महाराष्ट्रातील ही अभयारण्ये म्हणजे वेगवेगळ्या जातींच्या पक्षी व प्राण्यांचा मेळाच. ख-या अर्थाने आजची सफर सफल झाली होती.
अशावेळी निसर्गकवी राजकिशोर सुनानी, ओरिसा, यांच्या कवितेची आठवण झाली. निसर्गाला भगवान मानणारे हे कवी आपल्या कवितेत सांगतात. भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, वा म्हणजे वायू, न म्हणजे नीर. असा हा भगवान आपणही पुजायला हवा. त्याचे रक्षण करायला हवे.
(त्यांची ही भाषांतरीत कविता)
ही माती आम्हाला देते हिरवाई,
झाडं आणि कंद आणि फळं...
या नभातून मिळतो पाऊस आणि झऱ्यांचं पाणी...
पाणी जणू काही आईचा पान्हा
हा पान्हाच आमची भागवतो तहान..
मित्रांनो, डोंगर, झरे, जंगल आणि जमीन आमचा हा भगवान...!
संदीप राक्षे✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१
रायगड एक विद्यापीठ
*रायगड*....
*एक मोहीम*...
*शिव विद्यापीठाची*....
*संदीप राक्षे* ✍🏻
रायगड हे *वैश्विक* महातिर्थ आहे.
स्वातंत्र्य सैनिकांची काशी, गया, वाराणशी आहे...
महाराष्ट्राच्या संस्कृतीची ती *गंगोत्री* आहे.
पुरूषार्थ आणि पराक्रम यांचे ते *प्रेरणास्थान* आहे..
गो.नि दांडेकर.
निसर्गरम्य खेड तालुका, या व्हाटसअप गृपवर खलिता मिळाला की, दि. ४/१/२०२० रोजी *रायगड मोहीम* राबवायची आहे. असा अध्यादेश या मोहिमचे सेनापती किशोर राक्षे, रोहीत बोरूडे, वर्षा चासकर यांनी काढललेला दिसला. त्या आदेशाला भरपूर प्रतिसाद मिळाला. अनेक मावळ्यांनी हिरिरीने सहभाग घेतला. त्यामध्ये अजित आरूडे, अशोक कोरडे, गुंडाजी जीवना, संतोष भोसले, कांचन लांघी, सुप्रिया म्हसे, दिपाली जीवना, प्रतिक्षा शिंदे, दिगंबर शिंदे, विकी हुरसळे, सुप्रिया पिंगळे, उषा होले, बबन होले, अंकिता कहाने, सायली कहाने, गौरी राऊत, काजल दौडकर, नाजुका शेडगे, मयुर गोपाळे, पुजा सावंत, अक्षय भोगाडे, योगेंद्र आंबवणे, रविंद्र भोगाडे, रेश्मा भोसले, वैशाली भोसले, ॠषी गोरे, सुरज नालगुणे, दुर्योधन लवटे, प्रगती गोपाळे, योगेश उभे, अभिनव आरूडे, आदित्य कोरडे, शौर्य पिंगळे या सर्वांनी मोहिमेवर जाण्याचे ठरविले.
ठरलेल्या वेळेवर सर्व मावळे जमले आणि गाडी सुसाट रायगडाच्या दिशेने मार्गस्थ झाली.
भल्या पहाटेच श्रीमान रायगडाच्या पायथ्याशी पोहचलो. निरव शांतता होती. कडक थंडीच्या गारठ्याने अंगात हुडहुडी भरत होती. सुर्यदेवाने संपूर्ण डोंगराईवर सुवर्ण प्रकाशाचा पदर पसरला होता. संपूर्ण परिसर राजमाता जिजाऊ, छ. शिवराय, व छ. संभाजी महाराजांच्या नावाच्या जयजयकाराने दुमदुमून गेला होता. तो जयघोष अंगावर शहारे निर्माण करीत होता, कारण जगाच्या इतिहासात मराठ्यांचा इतिहास अद्वितीय असा आहे. मराठ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्ययुगीन भारताच्या इतिहासात नवे पर्व सुरू केले होते. स्वराज्याचेच नंतरच्या काळात विशाल साम्राज्यात रुपांतर होऊन हिंदुपदपादशाही असे नाव त्यास प्राप्त झाले होते. भारतातील सर्वांत शक्तिशाली सत्ता म्हणून मराठ्यांचे साम्राज्य ओळखले जात होते. संपूर्ण जगातील सेनानायकाच्या क्रमांकात छ. शिवाजी महाराजांचे स्थान प्रथम दर्जाचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्षातून स्वराज्याचे सुराज्य घडवून रयतेला स्वातंत्र्य सुख मिळवून दिले होते. जीवाची पर्वा न करता अनेक मोहिमा फत्ते केल्या. या सर्व गोष्टींना रायगड साक्षी होता. याच रायगडावर राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने इथली भूमी पवित्र झालेली आहे. इथल्या मातीत पसरलेल्या शौर्याच्या गंधानेही देह पवित्र होतो. हीच सदभावना रायगड चढताना मनाला उभारी देत होती.
रायगडाचे प्राचीन नाव रायरी असे होते. हा गड समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर म्हणजे अंदाजे २७०० फूट उंचीवर आहे. गडावर पोहोचण्यासाठी १४०० पायऱ्या चढून जावे लागते. छत्रपतींनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायगडास वेढा घालून रायगड ताब्यात घेतला. कल्याणच्या सुभेदार मुल्ला अहमद याला चारीमुंड्या चीत करून लढाईत काबीज केलेल्या खजिन्याचा गडाच्या पुनःर्उद्धाराच्या कामी लावला. रायगडाची जागा अवघड ठिकाणी असल्यामुळे तसेच ते सागरी दळणवळण व सुरक्षिततेच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे छत्रपतींनी गडाची राजधानी म्हणून निवड करून गडाची रचना हिरोजी इंदुलकरांकरवी त्या दृष्टीने करवून घेतली. गडावर राजसभा, राजनिवास, न्यायसभा, कल्याणसभा, विवेक सभा, दारु कोठारे, अंबरखाने, मंत्र्यांची निवासस्थाने, कचेऱ्या, नगरपेठ, किर्तीस्तंभ, तलाव, मंदिरे, खलबतखाना, हत्तीशाळा, अश्वशाळा, वस्त्रागार, रत्नागार, जगदीश्वर मंदीर, या सुविधांबरोबरच गडाच्या संरक्षण व्यवस्थेतील कडे तासणे, तटबंदी बांधणे, महाद्वार आणि बुरुज, चोरवाटा उभारणे यासाठी आपले कसब पणाला लावले होते.
चित्त दरवाजाची पहिली पायरी दिसताच नतमस्तक झालो. क्षणभर डोळे मिटले. निरव शांततेत जगदंब, जगदंबचा मंत्रोच्चार कानातून मनात साठवू लागलो. आपसूकच स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांची अविस्मरणीय भुमिका साकारणारे शंतनु मोघे यांची शिवराय साकारणारी मुर्ती डोळ्यासमोर उभी राहीली. या मालिकेतील छ. संभाजींची भूमिका साकारणारे डाॅ. अमोलजी कोल्हे यांच्या सह प्रत्येक भुमिकेतील पात्रे इतिहास डोळ्यासमोर जिवंत साकारतात. या सा-यांचे आभार मानावे तितके थोडेच.
आता आम्ही सर्वजण मुख्य दरवाजा जवळ पोहचलो. मुख्य दरवाज्याच्या बाहेरील दोन्ही बाजूस हत्ती आणि कमळाच्या सुंदर शिल्पाकृती कोरलेल्या दिसल्या. तसेच दोन्ही बाजूस भव्य बुरूज, पहारेकऱ्यांसाठी आणि संरक्षकांसाठी देवड्या आणि टकमक टोकापासून ते हिरकणी बुरूजापर्यंत भक्कम तटबंदी बांधलेली रांग दिसली. गजशाळेतून येणा-या हत्तींच्या पिण्याच्या पाणाच्या सोईकरिता मुख्य दरवाज्यापासून थोडे वर चढून गेल्यावर हत्ती तलावाची बांधणी केलेली दिसली. हत्ती तलावापासून गंगासागर तलाव नजरेस पडला. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर आणि नद्यांची आणलेली तीर्थे याच तलावात विसर्जित केलेली होती. त्यामुळेच या तलावाचे नाव गंगासागर असे रूढ झाले. गडावर आजही या पाण्याचा उपयोग केला जातो. संपूर्ण तलावाला वेढा घालून आम्ही शिरकाई देवीचे दर्शन घेऊन होळीच्या माळावर पोहचलो आणि शिवकालिन शिमग्याचा सण डोळ्यासमोर उभा राहिला. शिमग्याला धगधगत्या होळीतून नारळ बाहेर काढणा-या शूरवीर मावळ्याला छत्रपतींच्या हस्ते सोन्याचे कडे भेट म्हणून दिले जाई. होळीतून नारळ काढण्याच्या प्रयत्नात अनेकांना अपयश आले. शंभूराजांनी मात्र सोन्याचे कडे मिळविण्याचा मान मिळवला. हे हृदयस्पर्शी चित्र आठवताना मन भरून आले. होळीच्या माळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनास्थ मुर्तीचे मनोभावे दर्शन घेतले. फोटो काढले आणि पुढे राणीवसा, सदर, राजभवन, राजसभेच्या ठिकाणाकडे प्रस्थान केले. आत शिरताच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्याठिकाणी झाला त्या सभामंडपाच्या मध्यभागी पोहोचलो. समोरच २२० फुट लांब व १२४ फुट रूंद अशी पूर्वगामी सिंहासनाची जागा दिसत होती. ६ जून १६७४ शिवराज्याभिषेकाचा तो दिवस, बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन, साक्षात छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झालेले, शेजारी शंभूराजे आणि राजमाता जिजाऊ, सिंहासनाच्या सभोवार हातांत सुवर्णकलश घेतलेले प्रधान आठ दिशांना उभे राहिलेले, पूर्वेला मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे हाती सुवर्णकलश घेऊन, दक्षिणेस सेनापती हंबीरराव मोहिते दुधाचा रौप्यकलश घेऊन, पश्चिमेस रामचंद्र नीलकंठ पंडित अमात्य दही दुधाने पूर्ण भरलेला तांब्याचा कलश घेऊन, उत्तरेस छंदोगामात्य प्रधान रघुनाथ पंडितराव मधु सुवर्णकलश घेऊन, तसेच आजूबाजूला मातीच्या कुंभात सप्तसागर आणि महानदयांचे पाणी भरून ठेवलेले, हातात छत्री धरून सचिव अण्णाजी दत्तो पंडित, पक्वान्नांची थाळी हाती घेतलेले सुमंत जनार्दन पंडित, न्यायाधीश बाळाजी, पंडीत मंत्री, महामंत्री, पाहुणे आसनस्थ झालेले, एकीकडे गागा भट्टांचा मंत्रोच्चार सुरू असे अगम्य सोहळ्याचे क्षणचित्र काही क्षण मनपटलावर राज्याभिषेकाच्या यज्ञकुंडातील ज्वांलांसारखे धगधगत असल्याचा भास झाला आणि मंत्रोच्चार पूर्ण होताच कवी भुषणांचे छत्रपतींचे अंगावर शहारे आणणारे गुण गौरवास्पद काव्य कानावर आले.
इन्द्र जिमि जंभ पर, बाडब सुअंभ पर
रावन सदंभ पर, रघुकुल राज हैं!
पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर
ज्यौं सहस्रबाह पर राम द्विजराज हैं!!
दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर
भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं!
तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर
त्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज है!!
जय भवानी जय शिवाजी!!
सभामंडपाचे प्रत्येक दालन कधी हाताने, कधी नजरेने स्पर्शून प्रत्येकाच मन भारावून गेले आणि जय भवानी जय शिवाजीचा गजर कानावर आला आणि मी भानावर आलो. सभामंडपातून बाहेर जावे असे वाटत नव्हते जड अंतःकरणाने सभामंडप सोडला. सभामंडप सोडून मागच्या बाजूने धान्याचे कोठार, खलबतखाना व टाकसाळ यांना वळसा घालून खाली उतरलो. बाजारपेठ लागली सूर्य माथ्यावरून खाली सरकू लागला होता. लांबून येणा-या व्यापा-यांच्यासाठी भोजनाची बैठक व्यवस्था याच ठिकाणी केलेली असावी असे उद्गार समुहातील कोणीतरी काढताच सर्वांनाच भुकेची जाणीव झाली आणि भोजन आटपून घेतले आणि पुढे बाजारपेठेकडे निघालो. बाजारपेठेचा विस्तार भव्य असून रुंद रस्ते, दुर्तफा दुकाने, प्रत्येक दुकानास माल साठवण्याकरीता मागे दोन खोल्या आणि खाली तळघर. सारे कसे एका दोरीत दिसत होते. दुकानांची उंची इतकी होती की घोड्यावर बसल्या बसल्या सहज माल खरेदी करता आला पाहिजे अशी रचना केलेली. बाजारपेठ पाहून झाल्यावर आम्ही सर्वजण टकमक टोकाकडे निघालो. बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरलो, जाताना मध्येच एका दारूच्या कोठाराचे अवशेष नजरेस पडले, ते पहात पहात जसजसे टोकाकडे जावे तसतसा रस्ता निमुळता झाला. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा दिसला. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगून सर्वांना फोटोत टिपले. टकमक टोकावरती कडेलोट करणा-या गुन्हेगारांना शिक्षा जरी सुनावली तरी त्यांची अवस्था किती भयानक होत असेल हे टकमक टोक पाहिल्यावर कळले. टकमक टोकाकडून आम्ही आता जगदिश्वराचे दर्शन घेऊन मंदिराच्या मागच्या बाजूला येवून छत्रपतींच्या समाधी स्थळाकडे वळलो. महाराजांचा मृत्यू ३ एप्रिल १६८० रोजी झाला. समोरच समाधीच्या अष्टकोनी आकारातील चौथ-यावर घुमटकार बांधणी केलेल्या समाधीचा जिर्णोद्धार १९२६ साली केल्याची नोंद पाहीली. सर्वांनी आपल्या छत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेतले. कितीतरी उन, वादळे, पाऊस अशा नैसर्गिक संकटांना झुंज देऊन ही समाधी निर्धास्त पणे आजही उभी आहे. एका मानवी नितीमुल्यांची मुर्तिमंत खाण याच ठिकाणी गुप्त झाली होती. भावनाविवश झालेले मन सावरले आणि हा रायगड किल्ला ज्यांनी बांधला ते हिरोजी इंदलकरांच्या पायरीचे दर्शन घेतले. दर्शन घेऊन आता परतीचा प्रवास जवळ आल्याची जाणीव झाली.
जो जो या महाराष्ट्र भूमीत जन्मला,
शिवशंभूच्या विचारांचा पाईक झाला.
एकदा तरी याचि डोळा याचि देही
महातिर्थ, महाविद्यापीठ रायगड पहावा..
राजमाता जिजाऊंची महती सर्वश्रुत आहेच. त्यांच्या कीर्तीचा सुगंध अखंड भारतवर्षात तसेच संपूर्ण जगतात सदैव दरवळत आहे. तो तसाच दरवळत राहील. तेजस्वी व अफाट बुद्धीमत्ता असलेल्या जिजाऊंचे पाचाड येथील समाधी स्थळावर जाऊन दर्शन घेतले आणि निसर्गरम्य खेड तालुका आयोजित रायगड मोहिमेची सांगता करण्यात आली...
मोहीमेची जरी सांगता झाली तरी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याच पराक्रमाच्या शौर्याच्या चर्चा सुरू होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वगुणसंपन्नता, विचार आचारांचे अधिष्ठान, देदीप्यमान कार्यकर्तृत्व, ध्येयाबद्दल आसक्ती, दूरदृष्टी, समाजसंघटित ठेवण्यासाठी संघटन कौशल्य, अशा कैक रत्नांचे भांडार म्हणजे शिवरायांचे व्यक्तीमत्व. हे व्यक्तिमत्व ज्याला उमजले, समजले, उलगडले, त्याचे समाजातील स्थान कोणीच हलवू शकत नाही. त्याला हरवू शकत नाही. किती किती थोरवी वर्णावी, किती गुणगान गावं आपल्या या शिवबांचं..! आजही पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंग्लंड, अमेरिका, जपान, मॉरिशससारख्या राष्ट्रांमध्ये राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात संदर्भासाठी छत्रपती शिवाजी महाराज शिकविले जातात. कुणाही राष्ट्राभिमानी माणसाला प्रभावीत करणारे असे हे आमचे महाराजे, छ. शिवरायांचे कर्तृत्व एवढे अफाट आणि उंच आहे की, त्यापर्यंत पोहोचणे अशक्यच आहे. तरीही त्यांच्या सावलीत राहून स्वतःचा उद्धार करवून घेणे सहज शक्य आहे. म्हणूनच आजच्या घडीलाच नव्हे तर येणा-या पिढय़ांनाही छ. शिवाजी महाराज कळायला हवेत. कारण छ. शिवाजी महाराज ही केवळ एक व्यक्ती नसून तो विचार आहे, सिद्धांत आहे, आणि सिद्धांत हा कधीही कालवश होत नाही. शिवाजी महाराज आजही अजरामर आहेत आणि जोपर्यंत ही पृथ्वी, हे सुर्य-चंद्र, तारे आहेत तो पर्यंत अजरामर राहतील.
शिवरायांचे आठवावे स्वरुप!
शिवरायांचा आठवावा साक्षेप!
शिवरायांचा आठवावा प्रताप!
भूमंडळी!!
जय भवानी जय शिवाजी...
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१
Wednesday, 21 April 2021
होळकर वाडा काठापूर
सातबा-याच्या काटेरी कचाट्यात अडकलेली मल्हारराव होळकरांची "दुर्लक्षित" ऐतिहासिक वास्तू, काठापूरचा वाघवाडा.
संदीप राक्षे✍🏻
सुंदर कलाकृती पाहूनी
आज मी धन्य झालो
दगडाच्या काळजाचे
गाव मी पाहूनी आलो..
तीन चार दिवसापूर्वी फेसबुकला काठापूर ता. आंबेगाव जि पुणे येथील मल्हारराव होळकर यांनी बांधलेला वाघ वाडा ही पोस्ट व फोटो पाहिले, त्या पोस्ट मधील ऐतिहासिक वास्तूंचे फोटो पाहिले अन तीच वास्तू पहाण्याचा मोहच जडला, तीव्र इच्छा झाली. दिवस, रात्र, ध्यानी, मनी तीच वास्तु आठवू लागली. नजरेसमोर वारंवार दिसू लागली. आता ती वास्तू साक्षात पाहिल्याशिवाय काहीच गत्यंतर नव्हते. इकडे सारखा भटकतो म्हणून प्रत्येक जण मला लेक्चर देत होता. आता महिना दोन महिने तरी कुठे फिरायचे नाही, असा निर्धार केला होता. पण आठ दिवसही नीट गेले नाही. माझा निर्धार मीच मागे घेतला, अन सोबत मारूती तायनाथ यांना आळंदीतून घेऊन आंबेगावचा रस्ता धरला. शेल पिंपळगाव मार्गे कन्हेरसर, पाबळ, खडकवाडीहून आम्ही काठापूरला पोहचलो. आंबेगाव तालुका शेती उत्पन्नाच्या बाबतीत अग्रेसर असणारा तालुका, त्यामुळे इथले सर्व शेतकरी बंधू भरपूर श्रीमंत, कॅनलचे पाणी आणि घोडनदीच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पाटाला पाणीच पाणी दिसत होते. हिरव्यागार शेतीमुळे वातावरण प्रफुल्लित दिसत होते. काठापूरच्या वेशीत पोहचलो भव्य अशा कमानींने आमचे स्वागत केले. दगडातील भव्य प्रवेशद्वार त्याला लाकडी दरवाजे परंतु प्रवेशद्वाराचा मधला भाग पडून गेल्याने दोन बाजूला विभक्त अशी कमान पाहून आम्ही मारूती मंदिराजवळ आलो तिथे गाडी लावली. अन पायी पायी भुईकोट गडाकडे निघालो. वाड्याच्या जवळ आलो तर प्रवेशद्वारात आक्राळ विक्राळ सुबाभळीने संपूर्ण प्रवेशद्वार अडवलेले, एका बुरूंजाच्या कडेकडेने येड्या बाभळीच्या फांदया चुकवत चुकवत कसा तरी वाड्यात प्रवेश मिळवला, वाडाच्या आतले दृष्य पाहून तर खालीच बसलो, संपूर्ण वाड्यात येड्या बाभळी व टणटणीची झुडप थोडी सुद्धा जमीन दिसत नव्हती. बुट असूनही काटे टोचत होते. हळुहळू पाय टाकीत वाड्याच्या मध्यभागी आलो. काही ठिकाणी अरुंद असे खंदक होते त्यातून डोकावल्यावर तळघर व त्यांचे नक्षीकाम दिसत होते. छोटी छोटी भुयार दिसत होती तळघरात जाण्याचा मार्ग दिसायचा, नक्कीच अद्भुत असे काहीतरी खाली पण असणार याची खात्री होती. वरचे वातावरण पाहूनच पुढे जाण्याचे धाडस होईना. मनात सारखा एकच प्रश्न उद्भवत होता. इतकी अद्भुत ऐतिहासिक वास्तू अन तिची ही दूरवस्था कशामुळे झाली असेल. गाव इतके जवळ असूनही वाड्यात जायला रस्ता सुद्धा नाही. गावातले चिटपाखरू पण या वाड्यात फिरकत नसावे याची जाणीव हे सारं दृष्य पाहून झाली. चारीबाजूनी भव्य बुरूंज ते सुस्थितीत होते. वाड्याच्या प्रवेशद्वारावरील घडीव दगडांचे काम व्यवस्थित होते. हिंदवी स्वराज्याचे सरदार मल्हारराव होळकर यांनी हा वाडा १७५० साली बांधला होता. पानीपतच्या युद्धात सरदार संताजी वाघ हे मरण पावले त्यानंतर हा वाडा मल्हारराव होळकर यांनी १७६५ साली सरदार संताजी वाघ यांच्या वंशजांना दिला. त्यानंतर ते आजपर्यंत हा वाडा वाघ वाडा म्हणुन प्रसिद्ध झाला. इतक्या मोठ्या वैभवाची साक्ष सांगणारा हा वाडा आज ख-या अर्थाने धारातीर्थ पडला आहे. अखेरचा श्वास घेत आहे. आज अशा वास्तू खूप दुर्मिळ आहेत हेच आपल्या लक्षात येत नाही हे खरच दुर्दैव आहे. वाड्याची ती दयनीय अवस्था पाहून दु:खद अंतःकरणाने वाड्याच्या बाहेर पडलो. काही अंतरावर एक समाधी मंदिर आहे ते पाहिले तेथून आम्ही विष्णू व रुक्मिणी अशी दोन वेगवेगळी मंदिर आहेत तिथे आलो. ती दोन्ही मंदिर अशीच झाड झुडपांनी वेढलेली नजरेस पडली. समोरच्या बाजूला जाई पर्यंत आम्ही मंदिराकडे लक्ष दिले नाही. मंदिराच्या समोर आलो अन मंदिर पाहून अवाकचं झालो. पृथ्वीवरही स्वर्गातली मंदीर आहेत याची जाणीव झाली. नेत्रदीपक अशी कलाकुसर पाहीली अन माझा माझ्याच डोळ्यावर विश्वास बसेना, मंदिराच्या पाय-या चढून प्रवेशद्वारात आलो, अन क्षणभर डोक्याला हात लावून खालीच बसलो. किती सुंदर मंदिर किती अप्रतिम कलाकुसर, तरी पण या मंदिरांच्याकडे त्या वास्तुकडे येथील स्थानिकांचे इतके दूर्लक्ष, या ऐतिहासिक वास्तुंची इतकी भयानक विटंबना पाहून डोळे पाणावले, तिथेच मुटक मारून त्या दगडावरील कोरीव कलाकुसरीकडे पहात शांत बसलो. भावनांना आवर घातला, पुन्हा उठलो त्या प्रत्येक नक्षीकामांवर कोळ्यांच्या जाळ्यांनी वेढा घातला होता. शक्य तेवढ्या जाळ्या काढल्या. पाषाणावरील कोरीव काम लाकडांवर कोरल्या सारखे दिसत होते. अनेक फुलांची नक्षीकाम त्या मंदिरावर कोरले होते, मंदिराच्या चारी बाजूंनी कोरलेले खांब मंदिराचे सौंदर्य वाढवित होते. मंदिराच्या गाभाऱ्यात भग्न अवस्थेत काही मुर्ती पडल्या होत्या. दोन्ही मंदिरात मुख्य मुर्ती नव्हत्या, रुक्मिणी मातेच्या मंदिरात अलिकडच्या काळात दत्त महाराजांची मुर्ती बसवलेली दिसत होती. मंदिराच्या कळसावरील काही भाग जीर्ण झाल्याने काही पडलेला आहे. साक्षात विश्वकर्माने ही मंदिर साकारली असावीत याचा वेळोवेळी प्रत्यय ही मंदिर पहाताना येत होता. मंदिर पहात असताना तेथून काही गावकरी चालले होते त्यांना थोडे हटकवले अन मंदिराच्या विषयी विचारले पण प्रत्येकाने तिरस्कार भावनेने उत्तर दिले. आमच्या काहीच लक्षात येईना. याच वास्तु दुसरीकडे असत्या तर जागतिक ऐतिहासिक स्थळ म्हणून जगप्रसिद्ध झाले असते. इथल्या स्थानिकांची या स्थळांबद्दल ही प्रतिक्रिया म्हणजे कुठेतरी सातबा-यात ही ऐतिहासिक वास्तु अडकल्याचे लक्षात येते. एखादयाच्या नावावर हा सातबारा असणार आणि तो या वास्तुवर हक्क सांगत असणार. जोपर्यंत या वास्तू जमीनदोस्त होत नाही तोपर्यंत हा मालक वाट पहाणार एकदा जमीनदोस्त झाल्या की फुकायला मोकळा, नक्कीच ही मानसिकता असणार, नाहीतर इतक्या भव्य वास्तु दुर्लक्षित राहूच शकत नाही. खरतर स्थानिक पुढारी व युवा कार्यकर्त्यांनी या पवित्र वास्तु जतन करायला हव्यात, यासाठी सरकार दरबारी आंदोलन करायला हव, अशा दुर्लक्षित वास्तुंच्या मालकी हक्क सांगणा-यांना कुठेतरी फुटकळ जागा देऊन या ऐतिहासिक वास्तू सोडवायला हव्यात. याच परिसरात एक श्रीमंत साखर कारखाना आहे, त्यांनी ही ऐतिहासिक वास्तु दत्तक घेऊन जागतिक ऐतिहासिक व पर्यटन स्थळ निर्माण करायला पाहिजे. घोडनदीच्या किनाऱ्यावरील ही ऐतिहासिक वास्तू पर्यटनास चालना देणारी आहे. त्याच बरोबर हा ऐतिहासिक ठेवा पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शन करणारा ठरायला हवा. आज अब्जो रूपये घालविले तरी अशा वास्तू तयार होणार नाहीत. आज आपण पहातो करौडो रू खर्च करून सिमेंटची मंदीर आपण उभी करीत आहोत. दगडावरची कलाकुसर करणारा आज कोणीच मायका लाल या पृथ्वीतलावर जिवंत नाही. म्हणून या वास्तुतरी जिवंत ठेवायला हव्यात. महाराष्ट्रातील अशा दुर्लक्षित पुरातन वास्तूंचे महाराष्ट्रातील प्रत्येक जण वारसदार आहे. आपण स्वतः वारसदार समजूनच या ऐतिहासिक वास्तूंचे जतन, संगोपन करायला हवं.
माझी कळकळीची विनंती आहे आंबेगावकरांना आपल्या भागातील हे वैभव, हा ऐतिहासिक ठेवा वाचवा त्याचे जतन करा...
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१
Thursday, 4 March 2021
बगलामुखी देवी
माझी सहल "हिमाचल"
भक्तांचे संकट निवारण करणारी माता "बगलामुखी देवी". संदीप राक्षे✍🏻
ज्वालादेवीचे दर्शन घेऊन आम्ही माता बगलामुखी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी निघालो. हे मंदिर ज्वालादेवी पासून २५ किलोमीटर अंतरावर पठाणकोट रस्त्यावर घनदाट जंगलात कौटला पर्वताच्या पायथ्याशी आहे..
हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्हय़ातील वनखंडी गावातील माता बगलामुखी मंदिर हे ऋषी मुनींच्या तपश्चर्येची पवित्र भूमी आहे.
आपल्या सृष्टीचे निर्माते ब्रम्हदेवांचा ग्रंथ एका राक्षसाने चोरला व तो पाताळात जाऊन लपून बसला, त्या राक्षसाला एक वरदान होते ते असे की त्या राक्षसाला पाण्यात देव किंवा मानव पाण्यात त्याला मारू शकत नव्हते. त्यामुळे ब्रम्हदेवाने माता भगवती यांची आराधना केली त्यामुळे भगवती देवी बगळ्याच्या रूपात प्रकट झाली. व तिने त्या पाताळात लपलेल्या राक्षसाचा वध करून ब्रम्हदेवांना तो ग्रंथ पुन्हा मिळवून दिला. त्यानंतर पांडवानी सुद्धा या बगलामुखी देवीची खूप आराधना केली आहे. लढाईत जिंकण्यासाठी व शक्ती प्राप्त करून घेण्यासाठी विशेष पुजा केल्याचा उल्लेखही येथील दगडावर कोरलेल्या शीलालेखावरून समजतो. अज्ञात वासात असताना पांडवांनी माता बगलामुखीचे हे मंदिर एका रात्री बांधलेले आहे.
बगलामुखी देवीला माता पिंताबरी या नावाने सुद्धा ओळखले जाते, कारण देवी हळदीच्या पाण्यात प्रकट झाली होती. त्यावेळेस त्या संपूर्ण पितरंगाच्या म्हणजे पिवळ्या रंगाच्या दिसत होत्या म्हणून देवीला पिवळा रंग खूप पसंत आहे. पिवळी कपडे, पिवळी फुल हे देवीला विशेष करून आवडतात. या देवीच्या दर्शनाला इंदिराजी गांधी, प्रणव मुखर्जी, प्रल्हाद मोदी, अमर सिंह, राज बब्बर, गुरुदास मान, गोविंदा असे अनेक सेलेब्रिटीज या मंदिराला भेट देऊन गेले आहेत. अनेक विधी करून संकट नाश, धन दौलत पैसा यासाठी अनेक भाविक येथे देवीला येवून साकडं घालतात त्यांची मनोकामना पूर्ण होते. आम्ही पण मनोभावे दर्शन घेऊन पठाणकोट कडे रवाना झालो...
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१
११/०२/२०२१
Tuesday, 23 February 2021
ज्वालादेवी..हिमाचल
माझी सहल "हिमाचल"
मनोकामना पूर्ण करणारी "ज्वालादेवी"
संदीप राक्षे ✍🏻
गेली कित्येक वर्ष ज्वालादेवीला जाण्याची इच्छा होती, अनेक दिवसांचे स्वप्न होते ते स्वप्न फेब्रुवारी २०२१ मधे पुर्णत्वास आले होते. सिमला ते ज्वालादेवी हे अंतर १७३ किलोमीटर होते. सलग दोन दिवसांची धरती आणि आकाशाच्या मध्यभागाची, धवल निसर्गाची सहल संपवून, आम्ही सपाट भाग असणा-या कांगडा जिल्ह्य़ात जमीनीवर पोहचलो होतो. ज्वालादेवीला जाताना रस्त्यात अर्कीचा खाजगी किल्ला आहे. तो पण आम्ही पाहिला, शाही पाहुणे आल्याने आम्हाला तो किल्ला दूरूनच पहावा लागला. त्या किल्ल्यात बाॅलिवूडच्या अनेक चित्रपटांची शूटिंग झाली आहे असे तेथील सुरक्षा रक्षकाने सांगितले. बाहेरूनच त्या किल्याचा आनंद घेऊन आम्ही ज्वाला देवीचा रस्ता धरला. ज्वालादेवीची आख्यायिका खूप वर्षांच्यापासून माझ्या मनावर कोरलेली होती. प्रवास करताना आणि आज साक्षात मातेच्या दर्शनाला जाताना ती कथा मन पटलावर पुन्हा आठवू लागली. गाडीचे सारथ्य संजय जाधव हे करीत असल्याने निसर्गाचा आनंद घेत या कथेचा उलगडा करीतच प्रवास आनंदात सुरू होता. शिवपुराणात कथेनुसार माता सतीचे पिता दक्ष यांनी महायज्ञाचे आयोजन केले होते. त्या महायज्ञाला देव देवता ऋषीं मुनींना आमंत्रित करण्यात आले होते. फक्त भगवान शंकरांना निमंत्रण दिले नव्हते, त्यामुळे माता सती म्हणजे पार्वती देवींना राग आला होता. कारण विचारण्यासाठी त्या रागानेच आपल्या पित्याकडे आल्या, भगवान भोलेनाथांनी पार्वतीमातेला न जाण्यासाठी बरीच विनवणी केली तरी सती मातेने त्यांचेही ऐकले नाही. पित्याला जाब विचारीत असतानाच पित्याकडूनच सती मातेला अपमानित व्हावं लागलं, मातेला खूप राग आला आणि त्यांनी यज्ञातच उडी मारून आपले प्राण दिले, यज्ञात भस्म होताच त्यातून एक ज्योतीपूंज तयार झाले व ते ज्योतीपूंज आकाशात जात असताना कसेटी पर्वतावर ते ज्योतीपूंज पडले, तेव्हापासून कांगडा जिल्हय़ातील कसेटी गावातील पर्वतावर ती ज्योती अजूनही तेवत आहे. कालांतराने या दिव्यत्वाचे ज्वालादेवी असे नामकरण झाले तसेच एक्कावन्न शक्तीपीठांच्यात ज्वालादेवी शक्तीपीठ म्हणून गणले जाऊ लागले. ही मनात चालणारी कथा संपली ती ढाब्यावर गाडी थांबल्यावर कारण पेटपूजा ही महत्वाची होती. गाडीतही भक्ती गीतांचे फोल्डर सुरू असल्याने वातावरणही भक्तिमय झाले होते. जेवण उरकले, पुन्हा प्रवास सुरू झाला मध्यरात्री दिडच्या सुमारास आम्ही. कसेटी गावात पोहचलो, मारूती तायनाथ यांनी फोनवरूनच एक धर्मशाळा मुक्कामासाठी बुकिंग करून ठेवली होती. पडल्या पडल्या शांत झोप लागली. पहाटेच उठलो साक्षात ज्योतावाली मातेच्या दरबारात पोहचल्याचा आनंद होताच. प्रात:विधी उरकला, मस्त ताजेतवाने होऊन मंदिराचा रस्ता धरला. मनातल्या मनात मला येत असलेले कनकधारा स्त्रोत्र सुरू होते...
अंगम हरे पुलकभूषणमाश्रयंन्ती!
भृंगांगनेव मुकुलाभरणं तमालमं!
अंगीकृताखिलविभूतिरपांगलीला!
मांगल्यदास्तु मम मंगलदेवताया!
कोणत्याही शक्तीपीठा जवळ गेलो की हे कनकधारा स्त्रोत्र आवर्जून आठवते, पहिले हे स्त्रोत्र पाठ होते, आता यातील काही ओळीच आठवतात मग त्याच मनातल्या मनात गुणगुणतो. धर्मशाळावाल्याने देवीला जाणारा मधला मार्ग सांगितला होता. त्याच पायवाटेने मी संजय जाधव, मारूती तायनाथ, राजेश क्षीरसागर चालत होतो. पर्वताच्या पायथ्याशी हे मंदिर असल्याने थोडे चालावे लागले, मनात आनंदाला उधाण आले होते, जे स्वप्नी दिसत होते, ते आज डोळे भरून साक्षात पहाणार होतो. ज्वालादेवीच्या मंदिराच्या पाय-या सुरू झाल्या अन कंठ दाटून आला. भक्ती आणि भाव जिथे उत्पन्न होतो तिथे आपोआपच कंठ दाटून येतो. डोळ्यात आनंदाश्रूनी दाटी केली होती. क्षणाचाही विलंब न करता देवीच्या दर्शनाच्या रांगेत उभे राहीलो. हात जोडलेले, डोळे मिटलेले ज्वालादेवीच्या तेजोमय रूपात लीन होऊन गेलो. एक एक माणूस पुढे सरकत होता, तस तसे माझ्या डोळ्यांची पापणी ताणली जात होती. कारण ज्वालादेवीचे ज्योतीपुंज डोळ्यात साठवून हदयात बंदिस्त करायचे होते. कोरोनाचे संकट असल्याने दूरवरूनच माता ज्वालादेवीचे दर्शन झाले. युगेनयुगे तेजाळत असलेले हे दिव्यस्वरूप पहाताना पूर्ण लीन झालो होतो. अखंड तेजाळत असलेल्या दिव्यस्वरूप सती मातेचे मनभरून दर्शन घेतले. मंदिराच्या बाहेर आलो, कळसाचे दर्शन घेतले.. आजवर मुर्ती स्वरूपात असणा-या देवी देवतांचे दर्शन घेत होतो आज ख-या अर्थाने दिव्यस्वरूप व अद्भुतेचे दर्शन झाले होते. ज्वालादेवीचे दर्शन घेऊन गोरक्षनाथ मंदिराचे दर्शन घेतले तिथे पण असाच एक चमत्कार आहे, एक खोल खड्डा आहे त्या खड्याच्या वरती एक ज्वाला आहे ती पण सतत पेटलेली असते. त्या खड्यातील पाणी सतत उकळत असते. अशा दैवी शक्तीचे दर्शन घेऊन खाली आलो. ज्वालादेवीच्या मंदिराच्या बाजूला बादशाह अकबराने अर्पण केलेले सोन्याचे छत्र एका पेटीत ठेवलेले दिसते. त्याविषयी जरा कुतुहल होते कारण त्यावेळेसच्या मुस्लीम आक्रमकांनी भारतातील मंदिर संपूर्ण उध्वस्त केलेली आज आपल्याला संपूर्ण भारतात पहावयास मिळतात.. अशाच प्रकारे या मंदिरावर पण बादशाह अकबराने अतिक्रमण केले होते या दिव्य ज्योतीला विझविण्याचा वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केला. कधी संपूर्ण नदीच या ज्योतीच्या बाजूने फिरवली परंतु ही ज्वाला विझली नाही. सैनिकांच्या व्दारे तिला गाडण्याचा प्रयत्न केला तरी ती विझली नाही.. नानाप्रकारे प्रयत्न करूनही ज्वालामाता विझली नाही. तेथील मधमाशांनी मोगली सैन्यावर हल्ला चढवून सैन्याला नामोहराम केले. अखेर अकबर बादशाह ज्वालादेवीला शरण आला व त्याने हे सोन्याचे छत्र देवीला अर्पण केले. अशा अनेक कहाण्या या ज्वालादेवीशी निगडित आहेत. विज्ञानच काय पण पुर्वीच्या काळातील महासत्तेला सुद्धा गुडघे टेकायला लावणारी माता "ज्वालादेवी".. खरतर माझे खूप दिवसांचे स्वप्न पूर्ण झाले होते. ज्वालादेवीला समस्त जनांच्या कल्याणाचे दान मागितले, पुन्हा एकदा कळसाचे दर्शन घेतले, योग आलातर पुन्हा दर्शनास येईल अशी इच्छा प्रकट केली अन जड अंतःकरणाने मंदिराच्या पाय-या उतरू लागलो..
जगी तुझ्या लेकराला तुच सुखी ठेव!
जगी तुझा महिमा तुझी किर्ती मोठी!
दु:खामध्ये हाक मारीता तुच रक्षणा धाव!
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१
११/०२/२०२१
पेडगावचा धर्मवीर गड
शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...

-
"परिक्रमा ब्रम्हगिरीची निवृत्तीरायाची" आळंदीत दर्शना साठी सिद्धबेटावर गेलो होतो. संध्याकाळची वेळ होती. गाडीवरून खाली उतरलो माऊलीं...
-
नको नको मना गुंतू मायाजाळी* तोरणमाळ मध्ये सकाळचा प्रहर होता पहाटेच सुर्य उगवतीचे दर्शन घेऊन, तलावाचे विहंगम दृश्य पहाण्यात मग्न होतो. रात्...
-
*---आठवण----* *बायको मिळाली जरी पोळी मधाची* *आठवण ठेवावी तु आईच्या दुधाची !* *कडेवर खांद्यावर तु खेळलास वेड्या* *दिनरात मांडीवर त्या लो...