Monday, 18 December 2017

परिक्रमा ब्रम्हगिरीची!

"परिक्रमा ब्रम्हगिरीची निवृत्तीरायाची"
आळंदीत दर्शना साठी सिद्धबेटावर गेलो होतो. संध्याकाळची वेळ होती. गाडीवरून खाली उतरलो माऊलींची असणारी कुटी कडे चालु लागलो. त्याच वेळी माझे बॅकेचे सहकारी मित्र ह.भ.प मनोहर महाराज सुभेकर यांचा फोन आला, त्यांनी विचारले त्रिंबकेश्वरला येता का? थोडा शांत झालो मन भरून आले कसलाच विचार न करता हो म्हणालो..
वाचे म्हणता गंगा गंगा!
सकळ पापे जाती भंगा!!
दृष्टी पडता ब्रम्हगिरी!
त्यासी नाही यमपुरी!!
कुशावर्ता करिता स्नान!
त्याचे वैकुंठी रहाणे!!
नामा म्हणे प्रदक्षीणा!
त्यांच्या पुण्या नाही गणना!!
दिनांक 15/1/15 रोजी सांयकाळी 7 वाजता आम्ही त्रिंबकेश्वर ला जाण्यासाठी पिंपरी हुन निघालो. सोबत पिंपरीतील तुकाराम महाराज पालखी सोहळयातील जोग महाराज पायी दिंडीतले अनेक  जण होते. त्यामुळे जाताना भक्तीमय वातावरणातच आम्ही मध्यरात्री 2 वाजता त्रिंबकेश्वर ला पोहोचलो. षौष कृ. षटतिला एकादशी व निवृत्तीनाथांच्या समाधी सोहळादिन या ब्रम्ह मुहूर्तावर आम्ही कुशावर्ता मध्ये स्नान केले. त्रिंबकेश्वराचे दर्शन घेऊन पहाटे तीन वाजता परिक्रमेसाठी प्रारंभ केला,  विणा मृदुंग टाळाच्या गजरात पायी परिक्रमेला सुरवात केली. सर्वांच्या मुखात निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, हा मंत्र सुरू होता. अशा मंत्र मुग्ध वातावरणात पाउले चालु लागली. आजुबाजुला घनदाट जंगल पुसटसे दिसत होते. पायाकडे पाहिले तर अंधार दिसत होता, पुढे चालणार-याच्या पावलावर पाऊल ठेवुन वयोवृद्ध मंडळी व आम्ही चालत होतो. आकाशा कडे पाहिले तर सर्वत्र चांदण्यांचे विलोभनिय दृष्य दिसत होते. माऊलींच्या नाम स्मरणाने डोंगरातील झाडात सुद्धा माऊलींची प्रतिकृति दिसत होती असा भास होत होता. मध्येच डोंगरा आडुन चंद्राचे अर्धदर्शन होत होते. म्हातारी माणसे हातात काठी घेऊन मुखात नाम घेत वृदधपणावर सुद्धा मात करीत होती डोळ्यांना दिसत नव्हते तरी एकमेकांच्या आधाराने मार्गाक्रमण करीत होती, त्यांना पाहुन उत्साह वाढत होता. पुढे पुढे चालता चालता ब्रम्हगिरी पर्वत जवळ जवळ दिसत होता, ब्रम्हगिरीच्या दोन सुळक्यांच्या मधोमध एक चांदणी तीव्र चमकत होती प्रत्येकाने दृष्य पाहिले मनात क्षणभर आले साक्षात निवृत्ती नाथांनीच या चांदणी च्या रूपात दर्शन दिले सर्वांचे हात आपोआप जोडले गेले. सर्वजण आनंदी मनाने या दृष्याची चर्चा करीत होती. पाऊल चालत होती मन नामस्मरणात गुंतले होते. पहाटेचा गार वारा आता अंगाला झोंबत होता. दुरवरून कोंबड्याची बांग ऐकु येत होती पण मुखात चालल्या नामघोषाणे ती त्यामध्येच विरत होती. तांबड फुटल होत अंधार दुर होत होता. पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झाला होता. आमच्या समोर गौतम ऋषींचा आश्रम दुर वर डोंगरात दिसत होता तो डोंगर पार करायचा होता. झपाझप पाऊले टाकित डोंगराच्या पायरी पर्यंत पोहचलो होतो हळूहळु डोंगर चढु लागलो. मध्येच खाच खळगे पायांना ठेचा लागत होत्या. मध्येच मोठ मोठे दगड पार करून अखेर गौतम ऋषींच्या मंदिरात पोहचलो एकीकडे सुर्यनारायण प्रकट झाले होते हे अविस्मरणीय दृष्य पाहुन सगळा शीण दुर झाला होता. दर्शन घेऊन पुढे निघालो आता गारव्याची जागा उन्हाने घेतली होती. अंगातुन घामाच्या धारा निघत होत्या. गळा सुकला होता, पण परिक्रमा पुर्ण होई पर्यंत बसायचे नाही व पाणी सुद्धा प्यायचे नाही हा संकल्प मनात केला होता, बरेच ठिकाणी भावीक थांबले होते कुणी नास्ता करीत होते. कुणी आराम करीत होते मलाही वाटायचे पण मन मानत नव्हते. पुढे चालत होतो आता माझा चालण्याचा वेग कमी झाला होता माझ्या बरोबरचे सर्वजण पुढे गेले होते मी एकटाच चालत होतो मुखात ॐ नमो ज्ञानेश्वराय हा जप सुरू होता. पायांच्या तळव्याला आग होत होती जाणवत होती पण नामाने ती सुद्धा शांत होत होती. आता शरीरात ताकद नव्हती पाय वाकडे पडु लागले होते. बरोबर कुणीच नव्हते बरोबर होती अनोळखी पण माणुसकीचा झरा असणारी माणसे  ती शब्दांनी आधार द्यायची आता थोडे राहिले आहे लवकर च पोहचाल थोडा आराम करा. पण नाही पाऊले थांबत नव्हती तळव्यांना आता फोड आले हे जाणवत होते. ते खुप दुखत होते. वेदना वाढत होत्या मनात येत होते हा कशासाठी इतका त्रास पण पुन्हा मनी परिक्रमा पुर्ण करण्याची आस. अंगातुन घामाच्या धारा सुरू झाल्या होत्या एखादी वा-याची झुळूक आली की चैतन्य संचारल्या सारखे चालु लागलो झपाझपा पाऊले पडत होती, अखेर त्रिंबकेश्वराचा कळस दुरवरून दिसला आणी सर्व वेदना शांत झाल्या पण अजुनही खूप चालायचे होते. मन खचत होते नाम प्रेरणा देत होते. पाय अडखळत होते घशाला कोरड पडली होती पण थांबायचे नाही हा संकल्प स्फुर्ति देत होता. आता  जिथे आमच्या गाड्या होत्या तिथ पर्यंत पोहोचलो होतो पाय खुप दुखत होते मनात आले आता गाडीत जाऊन आराम करावा. पण परिक्रमा अर्धवट राहिल संकल्प अपुर्ण राहिल तसाच चालत राहिलो. मंदिर जवळ दिसत होते पण पाय उचलत नव्हता. तरीही हळुहळु मंदिरा पर्यंत पोहचलो. त्रिंबकेश्वराला प्रदक्षीणा घातली कळसाचे दर्शन घेतले व परिक्रमा पुर्ण केली सर्व अंगात शक्ती आली होती सगळा शीण निघून गेला होता. पाय थंड पडले होते. पायांची आग शांत झाली होती  क्षणभर मंदिरात बसलो नवचैतन्य आता सर्व अंगात संचारले होते. परिक्रमा पुर्ण झाल्याने खुपच आनंद झाला होता.सकाळचे दहा वाजले होते 39 किलोमीटरची ब्रम्हगिरीची परिक्रमा करण्याचे भाग्य लाभले होते.
(शब्द अनुभवाचे-संदिप राक्षे.भोसरी)

No comments:

Post a Comment

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...