माझी सहल "हिमाचल"
भक्तांचे संकट निवारण करणारी माता "बगलामुखी देवी". संदीप राक्षे✍🏻
ज्वालादेवीचे दर्शन घेऊन आम्ही माता बगलामुखी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी निघालो. हे मंदिर ज्वालादेवी पासून २५ किलोमीटर अंतरावर पठाणकोट रस्त्यावर घनदाट जंगलात कौटला पर्वताच्या पायथ्याशी आहे..
हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्हय़ातील वनखंडी गावातील माता बगलामुखी मंदिर हे ऋषी मुनींच्या तपश्चर्येची पवित्र भूमी आहे.
आपल्या सृष्टीचे निर्माते ब्रम्हदेवांचा ग्रंथ एका राक्षसाने चोरला व तो पाताळात जाऊन लपून बसला, त्या राक्षसाला एक वरदान होते ते असे की त्या राक्षसाला पाण्यात देव किंवा मानव पाण्यात त्याला मारू शकत नव्हते. त्यामुळे ब्रम्हदेवाने माता भगवती यांची आराधना केली त्यामुळे भगवती देवी बगळ्याच्या रूपात प्रकट झाली. व तिने त्या पाताळात लपलेल्या राक्षसाचा वध करून ब्रम्हदेवांना तो ग्रंथ पुन्हा मिळवून दिला. त्यानंतर पांडवानी सुद्धा या बगलामुखी देवीची खूप आराधना केली आहे. लढाईत जिंकण्यासाठी व शक्ती प्राप्त करून घेण्यासाठी विशेष पुजा केल्याचा उल्लेखही येथील दगडावर कोरलेल्या शीलालेखावरून समजतो. अज्ञात वासात असताना पांडवांनी माता बगलामुखीचे हे मंदिर एका रात्री बांधलेले आहे.
बगलामुखी देवीला माता पिंताबरी या नावाने सुद्धा ओळखले जाते, कारण देवी हळदीच्या पाण्यात प्रकट झाली होती. त्यावेळेस त्या संपूर्ण पितरंगाच्या म्हणजे पिवळ्या रंगाच्या दिसत होत्या म्हणून देवीला पिवळा रंग खूप पसंत आहे. पिवळी कपडे, पिवळी फुल हे देवीला विशेष करून आवडतात. या देवीच्या दर्शनाला इंदिराजी गांधी, प्रणव मुखर्जी, प्रल्हाद मोदी, अमर सिंह, राज बब्बर, गुरुदास मान, गोविंदा असे अनेक सेलेब्रिटीज या मंदिराला भेट देऊन गेले आहेत. अनेक विधी करून संकट नाश, धन दौलत पैसा यासाठी अनेक भाविक येथे देवीला येवून साकडं घालतात त्यांची मनोकामना पूर्ण होते. आम्ही पण मनोभावे दर्शन घेऊन पठाणकोट कडे रवाना झालो...
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१
११/०२/२०२१