अद्भुत त्रिशूंड गणेश मंदिर,
पुण्याचे अपरिचित वारसास्थळ. संदीप राक्षे ✍🏻
भारतातील प्राचीन अद्भुत मंदिरात अतिशय तरल असा एक लोहचुंबकीय आकर्षण भाव असतो, आपण जर मनाच्या आध्यात्मिक कलानं चाललो तर, ज्या वाटेने जाण्याचा आंतरिक ध्यास आपण घेतलेला असतो त्याच ठिकाणी आपण पोहचणार याचा प्रत्यय आज पुन्हा मला आला. २८ ऑगस्ट २०२१ सुट्टीचा हा दिवस, साखर झोपेतून आज पहाटेच जाग आली होती, फेसबुक चाळीत पडलो होतो. तिथे त्रिशूंड गणेश मंदिराची सुंदर शिल्पाकृती असलेली एक व्हिडीओ पोस्ट दिसली, त्या पोस्टवर मी क्लीक केले. पुण्यातील दुर्मिळ अशा मी अपरिचित असलेल्या त्रिशूंड मंदिराची पोस्ट पाहून अक्षरशः भारावून गेलो होतो. पुण्यातला असूनही या मंदिराच्याविषयी अनभिज्ञ राहिलो याचे मला आश्चर्य वाटले. वेळ आली की स्वर्ग सुद्धा पायाशी लोळण घेतो, मला खूप आनंद वाटला. अंथरूणावरून चटकन उठलो, पटकन आवरून तयार झालो. आज पी एम पी एल च्या बसने प्रवास करून पुणे गाठायचे असे ठरवले होते. भोसरीहून पुणे कार्पोरेशनला जाणा-या बस मध्ये बसलो, पुणे कार्पोरेशनला उतरून पुढे रिक्षाने पुण्यातील सोमवार पेठेत पोहोचलो. रिक्षावाल्यांना सोमवार पेठ माहित होते, परंतू जगातील एकमेव असणारे त्रिशूंड गणेश मंदिर माहिती नव्हते. रिक्षावाल्याने मला कमला नेहरू हाॅस्पीटलच्या तिथे उतरवून दिले. तिथे असणा-या पानपट्टीच्या दुकानातील व्यक्तीला त्रिशूंड गणेश मंदिर कुठे आहे असे विचारले? तो म्हणाला सरळ जाऊन डावीकडे वळण घ्या, पुन्हा उजव्या बाजूला वळण घ्या तिथे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक दिसेल त्या बँकेच्या बाजूलाच त्रिशूंड गणेश मंदिर आहे. त्यांनी सांगितल्या प्रमाणे मी बरोबर त्रिशूंड मंदिराजवळ पोहचलो...
छत्रपती शिवरायांनी पुण्याच्या भूमीवर सोन्याचा नांगर फिरवला आणि ही भूमी पवित्र, पावन केली, अशा ऐतिहासिक पुण्यनगरीतील हे त्रिशूंड गणेश मंदिर. जलपर्णीने व्यापलेल्या एखाद्या तलावात कमलपुष्प उमलावे त्याचप्रमाणे सिमेंटच्या जंगलात अडकलेली काळ्या सुवर्णपाषाणातील त्रिशूंड गणेशाची ही शिल्पवास्तू उमललेली दिसत होती.
मुख्यप्रवेशव्दारावर भव्य गजलक्ष्मीचे शिल्प, ललाटबिंबावर गणेशाचे शिल्प गजलक्ष्मी शिल्पाच्यावरती शेषशायी विष्णू, प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस व्दारपालांचे शिल्प, त्यावर गजव्याल शिल्प, प्रवेशव्दाराच्या उंब-यावर दोन किर्तीमुख शिल्प. दोन्हीबाजूला घडीव दगडी खांब कुशलतापूर्वक कोरलेले दिसतात त्यावर घंटा धरलेले भारवाही यक्ष शिल्प पण दिसते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला देवकोष्ट कोरलेली दिसतात त्यामध्ये मुर्ती नाहीत. देवकोष्टकाच्या खाली दोन्ही बाजूस इंग्रज अधिकारी एका गेंड्याला साखळदंडाने जखडत आहे असे प्रतिकात्मक शिल्प कोरलेले दिसते, हे शिल्प या मंदिराचे एक आकर्षण आहे. याच शिल्पाच्या खाली, दोन्ही बाजूस हत्तींची झूंज चाललेली असे शिल्प कोरलेले दिसते. मुख्यप्रवेशव्दाराच्या दोन्ही कडेला खांबांचे शिल्प उजव्या बाजूला श्रीकृष्ण व डाव्या बाजूस श्रीविठ्ठलाचे शिल्प कोरलेले दिसते, याच खांबाच्या बाजूस दक्षिणेला व उत्तरेला रूक्मिणी मातेचे शिल्प कोरलेले पाहिले. प्रथम दर्शनीची ही अद्भुत शिल्पकला पाहून मंदिराला प्रदक्षिणा घालून मग मंदिरात प्रवेश करायचा असे ठरवले. मंदिराच्या दक्षिण बाजूस एक देवकोष्ट होते, त्यामध्ये नटराजाची सुबक मुर्ती कोरलेली होती तिचे दर्शन घेऊन मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आलो होतो. देवकोष्टात एक दुर्मिळ शिवलिंग पाहिले, त्या शिवलिंगावर शेषनागाने छत्र धरलेले होते, त्याच शिवलिंगावरील हंस आकाशात झेपावतानाचे शिल्प व खालच्या दिशेने मुसंडी मारणारा वराह असे दुर्मिळ शिल्प पाहून अक्षरश: थक्कच झालो होतो. शिवलिंग पाहून मंदिराच्या उत्तर दिशेला भैरवाचे शिल्प पाहून मंदिरात प्रवेश केला. सभामंडपातून मंदिराच्या अंतराळ भागात आल्यानंतर गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस देवकोष्ट, एका देवकोष्ठावर पोपट तर एकावर हत्ती अशी शिल्प कोरलेली दिसतात. गर्भगृहाच्या बाहेर दगडी कमान, त्यावर सुंदर नक्षीकाम, दोन्ही बाजूला साधू वेषातील व्दारपाल होते. कमानीच्या मध्यभागी एक शिल्प कोरलेले होते, एका बाजूला नंदी व एका बाजूला सिंह पण ते शिल्प कशाचे याचा उलगडा होईना. त्यासाठी मी इतिहास संशोधक व लेखक आशुतोष बापट सरांना त्या शिल्पाचे फोटो फेसबुकवर शेअर केले व त्या शिल्पाविषयी माहिती विचारली. त्यांनी दुस-या मिनिटाला मला त्या शिल्पाची माहीती पाठवली ती अशी, त्या शिल्पाला शिव पार्वती आलिंगन मुर्ती म्हणतात. शिव बसले असून त्यांच्या डाव्या मांडीवर पार्वती दिसतेय. एका बाजूला शिवाचे वाहन नंदी आणि दुसर्याबाजूला पार्वतीचे वाहन सिंह. शिल्पाबाबतची ही माहिती माझ्यासाठी अनमोल होती, मी आशुतोष बापट सरांचे आभार मानले. याच शिल्पाच्या वरती दोन संस्कृत व एक फारशी भाषेतला लेख दिसतो उंचावर असल्याने मी त्याचे फोटो काढले. हे सारे पाहून मी निवांत अंतराळातील गर्भगृहाच्या बाहेर बसलो. अंतराळ म्हणजे मंदिराचा मुख्य मंडप आणि गर्भगृह या दोघांच्या मधली चिंचोळी जागा. अंतराळात घटकाभर थांबून चित्त एकाग्र करायचं असतं. अंतराळातून त्रिशूंड गणेशाची मुर्ती अगदी स्पष्ट दिसत होती. जगाच्या पाठीवर कुठेच न आढळणारी ही दुर्मिळ त्रिशूंड गणेशाची मुर्ती पाहून मंत्रमुग्ध झालो होतो.
आवडे हे रूप गोजिरे सगुण!
पाहता लोचन सुखावले!!
आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे!
जो मी तुज पाहे वेळोवेळा!!
लाचावले मन लागलीस गोडी!
ते जीवे न सोडी ऐसे झाले!!
मयुरेश्वरला पाहून संत तुकाराम महाराजांची ही रचना, पं. आदिनाथ सटले यांचे शिष्य रामेश्वर सुपेकर यांनी मिश्र किरवानी या रागात गायलेला अभंग चाली सहीत आठवला. तीन सोंड असलेली मोरावर बसलेली बाप्पांची मूर्ती, मोराच्या चोचीत नाग, मुकुटावरसुद्धा नागाचे वेटोळे दिसत होते. गणेशाला सहा हात आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीत सुद्धा या सहा हातांचे वर्णन येते..
देखा षढ्दर्शने म्हणीपती! तेचि भुजांची आकृती!!
म्हणऊनी विसंवादे धरिती! आयुधे हाती!!
तरी तर्क तोचि परशु! नीतीभेदु अंकुशु!!
वेदांतु तो महारसु! मोदकाचा!!
गणेशाच्या वरच्या उजव्या हातात अंकुश धारण केलेला दिसतो, मधल्या उजव्या हातात शूल, खालच्या उजव्या हातात मोदकाचे पात्र दिसते. वरच्या डाव्या हातात परशु, मधल्या डाव्या हातात पाश दिसतो, खालच्या डाव्या हाताने मांडीवर बसलेल्या शक्ती देवतेला आधार दिलेला आहे. त्रिशूंड गणेशाची एक सोंड मांडीवर बसलेल्या शक्तीच्या हनुवटीला स्पर्श करीत आहे, दुसरी सोंड मोदकाच्या भांड्याला स्पर्श करताना दिसते, तिसरी सोंड मोराच्या डोक्यावर दिसते. गणेशाच्या आसनस्थानी रिद्धी व सिद्धी तसेच उंदीर मामा पण दिसत होते. त्रिशूंड गणेशाच्या पाठीमागे शेषशायी विष्णू शिल्प व गणेश यंत्राचे शिल्प कोरलेले दिसत होते. हे सार पहात असतानाच मंदिराचे पुजारी शिरीष शेंडे गुरूजी हे गणेशाची दुपारची आरती करण्यासाठी आले होते. त्यांना नमस्कार केला आणि या मंदिराची थोडी माहिती द्याल का? असे विचारले शेंडे काका हो म्हणाले आणू सांगू लागले. हे मंदिर मध्यप्रदेशातील धामपूर गावचे धनिक भीमगिरीजी गोसावी यांनी २६ ऑगस्ट १७५४ साली बांधले होते. राजस्थानी माळवा व दाक्षिणात्य वास्तुशैलीचा समिश्र वापर करून हे त्रिगुणात्मक गणेशाचे मंदिर उभारले. त्रिशूंड गणपतीच्या खाली एक तळघर आहे, तिथे दत्तगुरू गोसावी यांची समाधी आहे. दररोज गणेश मूर्तीला जो अभिषेक होतो त्या मूर्तीवरचे पाणी समाधीवर पडते आणि आपोआप त्या समाधीचा सुद्धा अभिषेक होतो. त्या तळघराचे वैशिष्ट्य म्हणजे तळघरात एक जिवंत पाण्याचा झरा असून तो झरा पाच मीटर खोल आहे. हे तळघर दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त उघडले जाते तिथे जाण्यासाठी मुख्यप्रवेशव्दारापासून एक भुयारी रस्ता आहे व दुसरा त्रिशूंड गणेश मुर्तीच्या उजव्या बाजूने एक भुयारी रस्ता आहे. हे ऐकतानाच माझ्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला होता. खरच सारंच अद्भुत पहायला व ऐकायला मिळत होत इतकी दुर्मिळ वास्तू आपल्या इतक्या जवळ असेल हे स्वप्नातही वाटले नव्हते. शेंडे काकांना श्रावणतल्या घरच्या पुजा असल्याने त्यांनी माहिती देण्याचे मध्येच थांबवून आपण आरती करूयात मला पुढे जायचे आहे. मी होकार दिला शेंडे काकांनी आरती म्हणायला सुरवात केली व मला बाजूची असणारी घंटा वाजवायला सांगितली...
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची!
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची!!
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची!
कंठी झळके माळ मुक्ताफळांची!!
जय देव जय देव जय मंगलमूर्ती!
आरती संपल्यावर शेंडे काकांनी गुळ खोब-याचा प्रसाद दिला. पुजेसाठी दुसरीकडे जायची तयारी करीत असतानाच त्यांना काही इतिहास आठवला ते पुन्हा सांगू लागले, पुर्वीच्या काळी त्रिशूंड गणपतीच्या तळघरात योगविद्येची साधना केली जायची त्यासाठी विशिष्ट खोल्यांची रचना तळघरात केलेली दिसते. धुम्रपान नावाची साधना इथे होत असे, हठयोगाचे साधक स्वतःला छताला उलटे टांगून घेत व खाली निखा-यामध्ये काही औषधी वनस्पती टाकल्या जात व त्यापासून निघालेला धूर ते नाकावाटे घेत असत. जे जे ऐकावे ते ते नवलच होते. खरतर अशा अद्भुत मंदिराचे, योग स्मारकाचे संवर्धन होणं गरजेचे आहे. या वास्तूला खरतर जागतिक दर्जा मिळायला हवा. एखाद्या वास्तूला जेव्हा जागतिक दर्जा प्राप्त होतो तेव्हा तो संपूर्ण मानवजातीच्या दृष्टीने महत्वाचा वारसा असतो. त्याचे जतन होते संरक्षण होते. खरतर आपल्या भारत देशात कोणत्याही देशात नसतील इतकी पर्यटनस्थळ आहेत, ऐतिहासिक वास्तू आहेत. परंतु भारतातील व जगातील पर्यटक त्यावास्तूपर्यंत आणण्यासाठी आपण तेवढे यशस्वी होऊ शकलो नाही ही शोकांतिका आहे. आपल्याला लाभलेला हा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीसाठी शिल्लक ठेवायचा असेल तर त्याचे काटेकोर पणे जतन होणं गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी जागृत होऊन प्रयत्न करायला हवेत...
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१