नको पैसा नको बंगला गाडी
निसर्गाच्या सान्निध्यात रमण हिच जीवाला गोडी.
रघुदादा तोरणमाळच्या जंगलात निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त विहार करणारा आझाद पंछी.
*निसर्गासारखा नाही रे सोयरा*
*गुरू सखा बंधू मायबाप*
*त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप*
*मिटती क्षणात आपोआप*
आम्ही तोरणमाळला मच्छिंद्रनाथ गुहे कडे जात असताना रघुदादांची भेट झाली. उन्हात फिरून त्वचा राकट झालेली थंडी पासुन वाचण्यासाठी अंगात स्वेटर,आणी लंगोटी असा वेष परिधान केलेले, साधारण पंच्याऐंशी वय असलेले हे गृहस्थ. आम्ही त्यांच्या जवळ गेलो त्यांनी गाठी सकट नमस्कार केला. आम्ही पण नमस्कार केला. कोणत गाव बाबांनी विचारले? मी पुणे सांगितले थोरात सरांनी झोडगे नाशिक सांगितले आणी गजाननदादांनी आळंदी सांगितले. या गावा मधील एकही गाव त्यांच्या परिचयाचे नव्हते कारण जन्मापासूनच या पर्वतावर या डोंगर द-यातच आयुष्य गेलेले. बाबा बोलु लागले एक एक आयुष्याचा पैलू ते सांगु लागले.. शाळे ऐवजी लहानपणापासूनच हातात काठी आली, ती आज पर्यंत तशीच आहे. कारण लहानपणी गुरांच्या मागे, आणी म्हातारपणी मलाच आधार, ही गाठी माझ्याबरोबरच जाणार.
*त्याच्या संगतीत फिटतो संदेह*
*वितळतो क्षोभ माया मोह*
*त्याच्या संकीर्तनी मुरविता देह*
*भेटतो उजेड अंतर्बाह्य*
गाठी कडे पाहुन थोडे भावनिक झाले होते. मी विचारले बाबा का हो? ते म्हणाले माझी कारभारीण पण देवाघरी गेली आहे. एक मुलगा कामानिमित्त गुजरात मध्ये आहे. मी एकटाच असतो ही काठी सोबत असते. म्हणून हिलाच सर्व सुख दु:ख सांगतो. तसे आयुष्य जगताना कधीच दु:ख झाले नाही. कितीही संकट आली तरी हे रान इथले पशु पक्षी जगायला बळ देतात, यांच्या सहवासात जीवन आनंदी असते. मी सहज विचारले बाबा आजारी पडल्यावर काय त्यांनी एका झाडपाल्या कडे बोट दाखविले हे झाडच आमचा डाॅक्टर आणी उपचार सुद्धा. बाबा म्हणाले मी आजारी कधीच पडत नाही. इतके वय झाले तरी एक दात सुद्धा हलला नाही..की तुमचा बी पी डायबेटिस आम्हाला शिवला नाही. आता आमच्या गावात टीव्ही आले त्यामुळे आम्हाला कळते शहरात काय होते, काय चालते. तुमच्या सारखी माणस आली की विचारतात सांगा झाड पाल्याचे औषध, या आजारावर त्या आजारावर, आजार ऐकूनच हसायला येते. इतके जीवनात सुख उपभोगणारे तुम्ही इतके आजार शरीराला लावुन घेता. मग आम्ही तुमच्या पेक्षा बरे निरोगी आयुष्य जगतो या निसर्ग देवतेच्या सानिध्यात. हे तोरणमाळ खुप चमत्कारिक आहे..आम्ही रात्री अपरात्री या जंगलात फिरतो पण कधीच भीती वाटली नाही. झाडाच्या मुळाची कंदमुळ खाऊन आमची मुल मोठी होतात..कसलाच आजार होत नाही..इथे ना धावपळ ना पळापळ आलेला दिवस आनंदात घालवायचा दोन वख्ताची जेवणाची सोय झाली म्हणजे दिवस सरला. रानफळ रानफुल खाऊन हे शरीर अजुनही भक्कम आहे अजुनही तुमच्या सारख्या तीन चार जणांना लोळविण्याची ताकद मनगटात आहे. आता बाबांच्या चेहरा एखाद्या विजेत्या सारखा भासत होता..पाय जमिनीला घासतच बोलत होते. किती आत्मविश्वास होता किती बळ अजुनही अंगात होते याचे कारण फक्त एकच "निसर्गसानिध्य" निघताना बाबांचा निरोप घेतला बाबांना एक बिस्किटचा पुडा दिला. शंभर रू दिले आणी तेथुन मच्छिंद्र गुहे कडे निघुन गेलो....
*त्याच्या स्मरणाने प्रकाशते मन*
*उजळते जग क्षणकाली*
*स्थिरावते पुन्हा चळलेले चित्त*
*पुन्हा मूळ वाट पायाखाली*
*लेखन: -संदिप राक्षे* ✍🏻
No comments:
Post a Comment