मंतरलेली रात्र जेव्हा होते थरथरती (बामणोली जंगल)
निश्चयाचा महामेरू बहुत
जनांसी आधारू
अखंडस्थितीचा निर्धारू
श्रीमंतयोगी...
सातारा म्हटले की इतिहास, इतिहास म्हटले की आठवते फक्त एकच नाव माझा राजा "शिव छत्रपती" नाव उच्चारले तरी बाहु आपोआप स्फुरण पावतात, नसानसात रक्त प्रवाह तेज होतात, हातांच्या मुठी आवळल्या जातात, त्याच प्रमाणे इथली माणस सुद्धा तशीच रांगडी, शूर तितकीच मायाळू, लढवैयांचा जिल्हा, देशासाठी प्राणांचे बलिदान देण्या-या शूर सैनिकांची भूमी, लागोपाठ सुट्टी आल्याने या तीन दिवसात सातारा जिल्ह्यातील काही भाग फिरायचा असा निश्चय केला.. या वेळेस पण बँकेचे सहकारी दादू डोळस साहेब सोबतीला होतो, त्यांची इच्छा होती एक दिवस एक रात्र तरी आपण जंगलात टेंट मधे राहायचे ते थरारक जीवन अनुभवायचे. मला थोडे टेन्शन आले घनदाट जंगलात एका साध्या टेंट मधे कसे राहायचे..विचारातच अजिंक्यतारा गडाच्या पायथ्याशी येवुन पोहचलो, दुरूनच गडाचे दर्शन घेतले शिव छत्रपतींचे स्मरण केले. पहिले कोणत्या ठिकाणावर जायचे असा गाडीतच आमच्या दोघांचा विचार सुरू झाला.. माझे भेदरलेले मन मलाच साथ देईना व्दिधा मनस्थितीत होतो तोच पुढे सज्जनगडा कडे अशी पाटी दिसली. आणी मनातल्या मनात असलो.. कारण होते सज्जनगड म्हटले की मानसशास्त्रांचे गाढे अभ्यासक, समर्थ रामदास स्वामींचे समाधी स्थान.. मन या विषयावर कितीतरी ओव्या आणी काव्य करून मनाला चांगल्या सवयी, मन आपल्या ताब्यात कसे राहील यावर असंख्य उपाय सांगितले आहेत.. आणी मलाही तीच गरज होती, म्हणून मला हसु आले... कोणताच विचार न करता गाडी सज्जनगडाकडे ओळवली...
धरी रे मना संगती सज्जनांची !
जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनांची !
बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे !
महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे !
"जय जय रघुवीर समर्थ" रामदास स्वामींचा जप करीतच सज्जनगडाच्या पायथ्याशी पोहचलो,सुट्यांच्या मुळे असंख्य भाविकांची मांदियाळीच येथे जमली होती.. गडावर गाडी जात नसल्याने,गाडी पायथ्याला पार्क करून गड चढायचा निर्णय घेतला. अर्ध्या पर्यंत डोळस गड चढले,आणी थांबले मला नाही चढवणार पुढे, गडावर तूच एकटा जा मी त्यांना हो म्हणालो आणी एकटाच गड चढू लागलो.. प्रचंड उन होते सुर्य डोक्यावर होता.. थंडीचे दिवस असून सुद्धा अंग घामाने डबडबले होते. दम लागत होता. थोडे थांबायचे आणी पुन्हा चालायचे असे करीत करीत सज्जनगडाच्या मुख्य दरवाज्या जवळ पोहचलो. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव होते त्या भल्यामोठ्या प्रवेशद्वारावर, तिथेच एक सेल्फी घेतला, पुढे लोकमान्य टिळक प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलो तिथेच एक भला मोठा पाण्याचा चौकोनी तलाव दिसला इतिहासकालीन हा तलाव इतिहासाची साक्ष देत होता..
राया शिवछत्रपती! समर्थाशी अतिप्रती !!
सज्जनगडी त्यांची वस्ती! तेणे करविली!!
काही जुन्या वास्तु पहात पहात छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना भव्य निवासस्थान बांधून दिले होते त्या ठिकाणी पोहचलो,धन्य ती वास्तू धन्य तो इतिहास आज ही ती वास्तू समर्थ रामदास स्वामींचा मठ म्हणून ओळखली जाते..मी त्या निवास्थानात प्रवेश केला आपल्या राज्याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या वास्तूत अफाट चैतन्य होते... एका खोलीत छत्रपतींनी रामदास स्वामींना एक पलंग भेट दिला होता तो आजही तसाच आहे...तेथून पुढे एक शेजघर आहे तिथे समर्थ रामदास स्वामींच्या वापरात असलेल्या वस्तु अजूनही जतन करून ठेवल्या आहेत..त्यामधे शिवाजी महारांजानी दिलेल्या कुबड्या, श्री दत्त महाराजांनी दिलेली कुबडी, वेताची काठी, सोटा, समर्थांना शिवाजी महाराजांनी दिलेली कुबडी मोठी रहस्यमय आहे. या कुबडीमध्ये तलवार आहे. त्याला गुप्ती असे म्हणतात. कुबडीचा वापर समर्थ उभ्याने जप करताना बगलेत अडणी म्हणून करीत होते. भारतभ्रमण करीत असताना समर्थ हिमालयात गेले होते तेथे त्यांना थंडीचा त्रास जाणवु लागला त्यावेळेस मारूतीराया प्रकट झाले व समर्थांना शरीराच्या रक्षणासाठी वल्कले दिली ती वल्कले अजूनही शेजघरात आहेत...शेजघरात प्रवेश करताना दारावरच एक फोटो फ्रेम दिसली त्यामधे शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी हे चर्चा करतानाचा फोटो आहे तो मी खुप वेळ पहात होतो.. साधू संताना जातीपातीच्या चौकटीत अडकविणा-यांना ती एक मोठी चपराक होती.. संपूर्ण शेजघर पाहून त्या संपूर्ण अमल्य वस्तु डोळ्यात साठवून, मनोभावे वंदन केले आणी समर्थांच्या समाधी मंदिरा कडे आलो..समाधी स्थानाच्या वरती राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन उजव्या हाताच्या जिन्याने भुयारात उतरलो समर्थांच्या समाधीचे दर्शन घेतले, आयाताकृत समाधी ही आपोआप जमिनीतून वरती आलेली आहे. समर्थांनी शेवटच्या क्षणी दोन काव्य केली होती त्याचे स्मरण केले, आणी सज्जनगडचा निरोप घेतला..
रघुकूळटिळकाचा वेध सन्नीध आला!
तदुपरी भजनाचा पाहिजे सांग केला!
समर्थांच्या दर्शनाने आणी तेथील वातावरणाने मनाला एक उभारी मिळाली होती.. वा-यापेक्षा वेगाने धावणारे मन समर्थांच्या जपा मधे मग्न स्थिर झाले होते. समर्थांनी मनावर केलेले एक एक काव्य आठवु लागले होते. गडाच्या पायथ्याशी पोहचलो फ्रेश झालो तिथेच ठोसेघर धबधब्याकडे जाण्याचा मार्ग दिसला खुप दिवस हे नाव ऐकून होतो पण जाण्याचा योग येत नव्हता.. आलो आहोत जवळ तर जाऊयात का? डोळस साहेबांना विचारले त्यांनी होकार दिला. पाऊस संपून आता खुप दिवस झाले धबधबा सुरू असेल का हा मनात विचार होता. पण नंतर समजले ठोसेघरचा धबधबा अविरत कोसळत असतो. एक नाविन्यपूर्ण निसर्गाचा हा चमत्कार पहाण्यासाठी ठोसेघरला निघालो. ठोसेघर धबधबा समुद्र सपाटी पासुन १२०० किलोमीटर उंचीवर आहे.
भरभर धारा बरसत येती
डोंगर कडा कपारीतूनी
क्षणभर वाटे मजला
दुग्ध सांडीले रंग पाहुनी !
कोण अडवी धबधब्यास
अविरत तांडव नृत्य करी
खोल दरीतील विक्राळरूप
रोमांच भरी अंगावरी!
ठोसेघरचा धबधबा पाहुनच या काव्याची निर्मिती तिथेच झाली.. निसर्गाने किती भरभरून दिले आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. छोटा आणी मोठा असे दोन धबधबे येथे आहेत, हे धबधबे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असला तरी हे मात्र कधीच थांबत नाहीत. पाणी थोडेफार कमी होते, पण हे अविरत कोसळत असतात. येणाऱ्या पर्यटकांचे डोळ्यांचे पारणे फेडणारा, नयनविभोर दृष्य सोहळा पाहून आम्ही बामणोली जंगलाकडे प्रस्थान केले. कास पठाराच्या डोंगर रांगेतून आमचा प्रवास सुरू होता. कास पठार लागलेल्या वणव्यामुळे काळे ठिक्कूर पडले होते. पठार सोडून आता घनदाट जंगल सुरू झाले होते.. एक वाहन जाईल इतका नागमोडी रस्ता, बाजुला दाट झाडी गुलाबी थंडी प्रमाणेच गुलाबी फुलांचा जथ्था जागोजागी दिसत होता.. हे दृश्य सुखद वाटत होते .. शिशीराचा गार वारा म्हणजे गुलाबी थंडी आणी गुलाबी फुल हा योग दुर्मिळच पाहावयास मिळाला. अनेक वेगवेगळ्या जातींची पुष्ष फुले निसर्ग देवतेची साक्षात पुजाच करताना दिसत होती. त्या मधे विघ्नहर्ता पुष्प, कुमुदिनी पुष्प, झुंबर पुष्प, कंदील पुष्प, कावळा पुष्प, कळलावी पुष्प, या मधे असे एक पुष्प पहायला मिळाले ते म्हणजे किटकभक्षी त्या फुलावर जर एखादा किडा बसला की तो आपोआप गायब होऊन जायचा ते पुष्प हे किटक भक्ष्य करून टाकायचे, निसर्गाची करनी आणी नारळात पाणी, निसर्गाच्या कुशीत शिरल्या शिवाय असले चमत्कार बघायला मिळणारच नाहीत. विविध पक्ष्यांचे आवाज वातावरणाला सूरमयी बनवीत होते. ताला सुरात गाणारे पक्षी निसर्ग आणी संगीताचे ऋणानुबंध किती जवळचे, हेच सांगत आहेत असे वाटायचे. सुर्य आता मावळतीला लागला होता..आम्हाला बामणोलीच्या जंगलात कोयनेच्या बॅकवॉटर च्या परिसरात पोहोचायचे होते. आता गाडीचे थोडे स्पीड वाढवले अंधार झाला तर ज्या ठिकाणी मुक्कामाची सोय केली ते ठिकाण सापडले नसते.. एकदा जंगलात घुसले की होकायंत्रा शिवाय बाहेर पडणेच अशक्य. पुष्पवल्ली पहाण्याचा मोह आवरता घेतला. वेडी वाकडी वळणे, डोंगर द-या पार करीत अखेर बामणोली गावात येवून पोहचलो शंभर दिडशे उंबरा असलेले गाव तेथूनच बोटीने तापोळा व वासोटा किल्यावर जाता येते. आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणाचा पत्ता विचारला अजून पाच किलोमीटर जावे लागेल असे तेथील ग्रामस्थाने सांगितले, हे ठिकाण आहे. मनात भिती प्रचंड वाढत चालली होती कारण होते आज मुक्कामाचे ठिकाण कोणते लाॅजिंग किंवा रिसोर्ट नव्हते, आजचा मुक्काम घनदाट जंगलात उघड्यावर एका टेंट (कुपी) मधे होता. आता अंधार पडला होता, निर्मनुष्य रस्ता होता, कुठेही उजेड नव्हता, चित्र विचित्र आवाजाने मन खूपच भेदरले होते..कुठून बुद्धी दिली अन सुखाची ठिकाण सोडून या अडचणीच्या ठिकाणावर का आलो हा माझा मलाच प्रश्न पडला. समर्थांची आठवण झाल्यावर मन जरा शांत झाले. मुक्कामाच्या ठिकाणावर पोहचलो होतो.. डांबरी सोडून गाडी कच्च्या रस्त्याने चालू लागली.. एक किलोमीटर अंतरापर्यंत गेल्यावर एक वाटाड्या उभा होता तो आमचीच वाट पहात उभा होता. त्याने विचारले तुमचे नाव काय? कुठून आलात? मी म्हणालो मी संदीप राक्षे भोसरी पुणे येथून आलो. गेल्या गेल्या त्याने आम्हाला चहा दिला. दोन तीन ठिकाण आम्हाला त्याने दाखवली, कुठे टेंट लावायचे ते काही ठिकाण पाहूनच भितीने गाळण उडाली होती. मी त्यालाच सांगितले तुला जिथे चांगले वाटेल आम्ही सुरक्षित राहू अशा ठिकाणी व्यवस्था कर, कारण इथला अनुभव तुला आहे. त्याने गर्द झाडीत, नुकतेच भात कापणी झाली होती, त्या छोट्याश्या खाचरात टेंट लावला. मी आजु बाजुला पाहिले तर असंख्य जंगली प्राण्यांच्या पायाचे ठसे सहज दिसत होते. त्याच्या कडून कसलीच माहीती घेतली नाही. विचारले की मनाचा खेळ सुरू होईल नको नको त्या विचारांचे थैमान डोक्यात दाटेल, त्यामुळे काहीच विचारले नाही. आता जिकडे पहावा तिकडे अंधाराचे साम्राज्य होते. आज चंद्र सुद्धा अर्ध आकार असल्याने त्याचा प्रकाशही जास्त पडणार नव्हता. रात्री नऊ वाजता जेवण उरकले छान पिठले भाकरीवर ताव मारला. टेंट जवळच शेकोटी पेटवली आणी मस्त बैठक मारली. डोळस साहेब आणी मी आम्ही दोघेच असल्याने आमच्याच गप्पा सुरू झाल्या. दूरवर अजून काही ट्रेकअर आले होते त्यांचे टेंट होतेच त्यामुळे थोडासा आधार आला होता. झाडावर चढून धरणाचे पाणी चंद्र असल्याने दिसते का, पहावे मनात विचार आला. एक एक फांदी चढत मध्यापर्यंत गेलो काळ्याकुट्ट अंधारा पलीकडे काहीच दिसले नाही.मी झाडावर चढल्याने झाडावरील पक्ष्यांचा किलबिलाट अचानक सुरू झाला. पटकन खाली उतरलो, शेकोटी जवळ जाऊन शेकत बसलो; शेकोटीतील अग्नी निरनिराळी रूपे धारण करीत होता, ती मी मोबाईल मधे टिपीत होतो.. अक्राळ विक्राळ आकार त्या अग्नीतून प्रकट होत होते. मनाचा खेळ सुरू होण्या अगोदरच स्वताला सावरले, मोबाईल मधे जुनी गाणी मंद आवाजात सुरू केली मन गाण्यात रमले होते. तितक्यात कोल्हेकुई सुरू झाली, आणी वातावरण धीर गंभीर झाले. वा-याने हलणा-या करवंदीच्या जाळ्यांच्याकडे लक्ष वेधू लागले. शेकोटीला आणलेले सरपण पण संपून गेले..आता उरला होता फक्त निखारा, इकडे चंद्र डोक्यावर आला होता. घड्याळात पाहिले तर मध्यरात्रीचे बारा वाजले होते. इकडे माझ्या छातीत धस्स झाले, रात्री बाराचे किस्से खुप ऐकल्याने एक एक ओपन होऊ लागला, आठवु लागला. डोळस साहेब झोप आल्याने टेंट मधे गेले दिवसभराच्या प्रवासाने थकले होते. पडल्या पडल्याच झोपी गेले. आता उरलो मी एकटाच आणी मनातले भूत दोघेच जागे होते. प्रचंड थंडीत सुद्धा घामाने डबबलो होतो. विचार काही थांबेनात. चंद्रप्रकाश थोडा प्रखर झाला होता. झाडांच्या आकृत्या जिवंत माणसा सारख्या भासू लागल्या तसा तसा भितीचा प्रकोप वाढू लागला. सळसळ स्पष्ट ऐकू येऊ लागली. कोल्हेकुईत आता अनेक आवाजांची भर पडली.. इतक्या वेळ निरव शांत असलेले जंगल अशांत झाले होते. पाणवठा आमच्या पासुन जवळपास होता. कसलाच विचार न करता मी पटकन टेंट मधे घुसलो, सर्व पॅकबंद केले दोन रजई अंगावर घेतल्या, पण काही केल्या झोप येईना. शांत पडून राहिलो आवाजाचे निरीक्षण करीत करीत रात्रीचा हा थरार डोळ्याने न पहाता कानाने अनुभवत होतो. कधी पहाट होते या विचारत पडलो पण काही केल्या वेळ पुढे जाईना. दवांच्या पाण्याने संपूर्ण टेंट ओला चिंब झाला होता. ते टिपकणारे थेंब सुद्धा स्पष्ट ऐकू येत होते. अचानक टेंटवर काहीतरी पडल्याचा आवाज झाला. आता हातापायची गाळण झाली होती. काय करावे सुचेना पण थोडासा कानोसा घेतला तर दोन वटवाघुळ चिर्र चिर्र करीत टेंट वर पडली होती. थोडा जीवात जीव आला..पुढे काय काय वाढून ठेवले आहे, याचा विचार करीतच पहाटेचे चार वाजले होते. आता थंडीत प्रचंड वाढ झाली होती येणारे आवाज बंद झाले होते. अशातच निद्रादेवी माझ्यावर प्रसन्न झाली आणी मला झोप लागली..
मंतरलेली रात्र थरारक,
धुंद गुलाबी ही थंडीची,
रातकिडयांचे चित्कार ते,
घंटा भासते जणू धोक्याची !
पाणवठयाच्या काठी वसते,
वसाहत तृष्णीत प्राण्यांची,
भेदरलेल्या मध्य रात्रीस या,
प्रतिक्षा मला सकाळची !
सकाळी जाग आली ती सुर्यदेवाच्या आगमनानेच, उठून टेंटची चैन उघडली बाहेर डोकावले तर मस्त कोवळ उन पडलेल, टेंट मधून बाहेर पडलो. सुर्यदेवाचे दर्शन घेतले प्रातर्विधी उरकला. सरळ आंघोळी साठी धरणाकडे निघालो गाडीत ठेवलेली पाण्याची बाटली बर्फा पेक्षाही गार होती.. मी विचार केला हे पाणी इतके थंड तर धरणातील पाणी किती थंड असेल कशी आंघोळ करायची. धरणा जवळ गेलो पाण्यात हात घातला तर पाणी कोमट होते. मस्त पाण्यात उडी मारली मनसोक्त पोहण्याचा आनंद घेतला, इतर आलेले ट्रेकर माझ्या कडे पहातच होते. इतक्या थंडीत धरणात कसे काय पोहतात म्हणून कुतूहलाने पहात होते. पोहण्याचा आनंद खरच वेगळाच होता स्वच्छ आणी निर्मळ पाणी अंगाला गरम भासत होते.. थंडी कुठेच्या कुठे पळून गेली होती.. सर्व साहित्य पॅक केले कपडे बदलले, आणी या थरारक बामणोली जंगलाचा निरोप घेतला, पंचवीस डिसेंबर ख्रिसमस ची ही रात्र माझ्या आयुष्यभर स्मरणात राहील....
लेखन: -संदीप राक्षे
भोसरी पुणे २६
No comments:
Post a Comment