Thursday, 14 December 2017

आध्यात्म आणी निसर्ग

तोरणमाळ नुसते थंड हवेचे ठिकाण नसुन
नवनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र सिध्द भुमी आहे..

तोरणमाळ नाव जरी आठवले तरी तनामनात उत्साह संचारणारी भुमी,निसर्गाचा अभूतपूर्व चमत्कार म्हणजे तोरणमाळ, गुरू गोरक्षनाथांची तपश्चर्या भुमी म्हणजे तोरणमाळ, अशा या तोरणमाळला जाण्याचा पुन्हा एकदा योग आला. सोबत मुकूंदजी थोरात सर व गजाननदादा साप्ते होते. रात्री आठ वाजता गाडीने तोरणमाळच्या चढाईला सुरवात केली. संपूर्ण डोंगर रात्रीच्या अंधारात झाकोळला होता..गाडीच्या लाईट मध्ये जे दिसेल ते पहाण्याचा प्रयत्न करीत होतो. मध्यभागी आल्यावर आकाशात तारांगण प्रकट झालेले पाहिले इतर वेळी कधीच न दिसणाऱ्या चांदण्यांचे दर्शन होत होते. थोडा काळोख दुर होऊन चांदण्यांच्या प्रकाशात संपूर्ण डोंगर कामधेनूच्या दुधाची छटा पडल्या सारखे भासत होते. मध्ये मध्ये पांगीराची फुले त्या चांदण्यात चमकत होती. हे विलोभनीय दृष्य आम्ही गाडीतूनच अनुभवत होतो.. भयानक शांतता मनात भीतीचे काहूर उठवीत होती.वेगवेगळया विचारांनी मन भरले होते. भीतीचा पडदा दुर सारून आम्ही गाडीतील टेपच्या गाण्यांचा आवाज वाढविला..गाण्यांचा आस्वाद घेत आम्ही तोरणमाळला पोहोचलो.. शांत वातावरण होते. समोरच नर्मदा तलावाचे पाणी चांदण्यांच्या प्रकाशात चांदीचा वर्ख पांघरावा तसा भासत होता..हे दृश्य डोळ्यात साठवून मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो.पहाटे पाच वाजता उठलो आणी तोरणा देवीची टेकडी गाठली, टेकडी चढताना दमछाक होत होती पण गार वारा मनाला अंगाला ताजेतवाना करत होता..उत्साहवर्धक वातावरण शुद्ध हवा खात खात टेकडीवर पोहचलो आता उजाडल होत. पुर्व दिशेला वेगवेगळया रंगाची उधळण जाणवत होती. प्रतिक्षा होती सुर्योदयाची ते विहंगम दृश्य पहाण्यासाठीचआम्ही आलो होतो. हळू हळू सुर्यदेव वर वर येऊ लागले तसा सारा परिसर सुवर्णा सारखा चकाकत होता. इतका सुंदर सूर्योदय पहिल्यांदाच अनुभवत होतो. तेथुन आम्ही जिथे गोरक्षनाथांची तपश्चर्या भुमी आहे त्या ठिकाणी आलो. एक वेगळे चैतन्य या परिसरात जाणवत होते. शेजारीच अमृत तलाव या मंदिराचे देखणे रुप पण दाखवित होते. या मंदिराची प्रतिकृती या तलावात स्पष्ट दिसत होती. इतके शांत वातावरण की टाचणी जरी पडली तरी तिचा आवाज येईल, उदबत्तीचा मनमोहक सुगंध दरवळत होता एका छोट्या मंदिरात धुनी जळत होती. मंदिरात गेलो गोरक्षनाथांचे दर्शन घेतले, जिथे धुनी जळते त्या मंदिराचे दर्शन घेतले. नवीनच मंदिराचे काम सुरू होते आपणही थोडीशी मदत करावी मनात विचार आला पण तिथे कोणीच दिसले नाही.  थोडा वेळ थांबलो तितक्यात एक भगव्या कपड्यातील एक बाबाजी येताना दिसले.. त्यांच्या चेहऱ्यावरील तेज स्पष्ट दिसत होते  हे कोणीतरी योगीच असावेत हा समज खरा ठरला.ते जवळ आले त्यांना मी वाकून नमस्कार केला. मी बोलण्या अगोदरच ते बोलु लागले जे ते मला बोलत होते असे काही आमची खुप वर्षाची ओळख आहे . त्यांनी मला जे काम सांगितले ते ऐकून मी चकितच झालो. त्या बाबाजींना मी विचारले आपली ना ओळख ना कधी भेट मग हे काम तुम्ही माझ्यावर सोपविलेत बाबाजी बोलु लागले इथे येणारे अनेक करोडपती असतात मोठ मोठे उद्योगपती असतात, ते इथे त्यांचेच रडगाणे गात असतात, त्यांना सांगुन काहीच उपयोग होत नाही. तुम्हीच हे काम करणार हे सत्य मी जाणले गुरू गोरक्षनाथांचाच तो आदेश असेल कदाचित म्हणून मी तुम्हाला सांगितले, मी त्या बाबाजींना शब्द दिला.. त्या बाबाजींना मी नाव विचारले त्यांनी योगी संजुनाथ हे नाव सांगितले नवरात्र पासुन मी इथेच आहे. मुकुंद सरांनी बाबाजींना तोरणमाळ विषयी काही सांगाल का असे विचारले ते हो म्हणाले .. आणी बाबाजी बोलु लागले, इथे शिवरात्रीला खुप मोठी यात्रा भरते दोन ते पाच लाख यात्रेकरु येथे येतात,बाबाजी आम्हाला एका कुंडा जवळ घेऊन गेले याच कुंडात शिवरात्रीला एक एक्कावन्न किलोचा रोट बनवितात तो एका कपड्यात रस्सीने बांधतात आणी त्या रोटला जळत्या निखा-यात टाकतात त्याच्या वर पुन्हा गौ-या टाकतात. पुर्ण भाजल्या नंतर तो रोट बाहेर काढतात तर बांधलेला कपडा व रस्सी अजिबात जळत नाही हा एक मोठा चमत्कार आहे. कारण अग्नीत सर्वच जळते पण रस्सी आणी कपडा जळत नाही हा साक्षात्कार गोरक्षनाथांचा आहे. हा रोट आलेल्या भक्तांना प्रसाद म्हणून वाटतात पण तो संपत नाही हे पण विशेष आहे. सांगता सांगता बाबाजी आम्हाला एका वडा खाली घेऊन गेले आणी सांगितले हाच तो वड याच वडाखाली गोरक्षनाथांनी बारा वर्षे तपश्चर्या केल्याने हा वड अमर आहे. हा वड खुप मोठा विशालकाय होतो आणी अचानक फाटतो त्या मध्ये पुन्हा एक वडाचे लहान रोप उगवते व पुन्हा त्याचा विशालकाय वड तयार होतो. असे खुप युगां पासुन घडते आहे. याच वडाखाली राजा भर्तहारी यांना शिष्य करून घेतले होते..बाबाजी थोडे थांबले आणी एकाला चहा बनवायला सांगितला.  बाबाजींनी आम्हाला तलावा काठी आणले हाच तो तलाव कधीच आटलेला नाही आणि याचा ठाव सुद्धा लागत नाही.. ज्यावेळेस राजा भर्तहारी गोरक्षनाथांचे शिष्य झाले त्यावेळी राजाने हा तलाव खोदण्याचे काम केले पण इथे पाणी लागले नाही. राजाने गोरक्षनाथांना विनंती केली खुप मेहनतीने हा तलाव खोदला आहेत पण पाणी नाही त्यावेळी गोरक्षनाथांनी आपला चिमटा तलावाच्या मध्यभागी मारला आणी साक्षात नर्मदामाता प्रकट झाल्या पण त्या तलावाची खोली पाताळात गेली म्हणून तिथे ठाव लागत नाही उन्हाळा असो किंवा दुष्काळ असो इतक्या उंचावर असुनही इथले पाणी कधीच आटत नाही.. कारण दुर दुर पर्यंत आजुबाजुला पाण्याचा थेंब दिसत नाही. बाबांजींनी दिलेली माहिती ऐकून आम्ही मंत्रमुग्धच झालो.. किती पवित्र ठिकाण आहे हे चार धाम पेक्षा श्रेष्ठ असे हे तोरणमाळ धाम आहे आवर्जुन बाबांजीनी सांगितले.. जसे आपले देहू आळंदी पंढरपुर तसेच खानदेशचे हे पवित्र ठिकाण म्हणजे तोरणमाळ, बाबाजी आता शांत झाले होते त्यांना मी सांगितले मी एक चित्रपट केला आहे गुड मॉर्निंग नावाचा त्यांनी आर्शिर्वाद दिले शुभेच्छा दिल्या, एका पवित्र ठिकाणाची नविन माहीती मिळाली  आध्यात्माच्या माहितीचे गाठोडे घेऊन आम्ही तोरणमाळ सोडले पुन्हा लवकरच येण्यासाठी....

लेखन: -संदिप राक्षे✍🏻

No comments:

Post a Comment

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...