*भटकंती महाराष्ट्राचे "स्वित्झर्लंड"भंडारद-याची*
*निसर्गाच्या संगतीत फिटतो संदेह*
*वितळतो क्षोभ माया मोह*
*त्याच्या संकीर्तनी मुरविता देह*
*भेटतो उजेड अंतर्बाह्य*
शनिवार रविवार आला की निसर्गाच्या सान्निध्यात मनसोक्त भटकंती करायची हा नित्य नेम,खुप दिवसांपासुन भंडारद-याला जायचा विचार होता.पण योग येत नव्हता,पण ठरवल जायचंच माझ्या सोबत आमच्या बँकेचे माझे जुने सहकारी दादु डोळस साहेब तयार झाले. खूप अडचणी आणी खराब रस्ते सगळं काही मला निश्चयापासून दूर करणारे होते,पण दृढ निश्चयापुढे कोणतीच समस्या टिकत नाही. दुपारी १२ वाजता निघून रात्री ८ वाजले यश रिसोर्ट(शेंडीला)पोहचायला रात्री सगळेच भेसूर वाटत होते. पण सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने सकाळी सहा वाजता जाग आली, पडदे बाजूला सरकवले तेव्हा निसर्ग देवताच साक्षात उभी होती. रात्रीच ओळख झालेला शुभम काळे अठरा वर्षाचा युवक यश रिसोर्ट च्या दारात गाडी घेऊन उभा होता,मी व डोळस साहेब गाडीत बसलो आणी शुभम काळे याने माहीती देण्यास सुरवात केली आज आपण बावन्न किलोमीटरचा प्रवास करणार आहोत,साक्षात निसर्गाचा चमत्कार अनुभवणार आहोत. भंडारदरा हे महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात.भंडारदरा-शेंडी हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले एक आदिवासी कोळी महादेव जमातीचे गाव.या भंडारदरा धरण परिसरात दहा किल्ले,शिखर आणी द-या व असंख्य जल साठे आहेत. रंधा धबधबा प्रसिद्ध आहे. तसेच कळसुबाई मंदिर,पांजरे बेट,अलंग, मलंग,कुलंगगड,उंबरदारा व्ह्युव पॉइंट, कोकणकडा,घाटनदेवी व्ह्युव पॉइंट,सांदन दरी,रिव्हर्स वॉटर फॉल,अमृतेश्वर मंदिर, नान्ही वॉटर फॉल,कळसुबाई शिखर,रतनगड,रंधा फॉल,घाटघर अशी निसर्ग रम्य ठिकाणे आहेत. शुभम सांगत होता.. माझे कान त्याच्या कडे पण नजर मात्र रस्त्याच्या कडेने दिसणा-य हिरडा,बेहडा,सादडा,जांभुळ,आंबा,उंबर या झाडांकडे होती. त्या झाडांवरून येणाऱ्या पक्ष्यांच्या आवाजाने कान तृप्त होत होते. नीरव शांततेत ते आवाज स्पष्ट ऐकू येत, घनदाट जंगलाचा भाग सोडून आम्ही धरणाच्या एका सपाट जागेवर येवुन थांबलो गाडीतून खाली उतरताच वा-याची एक मंद झुळूक धरणाच्या पाण्यावरून आली, ती झुळूक चैत्यन्य घेऊन आलेली,अंगावर रोमांच उभे राहिले,निळ्या स्वच्छ आकाशाचे प्रतिबिंब धरणाच्या जलाशयात एकरूप झाल्याने निळे पाणी आणी निसर्गाची हिरवाई यांच्या मिलनाने तयार झालेला देखावा जणू चित्रकाराच्या कुंचल्यातून चितारलेला भासत होता.सह्याद्रीच्या हिरव्या पर्वत रांगावर पिवळी फुले जणू काही धरणी मातेने हिरव्या रंगाचा शालूच ल्यायला होता.त्यावर सोनेरी बुट्टे होते. सोनकीच्या इटुकल्या पिटुकल्या फुलांचा फुललेल्या पुष्पमाळांनी पर्वत पठारे पीतवर्णी दिसत होती. रानतेरडा, रान गांजा, श्वेतांबरा, फांगळा, आभाळी, नभाळी, सोनटिकली, लाजाळू, जांभळी, मंजिरी, गोपाळी, रानतूर, सोनसरी, पांढरी, कोरांटी, उंदरी, कुसुंबी, अशा कितीतरी फुलांचा सडाच पडला होता. एक कणही प्रदूषणाचा नसल्याने दूरदूरचे अगदी स्पष्ट दिसत होते. आॅक्सिजनच्या निळाईने एक निळसर झालरच पसरावी असा डोंगराच्या व आभाळाच्या मध्यभागी एक पट्टाच दिसत होता. सकाळची दवं फुलांच्यावर मोत्यासारखी दिसत होती. सकाळची दवं फुलांच्यावर मोत्यासारखी दिसत होती. त्या दवांवर सुर्यकिरण पडले की इंद्रधनुष्याचे रंग प्रकट होत होते.
*कोणी सांडले दवबिंदू इथे*
*जशी मोती माळून धरती सजली*
*सूर्याने ही घातली भरतिथे*
*भाळी टिळा लावून धरती सजली*
हा सगळा चमत्कार जणू मी स्वर्गातच होतो. पण चालताना पृथ्वीवर स्वर्ग उतरल्याची जाणीव होत होती. एका अद्भुत झ-याजवळ की जो कधीच आटत नाही, की जो खोल दरीत होता. प्रत्येकाची तृष्णा शमवत होता. मी आणी डोळस साहेब त्या दरीत उतरलो, एक इंची नळ लावावा जसे पाणी त्या झ-यातून पडत होते. हातांची ओंजळ करून भरपूर पाणी प्यायलो, हिमालयातील गंगेच्या पाण्याची चव, पाणी इतके थंड की उदर शांत झाले. कोकणकडा बघून आम्ही रांधन घळी कडे निघालो. अनेक ठिकाणी पाण्याचे मोठे मोठे कालवे होते, त्यामध्ये हजारो झाडे, त्या झाडांवर बसलेले पांढरे बगळे असे भासवत होते की पाण्यातच सफेद रंगाचे फूल उमलेले आहे. आता उन्हाचा पारा चढला होता, हवेत गारवा होता. बाजुला सज्जनगड दिसत होता. त्याच्या पायथ्याशी अमृतेश्वराचे प्राचीन (पांडवकालीन) मंदिर शतकोत्तर त्याच अवस्थेत होते. मंदिराच्या समोरच पांडवांनी बांधलेला षठकोनी तलाव होता. दगडी बांधकाम व त्यावरील नक्षीकाम पुरातन संस्कृतीचे दर्शन घडवित होते.
*म्हणतो मलाही सांब*
*मी खेळ तव मनाचा*
*असतो निसर्ग सारा*
*कधी देव का कुणाचा*
*तुमच्या खुळया स्वभावी*
*मज देव जन्म आहे*
*कुणी देव का म्हणाना*
*अंती निसर्ग आहे.*
हे मंदिर पाहिल्यावर वरील आठवल्या, त्यातून भगवान शंकराचे आणि निसर्गाचे नाते उलगडले. इतक्या घनदाट जंगलात इतके सुंदर शिल्प संपूर्ण काळ्या पाषाणात इतके कोरीव काम खरच चमत्कारच. मंदिरातील गाभाऱ्याचा सुखद गारवा अंगावर साठवून, प्रदक्षिणा घालताना काही पर्यटक झाडाखाली बसलेले दिसले, एक जण कसली तरी माहिती देत होते, कुतूहल म्हणून त्यांच्यात सहभागी झालो, ते भंडारद-यातील काजवा महोत्सवाबद्दल बोलत होते. ते होते अकोले तालुक्यातील L.I.C चे डेव्हलपमेंट ऑफिसर श्री.वाणी साहेब, त्यांनी सांगायला सुरूवात केली, मी ही तिथेच ठाण मांडून बसलो. काजव्यांचा हा काही दिवसांचा अद्भुत खेळ जून महिन्यांच्या अगोदर सुरू होतो. ज्या झाडावर काजव्यांची वस्ती असते ती झाडे ख्रिसमस ट्री सारखी दिसतात. झाडांच्या खोडावर फांद्यांवर पानांवर लक्ष लक्ष काजवे बसलेले असतात. लुकलुकणारी ही काजव्यांची प्रकाशफुले आपल्या डोळ्यांना सुखावून जातात. कुतूहलमिश्रीत आणि भाव मुद्रेने निसर्ग वैभव आपण पहातच राहतो, आणी भान हरपून जातो. भोवतीच्या विराट पसा-यात रात्रीच्या प्रकाशाचा अदभुत खेळ खेळत स्वताला आपण हरवून बसतो. कुठ शेकोटीतल्या निखा-यावरून ठिणग्या उसळाव्यात तसे काजवे उसळत होते. रात्र चढता चढता रस्त्यातील वाहतूक कमी होत गेली, आणि कालजव्यांच्या झुळकावर झुळका येवु लागल्या, मिठ्ठ काळोख ओथंबलेल आभाळ गार वारा; हळू हळू नीरव शांततेन आसमंताला घेरून टाकल, आणी आतिषबाजी रंगात आली. रात्र चढत गेलेली कळलही नाही. काजव्यांनी मन वेड-पिस करून सोडल होत, रस्त्यालगत १५-२० फुटांच्या परिघात तीन उंच झाडांनी गोलाकार फेर धरलेला होता. माथ्यावर त्यांच्या फांद्या पानांचा पसारा आणि मध्ये आकाशाचा तुकडा या तीनही झाडांना पानांऐवजी काजवेच आले होते. झाड पेटूनच उठली होती. कधी हे झाड, तर कधी ते आणी अचानक आकाशातला काळोख दूर झाला. झाडांमधून दिसणारा आकाशाचा चतकोर चांदण्यांनी लखलखला नजरबंदी झाली. इथ आकाश नव्हते पण चांदण भरले होते, आकाश वरती की खाली हा संभ्रम नक्कीच होता. आता धुक्यांचा पडदा कळत न कळत जाणवत होता. मन उगीचच हुरहुरल, आता उजाडेल सुर्य प्रकाशापुढे काजव्यांची प्रभा ती काय, हा सर्व अनुभव मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. प्रत्येक क्षणांचे चित्र डोळ्यासमोर तरळत होते. इतका रोमांचकारी अनुभव ऐकून मन तृप्त झाले होते. त्याच वेळी निश्चय केला की पुढच्या वेळी नक्कीच यायचे काजवा महोत्सवाला. वाणी सरांचे आभार मानून पुढच्या प्रवासाला सुरूवात केली. पावसाळा संपल्याने बहुतेक धबधबे बंद झाले होते. कुठे तरी एखादी धार नजरेस पडत होती. आमच्या बरोबर जो मंगेश काळे होता तो तिथला स्थानिक असल्याने त्याला संपूर्ण माहीती होती. त्याने विचारले एक धबधबा सुरू असणार पण जाण्यास खुप अडचणी आहेत, तुम्ही धबधबा पाहिलात की खुष होणार हे नक्कीच. आम्ही मंडाळा धबधब्याकडे जाण्यासाठी निघालो. गाडी जिथपर्यंत जात होती. तिथ पर्यंत गाडीने गेलो पुढची पाच किलोमीटरची चढण चढून जायचे होते. गाडी लावली आणि आम्ही तिघेजण चालु लागलो...भात खाचरांची शेती इंद्रायणी तांदळाचा सुमधूर वास वातावरणात दरवळत होता. पुढे टेकडी चढायची होती. झाडांच्या मुळांच्या आधाराने चढत होतो. चढण खूपच सरळ होती दम लागत होता, थोडा आराम करून पुन्हा टेकडी चढायला सुरवात केली. सोबत आणलेले पाणी संपले, तहान लागली होती, संपूर्ण जंगल असल्याने आजू बाजूला कोणीच नव्हते...थोडे चालून गेल्यावर एक झोपडी दिसली बरे वाटले. झोपडीत कुणीच नसल्याने तडकी लावलेली तिला कपड्याने बांधले होते. कुलपाच्या जागेवर चिरगुटाचा वापर केला होता. तुकडोजी महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे *या झोपडीत माझ्या*तशी ती होती. तहान लागल्याने मंगेशने तडकीचे चिरगुट सोडले, झोपडीत शिरला, टांगलेली शिकई दिसली, त्यात ताक होते, मंगेशने आतूनच विचारले पाण्याऐवजी ताक चालेल का? आम्ही आनंदाने हो म्हणालो, गाडगे तसेच तोंडाला लावले, घटाघटा सगळे ताक संपवले, ताकाची चवच वेगळी होती. पोटात वाढलेली उष्णता क्षणात कमी झाली. आता टेकडी चढायला थोडासा जोश आला होता. वेडी वाकडी वळणे चढत धबधब्याच्या जवळ पोहचलो, उंच कड्यावरून खाली पडणाऱ्या पाण्याचे तुषार अंगावर उडत होते, धबधब्याचे विलोभनीय दृष्य पाहून हरवूनच गेलो. दुधाच्या धारा बरसाव्यात तश्या पाण्याच्या पांढऱ्या शुभ्र धारा उंचावरून कोसळत होत्या. धबधब्या खाली थोडे भिजलो तनासवे मन ही ताजे तवाने झाले होते. आता टेकडी उतरायची होती, चढाई करणे सोपे पण उतरणे खुपच अवघड, एकमेकांच्या सहाय्याने टेकडी उतरलो. हाताला गुडघ्याला खरचटले होते थोडा दगडी पाल्याचा रस लावल्याने जळजळ थांबली. मंडाळा धबधब्याचा थरारक अनुभव घेऊन पुढे कळसूबाई शिखराकडे निघालो पण वेळ कमी असल्याने कळसूबाई देवीच्या पायथ्याचे दर्शन घेतले. पुढच्या वेळी शिखरावर जायचे हे मनात ठाम केले. द-या, कडे, कालवे, किल्ले, शिखरे, फुल, वेली, पशु पक्ष्यांचा आवाज पुरातन वास्तू यांच्या सानिध्यात व्यतीत केलेला आनंदी दिवस हदयात बंद करून, परतीच्या प्रवासास सुरवात केली.
*कंठी येती गाणी कुठली*
*पाखरांसही भूल पडे*
*निसर्ग सारा गातो गाणे*
*रोमांचित होऊनी मन बागडे*
*संदीप राक्षे*✍🏻
*भोसरी पुणे २६*
*८६५७४२१४२१*
No comments:
Post a Comment