Saturday, 24 March 2018

चौथा स्तंभ भ्रष्टतेचा!

चौथा स्तंभ भ्रष्टतेचा!

लोकशाहीचा चौथा स्तंभ
कानाडोळा करतो आहे
भ्रष्ट आणि भ्रष्टाचाराला
पाठीशी घालतो आहे!

महागाईचा भस्मासुर
इथे मानगुटीवर आहे
पॅकेज घेऊन गप्प जणू
बक ध्यानात उभा आहे!

अन्यायाला वाचा फोडणारे
पडदया आड गेले आहे
भ्रष्ट पुढाऱ्यांच्या पुढे
मूग गिळून गप्प आहे!

जाहिरातबाज झाली वृत्तपत्रे
लेखणीला ना धार आहे
अर्थकारणाच्या ढीगाऱ्यात
सत्याचा वाली दबला आहे!

संदीप राक्षे✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Wednesday, 21 March 2018

पारदर्शक सट्टा!

*पारदर्शक सट्टा !*

*सत्ता* पण वैतागली असेल
भाजपाचा गिरविताना कित्ता
पारदर्शकतेच्या नावाखाली
रोजच विकतात हे *सत्ता*

*पारदर्शकता* नावातच विरली
यांना नाही कसलीच चिंता
घोटाळ्यावर घोटाळे करीत
म्हणत आहेत फक्त *पारदर्शकता*

*शेतकरी* रोजच मरतो आहे
होत आहेत सतत कर्जबाजारी
यांनी यांचाच बाजार चालविला
कोणी म्हणे हा साला *शेतकरी*

*आश्वासनांची* खिरापत भारी
रोज असते तयांची पोपटपंची
सर्व क्षेत्रात हाहाकार माजला
यांची एकच वाणी *आश्वसनांची*

*क्लीनचीट* असते यांची तत्पर
ना तपास ना खुलासा ना भेट
एका दिवसात होते गळाभेट
लगेच बातमी पसरते *क्लीनचीट*

*चित्र* असावे बाटलीवर बाईचे
म्हणणारा असेल किती विचित्र
शुद्ध हरपलेले राजकारणी सारे
महाराष्ट्रात हेच विदारक *चित्र*

*बांधिलकी* समाजाशी तीच संपली
फेकूंचा उदय झाला दृष्य आहेत बोलकी
जागा हो मराठी माणसा हात सावरून
प्रत्येकात जागवायची सामाजिक *बांधिलकी*

*संदीप राक्षे ✍🏻*
*भोसरी पुणे २६*
*८६५७४२१४२१*

Tuesday, 20 March 2018

ईश्वरीय बात!(कविता)

ईश्वरीय बात!

ईश्वरीय बात न्यारी,
शिवशंभू भोळा आहे!

साथसंगी नको कोणी
ऊर्जेचीच झळा आहे!

बघा फुलहारांची या
वेगळीच तऱ्हा आहे!

शांत गाभा-यातही या,
चिंतनाचा लळा आहे!

स्पर्श नको माणसांचे
साऱ्यांचा विटाळ आहे!

मुका राहतो माझा मी
शब्द अडथळा आहे!

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

माय मराठी माझी कर्मभूमी!

माय मराठी माझी कर्मभूमी!

महाराष्ट्र ही संतभूमी म्हणून ओळखली जाते, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज,संत सावता माळी, संत चोखामेळा,संत एकनाथ महाराज, संत जनाबाई, संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज, अशा अनेक संतांनी आपल्या पवित्र शब्दांनी समाजाच्या विचारांचे परिवर्तन केले तत्कालीन परिस्थितीत दृढ असलेले जातीभेद वैचारिक मतभेद मुळासकट उपटून काढले इतक सोप होत का हे सगळ? पण तरीही हातात कोणतही शस्त्र न घेता समोरच्या व्यक्तीच्या विचारसरणीत बदल करायचा आणि तो कृतीत उतरवायचा खुप अवघड पण तरीही निश्चय पक्का असल्यावर प्रयत्नांना यश मिळतेच. अशी ही महाराष्ट्राची ऐतिहासिक संतपरंपरा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या  पदस्पर्शाने पावन झालेल्या त्याच मातीत जन्माला येण्याचे भाग्य मला लाभल;
देहू आळंदी तीर्थ क्षेत्राच्या सानिध्यात लहानपण गेले, भोसरीत शालेय जीवनापासूनच काहीतरी वेगळे करायचा हा सततचा ध्यास,  लहानपणापासूनच सामाजिक बांधिलकीचा वारसा लाभल्याने मन त्यातच रमू लागले, माझे लहानपणही खूप मजेत गेले असे नाही. परस्थितीच्या सर्व प्रकारच्या झळा सोसल्यानंतर तस पहायला गेल तर माणूस दुसऱ्यासाठी काहीच करायला मागत नाही. पण मी तस केल नाही. आपण जे सोसलय ते इतरांच्या वाट्याला येवू नये, असा शुद्ध आणि प्रामाणिक हेतू मनात ठेवून, नेहमी स्वतःच्या वैयक्तिक सुख दुखाःचा त्याग करून, सर्व मंगलमयी आदर्शास डोळ्यासमोर ठेवून, सामाजिक मार्गावर चालण्याचा प्रयत्न गेली ३० वर्षे मी करीत आहे. आयुष्यात काही तत्व सतत उराशी बाळगली आपल्याला दुसऱ्याचे जरी चांगले करता आले नाही तरी वाईट कोणाचेच करायचे नाही. मुंगीलाही आपल्या मुळे त्रास होऊ नये हा सततचा विचार, कोणतेही कार्य करताना फायदा तोटा न पाहता एखाद्याला मदत कशी होईल यालाच प्राधान्य दिले,  वाईट मार्गाने पैसा कमविण्याचे धाडस कधीच आले नाही, त्यामुळेच जो कष्टाने मिळालेला पैसाच तोच आपला मानला, माणस जोडीत गेलो, माणसांची संपत्ती गोळा करीत गेलो त्यामुळेच मी स्वताला खुप मोठा श्रीमंत समजतो. लांडगे लिंबाची तालीम मंडळ भोसरी येथूनच मला सामाजिक कार्याचे बाळकडू मिळाले, पै कै,विश्वनाथ आण्णा लांडगे यांनी हात धरून या कार्यात चालायला शिकवले

अधिकार तैसा दावियेला मार्ग! चालता हे मग कळो येते !!

सतत समाजोपयोगी कार्य करीत असतानाच माझ्या या कार्याची दखल उपराकार लक्ष्मण माने यांनी घेतली त्यांनी मला यशवंतराव चव्हाण  आश्रमशाळेच्या शालेय समितीवर नियुक्ती केली. समाजातील वंचित व भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मुलांच्या साठीची ही शाळा, अहोरात्र या मुलांच्या साठी काम करतो आहे. त्यांना कपड्या पासून ते वह्या पुस्तक मिळवून देण्यासाठी प्रयत्न सतत सुरू असतात, तेथील मुलांच्या साठी सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानमाला, आरोग्य शिबीर विविध कलागुणदर्शन स्पर्धा, काँप्युटर क्लास, अशी सर्व काम मी गेली २५ वर्ष निस्वार्थ पण काम करतो आहे. कुणीही काम सांगाव आणि मी कराव असत होत. कष्ट मी करीत गेलो आणि माणस दुसरीच मोठी करीत गेलो. पण त्याच कधीच वाईट वाटले नाही. आपल्या स्वताच्या पद्धतीने मनातली चांगली कार्य व्हावीत यासाठी १२ डिसेंबर २००५ साली  काही समविचारी लोकांना बरोबर घेऊन सुप्रिया सुळे युवा फाऊंडेशनची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून स्त्रीभ्रूण हत्या जनजागृती अभियान,  शिक्षण व आरोग्य विषयी जनजागृती अभियान, महाराष्ट्रातील काही भागांत जावून यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. दरवर्षी अपंग कलाकारांचा मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्याला राज्यभरातून  अनेक अपंग कलाकारांनी सहभाग घेतला. या मेळाव्यामुळे अपंग व्यक्तींच्या मधे एक वेगळाच उत्साह बघायला मिळायचा. अनेक व्याख्यानमाला, विविध मान्यवरांना दरवर्षी सुप्रिया ताई सुळे यांच्या नावाने पुरस्कार, भक्ती संगीत महोत्सव, विविध पथनाट्य, जेणे करून आपल्या या समाजाला काहीतरी मिळाले पाहिजे हाच शुद्ध हेतू ठेवून कार्य सुरू आहे. हे सर्व करताना कोणाकडेही कधीच हात पसरलेला नाही. नेहमी स्वताची पदरमोड करून हे सामाजिक कार्य करीत आलो. कोणी चांगल म्हणाव यासाठी नाहीतर स्वानंदा साठी.

पराधीन जीवन आपुले,हेच खर मानलय!
स्वप्न सारी स्वतःचीच,खुंटीला बांधलीयं!

समाधान आनंद मिळतो,दुस-यांच्याच सुखात!
हाच मूलमंत्र मी आता,ठेवला आहे ध्यानात!

पं. कल्याणजी गायकवाड संगीत कला प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून सुद्धा गेली काही वर्ष काम करीत आहे.. या प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षी सिद्धबेट आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्याचे औचित्य साधून भव्य  दिपोउत्सवाचे आयोजन करतो..दरवर्षी गायन स्पर्धा, विविध संगीत कलाकारांना मदत करतो.. भोसरी कला क्रिडा मंच च्या वतीने भव्य महोत्सवाचे आयोजन केले जाते, त्यामधे हिरहिरीने सहभाग घेऊन भजन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, तसेच अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करीत असतो..
निसर्गाचा उपासक असल्याने बऱ्याच वेळी बऱ्याच ठिकाणी भटकंती करीत असतो, प्रवासात निसर्ग भेटतो, पशू पक्षी प्राणी भेटतात, आपण कोण आहोत या कोषातून बाहेर पडलं की त्यांच्यात समरस होता येत. पाण्याचा झरा, नारळाची झाड, तिथली थंड हवा मनाला उल्हासित करते, प्रवासामधे भेटलेली माणस माझे ओअॅसिस आहेत. तिथ मन रमत, उर्जा मिळते मनातल मळभ निघून जात. पुन्हा एकदा जिद्दीने सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळते, पुन्हा याच प्रेरणेने आदिवासी भागात जावून तेथील लोकांच्या बरोबर सणांवारांचा आनंद घेतो. तिथल्या गरीब कुटुंबांना त्यांच्या गरजेच्या वस्तू भेट देतो. दरवर्षी दिवाळीला तोरणमाळ,नंदूरबार किंवा चिखलदरा येथील आदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळाचे साहित्य वाटप करतो आहे. सामाजिक कार्याची धुंदी ही सतत असते, आयुष्याच्या प्रत्येक क्षणावर प्रत्येक दिवशी समाजासाठी काही काम केल्या शिवाय चैनच पडत नाही. कधी कधी लोक मला विचारतात हे काय वेड आहे. घरच खाऊन लष्कराच्या भाकरी कशाला भाजायच्या, स्वताचे काहीतरी पहायचे. पण स्वतःचे कधीच काही सरळ होत नाही.. दुसऱ्यांचे भले होत असेल तर आनंदच की, म्हणून मी स्वताला पराधीन समजतो, आणी स्वताचे काही करण्याच्या भानगडीत पडत नाही. जीवनात अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली, कोणाला नोकरी लावण्यास मदत केली, तर कोणाला व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्याची मदत केली, पण ही सर्व निस्वार्थ पणाने, आयुष्यात कधीच स्वतःकडे न पहाता दु:खी माणसाला सुखी कसा करता येईल हा सदोदितचा प्रयत्न यशस्वी होतो. स्वताला कितीही दुख असले तरी ते कधीच ओठावर चेहऱ्यावर न दाखवता दुसऱ्याच्या सुखात सुख मानने ही कला निसर्गाने मला दिली, मी निसर्गाचे कायम आभार मानत असतो. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली, अनेकांना ज्ञानाचे भांडार मोकळे करून दिले त्याच ज्ञानदेवांचा आदर्श ठेवून वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक अनुयाला थोडा का होईना मदतीचा हात देतो, सामाजिक, साहित्य, संगीत, कला या क्षेत्रात विशेष असे कार्य करतो..
स्वप्न भंग होणे हा निसर्गनियम असला तरी रक्ताळलेल्या पायांनी पुन्हा नवीन स्वप्नांच्यासाठी वाटचाल करणे हे मी चिरंतन लक्षात ठेवून वेगळ्या वाटेने  (दुसऱ्यांच्या पेक्षा काहीतरी वेगळे) करण्याचा ध्यास या ध्यासातूनच मुकबधिरांच्या समस्यांचे दर्शन समाजाला व्हावे, त्यांच्या अवहेलना थांबाव्यात विकलांगाना सुद्धा सन्मानाने जगता यावे म्हणून मी गुड मॉर्निंग या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. चित्रपटाचे नाव जरी इंग्रजी असले तरी मूकबधिर मुलांच्या आयुष्यातही सुप्रभात यावी हा उदार व सामाजिक दृष्टिकोन ठेवला आहे. या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा मुलगा आहे तो ओरिजिनल मूकबधिर आहे. हे एक शिवधनुष्य मी आपल्या सर्व मायबापांच्या आर्शिवादाने उचलले आहे. गेली काही वर्षे साहित्य क्षेत्रातही पदार्पण केले आहे. लिखाणाची आवड जोपासता जोपासता काव्यनिर्मितीचा छंद जोपासायला लागलो. विविध विषयांवर अनेक कविता तयार केल्या आहेत. नुकतीच केलेली एक कविता "आर्त हाक मुलीची" राष्ट्रीय कन्यादिनानिमीत्त महाराष्ट्राची महागायिका कार्तिकी गायकवाड यांच्या सुमधूर आवाजात "झी २४ तास या वाहिनीवरून संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाली. या कवितेत सुद्धा सामाजिक भान जपत मुलींना गर्भातच मारून टाकणा-यांना सुद्धा रडायला येईल अशी रचना केली. संपूर्ण देशाला मुलींबद्दल आस्था निर्माण करण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे. कवितेत सुद्धा सामाजिक भान जपत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेत, संतांच्या विचारांना काव्यात गुंफण्याचा प्रयत्न केलाय, विशेष करून निसर्गाची होणारी हानी थांबावी या साठी सुद्धा कवितेची निर्मिती केली ती लोकांच्या समोर मांडली, उपरोक्त सर्व सामाजिक बांधिलकीतून केलेले उपक्रम व विधायक कार्यक्रम यांच्या वर्तमानपत्रांतून मिळालेल्या प्रसिद्धीची कात्रण संग्रही आहेत. काही क्षणचित्रे एकत्रित केली आहेत. जगाला दाखविण्यासाठी नाहीतर माझ्या अल्पशा कार्याचा वसा माझ्याही पुढच्या पिढीने घ्यावा हा स्वच्छ आणि प्रामाणिक हेतू आहे...

सामाजिक बांधिलकीचा,वसा पेलतो खांदयावरी!
सुखी व्हावे जग सारे,हेच प्रयत्न माझे परोपरी!

भूकेल्यास मिळावे अन्न,तहानलेल्यांस पाणी!
धडपड माझी हीच सदा,असते अंतरआत्म्यातूनी!

संदीप राक्षे  
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Tuesday, 13 March 2018

सौभाग्यवती!

...सौभाग्यवती!

पाभरीच्या चाड्यातून
पडे बियाण्याचे मोती
चाले मोघडाच्या मागे
माझी ही सौभाग्यवती!१

सारं कोळपलं रान
अनवाणीच पायांनी
किती सोसल्या वेदना
भेगाळल्या ह्या टाचांनी!२

रुते पायाला ढेकूळ
येई डोळ्यामध्ये पाणी
तरी हसे आनंदाने
मळा फुलता पाहुनी!३

माझा फाटका संसार
तीच करते नेटका
दुःख संकट पेलते
तिचा स्वभाव बोलका!४
     
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Friday, 9 March 2018

रत्नगर्भातूनी (कविता)

रत्नगर्भातूनी!

नारी तू उपजलीस
रत्नगर्भातूनी
सृष्टीला या तारावया
भवसागरातूनी!

नारी तूच आहेस
जीवनाची आशा
तुझाच सन्मान असो
हीच आहे परीभाषा!

नारी तूच आहेस
लक्ष्मी आणि सरस्वती,
जेव्हा वाढतील अत्याचार
तेव्हा तूच सर्वांस रक्षती!

नारी तूच ईश्वराचा
खरा चमत्कार
तुझ्याच मुळे निसर्गाला
येतो आहे बहार!

नारी तुझ्याच मुळे
ही सारी सृष्टी
खंबीर हो कणखर हो
हीच सरळ ठेव दृष्टी!

संदीप राक्षे
भोसरी पुणे २६

Thursday, 8 March 2018

संघर्ष कन्या! (कविता)

संघर्ष कन्या,,!

पुजा घनसरवाड हे नाव
बीडच्या संघर्ष कन्येचे
सर्व सामान्य समाजाच्या
लाडक्या या लेकीचे!

आई सुया पोत विकायची
कुटुंबाचा भार वाहायची
बापाच्या नशिबी आले
प्रेतांची विल्हेवाट लावायची!

जळत्या चितेच्या उजेडात
पुजा ज्ञानाचे धडे गिरवायची
ना भिती ना कसलीच बाधा
चितेच्या जवळ चिंता नसायची!

मनात होता एकच ध्यास
अभ्यास करून मोठे व्हायच
करून गरीब परिस्थितीवर मात
डॉक्टर होण्याचे स्वप्न साकारायच!

पुजाच्या या मनोधैर्याचा,
सर्वांनीच घ्यावा धडा,
अंधश्रद्धा दूर सारून,
ध्येयाचा ध्यास घ्यावा वेडा!

संदीप राक्षे
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

नारी तूच (कविता)

नारी तूच....

नारी तूच रसा
घेतलास या सृष्टीच्या
पालन पोषनाचा वसा!

नारी तू अक्षर
नसणार कोणीच
या धरेवर निरक्षर!

नारी तू साधना
करतील सजीव सृष्टी
तुझीच आराधना!

नारी तूच भक्ती
कुटुंबाची सा-या
तुच खरी शक्ती!

नारी तूच सौंदर्य
जपते प्रत्येक क्षणी
जीवनात तू औदार्य!

नारी तूच कर्तृत्व
स्विकारलेस भुवरी
नात्यातील दातृत्व!

नारी तूच आनंदवन
सृष्टीचे करण्या तू
समर्थ नंदनवन!

संदीप राक्षे
भोसरी पुणे २६

Tuesday, 6 March 2018

पाऊलवाट!(कविता)

पाऊलवाट!

अनवाणी.पावलांनीच,
चालायची जीवनाची वाट,
आकाशाकडे डोळे भिरभिरते,
प्रतिक्षेत होण्याची पहाट!

काटेरी त्या वाटेवरती,
काटा रुततो टाचेला,
रक्तबंबाळ वेदनेची,
जाणिव उजळमाथ्याला!!

माथा उजळ दिसतो जरी,
स्वार्थ माणसांत रुजला,
नशिबाच्या पाऊलवाटेची,
खंत असे फक्त हृदयाला!!

संदीप राक्षे
भोसरी पुणे २६

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...