Sunday, 15 March 2020

काठीगावची होळी, संदीप राक्षे

अनुभूती अद्भुत संस्कृती दर्शनाची, परंपरा काठीगावच्या होळीची:-  संदीप राक्षे ✍🏻

महू, सावर, पळस
आंब्याला पण मोहर.
मोरखी, बुधा, बावा
पारंपारिकतेचा बहर.
काठीगावची होळी पेटते
असतो पहाटेचा प्रहर..

महाराष्ट्र म्हटलं की अनेक परंपरांच माहेरघर, दिवाळी पासून ते गणेशोत्सवापर्य॔तचे सर्व सणवार अति उत्साहात साजरे होत असतात यातूनच बंधूता एकता निर्माण करण्याचे मोठे सामाजिक कार्य केले जाते. प्रत्येक सण हा सामाजिकतेचे प्रतिक आहे. असाच एक सण सातपुडा पर्वत रांगेत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तो म्हणजे होळी, भारतातच या उत्सवाची महती, किर्ती नव्हे तर जगभरात महती आहे. मी फक्त या काठी गावच्या होळी संबंधी ऐकून होतो, पेपर मधे वाचलेले होते. साक्षात पहाण्याचा कधीच योग आला नाही. मनात दरवर्षी प्रचंड इच्छा निर्माण व्हायची, या वर्षी जावूयात, तयारी व्हायची, पण काही ना काही दुसरेच काम निघायचे अन जाणे रद्द व्हायचे. आज नुकताच आश्रमशाळेत फेरफटका मारून नुकताच घरी आलो होतो. तितक्यात आमचे परम मित्र विनोदभाऊ चौधरी यांचा ८/३/२०२० रोजी फोन आला. त्यांनी पहिलेच विचारले उदया कुठे फिरस्तीची योजना तर नाही ना? मी नाही म्हणालो. मग ते म्हणाले जळगाव जिल्हा प्रादेशिक वाहतूक विभागाचे प्रमुख विलासराव चौधरी साहेबांनी काठीगाव, नंदुरबार येथील होळी पहायला जाण्यासाठीचे दि. ९/३/२०२० रोजी योजिले आहे. त्या मधे मी स्वःता साहेब, मालेगाव जिल्हा प्रादेशिक विभागाचे प्रमुख अतुल सुर्यवंशी साहेब, नंदुरबार जिल्हा प्रादेशिक वाहतूक विभाग प्रमुख नितीनजी सुर्यवंशी साहेब, बापूसाहेब चौरै साहेब, उदयोजक अमितजी गायकवाड, गोरे साहेब इतके जण आहोत तुम्ही येणार का? मी कसलाच न विचार करता लगेच होकार दिला. विनोद भाऊंनी सांगितले उदया दहा वाजेपर्यंत नाशिकला पोहचून जा मी नाशिकलाच आहे.
पहाटेच उठलो अन दहा वाजेपर्यंत नाशिकला पोहचलो. तेथून आम्ही सहा जण सटाणा, साक्री मार्गे नंदुरबारला सात वाजता पोहचलो. नंदुरबार येथे चहा पाणी झाला तेथून आम्ही धडगावच्या रस्त्याला लागलो. जाताना गावा गावातील होळ्या पेटल्या होत्या, संपूर्ण गावकरी गावच्या वेशीवर जमून एकत्रित होळीचा आनंद घेत होते. लहान मुल डफडी वाजवून सणांचा आनंद लुटत होती. आकाशातून पांढरा शुभ्र चांदोमामा पण होळी उत्सवाचा आनंद घेत होता. त्याच्या दयेने अंधारावर मात होऊन दूरदुरचे अगदी स्पष्ट दिसत होते. कारण पौर्णिमेचा तो चांदवा होता. खरतर चंद्र हा कल्पना शक्तीचा कारक ग्रह आहे त्यामुळे सहजच जगदिश खेबुडकरांनी लिहीलेल्या काही ओळी आठवल्या.

उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा!
दाही दिशा कशा खुलल्या, वनीवनी कुमुदिनी फुलल्या,
नववधु अधिर मनी जाहल्या, प्रणयरस हा चहुकडे वितळला स्वर्गीचा!!

चंद्रोदयानंतर सारा निसर्गच आनंदमय होतो, आणि प्रणयरसाने भारला जातो त्यात अनेक झाडं, फुल, वेली मोहरून जातात तर प्रत्येक माणसाच्या हदयात प्रेमरसाच्या अनेक लाटां उसळू लागतात. असे काही वातावरण आकाशातील त्या चंद्राकडे पाहून झाले होते, कधी कधी ढगांच्या आड तर कधी कधी डोंगराच्या आड लपून जायचा, असा हा पाठ शिवणीचा खेळ खेळत आमचा प्रवास सुरू होता. आता आमची गाडी सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी आली होती. पुढे खूप मोठा घाट मार्ग चढून आम्हाला पुढे जायचे होते. विरळ झाडीतला सातपुडा पर्वत संपूर्णता उजाड दिसत होता. चंद्राच्या उजेडात पांढरा धक्क दिसत होता. अशातच हातात धारदार हत्यार घेऊन दहा बारा जण रंगीबेरंगी कपडे परिधान करून, चेह-यावर चित्र विचित्र रंगवलेले, काहीनीं चेह-यावर मुखवटे बसवलेले होते. गाडीला आडवे झाले अन मनातल्या भितीने कहरच केला. अचानक गाडी पुढे आलेली ही तरूण मुले काहीतरी मागत होती पण लक्षात येईना. ते नुसते फाग दो, फाग दो म्हणायची इतक्यात चौधरी साहेबांनी खिशातले दहा रू काढले अन त्यांना दिले. दहा रू मिळाले अन ती आदिवासी मुल गाडी पासून दूर गेली. पुढे गेल्यावर चौधरी साहेबांनी सांगितले की हे होळीच्या सणाला पैसे मागतात त्याला फाग म्हणतात. मला जरा हे चमत्कारिक वाटले, पण प्रथा आहे हे कळल्यावर बरं वाटलं, मग आम्ही सर्वानींच सुट्टे दहा दहा रू काढले अन जो गाडीला आडवा येईल त्याला दहा रू देत गेलो. संपूर्ण पर्वत रांगेतून ढोलाचे आवाज आता घुमत होते भयाण शांततेला छेद देत होते. रात्री अकरा वाजता आम्ही धडगाव सरकारी गेस्ट हाऊसला पोहचलो तिथे आमची जेवणाची व राहण्याची सोय केलेली होती. संपूर्ण अधिकारी वर्ग सोबत असल्याने, मनसोक्त सरकारी पाहुणचार घेतला. जेवणाचा बेत मस्त आदिवासी पद्धतीने केल्या मुळे एक वेगळीच चव चाखायला मिळाली. विलासराव चौधरी साहेबांनी आमची सर्व अधिकारी वर्गाशी ओळख करून दिली अन तेथून आम्ही काठीगावाकडे निघालो. धडगावहून पुढे काठीगाव ४० किलोमीटर होते. आमच्या गाडीच्या पुढे प्रादेशिक वाहतूक विभागाची पिवळ्या दिव्याची गाडी होती, आमची गाडी मधोमध आमच्या मागे अजून स्कॉर्पिओ त्यामुळे आमचा रूबाब तर डबल वाढला होता. आपणही कुणीतरी मोठी आसामी आहोत असा मनातल्या मनात भास करून घेत सरकारी थाटात प्रवास सुरू होता. आता दोन किलोमीटर काठीगाव राहिले होते, तिथून पुढे मोठ्या गाड्यांना प्रवेश निषिध्द होता. पण आमच्या पुढे दिव्याची गाडी असल्याने आम्ही थेट काठीगावात पोहचलो. मंगळुरी व जुन्या कौलारूंची घर मस्त लाईटिंग लावून सजवलेली होती. घरात मात्र कोणीच नव्हतं सारे जण होळी उत्सवात मग्न होते. गाडया एका घराच्या समोर उभ्या केल्या अन आम्ही पण पायी उतरून चालू लागलो. असंख्य आदिवासी बंधू समुहाने सजून धजून होळीच्या ठिकाणी निघाले होते. आजूबाजूला गळ्यातल्या रंगीबेरंगी माळा, पोत, डोरले, कुडक्या पिपाण्यांची दुकानं सजली होती. अनेक दुकानांवर झुंबड उडालेली होती. जिलेबीच्या परातीच्या पराती खाली होत होत्या, पिपांण्याच्या आवाजाने तर कानठाळ्या बसत होत्या, अशातच आम्ही होळीचा मुख्य सोहळा जिथे चालतो त्या ठिकाणी पोहचलो. डोक्यावर मोरपिसांचा मुकूट व कंबरेला भल्या मोठ्या घुंगरमाळा बांधलेल्या, आदिवासींचा मोठा समुह आपल्या पारंपरिक शैलीत ढोल, पिरी, पावा, मांदल या वाद्यांच्या तालावर एक विशिष्ट ठेका धरून नाचत होता. एक पाऊल पुढे एक पाऊल मागे घेत कंबरेला हळूच झटका देत होता. त्यामुळे एक प्रकारचा लयबद्ध आवाज ऐकू येत होता त्या आवाजाने आनंदाला उधाण येवून आजूबाजूचा प्रत्येक जण त्यांच्या सोबत ठेका धरीत होता. आम्ही सर्वांनी पण त्यांच्या तालावर थोडावेळ ठेका धरला अन पुढच्या समुहाकडे गेलो, त्यांनी बांबूच्या झाडापासून मुकूट तयार करून त्याला रंगीबेरंगी कागदांनी सजवलेले होते व तो डोक्यावर परीधान केला होता. अन कंबरेला भले मोठे वाळलेल्या भोपळ्यांची माळ बांधलेली होती. ते पण ढोलाच्या तालावर नाचत होते. त्यांच्या मधोमध अस्वल, डाकीण, वाघ्या यांचे मुखवटे घातलेले अनेक आदिवासी नाचताना दिसत होते. अनेक पुरूषांनी स्त्री पात्र साकारली होती ते पण साडी चोळी घालून नाचत होते. या होळीचे वैशिष्ट्य म्हणजे यामधे कुठेही महिलां नाचताना दिसत नव्हत्या. एका टेकडीवर असंख्य महिलांचा समुह हा अविस्मरणीय सोहळा बसून पहात होत्या. वरील प्रमाणे सजलेले असंख्य समुह या होळी उत्सवात दिसत होते. आम्ही संपूर्ण गावाला फेरफटका मारला सगळीकडे तोच उत्साह भरलेला दिसत होता. एकही आदिवासी बांधव थकत नव्हता की बसत नव्हता एक सारखे त्याचे हे पारंपरिक नृत्य सुरूच होते. गावच्या मध्यभागी एका लिंबाच्या झाडाला दिडशे फूट मोठी बांबुची सरळ काठी उभी केलेले होती प्रत्येक जण येवून ती काठी उचलत होता व काहीतरी मागणं मागत होता. आम्ही पण त्या काठीचे दर्शन घेतले थोडी वर उचलली. काही वाद्यांचा समुह बाजूला बोलवून घेतला अन तिथे आम्ही सर्वांनी या पारंपरिक नृत्याचा आनंद लुटला. सगळे जण नाचून घामांत भिजून गेले होते. पहाटेचे चार कधी वाजले हे आम्हाला कळलेच नाही. मुख्य चौकात आता होळी पेटविण्याची तयारी सुरू झाली होती.

पावित्र्याने भरते वर्षानुवर्षं
उभ्या मानवतेची होळी
संस्कृती जपत पेटते
काठीगावची होळी..

१२४६ साली या होळीची परंपरा सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे. आदिवासींचे देवता राजा पाणठा व गांडा ठाकूर यांनी सुरू केलेली ही काठी गावची होळी त्यामुळे या होळीला विशेष महत्त्व आहे. आता सूर्योदयची वेळ झाली होती. गावच्या पाटलाच्या हस्ते होळीची पुजा करण्यात आली. जो लिंबाच्या झाडाला उभा केलेला बांबू आणून होळीच्या मधोमध रोवला गेला. प्रत्येक आदिवासी बंधूनी घरातून लाकडाचा एक एक ओंडका आणलेला होता. ते सर्व ओंडके उभ्या केलेल्या बांबूच्या सभोवती रचन्यात आले. आणि गावच्या पाटलाच्या शुभहस्ते होळी पेटविण्यात आली. होळी पेटली आणि थोड्यावेळातच भला मोठा बांबू आडवा झाला. तेथे असलेल्या मान्यवरांच्या हस्ते त्या बांबुचे तुकडे करण्यात आले अन आलेल्या प्रत्येक आदिवासी बांधवाला ते वाटण्यात आले. मानवी संस्कृतीची मुल्ये जपणारी ही होळी आदिवासींच्या जीवनात महत्वाची आहे. या वर्षी कोरोना या व्हायरस मुळे बाहेर देशातील पर्यटक या होळी उत्सवासाठी उपस्थित नव्हते. महाराष्ट्रातील प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी काठी गावची होळी अनुभवावी याचि देही याचि डोळा पहावी, आपल्या या महाराष्ट्रातील अनमोल अशी संस्कृती जतन करण्याची आदिवासी बांधवांना प्रेरणा दयावी..
महाराष्ट्रामध्ये रूढी परंपरेनुसार त्या त्या भागातील सांस्कृतिक जडण घडण होत असताना इथल्या मातीतला  रांगडेपणा, लोककला संस्कृतीचे वैविध्यपूर्ण वेगळेपण पाहिले की या महाराष्ट्रात जन्माला आलो आहे याचा सार्थ अभिमान वाटतो. काठीगावचा हा नयनरम्य सोहळा पाहून सारेच जण भारावून गेलो होतो. रात्रभरच्या जागरणाने डोळ्यांच्यावर झापड येत होती. शरीर थकले होते पण मन ताजेतवाने होते अशातच काठी गावचा निरोप घेतला अन नाशिककडे प्रस्थान केले...

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

No comments:

Post a Comment

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...