Friday, 29 January 2021

हत्ती महल, कमल महल, रंगा मंदिर

 भारताच्या सुवर्ण वैभवाच्या पाऊलखुणा..

"हत्तीमहल, कमल महल, माधव रंगा मंदिर" हंम्पी कर्नाटक 

संदीप राक्षे ✍🏻


हजार राम मंदिर पाहून आम्ही हत्ती अस्ताबल, कमल महाल व माधव रंगा मंदिर पहावयास आलो होतो. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर प्रथम दिसते ते भव्य हत्ती अस्ताबल, हत्तींना ठेवण्याकरता १२०० फूट लांब उत्तम दगडी महाल, ज्याला ११ मोठी दालने होती. प्रत्येक दालनाचा घुमट वेगळ्या आकाराचा दिसत आहे. नक्षीकामाची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे. घुमटाच्या आतील बाजूने लटकवलेले अजस्र लोखंडी हूक, ज्याच्या आधाराने जाड दोरखंडाने हत्तींना बांधून ठेवत. या वस्तू समोरच भव्य दालनात माहूत व पहारेकरी रहात होते. राणी महाला इतकेच हत्ती महालाचे महत्त्व होते. इथूनच राजघराण्यातील महिलां हत्ती वरील अंबारीत बसून कार्यक्रमाला जात असायच्या. हत्ती महालाच्या समोरच प्रशस्त प्रांगण या प्रांगणात हत्तीना शिक्षण दिले जायचे. इतके फिरलो पण प्राण्यांच्या साठी महाल प्रथमच पाहिला होता. या वरून विजयनगरच्या वैभवाची महती साक्षांकित होते. हत्ती महाल पाहून आम्ही चालतच कमल महाल पहाण्यास निघालो. राजघराण्यातील स्त्रियांना एकत्रित दिवस घालविण्याचा महाल म्हणजे कमल महाल, उंचावरून पाहिले तर पूर्ण कमळाच्या फुलांचा आकार दिसतो. या महालातील १४ कमानी इतक्या सरळ रेषेत आहेत की शेवटच्या कमानीतून दिसणारा उजेड  अवर्णनीय आहे. कमल महाल हा कमळाच्या फुलाच्या आकाराचा म्हणून त्याला कमल महाल हे नाव पडले आहे. एक एक वास्तू पाहून मन थक्क होत होते. संकेत प्रत्येक वास्तूची माहिती गाईडला तंतोतंत विचारीत होता त्यामुळे माझ्या पण ज्ञानात भर पडत होती. कमल महाल पाहून आम्ही टेहळणी बुरूजा जवळ पोहचलो, त्या बुरूजावरून चोहोबाजूंवर कडक नजर ठेवता येईल व कमल महालातील राज घराण्यातील महिलांची हालचाल सेवकांच्या दृष्टीस पडू नये अशी सुविधा केलेली दिसत होती. एक एक वास्तू पहात होतो तिची नवलाई वेग वेगळीच होती. टेहळणी बुरूजाला वळसा घालून आम्ही माधव रंगा मंदिराकडे निघालो..

माधव रंगा मंदिर हे १५४५ साली नृत्य, गायन, वादन या साठी बांधलेले होते. या मंदिरातील प्रत्येक खांबावर गरूड, श्री विठ्ठल, सूर्य, कृष्ण, हनुमान अशा विविध देवतांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. शेजारी देवी मंदिर गर्भ गृह रिकामे पण मंदिराच्या बाहेरच बारा फुटाची हनुमानाची कोरीव मुर्ती प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते, त्या मुर्तीचे दर्शन घेण्याचा व तिच्या सोबत फोटो काढण्याचा मोह अजिबात आवरत नाही. प्रत्येक मंदिर निरिक्षण पूर्वक पाहून त्याची खासियत समजून घेताना साक्षात चौदाव्या शतकात असल्याचा भास वेळोवेळी होत होता. किती परंपरा, संस्कृती कला, अनमोल, अप्रतिम, अद्भुत, चैतन्यदायी, चमत्कारिक अशा वास्तू हा आपल्या पुर्वजांचा हा ठेवा पाहून आपला भारतदेश हाच खरा स्वर्ग असा साक्षात्कार होतो..


संदीप राक्षे✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१


No comments:

Post a Comment

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...