Thursday, 16 October 2025

सत्य संकल्पाचा दाता! आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा!

सत्य संकल्पाचा दाता! आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा..
संदीप राक्षे✍🏻


संत तोचि जाणा! 
जो देही उदार!!

म्हणजे खरा संत तोच असतो, जो आपल्या शरीराने (देहाने) उदार असतो. याचा अर्थ असा की, जो माणूस आपल्या स्वार्थाचा विचार न करता, सर्वांसाठी उदार मनाने काम करतो, आपली सत्य संकल्पना पुर्णत्वास लावतो, इतरांना मदत करतो आणि त्यांच्या गरजा पूर्ण करतो. संकल्प म्हणजे विचारांच बीज, आणि सत्य संकल्प म्हणजे दैवी बीज. ज्याच्या अंतःकरणात श्रद्धा, प्रेम, आणि निःस्वार्थता आहे, त्यांचा संकल्प अखेर साकार होतो. अशा सत्य संकल्पातून उगम झाला, आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादांच्या कार्याचा. त्यांच्या एका शुद्ध विचाराने माळरानावरचं आपेगाव आज संतभूमीचं नंदनवन बनलं आहे. श्रीक्षेत्र आपेगाव संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती, सोपान, आणि मुक्ताबाई यांची पवित्र जन्मभूमी. काळाच्या ओघात ही भूमी जणू विस्मृतीत गेली होती. परंतु, दादांच्या अंतःकरणात एक दैवी हाक उमटली ही भूमी पुन्हा जागवायची! ही केवळ पुनर्बांधणी नव्हती, तर एक आध्यात्मिक पुनर्जागरणाची चळवळ होती. ज्या भूमीवर कधी काटेरी झाडं आणि जुनी वास्तू होती, त्या जागेवर आज पवित्र मंदिरे, हरित वनश्री आणि भक्तिरसाने ओथंबलेलं नंदनवन फुललं आहे. हे नंदनवन म्हणजे ज्ञानेश्वर दादांच्या गुरू महाराजांचे, वडिलांचे म्हणजेच विष्णू महाराज कोल्हापूरकर यांच्या स्वप्नांचे मूर्त रूप. मातीला जर प्रेमाचा स्पर्श मिळाला, तर ती भूमीही परमेश्वराचं रूप धारण करते! अगदी हेच ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादांनी सिद्ध करून दाखवलं. जेव्हा सत्य कार्य सुरू होतं, तेव्हा परीक्षा अपरिहार्य असते. दादांनाही मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला. अनेकांनी विरोध केला, अनेकांनी हिणवलं, पण दादांनी कधीच मार्ग सोडला नाही. त्यांचा संकल्प होता दृढ, ज्ञानेश्वरादि भावंडाची जन्मभूमी पुन्हा तेजोमय करायची. प्रत्येक आघात ज्ञानेश्वर दादांनी प्रसाद मानला, प्रत्येक अडथळा त्यांनी दैवी परीक्षा समजली. यातूनच त्यांनी शिकवलं, सत्यासाठी झगडा म्हणजेच सेवा!आज श्रीक्षेत्र आपेगावमध्ये केवळ मंदिरे नाहीत, तर आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याचा संगम आहे. भक्तांसाठी ध्यान, नामस्मरण, कीर्तन, भजन यांची परंपरा जिवंत आहे. देशभरातून भक्त येथे येतात, संतभूमीचा स्पर्श घेतात, आणि अंतःकरण शुद्ध करतात. हे सगळं शक्य झालं ते फक्त
ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादांच्या अखंड प्रयत्नांनी. ज्ञानेश्वर दादांचा संकल्प केवळ एका गावापुरता नव्हता.
त्यांचा हेतू होता “संत ज्ञानेश्वरांची जन्मभूमी जगभर पोहोचावी!”
यासाठी त्यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं. ते सतत प्रवास करत राहिले, कीर्तनाच्या माध्यमातून संतविचार व श्रीक्षेत्र आपेगाव, संत ज्ञानोबारायांची जन्मभूमी सगळीकडे पसरवत राहिले, आणि आज आपेगावचं नाव जगाच्या कोपऱ्यात कोपऱ्यात पोहोचलं आहे. आजच्या धावपळीच्या युगात
ज्ञानेश्वर दादांच जीवन आपल्याला सांगतं “कितीही अडथळे आले तरी, श्रद्धा जर खरी असेल तर यश निश्चित आहे.” त्यांचा संकल्प आपल्याला शिकवतो, साधेपणातही भव्यता असते, आणि सेवा हाच सर्वोच्च धर्म आहे. आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा हे केवळ संतभूमीचे सेवक नाहीत, तर सत्य संकल्पाचे जिवंत प्रतीक आहेत. त्यांच्या कार्याने एक माळरान चैतन्यमय केलं,
त्यांच्या तपश्चर्येने विस्मृतीत गेलेली भूमी पुन्हा तेजस्वी केली,
आणि त्यांच्या प्रेरणेने हजारो भक्तांच्या मनात श्रद्धेचा दीप प्रज्वलित झाला. सत्य संकल्पाचा दाता! ज्ञानेश्वर दादा!
ज्यांनी माळरानावर फुलवलं भक्तीचं नंदनवन! भारतातील दगडी शिल्पातील मंदिरे आज लोप पावत चालली आहेत. हजारो वर्षांच्या परंपरेतून उभारलेली ही मंदिरे केवळ पूजा स्थळ नव्हती, तर ती चैतन्याचे केंद्र होती. त्या दगडांमध्ये श्रद्धेचे, भक्‍तीचे आणि साधनेचे स्पंदन गुंजत असे. पण आज त्या जागी सिमेंटची मंदिरे उभी राहत आहेत. बाहेरून भव्य, पण आतून रिकामी.
ना ऊर्जा, ना शांतता, ना चैतन्य. माणूस क्षणभर पण उभा राहू शकत नाही. अशा निर्जीव भिंतींमध्ये देवाचं वास्तव्य कसं असेल? याच विचाराने प्रेरित होऊन आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा यांनी श्रीक्षेत्र आपेगाव या दुर्लक्षित भूमीवर दगडी मंदिर उभारण्याचा संकल्प केला. ही तीच भूमी जिच्यावर कधी काळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, निवृत्ती, सोपान, आणि मुक्ताबाई यांनी जन्म घेतला होता. याच पवित्र भूमीत संत ज्ञानोबारायांचा जन्म बाराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ. स. १२७५) रोजी झाला होता. त्यांच्या चरणस्पर्शांनी माती पवित्र झाली होती. एकेकाळी ओसाड, माळरानासारखी झालेली ती जन्मभूमी ज्ञानेश्वर दादांनी नंदनवनात रूपांतरित केली. पैशाची कमतरता, अनंत अडचणी, काही गावकऱ्यांचा विरोध, मानसिक व शारीरिक छळ  हे सगळं सहन करूनही दादांनी ध्यास सोडला नाही. त्यांच्या मनात एकच मंत्र होता. “संत ज्ञानेश्वरांची जन्मभूमी पुन्हा चैतन्यमय झाली पाहिजे!” ज्ञानेश्वर दादांचा स्वभाव फणसासारखा वरून कडक, काटेरी, पण आतून रसाळ आणि गोड. त्यांचं प्रेम, त्यांचा कठोरपणा, त्यांचा शिस्तप्रिय दृष्टिकोन हे सगळं त्या भूमीला पुन्हा तेजस्वी करण्यासाठी होतं. त्यांनी पैशाच्या, लोकांच्या, आणि काळाच्या मर्यादा ओलांडून दगड-दगड जपला, त्या दगडांमध्ये पुन्हा माऊलीचं चैतन्य फुंकलं. ज्ञानेश्वर दादांच्या स्वभावाशी साधर्म्य सांगणारा तुकोबारायांचा अभंग तंतोतंत जुळणारा आहे.

मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास! 
कठिण वज्रास भेदूं ऐसे !!
मेले जित असों निजोनियां जागे! 
जो जो जो जें मागे तें तें देऊं!!
भले तरि देऊं कासेची लंगोटी!
नाठाळाचे माथी हाणू काठी!!
मायबापाहूनि बहू मायावंत! 
करूं घातपात शत्रूहूनि!!
अमृत तें काय गोड आम्हा पुढे! 
विष तें बापुडें कडू किती!!
तुका म्हणे आम्ही अवघेचि गोड! 
ज्याचें पुरे कोड त्याचे परि!!

सर्वसाधारणपणे संत म्हटले की अगदी गायीपेक्षा गरीब, समाजाकडून होणारा कुठलाही त्रास सहन करणारा असा एक समज असतो. पण ज्ञानेश्वरदादा मात्र वेगळेच रसायन आहे. प्रत्यक्ष भल्याभल्यांना सुनवायला ही ज्ञानेश्वर दादा अजिबात कचरत नाहीत. ते एखाद्या चुकीच्या व्यक्तिचे वागणे कसे बरे सहन करतील. ज्ञानेश्वर दादा कायम सांगतात आपणहून आम्ही कोणाच्या वाटेला जाणार नाही, पण जर का विनाकारण कोणी आमची खोडी केली, तर मग तुमची काही धडगत नाही. हे नीट ध्यानात ठेवा! ज्ञानेश्वर दादा नेहमी सांगतात वेळ पडली तर आम्ही स्वतःची लंगोटीही देऊ, इतके आम्ही उदार आहोत, पण कोणी एखादा आम्हाला फारच नेभळट समजून आमच्या लंगोटीलाच हात घालू पाहेल तर खबरदार! आम्ही अशा नाठाळाचे टाळके सडकायलाही कमी करणार नाही. आम्ही खरे तर मायबापाहून कृपाळु, दयाळु आहोत, पण या गोष्टीचा कोणी गैरफायदा घेऊ लागल तर आम्ही शत्रूहूनही जास्त घातपात करू शकतो. आम्ही खरे तर अमृतापेक्षा गोड आहोत, पण वेळ पडली तर विषापेक्षाही कडू आहोत. थोडक्यात आम्ही जरी मवाळ-मृदु असलो तरी वेळ पडलीच तर मात्र समोरच्याला त्याच्या भाषेत उत्तर देणे हे काही आम्हाला अवघड नाही आहे. आज श्रीक्षेत्र आपेगाव हे केवळ एक तीर्थस्थान नाही,
तर श्रद्धा, परिश्रम आणि संकल्पशक्तीचा जिवंत प्रतीक आहे.
आणि या क्रांतीच्या केंद्रस्थानी आहेत, आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा सत्य संकल्पाचे, अदम्य श्रद्धेचे आणि चैतन्याच्या दगडातील देवाचे खरे साधक. चैतन्यशिल्पकार! माऊलीभूमीचे पुनर्जन्मदाता! सत्य संकल्पाचे अध्वर्यू! श्रद्धेचा शिल्पी! आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा खरंच एक महान विभूती आहेच, त्यांच्या अस्तित्वाने भक्तांना श्रद्धेचा दीप, हृदयांना उब आणि जीवनाला दिशा मिळते. अशा या दादांचा प्रकाश काळाच्या प्रवाहातही उजळत राहो! आज ज्ञानेश्वर दादांचा वाढदिवस! आजच्या दिवशी संत ज्ञानोबारायांना एकच प्रार्थना आहे की दादांचे जीवन दीर्घ, स्वास्थ्यपूर्ण आणि आनंदमयी जावो, ज्ञानेश्वर दादांच्या ध्यासाचा प्रकाश पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचत राहो, दादांची सेवा, साधना, श्वास आणि ध्यास हा आपेगावसारख्या पवित्र भक्तिमय स्थळी सदैव जिवंत राहो! त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या जीवनात
सत्य, श्रद्धा आणि चैतन्याची ज्योत पेटत राहो! हीच आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादांना वाढदिवसानिमित्त माऊलीमय शुभेच्छा!
माऊली की जय!

संदीप राक्षे✍🏻
भोसरी पुणे
९८५०२१७८४४

No comments:

Post a Comment

सत्य संकल्पाचा दाता! आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा!

सत्य संकल्पाचा दाता! आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा.. संदीप राक्षे✍🏻 संत तोचि जाणा!  जो देही उदार!! म्हणजे खरा संत तोच ...