Showing posts with label Sandeep Rakshe. Show all posts
Showing posts with label Sandeep Rakshe. Show all posts

Thursday, 14 December 2017

आठवण ठेवावी आईच्या दुधाची!


*---आठवण----*

*बायको मिळाली जरी पोळी मधाची*
*आठवण ठेवावी तु आईच्या दुधाची !*

*कडेवर खांद्यावर तु खेळलास वेड्या*
*दिनरात मांडीवर त्या लोळलास वेड्या !*

*पुन्हा जीवनात नाही घडी आनंदाची.*
*"आठवण ठेवावी तु आईच्या दुधाची"!*

*या विश्वात अमर आहे माऊलीची माया*
*बाळाच्या सुखासाठी ती झिजविती काया !*

*तिच्या जीवनात नसती अपेक्षा कशाची.*
*"आठवण ठेवावी तु आईच्या दुधाची !"*

*जन्मदात्या आईबापाला लोटु नको दुर*
*वृद्धपणी त्यांच्या जीवाला वाटे हुर हुर!*

*आई बापा बोलु नको रे भाषा क्रोधाची.*
*"आठवण ठेवावी तु आईच्या दुधाची"!*

*मायेच्या रे ओलाव्यात साठवु नको रे*
*आश्रमात आई बापाला पाठवु नको रे !*

*अपेक्षा तु कर रे बाळा आशिर्वादाची.*
*"आठवण ठेवावी तु आईच्या दुधाची"!*

*लेखन- संदिप राक्षे*
*भोसरी पुणे २६*
*८६५७४२४२१*
अवश्य भेट द्या: -  http://sandeeprakshe421.blogspot.in/2017/12/blog-post_50.html

आध्यात्म आणी निसर्ग

तोरणमाळ नुसते थंड हवेचे ठिकाण नसुन
नवनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र सिध्द भुमी आहे..

तोरणमाळ नाव जरी आठवले तरी तनामनात उत्साह संचारणारी भुमी,निसर्गाचा अभूतपूर्व चमत्कार म्हणजे तोरणमाळ, गुरू गोरक्षनाथांची तपश्चर्या भुमी म्हणजे तोरणमाळ, अशा या तोरणमाळला जाण्याचा पुन्हा एकदा योग आला. सोबत मुकूंदजी थोरात सर व गजाननदादा साप्ते होते. रात्री आठ वाजता गाडीने तोरणमाळच्या चढाईला सुरवात केली. संपूर्ण डोंगर रात्रीच्या अंधारात झाकोळला होता..गाडीच्या लाईट मध्ये जे दिसेल ते पहाण्याचा प्रयत्न करीत होतो. मध्यभागी आल्यावर आकाशात तारांगण प्रकट झालेले पाहिले इतर वेळी कधीच न दिसणाऱ्या चांदण्यांचे दर्शन होत होते. थोडा काळोख दुर होऊन चांदण्यांच्या प्रकाशात संपूर्ण डोंगर कामधेनूच्या दुधाची छटा पडल्या सारखे भासत होते. मध्ये मध्ये पांगीराची फुले त्या चांदण्यात चमकत होती. हे विलोभनीय दृष्य आम्ही गाडीतूनच अनुभवत होतो.. भयानक शांतता मनात भीतीचे काहूर उठवीत होती.वेगवेगळया विचारांनी मन भरले होते. भीतीचा पडदा दुर सारून आम्ही गाडीतील टेपच्या गाण्यांचा आवाज वाढविला..गाण्यांचा आस्वाद घेत आम्ही तोरणमाळला पोहोचलो.. शांत वातावरण होते. समोरच नर्मदा तलावाचे पाणी चांदण्यांच्या प्रकाशात चांदीचा वर्ख पांघरावा तसा भासत होता..हे दृश्य डोळ्यात साठवून मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो.पहाटे पाच वाजता उठलो आणी तोरणा देवीची टेकडी गाठली, टेकडी चढताना दमछाक होत होती पण गार वारा मनाला अंगाला ताजेतवाना करत होता..उत्साहवर्धक वातावरण शुद्ध हवा खात खात टेकडीवर पोहचलो आता उजाडल होत. पुर्व दिशेला वेगवेगळया रंगाची उधळण जाणवत होती. प्रतिक्षा होती सुर्योदयाची ते विहंगम दृश्य पहाण्यासाठीचआम्ही आलो होतो. हळू हळू सुर्यदेव वर वर येऊ लागले तसा सारा परिसर सुवर्णा सारखा चकाकत होता. इतका सुंदर सूर्योदय पहिल्यांदाच अनुभवत होतो. तेथुन आम्ही जिथे गोरक्षनाथांची तपश्चर्या भुमी आहे त्या ठिकाणी आलो. एक वेगळे चैतन्य या परिसरात जाणवत होते. शेजारीच अमृत तलाव या मंदिराचे देखणे रुप पण दाखवित होते. या मंदिराची प्रतिकृती या तलावात स्पष्ट दिसत होती. इतके शांत वातावरण की टाचणी जरी पडली तरी तिचा आवाज येईल, उदबत्तीचा मनमोहक सुगंध दरवळत होता एका छोट्या मंदिरात धुनी जळत होती. मंदिरात गेलो गोरक्षनाथांचे दर्शन घेतले, जिथे धुनी जळते त्या मंदिराचे दर्शन घेतले. नवीनच मंदिराचे काम सुरू होते आपणही थोडीशी मदत करावी मनात विचार आला पण तिथे कोणीच दिसले नाही.  थोडा वेळ थांबलो तितक्यात एक भगव्या कपड्यातील एक बाबाजी येताना दिसले.. त्यांच्या चेहऱ्यावरील तेज स्पष्ट दिसत होते  हे कोणीतरी योगीच असावेत हा समज खरा ठरला.ते जवळ आले त्यांना मी वाकून नमस्कार केला. मी बोलण्या अगोदरच ते बोलु लागले जे ते मला बोलत होते असे काही आमची खुप वर्षाची ओळख आहे . त्यांनी मला जे काम सांगितले ते ऐकून मी चकितच झालो. त्या बाबाजींना मी विचारले आपली ना ओळख ना कधी भेट मग हे काम तुम्ही माझ्यावर सोपविलेत बाबाजी बोलु लागले इथे येणारे अनेक करोडपती असतात मोठ मोठे उद्योगपती असतात, ते इथे त्यांचेच रडगाणे गात असतात, त्यांना सांगुन काहीच उपयोग होत नाही. तुम्हीच हे काम करणार हे सत्य मी जाणले गुरू गोरक्षनाथांचाच तो आदेश असेल कदाचित म्हणून मी तुम्हाला सांगितले, मी त्या बाबाजींना शब्द दिला.. त्या बाबाजींना मी नाव विचारले त्यांनी योगी संजुनाथ हे नाव सांगितले नवरात्र पासुन मी इथेच आहे. मुकुंद सरांनी बाबाजींना तोरणमाळ विषयी काही सांगाल का असे विचारले ते हो म्हणाले .. आणी बाबाजी बोलु लागले, इथे शिवरात्रीला खुप मोठी यात्रा भरते दोन ते पाच लाख यात्रेकरु येथे येतात,बाबाजी आम्हाला एका कुंडा जवळ घेऊन गेले याच कुंडात शिवरात्रीला एक एक्कावन्न किलोचा रोट बनवितात तो एका कपड्यात रस्सीने बांधतात आणी त्या रोटला जळत्या निखा-यात टाकतात त्याच्या वर पुन्हा गौ-या टाकतात. पुर्ण भाजल्या नंतर तो रोट बाहेर काढतात तर बांधलेला कपडा व रस्सी अजिबात जळत नाही हा एक मोठा चमत्कार आहे. कारण अग्नीत सर्वच जळते पण रस्सी आणी कपडा जळत नाही हा साक्षात्कार गोरक्षनाथांचा आहे. हा रोट आलेल्या भक्तांना प्रसाद म्हणून वाटतात पण तो संपत नाही हे पण विशेष आहे. सांगता सांगता बाबाजी आम्हाला एका वडा खाली घेऊन गेले आणी सांगितले हाच तो वड याच वडाखाली गोरक्षनाथांनी बारा वर्षे तपश्चर्या केल्याने हा वड अमर आहे. हा वड खुप मोठा विशालकाय होतो आणी अचानक फाटतो त्या मध्ये पुन्हा एक वडाचे लहान रोप उगवते व पुन्हा त्याचा विशालकाय वड तयार होतो. असे खुप युगां पासुन घडते आहे. याच वडाखाली राजा भर्तहारी यांना शिष्य करून घेतले होते..बाबाजी थोडे थांबले आणी एकाला चहा बनवायला सांगितला.  बाबाजींनी आम्हाला तलावा काठी आणले हाच तो तलाव कधीच आटलेला नाही आणि याचा ठाव सुद्धा लागत नाही.. ज्यावेळेस राजा भर्तहारी गोरक्षनाथांचे शिष्य झाले त्यावेळी राजाने हा तलाव खोदण्याचे काम केले पण इथे पाणी लागले नाही. राजाने गोरक्षनाथांना विनंती केली खुप मेहनतीने हा तलाव खोदला आहेत पण पाणी नाही त्यावेळी गोरक्षनाथांनी आपला चिमटा तलावाच्या मध्यभागी मारला आणी साक्षात नर्मदामाता प्रकट झाल्या पण त्या तलावाची खोली पाताळात गेली म्हणून तिथे ठाव लागत नाही उन्हाळा असो किंवा दुष्काळ असो इतक्या उंचावर असुनही इथले पाणी कधीच आटत नाही.. कारण दुर दुर पर्यंत आजुबाजुला पाण्याचा थेंब दिसत नाही. बाबांजींनी दिलेली माहिती ऐकून आम्ही मंत्रमुग्धच झालो.. किती पवित्र ठिकाण आहे हे चार धाम पेक्षा श्रेष्ठ असे हे तोरणमाळ धाम आहे आवर्जुन बाबांजीनी सांगितले.. जसे आपले देहू आळंदी पंढरपुर तसेच खानदेशचे हे पवित्र ठिकाण म्हणजे तोरणमाळ, बाबाजी आता शांत झाले होते त्यांना मी सांगितले मी एक चित्रपट केला आहे गुड मॉर्निंग नावाचा त्यांनी आर्शिर्वाद दिले शुभेच्छा दिल्या, एका पवित्र ठिकाणाची नविन माहीती मिळाली  आध्यात्माच्या माहितीचे गाठोडे घेऊन आम्ही तोरणमाळ सोडले पुन्हा लवकरच येण्यासाठी....

लेखन: -संदिप राक्षे✍🏻

सामाजिक उपक्रम

या निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहुन
आज माझी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली.

आज आहे दिवाळी
श्रीमंतांची लकझक
तर गरीबांची काटकसरी
कुठे दिव्यांच्या माळा
तर कुठे फक्त एक ज्योती
कुठे फटाक्यांचा कल्ला
तर कुठे गरीबांच्या आशा
कुठे चमचमीत गोडधोड
तर कुठे तुकड्यांची अपेक्षा
नको लक्ष्मी माता सोनं नाणं
फक्त दे गरीबास एकवेळच खाणं
नको राहायला आज कुणीही उपाशी
प्रकाश कर प्रत्येकाच्या दाराशी...
दीपावली म्हणजे सणांची सम्राज्ञी. हा सण आपल्याला दुःखातून आनंदाकडे, नैराश्यातून उत्साहाकडे आणि अंध:कारातून प्रकाशाकडे नेणारा असतो. दीप म्हणजे दिवा….”दीप्यते दीपयति वा स्वं परं येति” अर्थात “जो स्वतः प्रकाशतो किंवा दुसऱ्याला प्रकाशित करतो तो दीप” सर्व सामांन्याच्या जीवनात असते कधीतरी दिवाळी पण भौतिक सुखापासुन दुर जगापासून किती तरी पावले दुर असे जंगलात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबाच्या आयुष्यात कोठून येणार दिवाळी, मी गेल्या वर्षांपासून एक निर्धार केला की दिवाळी सणाच्या अगोदर दरवर्षी ज्यांनी कधीच या दिवाळीचा स्वप्नात सुद्धा विचार केला नाही, अशा भागात जावुन त्यांना दिवाळी फराळ व फटाक्यांचे वाटप करायचे आणी माझे ते स्वप्न या वर्षी पुर्ण झाले.पवित्र अशी रमा एकादशी, वसु बारसेची पुर्व संध्या हा दुग्ध शर्करा योग, तोरणमाळ च्या आदिवासींचे जीवन म्हणजे जीवनात कायम अंधारच,ना शिक्षण ना जगाची माहिती आपल्याच मिळालेल्या जीवनात आनंद शोधणारी जमात,जंगलात फिरून जी काही जडीबुटी मिळते त्यावर.किंवा मिळेल त्या जागेत नाचणीचे पीक घेऊन आपला उदरनिर्वाह करीत ना आशा ना आकांक्षा,अंग झाकायला मिळेल इतका एखादा कपडा तो पण धुवून पुन्हा घालायचा,अशा जीवन व्यथित करणाऱ्या आदिवासी पाड्यात जावुन दिवाळी फराळाचे वाटप केले. त्यांच्या चेहर्यावरील आनंद पाहुन माझी दिवाळी साजरी झाल्याचा अत्यानंद मला झाला.खरच दुसऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान पहाण्याचा आनंद काही वेगळाच असतो..
माझी विनंती आहे सर्व मित्रांना आपली दिवाळी तर साजरी कराच पण एखादयाला काही ना काही मदत करून त्याच्या चेहर्यावरील आनंदाचे क्षण पहाण्याचा एकदा तरी प्रयत्न करा.मग बघा आपल्या जीवनात किती आनंद मिळतो ते.. माझ्या या उपक्रमात गुरू गोरक्षनाथ संस्थान चे अध्यक्ष योगी संजुनाथ, कवी अरविंद शेलार, मुकुंद थोरात सर, गजानन साप्ते, आणी संकेत राक्षे सहभागी होते तसेच त्यांची मोलाची साथ मिळाली...

*दिपावलीच्या आजपासून ते* *भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी*, *उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त* *आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा*..!

लेखन: - *संदिप राक्षे*( निर्माता गुड मॉर्निंग चित्रपट)

ही वाट दुर जाते

ही वाट दुर जाते स्वप्ना मधील गावा....

शिखरावर जाण्यासाठी वाट शोधावी,
ध्येयासाठी निराशा नसावीच
आल्या कितीही अडचणी जरी,
यशासाठी थोडी "पायवाट" पहावीच,

लहानपणीची ही वाट कुठे घेऊन जाणार मनातली स्वप्न आशा आकांक्षा पुर्ण होतील की नाही ही मनातली शंका,भविष्या बद्दल अनभिन्नता,आज पुन्हा त्याच वाटेवर चालताना खुप काही आठवले, मामाच्या शेताकडची ही पाय वाट कळायला लागले तेव्हा पासुन उघड्या पायांनी तुडवलेली लाल माती,आजु बाजुला डोक्या पेक्षा वाढलेले उंच गवत मनात भिती निर्माण करणारी वा-याची सळसळ, लहानपणापासूनच भविष्याची स्वप्न या वाटेवरच पडायची त्या वाटेवर चालायला लागलो की मनात असंख्य विचारांची गर्दी दाटायची पण कोवळ्या मनाला काहीच कळत नव्हते पण जसा जसा मोठा होत गेलो तसा मनात येणारे विचार सत्यात उतरविण्याचा प्रयत्न करू लागलो, कधी हारायचो पडायचो ठेच लागायची पण पुन्हा लढायचो,याच पायवाटेचे इतके आकर्षण वाढले की तासनतास याच पायवाटेवर घालवायचो, लहाणपणी तर मला या वाटेचे इतकी भिती घालुन दिली की या वाटेवरच एक पिंपळाचे उंच उंच झाड होते त्या झाडावर टोळ(सापाचा एक उडणारा प्रकार) राहते व ती लहान मुलांचा टाळू फोडते थोडे दिवस भीतीपोटी या वाटेकडे फिरकलोच नाही. ही दंतकथा होती हे कळल्यावर पुन्हा त्याच पायवाटेकडे पाय फिरू लागले...चैत्राच्या महिन्यात पायवाटेच्या कडेने असलेली पांगीराची फुल इतकी बहरून यायची की त्या वाटेवरून चालताना मी एखाद्या नगरीचा राजा आहे आणी माझ्या स्वागतासाठी ही निसर्गाने केलेली सजावट आहे असे वाटायचे, एक एक मनातील कल्पना खरच आनंदायी होती. आज पुन्हा त्या वाटेवर चालताना ते दिवस आठवत होते मनातल्या मनात हसु येत होते. किती सहज एखाद्या स्वप्नाचा विचार करीत होतो. साक्षात उतरवताना किती दिव्य करावे लागते याची यत्किंचीत ही कल्पना मनाला शिवली नव्हती पण आज त्या वाटेवर चालताना आयुष्याची वाट किती खडतर असते,बिकट परस्थितीच्या वाटेतुन मार्ग काढताना किती ओढाताण होते. आयुष्य कमी आणी स्वप्न मोठी ती साकारण्याच्या नादात शरीराची व मनाची झालेली झीज न भरून येणारी. उगीच मोठे झालो असे वाटायला लागले...वलणदांड एक असा जीव की तो विमानाच्या आकाराचा असायचा त्याच्या मागे धावताना आकाशातील विमानांची आठवण व्हायची त्याला पकडायच्या प्रयत्नात कितीतरी वेळा पायाची ढोपर फुटायची पण कधीच पडल्याचे दुख जाणवायचे नाही. पाऊलवाटेच्या कडेच्या गवतावर पहाटेचे दव पडायचे त्यावर सुर्योदय झाला की हे दव असे काही चमकायचे जसा सप्तरंगी फुलांचा सडाच, त्या गवतावर हात फिरवला की ते दव खाली पडायचे, हात ओले व्हायचे, तोच हात तोंडाला पुसायचा आणी तोंड धुतल्याचे समाधान घ्यायचे, अशातच एखादे गाणे आठवायचे ते गात गातच इनाबात(मामाची शेती होती त्या ठिकाणाला नाव होते इनाब) जायचे.. या पाऊलवाटेने खुप प्रेम दिले म्हणून आजही या पाऊलवाटेवर माझे खुप प्रेम आहे.. कधीही बहुलीला मामा कडे गेलो या की जीवलग पाऊलवाटे कडे जातोच मनसोक्त चालण्याचा आनंद घेतो ...लहानपणीच्या आठवणी जागवतो कारण याच पाऊलवाटेने खुप काही शिकवले,मला घडवले,या लाल मातीच्या गंधाने मला दरवळायला शिकवले,भर कडक उन्हात अनवाणी पायाने चालणारी पाऊल अजुनही आठवतात पण कधी या लाल मातीचा चटका बसलेला आठवत नाही. याच पाऊलवाटेवरचे भिंडीचे झाड आठवते त्या झाडावरील फळांचा पिवळा रंग काढुन त्याच रंगात रंगपंचमीच्या दिवशी भिजवलेले सवंगडी याच पाऊलवाटेने नदी कडे जाताना या पाऊल वाटेची लाल माती एकमेकांच्या अंगावर उधळीत ते दिवाळ सणाच्या उटण्याची आठवण करून देत इतकी सुंदर माती तिचा स्पर्श शरीराला एक वेगळीच अनुभूती देत. या पाऊलवाटेच्या मातीने गंध स्पर्श इतकेच नव्हे तर पंचमहाभुतांचे संस्कार ही दिले.असाच एकदा दुपारचा प्रहर शाळेला सुट्टी होती पावसाळ्याचे दिवस होते, भातलावणीची लगबग होती.माझी ड्युटी भात लावणीकडे लागली मैंगावर(भात खाचरातील चिखल एकत्र करण्याचे अवजार)बसण्यासाठी पाऊलवाटेने पुढे पुढे जात होतो..भात खाचर तुडुंब पाण्याने भरलेली पाण्यातून वाट काढीत काढीत पाऊलवाटेला लागलो..पाऊलवाटेवर सुद्धा पोटरी इतका चिखल होता..पहिला पाऊल चिखलात टाकला आणी मऊ लोण्या सारखा स्पर्श जाणवला,दुसरा पाऊल टाकला अन घसरतच चिखलात पडलो मलाही कारण हवे होते मनसोक्त उड्या मारायला,आता संपूर्ण चिखलाने सर्व कपडे आणी अंग भरून गेले होते. पाठीमागून येणाऱ्या मामाने हा प्रकार पाहिला आणी चिखल तुडवावा तसा चिखलात तुडवला रडत रडतच घर गाठले पुन्हा पाऊलवाटे कडे फिरकलोच नाही.आता मामाच गाव सुटल आणी भोसरीत आमच बस्तान बसल नविन शाळा नविन मित्र पण मन कुठेच लागत नव्हते आठवण यायची ती मामाच्या गावाची आणी त्या पाऊलवाटेची,आता मामाच्या गावाला जायला मिळायचे वर्षांनी उत्सवासाठी तो दिवस म्हणजे आयुष्यातला महत्वाचा दिवस बनुन गेला..पुणे मंडईत ट्रक मधे बसायचे आणी मामाचे गाव गाठायचे उतरतो ना उतरतो तोच घर गाठायचो आणी इनाबात जाण्याचा बहाणा करून त्या पाऊलवाटेतच रमायचो, कारण त्या पाऊलवाटेत माझी नाळ जोडलेली असावी म्हणूनच त्या लाल मातीशी माझे नाते जुळले,आता कामाच्या व्यापामुळे सहसा जाणे होत नाही पण गेलो तर त्या पाऊलवाटेवर दोन मिनिट का होईना थांबल्या शिवाय चैन पडत नाही....
माणसांशी नाती सहज जोडली जातात पण अबोल अशा पाऊलवाटेशी माझे नाते कसे जुळले अजुनही मी निरुत्तर आहे....
माझी प्रकाशवाट म्हणजेच ही पाऊलवाट....

लेखन: - संदिप राक्षे ✍🏻

दिपोत्सव ज्ञानदेवांच्या समाधी सोहळ्याचा

*पाहुनिया दिपोत्सवाचा सोहळा*
*दाटला सिद्धबेटाचा गळा!*

आज सिद्धबेटावर भाविकांची मांदियाळी असुन सुद्धा वातावरण धीर गंभीर होते.. इतर वेळेस सिद्धबेटावर जे चैतन्य असते ते थोडे लोप पावले होते... पक्ष्यांचा किलबिलाट नव्हता, अजानवृक्षाची पाने आज सळसळत नव्हती,मातीचा गंध सुद्धा दरवळत नव्हता. या सर्वांचे कारण होते आजच्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज समाधीला याच सिद्धबेटावरून गेले होते. याच समाधी दिनाचे औचित्य साधून पं कल्याणजी गायकवाड संगीत कला अकादमी व संत गाडगेबाबा प्रतिष्ठान च्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही दिपोत्सवाचे आयोजन केले होते..ग्रिनीज बुक विजेती राजश्री जुन्नरकर यांनी आपल्या रांगोळीने सिद्धबेटाचा संपूर्ण परिसर सुशोभित केला होता,संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिकृती तिने रांगोळीत साकारली,सिद्धबेटावरील अनेक झोपड्यांच्या कडेला रांगोळीने सडा घातला.साक्षात माऊलींच्या सहवासाने पावन झालेला हा परिसर रांगोळीने सजुन गेला होता. गौरव राक्षे,गजानन साप्ते संकेत,रितेश,श्रद्धा राक्षे यांनी रांगोळीवर पणत्यांची मांडणी केली..आता सुर्यास्त झाला होता, सिद्धबेटावर काळोखाचे साम्राज्य पसरले होते...दिपोत्सवासाठी भाविक भक्तांची गर्दी जमु लागली... आपल्या हातुन सुद्धा या सिद्धबेटावर एक तरी दिवा पेटवावा या भावनेने सर्वजण स्तब्ध होती.. सात वाजता पं. कल्याणजी गायकवाड, महागायिका कार्तिकी गायकवाड, महागायक कौस्तुभ गायकवाड, कैवल्य गायकवाड यांचे आगमन झाले. या सर्वांच्या शुभहस्ते नंदादीप पेटवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .. एक एक करीत हजारो दिवे पेटले गेले आणी या उजेडात संपुर्ण सिद्धबेट उजळून गेले...इतक्या वेळ अजानवृक्षाची पाने शांत होती ती सळसळू लागली..पण दिवे मात्र शांत तेवत होते.. दिव्यांच्या प्रकाशात अजान वृक्षाची पाने सुवर्णमय झाली होती. हा क्षण पाहुन सर्वांचे नेत्र तृप्त झाले होते. दिपोत्सवाचा कार्यक्रम उरकल्या नंतर भजनाचा कार्यक्रम सुरू झाला भजन सम्राट आदिनाथजी सटले यांनी माऊलींचा विवेका सागरा हा अभंग गाऊन संगीत रजनीची सुरवात केली...कैवल्य गायकवाड,महागायक कौस्तुभ गायकवाड यांनी सुद्धा अभंग गाऊन वातावरण चैतन्य आणले.. आज संजीवन समाधीचा दिवस, *देव निवृतीयाने धरिले दोन्ही कर!*
*जातो ज्ञानेश्वर बैसावया!!*
हा समाधीपर अभंग पं.कल्याणजी गायकवाड यांनी गायला सुरवात केली अन संपूर्ण सिद्धबेट शांत झाले.आजुबाजुला गप्पा मारणारी मंडळी एक चित्त होऊन अभंग ऐकू लागली. गुरुजींचा चैत्यन्यमयी आवाज आज अभंग गाताना भावनिक झाला होता.. त्यांचा गळा दाटून आला हे त्यांच्या गायनातुन स्पष्ट जाणवत होते,अभंग ऐकणा-या भाविकांचे डोळे पाणावले होते. साक्षात चित्रमय समाधी सोहळा डोळ्यासमोर उभा रहात होता..गाता गाता गुरूजी खुपच भावनिक झाले होते.. थोडे शांत झाले..आणी पुन्हा गायला सुरवात केली..काय वातावरण होते खरच असले अनुभव मनाला स्पर्शून जातात,हदयात घर करून राहतात... केलेल्या दिपोत्सवाचे सार्थक झाल्या सारखे वाटत होते. माझे डोळेही भरून आले होते कडा ओल्या झाल्या होत्या..भावना कधीही दाटून येत नाही असे प्रसंग आयुष्यात नशिबानेच येतात....
*नामा म्हणे आता लोपला दिनकर!*
*बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ!!*
या भावपूर्ण अभंगाने कार्यक्रमाची सांगता झाली..
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजेश टाकळकर,आदिनाथदादा सटले, राजश्री जुन्नरकर  साहेबराव कवडेकर,बळवंतजी पांचाळ,तुकारामजी पांचाळ,अमोल नवपुते,गजानन साप्ते,रामदास ठोंबरे, संतोष साळुंखे यांनी मोलाचे सहकार्य केले....
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पवना बँकेचे मॅनेजर युवराज घुले साहेब, विकास सांडभोर साहेब, संगीतकार नरेंद्र जकाते सर उपस्थित होते...

*लेखन: -संदिप राक्षे✍🏻*

माझी आई (कविता)

माझ्या माऊलीचे कष्ट माझ्या शब्दात मांडताना 

मनी हुंदका दाटतोया व्यथा आईची सांगताना...

तिच्या फाटक्या साडीला किती ठिगळं जोडल्याली,

उभ्या आयुष्याला तिन कशी कातरी लावल्याली.

मला भरून येतया माझी आई आठवताना,

मनी हुंदका दाटतोया व्यथा आईची सांगताना...

भरविला घास मुटका माझ्या इवल्या मुखात,

तिचा जलम कष्टाचा पण सदा मी हसत..

तिन बघितली सपन माळ गवताचा कापताना

मनी हुंदका दाटतोया व्यथा आईची सांगताना...

सदा चालु वढाताण नाही भुकचबी भान,

देह झिजवला परी नाही लवली ती मान.

माझ्या जिंदगीच तिन अस 

सोन करताना मनी हुंदका दाटतोया व्यथा 

आईची सांगताना... 

संदिप राक्षे✍🏻

सत्य संकल्पाचा दाता! आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा!

सत्य संकल्पाचा दाता! आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा.. संदीप राक्षे✍🏻 संत तोचि जाणा!  जो देही उदार!! म्हणजे खरा संत तोच ...