Tuesday, 26 November 2019

दृष्टी सकारात्मकतेची

दृष्टी सकारात्मकतेची,,,,

रचनेचा हा रचियेता
अंतरंगात भिनला!
परी ठाव न मनाचा
भक्तीत ही ना विणला!

शिणला हा सारा देह
व्याकुळलेले सारे जीवन!
सैरवैर वायू जणू तो,
ऐकेना हे भिरभिरते मन!

कधी घेते उंच झेप
कधी जाते गगनावरी!
मरणाच्या दारातूनी
येते परतूनं माघारी!

निश्चयाने केला मग विचार
सोडला मनातून अविचार!
सकारात्मकतेच्या घोड्यावरती
झालो आहे आता स्वार!

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६

Friday, 8 November 2019

भारताचा नुसरत फतेहअली खान "सन्नी मलिक" चा बुट पाॅलिश ते इंडियन आयडाॅलचा प्रवास एक चमत्कार..

खरतर आज मोबाईल मुळे बिघडलेली पिढी आपण वर्तमानपत्रात सोशल मिडीयावर सारखे पहात असतो, वाचत असतो. पण साक्षात मोबाईलला आपला गुरू व नुसरत फतेहअली खान यांना एकलव्या सारखा पुजणारा त्यांची गाणी ऐकून रियाज करणारा भटिंडा पंजाबचा सन्नी मलिक हे दुर्मिळ उदाहरण आहे.
घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची वडिल स्वर्गवासी झाल्यानंतर आईने रस्त्यावर फुगे विकून संसाररथ सुरू ठेवला, सन्नी मलिकने आईला हातभार म्हणून अर्धवट शिक्षण सोडून तो बूट पाॅलिशचा व्यवसाय करू लागला. हा व्यवसाय करीत करीत संगीत हा आवडीचा विषय जोपासू लागला. एकलव्या प्रमाणे नुसरतजींना गुरू मानून त्यांचे प्रत्येक गाणं मोबाईलवर पुन्हा पुन्हा ऐकून ते स्वतात उतरविण्याचा प्रयत्न करू लागला, प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ना हे वावगे नाही प्रयत्न केला तर देव सुद्धा भेटू शकतो हे सन्नीने सिद्ध केले. नुसरतजींची प्रत्येक हरकत मुरकी तान यांचा बारकाईने अभ्यास केल्याने साक्षात गळ्यात तोच आवाज उतरला,  खरतर साक्षात गुरू शिवाय कोणतीही गोष्ट अशक्य आहे पण सन्नीच्या चिकाटीने हे शक्य केले. गावातील पारावर बसून नुसत्या विटांचा थर असलेल्या घरात दररोज न चुकता रियाज करीत प्रति नुसरत फतेहअली खान हे आकार घेत होते. सोनी टिव्हीवरील इंडियन आयडाॅलचे ११ वे पर्व सुरू झाले होते. ऑडिशन सुरू झाले होते. सन्नीची संगीत पुजा आता फळाला आली होती. १२ आॅक्टोंबरला पहिले ऑडिशन होते तिथे विशाल ददलानी, नेहा कक्कर, अनु मलिक हे नामवंत परिक्षक होते त्यांच्या समोर प्रथमता सन्नीने नुसरत फतेहअली खान यांचे उसने जाना की तारिफ मुमकीन नही, आफरी आफरी हे गाणं गायलं अन तीनही परिक्षकांना वाटले साक्षात नुसरत फतेहअली खान स्टेजवर गात आहे. सन्नी या गाण्यात तिहाई, आलापी, सरगम, मुरकी व अशा काही ताना घेतल्या की तिनही परिक्षक मंत्रमुग्ध झाले, आणि सन्नी मलिकची टाॅप ४ मधे निवड झाली. एका बुट पाॅलिश करणा-या अवघ्या २५ वर्षाच्या तरूणाची ही मेहनत, ना गुरू ना वस्ताद त्याशिवाय मिळालेले हे यश नविन पिढी साठी नक्कीच उर्जा देणारे आहे...

असफलता एक चुनौती है, स्वीकार करो
क्या कमी रह गई, देखो और सुधार करो
जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम
संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम
कुछ किये बिना ही जय जय कार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

जादूई आवाजाच्या सन्नी मलिक यांना त्यांच्या इंडियन आयडाॅल स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा, नक्कीच सन्नी मलिक या पर्वाचा विजेता होऊन भारतातीलच नव्हे तर जगभरातील तरूणांच्या साठी आयडाॅल ठरणार यात शंकाच नाही...

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे२६

Thursday, 26 September 2019

भावनिकतेने भारतीयांची बौद्धिकता संपत चालली आहे का?

भावनिकतेने भारतीयांची बौद्धिकता संपत चालली आहे का?

मुळात भारत हा भावनाप्रधान देश आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देशाला विचारधारा दिली. अभ्यासातून भावनेला दूर करण्याचे शस्त्र दिले पुरोगामी विचार रूजविले परंतु अलिकडच्या धर्मांध राजकारण्यांच्या कडून धर्म यावर आधारित गोष्टींचा अफूच्या गोळीप्रमाणे वापर केला जात आहे.
त्यात आज सोशल मीडियात भाजपाचे आय टी सेल पॉवरफुल आहे, इथे सतत राजकिय चर्चा किंवा धर्माचे उदात्त असे चित्रीकरण करून धर्माधर्मात तेढ वाढवण्याचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, या सोशल मीडियाचा वापर प्रत्येक राजकिय पक्ष पण आपल्या सोयीनुसार करत असतो, जर सगळ्यांना आठवत असेल तर २०१४ ची झालेली लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी या सोशल मीडियाचा खूप खुबीने वापर करण्यात आला होता, प्रत्येक माणसाची एक मानसिकता असते, जर एखादी गोष्ट तीच तीच पण वेगवेगळ्या पद्धतीने जर त्याच्यासमोर आणली गेली तर त्या गोष्टींची सत्यता पडताळून पाहण्यासाठी लागणारी सारासार विवेकबुद्धी माणूस गमावून बसतो व जी गोष्ट आपल्यासमोर आहे तीच खरी यावर माणसाचा ठाम विश्वास बसतो, महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू व काँग्रेस विषयीचे इतके विष पेरण्यात आले आणि हीच नेमकी गोष्ट हेरून सोशल मीडिया हा आज निवडणुकीचा महत्वपुर्ण हिस्सा झाला आहे. भावनिक ही जनता तेवढेच सत्य मानून जीवनावश्यक गोष्टीकडे दुर्लक्ष करून हेच अंतिम सत्य आहे हे मानून चालते अन ही खूप मोठी गंभीर चिंतनाची बाब आहे,
जाहिरातबाजीने आपल्या जीवनावर कसा परिणाम केला आहे याबद्दल एक उदाहरण सांगतो.
एक ७५ वर्षाच्या आजीबाई आपल्या नातवाला म्हणतात मला ते पतंजली शिकेकाई शाम्पू आणून दे जर दुसरे shampoo वापरले तर मला त्रास होतो, मग नातू म्हणाला पण आजी तू तर नेहमीच शिकेकाई वापरायचीस ना मग आता शाम्पू कशाला, त्यावर आजीबाईचे स्मार्ट उत्तर होते, अरे त्यामुळे केस छान मऊ होतात आणि शिकेकाईचे पण त्यात काही तत्व आहेतच ना या वरच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते की सोशल मीडिया मुळे आपल्या रोजच्या गोष्टीवर पण किती परिणाम झाला आहे, भारतीय घटनेचा तिसरा खांब पत्रकारिता आज पॅकेज घेऊन असत्याला सत्य दाखविण्याची जणू स्पर्धा सुरू आहे. मीडियावर होणाऱ्या कित्येक चर्चा ह्या उथळ व दिखाऊ असतात, काही अंशी सत्य जरी असले तरी त्यात व्यासंगाचा अभाव दिसतो, त्यात आजकालच्या तरुणांचे वाचन अतिशय मर्यादित झाले आहे, फक्त FB किंवा आणि जाहीरातबाजीवर त्यांचे ज्ञान सीमित असते त्यामुळे हे तरुण चुकीच्या बाजूने जाण्याचा खूप मोठा धोका निर्माण झाला आहे.
एक तर सीमित वाचन, अभ्यासाचा अभाव, तत्कालीन किंवा सद्य परिस्थितीचे खूप कमी आकलन असते, त्यामुळे उथळ राजकीय चर्चा व मोठमोठ्या भुलवून टाकणाऱ्या शब्दात लिहलेले लेख त्यांना खरे वाटते, त्यामुळे धर्मभावना, देशभक्ती, देशद्रोह, आरक्षण, जात या अफूच्या गोळीचा वापर सोशल मिडियाद्वारे भारतीय जनता पक्ष खुबीने वापर करून जनतेला भुलवण्याचे काम करते व भोळी जनता याच दिखाव्याला फसत जाते.
आज देशात मंदी, नोट बंदीतील भ्रष्टाचार, GST मुळे बंद पडलेले उदयोग व्यवसाय, महागाई, बेरोजगारी, स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण खूप मोठया प्रमाणात वाढले आहे पण हे भाजपाचे सरकार यावर तोडगा काढण्याऐवजी पाकिस्तान, पुलवामा, 370 कलम, अयोध्या मंदिर अशी भावनिक कारणे पुन्हा पुन्हा पुढे करून आपली पाठ आपणच थोपटून घेत आहे ही सत्य परिस्थिती आहे.
आजचे राजकारण कमालीचे बदलले आहे, सोशल मीडियाचा अनिर्बंध वापर हेच क्षेत्र जास्त करते, बदलत्या राजकारण समजून घेताना या माध्यमाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, या माध्यमाचा प्रत्यक्ष जनजीवनातील सहभाग, त्याचे स्थान व महत्त्व आपल्याला अधोरेखित आहेच, काळाने निर्माण केलेल्या आजच्या समाजाचा हे माध्यम आरसा आहे आणि हीच नेमकी गोष्ट भाजपाने हेरली व तिचा खुबीने वापर करण्यात ते कमालीचे यशस्वी झाले आहे, आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी प्रश्न विचारला की ते भारत माता की जय, वंदे मातरम चा जयघोष करतात, खरतर यांनी पण मोदी साहेबांच्या सारखी जनतेच्या भावनिकतेची नस ओळखली आहे. गेले पाच वर्षात महाराष्ट्र अधोगतीला गेलेला आहे पण यांच्या भल्या मोठ्या जाहिरातींच्या मधून विकासाचे दर्शन होत आहे. अनेक मोर्चे निघत आहेत, प्रत्येक माणूस अस्वस्थ आहे परंतु त्याला देशभक्तीची गोळी दररोज सुरू आहे. दुर्देवाची गोष्ट ही आहे की सोशल मिडीयाचा सकारात्मक वापर करण्याऐवजी फक्त एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठीच वापर करण्यात येतो, आपण नेहमीच बघतो निवडणुका जश्या जाहीर होतात तसे देशावर हल्ला होणार, ईडीची कारवाई होणार अशा बातम्यांचा टीव्ही वर चर्चाना उत येतो, काही चॅनल्सवर विद्यमान सरकारचा उदो, त्यांच्या कामाचा गौरव सतत चालु असतो यातून समाजाची सामाजिक, आर्थिक, राजकीय व धार्मिक गोष्टींची विशिष्ट मांडणी करून त्याच त्याच गोष्टींचा सतत भडिमार केला जातो त्यामुळे एका प्रश्नाला दोन बाजू असतात किंबहुना मेंदू बधिर झाल्यासारखे आपण त्या बाबतीत अधिकाधिक कट्टर होत जातो त्यामुळे आजच्या समाजाने विशेषतः तरुणांनी या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा, आणि नाण्याच्या दोन बाजू असतात यावर चिंतन करावे फक्त बोलबच्चन, भावनिकतेच्या व जाहिरातबाजीच्या विळख्यात न अडकता नेहमी सत्य काय आहे ते शोधून काढावे व जनतेला एक सक्षम व स्वच्छ असा राजकारणात पर्याय द्यावा हीच सदिच्छा...

मीडियाच्या जाहिरातबाजीने
जनता जनार्दन फसली
वाजता रणशिंग निवडणुकीचे
बघा आता पेटून उठली

संदीप राक्षे ✍🏻
(सरचिटणीस)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र...

Saturday, 21 September 2019

जाहिरात बाजीत अडकलेली जनता

जाहिरात बाजीत अडकलेली जनता
सत्यपरिस्थितीचा विचार करणार का?

आज सकाळीच चहाची तलफ झाली म्हणून जवळच असणा-या जायका चहा मधे चहा पिण्यास गेलो होतो. काउंटर जवळ गेलो तर त्या हाॅटेल मालकाला दोन तरूण केविलवाणी विनंती करीत असताना दिसले मी थोडा जवळ गेलो तर ते त्या हाॅटेल मालकाला विचारत होते दादा आम्ही एक दिवस तुमच्या या शाॅप मधे चिरोटे विकायला ठेवू का? फक्त एक दिवस ठेवून बघा जर लोकांना आवडले तर मग नंतर ठेवा त्या एक दिवसाचे चिरोट्यांचे पैसे देऊ नका पण ठेवून बघा, शाॅप मालकाला पण त्यांच्या केविलवाण्या चेह-याची किव आली आणि ते म्हणाले चालेल तुम्ही घेऊन या हे दृश्य पहाताना माझे मन पण हेलावून गेले होते. त्यांचे बोलणे झाल्यावर मी त्या दोन्ही तरूणांना बाजूला घेतले अन विचारले तुमचे शिक्षण काय? त्यांनी सांगितले मी अजय जाधव एम बी ए झालो आहे आणि हा ऋषीकेश चव्हाण इंजिनिअर आहे त्यांचे हे शिक्षण ऐकून मी शाॅकच झालो. वडिल रिटायर्ड झाले त्यामुळे घरची जबाबदारी आमच्यावर आली अन ना नोकरी मिळत ना व्यवसायाची संधी मिळत, म्हणून हा घरगुती व्यवसाय सुरू केला आहे.

नव्हतो नशिबावर विसंबून
गाडंभरून शिक्षण घेतलं...
तरी आहे कुटुंब माझं उपाशी
नोकरीच आमिष विष बनून भिनलं....

आई आणि बहिण घरीच चिरोटे तयार करतात आणि आम्ही दोघे मित्र ते अशा शाॅप मधे जाऊन विकतो त्यातून मिळणा-या पैशातून कुटूंब चालवतो. एकेकाळी उदयोग व्यवसायात अग्रेसर असणा-या शिक्षित तरूणाईवर ही वेळ यावी ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
आज सगळीकडेच अशी परिस्थिती दिसून येत आहे,
जीएसटी, नोटबंदी  मुळे लघुउद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत,  एखादा उद्योग सुरू करण्या साठी तर बँकेचे उंबरठे झिजवावे लागतात,  मुद्रालोन देण्यास कोणतीही बँक उत्सुक नाही मग रोजगार निर्मिती होणार कशी फक्त कॉपोरेट कंपन्यांना सवलती देऊन त्यांना मोठया प्रमाणात अर्थसहाय्य करून प्रश्न कसा सुटणार, त्यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत ह्या योजना यशस्वी पणे राबवल्यास हा प्रश्न बऱ्याच अंशी सुसाह्य होईल, मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया सारख्या योजना मोठया गाजतवाजत सुरू झाल्या पण त्याची फलनिष्पत्ती शून्य आहे, मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती ह्याचे उद्दिष्ट पण म्हणावे तसे होत नाही, कुठल्याही क्षेत्रात आज तरुणांना रोजगार उपलब्धी म्हणावी तशी नाही, एनएसडी च्या अहवालानुसार 40 लाख तरुणांना प्रशिक्षित करण्यात आले पण त्यापैकी फक्त 12% तरुणांना रोजगार मिळाला, अर्थात या सगळ्यांचा सबंध मंदावलेल्या अर्थकारणाशी आहे, भारत हा युवा वर्गाचा देश आहे पण त्यांना हवा तसा रोजगार उपलब्ध होत नाही जर जीडीपी हवा तसा वाढला नाही तर बेरोजगिरीची समस्या अतिशय चिंताजनक होवू शकते, जर नव्या संधी तरुणांना उपलब्ध करून द्यायच्या असतील तर त्या प्रमाणात प्रयत्न होणे गरजेचे आहे पण नुसते कागदी घोडे नाचवण्याचे काम चालू आहे, फक्त भावनिक आवाहन करून ही परिस्थिती बदलणार नाही त्यासाठी ठोस भूमिका व प्रयत्न होणे आवश्यक आहे, 48 लाख कुशल मनुष्यबळांपैकी जवळपास 75% तरुण वर्ग बेरोजगार आहे, याचा अर्थ असा की प्रत्यक्ष कृती पेक्षा नुसती आकडेवारी मांडण्यात येत आहे, मोठमोठ्या बॅनर वर मोठमोठ्या आकड्यांची बेरीज दाखवून जनतेची दिशाभूल करणे प्रस्थापित सरकारने बंद करावे हीच इच्छा व विकासाचे राजकारण न करता प्रत्यक्ष विकासाच्या दृष्टीने पावले उचलावीत ,
आज जीडीपी स्तर हा गेल्या तिमाहीत केवळ ५% आहे व नॉमिनल जीडीपी देखील गेल्या 15 वर्षात सर्वात कमी आहे त्यामुळे आर्थिक मंदीचे सावट सगळ्यात गंभीर आहे, या मंदीतून बाहेर येण्यासाठी सरकारने समजदारीने निर्णय घ्यावेत
जर तरुण हातांना काम मिळाले नाही तर हेच तरुण हात कधी दगड घेवून उठेल ते सांगता येत नाही, सरकारने त्या अनुषंगाने पावले उचलावीत
फक्त विकासाचे राजकारण न करता प्रत्यक्ष विकास कसा होईल ह्यावर भर द्यावा हीच सदिच्छा..
आताचे बीजेपी सरकार खोट्या जाहिरातीने लोकांना उल्लु बनवते आहे आणि सामान्य जण त्याला बळी पडत आहेत. हे कुठे तरी थांबले पाहिजे आज या सरकारने उदयोग व्यवसायाकडे अजिबात लक्ष दिले नाही. भावनिक मुद्दे पुढे करून लोकांना देशभक्तीत अडकवून बौद्धिक गुलाम बनविले आहे. लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी या महाराष्ट्रात मोठ मोठे उदयोग आणले आयटी पार्क आणले सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अनेक व्यवसाय निर्माण केले परंतु याच भाजपा सरकारने हे सारे मोडकळीस आणले आज अनेक कंपनी बंद पडत आहेत उदयोगपती आत्महत्या करीत आहेत. याचा विचार आपण करणार नाहीत का? तरूणांच्या भविष्याची चिंता करणारच नाहीत का? या भाजपा सरकारची जाहिरात खरी की खोटी याचा विचार आपण करणार नाहीत का? उच्च शिक्षित मुलांच्यावर चिरोटे विकण्याचे दिवस आले असल्या अच्छे दिनचा विचार करणारच नाहीत का?
खोटे बोलून जाहिरातीच्या माध्यमातून सत्तेवर आलेले हे निकृष्ट सरकार आपण बदलणार नाहीत का?
आर्थिक मंदीचा राक्षस हळुवार पावलांनी वाटचाल करत आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीचा युववर्गाने  गांभीर्याने विचार करावा....

विकासाच्या बिलोरी स्वप्नात
रोजगाराचे सोनेरी पान
मंदीच्या चक्रव्यूहात
अडकली माझी मान

अशी आजकालच्या तरुणांची स्थिती झाली आहे...

संदीप राक्षे ✍🏻
(प्रदेश सरचिटणीस)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र
८६५७४२१४२१

Friday, 5 July 2019

हरिश्चंद्र गड

इंद्रवज्राचा नैसर्गिक चमत्कार, चांगावटेश्वरांची चौदाशे वर्षांची तपश्चर्या असे अद्भुत महातिर्थ..
महाराष्ट्राचे केदारनाथ "हरिश्चंद्र गड"


निसर्गरम्य खेड तालुका, मोहिमांची ख्याती भारी! 
गड किल्ले, अन मंदिरांची असते सदा भ्रमंती!
घेऊन सवे साथी सवंगडी, चारी दिशा दौडती!
जपून ऋणानुबंध, वाढवतात निसर्गाप्रती प्रीती!
                       निसर्गरम्य खेड तालुका यांच्या माध्यमातून अनेक मोहिमा सतत पार पडत असतात, गेली अनेक वर्षे अनेक गड किल्ले यांनी सहज सर केले आहेत. प्रत्येक मोहीम यशस्वी करण्यासाठी मुख्य आयोजक किशोर राक्षे, योगेंद्र बुरूडे आयोजक योगेंद्र आंबवणे, अक्षय भोगाडे, सागर थोरात, मयुर गोपाळे, ऋषीकेश गोरे, ज्योती राक्षे हे आघाडीवर असतात. गुड माॅर्निग चित्रपटाच्या निमित्ताने कांचनजी लांघी यांनी मिटींग आयोजित केली होती ती मिटींग संपल्यावर त्यांनी सहज विषय काढला सर आपली भटकंती खुप असते आपल्याला मंदिर गड किल्ले पहायला खूप आवडते आमच्या निसर्गरम्य खेड तालुका यांच्या वतीने "हरिश्चंद्र गड मोहिम" आयोजित केली आहे आपण सहभागी व्हाल का?  मी लगेच होकार दिला. कारण हरिश्चंद्र गडाविषयी ऐकले होते पण पाहिला नव्हता.. योगायोगाने शनिवार होता आणि दुस-या दिवशी माझ्या सुट्टीचा वार रविवार होता. शनिवारी रात्री 9 वाजता भोसरीतून गाडी होती. एखादे नविन ठिकाण पहायचे म्हटले की उत्सुकता लागून राहते व ती वेळ कधी येते असे होते..
खरतर अशा मोहीमेला जाण्याची माझी पहिलीच वेळ होती. त्यामुळे तयारी अजिबात नव्हती, रात्री नऊ वाजता तळेगावहून लक्झरी बस भोसरी चौकात आली आणि पुढचा प्रवास सुरू झाला. भोसरी ते राजगुरू नगर पर्यंतचे सर्व सदस्य घेत घेत प्रवास सुरू होता. मध्यरात्रीला अकोले शहर सोडून जंगल रस्ता सुरू झाला होता. पाऊसाचा जोर होता त्यामुळे ड्रायव्हरला गाडी चालविण्यास अडढळा येत होता. दोन्ही बाजूने घनदाट झाडी, त्यात रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडलेले, क्लच दाबून दाबून ड्रायव्हरचे पाय बहुतेक दुखत असतील कारण पुढची चाकं हळूच उतरवित असे आणि मागची चाके जोरात आदळत असे. मध्यभागी बसणारे फूट फूट उडत होते. पण प्रवास छान सुरू होता. कोतुळ गावाच्या पुढे घाट सुरू झाला होता गाडी मोठी असल्याने टर्नला त्रास होत होता ट्रेकिंग गृपचे सदस्य उतरून गाडीला पाठीमागून दगडाची उटी लावीत होते, कारण गाडी कुठे ही फसू नये म्हणून, घाट संपून गाडी सरळ रस्त्यावर चालली होती. अचानक गाडी समोर एक नागाचे लहान पिल्लू आले ड्रायव्हर ने गाडी थांबवली त्या पिल्लाच्या मागे अजून दोन नाग होते गाडी थांबविल्यावर एका नागाने रस्ता क्राॅस केला व दोन नाग तसेच रस्त्याच्या कडेला थांबले , ड्रायव्हरने गाडी पुढे काढून घेतली.. ड्रायव्हर जागेवर थांबल्याने त्या तीन नागाच्या पिलांना जीवदान मिळाले होते. खरतर निसर्गाच्या ठिकाणी आपण फिरतो आणि प्राणी, पक्षी, किटक यांच्यावर अतिक्रमण करीत असतो खरच आपण त्यांना त्रास होऊ नये याचे भान सर्वांनीच ठेवायला हवे.     
                  सकाळी सहाला आम्ही हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याला पोहचलो होतो. अंधाराचे साम्राज्य संपून उजेडाने ताबा घेतला होता. पक्ष्यांची किलबिलाट जल्लोषात सुरू होती त्याच जल्लोषात पाऊस पण पडत होता. धुक्यांनी आजूबाजूची गावं घर डोंगर वेढलेली होती. जसं जसा दिवस उगवत होता तसे धुक्यांच पांघरून बाजूला होत होते. पाऊस पाहून तर मला थंडीच भरली होती हरिश्चंद्र गडा कडे पाहून तर अवसानच गळाले होते. कारण पावसा पासून बचावासाठी ना रेनकोट ना जर्किंग आणले होते. गाडीतील प्रत्येक जण तयारीत आले होते. प्रत्येक जण फ्रेश झाले, चहा नास्ता घेतला. मोहिमेच्या तयारीत सर्वजण सज्ज झाले वाट पहात होते ती किशोर सरांच्या परवानगीची, पण माझे मन गडावर चढण्यासाठी तयार होईना कारण रस्ता अवघड त्यात पाऊस भिजत भिजत जावे लागेल अन भिजत भिजत उतरावे लागेल, गाडीतून उतरून एका घरा जवळ जावून थांबलो, अनेक पर्यटक या मोहिमेसाठी आले होते..कोणी गाणी म्हणत तर कोणी एकमेकांच्या हाताला धरून चालत होते. मुंबईची एक टीम छत्रपतींचा पोवाडा गात पुढे चालत होती. तो पोवाडा अलिकडेच सोशल मिडीयावर खूप गाजला होता. लोकल मधे प्रवास करताना तो पोवाडा शूट झाला आणि प्रचंड व्हायरल झाला होता.. त्या पोवाड्याची चाल व शब्द मनावर पहिलेच गारूड करून होते तेच इथे पण ऐकले...

महाराष्ट्राचा भगवा झेंडा ऽऽऽऽऽऽ
रायगड किल्यावर....
हाती तलवार होती जयजयकार
हर हर महादेव हर महादेव

जिजामातेच्या पोटी जन्मली महाराष्ट्राची शान
हिंदवी स्वराज्यसाठी केला मोलाचा तो पण
आठवू आपण त्यांचा प्रताप करूया जयजयकार
हाती तलवार होती जयजयकार
हर हर महादेव हर महादेव

हे शब्द आणि चाल कानावर पडली अन अंगावर सरसर काटा उभा राहिला. आपोआप अंगात उर्जा संचारली, अन गड चढायला बळ मिळाले..
                  मोहीमेचे आयोजक किशोर राक्षे यांनी सर्वांना जवळ बोलवले व संपूर्ण गडाची माहिती दिली. स्वत:ची काळजी कशी घ्यायची या टीप्स दिल्या तसेच गडावर जाताना किंवा उतरताना कसलाच कचरा करायचा नाही. बिसलरची बाटली जरी सोबत घेतलीत तर ती सुद्धा कुठेही फेकून न देता परत आपल्या सोबत आणून गावातील कचरा कुंडीत टाकायची, गड चढताना सर्वांनी सोबतच चालायचे, गडबड गोंधळ करायचा नाही. या टीप्स सर्वांनी शांत पणे ऐकून घेतल्या. समुहाचा एक फोटो काढला जेणे करून या आठवणी कायम स्वरूपी स्मरणात राहतील...
                   आज धुकं आणि पाऊस जास्त होता. ओढे नाले तुडूंब भरले होते खळखळणारा आवाज निरव शांततेला भेदत होता. अशातच आम्ही सकाळी सात वाजता सर्वजण गडाकडे मार्गस्थ झालो. चालणा-या पायीवाटेवर चिखल चिखल साचला होता. त्यामुळे घसरडे झाले होते. चालतानाच पाय सटकत होते प्रत्येक जण एकमेकांना आधार देत होता. काही ठिकाणी सरळ उंच पाय-या होत्या पण बरेचसे दगड निसटल्याने त्यावरून चालणे पण कठीण झाले होते. वरूणराजा बरसत होता त्यामुळे चालताना कितीही दम लागला तरी अंगातून घाम काही केल्या निघत नव्हता त्यामुळे गड चढायला काहीच वाटत नव्हते. थोडे चढत, थोडे थांबत, थोडा आराम करीत आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेत शिववारी सुरू होती. अंगावरचे संपूर्ण कपडे आता भिजले होते. काही अंतर चढून गेलो पुढे कपारिच्या कडेने छोटासा रस्ता लागला होता तो पार करताना खूप काळजी घ्यावी लागत होती कारण एका बाजूला मोठे कातळाचे दगड आणि दुस-या बाजूला खोल दरी होती. कपारीत काही गुहा होत्या प्रत्येक जण त्या गुहेचा आरामासाठी वापर करीत होता. इतका कठीण रस्ता यापूर्वी केदारनाथलाच पाहिला होता. जस जसे अंतर कापीत होतो तसतसे उंचावर जात होतो.. खाली पाहिले तर निसर्गाचे विहंगम दृष्य दिसत होते. खाचर पाण्याने भरून वहात होती.. जिकडे पहावी तिकडे हिरवाईचा शालू नेसलेली धरतीमाता अतिशय सुंदर दिसत होती. काही क्षणाला तर असे वाटायचे की आपण महाराष्ट्रात नसून देवभुमी उत्तराखंडलाच आहोत. कपारीचा अवघड रस्ता पार करून पुढे आलो होतो. असंख्य धबधबे आजूबाजूला दिसत होते वा-याने काही पुन्हा उलट्या दिशेने वहाताना दिसत होते. ठिकठिकाणी कारवीची झाडं एक सारख्या उंचीत दिसत होती त्यामुळे जंगलाच्या आत मधे काहीच दिसत नव्हते, काही गोलाकार वनस्पती झुपकेदार डुलत होती जणू काही संपूर्ण डोंगराईवर चहाचे मळेच फुलले आहेत असे दिसत होते. मंदीर अजूनही खुप उंचावर होते. अजून बराच पल्ला चढायचा होता. आजूबाजूला निसर्गाचे देखणे रूप पाहून मन हर्ष उल्हासित होत होते. इतके उंचावर आलो पण तरी अजिबात थकवा जाणवला नाही की इतके भिजूनही साधी शिंकही आली नाही. हा सारा इथल्या आयुर्वेदिक वातावरणाचा परिणाम होता. आजूबाजूला जंगली आयुर्वेदिक झाडं फुलं वेली दिसत होत्या खरच इथे आयुर्वेदाचे भांडारच फुललेले दिसत होते. आता वारा सुरू झाला होता, ढगांनी तर इथे आपला ठियाच मांडला होता. वा-यामुळे काहीवेळ विसावा घेत असलेले पांढरे शुभ्र ढग सैरवैर झाले होते. जसे ढग दूर झाले तेव्हा हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराचा कळस दिसू लागला होता. वातावरणात प्रचंड आध्यात्मिक ऊर्जा भासत होती. जसजसे मंदिर परिसराच्या जवळ जात होतो तसतशी वारा आणि पावसाने एकत्रित हजेरी लावली होती. हिरवाईच्या नगरी मध्ये कातळाच्या दगडातील मंदिर चमकताना दिसत होती. जणू काही हिरे माणिक मोत्यांनी सजवलेली असावीत, पाऊसाच्या सरी त्या दगडावर पडून त्याचे रुपांतर थेंबात होत असे काही काळ त्या दगडावर स्थिरावत, काही वेळाने वातावरण बदलत सुर्याची किरणं त्या थेंबावर पडत असत त्यामुळे थेंब सप्तरंगात चमकताना दिसत होते. खरच अद्भुत नजारा दिसत होता. काही क्षण जागेवर स्तब्ध उभा राहून या देवाजीची करणी पहात होतो. उभ्या आयुष्यात असे दृश्य कधीच पाहिले नव्हते. जमीनीपासून ४८५० फुटांवर असलेले तारामतीचे शिखर त्या शिखरावरून वाहत येणारी मंगळगंगा नदी जणू काही मुळ गंगानदीच दिसत होती पण पुढे वाहत आल्यावर हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराच्या गर्भगृहाखालून भगवान महादेवांच्या चरणकमळांना स्पर्श करून गोमुखावाटे पुढे उगम पावत आहे. जे जे पहात होतो ते चमत्कारिक होते हे नक्कीच! आता हरिश्चंद्रेश्वराच्या मुख्यव्दाराजवळ आलो होतो.
उभा राहतो ना राहतो तोच एक अनोळखी व्यक्ती माझ्या समोरच येऊन उभा राहिला, त्याने माझ्या हाताला धरले आणि मला मंदिरात घेऊन गेला. त्याने मंदिरावरील एका शिल्पाकडे बोट करून दाखवले आणि म्हणाला ही मुर्ती सायकलवर बसलेली आहे म्हणजे त्या काळात सुद्धा सायकल होती हे मला त्या अनोळखी व्यक्तीला सांगायचे होते. मी निरखुन त्या शिल्पाकडे पहात राहिलो तर खरच सायकलवर बसलेल्या एका ऋषीचे शिल्प होते. निसर्ग शिल्पाने भारावलेली ही पवित्र भूमी संत चांगदेवांनाही भावली. त्यांनीही त्यांच्या चौदा वर्षाच्या तपश्चर्येसाठी हेच पुण्यस्थान (हरिश्चंद्रगड) का निवडले असेल याची प्रचिती मलाही आली. या पवित्र ठिकाणाची अजून माहिती जाणून घेण्याची प्रचंड इच्छा जागृत झाली. त्या अनोळखी व्यक्तीकडून अजून माहीती विचारण्याचा प्रयत्न करू लागलो..
              त्यांनी पण माहिती सांगायला सुरवात केली. हरिश्चंद्रेश्वराच्या या मंदिरात सहा, तर शेजारच्याच केदारेश्वराच्या लेण्यात दोन असे आठ लेख चांगदेवांच्या येथील वास्तव्याचे पुरावे देतात त्यांनी ते मला दाखवले, मंदिरात आत मधोमध अवकाशात उंच शिखर असलेले हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर दिसते. या मंदिराच्या भोवतीने दक्षिण आणि पश्चिम दिशांना काही कोरीव लेण्यांची दालने आणि पाण्याच्या टाक्या दिसतात, मुख्य मंदिरास पूर्व आणि पश्चिम असे दोन्ही बाजूस दरवाजे आहेत. गाभाऱ्यात मधोमध शिवलिंग आणि त्याच्या पुढय़ात नंदी विराजमान आहे. अशा या मंदिराच्या शिखर, भिंती, खांब आणि प्रवेशद्वार सर्वत्र मुक्तहस्ते शिल्पकाम केलेले आहे. देव-देवता, प्राणी, रत्न, निसर्ग या साऱ्यांची एक विलक्षण वीण या भरजरी कामात गुंफलेली आहे. हे वर्णन ऐकून मीच मनातल्या मनात या रचनेची तुलना उत्तराखंडातील केदारनाथांच्या मंदिराशी केली. हरिश्चंद्रेश्वराचे हे सौंदर्य पाहणाऱ्यांची मती काही क्षण गुंग करून टाकते.
मंदिराजवळच संत चांगदेवाने जिथे ‘तत्त्वसार’ हा ग्रंथ कार्यसिद्धीस नेला त्या ठिकाणी गेलो. याच ग्रंथात १०२८ ते ३३ दरम्यानच्या ओव्यांमध्ये या गडाचा उल्लेख आलेला आहे, तो पुढील प्रमाणे

हरिश्चंद्र नाम पर्वतु! तेथ महादेओ भवतु!!
सुरसिद्ध गणी विख्यातु! सेविजे जो!!१०२९
रिश्चंद्र देवता! मंगळगंगा सरिता!!
सर्वतीर्थ पुरविता! स्थान!! १०३०।।’
तत्त्वसारप्रमाणेच स्कंद, पद्म, अग्नी, मत्स्य पुराणांतही या हरिश्चंद्र गडाची,  पर्वताची माहिती येते. हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराशेजारीच ओढय़ालगत कातळात खोदलेले केदारेश्वराचे लेणे आहे. औरस-चौरस असलेल्या या लेण्यात कमरेएवढे पाणी असून त्याच्या मधोमध एका मोठय़ा ओटय़ावर शिवलिंग आहे. या शिवलिंगाभोवती चार सालंकृत खांबांची रचना केली आहे. यातील एक पूर्णपणे, तर दोन अर्ध्या पर्यंत पडलेले आहेत. मंदिराच्या पूर्वेला हेमाडपंथी सप्ततीर्थ आहे. त्या प्रशस्त तीर्थकुंडाच्या दक्षिणेला चौदा देवळ्यांमध्ये चौदा विष्णुमूर्ती विराजमान होत्या. देवालयाची व या बांधीव तीर्थकुंडाची मोठी पडझड झाली. तेथील काही विष्णुमूर्ती गायब झाल्या तर उर्वरित विष्णुमूर्ती मंदिरामागील गुहेत आहेत. तीर्थकुंडासमोर छोटेखानी मंदिर असून, ते काशीतीर्थ नावाने ओळखले जाते. तारामती शिखराच्या पायथ्याशी नऊ लेण्यांचा समूह आहे. त्या लेण्यांच्या दर्शनी बाजूच्या चौकटीवर गणेशमूर्ती कोरलेल्या आहेत. या लेणी अकराव्या शतकातील आहेत. समूहातील दुसरे लेणी आकाराने सर्वात मोठे आहे. तिसरी गुंफा अपूर्ण अवस्थेत आहे पण त्या गुंफेचे वैशिष्ट्ये म्हणजे तेथे सहा फुट उंचीची भव्य गणेशमूर्ती आहे. मूर्तीचे बारकाईने निरीक्षण केल्यास ती दिगंबर अवस्थेत असल्याचे दिसते. दिगंबरावस्थेतील गणेशमूर्ती अतिशय दुर्मीळ असते. तुम्ही बाहेरून मंदिराच्या कळसाचा खालील भाग पहाल तर चहुबाजूने कोंदण केलेले दिसेल त्या कोंदणात पुर्वी हिरे माणके बसवलेली होती. हे ऐकूनच मी मनात त्यावेळी मंदीर कसे दिसत असेल याचे चित्र मनात रंगवू लागलो. इतकी माहिती मिळाल्यावर पुन्हा पुन्हा मी त्याच त्याच ठिकाणी फिरू लागलो. प्रत्येक ठिकाण मी तीन तीन वेळा पाहिले कारण गृप मधील मी एकटाच तिथे होतो बाकीचे कोकणकडा व तारामती शिखराकडे गेले होते. खरतर माझे पाऊलच या ठिकाणावरून दुसरी कडे जाण्यासाठी निघत नव्हते. इतकी आकर्षण शक्ती आध्यात्मिक शक्ती या परिसरात होती. पण वाईट होते ते येथे येणा-या पर्यटकांचे या उर्जात्मक स्थळा बद्दल माहिती नसल्याने ते फक्त इथे फिरायला व निसर्गाचा आनंद घ्यायला आले होते. कुठल्याही मंदीरावर चढून ते फोटो काढीत होते एके काळी ज्या मंदिरात विष्णू मुर्ती होत्या त्या मधे बसून फोटो काढीत होते तर काही जण त्याच मंदीरावर चढून फोटो काढीत होते. मनाला खरच वेदना होत होत्या. पण काय करणार इतक्या वर्षाचा पुरातन ठेवा आपणच आपल्या हाताने नष्ट करीत आहोत. काही वर्षांपूर्वी इथे आलेल्या इंग्रज अधिका-याने इथला भव्य दिव्य असणारा मंदीराचा परिसर तोडून फोडून टाकला होता. पण त्याची मंदीराला हात लावण्याची ताकद झाली नाही. किती तरी शतका नंतरही हे मंदीर इथला सर्व अमूल्य असा ठेवा सुस्थितीत आहे. हाच आध्यात्मिक ठेवा आपल्या पण जपून ठेवायचा आहे. यासाठी खरच राज्य सरकारने या गोष्टी गांभिर्याने घेतल्या पाहिजेत.
                मी हरिश्चंद्रेश्वराच्या मंदीर परिसरातच खिळून राहिल्याने कोकण कडा बघणे झाले नाही. तिथे इंद्रव्रजा सारखा अद्भूत नैसर्गिक चमत्कार या आध्यात्मिक वातावरणा मुळे घडत असणार म्हणूनच मला हा हरिश्चंद्र गड केदारनाथ मंदीराची आठवण करून गेला. नवनाथांच्या पासून ते संत ज्ञानेश्वर महाराज, चांगावटेश्वरांच्या शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या प्रती केदारनाथला वंदन केले. दुपारचे तीन वाजले असल्याने परतीच्या प्रवासाला निघालो. सोबत कोणीच नसल्याने मनसोक्त निसर्गाचा आनंद घेत भरपूर ऑक्सीजन नसानसात साठवित हरिश्चंद्र गड उतरू लागलो. वाटेत जाताना काही ट्रेकिंग गृप सोबत होते. विशेष करून त्या गृपच्या मुली धरती आणि रोहीणी  गडावरील प्लॅस्टिक बाटल्या पासून ते सर्व कचरा गोळा करून आपल्या सोबत खाली घेऊन जात असताना दिसल्या खरच त्यांचे खूप कौतुक वाटले जिथे एकट्याला चालायला दमछाक होते तर या मुली इतके मोठे ओझे घेऊन चालत आहेत. खरतर पर्यटनाला कुठेही जाताना कोणत्त्याही पवित्र ठिकाणी निसर्ग रम्य ठिकाणी कुठलाच प्लॅस्टिक कचरा किंवा अन्य कचरा करू नका हाच संदेश या मुली देत असाव्यात.
मनाला दिव्यत्वाचा स्पर्श झाला की, सगळीकडे ईश्वराचा साक्षात्कार होतो, असा दिव्यत्वाचा स्पर्श इथल्या निसर्गातूनही झाला होता. निसर्गाची आणि आध्यात्माची विविध रूपं  आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जात असतात.
कवी मंगेश पाडगावकर आपल्या काव्यात म्हणतात,
मोर केशराचे झुलती पहाटेस दारी,
झऱ्यातुनी दिडता दिडता वाजती सतारी
त्यापुढे ते म्हणतात एक एक नक्षत्रांचा दिवा लागताना
आणि फुले होण्यासाठी कळ्या जगताना, असाचं निसर्गाचा आविष्कार पाहताना सर्व जण आनंदाने भरून या पुण्यभुमीचा निरोप घेऊन जात असे पण हे सारं सारखं अनुभवायला मिळावं म्हणून पुन्हा असचं म्हणावं लागेल..
या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती,
अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे…
या जन्मावर या जगण्यावर शतदा: प्रेम करावे.. आपल्या स्वता: बरोबरच या निसर्गावर आपल्या ऐतिहासिक शिल्पांच्यावर गड किल्यावर प्रेम करावं म्हणजे त्या लोप पावणार नाहीत..

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
 ८६५७४२१४२१

Saturday, 24 March 2018

चौथा स्तंभ भ्रष्टतेचा!

चौथा स्तंभ भ्रष्टतेचा!

लोकशाहीचा चौथा स्तंभ
कानाडोळा करतो आहे
भ्रष्ट आणि भ्रष्टाचाराला
पाठीशी घालतो आहे!

महागाईचा भस्मासुर
इथे मानगुटीवर आहे
पॅकेज घेऊन गप्प जणू
बक ध्यानात उभा आहे!

अन्यायाला वाचा फोडणारे
पडदया आड गेले आहे
भ्रष्ट पुढाऱ्यांच्या पुढे
मूग गिळून गप्प आहे!

जाहिरातबाज झाली वृत्तपत्रे
लेखणीला ना धार आहे
अर्थकारणाच्या ढीगाऱ्यात
सत्याचा वाली दबला आहे!

संदीप राक्षे✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Wednesday, 21 March 2018

पारदर्शक सट्टा!

*पारदर्शक सट्टा !*

*सत्ता* पण वैतागली असेल
भाजपाचा गिरविताना कित्ता
पारदर्शकतेच्या नावाखाली
रोजच विकतात हे *सत्ता*

*पारदर्शकता* नावातच विरली
यांना नाही कसलीच चिंता
घोटाळ्यावर घोटाळे करीत
म्हणत आहेत फक्त *पारदर्शकता*

*शेतकरी* रोजच मरतो आहे
होत आहेत सतत कर्जबाजारी
यांनी यांचाच बाजार चालविला
कोणी म्हणे हा साला *शेतकरी*

*आश्वासनांची* खिरापत भारी
रोज असते तयांची पोपटपंची
सर्व क्षेत्रात हाहाकार माजला
यांची एकच वाणी *आश्वसनांची*

*क्लीनचीट* असते यांची तत्पर
ना तपास ना खुलासा ना भेट
एका दिवसात होते गळाभेट
लगेच बातमी पसरते *क्लीनचीट*

*चित्र* असावे बाटलीवर बाईचे
म्हणणारा असेल किती विचित्र
शुद्ध हरपलेले राजकारणी सारे
महाराष्ट्रात हेच विदारक *चित्र*

*बांधिलकी* समाजाशी तीच संपली
फेकूंचा उदय झाला दृष्य आहेत बोलकी
जागा हो मराठी माणसा हात सावरून
प्रत्येकात जागवायची सामाजिक *बांधिलकी*

*संदीप राक्षे ✍🏻*
*भोसरी पुणे २६*
*८६५७४२१४२१*

सत्य संकल्पाचा दाता! आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा!

सत्य संकल्पाचा दाता! आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा.. संदीप राक्षे✍🏻 संत तोचि जाणा!  जो देही उदार!! म्हणजे खरा संत तोच ...