Sunday, 27 December 2020

कातळाचे नंदनवन पितळखोरे लेणी


कातळांचे नंदनवन, बौद्धलेणी पितळखोरे...
संदीप राक्षे ✍🏻

महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठे जंगल असलेले आणि कन्नड तालुक्यात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले गौताळा अभयारण्य, इथे निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेली भूमी म्हणजे गौताळा अभयारण्य. गौताळा अभयारण्यात फेरफटका मारताना रस्त्याच्या बाजूने आपल्याला अंगत-पंगत घातलेल्या सह्याद्रीच्या उतुंग व अथांग पर्वतरांगा दिसतात. ढगांशी स्पर्धा करणारे उंच उंच वृक्ष दिसतात, पावसाळ्यात निखळ खळखळून वाहणारे पाण्याचे झरे, ओसंडून वाहणारे धबधबे आणि डोंगराने हिरवीगार दुलई पांघरावी असे नयनरम्य हिरवेगार जंगल नजरेस पडते. प्रत्येकाला या निसर्गाचे सौंदर्य भुरळ घालणारच यात शंकाच नाही. निसर्गा सोबत औरंगाबादचा इतिहासही तेवढाच विरश्रीने नटलेला, अद्भुत कलाकृतीने सुप्रसिद्ध असलेला.
        मागच्या वेळी मी या रांगेतील अंतुर हा किल्ला पाहिला होता वेळे अभावी मला पितळखोरे लेणी पहाता आली नाही. कामानिमित्त औरंगाबादला जायचे होते आज कोणतेही नवीन ऐतिहासिक ठिकाण पहायचेच हा मनाने बांधलेला चंग स्वस्थ बसून देत नव्हता. मला आमचे कवी मित्र ज्ञानेश्वर गायके यांनी पितळखोरा लेणीची आठवण करून दिली, मी व माझे मित्र सिनेमॅटोग्राफर मारूती तायनाथ पितळखोरा लेणी पहायला निघालो. लेणी म्हणजे डोंगर, टेकडी, पर्वत, खडक कोरून तयार केलेल्या गुहा होत. ज्यांच्या उपयोग संन्यासी भिक्खूंना तपस्या, साधना, विश्रांती करण्यासाठी केला जाई, निसर्गाच्या सान्निध्यात, घनदाट जंगलात द-या खो-यात अनेक लेणी आपल्याला पहायला मिळतात.
      कन्नड या तालुक्याच्या गावावरून पितळखोरा ही लेणी अठरा किलोमीटरवर आहे. कन्नडचा अवघड घाट चढून आम्ही कन्नड मधे पोहचलो चहा नास्ता केला. कालिका मातेचे दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आल्याची हिरवीगार शेती, पाण्याची शेततळी मनाला प्रसन्न करीत होती. पितळखो-या लेणीच्या प्रवेशद्वारा जवळ पोहचलो तेथून गौताळा अभयारण्य सुरू झाले तीन चार किलोमीटरचा प्रवास करून लेणीच्या कडेला आलो. गाडी पार्किंगला लावली, आमच्या दोघांच्या शिवाय तिथे रानाची पाखर व त्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. तेथून आम्हाला खोल दरीत उतरायचे होते. महाराष्ट्र शासनाने तिथपर्यंत जाण्यासाठी छान पाय-यांची सुविधा केलेली होती. एक एक पायरी आम्हाला दरीच्या खोल गर्भात घेऊन जात होती. मोकळा वारा आता काहीसा शांत झाला होता. शे दोनशे पाय-या उतरून आम्ही लेणी जवळ आलो होतो. सहज आकाशाकडे नजर गेली अन हबकलोच दोन्ही बाजूला घनदाट जंगल  उंच कातळकडे जणू काही आम्ही एखाद्या भेगेत अडकलो आहोत असे वाटत होते. पण लेणीचा परिसर पाहिला आणि भिती कुठच्या कुठ पळून गेली, कातळांचे हे नंदनवन याची देही याची डोळा अनुभवत होतो. वातावरण शांत नीरव मनाला अद्भुतेचा स्पर्श जाणवत होता. जगापासून किती तरी दूर मन शून्यावर येऊन पोहचले होते. आपला प्राचीन इतिहास बघितला तर लाखो वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून फेकल्या गेलेल्या लाव्हाचे एकावर एक थर पसरत गेले आणि त्यातून निर्मिती झाली दख्खनच्या पठाराची आणि सह्यद्रीची याच सह्याद्रीच्या उदरात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळणाऱ्या १५ ते ६० मीटर उंचीच्या कातळामुळे लेणीनिर्मितीला उत्तम पार्श्वभूमी लाभली. त्याचबरोबर सातवाहन, क्षत्रप, वाकाटक, राष्ट्रकूट अशा विविध राजवटींच्या काळात राजघराण्यातील व्यक्तींनी तसेच व्यापारी, भिक्षू, सामान्य नागरिकांनी दानं दिल्यामुळे महाराष्ट्रात बौद्ध, हिंदु व जैन धर्मीयांच्या लेणींची निर्मिती झाल्याचे पुराव्यांवरून दिसून येते. अशीच दुर्मिळ बौद्ध कालीन लेणी म्हणजे पितळखोरा लेणी, ही लेणी सहाव्या शतकातील म्हणजे अजिंठा वेरूळच्या अगोदरची असे असल्याचे मानले जाते. राजा सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजे पैठण ते नालासोपारा हा अतिप्राचीन रहदारीचा प्रमुख मार्ग पितळखोर्‍याहुन जातो. त्यामुळेच ह्या जागेची निवड बौध्दांनी लेणी कोरण्यासाठी केली होती. महामायुरी ह्या बौध्दधर्मीय ग्रंथामध्ये "शकरीन" हा यक्ष पितलिंगया येथे राहतो. असा उल्लेख आला आहे. वरील ग्रंथाचे संदर्भातुनच पितलिंगया म्हणजे आताचे पितळखोरे आहे. इ.स.पूर्व सहाव्या शतकात भारतात बौद्ध धम्माचा उदय झाला. बौद्ध धम्माच्या प्रचार व विकासासाठी बौद्ध भिक्खूंना गावापासून दूर पावसाळ्यात राहण्यासाठी डोंगरात लेणी खोदण्यास सम्राट अशोकाने सुरुवात केली. अशा लेणींचा उल्लेख बौद्ध ग्रंथात ‘वर्षावास’ या नावाने केला आहे. या लेण्यांना पुढे विहार ही संज्ञा प्राप्त झाली. कालांतराने विहाराबरोबर प्रार्थनागृहे खोदण्यात आली. पितळखोरे ही लेणी खोल अरुंद दरीच्या दोन्ही काठावर दगडात कोरलेली आहे. लेण्यांचे पाण्याच्या प्रवाहामुळे दोन भाग झाले आहेत. या लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे लेण्यातील काही गुहा दुमजली आहेत. वरच्या मजल्यावर जाण्यास भुयारातून पायऱ्या खोदलेल्या आहेत. मुख्य गुंफा म्हणजे एक मोठा चैत्य आहे. मधल्या भागात ३५ स्तंभ असून या स्तंभांवर धवल, कृष्ण, रक्त आणि तपकिरी वा पिंगट रंगात रंगवलेली बौद्ध संन्यास्यांची चित्रे अस्पष्ट दिसतात. ब-याच लेणीच्या प्रवेश द्वाराला अकरा पायर्‍या आहेत. मुख्य लेणीच्या खालीच हत्तींची शिल्प रांग आहे. शेजारीच ५ फुटाचे प्रवेशद्वार आहे. दरवाज्याचा वरती अर्धकमळ व त्रिरत्नांच्या नक्षी आहे. या दरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन द्वारपाल कोरलेले आहेत. भव्य शिल्पाकडे जाताना इतका छोटा भुयारी मार्ग पाहून आश्चर्यचकित झालो. त्याच दरवाजाच्या वर गजलक्ष्मीचे शिल्प होते. परंतु ते खाली पडले आहे. ब-याच शिल्पांची नासधूस झालेली आहे. उन वारा पाणी आणि उनाड माणसांच्या आक्रमणाने ही ऐतिहासिक वास्तू डौलात उभी आहे. खरतर आपली सर्वांची जबाबदारी आहे असा मौल्यवान ठेवा जीवापाड जतन करायचा आहे. संपूर्ण पितळखो-याचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.  

कातळाच्या नंदववनाचे 
रक्षण आपणच करणार 
मौल्यवान या वास्तूंचे 
महत्व जगाला सांगणार..

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६

Thursday, 22 October 2020

मांडवगड


राजा भोज यांनी उभारलेली,


रानी रूपमती व बाज बहाद्दूर यांच्या अमरप्रेमाने सुप्रसिद्ध असलेली विंध्यांचल पर्वताच्या कुशीतील स्वप्नवत नगरी मांडवगड(मांण्डू)

भटकंतीने मन आणि शरीर सुदृढ होते, हा माझा कायमचा अनुभव म्हणून मी भटकायची एकही संधी सोडत नाही.

       विनोदभाऊंनी नविन गाडी घेतली म्हणून आम्ही तोरमाळला दर्शनासाठी गेलो होतो. गुरू गोरक्षनाथांचे दर्शन घेतले, योगी संजुनाथ महाराज यांना भेटलो बोलण्याच्या ओघात संजुनाथ महाराजांनी मांडवगडचा विषय काढला "बहोत किल्ले है एक जगह, मैने तो मेरे जीवन मे पहिली बार इतने किल्ले देखे है, इतना ऐतिहासिक स्थल जो बार बार देखनो को मन करता है" हे योगीजी बोलले आणि माझी उत्सुकता लागली मांडवगड विषयी ऐकण्याची मी राहून राहून त्यांना मांडवगडची माहिती विचारू लागलो, आणि तिथेच निश्चय केला मांडवगडला जाण्याचा...

दि. १३/२/२०१९  हा दिवस निश्चित झाला पण सोबत कोण हा प्रश्न डोक्यात होता. तेवढ्यात युवा दिग्दर्शक करण तांदळे यांचे नाव समोर आले मी त्यांना फोन लावला. त्यांना म्हणालो ? एक नविन ठिकाण तुमच्यासाठी लोकेशन व माझ्या साठी  भटकंती असे मध्यप्रदेश मधील मांडवगड येथे जायचे आहे. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता लगेच होकार दिला ते म्हणाले मी तयार आहे तुम्ही या. मी पण तयार होतो लगेच निघालो. आम्ही १२ तारखेलाच दुपार नंतर निघालो होतो. वाटेतच शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेतले आमचे मित्र बाळासाहेब महाडिक यांना भेटलो आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. करणदादांनी दिग्दर्शन केलेला परफ्युम हा चित्रपट १ मार्च ला रिलीज होणार होता. मग गाडीत आमचा तोच विषय रंगला होता. आलेले कडू वाईट अनुभव करणदादा सांगत होते. असा आमचा प्रवास सुरू होता. येवला सोडून भरपूर पुढे आलो होतो. गाडीच्या काचेवर पाण्याचे थेंब पडत होते, थोडा वेळ वाटले हे पाणी पुढच्या  गाडीतून सांडत असेल, कारण फेब्रुवारी महिन्यात पाऊस कसा येईल हा विचार करतो ना करतो तोच  जोरदार सोसाट्याचा वारा वाहू लागला अन पाऊस सुरू झाला. भले मोठे पावसाचे थेंब भर पावसळ्यातही दिसले नाहीत इतके मोठे थेंब  काचेवर आदळत होते. पुढचे काहीच दिसत नव्हते. मनमाड पर्यंत हा पाऊस पडत होता. मनात भितीचे काहूर माजले होते. वीस तीस च्या स्पीडने मी फोरव्हिलर चालवित होतो. रस्त्यावर तर तुडूंब पाणी साठलेले. मनमाडला आलो आणि पावसाचा जोर कमी झाला. मनमाड सोडले तर पुढे पाऊसच नाही. निरभ्र आभाळ चांदण्या स्पष्ट दिसत होत्या. काही अंतर मागे पावसाचे रौद्र रूप अनुभवले अन इथे काहीच नाही. निसर्गच तो त्याचा काहीच नेम नाही.

रात्रीचे साडे दहा वाजले होते भूक पण छान लागली होती.  मालेगावच्या पुढे पाच किलोमीटर वर साईकार ढाबा लागतो तिथे आम्ही थांबलो. छान चविष्ट अशा पाटोड्याची भाजी अन बाजरीची भाकरी सोबत मटक्यातले दही मनसोक्त खाल्ले. सुंदर पोट पूजा झाली. उशीर झाल्याने धुळ्यातच मुक्काम केला.

सकाळी नऊ वाजता उठलो, दरवेळी प्रमाणे धुळ्यात विनोदभाऊ चौधरी यांच्या कडे नास्त्याचे निमंत्रण होतेच कारण त्यांची भेट घेतल्या शिवाय पुढे जाणंच अशक्य असते. विनोदभाऊ कायम सेवेसाठी तत्पर असतात त्यांच्या सारखा दिलदार आणि प्रेमळ मित्र मिळाला हे माझे भाग्यचं समजतो. चहापाणी झाले नास्ता झाला. त्यांचे थोरले चिरंजीव निखिल याने विचारले काका कुठे निघालात फिरायला मी सांगितले मध्यप्रदेश, मी त्याला विचारले यायचे का? त्याने पटकन होकार दिला. मी विनोदभाऊंची परवानगी घेतली अन निखीलला पण सोबत घेतला. आता आमच्या तिघांचा प्रवास मध्यप्रदेशच्या दिशेने सुरू झाला. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर बीजासनी मातेचे मंदीर लागते तिथे आम्ही तिघांनी पण मनोभावे दर्शन घेतले पुढील सुखकर प्रवासाठी आर्शीवाद घेतला..

गुगल मॅपवर करण दादांनी मांडवगडचे लोकेशन टाकले होते त्याप्रमाणे आमचा प्रवास सुरू होता. सरळ हायवे सोडून आता गुगल बाबाने  डावीकडे वळण्याचा संदेश दिला त्याप्रमाणे गाडी डाव्या बाजूने ओळवली, एकेरी रस्ता सुरू झाला. थोडे अंतरावर गेलो तर डांबरी संपून बांधाचा कच्चा रोड सुरू झाला. मनात पुन्हा पुन्हा शंका यायची पण गुगल बाबा वरचा आमचा विश्वास अतिदांडगा एक सात आठ किलोमीटर गेलो बांधाचा रोड संपून बैलगाडीचा रस्ता सुरू झाला. आता मात्र बी पी हाय झाला, गुगलबाबाने वेगळाच अस्तित्वात नसलेला रस्ता पकडला होता पण आता पर्याय नव्हता. थोडे दूर गेल्यावर एक छोटे खेडे गाव लागले तिथे काही लोकांना आम्ही मांडवगड कैसे जाने का हे विचारले? ते आमच्या तोंडाकडे पाहून हसत होते. ते म्हणाले अरे भैय्या तुम्हे ये रस्ता किसने दिखाया आम्ही काहीच न बोलता एकमेकांकडे बघून हसत होतो. काय सांगणार आम्ही या गुगल मॅप मुळे फसलो, काहीच बोललो नाही. त्यातल्या एकाने सांगितले आप गलत रस्ते से लेफ्ट मारे है. अब आप आठ किलोमीटर सीधे जाओ आपको चौराया लगेगा सीधे जायो फीर आपको मांडवगड जाने के लिये सही रस्ता मिलेगा, समोरचा रस्ता पाहून गाडीच्या अगोदर मीच गळून गेलो. अजून आठ किलोमीटर बापरे !

कच्चा रस्ता संपून डांबरी रस्ता लागला  होता, समोरच विदयंचल पर्वतांची रांग दिसत होती. त्या पर्वतामध्ये मांडवगड कोणता याचा शोध घेत होतो, निरीक्षण करीत होतो पण काहीच सुगावा लागला नाही. ओसाड पडलेले पर्वत वणव्यांच्या मुळे काळे ठिक्कूर दिसत होते. घाटाचा रस्ता सुरू झाला होता. घाट चढून भरपूर उंचावर आलो होतो. आमचे स्वागत एका भल्या मोठ्या भव्य दिव्य अशा महाव्दाराने केले. पण हा दरवाजा मांडवगडच्या विरूद्ध दिशेला होता. खुप प्रश्न पडले हा महा दरवाजा पाहताना ब-याच अंशी सुस्थितीत होता. तेथून मांडवगड तीन ते चार किलोमीटरवर होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने छोटे छोटे घुमट आकार महल दिसत होते. आम्ही एव्हाना मांडव शहरातील बाजारपेठेत पोहचलो होतो. जातानाच उजवीकडे जामी मस्जिद आणि डावीकडे अशर्फी महाल या दोन भव्य वास्तूंनी आमचे लक्ष वेधून घेतले. पण या वास्तू नुसत्या पाहून उपयोग नाही या वास्तुंची पुरेपूर माहीती गाईडच देवू शकतो म्हणून आम्ही सोबत बिशन नावाचा गाईड घेतला तो पुढे मांडवगड ची माहीती कथन करू लागला मी निखिलला ही सर्व माहिती रेकाॅर्डिग करायला सांगितली.

मांडवगड (मांण्डू) येथे तेराव्या शतकापर्यंत असलेली परमारांची सत्ता सुल्तानांनी हस्तगत केली. दोनशे वर्षानंतर मुघलांनी बळकावलेली सत्ता इ.स.१६९७ मध्ये मराठ्यांनी मिळविली व सतराव्या शतकापासून इ.स. १९४८ पर्यंत पवारांच्या अधिपत्याखाली असलेला भाग भारतात समाविष्ट करण्यात आला. यातील राजा भोजचा इ. स. १०१० ते १०५५ पर्यंतचा काळ मांडवडगच्या वैभवाचा सर्वोच्च काळ होता. त्यावेळी धार-मांडव भारताचे सांस्कृतिक केंद्र होते. आता आपण जे पहाणार आहोत ती जामी मशिद व अशर्फी महल...

भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असलेल्या या वास्तूंच्या प्रवेशासाठी आम्ही तिकीट घेऊन आत प्रवेश केला. प्रवेश करता क्षणीच जामी मस्जिदची वास्तू बाह्यदर्शनी दिसते, एका घुमटाकार दालनातून पुढे जाताच अनेक सुबक कमानी, उंच खांब आणि त्यावर अनेक लहान-मोठे घुमट अशी ‘पश्तुन’ वास्तुकला म्हणजेच अफगाणी वास्तुकलेचे प्रतिनिधित्व करणारी अप्रतिम वास्तू पाहून आम्ही आश्चर्य चकित झालो. या वास्तुकलेचे खास वैशिष्टय म्हणजे अतिशय साधी परंतु आखीव-रेखीव अशी मांडणी. नजरेच्या एका टप्प्यात आणि कॅमे-याच्या लेन्सच्या एका फ्रेममध्ये सहज मावणार नाही एवढा रुंद विस्तार. बिशन सांगू लागला ही वास्तू साधारण इ. स. १४०५ मध्ये होशांग शहा राजाने ही मस्जिद बांधून घेतली. दमास्कस येथील भव्य मशिदीच्या रचनेवर आधारित या मशिदीची रचना आहे. राजेशाही थाटात उभ्या असलेल्या या जामी मस्जिदीच्या पश्चिमेकडील भिंतीवर १७ लहान कमानी आहेत. इस्लामिक पद्धतीच्या इतर कमानींपेक्षा या कमानी वेगळ्या दिसतात. कातीव दगडाच्या या कमानींवरील नक्षी हिंदू पद्धतीची आहे. भरपूर उजेड येईल अशी या मशिदीची रचना केलेली आहे. आम्ही तिथे पोहोचलो ती दुपारची वेळ असल्यामुळे सूर्यप्रकाशात उंच कमानींच्या सावल्या सुंदर परिणाम साधत होत्या. बिशन पुढे सांगत होता मी व निखील त्याला विविध प्रश्न विचारीत होतो. या जामी मशिदीच्या मागील बाजूस होशांग शहाची कबर असलेली मोठी घुमटाकार वास्तू आहे. होशांग शहाने त्याच्या कारकिर्दीतच स्वत:ची कबर बांधून घेतली अशी चमत्कारिक माहिती गाईड ने दिली. अशा नवलाईची ही कबर भारतातील पहिली संगमरवरी वास्तू म्हणून ओळखली जाते. असे म्हटले जाते की, ताजमहाल बांधण्यापूर्वी सहा महिने आधी तिथल्या वास्तुरचानाकारांनी या वास्तूच्या रचनेचा अभ्यास केला होता. मोबाईल मधे त्या भव्य अशा वास्तूचे फोटो निघत नव्हते आम्ही पॅनोरमा वापरून फोटो काढले. जामी मशिद पाहिल्या नंतर आम्ही अशर्फी महलाकडे निघालो. या महालाच्या रचनेवरून आणि आजही तिथे असणा-या नीरव शांततेवरून इथे पूर्वी मदरसा (college) होता, हे लक्षात येते. साधारण १०० चौ. फूट क्षेत्रफळाची अनेक छोटी दालने एका रांगेत पाहायला मिळतात. त्या दालनांसमोरचा लांबलचक व्हरांडा अनेक कमानींनी साकारला आहे. प्रत्येक छोटय़ा दालनात अभ्यास करता येईल अशी प्रकाशयोजना केलेली दिसते. भोज राजाच्या काळात या अशर्फी महालाचा उपयोग महाराण्यांच्या साठी केला जायचा. एखादी राणी तब्येतीने जाड झाली की याच अशर्फी महालाच्या पाय-यावर मोहरा मोहरा टाकायच्या आणी त्या मोहरा राणीने वेचायच्या. दिवसभर असे कष्टाचे काम करून राण्यांचा व्यायाम व्हायचा त्यामुळे राण्या आपोआप बारिक व्हायच्या हा गाईडने सांगितलेला किस्सा ऐकून मी करणदादा व निखील जोरजोरात पोट धरून हसतं होतो.

सुर्यदेव आपली दिवसाची हजेरी लावून मावळतीकडे निघाले होते, आम्हाला अजून खुप काही पहायचे होते पण लवकरच सुर्यास्त होणार होता, सात वाजल्याने ऐतिहासिक वास्तुंचे दरवाजे बंद झाले त्यामुळे आम्ही राहण्यासाठी हाॅटेल शोधू लागलो. जवळच एक रिसोर्ट होते पण तिथे राहण्याची सोय होती जेवणाची सुविधा नव्हती. तिथेच थांबण्याचा आम्ही निर्णय घेतला. दिवसभराच्या प्रवासाने, पायी चालण्याने पोटात कावळे काव काव करू लागले. तोपर्यंत निखिल जेवणासाठी छान हाॅटेल शोधून आला. आम्ही फ्रेश झालो व जेवणांसाठी हाॅटेल मधे आलो. मस्त दालबाटीची आॅर्डर मी दिली. थोड्या वेळातच भल्या मोठ्या कटो-यात बाटी आली वरणा सोबत ओल्या वाटण्याची भाजी आणी जिलेबी पण दिली.  मस्त गावरान तुपात भिजवलेली बाटी वरणात कुस्करली आणि मनसोक्त दालबाटी तिघांनी पण खाल्ली.

आजची सकाळ थोडी वेगळी होती भटकंती दरम्यान पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग यायची पण आज जाग आली ती गाढवांच्या ओरडण्याने. अशी दुर्मिळ सकाळ पहिल्यांदा अनुभवली होती. बाहेर येवून पहातो तर शेजारीच पुरातत्व खात्याच्या एका मंदिरात दगडी काम सुरू होते. आणि दगडी वाहण्याचे काम ही गाढव करीत होती. जरा सकाळचा फेरफटका मारला व करणदादा आणि निखिलला उठवले. आम्ही तिघांनी पण आवरले, ओढ लागली होती ती जहाज महल पहाण्याची, जहाल महल पहाण्यासाठी तेथील नगरपालिकेने तिकीट ठेवले आहे. ते आम्ही घेतले पुन्हा दुसरा गाईड सोबत घेतला आणि जहाज महाल परिसरात प्रवेश केला..

‘जहाजमहाल (रोमॅटिंक ब्युटी) म्हणून जग प्रसिद्ध आहे. १२० फूट लांब आणि दोन मजले उंच आहे. या महालाच्या दोन्ही बाजूंना कापूर आणि मुंज तलाव पाण्याने भरलेला दिसला, पण याच तलावातील पाणी नळ्यांव्दारे संपूर्ण महालांच्या भिंतीतून फिरवले आहे जेणे करून उन्हाळ्यात हा महल थंड राहावा म्हणून, खरच एखाद्या समुद्राच्या पाण्यात एखादे जहाज तरंगताना दिसते तसा हा जहाज महल दिसत होता. जहाज महालाच्या परिसरात सुंदर अशी बाग बहरली होती. जहाज महालात येणारे पाणी शुद्ध होऊन यावे म्हणून पाणी आणणा-या पन्हाळींच्या मार्गात चक्राकार रचना केलेली पाहीली.  जहाज महालाची बारचना मनाला भुरळ घालणारी दिसत होती. एखादे सुंदर स्वप्न पहात आहोत असा हा महाल दिसत होता. लहान मोठय़ा कमानी, घुमट, जिने आणि पुष्करिणी अशा वास्तुशिल्पाला चार चांद लावणा-या रचनांमुळे जहाज महालाचे अस्तित्व खुलून दिसत होते. जहाज महाल पाहण्याचा खरा आनंद पावसाळ्यात किंवा चांदण्या रात्री घेता येतो असे आमच्या गाइडने सांगितले. पावसाळ्यात महालाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या पाण्यात महालाचे प्रतिबिंब पडलेले दृश्य विहंगम असते. आम्ही जहाज महलाच्या आत मध्ये शिरलो तिथे पहिला हिंदोळा महाल लागतो तो पण पाहण्या सारखा आहे. उंच घुमट आणि कमानी मिळून बनलेला या महालाचा पूर्वी प्रेक्षागृह म्हणून उपयोग होत असे. विशिष्ट संरचनेमुळे पुन्हा परावर्तित होणा-या ध्वनी लहरींद्वारे एका टोकाचा अतिशय सूक्ष्म आवाज प्रेक्षागृहाच्या दुस-या टोकापर्यंत ऐकू येईल अशी रचना केलेली आहे. त्यामुळे प्रेक्षागृहात अतिशय शिस्तीचे आणि पारदर्शी वातावरण असे. खरच हा हिंदोळा महाल पहाताना ज्याने ही वास्तू घडविली त्याला हजार वेळा धन्यवाद द्यावेत असे वाटत होते. हिंदोळा महाल पहात पहात पुढे आम्ही नहर झरोका पाहिला, दिलावरखानाची मशीद पाहिली, आंघोळीसाठी एक हमाम खाना होता तिथे गाईड आम्हाला घेऊन गेला राज्याचे आंघोळीचे ठिकाण व जे शाही पाहुणे आहेत त्यांचे आंघोळीचे ठिकाण दाखविले ते पहात असताना भिंतीत असणा-या पाण्याच्या नळ्या दाखविल्या, त्याकाळी लाईट विना पाणी गरम करण्याची पद्धत दाखविली ती पाहून तर तोंडातच बोट घातले कुठल्याच धातूचा किंवा वस्तूचा उपयोग न करता सरळ गरम पाणी बाथरूम मधे जात होते, बाथरूम च्या खाली एक रूम होती त्या रूम मधे सोने जाळायचे त्यातून होणारी वाफ नळी व्दारे बाथरूम मधे यायची तिथे राजे महाराजे सोन्याचा स्टीम बाथ घ्यायची खरच या राजेशाही थाटाला सलाम केला अन त्यावेळची टेक्नाॅलाॅजी पाहून थक्कच झालो. त्या हमाम खान्याचा पॅनोरमा घेतला इतका जबरदस्त आला ना की आम्ही अजूनही पहात राहतो. तो परिसर फिरताना सारखेच वाटत होते हे दृश्य हा परिसर आपण कुठे तरी पहायलेला दिसतो पण काही केल्या आठवेना, मेंदूला भयंकर ताण दिला पण स्मृतीपटलावर काहीच उमटेना, त्यावेळी गाईड म्हणाला आपको पता है यहा बहोत सारी हिंदी पिक्चर की शूटिंग हुई है. मी त्याला विचारले कोणते चित्रपट पण त्याला नाव आठवेना तो फक्त म्हणायचा हेमामालीनी और धर्मेंद्र की पिक्चर थी  मग मी मेंदूला अजून ताण देऊ लागलो प्रत्येक फ्रेम पाहू लागलो, एखाद्या ऐतिहासिक वास्तूवर अनेकांनी आपली व आपल्या प्रेमिकेची नाव लिहीलेली असतात तसेच तिथे एका घुमटावर नाम गुम जायेगा असे लिहीले होते. मी सहज तेच युट्युब वर सर्च केले तर किनारा या चित्रपटातील नाम गुम जायेगा चेहरा ये बदल जायेगा हे जितेंद्र धर्मेंद्र व हेमामालीनी यांच्यावर चित्रीत केलेले हे गाणे सुरू झाले. आणि मला माझे उत्तर मिळाले. ते गाणे आणि साक्षात तिथल्या फ्रेम जुळू लागल्या, मनाला खुप आनंद झाला, मोठा शोध लावला याचा माझा मलाच अभिमान वाटला..  

आता गाईड घाई करू लागला होता त्याने आम्हाला चंपा बावडी नावाची एक विहीर आहे तिथे घेऊन गेला. त्याचा आकार कमळच्या पानांचा होता. तीन टप्पे असणारी ही विहीर व तिच्या सारखी रचना जगात कुठेच दिसणार नाही. या विहीरीचे वैशिष्ट्य गाईड सांगू लागला. जर कोणी या मांडवगडवर हल्ला केला तर सर्व राजे आणि राण्या त्या विहीरीत उड्या मारत. पहाणा-याला वाटायचे यांनी जीव दिला पण हे सारे तिस-या थराला जाऊन चोर रस्त्याने बाहेर पडायचे. आम्हाला पहिला विश्वास बसला नाही काहीतरीच बरळतो हा असे वाटले मग आम्हाला त्याने तीन मजले उतरून खाली घेऊन गेला आणि तिथे तो चोर दरवाजा दाखविला सध्या तो पुरातत्व खात्याने बंद केला आहे. एक एक चमत्कारीक व कधी न पाहिलेले अनुभवलेली एक एक गोष्ट इथे साक्षात पाहून खरच थक्क झालो होतो. त्या वेळी विहिरीच्या पाण्याला चाफ्याच्या फुलांचा सुगंध येत असे पण गाईडने जाता जाता सांगितले.

पृथ्वीवरचा स्वर्गच असे एका वाक्यात मी करणदादांना उत्तर दिले अन राणी रूपमती आणी बाज बहाद्दूर यांच्या महालाकडे निघालो. जाताना प्रत्येक ठिकाणी एक बोर्ड दिसायचा (एक अधुरी प्रेम कहाणी) तो वाचला अन आवर्जून या गाण्याची आठवण झाली.

आ लौट के आजा मेरे मीत तुझे मेरे गीत बुलाते हैं

मेरा सूना पड़ा रे संगीत तुझे मेरे गीत बुलाते हैं

बरसे गगन मेरे बरसे नयन देखो तरसे है मन अब तो आजा

शीतल पवन ये लगाए अगन ओ सजन अब तो मुखड़ा दिखा जा

तूने भली रे निभाई प्रीत तूने भली रे निभाई प्रीत

तुझे मेरे गीत बुलाते हैं आ लौट...

एक पल है हँसना एक पल है रोना कैसा है जीवन का खेला

एक पल है मिलना एक पल बिछड़ना दुनिया है दो दिन का मेला

ये घड़ी न जाए बीत ये घड़ी न जाए बीत तुझे मेरे गीत बुलाते हैं आ लौट...

गाडीतील पॅनड्राईव्ह मधे हे गाणं होतं ते प्ले केल, अन ऐकता ऐकता या प्रेमनगरी च्या दिशेने निघालो. वाटेत अनेक छोटे मोठे महल पडक्या अवस्थेत दिसते होते. उंच डोंगरावर एक किल्याची प्रतिकृती दिसत होती नक्कीच जवळ आलो याची खात्री पटली. इतक्या वेळ शांत असलेला गाईड दादा आता बोलू लागला.

मांडूचा राजा बाझ बहाद्दर एकदा शिकारीसाठी नर्मदेकाठी जंगलात गेला असताना त्याला स्वर्गिय आवाजातील गाण ऐकू आल. कवी मनाचा राजा आवाजाचा वेध घेत गेला असता त्याला रुपमतीचे दर्शन झाले. तिच्या रुपाने आणि आवाजाने घायाळ झालेल्या राजाने इतर राजांसारख अपहरण न करता तीला लग्नाची मागणी घातली आणि तीला मांडूला चलण्याची विनंती केली. रुपमतीने राजाला आपली अडचण सांगितली की, ती रोज नर्मदेच दर्शन केल्याशिवाय अन्नग्रहण करत नाही. राजाने तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मांडु गडाच्या दक्षिण टोकावर रुपमती महालाची आणि त्याला पाणीपुरवठा करण्यासाठी रेवाकुंडाची निर्मिती केली. रुपमती महालाच्या अगोदर त्या ठिकाणी टेहळणी करणार्‍या सैनिकांसाठी वास्तू बांधलेली होती. त्यावर दोन मजली रुपमती महाल बांधण्यात आले. या महालाच्या गच्चीवर दोन घुमट आहेत त्यांच्या कमानदार सज्जातून दुरवरचा प्रदेश दिसतो. येथूनच राणी रुपमती नर्मदेचे दर्शन घेत असे. राणी रुपमती चांगली कवियत्री होती, गायिका होती तर राजा बाज बहाद्दुर चांगला वादक संगितकार होता. संगिताच्या साथीने दोघांच प्रेम बहरल पण त्याचवेळी त्याच राज्याकडे दुर्लक्ष झाला. याचा फ़ायदा मोगलांनी घेतला. अकबरा पर्यंत राणी रुपमतीच्या सौंदर्याची वार्ता़ पोहोचली होती. त्याने आपला सावत्र भाऊ आदम खानाला मांडवगड वर हल्ला करण्यास सांगितले. १५६१ मध्ये आदम खान मांडवगड मधे पोहोचला. हे वृत्त कळताच बाझ बहाद्दर छोट्या फ़ौजेनिशी मोगलांच्या अफ़ाट सैन्याला सामोर गेला. त्याचा दारूण पराभव झाला आणि रणांगणातून पळून गेला. आदम खानाने मांडवगडावर कब्जा केला. हे वॄत्त कळताच राणी रुपमतीने विष प्राशन केले व आपले जीवन संपविले. एका प्रेमकहाणीचा करुण अंत झाला. बाझ बहाद्दरने परत काही काळ मांडव गडचा ताबा घेतला पण नंतर तो अकबराला शरण आला आणि त्याचा मनसबदार झाला. त्यानंतर बाज बहाद्दूर याने राणी रूपमतीची समाधी बांधली, आजही दोघेही त्या समाधी जवळ राणी रूपमती व बाज बहाद्दूर भेटतात अशी आख्यायिका आहे. गाईड दादाची ही स्टोरी ऐकता ऐकता आम्ही रानी रूपमतीचा दर्शन मंडप चढून वरती आलो. आम्ही तिघांनीपण मनसोक्त फोटो काढले, खुप उंचावर आल्याने आजूबाजूचै देखणे रूप डोळ्यात भरत होते. जेथून राणी रूपमती नर्मदामातेचे दर्शन घ्यायची त्या घुमटा मधे उभे राहिलो, तेथूनच दूरवर वहात असलेल्या नर्मदामातेचे अंधूकसे दर्शन घेतले, खरच एक वेगळाच अनुभव मनाला येत होता. संपूर्ण महल पाहून झाला. अन बाज बहाद्दूर यांच्या महालाकडे निघालो. दुपार झाल्याने अंगात घामाच्या धारा वहात होत्या, महालात शिरतानाच अंगात एक चैतन्य संचारले होते. अजूनही येथे इतिहासाच्या खुणा साक्ष देत होत्या. अजूनही इथे पूर्वजांचा वास आहे हे जाणवत होते. आम्ही तिघेच या महालात असल्यामुळे मन सुद्धा आमच्या सोबत खेळत होते. राजेशाही थाट आणि त्याचा अनुभव प्रत्यक्षात घेत होतो. एक घर बांधायची पंचाईत पण एका व्यक्तीसाठी इतके मोठे महल यावरून नक्कीच लक्षात येते भारत सोने की चिडीया होता. भारतात सोन्याचा धूर निघत होता यावरून स्पष्ट होते. राणी रूपमती यांचे समाधीस्थळ पाहिले. आणि निळकंठेश्वर महादेवाकडे आमचा प्रवास सुरू झाला...

संमार्जिली अंगणे, पान्हावली गोधने

आसावला आसमंत अमृताने चिंब नाहवा, हे शिवा

तू आपदा वारणारा, तू दुःखिता तारणारा

होई कृपावंत विश्वातले आर्त अभयंकरा शांतवा, हे शिवा

सोनपूर दरवाजाकडे जाताना म्हणजेच मांडवगड ची सहल संपवताना, डोंगरांच्या मधोमध, टेकड्यांनी घेरलेले निसर्गरम्य ठिकाणावर नीलकंण्ठ महादेव मंदिर आहे. त्यासाठी खोल दरीत उतरावे लागते तिथे हे मंदीर दिसते, उर्दू भाषेत मंदिराची माहीती लिहीलेली आढळते. दुसरे बाजीराव पेशवे यांनी या शिवलिंगाची स्थापना केली आहे. एका खोल गुहेत हे शिवलिंग स्थापन केलेले असून तिथे सारखा जलअभिषेक होत असतो. हा एक चमत्कारच आहे. मनोभावे दर्शन घेतले, पुन्हा पावसळ्यातही येण्याचा निश्चय तिथेच केला. तेथील पुजारी सांगत होते. पावसाळ्यात मांडवगडचे अलौकिक वातावरण व निसर्ग सौंदर्य काश्मीरच्या सौंदर्याचेच प्रतीक मानले जाते. नैसर्गिक सौंदर्य तसेच वास्तुकलेची परिसिमा गाठलेला मांडवगड आपण कितीही न्याहाळला तरी पूर्णतेची तृप्ती होतच नाही आणि आपली तृप्ती न होणं, हेच मांडवगडच्या सौंदर्याच्या रहस्य आहे. जसे पुजा-याने सांगितले तशीच अवस्था माझी होती.

संदीप राक्षे ✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१

Sunday, 15 March 2020

काठीगावची होळी, संदीप राक्षे

अनुभूती अद्भुत संस्कृती दर्शनाची, परंपरा काठीगावच्या होळीची:-  संदीप राक्षे ✍🏻

महू, सावर, पळस
आंब्याला पण मोहर.
मोरखी, बुधा, बावा
पारंपारिकतेचा बहर.
काठीगावची होळी पेटते
असतो पहाटेचा प्रहर..

महाराष्ट्र म्हटलं की अनेक परंपरांच माहेरघर, दिवाळी पासून ते गणेशोत्सवापर्य॔तचे सर्व सणवार अति उत्साहात साजरे होत असतात यातूनच बंधूता एकता निर्माण करण्याचे मोठे सामाजिक कार्य केले जाते. प्रत्येक सण हा सामाजिकतेचे प्रतिक आहे. असाच एक सण सातपुडा पर्वत रांगेत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तो म्हणजे होळी, भारतातच या उत्सवाची महती, किर्ती नव्हे तर जगभरात महती आहे. मी फक्त या काठी गावच्या होळी संबंधी ऐकून होतो, पेपर मधे वाचलेले होते. साक्षात पहाण्याचा कधीच योग आला नाही. मनात दरवर्षी प्रचंड इच्छा निर्माण व्हायची, या वर्षी जावूयात, तयारी व्हायची, पण काही ना काही दुसरेच काम निघायचे अन जाणे रद्द व्हायचे. आज नुकताच आश्रमशाळेत फेरफटका मारून नुकताच घरी आलो होतो. तितक्यात आमचे परम मित्र विनोदभाऊ चौधरी यांचा ८/३/२०२० रोजी फोन आला. त्यांनी पहिलेच विचारले उदया कुठे फिरस्तीची योजना तर नाही ना? मी नाही म्हणालो. मग ते म्हणाले जळगाव जिल्हा प्रादेशिक वाहतूक विभागाचे प्रमुख विलासराव चौधरी साहेबांनी काठीगाव, नंदुरबार येथील होळी पहायला जाण्यासाठीचे दि. ९/३/२०२० रोजी योजिले आहे. त्या मधे मी स्वःता साहेब, मालेगाव जिल्हा प्रादेशिक विभागाचे प्रमुख अतुल सुर्यवंशी साहेब, नंदुरबार जिल्हा प्रादेशिक वाहतूक विभाग प्रमुख नितीनजी सुर्यवंशी साहेब, बापूसाहेब चौरै साहेब, उदयोजक अमितजी गायकवाड, गोरे साहेब इतके जण आहोत तुम्ही येणार का? मी कसलाच न विचार करता लगेच होकार दिला. विनोद भाऊंनी सांगितले उदया दहा वाजेपर्यंत नाशिकला पोहचून जा मी नाशिकलाच आहे.
पहाटेच उठलो अन दहा वाजेपर्यंत नाशिकला पोहचलो. तेथून आम्ही सहा जण सटाणा, साक्री मार्गे नंदुरबारला सात वाजता पोहचलो. नंदुरबार येथे चहा पाणी झाला तेथून आम्ही धडगावच्या रस्त्याला लागलो. जाताना गावा गावातील होळ्या पेटल्या होत्या, संपूर्ण गावकरी गावच्या वेशीवर जमून एकत्रित होळीचा आनंद घेत होते. लहान मुल डफडी वाजवून सणांचा आनंद लुटत होती. आकाशातून पांढरा शुभ्र चांदोमामा पण होळी उत्सवाचा आनंद घेत होता. त्याच्या दयेने अंधारावर मात होऊन दूरदुरचे अगदी स्पष्ट दिसत होते. कारण पौर्णिमेचा तो चांदवा होता. खरतर चंद्र हा कल्पना शक्तीचा कारक ग्रह आहे त्यामुळे सहजच जगदिश खेबुडकरांनी लिहीलेल्या काही ओळी आठवल्या.

उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा!
दाही दिशा कशा खुलल्या, वनीवनी कुमुदिनी फुलल्या,
नववधु अधिर मनी जाहल्या, प्रणयरस हा चहुकडे वितळला स्वर्गीचा!!

चंद्रोदयानंतर सारा निसर्गच आनंदमय होतो, आणि प्रणयरसाने भारला जातो त्यात अनेक झाडं, फुल, वेली मोहरून जातात तर प्रत्येक माणसाच्या हदयात प्रेमरसाच्या अनेक लाटां उसळू लागतात. असे काही वातावरण आकाशातील त्या चंद्राकडे पाहून झाले होते, कधी कधी ढगांच्या आड तर कधी कधी डोंगराच्या आड लपून जायचा, असा हा पाठ शिवणीचा खेळ खेळत आमचा प्रवास सुरू होता. आता आमची गाडी सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी आली होती. पुढे खूप मोठा घाट मार्ग चढून आम्हाला पुढे जायचे होते. विरळ झाडीतला सातपुडा पर्वत संपूर्णता उजाड दिसत होता. चंद्राच्या उजेडात पांढरा धक्क दिसत होता. अशातच हातात धारदार हत्यार घेऊन दहा बारा जण रंगीबेरंगी कपडे परिधान करून, चेह-यावर चित्र विचित्र रंगवलेले, काहीनीं चेह-यावर मुखवटे बसवलेले होते. गाडीला आडवे झाले अन मनातल्या भितीने कहरच केला. अचानक गाडी पुढे आलेली ही तरूण मुले काहीतरी मागत होती पण लक्षात येईना. ते नुसते फाग दो, फाग दो म्हणायची इतक्यात चौधरी साहेबांनी खिशातले दहा रू काढले अन त्यांना दिले. दहा रू मिळाले अन ती आदिवासी मुल गाडी पासून दूर गेली. पुढे गेल्यावर चौधरी साहेबांनी सांगितले की हे होळीच्या सणाला पैसे मागतात त्याला फाग म्हणतात. मला जरा हे चमत्कारिक वाटले, पण प्रथा आहे हे कळल्यावर बरं वाटलं, मग आम्ही सर्वानींच सुट्टे दहा दहा रू काढले अन जो गाडीला आडवा येईल त्याला दहा रू देत गेलो. संपूर्ण पर्वत रांगेतून ढोलाचे आवाज आता घुमत होते भयाण शांततेला छेद देत होते. रात्री अकरा वाजता आम्ही धडगाव सरकारी गेस्ट हाऊसला पोहचलो तिथे आमची जेवणाची व राहण्याची सोय केलेली होती. संपूर्ण अधिकारी वर्ग सोबत असल्याने, मनसोक्त सरकारी पाहुणचार घेतला. जेवणाचा बेत मस्त आदिवासी पद्धतीने केल्या मुळे एक वेगळीच चव चाखायला मिळाली. विलासराव चौधरी साहेबांनी आमची सर्व अधिकारी वर्गाशी ओळख करून दिली अन तेथून आम्ही काठीगावाकडे निघालो. धडगावहून पुढे काठीगाव ४० किलोमीटर होते. आमच्या गाडीच्या पुढे प्रादेशिक वाहतूक विभागाची पिवळ्या दिव्याची गाडी होती, आमची गाडी मधोमध आमच्या मागे अजून स्कॉर्पिओ त्यामुळे आमचा रूबाब तर डबल वाढला होता. आपणही कुणीतरी मोठी आसामी आहोत असा मनातल्या मनात भास करून घेत सरकारी थाटात प्रवास सुरू होता. आता दोन किलोमीटर काठीगाव राहिले होते, तिथून पुढे मोठ्या गाड्यांना प्रवेश निषिध्द होता. पण आमच्या पुढे दिव्याची गाडी असल्याने आम्ही थेट काठीगावात पोहचलो. मंगळुरी व जुन्या कौलारूंची घर मस्त लाईटिंग लावून सजवलेली होती. घरात मात्र कोणीच नव्हतं सारे जण होळी उत्सवात मग्न होते. गाडया एका घराच्या समोर उभ्या केल्या अन आम्ही पण पायी उतरून चालू लागलो. असंख्य आदिवासी बंधू समुहाने सजून धजून होळीच्या ठिकाणी निघाले होते. आजूबाजूला गळ्यातल्या रंगीबेरंगी माळा, पोत, डोरले, कुडक्या पिपाण्यांची दुकानं सजली होती. अनेक दुकानांवर झुंबड उडालेली होती. जिलेबीच्या परातीच्या पराती खाली होत होत्या, पिपांण्याच्या आवाजाने तर कानठाळ्या बसत होत्या, अशातच आम्ही होळीचा मुख्य सोहळा जिथे चालतो त्या ठिकाणी पोहचलो. डोक्यावर मोरपिसांचा मुकूट व कंबरेला भल्या मोठ्या घुंगरमाळा बांधलेल्या, आदिवासींचा मोठा समुह आपल्या पारंपरिक शैलीत ढोल, पिरी, पावा, मांदल या वाद्यांच्या तालावर एक विशिष्ट ठेका धरून नाचत होता. एक पाऊल पुढे एक पाऊल मागे घेत कंबरेला हळूच झटका देत होता. त्यामुळे एक प्रकारचा लयबद्ध आवाज ऐकू येत होता त्या आवाजाने आनंदाला उधाण येवून आजूबाजूचा प्रत्येक जण त्यांच्या सोबत ठेका धरीत होता. आम्ही सर्वांनी पण त्यांच्या तालावर थोडावेळ ठेका धरला अन पुढच्या समुहाकडे गेलो, त्यांनी बांबूच्या झाडापासून मुकूट तयार करून त्याला रंगीबेरंगी कागदांनी सजवलेले होते व तो डोक्यावर परीधान केला होता. अन कंबरेला भले मोठे वाळलेल्या भोपळ्यांची माळ बांधलेली होती. ते पण ढोलाच्या तालावर नाचत होते. त्यांच्या मधोमध अस्वल, डाकीण, वाघ्या यांचे मुखवटे घातलेले अनेक आदिवासी नाचताना दिसत होते. अनेक पुरूषांनी स्त्री पात्र साकारली होती ते पण साडी चोळी घालून नाचत होते. या होळीचे वैशिष्ट्य म्हणजे यामधे कुठेही महिलां नाचताना दिसत नव्हत्या. एका टेकडीवर असंख्य महिलांचा समुह हा अविस्मरणीय सोहळा बसून पहात होत्या. वरील प्रमाणे सजलेले असंख्य समुह या होळी उत्सवात दिसत होते. आम्ही संपूर्ण गावाला फेरफटका मारला सगळीकडे तोच उत्साह भरलेला दिसत होता. एकही आदिवासी बांधव थकत नव्हता की बसत नव्हता एक सारखे त्याचे हे पारंपरिक नृत्य सुरूच होते. गावच्या मध्यभागी एका लिंबाच्या झाडाला दिडशे फूट मोठी बांबुची सरळ काठी उभी केलेले होती प्रत्येक जण येवून ती काठी उचलत होता व काहीतरी मागणं मागत होता. आम्ही पण त्या काठीचे दर्शन घेतले थोडी वर उचलली. काही वाद्यांचा समुह बाजूला बोलवून घेतला अन तिथे आम्ही सर्वांनी या पारंपरिक नृत्याचा आनंद लुटला. सगळे जण नाचून घामांत भिजून गेले होते. पहाटेचे चार कधी वाजले हे आम्हाला कळलेच नाही. मुख्य चौकात आता होळी पेटविण्याची तयारी सुरू झाली होती.

पावित्र्याने भरते वर्षानुवर्षं
उभ्या मानवतेची होळी
संस्कृती जपत पेटते
काठीगावची होळी..

१२४६ साली या होळीची परंपरा सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे. आदिवासींचे देवता राजा पाणठा व गांडा ठाकूर यांनी सुरू केलेली ही काठी गावची होळी त्यामुळे या होळीला विशेष महत्त्व आहे. आता सूर्योदयची वेळ झाली होती. गावच्या पाटलाच्या हस्ते होळीची पुजा करण्यात आली. जो लिंबाच्या झाडाला उभा केलेला बांबू आणून होळीच्या मधोमध रोवला गेला. प्रत्येक आदिवासी बंधूनी घरातून लाकडाचा एक एक ओंडका आणलेला होता. ते सर्व ओंडके उभ्या केलेल्या बांबूच्या सभोवती रचन्यात आले. आणि गावच्या पाटलाच्या शुभहस्ते होळी पेटविण्यात आली. होळी पेटली आणि थोड्यावेळातच भला मोठा बांबू आडवा झाला. तेथे असलेल्या मान्यवरांच्या हस्ते त्या बांबुचे तुकडे करण्यात आले अन आलेल्या प्रत्येक आदिवासी बांधवाला ते वाटण्यात आले. मानवी संस्कृतीची मुल्ये जपणारी ही होळी आदिवासींच्या जीवनात महत्वाची आहे. या वर्षी कोरोना या व्हायरस मुळे बाहेर देशातील पर्यटक या होळी उत्सवासाठी उपस्थित नव्हते. महाराष्ट्रातील प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी काठी गावची होळी अनुभवावी याचि देही याचि डोळा पहावी, आपल्या या महाराष्ट्रातील अनमोल अशी संस्कृती जतन करण्याची आदिवासी बांधवांना प्रेरणा दयावी..
महाराष्ट्रामध्ये रूढी परंपरेनुसार त्या त्या भागातील सांस्कृतिक जडण घडण होत असताना इथल्या मातीतला  रांगडेपणा, लोककला संस्कृतीचे वैविध्यपूर्ण वेगळेपण पाहिले की या महाराष्ट्रात जन्माला आलो आहे याचा सार्थ अभिमान वाटतो. काठीगावचा हा नयनरम्य सोहळा पाहून सारेच जण भारावून गेलो होतो. रात्रभरच्या जागरणाने डोळ्यांच्यावर झापड येत होती. शरीर थकले होते पण मन ताजेतवाने होते अशातच काठी गावचा निरोप घेतला अन नाशिककडे प्रस्थान केले...

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Friday, 6 March 2020

गिरीदुर्ग अंतुर किल्ला:- संदीप राक्षे

गौताळा अभयारण्यातील, इतिहासाचे सुवर्णपान असणारा गिरीदुर्ग अंतुर किल्ला. संदीप राक्षे ✍🏻

सकाळी सकाळीच एका किल्याची पोस्ट निसर्गरम्य खेड तालुका या व्हाटसअप गृपवर औरंगाबादचे सुरज नालगुणे यांनी शेअर केली होती. त्या फोटोतला किल्ला ही नविन दिसत होता अन त्या किल्याचे नाव पण ऐकण्यातील नव्हते त्यामुळे उत्सुकता लागून राहिली. अशातच मी सुरज नालगुणे यांना फोन केला व किल्याच्या विषयी माहिती विचारली त्यांनी अतिशय सुंदर किल्याचे वर्णन सांगितले व कसे जायचे ते पण सांगितले. एकदा मनात एखादी गोष्ट भरली तर ती करायचीच हा नियमच माझा, त्यामुळे मनात चक्र फिरू लागली. विचार करता करता शनिवार उजाडला तरी अजून काहीच ठरेना मन अस्वस्थ झाले अन किल्ला काही नजरे समोरून जाईना. एखाद्याला देवभक्तीचा नाद लागतो अन तो कोणत्या ना कोणत्या तीर्थक्षेत्राला, देवाला खेट्या मारत असतो अर्थात त्यामागे मागे काही तरी स्वार्थ असतो. असेच काहीसे या गड किल्यांच्या बाबतीत माझे झाले होते. एक तरी किल्ला अनुभवावा एखादा दिवस तरी त्या गड किल्यांच्या सानिध्यात घालवावा. निसर्गाशी एकरूप व्हावं अस वाटतं अन कधी कधी वाटते या बहुचर्चित तीर्थक्षेत्रांच्या पेक्षा हेच गड किल्ले आपले तीर्थक्षेत्र आहेत. त्यामुळेच या किल्याच्या सानिध्यात जाण्यासाठी त्याला डोळे भरुन पहाण्याची उत्कंठा लागून राहीली. इतक्या दुर ते पण अभयारण्यात किल्याची काही माहिती नाही सोबत कोणी तरी असले पाहिजे म्हणून खुप विचार केला कोणाला सोबत घेऊन जावं तितक्यातच खेडचे रोहीत दादा बोरूडे यांचे नाव आठवले क्षणाचाही विलंब न लावता रोहीत दादाला फोन लावला त्यांना विचारले आपल्याला औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील व जळगाव जिल्ह्याच्या किना-यावर असणारा अंतोरी हा किल्ला पहायला जायचे आहे. रोहितदादाने लगेच जाऊ म्हणून होकार दिला. शनिवार दि २९/२/२०२० रोजी रात्री नऊ वाजता मी भोसरीहून खेडला गेलो, तेथून रोहीत बोरूडे यांना घेतले अन पाबळ मार्गे शिरूर, नगर, औरंगाबाद असे मार्गक्रमण करीत पहाटे तीन वाजता वेरूळला पोहचलो. तेथील वृंदावन रिसोर्ट मधे एक रूम घेतली, दोन तास मस्त आराम केला. सकाळी  प्रातःविधी उरकून आम्ही कन्नडच्या गौताळा अभयारण्याच्या दिशेने निघालो...

क्षितिजा राऊळी प्रकट दिसु लागे निलउषा!
करी जागे झोपी असती तया दावि सूरउषा!

क्षितिजावरून सुर्याचे लालबुंद बिंब हळुहळु वर सरकु लागले होते. जंगलातील सकाळ हलकेच हिरव्या रंगातून सोनेरी रंगाला परिधान करतानाचे हे नयन रम्य दृश्य दिसत होते. बहारदार निसर्ग मनाला आल्हाददायक अनुभूती देत होता. उगवत्या सूर्याच्या स्वागताची गाणी गात पक्ष्यांचे मधुर संगीत श्रवणी पडत होते. गौताळा अभयारण्यातील ती सकाळ खरच मनाला एक वेगळीच अनुभूती देत होती.
गौताळा अभयारण्यात जायचे हा विचार पण आमच्या मनात नव्हता हे क्षेत्र बोनस मधे आम्हाला मिळाले होते. मग आम्ही गौताळा अभयारण्याचा पण आनंद घ्यायचा ठरवला. वाटेत जाताना इतिहासकालीन एक वास्तू दृष्टीस पडली आम्ही आवर्जून थांबलो मंदीराच्या आकाराचे दगडात बांधकाम केलेली ही वास्तू  सीतामाईची न्हानी म्हणून प्रचलित आहे. तिथे सध्या वानरांचे वास्तव्य आहे. ती वास्तू पाहून आम्ही नागद फाट्यावर पोहचलो तिथे मॅप बाबाने अंतुर किल्ल्यावर जाण्यासाठी आम्हाला डावीकडे वळायला सांगितले आम्ही कोणताच विचार न करता घाट उतरून नागोदला पोहचलो. नास्ता केला नव्हता त्यामुळे कडाक्याची भुक लागली होती वीस किलोमीटरचे अंतर कापून आम्ही नागोदला पोहचलो तिथे हाॅटेल दिसले तिथे थांबलो. मस्त गरमागरम भजी घेतली चहा घेतला तो पर्यंत रोहीतदादा हाॅटेल वाल्याला किल्याची माहिती विचारू लागले अंतुरी किल्ला म्हणताच हाॅटेलवाल्याच्या चेह-यावर वेगळाच भाव दिसला हाॅटेलवाल्याने विचारले कुठून आलात? मग रोहीतदादाने रूट सांगितला, हाॅटेलवाला म्हणाला इकडून गेलात तर   बेलखेडा- गोपेवाडी- दस्तापूरला जाऊन गाडी तेथेच लावून तुम्हाला पायी किल्ला २७०० मीटर चढावा लागेल अडीच तासांचा पायी प्रवास अन आता तर उन वाढले आहे तुम्ही एक करा पुन्हा आले त्या मार्गाने जा. तेथून तुम्हाला डायरेक्ट किल्यावर पोहचता येईल. नास्ता उरकला अन हाॅटेलवाल्याकडून सुर्यफुलाच्या भाजलेल्या बिया घेतल्या त्या बियांच्या आतील मगज खायला खुप चविष्ट आणि शरीराला पोषक असतो. गाडी पुन्हा मागे घेतली अन सुर्यफुलाच्या बिया खात खात आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला. घाट चढत असतानाच एक भेकर गाडी समोरून गेलं बहुदा ते चुकलेलं असावं खूप भेदरलेलं वाट फुटेल तिकडे धावत होते. आम्ही मनोमन आनंदी झालो अभयारण्यात आलो आणि एका तरी प्राण्याचे दर्शन झाले अन सहजच चारोळी सुचली...

नको सैरवैर होऊ नको तू भिऊ
थकलेल्या रानातल्या रानजीवा
मानवी वस्तीतून वाचलास खरा
पण आता पोहचशील आपल्या घरा.

आता घाटचा रस्ता संपून आम्ही नागापूरच्या रस्त्याने पुढे जावू लागलो अगोदरच उशीर झाला होता अजून बराच दूरचा प्रवास करायचा होता दहा बारा किलोमीटर पुढे आलो असेल तेव्हा आम्हाला सीताखोरी कडे असा बोर्ड दिसला अन आपोआप ब्रेक दाबला गेला, चला एक शेवटचा पाॅईन्ट पाहूयात म्हणून दोघेही गाडी खाली उतरलो अन सीताखोरी च्या दिशेने चालू लागलो. थोडे अंतरावर चालून गेलो तर भली मोठी दरी दिसली तिला पाहून तर डोळे गरगर फिरू लागले. त्या दरीच्या एका कडेला सशा सारखे कान असलेल्या आकाराची एक सरळ कातळ पाहून आश्चर्य वाटले, इतके वर्ष होऊनही ही कातळ सरळ उभी कशी काय? हा मनात प्रश्न पडला. कारण तिला अनेक ठिकाणी भगदाड पडलेली होते अनेक तडे, चिरा पडल्या होत्या, तरी ती कातळ प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होती. खरच निसर्गाचे हे चमत्कारीक रूप डोळ्यात साठवून पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो आलो. आता अभयारण्याचा भाग संपून शेतीपट्टा सुरू झाला होता. उन्हाळ्यात हिरवीगार शेती पाहून मनाला गारवा मिळत होता. मका गहू अशा अनेक पिकांनी शेती बहरली होती ती पहात पहात नागापूरला पोहचलो एक अरूंद कच्चा रस्ता अन तेथून पुढे सहा किलोमीटरवर अंतुरी किल्ला होता. अतिशय खडकाळ रस्ता त्यात आमच्या कडे नाजूक फोरव्हिलर ती म्हणजे होंडा अमेझ, बिचा-याच्या चाशीवर अनेक दगडधोंडे आदळत होते कधी कधी इंजिनला पण घासत होते. वेग मंदावला होता. दहा वीस च्या स्पीडने गाडी सुरू होती. एका शेताजवळ बटाट्याच्या आकाराचे पीक काढताना काही माणसं दिसली कारण दूरून बटाटा तर दिसत नव्हता. परंतू काय आहे पहावे म्हणून जवळ जावून पाहिले तर आठ दहा एकरात आल्याचे पीक काढण्याचे काम सुरू होते. आयुष्यात पहिल्यांदाच आल्याचे पीक काढताना पहात होतो. तेथील शेतक-याला थोडी आल्या विषयी माहिती विचारली व कधी लागवड केली होती हे पण विचारले?, त्यांनी सांगितले मागच्या जून मधे लागवड केली होती. आता फेब्रुवारी सुरू आहे तब्बल नऊ महिन्यानंतर हे पीक काढायला आले होते. संपूर्ण गौताळा परिसरात आल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ते पीक काढल्यावर गुजरात, राजस्थान, मुंबई, पुण्याला विक्रीसाठी जाते. असे शेतकरी सांगत असतानाच त्यांने दोन्ही हातात मावतील इतके आले माझ्या हातावर ठेवले, इतका अमुल्य वानवळा मिळाला होता. शेतक-याचे आभार मानले अन पुढे निघालो. कच्चा रस्ता पुढे जास्तच खराब होता. दूर पर्यंत एकही माणूस दिसत नव्हता. पुढे गेल्यावर एक छोटे तळे व ओपन चौथा-यावर हनुमंतरायाचे मंदिर होते ते पाहून किल्ला दिसतो का हे बारीक न्याहाळू लागलो पण किल्याचा काही माघमूसही दिसेना, पुढे चलण्याशिवाय पर्याय नव्हता माळरान जाऊन जंगल सुरू झाले होते अन या विराण आणि वन्यजीव असणा-या जंगलात फक्त हम दो शेर होतो.
इतका रोड खराब असूनही गाडी कशी तरी किल्या पर्यंत घेऊन आलो होतो. कारण जंगलात व किल्याच्या आजूबाजूला जंगली प्राणी व पाखरांच्या शिवाय कोणीच नव्हते काहीतरी संरक्षण असावे म्हणून गाडी किल्यापर्य॔त घेऊन आलो होतो. भोसरी पासून हा किल्ला ३१७ किलोमीटरवर होता, औरंगाबाद पासून ९० किलोमीटरवर व कन्नड पासून ३० किलोमीटर होता.
किल्याजवळ आलो खरा पण रस्ता सापडेना मग मी अन रोहीत बोरूडे किल्याच्या मोठ्या बुरूंजा कडून निघालो पुढे आलो तर किल्याच्या आणि जमिनीच्या मधे कातळ खोदून खुप मोठा खंदक खोदला होता. इथून उतरून जायचे का? हा प्रश्न मनात आला अन काळजाची धडधड वाढली. अशातच रोहितदादा हळूहळू त्या खंदकात उतरायला लागले. पण त्यांना पण जमेना निम्या पर्यंत गेलेले पुन्हा वरती पण येता येईना त्यांचे हे हाल पाहून माझे धाडस होईना मी बराच वेळ तसाच उभा राहिलो. तोपर्यंत रोहितदादा पूर्ण खंदकात उतरले पण पुर्ण घामाघूम झाले होते पुढे काय त्यांना पण प्रश्न पडला होता. ते खूप वेळ मला आवाज देत होते पण मला त्यांचा आवाज ऐकू येईना त्यामुळे रोहितदादा खुपच घाबरले होते. मी पण उंचावर एकटाच राहिलो होतो काही करावे सुचेना. तेवढ्यात रोहित दादांचा आवाज आला सर खुपच सोपा रस्ता दिसतो आहे तुम्ही तिकडून या; फक्त जरा चालावे लागेल. मी हो म्हणालो. जिथे गाडी लावली होती तिथे मी एकटाच परत आलो. अन रस्त्याची शोधा शोध केली, पहातो तर काय एक दगडी रस्ता सरळ किल्याच्या मुख्य दरवाजाकडे जात होता. मग मी त्या रस्त्याने निघालो, आजूबाजूला घनदाट जंगल, पाणगळी मुळे दूरचे पण सहज दिसत होते. बहिरी ससाण्याच्या ऐवजी आकाशात व झाडांझुडूपांच्यावर चिट पाखरू पण दिसेना. भयान शांतता त्यामुळे नको त्या विचांराची गर्दी मनात दाटू लागली. दगडी रस्त्यावर झाडांची पाणगळ झाल्याने पूर्ण रस्ता पानांनी झाकोळून  गेला होता. मधेच कुठून तरी सळसळ ऐकू यायची, पाणगळीतल्या त्या सळसळीने तर छातीत धस्स होत होते, आपोआप हदयाचे ठोके वाढत होते.
तोपर्यंत रोहितदादा संपूर्ण खंदक उतरून माझ्याच रस्त्याला येवून थांबले होते ते सुद्धा खुप घाबरलेले दिसत होते ते मला म्हणाले मी खुप वेळा तुम्हाला आवाज दिला पण तुमच्या पर्यंत आवाज पोहचतच नव्हता. दोघांची पण एकत्र भेट झाल्याने एकमेकांना धीर आला होता. समोरच कपारीच्या अगदी कडेला अंतुरी किल्याचा दक्षिणमुखी महादरवाजा दिसत होता. अजूनही  सुस्थितीत होता अलिकडेच त्याला भव्य असा लाकडी दरवाजा बसविण्यात आल्याने मुख्य दरवाचा अतिशय सुंदर दिसत होता. बाहेरच पहारेक-यांच्या उभे रहाण्याच्या ठिकाणावर शरभशिल्प दिसत होते. छोट्या दरवाजातून आम्ही किल्यात शिरलो. दोन्ही बाजूला उंच तटबंदी होती. तट व दरवाज्यावर जाण्यासाठी पाय-या बांधल्या होत्या.  पुढे पहिल्या दरवाज्याच्या नव्वद अंशाच्या कोनातच दुसरा मुख्य पुर्वाभिमुख दरवाजा होता. दरवाजाच्या वरील दोन्ही बाजूंचे बुरूंज चौकोनी आकारात बांधलेले होते. दरवाजाच्या आतील बाजूस घुमट व कमानी दिसत होत्या त्यावर कोरीव शिल्प व कमळपुष्प कोरलेली होती. जणू काही गडाची मुख्य कचेरी असावी. पुढे आम्ही तिस-या दक्षिणमुखी दरवाज्या जवळ पोहचलो त्या भल्या मोठ्या दरवाजाच्या कमानीवर निजामशाह यांच्या काळातील मलिक अंबर यांचा या किल्याच्या बांधकामाविषयी पार्शियन भाषेत शिलालेख होता. तिसरा दरवाजा पार करून आम्ही किल्यावर पोहचलो हा किल्ला  समुद्र सपाटी पासून २७५७ फूट उंचीवर असून ३२ एकरात हा किल्ला पसरला आहे. बत्तीस एकराच्या चोहोबाजुंनी तटबंदीने हा किल्ला वेढलेला आहे. चोहोबाजुंनी खोल द-या आणि मधोमध हा किल्ला अंडाकृती आहे. १७ व्या शतकातील हा किल्ला यादवकाळात बांधला होता. अनेक साम्राज्य या किल्यावर राज्य करून गेली होती. अल्लाद्दीन खिलजी व मराठ्यांच्या मधे घनघोर असे युद्ध याच किल्यावर झालेले आहे. फोटो काढीत काढीत आम्ही किल्यावरील तलावा जवळ येवून पोहचलो, हिरव्या पाण्याने तुडूंब भरलेल्या तलावात असंख्य जलपर्णी दिसत होत्या. तलावाच्या उजव्या बाजूला मज्जिद तर डाव्या बाजूला अतिशय सुंदर राजवाड्याचे अवशेष दिसत होते. लोहचुंबकाने लोखंडाला खेचावे तसे मला या अंतूर किल्याने खिळवून ठेवले होते. मला हा तलाव व तेथील बाजूचे बांधकाम पाहून चिखलद-यातील गवळी राजाने बांधलेल्या गाविलगडाची आठवण झाली होती. गडावरील अंबरखाना, धान्यकोठारे, शस्त्रागार अनेक मोठ्या इमारती पाहून मी आणि रोहित दादा मोठ्या टेहळणी बुरूंजा कडे निघालो. इतका मोठा किल्ला पण आमच्या दोघांच्या शिवाय या किल्यावर तिसरे कोणीच नव्हते, अन जरी असले तरी लपून बसलेले जंगली जनावरं असणार असे मनोमनी वाटत होते. तीन कमांनीच्या दरवाजातून टेहळणी बुरूंजाच्या आवारात एक पिराचा दर्गाह होता. मी त्या दर्ग्यात जावून दर्शन घेतले बाहेर आलो तितक्यात एक विचित्र आवाज तिथे येवू लागला बिबट्याच्या लहान पिलांचा हा आवाज असावा किंवा एखादया पक्ष्यांचा आवाज असावा असा तर्क आम्ही दोघांनी पण लावला. खुप वेळच्या आवाजाने आमची मात्र पाचावर धारण बसली होती. क्षणभरातच आम्ही तो बुरूंज सोडला, आता अशी मनात भीती बसली की कधी किल्यातून बाहेर पडतो असे झाले होते. मी आणि रोहितदादा एकमेकांना धीर देत होतो काहीच झाले नाही अशा आविर्भावात होतो. पण दोघांची मनातली अवस्था खुप भितीदायक बनली होती. किल्याच्या पश्चिम बाजूस काही लेण्या दिसल्या तिथे जाण्याचे पण धाडस होईना. पाऊलांची गती वाढलेली होती. एका टेकडावरील धान्याच्या अंधा-या कोठारात डोकावले तर तिथे पण वेगळाच आवाज ऐकू आला, आता मात्र धीर सुटत चालला होता. पण किल्यावर इतक्या सुंदर वास्तू होत्या त्या पाहिल्या शिवाय पाऊल पुढे सरकेना. वास्तू जरी सुंदर होती तरी किल्यावर येणा-या महाभागांनी पत्रावळ्या, दारूच्या बाटल्या, बिसलरी बाटल्यांनी अन प्लॅस्टिकच्या इतर वस्तूंचा जागोजागी खच पडलेला दिसत होता. प्रत्येक ऐतिहासिक वास्तूच्या दगडांच्यावर फलताड प्रेमींनी नाव कोरून वास्तूला दुषीत केलेले दिसत होते. महाराष्ट्राचे गड किल्ले हे तिर्थक्षेत्रापेक्षाही श्रेष्ठ आहेत हे जरी प्रत्येकाला समजले तरी त्याचे पावित्र्य राखले जाईल अन्यथा अशाच या ऐतिहासिक वास्तू नष्ट होतील यात शंकाच नाही. आपल्या या वैभवशाली महाराष्ट्राच्या गड किल्यांचे, पवित्र पावन स्थळांचे रक्षण करण्याचे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. आज अनेक आक्रमण निमूटपणे सहन करतो, शरीर पोलादा सारखे बनवू शकतो, कोणताही ऋतू यांच्यावर कसलाच परिणाम करीत नाही, वेदनेचे नाव ही उरत नाही तो योगी त्याच प्रमाणे हा अंतुर किल्ला मला एखाद्या योगी सारखा वाटला..

या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची,
दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची,
पहाड़ डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची,
जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदा शिरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी!

कुसुमाग्रजांच्या या काव्यपंक्तीना आठवतच अंतुर किल्ल्याचे दर्शन घेतले अन जड अंतःकरणाने निरोप दिला. तशी या किल्याची फारशी माहिती उपलब्ध नाही, किंवा येथे कुठल्याही प्रकारचे गाईड किंवा मार्गदर्शिका नसल्यामुळे किल्याची माहिती नसूनही चुकीचा विषय मांडणे मनाला पटत नाही. जितकी माहिती मला मिळाली मी स्वतः पाहिली तीच माहिती मी या लेखात नमूद केलेली आहे. माझी महाराष्ट्रातील तमाम गड किल्ले प्रेमींना विनंती आहे एकदा तरी या अंतुर किल्ल्याला नक्कीच भेट दया ...

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Tuesday, 25 February 2020

चंद्रेश्वर मंदिर ,चांदवड

चंद्रेश्वर, रेणूकामातेच्या कृपाछायेतील, चंद्रहास राजाचे चांदवड ....

खुप वर्षापासून पुणे नाशिक धुळे तसेच मुंबई आग्रा या महामार्गावर सतत प्रवास करण्याचा योग आला परंतु नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या परिसरातील सातमाळा डोंगर रांगेशिवाय काहीच पाहिले नाही. ही पण डोंगर रांग चालत्या गाडीतूनच डोळ्यात साठवायची अन पुढे प्रवास करायचा, जाताना येताना डोंगरावर मंदिर दिसायचे पण कधीच जाणून घेण्याचा पण प्रयत्न केला नाही. बँकेला लागोपाठ तीन सुट्या मिळाल्या होत्या एक दिवस किरण सानप यांच्या शिंगवे गावी जायचे ठरवले अन दोन दिवस शरद पवार माझ्या शब्दात या स्पर्धे विषयी काम करायचे ठरवले..ठरविल्या प्रमाणे सर्व व्यवस्थित पार पडले पण तीन दिवस गेले ते कामातच गेले, असे वाटू लागले. धुळे चे काम उरकले अन मालेगावच्या पुढे आलो होतो. मनात विचार आला आज इथेच कुठे तरी नविन एखादे प्रेक्षणीय स्थळ, किंवा एखाद तीर्थक्षेत्र पाहूनच पुढे जावूयात त्यासाठी मनातल्या मनातच शोधाशोध सुरू झाली तो पर्यंत चांदवड घाटात येऊन पोहचलो, एका चहाच्या टपरीवर चहा घेतला अन त्याच टपरीवाल्याला विचारले? इथे पहाण्यासाठी कोणते धार्मिक किंवा प्रेक्षणीय स्थळ चांगले आहे का? त्याने दूरूनच बोट करून दाखवले इथून एक किलोमीटर अंतरावर गेलात की तीन ठिकाण आहेत. १} चंद्रेश्वर मंदिर, २) रेणूकामाता मंदिर, ३) इच्छापुर्ती गणपती मंदीर ...
एकटाच असल्याने निर्णय सुद्धा मनासारखे घेता येत होते. चांदवडच्या घाटात आलो, डाव्या बाजूलाच चंद्रेश्वर मंदिराचा रस्ता होता. त्यारस्ताने गाडी थेट मंदिरा पर्यंत जात होती. वेडी वाकडी वळणे घेत, गाडीला सुद्धा डोंगरावर चढताना त्रास होत होता. मंदिराच्या पायथ्याशी पोहचलो. भव्यदिव्य कमान प्रत्येकाचे स्वागत करीत होती. तेथून डोंगराच्या कडेला आलो, तेथून चांदवड गाव व तिथली घर खूपच लहान दिसत होती. चंद्रेश्वर मंदिराच्या मागच्या बाजुच्या पाय-याने चढून मंदिरात पोहचलो. गाभा-यात जाऊन महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले आणि बाहेर येऊन बसलो होतो.
तिथे एका खोलीत एक साधू महाराज बसलेले दिसले आता मलाही या मंदिरा बाबत जाणून घ्यायचे होते. थोडीशी तरी माहिती असावी म्हणून खोलीच्या दाराजवळ गेलो. नमो आदेश बाबाजी असे बोललो? बाबांजींनी काहीच न बोलता नजरेने इशारा केला की आत मधे या.

साधू संत भेटता
होई मनोमनी हर्ष
उलगडती कोडी
होई आध्यात्माचा स्पर्श...

आत गेलो बाबांजीचे दर्शन घेतले अन तिथेच बसलो. थोड्यावेळाने बाबांनी मराठीतूनच विचारले कुठून आलात? मी सांगितले भोसरी पुणे येथून आलो. काय कामानिमित्त आलो आहे ते पण सविस्तर सांगितले. आता उत्सुकता लागली होती मंदिराचा इतिहास जाणून घेण्याची, पण बाबांजीकडे पाहिल्यावर धाडसच होईना काही विचारायचे. मनकवडे असल्या सारखे बाबांनीच मंदिराची आख्यायिका  सांगण्यास सुरुवात केली.
चंद्रसेन राज्याचे साम्राज्य असणारी ही चांदवड नगरी याच चंद्रसेन राज्याने या चंद्रेश्वर मंदिराची निर्मिती केली होती. प्राचीन काळी चंद्राला गौतम ऋषींनी शाप दिला होता त्या शापाचे निवारण होण्यासाठी चंद्राने शंकराची पिंड स्थापना करून उपासना केली. या उपासनेमुळे शंकर भगवान प्रसन्न झाले व चंद्रदेव शाप मुक्त झाले. चंद्रामध्ये जी महान शीतलता आहे शांत प्रकाशमय शक्ती आहे त्यामुळेच या क्षेत्राला चंद्रेश्वर हे नाव पडले आहे. ही भूमी पूर्वीच्या काळी मोठी तपोभूमी होती. मोठ मोठया दिव्य ऋषीमुनींनी येथे वास्तव्य केले इथे तपश्चर्या केली. इ. स १६०० ते १७०० साली मोगल सम्राट औरंगजेबाच्या साम्राज्यात तोफांच्या सहाय्याने या भुमी उध्वस्त केली. येथे असलेल्या विविध देवतांची ५२ मंदिरे नष्ट करण्यात आली. या वेळी तपाला बसलेल्या सप्त ऋषींची हत्या करण्यात आली. त्यांच्या समाधी पण तुम्ही पाहून आलात मी हो म्हणालो. पुढे एक दिवस भ्रमंती करीत करीत स्वामी १०८ श्री दयानंद महाराज चांदवड या ठिकाणी आले, त्यांना या पवित्र भुमीचा दुष्टांत झाला त्यावेळी त्यांनी चंद्रेश्वरची पिंड शेणाच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढली. जीर्ण असलेल्या देवालयात त्यांनी मुक्काम केला. त्याच रात्री भगवान शंकराने श्री दयानंद स्वामींना साक्षात दुष्टांत दिला. महाराज श्री दयानंद स्वामींनी या पुरातन स्थानाचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला. शंकराचे कट्टर उपासक व सिद्धयोगी असलेल्या स्वामीं दयानंद महाराजांनी काशीहून शिष्य विद्यानंदजीना बोलवुन सर्व घटना कथन केली. संस्कृतचे अध्ययन अर्धवट सोडून आलेल्या विद्यानंद महाराजांनी होकार दिला. गुरु व शिष्य दोघांनी अपार कष्ट घेऊन या भुमीला नावारूपाला आणले. स्वातंत्र पुर्व काळात प्राचीन चंद्रेश्वरावर परत कळस चढविला. प्रथम चंद्रेश्वर बाबा महाराज दयानंद स्वामींनी चंद्रेश्वराची सेवा केली. या निसर्गाच्या कुशीत बसलेल्या व रमणीय परिसराने नटलेल्या या मनोहर देवालयाला पूर्वीचे वैभव दोघा स्वामींनी प्राप्त करून दिले. तसेच इथे प्रभु रामचंद्रांचे पण पवित्र पावन पाऊल या भुमीला लागले आहेत. त्रेतायुगात प्रभू रामचंद्र वनवासात असताना या नगरीवरून चालले होते. प्रभू रामचंद्र ही एकदा या चंद्रेश्वर मंदिराच्या डोंगरावर वास्तव्यास होते, सीतामाईने इच्छा प्रकट केली की रोडगे करून त्याचा नैव्यद्य चंद्रेश्वराला द्यावा. तेव्हा डोंगरावर पाणी नव्हते म्हणून प्रभू रामचंद्राने बाण मारून पाणी उत्पन्न केले . पुढे लोकांनी ते कुंड व्यवस्थित बांधून घेतले. तेच आज गणेश टाका म्हणून प्रसिद्ध आहे. या गणेश टाक्याचे वैशिष्ट्य म्हणजे या टाक्यातील पाणी कधीच आटत नाही व पाणी अतिशय गोड, थंड व आरोग्यास लाभदायक आहे. चमत्कार म्हणजे जमिनीच्या सपाटीपासून ४०० फुट उंचीवर असूनही तेथे डोंगरावर पाणी कोठून व कसे येते याचा मात्र शोध लागत नाही. बाबाजी सांगत होते अन मी मंत्रमुग्ध होऊन सारं ऐकत होतो. क्षणभर मलाही समाधी लागल्या सारखे झाले. तितक्यात तिथे बाबांजींचे दोन शिष्य आले जेवणाची वेळ झाली आहे बाबाजी आपण चलावं. बाबाजी निघून गेले, मी पुन्हा जाऊन सर्व समाधींचे व चंद्रेश्वराचे दर्शन घेतले.
आजूबाजूचा परिसर पाहिला अन पुन्हा डोंगर उतरून तांबडका नावाच्या डोंगरकड्यावर आलो तिथे रेणुका मातेचे पुरातन मंदिर दिसले. मंदिराच्या   बाहेरच दोन दिपमाळ होत्या भव्य असा पुरातन दरवाजा व शेजारीच एक महाल होता तो महाल अहिल्यादेवी होळकर यांचा होता तो पाहून मंदिरात शिरलो एका कड्याच्या आतमधे हे मंदीर बांधलेले होते. दगडी कमानी व त्यावर सुबक नक्षीकाम इतिहासाची आठवण करून देत होती. मंदिराच्या दोन्ही बाजूने दर्शनाची सुविधा केलेली होती. कड्याच्या एका कपारीत रेणूकादेवीचे मुख असणारी सुंदर घडवलेली मुर्ती होती तिचे दर्शन घेतले अन दुस-या बाजूने बाहेर पडलो या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी १७४० मध्ये केला होता. ही रेणुका माता ही चांदवडची ग्रामदेवता आहे तसेच पंचक्रोशीचे श्रद्धास्थान आहे.
तेथूनच हायवेच्या पलिकडे अर्धा किलोमीटरवर ३०० वर्षापूर्वीचे इच्छापुर्ती गणेशाचे मंदीर आहे. तिथे पोहचलो सुंदर एका टेकडीच्या कुशीत हे मंदिर उभारलेले आहे. मंदिरात खुपच गर्दी होती. मंदिराच्या सभामंडपात उभा राहून थोडावेळ थांबलो, प्रत्येक भक्तगण आपल्या इच्छा गणेशाला सांगताना दिसत होते. मी मुख्य मंदिरात गेलो तर एक वेगळीच गणपतीची मुर्ती दृष्टीस पडली या अगोदर कधीच अशी मुर्ती मी पाहिली नव्हती. दर्शन घेतले प्रदक्षिणा घातली. अनेक भक्त तिथे नवस फेडायला आलेले पण दिसत होते. विघ्नहर्त्याचे हे वेगळं रूप पाहून मन आनंदी झाले. क्षणभर विसावा घेतला, अन पुढच्या प्रवासाला निघालो....

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ!
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा!

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
२३/२/२०२०

Thursday, 20 February 2020

वासोटा, व्याघ्रगड. संदीप राक्षे

मोहीम रौद्रसुंदर अनोख्या वनदुर्गाची व्याघ्रगड ,वासोटाची! संदीप राक्षे

निसर्गरम्य खेड तालुका या गृपच्या माध्यमातून दि १५ व १६ फेब्रुवारी २०२० रोजी वासोटा किल्ला मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत अजित आरूडे, अशोक कोरडे, ज्योती राक्षे, दिगंबर शिंदे, उपसरपंच कुलदीप वाळुंज, हर्षद पाटोळे, मयुर गोपाळे, विशाल दरेकर, समीर वाळुंज, स्वप्निल आढारी, अतुल बार्वेकर, महादेव शेळके, ओंकार रौंधळ, सौरभ फदाले, सायली घुले, रेवती कोहिनकर, अभिषेक बनकर, रूपेश भालसिंगे, जोत्स्ना मिंढे, अक्षय वाजे, किरण मांजरे, सागर वायदंडे, आदेश काळे, संतोष भोसले, वैशाली भोसले, गोरे सर, नयन देवकर, सहाणे सर, किराटी, प्रगती गोपाळे, दुर्योधन लवटे, सुरज नालगुणे, वैभव कोकीळ, वैभव बर्गे, अभिनव आरूडे, आदित्य कोरडे यांनी सहभाग घेतला होता. शनिवारी रात्री खेड राजगुरू नगर हून गाडी रात्री अकरा वाजता भोसरीला आली अन तेथून आमचा प्रवास साता-याच्या दिशेने सुरू झाला. यावेळी आयोजक किशोरदादा राक्षे नव्हते त्यांनी सर्व जबाबदारी रोहित बोरूडे व वर्षा चासकर यांच्या कडे सोपवली होती. या दोघांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली आम्ही पहाटे चार वाजता बामणोली या गावात पोहचलो, पहाट गारव्याने गावकरी व मोहिमेवर आलेले अनेक जण शांत झोपी गेलेले होते. दूरवरून कोंबड्याची पहाटेची बांग व पाणवठ्यावर आलेल्या जंगली जनावरांचा आवाज मात्र कानावर पडत होता. एक तास आम्ही गाडीतच बसून काढला. क्षितिजावरील अंधाराची झालर दूर होऊन प्रकाशाची उधळण सुरू झाली होती. जिथे आमच्या नास्त्याची व प्रातःविधी उरकण्यासाठी सोय केलेली होती त्या हाॅटेलवर पोहचलो, प्रात:विधी व नास्ता उरकला सोबत तेथूनच जेवणाचे डबे घेतले कारण वासोटा किल्यावर कसलीच सुविधा नव्हती.
बरोबर आठ वाजता वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी आमची बोट बामणोली येथील शिवसागराच्या किनारी लागली होती. वनअधिकारींनी तिथेच आमची तपासणी केली, प्लॅस्टिक किती व इतर साहित्य किती याचे मोजमाप झाले अन आम्ही बोटीत चढलो. सुर्य देवाचे आगमन होऊन पुर्ण जलाशय सुर्याच्या किरणांनी सुवर्णमयी झाला होता. जस जसा सुर्य वर येत होता तस तसा पाण्याचा रंग बदलत होता. बोट सुरू झाली निळेशार पाणी कापत बोट पुढे पुढे चालू लागली. चारी बाजूला घनदाट व हिरवीगार डोंगराईने जणु काही आपल्या कुशीत या कोयना जलाशयाला घेतले आहे, माता आणि पुत्र या प्रमाणे हे चित्र भासत होते. हवेतील गुलाबी गारवा अन जलाशयातील तुषार अंगावर पडून रोमांचित करीत होते.

निळेगर्द,निळसर शिवसागराचे पाणी
ओठांवर अवतरली मनातली गाणी
चोहोबांजूनी हिरवाईची मोहीनी
भासे हा क्षण जणू स्वर्गाच्या वाणी..

नीलरंगी रंगले अशी अवस्था बोटीतल्या प्रत्येकाचीच झाली होती, बरेचसे अंतर कापीत बोट एखाद्या  गुहेत आल्या सारखे वाटले, अद्भुत निळा प्रकाश चोहीकडे पसरला होता. आभाळ निळेसार झाले होते त्याचे प्रतिबिंब शिवसागर जलाशयाच्या पाण्यावर पडून खाली निळं पाणी अक्षरश: लखलखत होतं. त्या निळाईला एक विलक्षण चंदेरी झळाळी होती. या अद्भुत अंतरंगाचा अनुभव घेऊन थोडा विचार मग्नतेतून बाहेर पडतो ना पडतो तोच
जलाशयाच्या क्षेत्रात सुमिश्रीत विविध रंग संगतीचे चित्ताकर्षक सौंदर्याचे व मनोहरी लयबध्दतेचे नानाविविध जातीचे सुंदर पक्षी सहज नजरेस पडत होते, कदाचित जलाशयातील माशांचा घास घेण्यासाठी यांची तडपड सुरू असावी. इतक्यात एका बाजूला काहीतरी हलचल झाली, म्हणून लक्ष तिकडे वळवले तर एका किंगफिशर पक्ष्याला शिकार सापडली अन तो चोचीत घेऊन आमच्या समोरून मोठ्या तो-यात उडून पण गेला.
५० मिनिटांचा बोटिंगचा प्रवास करून आम्ही आता वासोट्याच्या जवळ पोहचलो होतो. बोटी मधून खाली उतरलो अन समोर पाहिले तर दूर वर उंचावर अस्पष्ट असा वासोटा किल्ला दिसत होता. आम्ही सर्वजण चेक नाक्यावर पोहचलो तिथे वनअधिकारी प्रत्येकाची पुन्हा तपासणी करीत होते. सोबत असलेल्या प्रत्येकाच्या बँग्ज चेक करीत होते, सोबत आणलेल्या प्रत्येक वस्तूंचे टिपण करीत होते. आमच्या गृपची तपासणी पुर्ण झाली अन आम्ही सर्वजण वासोटा किल्लाकडे मार्गस्थ झालो.
जंगलाची सीमाभिंत पार करून आता आलो तर आजूबाजूला फुलपाखरांची शाळाच भरली होती दोन मिनिटं थबकून गेलो त्या फुलपाखरांचा फोटो व व्हिडिओ काढण्याचा मोह आवरला नाही. माझ्या अगोदर रोहितदादा बोरूडे हे त्यांच्या कॅमे-याने प्रत्येक बागडणारे फुलपाखरू टिपत होते.
या फुलपाखरांच्या मधे ब्ल्यू मॉर्मन (नीलवंत) या जातीच्या फुलपाखरांची संख्या अधिक दिसत होती. या फुलपाखराचे शास्त्रीय नाव पॅपिलिओ पॉलिम्नेस्टर आहे. हे फुलपाखरू संपूर्ण महाराष्ट्रात व दक्षिण भारतातील वनांत आणि श्रीलंका या ठिकाणी आढळते तसेच मुंबई, नागपूर, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमध्येही त्यांचा वावर आढळतो. त्याचा पंख विस्तार १५० मिमी. असतो. शरीर आणि पंख काळे असून दोन्ही पंखांवर निळे ठिपके असतात. मागच्या पंखांच्या खालील बाजूस शरीरा कडील टोकावर लाल ठिपका असतो. काळ्या पंखावरती निळी चकाकी दिसून येते. हे फुलपाखरू वेगाने फुलांवर संचार करीत असते. २०१५ मध्ये या फुलपाखराला ‘महाराष्ट्र राज्य फुलपाखरू’ असा दर्जा देण्यात आला आहे. या फुलपाखरांना पासून मला ग.ह.पाटील यांची कविता आठवली..

छान किती दिसते ! फुलपाखरू
या वेलींवर ! फुलांबरोबर
गोड किती हसते ! फुलपाखरू

पंख चिमुकले ! निळेजांभळे
हलवूनी झुलते ! फुलपाखरू

डोळे बारीक ! करिती लुकलुक
गोल मणी जणु ते ! फुलपाखरू

मी धरू जाता ! येई न हाता
दूरच ते उडते ! फुलपाखरू

वाटेतच भल्या मोठ्या दगड गोट्यांनी सजलेला ओढा दिसला असे वाटत होते मानव निर्मित असेल, इतकी तंतोतंत मांडणी होती. पण तसे नव्हते ही रचना निसर्गनिर्मितच होती. ठिकठिकाणी पाणी होते, अजून झरे सुरूच होते. आजूबाजूला पाण्याचा खळखळाट ऐकू येत होता, त्यामुळे  मन शांत झाले होते.
सकाळचे अकरा वाजले होते त्यामुळे उन्हाचा कडाका जास्त लागल्याने, व थोडे चालून आल्याने डोके तापले होते. मस्त एका झ-या जवळ जावून डोक्यावर व तोंडावर पाण्याचे सपकारे मारले, फ्रेश झालो. पुढचा प्रवास खुप कठीण होता. घनदाट झाडीतून पाऊल वाट होती, त्या पाऊल वाटेची सीमा ओलांडायला पण परवानगी नव्हती कारण हे जंगल हिंस्त्र प्राण्यांनी खच्चून भरलेले होते. या जंगलात वाघ, बिबटे, सांबर, अस्वल, रानडुक्कर, ससा, हरिण, भेकर असे अनेक प्राणी आढळतात त्याच बरोबर असंख्य सरपटणा-या प्राण्यांची संख्या विशेष आहे. तसेच विविध जातीचे पक्षी, दुर्मिळ जातीचे पक्षी या जंगलात आहे. फुलपाखरांच्या सोबत मधमाश्या भरपूर प्रमाणात आहेत. रानमेवा रानफुल असंख्य वृक्षांनी बहरलेले हे वासोटा जंगल निसर्गाची मांदियाळीच जणू,
डोक्यात वासोटा पारायणं सुरू असतानाच आमच्या सोबत चालत असणा-या वाटाड्याने सर्वांना एका झाडा जवळ बोलवले अन एका झाडाकडे बोट केले तर त्या झाडाला असंख्य ओरखडण्याच्या खुणा दिसत होत्या तो म्हणाला? हे अस्वलाच्या नखांचे ओरखडे आहे. खुप खोलवर त्या झाडाला खड्डे पडलेले दिसत होते. शंभरफूट वाढलेल्या वृक्षांची एवढी दाटी होती की ऊन असूनही एक तिरीपही वाटेवर येत नव्हती. आता थोडी भिती वाटत होती कधी हे जंगल पार करतो असे झाले होते. एक तासाचा सपाट पण घनदाट जंगलाचा प्रवास करून आम्ही वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचलो होतो. इथून सुमारे ४२६७ फुट उंचावर वासोटा किल्ला होता. सुर्यदेव माथ्यावर आले होते, उन्हाची तीव्रता वाढले होती. त्यात आता सपाटी संपून चढाई सुरू झाली होती. किल्यावर चढण्यासाठी कोकणातील जांभ या दगडांचा वापर करून पाय-या बनविण्यात आल्या होत्या. कधी पाय-या तर कधी दगड गोटयांवरून चढाई सुरू होती, संपूर्ण शरीर घामाने चिंब झाले होते. दम लागत होता. पण हळूहळू चालत होतो. वाटेच्या दोन्ही बाजूंनी वडाच्या झाडा सारखी खुप झाडे होती त्या झाडाच्या पारंब्यांनी नैसर्गिक असे झोके तयार झाले होते. दमलो की एखाद्या झाडाच्या झोक्यावर जावून बसायचो, मस्त झोके घ्यायचो. झोके घेता घेता लहानपणीच्या आठवणीत रमायचो.

एक झोका, चुके काळजाचा ठोका
उजवीकडे डावीकडे
डावीकडे उजवीकडे
जरा स्वतःलाच फेका |१|
नाही कुठे थांबायचे
मागेपुढे झुलायचे
हाच धरायचा ठेका |२|
जमिनीला ओढायचें
आकाशाला जोडायचें
खूप मजा, थोडा धोका |३|

गायिका आशाताई भोसले यांनी गायलेले संगीतकार  आनंद मोडक यांनी संगितबद्ध केलेलं आणि गीतकार सुधीर मोघे यांनी लिहिलेलं चौकट राजा या चित्रपटातील गीत हुबेहुब या वातावरणाला लागू पडलं होत. एव्हाना सोबत आलेले सगळेच जण आता पुढे निघून गेले होते. माझ्या सोबतीला अजित आरूडे, अशोक कोरडे, रोहित बोरूडे, दिगंबर शिंदे, वर्षा चासकर, अभिनव व आदित्य हे होते. दिड ते दोन तासांच्या खड्या चढाईचा प्रवास करून आम्ही किल्यावर पोहचलो, समोरच छप्पर नसलेले पडके मारूतीचे मंदीर होते तिथे जाऊन मारूतीरायाचे मनोभावे दर्शन घेतले खुप दमलो असल्याने मारूतीच्या बाहेर चौथा-यावरच बैठक मारली, आजूबाजूला प्रत्येक जण सोबत आणलेल्या डब्यावर इथेच्छ ताव मारीत होता. कारण वाटेत ना पाणी ना खाण्यासाठी काही त्यात इतकी अवघड चढाई सर्वच भुकलेले होते. थोडावेळ बसलो अंगातील घामाच्या धारा कमी झाल्या होत्या ब-या पैकी छातीचा भाता आता पूर्ववत झाला होता. समोरच किल्याच्या उत्तरेला असणारं हे जुनं पुराणं जीर्ण झालेलं महादेवाचं मंदिर अजुन सुस्थितीत दिसत होते. आम्ही सर्वजण मंदिरात गेलो, भग्न झालेली महादेवाची पिंड दिसत होती तिला नमस्कार केला. त्या मंदिराच्या समोरून पुढे आलो, एका दगडी कमानातून वाकून पुढे सरसावलो, तिथे मोकळी जागा म्हणजे कोठडी होती. तेच अजब अस ओपन जेल होतं. सिद्दी जौहरला मदत करून मराठय़ांना दगा देणाऱ्या टोपीकरास छत्रपती शिवाजी महाराजांनी इथेच डांबून ठेवलं होतं. ते पाहून आम्ही पुढे उत्तर टोकावर आलो होतो. समोरच दिसत असलेला उत्तुंग नागेश्वराचा फणा असलेला सुळका न्याहाळात बसलो, क्षणभर वाटायचे नागेश्वराला जावून यावं पण थकल्याने कुठेच जायची इच्छा होत नव्हती दूरून नमस्कार केला. नागेश्वराची गुहा स्पष्ट दिसत होती. त्यांच्या समोरच अजून एक सुळका दिसत होता त्याला तुळशी वृंदावन किंवा ठेंगा म्हणतात, अनेक कातळकडे पाहून वेगळाच थरार अनुभवत होतो. आता भुकेने व्याकुळ झालो होतो किल्याचा अर्धाभाग पाहून महादेव मंदिराच्या शेजारीच असणा-या तळ्यावर हात धुतले, पाणी बर्फा पेक्षाही थंडगार होते ही सारी निसर्गाची किमया होती. एका झाडाखाली आम्ही सोबत आणलेले डबे सोडले, दरवेळच्या ट्रेक प्रमाणे यावेळी सुनिताताई आरूडे यांनी चपत्या आणि शेंगदाण्याची चटणी दिली होती भुकेच्या तडाख्यात सर्वच जेवण संपवून टाकले. झाडाखाली गारवा मस्त लागत होता त्यामुळे आम्ही निवांत बसलो आजूबाजूला मोहीमेसाठी आलेले तरूण आणि त्यांनी सोबत आणलेले गाईड मुलांना किल्याची सविस्तर माहिती देत होते..
किल्ल्याच्या एका अंगाला अरण्य तर दुसऱ्या अंगाला पातळात खोल गेलेले कडे म्हणूनच या किल्याला छ शिवाजी महाराजांनी व्याघ्र गड असे नाव दिले याला वनदुर्ग सुद्धा म्हणतात. शिलाहार राजांनी या गडाची निर्मिती केली. यानंतर तो शिर्के मोरे घराण्याकडे काही काळ होता. इ.स १६६० मध्ये जावळी बरोबर हा कोयनेचा वाघ स्वराज्यात सामील झाला. बराच काळ या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला गेला. हंटर आणि मॉरिसन या बड्या इंग्रज अधिकाऱ्यांनाही वासोट्याच्या या तुरुंगाची हवा खावी लागली होती. ज्ञानेश्वरीत एका ठिकाणी "वसौटा" असा शब्द आलेला आहे त्याचा अर्थ आश्रयस्थान असा सांगितला जातो. म्हणूनच या कोयनेच्या वाघाला आश्रयस्थान असल्याने वासोटा हे नाव पडले. अशी त्या गाईड कडून पुसटशी माहिती ऐकून आम्ही किल्यावर असणा-या राजवाड्याकडे निघालो. राजवाड्याचा फक्त पाया व्यवस्थित होता बाकीचे काहीच शिल्लक नव्हते.
वाड्याच्या मागेच पश्चिम टोकावर म्हणजेच अद्भुत  कोकणकडय़ावर आम्ही निघालो. काही अंतर चालून आल्यावर वाटेत दगडी चुन्याचा घाणा अजूनही सुस्थितीत होता. पुढे दोन पाण्याचे टाके होते निळेशार पाणी त्या टाक्यात दिसतं होते ते पाहून आम्ही बाबू कड्यावर पोहचलो, निळ्या रंगाच्या अनेक विविध छटा धारण केलेल्या असंख्य डोंगररांगा कोकणभूमीकडे धावत आहेत असे दिसत होते. गडाच्या दक्षिण टोकावर अजस्त्र, महाकाय हे शब्दही खुजे पडावेत असा जुना वासोटा आपला ताशीव कडा मिरवत उभा दिसत होता. गंमत अशी की छातीत धडकी भरवणाऱ्या या कडय़ाचे नाव ‘बाबू कडा’ असे आहे. तिथे एकदा आवाज दिला की त्याचे चारवेळा प्रतिध्वनी उमटत होते. जुन्या वासोटाची सीमाभिंत दिसत होती त्या किल्यावर जाण्यासाठी बंदी आहे म्हणूनच दूरूनच त्याचे विक्राळ रूप पाहिले मनसोक्त फोटो काढले. वासोट्याचे चैतन्यरूप तनामनात साठविले, आता पुन्हा बामणोलीला  परतायचे होते त्यात हा कठिण किल्ला उतरायचा होता. एक एक पायरी उतरताना पोट-यांना गोळे येत होते, कधी कधी दगड गोट्या वरून घसरत होतो, स्वताला सावरत होतो. दुरूवरून एका वेगळ्याच पक्षाच्या शिळेचा आवाज कानावर पडत होता. पण कानावर पडणारा आवाज थकलेल्या जीवाला उर्जा देत होता. घनदाट जंगलात अनेक औषधी वनस्पती होत्या त्यांचा सुगंध दरवळत तसे मन पण उत्साहाने भरून जाई खरच वासोटा हा वेगळा अनुभव होता. कारण इथली शिस्त खूप आवडली होती. अनेक ठिकाणी गड किल्यांचा होत असलेला -हास अशा नियमांनी थांबणारा होता. ना कुठे प्लॅस्टिक दिसले अन ना कुठे कचरा नियमांच्या मुळे लोकांना पण चांगली सवय लागली हे पाहून समाधान वाटले. खरतर गडकिल्ले हे आपले वैभव आपल्या शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या भूमी म्हणजे आपल्यासाठी स्मारकच ते अद्भुत असे मंदीरच या शिवमंदीरांची जपणूक करणे हे महाराष्ट्रातील प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. एक एक किल्ला पूर्ववत करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत, मंदीर सप्ताह या खर्चात पडण्यापेक्षा आपल्या शिवशंभूच्या या वास्तू उभ्या करण्यासाठी मदत करायला हवी. आपले हेच गड किल्ले जगासाठी  प्रेरणास्त्रोत्र बनतील यात शंकाच नाही.  आजही प्रत्येक गड किल्यावर वेगळीच उर्जा मिळते कारण आपल्या राजाचा सहवास या गड किल्यांना लाभला आहे. या अभेदय गड किल्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्षण केले आहे. असा हा सह्याद्री टिकला पाहिजे, जपला पाहिजे. किल्ला उतरत होतो पण या विचारांत गर्क झाल्याने कधी वासोटा किल्ला उतरलो याचे भानच राहिले नाही. पुन्हा चेक नाक्यावर जेवढे सोबत घेऊन गेलो होतो तेवढे सोबत आणले हे दाखवले तेव्हाच सर्वांना सोडले पुन्हा दिड तासांचा बोटींगचा प्रवास करून बामणोलीला पोहचलो..घामाने चिंब झालेले शरीर ऊन आणि प्रवासाने तापलेले शरीर, थंडगार तर करायलाच हवे म्हणून मस्त शिवसागरात पोहण्याचा मनसोक्त  आनंद घेतला अन आलेला शीण कुठल्या कुठे पळून गेला.

वासोटा दुर्ग दुर्गम जरी!
असला व्याघ्रगड तरी!
वन्यजीवांनी समृद्ध परी!
वनदुर्ग म्हणून किर्ती उरी!

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Thursday, 6 February 2020

स्वागताध्यक्ष

स्वागताध्यक्ष भाषण
साहित्यकणा साहित्य संमेलन नाशिक

5 व्या साहित्यकणा फाऊंडेशनच्या  साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष म्हणून या समर्थ मंगल कार्यालय नाशिक येथे उपस्थित असलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचे हार्दिक स्वागत करताना मला मनस्वी आनंद होत आहे. मराठी मायमाऊलीच्या पुढे नतमस्तक होऊन ज्ञानोबा आणि तुकोबाला साष्टांग दंडवत घालून मी या सारस्वताच्या मेळाव्यात आणि एक प्रकारच्या साहित्य पंढरीत आपल्या सर्वाचे अत्यंत मनापासून स्वागत करतो. या साहित्य संमेलनाचे उद्घाटक डाॅ. वेदश्री थिगळे, साहित्य काव्य संमेलनाध्यक्ष शिलाताई गेहलोत, प्रमुख पाहुणे डाॅ शंकरजी बो-हाडे, घनश्याम पाटील, उद्धवजी अहिरे, डाॅ. राहुल पाटील, किरण भावसार, संदीप चव्हाण तसेच या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन करणारे आमचे मित्र रविंद्र मालुंजकर यांचे पण मनःपूर्वक स्वागत करतो.
मराठीची पताका खांद्यावर घेऊन या नाशिक महानगरीत ही जी मांदियाळी इथे जमली आहे, ती गोदावरी काठावरचीच साहित्यगंगा आहे. या साहित्यगंगेत माझ्यासारख्या सामाजिक सांस्कृतिक व कला क्षेत्रातल्या छोटया कार्यकर्त्यांला स्वागताध्यक्ष होण्याचा जो बहुमान आपण मला एकमताने दिलात, याबद्दल मी अध्यक्ष संजयजी गोराडे, सचिव विलासराव पंचभाई, सहसचिव सुरेखाताई बो-हाडे, सल्लागार रावसाहेब जाधव, पुजाताई बागूल यांचा अंत:करणापासून ऋणी आहे.
आयुष्यात यश आणि अपयशाचे अनेक टप्पे असतात, ते सर्व पार करून जाताना कधी यश मिळते, कधी अपयश मिळते, कधी सुखाचे दिवस असतात. कधी अडचणीचे दिवस असतात. आज मी असे मानतो की स्वागताध्यक्ष पदाचा बहुमान करून, माझ्या आयुष्यातील अत्यंत सन्मानाचा असा दिवस मला पाहायला मिळाला. त्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.

इवलेसे रोप लावियेले द्वारी। त्याचा वेलू गेला गंगनावरी

संजयराव गोराडे सरांनी साहित्यकणा फाऊंडेशनचे पाच वर्षापूर्वी लावलेले साहित्यसंस्थेचे हे रोपटे आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. साहित्यकणा फाऊंडेशन आता सर्वच क्षेत्रात भरारी घेत आहे. या संस्थेचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात आहे, हे फक्त संजय गोराडे सरांच्या मुळे, निखळ मनाचा साधा माणूस, षंढरिपूंचा थोडा सुद्धा प्रादूर्भाव या माणसावर जाणवत नाही, पुसटसाही ही दिसत नाही. त्यामुळे निस्वार्थ, सहदयी, मनमोकळा, मनमुराद आनंद लुटणारा अन इतरांनाही आनंद देणारा साहित्याचा पुजारी अन संत माणूस म्हणजेच संजयजी गोराडे सर, परंतु हे सर्व करताना पाठीवर लढ म्हणण्याची ताकद देणारा पण हवा असतो अन तो पाठीवरचा हात तसेच खंबीर साथ देणारे विलासजी पंचभाई..

खरतर कविता अन लेखन शिकलो ते साहित्यकणा फाऊंडेशन या समुहात सहभागी झाल्यावर ख-या अर्थाने साहित्याचा प्रवास सुरू झाला.
कविता ही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे हे कधीच उमगलं नाही. काव्य हे आपले आंतरिक प्रेरणास्थान आहे हे जाणवलं पण नाही. त्यामुळे या अगोदर कविता म्हणजे काय हा प्रश्न सारखा सतवायचा. अनेक दिग्गज साहित्यिकांच्या कविते बद्दलच्या व्याख्या ऐकल्या, निःशब्दाला शब्दरूप करणारे साधन, मनाचे विविध भावतरंग उमटविणारे काव्य, भावनांचा उस्फूर्त आणि अद्भुत आविष्कार, सृजनशील आत्म्याचा उच्चार' अशा अनेक व्याख्या ऐकल्या परंतु कवितेची हीच ओळख आहे का? आणि लक्षात आले, जी कविता ओळखण्याचा आपण सतत प्रयत्न करत आहोत, ती कविता आपल्याला फार पूर्वीपासून ओळखीची आहे, अगदी कळायला लागण्या आधीपासून  'काऊ ये, चिऊ ये ' म्हणत कवितेनेच पहिला घास भरवला. जात्यावरच्या ओव्यांनी पहाटेची सुरवात झाली, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई हे अंगाई गीत गाऊन निजवले, शाळेत कविता भेटली ती तुकडोजी महाराजांची या झोपडीत माझ्या त्यामुळे जीवनाच्या जाणिवांचे आणि नेणिवांचे पदर उलगडत कळीचे फूल झाले. मनावर संस्काराचे बीज रूजले ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदाने, संत तुकाराम महाराजांच्या मार्गदर्शनपर ओव्यांनी, दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे मंगेश पाडगावकरांची ही रचना अजूनही उर्जा देऊन जाते, किसीकी मुस्कराहटो पे हो निसार किसीका दर्द मिल सके तो ले उधार शैलेंद्र यांनी लिहीलेली ही रचना सामाजिक बांधिलकीचे भान देऊन जायची.
कवितेने शिकवण्यापेक्षाही शहाणे आणि सुजाण केले. कवितेने भारावून जाऊनच आम्ही मित्रांनी कितीतरी मनोरथे रचली. कधी वाटे घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात व्हावे, आकाशी झेप घे रे पाखरा ही रचना ऐकून तर अक्षरशः आकाशात झेप घ्यावी अस वाटायंच,  किती वचने टिकली माहित नाही पण कवितेने स्वप्न बघायला शिकवले. कवितेने आयुष्यातल्या प्रत्येक अवस्थेत साथ दिली. आयुष्याच्या संध्याकाळी “आयुष्य कसे जगायचे, कण्हत कण्हत की गाणे म्हणत या आशादायी दृष्टीकोनाने उभारी दिली. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कविता दीपस्तंभासारखी पाठीशी उभी राहिली. कधी मित्र म्हणून, कधी गुरू म्हणून, कधी पालक म्हणून, कधी मार्गदर्शक म्हणून, त्या मुळे  कवितेशी एक ऋणानुबंध तयार झाले आहे. म्हणूनच कदाचित कविता म्हणजे काय हे सांगता येणे कठीण आहे. कारण नात्याची फक्त अनुभूती घेता येते, शब्दात मांडता येत नाही. चार भिंती, एक छप्पर, दरवाजा, खिडकी घराला असते ते घर या व्याख्येत, मनातले घर बसत नाही. तसंच कविता कुठल्याही व्याख्येत बसवता येत नाही. कवितेच्या अनेक नात्यांप्रमाणे तिची रुपेही अनेक आहेत. कविता हा केवळ आत्म्याचा उच्चार नाही तर एक अविष्कार आहे. एखादा कवी, गझलकार स्वप्नाचे बीज रुजवतो, भावनेच्या ऊबेत जोपासतो, विचारांच्या कोषांचे आवरण घालतो, त्यातून जे सुंदर फुलपाखरू बाहेर येते त्याला कविता असे म्हणतात....

स्वागताध्यक्ष भाषणाच्या शेवटी गुरू ठाकूर यांची एक अप्रतिम रचना सादर करतो आणि माझे भाषण संपवतो...

असे जगावे दुनियेमध्ये,
आव्हानाचे लावुन अत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..

पाय असावे जमिनीवरती,
कवेत अंबर घेताना,
हसू असावे ओठांवरती,
काळीज काढुन देताना..

संकटासही ठणकावुन सांगावे,
आता ये बेहत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..

करुन जावे असेही काही,
दुनियेतुनी या जाताना,
गहिवर यावा जगास सा-या,
निरोप शेवटचा देताना..

स्वर कठोर त्या काळाचाही,
क्षणभर व्हावा कातर कातर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर...

जय साहित्य जय साहित्यकणा

संदीप राक्षे ✍🏻
स्वागताध्यक्ष
साहित्यकणा साहित्य संमेलन

सत्य संकल्पाचा दाता! आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा!

सत्य संकल्पाचा दाता! आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा.. संदीप राक्षे✍🏻 संत तोचि जाणा!  जो देही उदार!! म्हणजे खरा संत तोच ...