Tuesday, 25 February 2020

चंद्रेश्वर मंदिर ,चांदवड

चंद्रेश्वर, रेणूकामातेच्या कृपाछायेतील, चंद्रहास राजाचे चांदवड ....

खुप वर्षापासून पुणे नाशिक धुळे तसेच मुंबई आग्रा या महामार्गावर सतत प्रवास करण्याचा योग आला परंतु नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या परिसरातील सातमाळा डोंगर रांगेशिवाय काहीच पाहिले नाही. ही पण डोंगर रांग चालत्या गाडीतूनच डोळ्यात साठवायची अन पुढे प्रवास करायचा, जाताना येताना डोंगरावर मंदिर दिसायचे पण कधीच जाणून घेण्याचा पण प्रयत्न केला नाही. बँकेला लागोपाठ तीन सुट्या मिळाल्या होत्या एक दिवस किरण सानप यांच्या शिंगवे गावी जायचे ठरवले अन दोन दिवस शरद पवार माझ्या शब्दात या स्पर्धे विषयी काम करायचे ठरवले..ठरविल्या प्रमाणे सर्व व्यवस्थित पार पडले पण तीन दिवस गेले ते कामातच गेले, असे वाटू लागले. धुळे चे काम उरकले अन मालेगावच्या पुढे आलो होतो. मनात विचार आला आज इथेच कुठे तरी नविन एखादे प्रेक्षणीय स्थळ, किंवा एखाद तीर्थक्षेत्र पाहूनच पुढे जावूयात त्यासाठी मनातल्या मनातच शोधाशोध सुरू झाली तो पर्यंत चांदवड घाटात येऊन पोहचलो, एका चहाच्या टपरीवर चहा घेतला अन त्याच टपरीवाल्याला विचारले? इथे पहाण्यासाठी कोणते धार्मिक किंवा प्रेक्षणीय स्थळ चांगले आहे का? त्याने दूरूनच बोट करून दाखवले इथून एक किलोमीटर अंतरावर गेलात की तीन ठिकाण आहेत. १} चंद्रेश्वर मंदिर, २) रेणूकामाता मंदिर, ३) इच्छापुर्ती गणपती मंदीर ...
एकटाच असल्याने निर्णय सुद्धा मनासारखे घेता येत होते. चांदवडच्या घाटात आलो, डाव्या बाजूलाच चंद्रेश्वर मंदिराचा रस्ता होता. त्यारस्ताने गाडी थेट मंदिरा पर्यंत जात होती. वेडी वाकडी वळणे घेत, गाडीला सुद्धा डोंगरावर चढताना त्रास होत होता. मंदिराच्या पायथ्याशी पोहचलो. भव्यदिव्य कमान प्रत्येकाचे स्वागत करीत होती. तेथून डोंगराच्या कडेला आलो, तेथून चांदवड गाव व तिथली घर खूपच लहान दिसत होती. चंद्रेश्वर मंदिराच्या मागच्या बाजुच्या पाय-याने चढून मंदिरात पोहचलो. गाभा-यात जाऊन महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले आणि बाहेर येऊन बसलो होतो.
तिथे एका खोलीत एक साधू महाराज बसलेले दिसले आता मलाही या मंदिरा बाबत जाणून घ्यायचे होते. थोडीशी तरी माहिती असावी म्हणून खोलीच्या दाराजवळ गेलो. नमो आदेश बाबाजी असे बोललो? बाबांजींनी काहीच न बोलता नजरेने इशारा केला की आत मधे या.

साधू संत भेटता
होई मनोमनी हर्ष
उलगडती कोडी
होई आध्यात्माचा स्पर्श...

आत गेलो बाबांजीचे दर्शन घेतले अन तिथेच बसलो. थोड्यावेळाने बाबांनी मराठीतूनच विचारले कुठून आलात? मी सांगितले भोसरी पुणे येथून आलो. काय कामानिमित्त आलो आहे ते पण सविस्तर सांगितले. आता उत्सुकता लागली होती मंदिराचा इतिहास जाणून घेण्याची, पण बाबांजीकडे पाहिल्यावर धाडसच होईना काही विचारायचे. मनकवडे असल्या सारखे बाबांनीच मंदिराची आख्यायिका  सांगण्यास सुरुवात केली.
चंद्रसेन राज्याचे साम्राज्य असणारी ही चांदवड नगरी याच चंद्रसेन राज्याने या चंद्रेश्वर मंदिराची निर्मिती केली होती. प्राचीन काळी चंद्राला गौतम ऋषींनी शाप दिला होता त्या शापाचे निवारण होण्यासाठी चंद्राने शंकराची पिंड स्थापना करून उपासना केली. या उपासनेमुळे शंकर भगवान प्रसन्न झाले व चंद्रदेव शाप मुक्त झाले. चंद्रामध्ये जी महान शीतलता आहे शांत प्रकाशमय शक्ती आहे त्यामुळेच या क्षेत्राला चंद्रेश्वर हे नाव पडले आहे. ही भूमी पूर्वीच्या काळी मोठी तपोभूमी होती. मोठ मोठया दिव्य ऋषीमुनींनी येथे वास्तव्य केले इथे तपश्चर्या केली. इ. स १६०० ते १७०० साली मोगल सम्राट औरंगजेबाच्या साम्राज्यात तोफांच्या सहाय्याने या भुमी उध्वस्त केली. येथे असलेल्या विविध देवतांची ५२ मंदिरे नष्ट करण्यात आली. या वेळी तपाला बसलेल्या सप्त ऋषींची हत्या करण्यात आली. त्यांच्या समाधी पण तुम्ही पाहून आलात मी हो म्हणालो. पुढे एक दिवस भ्रमंती करीत करीत स्वामी १०८ श्री दयानंद महाराज चांदवड या ठिकाणी आले, त्यांना या पवित्र भुमीचा दुष्टांत झाला त्यावेळी त्यांनी चंद्रेश्वरची पिंड शेणाच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढली. जीर्ण असलेल्या देवालयात त्यांनी मुक्काम केला. त्याच रात्री भगवान शंकराने श्री दयानंद स्वामींना साक्षात दुष्टांत दिला. महाराज श्री दयानंद स्वामींनी या पुरातन स्थानाचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला. शंकराचे कट्टर उपासक व सिद्धयोगी असलेल्या स्वामीं दयानंद महाराजांनी काशीहून शिष्य विद्यानंदजीना बोलवुन सर्व घटना कथन केली. संस्कृतचे अध्ययन अर्धवट सोडून आलेल्या विद्यानंद महाराजांनी होकार दिला. गुरु व शिष्य दोघांनी अपार कष्ट घेऊन या भुमीला नावारूपाला आणले. स्वातंत्र पुर्व काळात प्राचीन चंद्रेश्वरावर परत कळस चढविला. प्रथम चंद्रेश्वर बाबा महाराज दयानंद स्वामींनी चंद्रेश्वराची सेवा केली. या निसर्गाच्या कुशीत बसलेल्या व रमणीय परिसराने नटलेल्या या मनोहर देवालयाला पूर्वीचे वैभव दोघा स्वामींनी प्राप्त करून दिले. तसेच इथे प्रभु रामचंद्रांचे पण पवित्र पावन पाऊल या भुमीला लागले आहेत. त्रेतायुगात प्रभू रामचंद्र वनवासात असताना या नगरीवरून चालले होते. प्रभू रामचंद्र ही एकदा या चंद्रेश्वर मंदिराच्या डोंगरावर वास्तव्यास होते, सीतामाईने इच्छा प्रकट केली की रोडगे करून त्याचा नैव्यद्य चंद्रेश्वराला द्यावा. तेव्हा डोंगरावर पाणी नव्हते म्हणून प्रभू रामचंद्राने बाण मारून पाणी उत्पन्न केले . पुढे लोकांनी ते कुंड व्यवस्थित बांधून घेतले. तेच आज गणेश टाका म्हणून प्रसिद्ध आहे. या गणेश टाक्याचे वैशिष्ट्य म्हणजे या टाक्यातील पाणी कधीच आटत नाही व पाणी अतिशय गोड, थंड व आरोग्यास लाभदायक आहे. चमत्कार म्हणजे जमिनीच्या सपाटीपासून ४०० फुट उंचीवर असूनही तेथे डोंगरावर पाणी कोठून व कसे येते याचा मात्र शोध लागत नाही. बाबाजी सांगत होते अन मी मंत्रमुग्ध होऊन सारं ऐकत होतो. क्षणभर मलाही समाधी लागल्या सारखे झाले. तितक्यात तिथे बाबांजींचे दोन शिष्य आले जेवणाची वेळ झाली आहे बाबाजी आपण चलावं. बाबाजी निघून गेले, मी पुन्हा जाऊन सर्व समाधींचे व चंद्रेश्वराचे दर्शन घेतले.
आजूबाजूचा परिसर पाहिला अन पुन्हा डोंगर उतरून तांबडका नावाच्या डोंगरकड्यावर आलो तिथे रेणुका मातेचे पुरातन मंदिर दिसले. मंदिराच्या   बाहेरच दोन दिपमाळ होत्या भव्य असा पुरातन दरवाजा व शेजारीच एक महाल होता तो महाल अहिल्यादेवी होळकर यांचा होता तो पाहून मंदिरात शिरलो एका कड्याच्या आतमधे हे मंदीर बांधलेले होते. दगडी कमानी व त्यावर सुबक नक्षीकाम इतिहासाची आठवण करून देत होती. मंदिराच्या दोन्ही बाजूने दर्शनाची सुविधा केलेली होती. कड्याच्या एका कपारीत रेणूकादेवीचे मुख असणारी सुंदर घडवलेली मुर्ती होती तिचे दर्शन घेतले अन दुस-या बाजूने बाहेर पडलो या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी १७४० मध्ये केला होता. ही रेणुका माता ही चांदवडची ग्रामदेवता आहे तसेच पंचक्रोशीचे श्रद्धास्थान आहे.
तेथूनच हायवेच्या पलिकडे अर्धा किलोमीटरवर ३०० वर्षापूर्वीचे इच्छापुर्ती गणेशाचे मंदीर आहे. तिथे पोहचलो सुंदर एका टेकडीच्या कुशीत हे मंदिर उभारलेले आहे. मंदिरात खुपच गर्दी होती. मंदिराच्या सभामंडपात उभा राहून थोडावेळ थांबलो, प्रत्येक भक्तगण आपल्या इच्छा गणेशाला सांगताना दिसत होते. मी मुख्य मंदिरात गेलो तर एक वेगळीच गणपतीची मुर्ती दृष्टीस पडली या अगोदर कधीच अशी मुर्ती मी पाहिली नव्हती. दर्शन घेतले प्रदक्षिणा घातली. अनेक भक्त तिथे नवस फेडायला आलेले पण दिसत होते. विघ्नहर्त्याचे हे वेगळं रूप पाहून मन आनंदी झाले. क्षणभर विसावा घेतला, अन पुढच्या प्रवासाला निघालो....

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ!
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा!

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
२३/२/२०२०

Thursday, 20 February 2020

वासोटा, व्याघ्रगड. संदीप राक्षे

मोहीम रौद्रसुंदर अनोख्या वनदुर्गाची व्याघ्रगड ,वासोटाची! संदीप राक्षे

निसर्गरम्य खेड तालुका या गृपच्या माध्यमातून दि १५ व १६ फेब्रुवारी २०२० रोजी वासोटा किल्ला मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत अजित आरूडे, अशोक कोरडे, ज्योती राक्षे, दिगंबर शिंदे, उपसरपंच कुलदीप वाळुंज, हर्षद पाटोळे, मयुर गोपाळे, विशाल दरेकर, समीर वाळुंज, स्वप्निल आढारी, अतुल बार्वेकर, महादेव शेळके, ओंकार रौंधळ, सौरभ फदाले, सायली घुले, रेवती कोहिनकर, अभिषेक बनकर, रूपेश भालसिंगे, जोत्स्ना मिंढे, अक्षय वाजे, किरण मांजरे, सागर वायदंडे, आदेश काळे, संतोष भोसले, वैशाली भोसले, गोरे सर, नयन देवकर, सहाणे सर, किराटी, प्रगती गोपाळे, दुर्योधन लवटे, सुरज नालगुणे, वैभव कोकीळ, वैभव बर्गे, अभिनव आरूडे, आदित्य कोरडे यांनी सहभाग घेतला होता. शनिवारी रात्री खेड राजगुरू नगर हून गाडी रात्री अकरा वाजता भोसरीला आली अन तेथून आमचा प्रवास साता-याच्या दिशेने सुरू झाला. यावेळी आयोजक किशोरदादा राक्षे नव्हते त्यांनी सर्व जबाबदारी रोहित बोरूडे व वर्षा चासकर यांच्या कडे सोपवली होती. या दोघांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली आम्ही पहाटे चार वाजता बामणोली या गावात पोहचलो, पहाट गारव्याने गावकरी व मोहिमेवर आलेले अनेक जण शांत झोपी गेलेले होते. दूरवरून कोंबड्याची पहाटेची बांग व पाणवठ्यावर आलेल्या जंगली जनावरांचा आवाज मात्र कानावर पडत होता. एक तास आम्ही गाडीतच बसून काढला. क्षितिजावरील अंधाराची झालर दूर होऊन प्रकाशाची उधळण सुरू झाली होती. जिथे आमच्या नास्त्याची व प्रातःविधी उरकण्यासाठी सोय केलेली होती त्या हाॅटेलवर पोहचलो, प्रात:विधी व नास्ता उरकला सोबत तेथूनच जेवणाचे डबे घेतले कारण वासोटा किल्यावर कसलीच सुविधा नव्हती.
बरोबर आठ वाजता वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी आमची बोट बामणोली येथील शिवसागराच्या किनारी लागली होती. वनअधिकारींनी तिथेच आमची तपासणी केली, प्लॅस्टिक किती व इतर साहित्य किती याचे मोजमाप झाले अन आम्ही बोटीत चढलो. सुर्य देवाचे आगमन होऊन पुर्ण जलाशय सुर्याच्या किरणांनी सुवर्णमयी झाला होता. जस जसा सुर्य वर येत होता तस तसा पाण्याचा रंग बदलत होता. बोट सुरू झाली निळेशार पाणी कापत बोट पुढे पुढे चालू लागली. चारी बाजूला घनदाट व हिरवीगार डोंगराईने जणु काही आपल्या कुशीत या कोयना जलाशयाला घेतले आहे, माता आणि पुत्र या प्रमाणे हे चित्र भासत होते. हवेतील गुलाबी गारवा अन जलाशयातील तुषार अंगावर पडून रोमांचित करीत होते.

निळेगर्द,निळसर शिवसागराचे पाणी
ओठांवर अवतरली मनातली गाणी
चोहोबांजूनी हिरवाईची मोहीनी
भासे हा क्षण जणू स्वर्गाच्या वाणी..

नीलरंगी रंगले अशी अवस्था बोटीतल्या प्रत्येकाचीच झाली होती, बरेचसे अंतर कापीत बोट एखाद्या  गुहेत आल्या सारखे वाटले, अद्भुत निळा प्रकाश चोहीकडे पसरला होता. आभाळ निळेसार झाले होते त्याचे प्रतिबिंब शिवसागर जलाशयाच्या पाण्यावर पडून खाली निळं पाणी अक्षरश: लखलखत होतं. त्या निळाईला एक विलक्षण चंदेरी झळाळी होती. या अद्भुत अंतरंगाचा अनुभव घेऊन थोडा विचार मग्नतेतून बाहेर पडतो ना पडतो तोच
जलाशयाच्या क्षेत्रात सुमिश्रीत विविध रंग संगतीचे चित्ताकर्षक सौंदर्याचे व मनोहरी लयबध्दतेचे नानाविविध जातीचे सुंदर पक्षी सहज नजरेस पडत होते, कदाचित जलाशयातील माशांचा घास घेण्यासाठी यांची तडपड सुरू असावी. इतक्यात एका बाजूला काहीतरी हलचल झाली, म्हणून लक्ष तिकडे वळवले तर एका किंगफिशर पक्ष्याला शिकार सापडली अन तो चोचीत घेऊन आमच्या समोरून मोठ्या तो-यात उडून पण गेला.
५० मिनिटांचा बोटिंगचा प्रवास करून आम्ही आता वासोट्याच्या जवळ पोहचलो होतो. बोटी मधून खाली उतरलो अन समोर पाहिले तर दूर वर उंचावर अस्पष्ट असा वासोटा किल्ला दिसत होता. आम्ही सर्वजण चेक नाक्यावर पोहचलो तिथे वनअधिकारी प्रत्येकाची पुन्हा तपासणी करीत होते. सोबत असलेल्या प्रत्येकाच्या बँग्ज चेक करीत होते, सोबत आणलेल्या प्रत्येक वस्तूंचे टिपण करीत होते. आमच्या गृपची तपासणी पुर्ण झाली अन आम्ही सर्वजण वासोटा किल्लाकडे मार्गस्थ झालो.
जंगलाची सीमाभिंत पार करून आता आलो तर आजूबाजूला फुलपाखरांची शाळाच भरली होती दोन मिनिटं थबकून गेलो त्या फुलपाखरांचा फोटो व व्हिडिओ काढण्याचा मोह आवरला नाही. माझ्या अगोदर रोहितदादा बोरूडे हे त्यांच्या कॅमे-याने प्रत्येक बागडणारे फुलपाखरू टिपत होते.
या फुलपाखरांच्या मधे ब्ल्यू मॉर्मन (नीलवंत) या जातीच्या फुलपाखरांची संख्या अधिक दिसत होती. या फुलपाखराचे शास्त्रीय नाव पॅपिलिओ पॉलिम्नेस्टर आहे. हे फुलपाखरू संपूर्ण महाराष्ट्रात व दक्षिण भारतातील वनांत आणि श्रीलंका या ठिकाणी आढळते तसेच मुंबई, नागपूर, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमध्येही त्यांचा वावर आढळतो. त्याचा पंख विस्तार १५० मिमी. असतो. शरीर आणि पंख काळे असून दोन्ही पंखांवर निळे ठिपके असतात. मागच्या पंखांच्या खालील बाजूस शरीरा कडील टोकावर लाल ठिपका असतो. काळ्या पंखावरती निळी चकाकी दिसून येते. हे फुलपाखरू वेगाने फुलांवर संचार करीत असते. २०१५ मध्ये या फुलपाखराला ‘महाराष्ट्र राज्य फुलपाखरू’ असा दर्जा देण्यात आला आहे. या फुलपाखरांना पासून मला ग.ह.पाटील यांची कविता आठवली..

छान किती दिसते ! फुलपाखरू
या वेलींवर ! फुलांबरोबर
गोड किती हसते ! फुलपाखरू

पंख चिमुकले ! निळेजांभळे
हलवूनी झुलते ! फुलपाखरू

डोळे बारीक ! करिती लुकलुक
गोल मणी जणु ते ! फुलपाखरू

मी धरू जाता ! येई न हाता
दूरच ते उडते ! फुलपाखरू

वाटेतच भल्या मोठ्या दगड गोट्यांनी सजलेला ओढा दिसला असे वाटत होते मानव निर्मित असेल, इतकी तंतोतंत मांडणी होती. पण तसे नव्हते ही रचना निसर्गनिर्मितच होती. ठिकठिकाणी पाणी होते, अजून झरे सुरूच होते. आजूबाजूला पाण्याचा खळखळाट ऐकू येत होता, त्यामुळे  मन शांत झाले होते.
सकाळचे अकरा वाजले होते त्यामुळे उन्हाचा कडाका जास्त लागल्याने, व थोडे चालून आल्याने डोके तापले होते. मस्त एका झ-या जवळ जावून डोक्यावर व तोंडावर पाण्याचे सपकारे मारले, फ्रेश झालो. पुढचा प्रवास खुप कठीण होता. घनदाट झाडीतून पाऊल वाट होती, त्या पाऊल वाटेची सीमा ओलांडायला पण परवानगी नव्हती कारण हे जंगल हिंस्त्र प्राण्यांनी खच्चून भरलेले होते. या जंगलात वाघ, बिबटे, सांबर, अस्वल, रानडुक्कर, ससा, हरिण, भेकर असे अनेक प्राणी आढळतात त्याच बरोबर असंख्य सरपटणा-या प्राण्यांची संख्या विशेष आहे. तसेच विविध जातीचे पक्षी, दुर्मिळ जातीचे पक्षी या जंगलात आहे. फुलपाखरांच्या सोबत मधमाश्या भरपूर प्रमाणात आहेत. रानमेवा रानफुल असंख्य वृक्षांनी बहरलेले हे वासोटा जंगल निसर्गाची मांदियाळीच जणू,
डोक्यात वासोटा पारायणं सुरू असतानाच आमच्या सोबत चालत असणा-या वाटाड्याने सर्वांना एका झाडा जवळ बोलवले अन एका झाडाकडे बोट केले तर त्या झाडाला असंख्य ओरखडण्याच्या खुणा दिसत होत्या तो म्हणाला? हे अस्वलाच्या नखांचे ओरखडे आहे. खुप खोलवर त्या झाडाला खड्डे पडलेले दिसत होते. शंभरफूट वाढलेल्या वृक्षांची एवढी दाटी होती की ऊन असूनही एक तिरीपही वाटेवर येत नव्हती. आता थोडी भिती वाटत होती कधी हे जंगल पार करतो असे झाले होते. एक तासाचा सपाट पण घनदाट जंगलाचा प्रवास करून आम्ही वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचलो होतो. इथून सुमारे ४२६७ फुट उंचावर वासोटा किल्ला होता. सुर्यदेव माथ्यावर आले होते, उन्हाची तीव्रता वाढले होती. त्यात आता सपाटी संपून चढाई सुरू झाली होती. किल्यावर चढण्यासाठी कोकणातील जांभ या दगडांचा वापर करून पाय-या बनविण्यात आल्या होत्या. कधी पाय-या तर कधी दगड गोटयांवरून चढाई सुरू होती, संपूर्ण शरीर घामाने चिंब झाले होते. दम लागत होता. पण हळूहळू चालत होतो. वाटेच्या दोन्ही बाजूंनी वडाच्या झाडा सारखी खुप झाडे होती त्या झाडाच्या पारंब्यांनी नैसर्गिक असे झोके तयार झाले होते. दमलो की एखाद्या झाडाच्या झोक्यावर जावून बसायचो, मस्त झोके घ्यायचो. झोके घेता घेता लहानपणीच्या आठवणीत रमायचो.

एक झोका, चुके काळजाचा ठोका
उजवीकडे डावीकडे
डावीकडे उजवीकडे
जरा स्वतःलाच फेका |१|
नाही कुठे थांबायचे
मागेपुढे झुलायचे
हाच धरायचा ठेका |२|
जमिनीला ओढायचें
आकाशाला जोडायचें
खूप मजा, थोडा धोका |३|

गायिका आशाताई भोसले यांनी गायलेले संगीतकार  आनंद मोडक यांनी संगितबद्ध केलेलं आणि गीतकार सुधीर मोघे यांनी लिहिलेलं चौकट राजा या चित्रपटातील गीत हुबेहुब या वातावरणाला लागू पडलं होत. एव्हाना सोबत आलेले सगळेच जण आता पुढे निघून गेले होते. माझ्या सोबतीला अजित आरूडे, अशोक कोरडे, रोहित बोरूडे, दिगंबर शिंदे, वर्षा चासकर, अभिनव व आदित्य हे होते. दिड ते दोन तासांच्या खड्या चढाईचा प्रवास करून आम्ही किल्यावर पोहचलो, समोरच छप्पर नसलेले पडके मारूतीचे मंदीर होते तिथे जाऊन मारूतीरायाचे मनोभावे दर्शन घेतले खुप दमलो असल्याने मारूतीच्या बाहेर चौथा-यावरच बैठक मारली, आजूबाजूला प्रत्येक जण सोबत आणलेल्या डब्यावर इथेच्छ ताव मारीत होता. कारण वाटेत ना पाणी ना खाण्यासाठी काही त्यात इतकी अवघड चढाई सर्वच भुकलेले होते. थोडावेळ बसलो अंगातील घामाच्या धारा कमी झाल्या होत्या ब-या पैकी छातीचा भाता आता पूर्ववत झाला होता. समोरच किल्याच्या उत्तरेला असणारं हे जुनं पुराणं जीर्ण झालेलं महादेवाचं मंदिर अजुन सुस्थितीत दिसत होते. आम्ही सर्वजण मंदिरात गेलो, भग्न झालेली महादेवाची पिंड दिसत होती तिला नमस्कार केला. त्या मंदिराच्या समोरून पुढे आलो, एका दगडी कमानातून वाकून पुढे सरसावलो, तिथे मोकळी जागा म्हणजे कोठडी होती. तेच अजब अस ओपन जेल होतं. सिद्दी जौहरला मदत करून मराठय़ांना दगा देणाऱ्या टोपीकरास छत्रपती शिवाजी महाराजांनी इथेच डांबून ठेवलं होतं. ते पाहून आम्ही पुढे उत्तर टोकावर आलो होतो. समोरच दिसत असलेला उत्तुंग नागेश्वराचा फणा असलेला सुळका न्याहाळात बसलो, क्षणभर वाटायचे नागेश्वराला जावून यावं पण थकल्याने कुठेच जायची इच्छा होत नव्हती दूरून नमस्कार केला. नागेश्वराची गुहा स्पष्ट दिसत होती. त्यांच्या समोरच अजून एक सुळका दिसत होता त्याला तुळशी वृंदावन किंवा ठेंगा म्हणतात, अनेक कातळकडे पाहून वेगळाच थरार अनुभवत होतो. आता भुकेने व्याकुळ झालो होतो किल्याचा अर्धाभाग पाहून महादेव मंदिराच्या शेजारीच असणा-या तळ्यावर हात धुतले, पाणी बर्फा पेक्षाही थंडगार होते ही सारी निसर्गाची किमया होती. एका झाडाखाली आम्ही सोबत आणलेले डबे सोडले, दरवेळच्या ट्रेक प्रमाणे यावेळी सुनिताताई आरूडे यांनी चपत्या आणि शेंगदाण्याची चटणी दिली होती भुकेच्या तडाख्यात सर्वच जेवण संपवून टाकले. झाडाखाली गारवा मस्त लागत होता त्यामुळे आम्ही निवांत बसलो आजूबाजूला मोहीमेसाठी आलेले तरूण आणि त्यांनी सोबत आणलेले गाईड मुलांना किल्याची सविस्तर माहिती देत होते..
किल्ल्याच्या एका अंगाला अरण्य तर दुसऱ्या अंगाला पातळात खोल गेलेले कडे म्हणूनच या किल्याला छ शिवाजी महाराजांनी व्याघ्र गड असे नाव दिले याला वनदुर्ग सुद्धा म्हणतात. शिलाहार राजांनी या गडाची निर्मिती केली. यानंतर तो शिर्के मोरे घराण्याकडे काही काळ होता. इ.स १६६० मध्ये जावळी बरोबर हा कोयनेचा वाघ स्वराज्यात सामील झाला. बराच काळ या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला गेला. हंटर आणि मॉरिसन या बड्या इंग्रज अधिकाऱ्यांनाही वासोट्याच्या या तुरुंगाची हवा खावी लागली होती. ज्ञानेश्वरीत एका ठिकाणी "वसौटा" असा शब्द आलेला आहे त्याचा अर्थ आश्रयस्थान असा सांगितला जातो. म्हणूनच या कोयनेच्या वाघाला आश्रयस्थान असल्याने वासोटा हे नाव पडले. अशी त्या गाईड कडून पुसटशी माहिती ऐकून आम्ही किल्यावर असणा-या राजवाड्याकडे निघालो. राजवाड्याचा फक्त पाया व्यवस्थित होता बाकीचे काहीच शिल्लक नव्हते.
वाड्याच्या मागेच पश्चिम टोकावर म्हणजेच अद्भुत  कोकणकडय़ावर आम्ही निघालो. काही अंतर चालून आल्यावर वाटेत दगडी चुन्याचा घाणा अजूनही सुस्थितीत होता. पुढे दोन पाण्याचे टाके होते निळेशार पाणी त्या टाक्यात दिसतं होते ते पाहून आम्ही बाबू कड्यावर पोहचलो, निळ्या रंगाच्या अनेक विविध छटा धारण केलेल्या असंख्य डोंगररांगा कोकणभूमीकडे धावत आहेत असे दिसत होते. गडाच्या दक्षिण टोकावर अजस्त्र, महाकाय हे शब्दही खुजे पडावेत असा जुना वासोटा आपला ताशीव कडा मिरवत उभा दिसत होता. गंमत अशी की छातीत धडकी भरवणाऱ्या या कडय़ाचे नाव ‘बाबू कडा’ असे आहे. तिथे एकदा आवाज दिला की त्याचे चारवेळा प्रतिध्वनी उमटत होते. जुन्या वासोटाची सीमाभिंत दिसत होती त्या किल्यावर जाण्यासाठी बंदी आहे म्हणूनच दूरूनच त्याचे विक्राळ रूप पाहिले मनसोक्त फोटो काढले. वासोट्याचे चैतन्यरूप तनामनात साठविले, आता पुन्हा बामणोलीला  परतायचे होते त्यात हा कठिण किल्ला उतरायचा होता. एक एक पायरी उतरताना पोट-यांना गोळे येत होते, कधी कधी दगड गोट्या वरून घसरत होतो, स्वताला सावरत होतो. दुरूवरून एका वेगळ्याच पक्षाच्या शिळेचा आवाज कानावर पडत होता. पण कानावर पडणारा आवाज थकलेल्या जीवाला उर्जा देत होता. घनदाट जंगलात अनेक औषधी वनस्पती होत्या त्यांचा सुगंध दरवळत तसे मन पण उत्साहाने भरून जाई खरच वासोटा हा वेगळा अनुभव होता. कारण इथली शिस्त खूप आवडली होती. अनेक ठिकाणी गड किल्यांचा होत असलेला -हास अशा नियमांनी थांबणारा होता. ना कुठे प्लॅस्टिक दिसले अन ना कुठे कचरा नियमांच्या मुळे लोकांना पण चांगली सवय लागली हे पाहून समाधान वाटले. खरतर गडकिल्ले हे आपले वैभव आपल्या शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या भूमी म्हणजे आपल्यासाठी स्मारकच ते अद्भुत असे मंदीरच या शिवमंदीरांची जपणूक करणे हे महाराष्ट्रातील प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. एक एक किल्ला पूर्ववत करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत, मंदीर सप्ताह या खर्चात पडण्यापेक्षा आपल्या शिवशंभूच्या या वास्तू उभ्या करण्यासाठी मदत करायला हवी. आपले हेच गड किल्ले जगासाठी  प्रेरणास्त्रोत्र बनतील यात शंकाच नाही.  आजही प्रत्येक गड किल्यावर वेगळीच उर्जा मिळते कारण आपल्या राजाचा सहवास या गड किल्यांना लाभला आहे. या अभेदय गड किल्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्षण केले आहे. असा हा सह्याद्री टिकला पाहिजे, जपला पाहिजे. किल्ला उतरत होतो पण या विचारांत गर्क झाल्याने कधी वासोटा किल्ला उतरलो याचे भानच राहिले नाही. पुन्हा चेक नाक्यावर जेवढे सोबत घेऊन गेलो होतो तेवढे सोबत आणले हे दाखवले तेव्हाच सर्वांना सोडले पुन्हा दिड तासांचा बोटींगचा प्रवास करून बामणोलीला पोहचलो..घामाने चिंब झालेले शरीर ऊन आणि प्रवासाने तापलेले शरीर, थंडगार तर करायलाच हवे म्हणून मस्त शिवसागरात पोहण्याचा मनसोक्त  आनंद घेतला अन आलेला शीण कुठल्या कुठे पळून गेला.

वासोटा दुर्ग दुर्गम जरी!
असला व्याघ्रगड तरी!
वन्यजीवांनी समृद्ध परी!
वनदुर्ग म्हणून किर्ती उरी!

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Thursday, 6 February 2020

स्वागताध्यक्ष

स्वागताध्यक्ष भाषण
साहित्यकणा साहित्य संमेलन नाशिक

5 व्या साहित्यकणा फाऊंडेशनच्या  साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष म्हणून या समर्थ मंगल कार्यालय नाशिक येथे उपस्थित असलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचे हार्दिक स्वागत करताना मला मनस्वी आनंद होत आहे. मराठी मायमाऊलीच्या पुढे नतमस्तक होऊन ज्ञानोबा आणि तुकोबाला साष्टांग दंडवत घालून मी या सारस्वताच्या मेळाव्यात आणि एक प्रकारच्या साहित्य पंढरीत आपल्या सर्वाचे अत्यंत मनापासून स्वागत करतो. या साहित्य संमेलनाचे उद्घाटक डाॅ. वेदश्री थिगळे, साहित्य काव्य संमेलनाध्यक्ष शिलाताई गेहलोत, प्रमुख पाहुणे डाॅ शंकरजी बो-हाडे, घनश्याम पाटील, उद्धवजी अहिरे, डाॅ. राहुल पाटील, किरण भावसार, संदीप चव्हाण तसेच या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन करणारे आमचे मित्र रविंद्र मालुंजकर यांचे पण मनःपूर्वक स्वागत करतो.
मराठीची पताका खांद्यावर घेऊन या नाशिक महानगरीत ही जी मांदियाळी इथे जमली आहे, ती गोदावरी काठावरचीच साहित्यगंगा आहे. या साहित्यगंगेत माझ्यासारख्या सामाजिक सांस्कृतिक व कला क्षेत्रातल्या छोटया कार्यकर्त्यांला स्वागताध्यक्ष होण्याचा जो बहुमान आपण मला एकमताने दिलात, याबद्दल मी अध्यक्ष संजयजी गोराडे, सचिव विलासराव पंचभाई, सहसचिव सुरेखाताई बो-हाडे, सल्लागार रावसाहेब जाधव, पुजाताई बागूल यांचा अंत:करणापासून ऋणी आहे.
आयुष्यात यश आणि अपयशाचे अनेक टप्पे असतात, ते सर्व पार करून जाताना कधी यश मिळते, कधी अपयश मिळते, कधी सुखाचे दिवस असतात. कधी अडचणीचे दिवस असतात. आज मी असे मानतो की स्वागताध्यक्ष पदाचा बहुमान करून, माझ्या आयुष्यातील अत्यंत सन्मानाचा असा दिवस मला पाहायला मिळाला. त्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.

इवलेसे रोप लावियेले द्वारी। त्याचा वेलू गेला गंगनावरी

संजयराव गोराडे सरांनी साहित्यकणा फाऊंडेशनचे पाच वर्षापूर्वी लावलेले साहित्यसंस्थेचे हे रोपटे आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. साहित्यकणा फाऊंडेशन आता सर्वच क्षेत्रात भरारी घेत आहे. या संस्थेचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात आहे, हे फक्त संजय गोराडे सरांच्या मुळे, निखळ मनाचा साधा माणूस, षंढरिपूंचा थोडा सुद्धा प्रादूर्भाव या माणसावर जाणवत नाही, पुसटसाही ही दिसत नाही. त्यामुळे निस्वार्थ, सहदयी, मनमोकळा, मनमुराद आनंद लुटणारा अन इतरांनाही आनंद देणारा साहित्याचा पुजारी अन संत माणूस म्हणजेच संजयजी गोराडे सर, परंतु हे सर्व करताना पाठीवर लढ म्हणण्याची ताकद देणारा पण हवा असतो अन तो पाठीवरचा हात तसेच खंबीर साथ देणारे विलासजी पंचभाई..

खरतर कविता अन लेखन शिकलो ते साहित्यकणा फाऊंडेशन या समुहात सहभागी झाल्यावर ख-या अर्थाने साहित्याचा प्रवास सुरू झाला.
कविता ही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे हे कधीच उमगलं नाही. काव्य हे आपले आंतरिक प्रेरणास्थान आहे हे जाणवलं पण नाही. त्यामुळे या अगोदर कविता म्हणजे काय हा प्रश्न सारखा सतवायचा. अनेक दिग्गज साहित्यिकांच्या कविते बद्दलच्या व्याख्या ऐकल्या, निःशब्दाला शब्दरूप करणारे साधन, मनाचे विविध भावतरंग उमटविणारे काव्य, भावनांचा उस्फूर्त आणि अद्भुत आविष्कार, सृजनशील आत्म्याचा उच्चार' अशा अनेक व्याख्या ऐकल्या परंतु कवितेची हीच ओळख आहे का? आणि लक्षात आले, जी कविता ओळखण्याचा आपण सतत प्रयत्न करत आहोत, ती कविता आपल्याला फार पूर्वीपासून ओळखीची आहे, अगदी कळायला लागण्या आधीपासून  'काऊ ये, चिऊ ये ' म्हणत कवितेनेच पहिला घास भरवला. जात्यावरच्या ओव्यांनी पहाटेची सुरवात झाली, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई हे अंगाई गीत गाऊन निजवले, शाळेत कविता भेटली ती तुकडोजी महाराजांची या झोपडीत माझ्या त्यामुळे जीवनाच्या जाणिवांचे आणि नेणिवांचे पदर उलगडत कळीचे फूल झाले. मनावर संस्काराचे बीज रूजले ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदाने, संत तुकाराम महाराजांच्या मार्गदर्शनपर ओव्यांनी, दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे मंगेश पाडगावकरांची ही रचना अजूनही उर्जा देऊन जाते, किसीकी मुस्कराहटो पे हो निसार किसीका दर्द मिल सके तो ले उधार शैलेंद्र यांनी लिहीलेली ही रचना सामाजिक बांधिलकीचे भान देऊन जायची.
कवितेने शिकवण्यापेक्षाही शहाणे आणि सुजाण केले. कवितेने भारावून जाऊनच आम्ही मित्रांनी कितीतरी मनोरथे रचली. कधी वाटे घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात व्हावे, आकाशी झेप घे रे पाखरा ही रचना ऐकून तर अक्षरशः आकाशात झेप घ्यावी अस वाटायंच,  किती वचने टिकली माहित नाही पण कवितेने स्वप्न बघायला शिकवले. कवितेने आयुष्यातल्या प्रत्येक अवस्थेत साथ दिली. आयुष्याच्या संध्याकाळी “आयुष्य कसे जगायचे, कण्हत कण्हत की गाणे म्हणत या आशादायी दृष्टीकोनाने उभारी दिली. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कविता दीपस्तंभासारखी पाठीशी उभी राहिली. कधी मित्र म्हणून, कधी गुरू म्हणून, कधी पालक म्हणून, कधी मार्गदर्शक म्हणून, त्या मुळे  कवितेशी एक ऋणानुबंध तयार झाले आहे. म्हणूनच कदाचित कविता म्हणजे काय हे सांगता येणे कठीण आहे. कारण नात्याची फक्त अनुभूती घेता येते, शब्दात मांडता येत नाही. चार भिंती, एक छप्पर, दरवाजा, खिडकी घराला असते ते घर या व्याख्येत, मनातले घर बसत नाही. तसंच कविता कुठल्याही व्याख्येत बसवता येत नाही. कवितेच्या अनेक नात्यांप्रमाणे तिची रुपेही अनेक आहेत. कविता हा केवळ आत्म्याचा उच्चार नाही तर एक अविष्कार आहे. एखादा कवी, गझलकार स्वप्नाचे बीज रुजवतो, भावनेच्या ऊबेत जोपासतो, विचारांच्या कोषांचे आवरण घालतो, त्यातून जे सुंदर फुलपाखरू बाहेर येते त्याला कविता असे म्हणतात....

स्वागताध्यक्ष भाषणाच्या शेवटी गुरू ठाकूर यांची एक अप्रतिम रचना सादर करतो आणि माझे भाषण संपवतो...

असे जगावे दुनियेमध्ये,
आव्हानाचे लावुन अत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..

पाय असावे जमिनीवरती,
कवेत अंबर घेताना,
हसू असावे ओठांवरती,
काळीज काढुन देताना..

संकटासही ठणकावुन सांगावे,
आता ये बेहत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..

करुन जावे असेही काही,
दुनियेतुनी या जाताना,
गहिवर यावा जगास सा-या,
निरोप शेवटचा देताना..

स्वर कठोर त्या काळाचाही,
क्षणभर व्हावा कातर कातर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर...

जय साहित्य जय साहित्यकणा

संदीप राक्षे ✍🏻
स्वागताध्यक्ष
साहित्यकणा साहित्य संमेलन

Wednesday, 22 January 2020

सोनलपाडा धरण, कर्जत


जेथे मिळे धरेला,आभाळ वाकलेले
अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले
जेथे खुळया ढगांनी जेथे खुळया ढगांनी
रंगीन साज ल्यावा माझ्या मनातला का
तेथे असेल रावा ही वाट दूर जाते…

खोपोली कडून कर्जत कडे टर्न घेतला आणी या सदाबहार गाण्याची आठवण झाली. पं कल्याणजी गायकवाड महागायक कौस्तुभ गायकवाड व कैवल्य गायकवाड आम्ही तिघेजण दुसरे महागायक वैभव थोरवे यांच्या स्वप्नातील गावाकडे निघालो होतो..निसर्गाचे अप्रतिम स्वरूप निर्मळ डोंगर दऱ्या पाठीमागे टाकीत आमचा प्रवास पुढे सुरू होता...अखेर महागायक वैभव थोरवे यांच्या माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या देऊळगाव या गावी पोहचलो तेथुन वैभव थोरवे यांना घेऊन सोनलपाडा धरण पहाण्यासाठी निघालो.. देऊळवाडी पासुन पंचवीस किलोमीटर अंतरावर हे धरण होते.. तिघांचे आता चौघे झालो होतो..जाताना वाटेत लागणाऱ्या निसर्ग रम्य ठिकाणांची माहिती घेत घेत आमचा प्रवास सुरू होता..पेठचा किल्ला,ढाकचा बहिरी, टाटा पॉवर आम्हाला जातानाच हि प्रेक्षणीय स्थळे खुणावत होती..गिलोयच्या वेलींचा जथा प्रत्येक झाडाला लपेटलेला खाण्याच्या पानांसारखा भासत होता. हिरवा साज नेसलेली वनराई एखादया नववधू सारखी सजली होती जणु आमच्या स्वागतासाठीच उभी होती. एरवी काळे ठिक्कूर दिसणाऱ्या सागाच्या झाडाने कात टाकली होती. रस्त्याच्या कडेने मोठ मोठे फार्म हाऊस दिसत होते,ज्याची जशी ऐपत तसे सजविलेले मनात एक स्वप्न निर्माण करीत होती आपलाही असा एखादा असावा मनसोक्त या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पण स्वप्न ही स्वप्नच असतात..असा हा संगीत सम्राटांच्या समवेतचा हा प्रवास अखेर सोनलपाडा या धरणा जवळ येवुन थांबला. सगळे जण गाडीतुन उतरलो गाडीचे सारथ्य कौस्तुभ करीत होता..उतरता उतरता धरणाच्या सरळ रांगेत डोंगरावर एक वेगळीच आकृती लक्ष वेधून घेत होती नीट निरीक्षण केले तर डोंगराच्या कड्याचा एक भाग महादेवाच्या पिंडी सारखा दिसत होता त्याच पिंडी समोर नंदी पण दिसत होता. खरच चराचरात देव निसर्गात कसा चैतन्यमयी देव वसला आहे याचे जीवंत उदाहरण साक्षात दिसत होते. सर्वांनी हात जोडले... वैभवने सांगितले तो भीमाशंकर चा डोंगर आहे. इतक्या वेळ निसर्गाचा चमत्कार समजणारे आम्ही आता साक्षातच भीमाशंकरच दर्शन देत आहे असे वाटु लागले. चहूबाजुने भले मोठे डोंगर आणी त्यावरून पडणारे पाणी (धबधबे)आवाज करीतच धरणात पडत होते. काही धबधबे हवेच्या मा-याने पुन्हा उलटे जात होते ते साक्षात शंकर भगवानांच्या जटे सारखे दिसत होते... निसर्गाचा हा रूद्र अवतार पहाताना मन भेदरून जात होते.. निळेशार पाणी,हिरवे डोंगर,निळे आकाश याचे प्रतिबिंब धरणाच्या पाण्यात आपोआप सप्तरंगाची उधळण करीत होते. हे नयनरम्य दृष्य मनाला चैतन्य देत होते..धरणाच्या जवळ गेलो तर खुप पर्यटक पाण्यात पोहत होती... धरणाच्या थोडे खाली छाती इतके पाणी असेल असे चोहोबाजुने बांधकाम केलेले आणी त्या मधे आलेले पर्यटक भिजण्याचा आनंद घेत होते.. माझे मन काही स्वस्थ बसु देईना खुप दिवसांच्या पासुन स्विमिंग बंद आहे..त्यामुळे शरीर जड पडलेले जरा मोकळे करावे म्हणून कपडे काढली आणी पाण्यात उतरलो मनसोक्त पोहण्याचा आनंद घेतला माझ्या सोबत कल्याणजींचा छोटा कैवल्य उतरला होता... आम्हा दोघांना पोहण्याचा आनंद घेताना पाहुन गुरूजींना ही मोह आवरेना ते पण पाण्यात उतरले, खुप वर्षांनी पाण्यात पोहण्याचा आनंद गुरूजी सुद्धा मनसोक्त घेऊ लागले.. धरणातून ओव्हरफुल झालेले पाणी ते धबधब्याच्या रूपात, डोंगर द-यातुन, झाडा वेलीतुन,मातीच्या गंधातुन, पाणी सरळ धरणात पडत होते तेच पाणी आमच्या शरीरावर पडत होते. तिघांनीही खुप आनंद लुटला,आता सुर्य मावळतीला चालल्याने उजेड कमी होत चालला होता..एरवी गार असणारे पाणी गरम वाटत होते त्यामुळे बाहेर निघावेसे वाटेना पण आता सायंकाळ झाली होती..तिघेही बाहेर आलो, काळोख दाटत चालला तसतसे दुधी धबधबे अजुन ठळक दिसत होते.. फोटो शेषण झाले पुन्हा एकदा त्या भीमाशंकराचे दर्शन घेतले आणी परतीचा प्रवास सुरू झाला थोडे अंतरावर आलो पुर्ण अंधार पडला होता. निरव शांतता आणी रात किड्यांचा आवाज फक्त येत होता.. कुठूनतरी दुरवरून कोल्हेकुई ऐकू येत होती. अचानक एका ठिकाणी कौस्तुभ ने गाडी थांबवली इतक्या जंगलात अचानक गाडी थांबली थोडे छातीत धस्स झाले..पण मागे पहा कौस्तुभने सांगितले? तर काय चमत्कार एका झाडावर असंख्य काजवे चमकत होते. निरनिराळे आकार दिसत होते आम्ही गाडीतुन खाली उतरलो तर खरच जिकडे पहावे तिकडे काजवेच दिसत होते.पहाता पहाताच कौस्तुभ "मनमंदिरा तेजाने" हे शंकर महादेवन यांचे गाणे गाऊ लागला.दुग्धशर्करा योगच,निसर्ग आणी संगीताचे अनोखे नाते आज मी स्वता अनुभवत होतो. खरच हा निसर्ग प्रवास संगीतमय साथ अशीच आयुष्यभर हदयात घर करून राहील.....

लेखन: -संदिप राक्षे

पेमगिरी किल्ला(भीमगड)

इतिहासाच्या अस्पष्ट पाऊलखुणा (१)
शहाजी राजे यांनी स्वराज्याची स्वप्न ज्या किल्यावरून पाहिली तो पेमगिरी किल्ला उर्फ भीमगड उर्फ शाहगड.

इतिहासाच्या पुन्हा
खुणावतात पाऊलखुणा!
अस्पष्ट झाल्या तरी
स्पष्ट जाणवतात मना!

डाॅ अमोल कोल्हे सरांनी अस्पष्ट असलेला इतिहास आज स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून संपूर्ण भारतदेशाला स्पष्ट करून दाखविला आहे. आज आपण पवित्र अशा शिवशंभूच्या महाराष्ट्र भूमीत जन्माला आलो हेच भाग्य थोर, म्हणूनच पुन्हा इतिहासाकडे एक एक पाऊल ओढत आहे.
सुट्टी असल्यावर मन काही स्वस्थ बसू देत नाही. आता मनालाही सवय लागली त्याच्या गुणधर्माप्रमाणे भटकायची, मनसोक्त हुंदडायची, निसर्गात रमायची, गड दगड मातीशी मैत्री करण्याची, त्यांच्या कडून इतिहास ऐकण्याची.
आयुष्यात निर्व्यसनी राहण्याचा आटोकाट प्रयत्न केला त्यात यशस्वी झालो पण भटकंतीच्या या व्यसनाने पछाडलेच. चार पाच दिवस अगोदरच पेमगिरीची आठवण झाली होती या वेळी नक्कीच जायचे ठरविले
नाशिकला एक महत्त्वाचे लग्न होते पण ते रात्री उशीरा सात वाजता होते. मी तर सकाळी नऊ वाजताच घरातून बाहेर पडलो होतो. आज सोबतीला कोणीच नव्हते, पेमगिरी सारखी डोळ्यासमोर दिसायची, मनात विचार यायचा आपण तर एकटेच चाललो आहोत उगीच कशाला जोखीम घ्यायची. गाडी चालवत असतानाच दोन मनांचे भयंकर व्दंद सुरू झाले होते. कोणीच माघार घेत नव्हते. गाडीचे टायर सुद्धा उगाळलेले होते त्यातील तारा सुद्धा दिसत होत्या. नको जायला असे सांगणारे मन नवनवीन संकट पुढे करीत होतं. पण काही झाले तरी जायचेच, कितीही संकट आली तरी तू स्वता खंबीर आहेस या सर्व परस्थितीला नक्कीच सामोरा जाशील हे सांगणा-या मनाचे मी ऐकले आणि निश्चय केला.
नाशिक पुणे हायवे लगतच दौलत हाॅटेल आहे तिथे नास्ता करायला थांबलो. मोबाईलच्या मॅप या अॅपसवर पेमगिरी सर्च केले पन्नास किलोमीटरचे अंतर दाखविले तेथूनच आमचे मित्र थोरात सर व अनिल गडाख यांना या स्थळाची रितसर माहिती मिळवली.
संगमनेरच्या अलिकडे खांडगावहून डावीकडे वळण घेतले. हायवे पासून पेमगिरी बावीस किलोमीटरच्या अंतरावर होते. रस्ता थोडा खराब असल्याने मनात धाकधुकी होती. आजूबाजूचा हिरवा परिसर पाहून, प्रवरा नदीचा प्रवाह पाहून मन आनंदी होत होते.
जस जसे अंतर कापत होतो तशा सह्याद्रीच्या डोंगररांगा स्पष्ट दिसत होत्या, पुसट, गडद दिसणा-या सह्याद्रीचा रांगा पाहिल्या की निधड्या छातीच्या मावळ्यांचा इतिहास आठवतो. या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळलेला मावळी गडी दिसतो. उन, पाऊस, वादळ, वारा युगे न युगे अंगावर झेलून सुद्धा त्याच तडफेने उभ्या असलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा या महाराष्ट्राचे खरे वैभवच दिसते.

एकट्याने चालताना सोसती जे यातना
चालत्या त्या पावलांसाठीच माझी प्रार्थना!

बंधने तोडून ज्यांनी मार्ग हा चोखाळला
हा यशाचा सूर्य त्यांच्या कल्पनेला भाळला!

वाकले अस्मान आहे या क्षितीजाच्या पुढे
चालतो जो जो पुढे हा मार्ग त्याला सापडे!

संत कोणी होत नाही यातनांना टाळुनी
लोभ त्यांनी टाकले ध्येयापुढे ओवाळुनी!

कष्टदायी वाट आहे पर्वतांना घाट आहे
या किनारे शोधणारी सोबतीला लाट आहे!

कवी गजानन मुळे यांच्या या कवितेच्या ओळी आठवतच पेमगिरीला पोहचलो होतो. खरतर मी आलो होतो येथील विराट असा महावटवृक्ष पहायला पण जवळच पेमगिरी गड आहे कळले आणि पहिला मोर्चा गडाकडे वळविला. कारण पुढचा पायी प्रवास एकट्याचा होता आणि पेमगिरी गड चढायचा होता. या कवितांच्या ओळींनी मनाला काहीसे बळ दिले होते. गडाच्या पायथ्याला पेमगिरी हे गाव वसलेले शंभर दोनशे घरांचा उंबरा असलेले गाव, तेथे एका टपरी वाल्याला गडाकडे जाण्याचा मार्ग विचारला, गाडीत मला एकट्याला पाहून तो जरा माझ्याकडे विचित्र नजरेनेच पहात होता. नक्कीच त्याच्या मनात एकच विचार आला असणार "खरच हा खूप वेडा माणूस दिसतो आहे" हे मी जाणले मी पण थोडा हसलो. त्याने हातानेच इशारा करून मला सांगितले या रोडने सरळ गडावर गाडी जाते. मी थोड्या अंतरावर गेलो अन मनात विचार आला आपण जर गडावर गाडी घेऊन गेलो आणि टायर ने दगा दिला तर ? गाडी तिथेच एका झाडाखाली लावली अन पायी गडावर जायचे ठरविले.
नास्ता चहा पाणी झाल्याने शरीर उत्साही होते. अवघड चढण पार करता करता दम लागत होता. ऊन असूनही कडक पणा न जाणवता वातावरणातील थंडीचा प्रवाह अधिक जाणवत होता. गुलाबी हवा शरिराला गारवा प्रदान करीत होती. गाडी रोडने चढाई केल्याने थकवा जाणवला नाही. पण अंतर खुप वाढले होते. अखेर गडावर पोहोचलो, मंदिरात जाऊन ज्या देवीच्या नावावरून पेमगिरी नाव पडले त्या पेमादेवीचे मनोभावे दर्शन घेतले. गडावर काहीच नव्हते. तटबंदीच्या खुणा तेवढ्या दिसत होत्या. काही ठिकाणी पाण्याचे टाके दिसत होते. पेमगिरी च्या इतिहासाबद्दल काहीच माहीत नव्हते, गडावर चिटपाखरूही दिसत नव्हते शक्य तितका गडावरचा परिसर पाहिला आणि गडाच्या दुस-या बाजूने उतरायला सुरुवात केली. तहानेने घशाला कोरड पडली होती. खाली उतरताना दूरूनच पायथ्याशी लाकडी वाड्याची प्रतिकृती दिसत होती. काहितरी ऐतिहासिक असणार म्हणून मी त्या वाड्याकडे गेलो तर ते मारूतीरायाचे मंदीर होते. पण ते बाहेरून एखाद्या सरदाराच्या वाड्यासारखे दिसत होते. बाहेरून कुलूप असल्याने आत मधे जाता आले नाही. तिथेच एका झाडाखाली बसलो होतो. माझ्या शेजारीच साधारण साठीच्या घरात असणारे गृहस्थ बसले होते. त्यांनी मला विचारले कोठून आलात? मी सांगितले भोसरी पुणे येथून. एकटेच का? मी हो म्हणालो, जरा गावचा आणि गडाचा इतिहास विचारावा म्हणून त्या दादांना बोलते केले. पहिल्यांदा त्यांनी मला वरवर उत्तर दिली. पण नंतर ते इतिहास सांगू लागले.
हा पेमगिरीचा किल्ला हा भीमगड व शाहगड या नावाने इतिहासात ओळखला जातो. इ.स. २०० मध्ये यादव राजांनी बांधला होता. मुघल सम्राट शाहजहान आणि विजापुराची आदिलशाही या दोन सत्तांनी १७ जुन १६६३ रोजी निजामशाही बुडविली. शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज मुर्तिजा निजाम याला जीवधनच्या कैदेतून सोडवुन याच पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणुन घोषित केले."शहाजीराज्यांनी याच किल्यावर सर्वप्रथम स्वराज्याचे स्वप्न पाहिले व तसा तीन वर्षे कारभारही केला. हे वाक्य ऐकले आणि आपण ज्या गडावरून जाऊन आलो तिथे स्वराज्याच्या संकल्पनेचे बीज रोवले गेले याचा माझा मलाच अभिमान वाटला. अनभिज्ञ असलेल्या इतिहासाची माहिती पायथ्याशी आल्यावर मिळत आहे याचे सर्वात मोठे दु:ख झाले. दादा पुढील इतिहास सांगत होते. १७३८ ते १७४० या दरम्यान पहिला बाजीराव पेशवे व मस्तानी यांचे वास्तव्य सुद्धा याच शाहगडावर होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी १६४२ साली बांधलेली बारव म्हणजे विहीर जवळच आहे ती पण पहा, थोडक्यात हा इतिहास ऐकून या गडावर पुन्हा चढून जावं अस वाटत होते. इतक्या घडामोडी या गडावर घडल्या हे ऐकूनच आश्चर्याचा धक्काच बसला. या गडाचा इतिहास सांगितल्यावर त्यांनी आशिया खंडातील सर्वात मोठा वटवृक्ष येथूनच दिड किलोमीटरवर आहे असे सांगितले पण जाण्यापूर्वी त्या वडाच्या विषयी थोडी माहिती सांगाल का अशी विनंती केली.
जिथे हा महाकाय वटवृक्ष आहे त्या भागाला मोरदरा असे म्हणतात. कित्येक शतके हा वड वादळ- वा-याला नैसर्गिक आपत्तींना तोंड देत तो तेथे खंबीरपणे उभा आहे. सुमारे दीड ते दोन एकरावर हा महाकाय वृक्ष पसरलेला आहे. त्याच्या मुख्य खोडाचा घेर ५८ फूट आहे. त्याच्या एकूण पारंब्या ९० च्या जवळपास आहेत. झाडाचा उत्तर-दक्षिण व्यास ३०० फूटांपर्यंत तर पूर्व-पश्चिम व्यास २८० फूट इतका मोठा आहे. हा वटवृक्ष पहाण्यासाठी परदेशातून पण अनेक पर्यटक येतात. या वडाच्या झाडाखाली भिल्ल-रामोशांची 'जाखाई-जाकमतबाबा' ही दैवते आहेत. या दैवतांची दंतकथाही फार मोठी रोमांचकारी आहे. आता कथा ऐकत बसलो तर पुढे नाशिकला जाणे होणार नाही, म्हणून दादांचे आभार मानले. निरोप घेतला, आज खरच त्यांच्या मुळे खूप मोठी माहिती मला मिळाली होती. जाता जाता सहज मी त्यांना त्यांचे नाव विचारले? ते म्हणाले मी बबन कानवडे येथून जवळच माझे गाव आहे, मी रिटायर्ड शिक्षक आहे. तरी मी पण विचार करीत होतो. यांना इतका इतिहास कसा माहीती. पुन्हा एकदा त्यांचा निरोप घेतला आणि जवळ असणा-या मोरद-याचे दिशेने निघालो.

उभा महाकाय वटवृक्ष
देतसे इतिहासाची साक्ष!
पाहून त्याचे विराट रूप
भासे मायेचा तो कक्ष!

महाकाय वटवृक्षाला पाहून सहजच माझ्या मुखातून हे शब्द बाहेर पडले.
या वडाला पाहूनच माझी नजर फिरू लागली. नीरव शांतता, या झाडावरील पक्षांचा किलबिलाट जणू काही येथे जत्राच भरलेली. आजूबाजूला कोणीच नव्हते मी एकटाच त्या भल्या मोठ्या वडाच्या सानिध्यात उभा होतो. जिकडे पहावे तिकडे त्या वडाच्या पारंब्या त्याच पारब्यांचे झालेले झाड पाहून हा निसर्गाचा चमत्कारच वाटत होता. वडाला आयुर्वेदात मोठे स्थान आहे. वडाच्या झाडाच्या जवळ पास ऑक्सीजनचे प्रमाण खूप जास्त असते, त्याच मुळे ज्यावेळी मी दुरून हे झाड पाहिले, तेव्हा त्या वडाच्या झाडाच्या भोवतीने निळाईची झालर पसरलेली दिसत होती. एकटा असल्याने नको त्या विचारांनी मनात थैमान घातले होते. वडाच्या झाडाच्या बुंध्याजवळ आलो तिथे सिंदूर लावलेल्या काही मुर्ती दिसत होत्या. येथील लोकांचे श्रद्धास्थान म्हणून मी पण दर्शन घेतले आणि परतीच्या प्रवासाला निघालो...

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

नांदुर मधमेश्वर पक्षीतिर्थ

नांदूर मध्यमेश्वर पक्षीतिर्थ
विहंगाची भरते मांदियाळी!
विदेशी पक्ष्यांचा कुंभमेळा
भरतो इथे हेमंताच्या वेळी!

भटकंती मधे अनेक गड किल्ले, तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळ पाहिली पण इच्छा होती ती काहीतरी आगळ वेगळं पाहण्याची जे कधी पाहिले नाही, अनुभवले नाही अशा चमत्कारीत स्थळाची! "पक्षीतीर्थ" हे नाव वाचनात अनेक वेळा आलेले पण त्याचा उलगडा होत नव्हता.
फेसबुकला मुकूंद थोरात सरांची नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य ही पोस्ट पाहिली आणि डोक्यात ट्यूब पेटली, हेच ते पक्षीतीर्थ जे मला पहायचं होतं. सरांना मी फोन लावला हे पक्षी अभयारण्य कुठे आहे? सरांनी सांगितले नाशिक जिल्ह्यात, निफाड तालुक्यात सिन्नर जवळच नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य आहे तुम्ही नक्कीच जा. काखेत कळसा आणि गावाला वळसा तसेच माझे पण झाले, कारण आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते अनिलजी गडाख सर याच परिसरातील मांजरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गडाख सरांना मी फोन केला सर मी येत आहे तुमच्या कडे, सरांनी काहीच न विचारता नक्कीच या असे म्हणाले. सकाळीच दहा वाजता दुसरे मित्र गजाननदादा साप्ते यांना सोबत घेतले आणि भोसरीहून निघालो. निवांत प्रवास असल्याने सायंकाळी सहा वाजता मांजरगाव ता. निफाड येथे पोहचलो गडाख सर आमच्या स्वागतासाठी मेन रोडवरच येऊन उभे होते.
चहापाणी झाला सरांनी विचारले आज आमच्याकडे भटकंती, पण तुम्ही आलात छान वाटले, सरांना मी सांगितले आज आम्ही पक्षी अभयारण्य पहाण्यासाठी आलो आहोत. सरांनी क्षणाचाही विचार न करता त्यांचे मांजरगावातील मित्र चेअरमन सुभाषराव नागरे यांना फोन केला ते पण पाचच मिनिटांत आले. गडाख सरांनी आमची ओळख करून दिली. सुभाषराव नागरे यांनी निसर्ग निर्वचन केंद्र खानगाव थडी येथे फोन केला आणि सांगितले पुण्यावरून आमचे मित्र आले आहेत गेस्ट हाऊस मधील एक रूम बुक करा. आम्ही सर्वजण खानगाव थडी कडे निघालो.
निसर्गाच्या सानिध्यात, गोदावरीच्या तटी हे निर्वचन केंद्र असल्याने वातावरण खुपच छान होते. रात्री जेवणाचा बेत सुभाषराव नागरे व अनिलजी गडाख सरांनी खुपच चविष्ट केला होता, यथेच्छ भोजन झाले. एकमेकांना निरोप दिला आणि आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी आलो.
उदया वेगवेगळ्या पक्ष्यांच्या दुनियेत जायचे असल्याने लवकरच झोपलो.
जाग आली ती पक्ष्यांच्या किलबिलाटाने, प्रातःविधी उरकला, नास्त्याची व्यवस्था सुभाषरावांच्या घरी होती.
मांजरगाव हून आम्हाला चापडगाव पक्षी निरीक्षण मनो-याकडे जायचे होते. सकाळचे आठ वाजले होते. थंडीचे दिवस असल्याने खुपच थंडी वाजत होती. हुडहुडी भरली होती पण आज एका वेगळ्याच दुनियेत जाणार होतो त्यामुळे हुडहुडीची परवा केली नाही. रोड पासून ८०० मीटरवर पक्षी अभयारण्याची हद्द सुरू झाली. वन्यजीव विभागाकडून गेटपास घेतला, सोबत दोन दुर्बिणी व गाईड घेतला. पाण कणसांच्या मधून वाट काढीत पुढे गाईड व आम्ही त्याच्या मागे चालत होतो. आमच्या पायाच्या आवाजाने काही पक्षी विचित्र आवाज काढून आम्ही आलोय याची सुचना इतर पक्ष्यांना देत होते. टिटवीने तर कहरच केला संपूर्ण शांततेचा भंगच करून टाकाला किना-यावर असलेले पक्षी पंखांची फडफड करीत खोल पाण्यात जावू लागले. दलदलीच्या रस्त्याने मनो-याची वाट मी व गजाननदादा चालत होतो. मनात थोडी भिती पण वाटायची एखाद्या सरपटणा-या प्राण्याने हल्ला केला तर पाणी पण मागून देणार नाही. पण गाईड स्थानिक असल्याने त्याला सर्व माहिती होती. अखेर आम्ही शेवटच्या मनो-या जवळ आलो सिडी चढून वरती गेलो..आजूबाजूला पाहिले तर एक विलक्षण नजारा दिसत होता. हजारो परदेशी पाहुणे मनसोक्त आनंदाने बागडत होते. जो पर्यंत नजर जात होती तिथपर्यंत संपूर्ण परिसर या परदेशी पाहुण्यांनी व्यापलेला दिसत होता..
इतके वेळ शांत असलेला गाईड आता बोलू लागला होता. माझे नाव संतोष, माझे गाव हेच, शिक्षण घेत आम्ही गाईडचे काम करतो. गेली कित्येक वर्ष अभ्यास करून आम्हाला या पक्ष्यांची माहीती झाली..
तसेच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे तत्कालीन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे महाराष्ट्रातील तीन पाणथळ जागांचे अनुमोदन रामसार जागांच्या साठी पाठविले होते. जेणेकरून समृद्ध पाणथळ म्हणून नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य विकसीत होईल, हाच ठराव इराण येथे आंतरराष्ट्रीय पातळीवर मंजूर झाला त्यातीन ठरावांच्या पैकी नांदूरमधमेश्वर पक्षी प्रकल्पाचा समावेश झाला. रामसार ठराव हा जगातील विविध जैवविविधतेने समृद्ध अशा पाणथळ जागांचे संरक्षण करणे, तसेच पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी या पक्ष्यांचा पण महत्वाचा वाटा असतो. उगमस्त्रोत्रांचे संरक्षण करणे हे निसर्गाच्या व मानवाच्या दृष्टीने विकासाचे ठरणार आहे. म्हणून या नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्याला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून या अभयारण्याची जगात ओळख आहे...
गंगापूर आणि दारणा पाणवठयाच्या विसर्गातून वाहत येणाऱ्या मातीने, वनोपजामुळे नांदूर मध्यमेश्वर परिसरात अनेक नैसर्गिक बेटसदृश भाग बनले, त्या परिसरात बहुतांश पाणवनस्पती आणि जलचर वास्तव्यास आल्याने समृद्ध जल अन्नसाखळी या परिसरात नांदते आहे. हीच समृद्ध अन्नसाखळी अनेक पक्ष्यांना इथे आकर्षित करते. त्या मुळे परदेशातून शेकडो पक्षी येथे वास्तव्यास येत आहेत. विविध रंगी बेरंगी प्रकारच्या पक्ष्यांनी गजबजणारा हा परिसर १९८६ साली अभयारण्याचा दर्जा देऊन संरक्षित केला गेला. सुमारे १०१ किलोमीटरचा परिसर महाराष्ट्र वन विभागाने संरक्षित करून नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्याची निर्मिती केली.
आमच्या कार्यालयातील नोंदीनुसार येथे युरोप, रशिया, सायबेरिया, चीन, तिबेट असा दहा हजार किलोमीटरचा प्रवास करून २३० हून जास्त प्रकारचे पक्षी या परिसरात आढळतात. यामधे टिल्स, पोचार्ड, विजन, गडवाल, शाॅवलर, पिनटेल, क्रेन, गारगनी, टर्नस, गूस, पेलकिन, क्रेन, गॉडवीट, हॅरियर, प्रिटेनकोल, फ्लेमिंगो, स्पूनबिल्स, विव्हर्स हे पक्षी आहेत. तर इथेच राहणाऱ्या स्थानिक पक्ष्यांची यादी भरपूर मोठी आहे. यात चक्रवाक, तलवार बदक, लालसरी, चतुरंग, सुरय, कादंब, झोळीवाला, करकोचे, शराटी, तुतारी, क्रौंच, गल, चिलखे, कुरल, हरीण, चमचा बदक, बगळे, चांदवा, कमळपक्षी, पाणकोंबडी, मुग्धबलाक, खंडय़ा, ससाणा, पाणबुडी हे स्थानिक पक्षी बघायला मिळतात. नांदूर मध्यमेश्वर परिसरातल्या उत्तम नैसर्गिक अधिवासामुळे, इथे आढळणाऱ्या पक्ष्यांच्या वास्तव्यामुळे या परिसराला महत्त्व आले आहे. या अभयारण्याची निर्मितीच पक्ष्यांच्या अधिवासासाठी केलेली असली तरी अभयारण्याच्या परिसरात अनेक वन्यजीव वास्तव्याला आहेत. इथल्या पाणवठया मध्ये पाणमांजरं, मासेमार मांजरं, उदमांजरं नियमित दिसतात. परिसरातल्या ऊस शेतीमध्ये येऊन जाऊन असणारे कोल्हे आणि लांडगेही मधूनच इथे दर्शन देऊन जातात. नांदूर परिसरात सरडे, सुरळ्या, साप, मुंगूस यांची रेलचेल असून अनेकदा हे जीव उन्हात शेकताना किंवा नदीच्या काठावर दिसून येतात. या सगळ्यांची एकमेकांवर अवलंबलेली समृद्ध जीवनसाखळी या परिसरात नांदते आहे. नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याच्या परिसरात राहाणाऱ्या हजारो पक्ष्यांसाठी मुबलक खाण उपलब्ध आहे. कारण इथल्या पाणवठय़ांमध्ये २४ हून जास्त प्रकारचे मासे सापडतात. तसेच पक्ष्यांना घरटी करायला उत्तम अशी झाडं परिसरात असून सुमारे ४६० प्रकारची झाडं, झुडपं आणि वनस्पती यांची नोंद आहे. अशी परिपूर्ण माहीती मी व गजाननदादा एकरूप होऊन ऐकत होतो इतके माहीतीचे भांडार पहिल्यांदाच अनुभवत होतो. थंडी सरून उन्हाचा तडाखा जानवत होता तसंतसे विविध पक्षी पाण्यात जात होते. काही क्षण असे वाटत होते पक्ष्यांची येथे ब्युटी क्वीन स्पर्धाच सुरू आहे. जोडीने पक्षी यायचे उथळ पाण्याच्या रॅम्मवाॅकवर इकडून तिकडून डोलायचे आणि निघून जायचे. हा खेळ खुप वेळचा सुरू होता. अचानक समोरून बगळ्यांची रांग दिसली सफेद रंगाचे बगळे एकसंघ उडत खाण्याच्या शोधात निघाले होते..

बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात?

हे गाणे सहजच त्या बगळ्यांना पाहून मनपटलावर तरारले,
गाईड दादाने एक मोठी दुर्बिण आणली होती त्यातून दुरवरचा पक्षी सुद्धा स्पष्ट दिसत होता. अशाच एका दिशेने दुर्बिण रोखली आणि मला पहायला सांगितले. दादा हा पांढरा बलाक युरोपहून आला आहे याची लांबी १०० से.मी हा रंगाने संपूर्ण पांढरा असतो याचे अन्न मासे, बेडूक, खेकडा, शंख, शिंपले. ही माहिती ऐकता ऐकता या परदेशी पाहुण्याला मी प्रत्यक्ष पहात होतो. त्यानंतर हा अग्निपंखी/ रोहीत यांची लांबी १४० से. मी हा पक्षी मी तर पहिल्यांदा पहात होतो त्याची मान S आकाराची होती गुलाबी पांढ-या रंगाची पिसे कडेला लाल शेंदरी पिसे, भले उंच गुलाबी रंगाचे पाय, जाड गुलाबी चोच मध्यावर वाकलेली, पिवळे डोळे हा रोहित पक्षी पाहूनच सारखे पहात रहावे असे वाटत होते.
गाईड दादाची दुर्बिण विविध पक्षी हेरत होती आणि मला साक्षात दर्शन घडवित होती.
पट्ट कादंब:- लांबी ७५ से.मी रंग राखी, तपकिरी व पांढरा, डोके व मान यांच्या मध्ये दोन मोठे आडवे काळे पट्टे, पिवळी चोच हा पक्षी तिबेट हून भारतात येतो.
शाम कादंब::- लांबी ८१ से. मी, रंग करडा, मातकट, गुलाबी मातकट चोच हा पक्षी हंसाचा मुळ पुरूष समजला जातो...
शाही चक्रवाक:- लांबी ६६ से.मी पांढ- या रंगाचे अंग, पोटावर तपकिरी रंगाचा पट्टा, पंखावर काळा पट्टा, काळी मान, लाल चोच इतका सुंदर पक्षी कधीच पाहिला नव्हता..
हळदी कूंकू:- या पक्ष्याचे नाव मला जरा विचित्रच वाटले, याची लांबी ६१ से.मी, पांढरट राखाडी मान, पंखावरती गडद तपकिरी रंग, पंखाखाली हिरवट पट्टा, काळ्या चोचीच्या टोकावर पिवळा ठिपका,
शेंडी बदक:- लांबी ४६ से.मी, शेंडी असलेले काळ्या जांभळ्या रंगाचे डोके, पाठ मान पोटाकडील भाग पांढरा..
चिमणशेंद्रया:- लांबी ४८ से. मी, शेंदरी तपकिरी डोके, काळसर करडी चोच, काळा गळा, करडी पाठ, काळी शेपटी, लालसर पिवळे डोळे, हा पक्षी सैवेरिया या देशातून आलेला.
तरंग:- लांबी ४९ से.मी, निळी करडी चोच, फिकट पिवळ्या रंगाचा डोक्यावर पट्टा, लालसर तपकिरी डोकं, करडी पाठ, हा पक्षी उ युरोप हून या पक्षी अभयारण्यात आलेला.
जांभळी पाण कोंबडी:- ही नांदूर मधमेश्वरची राणी म्हणून ओळखली जाते. लांबी ४३ से.मी संपूर्ण जांभळा रंग, लालचुटूक चोच, उंच लाल पाय, शेपटी खाली पांढरा रंग ही अशी पाण कोंबडी फक्त मध्यमेश्वर येथेच आढळते..
चमचा पक्षी:- लांबी ७५ से.मी, लांब चमच्याच्या आकाराची काळी चोच, डोक्यावर पांढरा तुरा..
असे भरपूर पक्षी दुर्बिणीतून गाईड दादाने दाखविले त्यांची माहिती तंतोतंत दिली. पक्ष्यांच्या या सानिध्यात मी पण पक्षी झालो होतो. तीन तास हे जगच विसरून गेलो. खरच साक्षात पक्षीतीर्थ पाहिल्याची अनुभूती मला मिळाली होती. खुपच अप्रतिम अविस्मरणीय ही पक्ष्यांची दुनिया डोळ्यात साठवली, आता पोटात पण भुकेचे कावळे ओरडायला लागले होते. पुन्हा एकदा दूरवर नजर फिरवून, मनोरा उतरलो. दुर्बिणी ऑफीस मधे जमा केल्या आणि गाईड दादाचे आभार मानून निरोप घेतला...

पशू, पक्षी, वनस्पती
हेच खरे निसर्गाचे धन
संरक्षण, संवर्धन तयांचे
करण्या घेवुया प्रण!

संदीप राक्षे
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

कोपेश्वरमंदिर, खिद्रापूर

याचि देही याचि डोळा अनुभवली
कोपेश्वर मंदिराची शिल्पकला...

फेसबुक ला एक पोस्ट पाहिली आणि डोळे खिळून राहिले, एका मंदिराचा फोटो होता. अलौकिक अशी कलाकृती पाहून मंत्रमुग्ध झालो, पुन्हा पुन्हा ते मंदीर फोटोत पाहून मन काही भरेना, उत्सुकता लागली त्या मंदिराची माहीती घेण्याची, ती पोस्ट केली होती किरण मगदूम यांनी मी त्यांना मेसेंजर वर मेसेज केला आणि त्या मंदिराची माहीती विचारली ते म्हणाले हे मंदिर कोपेश्वर महादेवाचे आहे कोल्हापूर मध्ये नृसिंहवाडीच्या जवळ आहे. आता मला पत्ता मिळाला होता. मनात आता तीव्र इच्छा झाली कोपेश्वराचे मंदीर पहाण्याची रोज तेच मंदीर आठवू लागले, पण तो दिवस काही येईना.

अचानक एक दिवस मला कोल्हापूरहून छ. शिवराय विचार नवरंग कला यांच्या अध्यक्षाचा फोन आला ते मला म्हणाले शनिवार दि. २३ मार्च २०१९ रोजी तुम्हाला जेष्ठ समाजसेविका सिंधूताई सकपाळ यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र शिवसन्मान हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे. मी लगेच होकार दिला. कोपेश्वर महादेव पावन झाले असे थोडा वेळ वाटले आणी खुप आनंद झाला. जी मंदिर पहाण्याची इच्छा होती ती पूर्ण होणार होती.

२१ तारखेला धुलीवंदनच्या दिवशी कोल्हापूरला जायचे ठरले पण यावेळी सह कुटूंब सह परिवार सोबत घेऊन निघालो, खुप दिवस झाले त्यांना पण कुठे घेऊन गेलो नव्हतो एकदा कुठे तरी फिरवून आणले की एक दोन वर्षे मनसोक्त एकट्याला भटकायला मिळते, आमचे बंधू राजेश राक्षे यांनी नविन घेतलेली ब्रेझा अॅटोमॅटिक ही गाडी प्रवासास असल्याने प्रवास अतिशय आनंददायी आणि रिलॅक्स चालला होता. सोबत चि संकेत आणि पुतण्या रितेश पण साथीला होते....

सकाळी आठ वाजता घर सोडले दुपारी दोन वाजता कोल्हापूरला पोहचलो तेथून मॅप बाबा सुरू केले आणि त्यांच्या आधाराने ते सांगतील तसा प्रवास चालला होता. ऐन उन्हाळ्यात इतके हिरवे रितेशचा प्रश्न होता. कारण आजूबाजूला इतकी हिरवीगार शेती पाहून खरच डोळेही कडक उन्हात गार पडले होते. अरूंद पण डांबरी रस्ता, रस्त्याच्या दोन्ही कडेला नारळाची झाडं आणि जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत फक्त ऊसच ऊस दिसत होता. पश्चिम महाराष्ट्र तसा पाण्याची खाणंच हेच पाणी वाया न देऊन जाता त्यासाठी धरण बांधली, छत्रपती शाहू महाराज स्वर्गिय यशवंतराव चव्हाण त्यानंतर शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या दूरदृष्टीचे ते फळ होते. बळिराजा सतत आनंदी असतो येथील स्थानीक पुढा-यांनी गेली कित्येक वर्षे साखर कारखाने सुरू ठेवून त्यांना योग्य भाव देऊन प्रत्येक शेतकरी श्रीमंत केला. रस्त्याच्या कडेला प्रत्येक बळीराजाचा बंगला याची साक्ष देत होता...

खिद्रापूर अवघे दोन किलोमीटर राहीले होते इतक्या दिवसाची मनाची आस पूर्ण होणार होती. महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर हे गाव कोपेश्वर महादेवाच्या अतिप्राचिन मंदिरामुळे संपूर्ण भारत देशात प्रसिद्ध आहे तसेच याच मंदिरात कट्यार काळजात घुसली या चित्रपटाचे चित्रिकरण झाल्याने हे मंदिर लोकांच्या नजरे समोर आले.

पार्किंग मधे गाडी लावली एक दोन गाड्या उभ्या होत्या म्हणजे गर्दी नव्हती, गावातील लहान लहान मुलं धुलवडीसाठी पैसे जमा करीत होते त्यांच्यातील एकाला मंदीर कुठे आहे विचारले समोरच्या वाड्याकडे त्याने बोट केले, पहिल्यांदा मला वाटले आपले काहीतरी चुकत आहे मंदिर इतके मोठे आणि वाडा इतका लहान तरी पण आम्ही सर्वजण वाड्यात गेलो. दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला जे पाहिले तेच मंदीर होते पायरीचे दर्शन घेतले, आत मध्ये महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले, काय सांगू खरच एका विलक्षण दुनियेत आलो आहोत असा भास होत होता.. दगडावरील कलाकुसर नक्षीकाम साक्षात स्वर्गातील इंद्राचा दरबारच जणू...
मनसोक्त फोटो काढले, खुपच बारकाईने मंदीर न्याहाळले, आजूबाजूला कोणीच नव्हते, गाईड नव्हता त्यामुळे मंदिराची काहीच माहिती मिळणार नव्हती, मंदिरात बसल्या बसल्या साठ्याचा महामेरू गुगल बाबावर सर्च केले तर खुपच छान माहिती मिळाली मग मंदिरातून बाहेर पडू नये असे झाले. म्हणून मग गुखलवरच माहीती वाचत बसलो, तिथे मंदीराची खरी माहिती मिळाली ती अशी....

या महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर. मग त्याची समजूत काढण्यास कुणीतरी हवे होते ते काम श्री विष्णूनी केले. त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही.
साधारणत सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी, ११-१२ व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले. देवगिरीच्या यादवांनीसुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे. येथील स्थापत्यशैली दक्षिणेकडील बेलूर, हळेबिडशी साम्य दर्शवणारी आहे.
देवळाबाहेर ४८ खांबांवर तोललेला एक मंडप आहे. या मंडपाला पूर्ण छत नाही. एक वर्तुळाकार जागा मुद्दाम रिकामी ठेवण्यात आली आहे. या मंडपाचा वापर यज्ञकार्यासाठी होत असे. त्यामुळे होम-हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठीची ती जागा आहे. मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास आहे. गर्भगृहाच्या कपोतालीवर मुख्य शिखराची प्रतिकृती असलेल्या छोट्या शिखरांची ओळ आहे. अंतराळ आणि मंडप यांचे मूळ छप्पर अस्तित्वात नाही. मंडपापासून काहीसा विलग असलेला खुल्या मंडपाला स्वर्गमंडप म्हणून ओळखले जाते, त्याला कधीच छत नव्हते. कोपेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून सर्वात पुढच्या बाजूस मुखमंडपाऐवजी त्रिरथ तलविन्यासाचा पूर्णमंडप आहे. मंडपाच्या मध्यभागी वर्तुळाकार रंगशिळा असून तिच्याभोवती अपूर्ण घुमटाकार छताला पेलणारे बारा स्तंभ आहेत. या स्तंभांच्या आतील भागावर कार्तिकेय आणि अष्टदिक्पाल वाहनांसह दाखविलेले आहेत. या बारा स्तंभांच्या मागे तुलनेने कमी रुंदीचे नऊ स्तंभ आहेत.
स्वर्गमंडपाच्या आत सभामंडप आहे. या सभामंडपाच्या उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लगतच एकेक स्तंभ व त्याखालील कोनाड्यात व्याल आहेत. सभामंडपाच्या मधल्या बारा स्तंभांभोवती वीस चौकोनाकृती स्तंभ आहेत. या स्तंभांच्या रांगांपलीकडे सभामंडपाच्या भिंती आहेत. या सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना प्रकाशासाठी गवाक्षे आहेत. मंडपातून अंतराळात जाताना प्रवेशमार्गापाशी दोन्ही बाजूंना द्वारपालाच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाचे द्वार पंचशाख प्रकारचे आहे. गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत.
सभामंडपात जाताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार जाळ्या बसवलेल्या आहेत. त्या जाळ्यांवरचे दगडात कोरलेले हत्ती खूप सुंदर आहेत. दरवाजाच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला पाच-पाच द्वारपाल आहेत. मुख्य सभामंडपही खूप सुंदर आहे. पुढे गर्भगृहात जाताना प्रवेशद्वाराच्या पायाशी रांगोळीसारखी सुरेख नक्षी कोरलेली दिसते. गर्भगृह जरासे अंधारे आहे. परंतु डोळे सरावल्यानंतर आतमध्येही सुंदर मूर्ती आहेत असे लक्षात येते. या सर्व मूर्तीमध्ये त्यांचा आकार, प्रमाणबद्धता विशेष उठून दिसतात.
शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कमानी परिपूर्ण आहे. संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या आखीव-रेखीव मानवी आकृती सुमारे पाच-सहा फूट उंचीवर आहेत. मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत. उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूस मात्र एक नंदीवजा आकृती दिसते. त्यावर रथामध्ये एक जोडपे बसले आहे असे लक्षात येते. सभामंडपाच्या दक्षिण दरवाजाबाहेर एक पुरातन शिलालेख आहे. ऊन-पावसाचा मारा खात हा शिलालेख अजून शिल्लक आहे.
कोपेश्वर मंदिराच्या बाह्य बाजूच्या जंघाभाग, देवकोष्ठे आणि अधिष्ठानाच्या थरावर वेगवेगळी आकृतिशिल्पे आहेत. या मंदिरावरील सुरसुंदरी शिल्पे विशेष प्रसिद्ध आहेत. गजथरावर मोठ्या आकाराचे हत्ती असून या हत्तींच्या पाठीवर वेगवेगळ्या देवदेवतांची शिल्पे आहेत. भद्रावरील देवकोष्ठात बैल असून त्यावर शक्तीसह शिव आरूढ झाला आहे. मंडोवरावर नायिका, विष्णूचे अवतार, चामुंडा, गणेश व दुर्गा यांची शिल्पे आहेत. या मंदिराच्या परिसरात काही वीरगळ देखील पहायला मिळतात. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दोन बाजूच्या महाव्दावारात दगडात रांगोळी काढलेली आहे, ती नक्षी कलाकुसर इतकी अप्रतिम आहे त्यावर पाय ठेवायला सुद्धा नको वाटते. मंदीर पहाता पहाताच देहभान हरपून जाते, किती मोठा विलक्षण अनमोल ठेवा अशा ऐतिहासिक मंदिराची देखभाल ठेवली पाहिजे पिढ्यांन पिढ्या ही प्रतिक, इतिहासाची साक्ष जतन करून ठेवायला हवीत. मंदीर पहाता पहाताच सवसांज झाली होती सुर्य मावळतीला गेला होता. मंदीर आता काळोखाच्या पडदयाआड जाणार होते. पुन्हा एकदा कोपेश्वराचे दर्शन घेतले आणि पुढील प्रवास सुरू केला...

हेच ऐश्वर्य जणू स्वर्गाचा मळा
जळी स्थळी पाषाणी देव भोळा
कृपा करितो अखंड भक्तावरी
कोपेश्वर महादेव धावे वेळोवेळा..

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

सत्य संकल्पाचा दाता! आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा!

सत्य संकल्पाचा दाता! आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा.. संदीप राक्षे✍🏻 संत तोचि जाणा!  जो देही उदार!! म्हणजे खरा संत तोच ...