*पाहुनिया दिपोत्सवाचा सोहळा*
*दाटला सिद्धबेटाचा गळा!*
आज सिद्धबेटावर भाविकांची मांदियाळी असुन सुद्धा वातावरण धीर गंभीर होते.. इतर वेळेस सिद्धबेटावर जे चैतन्य असते ते थोडे लोप पावले होते... पक्ष्यांचा किलबिलाट नव्हता, अजानवृक्षाची पाने आज सळसळत नव्हती,मातीचा गंध सुद्धा दरवळत नव्हता. या सर्वांचे कारण होते आजच्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज समाधीला याच सिद्धबेटावरून गेले होते. याच समाधी दिनाचे औचित्य साधून पं कल्याणजी गायकवाड संगीत कला अकादमी व संत गाडगेबाबा प्रतिष्ठान च्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही दिपोत्सवाचे आयोजन केले होते..ग्रिनीज बुक विजेती राजश्री जुन्नरकर यांनी आपल्या रांगोळीने सिद्धबेटाचा संपूर्ण परिसर सुशोभित केला होता,संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिकृती तिने रांगोळीत साकारली,सिद्धबेटावरील अनेक झोपड्यांच्या कडेला रांगोळीने सडा घातला.साक्षात माऊलींच्या सहवासाने पावन झालेला हा परिसर रांगोळीने सजुन गेला होता. गौरव राक्षे,गजानन साप्ते संकेत,रितेश,श्रद्धा राक्षे यांनी रांगोळीवर पणत्यांची मांडणी केली..आता सुर्यास्त झाला होता, सिद्धबेटावर काळोखाचे साम्राज्य पसरले होते...दिपोत्सवासाठी भाविक भक्तांची गर्दी जमु लागली... आपल्या हातुन सुद्धा या सिद्धबेटावर एक तरी दिवा पेटवावा या भावनेने सर्वजण स्तब्ध होती.. सात वाजता पं. कल्याणजी गायकवाड, महागायिका कार्तिकी गायकवाड, महागायक कौस्तुभ गायकवाड, कैवल्य गायकवाड यांचे आगमन झाले. या सर्वांच्या शुभहस्ते नंदादीप पेटवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .. एक एक करीत हजारो दिवे पेटले गेले आणी या उजेडात संपुर्ण सिद्धबेट उजळून गेले...इतक्या वेळ अजानवृक्षाची पाने शांत होती ती सळसळू लागली..पण दिवे मात्र शांत तेवत होते.. दिव्यांच्या प्रकाशात अजान वृक्षाची पाने सुवर्णमय झाली होती. हा क्षण पाहुन सर्वांचे नेत्र तृप्त झाले होते. दिपोत्सवाचा कार्यक्रम उरकल्या नंतर भजनाचा कार्यक्रम सुरू झाला भजन सम्राट आदिनाथजी सटले यांनी माऊलींचा विवेका सागरा हा अभंग गाऊन संगीत रजनीची सुरवात केली...कैवल्य गायकवाड,महागायक कौस्तुभ गायकवाड यांनी सुद्धा अभंग गाऊन वातावरण चैतन्य आणले.. आज संजीवन समाधीचा दिवस, *देव निवृतीयाने धरिले दोन्ही कर!*
*जातो ज्ञानेश्वर बैसावया!!*
हा समाधीपर अभंग पं.कल्याणजी गायकवाड यांनी गायला सुरवात केली अन संपूर्ण सिद्धबेट शांत झाले.आजुबाजुला गप्पा मारणारी मंडळी एक चित्त होऊन अभंग ऐकू लागली. गुरुजींचा चैत्यन्यमयी आवाज आज अभंग गाताना भावनिक झाला होता.. त्यांचा गळा दाटून आला हे त्यांच्या गायनातुन स्पष्ट जाणवत होते,अभंग ऐकणा-या भाविकांचे डोळे पाणावले होते. साक्षात चित्रमय समाधी सोहळा डोळ्यासमोर उभा रहात होता..गाता गाता गुरूजी खुपच भावनिक झाले होते.. थोडे शांत झाले..आणी पुन्हा गायला सुरवात केली..काय वातावरण होते खरच असले अनुभव मनाला स्पर्शून जातात,हदयात घर करून राहतात... केलेल्या दिपोत्सवाचे सार्थक झाल्या सारखे वाटत होते. माझे डोळेही भरून आले होते कडा ओल्या झाल्या होत्या..भावना कधीही दाटून येत नाही असे प्रसंग आयुष्यात नशिबानेच येतात....
*नामा म्हणे आता लोपला दिनकर!*
*बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ!!*
या भावपूर्ण अभंगाने कार्यक्रमाची सांगता झाली..
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजेश टाकळकर,आदिनाथदादा सटले, राजश्री जुन्नरकर साहेबराव कवडेकर,बळवंतजी पांचाळ,तुकारामजी पांचाळ,अमोल नवपुते,गजानन साप्ते,रामदास ठोंबरे, संतोष साळुंखे यांनी मोलाचे सहकार्य केले....
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पवना बँकेचे मॅनेजर युवराज घुले साहेब, विकास सांडभोर साहेब, संगीतकार नरेंद्र जकाते सर उपस्थित होते...
*लेखन: -संदिप राक्षे✍🏻*
No comments:
Post a Comment