Thursday, 14 December 2017

ही वाट दुर जाते

ही वाट दुर जाते स्वप्ना मधील गावा....

शिखरावर जाण्यासाठी वाट शोधावी,
ध्येयासाठी निराशा नसावीच
आल्या कितीही अडचणी जरी,
यशासाठी थोडी "पायवाट" पहावीच,

लहानपणीची ही वाट कुठे घेऊन जाणार मनातली स्वप्न आशा आकांक्षा पुर्ण होतील की नाही ही मनातली शंका,भविष्या बद्दल अनभिन्नता,आज पुन्हा त्याच वाटेवर चालताना खुप काही आठवले, मामाच्या शेताकडची ही पाय वाट कळायला लागले तेव्हा पासुन उघड्या पायांनी तुडवलेली लाल माती,आजु बाजुला डोक्या पेक्षा वाढलेले उंच गवत मनात भिती निर्माण करणारी वा-याची सळसळ, लहानपणापासूनच भविष्याची स्वप्न या वाटेवरच पडायची त्या वाटेवर चालायला लागलो की मनात असंख्य विचारांची गर्दी दाटायची पण कोवळ्या मनाला काहीच कळत नव्हते पण जसा जसा मोठा होत गेलो तसा मनात येणारे विचार सत्यात उतरविण्याचा प्रयत्न करू लागलो, कधी हारायचो पडायचो ठेच लागायची पण पुन्हा लढायचो,याच पायवाटेचे इतके आकर्षण वाढले की तासनतास याच पायवाटेवर घालवायचो, लहाणपणी तर मला या वाटेचे इतकी भिती घालुन दिली की या वाटेवरच एक पिंपळाचे उंच उंच झाड होते त्या झाडावर टोळ(सापाचा एक उडणारा प्रकार) राहते व ती लहान मुलांचा टाळू फोडते थोडे दिवस भीतीपोटी या वाटेकडे फिरकलोच नाही. ही दंतकथा होती हे कळल्यावर पुन्हा त्याच पायवाटेकडे पाय फिरू लागले...चैत्राच्या महिन्यात पायवाटेच्या कडेने असलेली पांगीराची फुल इतकी बहरून यायची की त्या वाटेवरून चालताना मी एखाद्या नगरीचा राजा आहे आणी माझ्या स्वागतासाठी ही निसर्गाने केलेली सजावट आहे असे वाटायचे, एक एक मनातील कल्पना खरच आनंदायी होती. आज पुन्हा त्या वाटेवर चालताना ते दिवस आठवत होते मनातल्या मनात हसु येत होते. किती सहज एखाद्या स्वप्नाचा विचार करीत होतो. साक्षात उतरवताना किती दिव्य करावे लागते याची यत्किंचीत ही कल्पना मनाला शिवली नव्हती पण आज त्या वाटेवर चालताना आयुष्याची वाट किती खडतर असते,बिकट परस्थितीच्या वाटेतुन मार्ग काढताना किती ओढाताण होते. आयुष्य कमी आणी स्वप्न मोठी ती साकारण्याच्या नादात शरीराची व मनाची झालेली झीज न भरून येणारी. उगीच मोठे झालो असे वाटायला लागले...वलणदांड एक असा जीव की तो विमानाच्या आकाराचा असायचा त्याच्या मागे धावताना आकाशातील विमानांची आठवण व्हायची त्याला पकडायच्या प्रयत्नात कितीतरी वेळा पायाची ढोपर फुटायची पण कधीच पडल्याचे दुख जाणवायचे नाही. पाऊलवाटेच्या कडेच्या गवतावर पहाटेचे दव पडायचे त्यावर सुर्योदय झाला की हे दव असे काही चमकायचे जसा सप्तरंगी फुलांचा सडाच, त्या गवतावर हात फिरवला की ते दव खाली पडायचे, हात ओले व्हायचे, तोच हात तोंडाला पुसायचा आणी तोंड धुतल्याचे समाधान घ्यायचे, अशातच एखादे गाणे आठवायचे ते गात गातच इनाबात(मामाची शेती होती त्या ठिकाणाला नाव होते इनाब) जायचे.. या पाऊलवाटेने खुप प्रेम दिले म्हणून आजही या पाऊलवाटेवर माझे खुप प्रेम आहे.. कधीही बहुलीला मामा कडे गेलो या की जीवलग पाऊलवाटे कडे जातोच मनसोक्त चालण्याचा आनंद घेतो ...लहानपणीच्या आठवणी जागवतो कारण याच पाऊलवाटेने खुप काही शिकवले,मला घडवले,या लाल मातीच्या गंधाने मला दरवळायला शिकवले,भर कडक उन्हात अनवाणी पायाने चालणारी पाऊल अजुनही आठवतात पण कधी या लाल मातीचा चटका बसलेला आठवत नाही. याच पाऊलवाटेवरचे भिंडीचे झाड आठवते त्या झाडावरील फळांचा पिवळा रंग काढुन त्याच रंगात रंगपंचमीच्या दिवशी भिजवलेले सवंगडी याच पाऊलवाटेने नदी कडे जाताना या पाऊल वाटेची लाल माती एकमेकांच्या अंगावर उधळीत ते दिवाळ सणाच्या उटण्याची आठवण करून देत इतकी सुंदर माती तिचा स्पर्श शरीराला एक वेगळीच अनुभूती देत. या पाऊलवाटेच्या मातीने गंध स्पर्श इतकेच नव्हे तर पंचमहाभुतांचे संस्कार ही दिले.असाच एकदा दुपारचा प्रहर शाळेला सुट्टी होती पावसाळ्याचे दिवस होते, भातलावणीची लगबग होती.माझी ड्युटी भात लावणीकडे लागली मैंगावर(भात खाचरातील चिखल एकत्र करण्याचे अवजार)बसण्यासाठी पाऊलवाटेने पुढे पुढे जात होतो..भात खाचर तुडुंब पाण्याने भरलेली पाण्यातून वाट काढीत काढीत पाऊलवाटेला लागलो..पाऊलवाटेवर सुद्धा पोटरी इतका चिखल होता..पहिला पाऊल चिखलात टाकला आणी मऊ लोण्या सारखा स्पर्श जाणवला,दुसरा पाऊल टाकला अन घसरतच चिखलात पडलो मलाही कारण हवे होते मनसोक्त उड्या मारायला,आता संपूर्ण चिखलाने सर्व कपडे आणी अंग भरून गेले होते. पाठीमागून येणाऱ्या मामाने हा प्रकार पाहिला आणी चिखल तुडवावा तसा चिखलात तुडवला रडत रडतच घर गाठले पुन्हा पाऊलवाटे कडे फिरकलोच नाही.आता मामाच गाव सुटल आणी भोसरीत आमच बस्तान बसल नविन शाळा नविन मित्र पण मन कुठेच लागत नव्हते आठवण यायची ती मामाच्या गावाची आणी त्या पाऊलवाटेची,आता मामाच्या गावाला जायला मिळायचे वर्षांनी उत्सवासाठी तो दिवस म्हणजे आयुष्यातला महत्वाचा दिवस बनुन गेला..पुणे मंडईत ट्रक मधे बसायचे आणी मामाचे गाव गाठायचे उतरतो ना उतरतो तोच घर गाठायचो आणी इनाबात जाण्याचा बहाणा करून त्या पाऊलवाटेतच रमायचो, कारण त्या पाऊलवाटेत माझी नाळ जोडलेली असावी म्हणूनच त्या लाल मातीशी माझे नाते जुळले,आता कामाच्या व्यापामुळे सहसा जाणे होत नाही पण गेलो तर त्या पाऊलवाटेवर दोन मिनिट का होईना थांबल्या शिवाय चैन पडत नाही....
माणसांशी नाती सहज जोडली जातात पण अबोल अशा पाऊलवाटेशी माझे नाते कसे जुळले अजुनही मी निरुत्तर आहे....
माझी प्रकाशवाट म्हणजेच ही पाऊलवाट....

लेखन: - संदिप राक्षे ✍🏻

No comments:

Post a Comment

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...