"जगाचा मध्यबिंदु चिखलदरा (मेळघाट)"
कमाल आहे निसर्गा तुझी
सुंदरता किती वर्णू मी तुझी
दुरवर पसरली हिरवी चादर
निळे आकाश जणू आईचा पदर
फुलांचा पाऊस पडतो जसा
देवाने दिलाय आशिर्वाद जसा
पाहूनी फुलपाखरांचे रंग
मनात उठती हर्ष तरंग
तलावं पाण्याने भरली तुडूंब
तहान भागते जसे सुखी कुटूंब
निसर्गाची किमया ही भारी
गारठलेे मन माझे भर दुपारी
पाय माझा निघता निघेना
डोळ्या समोरुन स्रृष्टी ही हटेना
नको ते क्रृत्रिम जीणे मजला
निसर्गाचा सहवास सुखावतो मनाला!
चिखलदरा (मेळघाट) येथील वर्णन अनेक पुस्तका मधुन वाचले अनेक कविता वाचल्या पण कधी योग आला नाही तिथे जाण्याचा कारण जगाचा मध्यबिंदु असलेला चिखलदरा खुप दुर वाटायचा. पण तेथे जाण्याचा योग जुळून आला. जाताना मी व माझे मित्र सोबती मारूती तायनाथ होते. थोडी मनात भिती होती इतक्या दुर दोघेच जण कसे जायचे पण इच्छा तिथे शक्ती माऊलींचे नाव घेतले आणि प्रवासाला सुरवात केले. निसर्ग रम्य परिसर यामुळे परतवाडा (अमरावती) चिखलदरा चा पायथा कधी पोहचलो हे कळाले सुद्धा नाही. रात्र झाली होती. बहुतेक जणांनी सांगितले होते घाटातुन रात्रीचा प्रवास करू नका. पण ओढ मेळघाटाची शांत बसुन देत नव्हती. निश्चिय केला. आत्ताच निघायचे पण मनात भिती होतीच, मन सैरवैर होत होते , रात्री कोणी अडवले तर आपण दोघेच काहीच करू शकणार नाही. मन घट्ट केले आणी प्रवासाला सुरवात केली. थोड्या अंतरावर जात नाही तोच भले मोठे अजगर रस्त्यावरून शांत सरपटत होते. आता मात्र ठोके वाढले होते. गाडी थांबवली त्याला जावुन दिले अन मग पुन्हा प्रवास सुरू केला. सुरवातच अशी तर अजुन पुढे काय विचारात मन गेले. चढाव सुरू झाला. गाडीच्या उजेडा कडेच टक लावून गाडी चालवित होतो. समोरून एखादी गाडी दिसली तर जीवात जीव येत होता. शांत मन सैतान घर आता खरे वाटत होते. अनेक नागमोडी रस्ते पार करित अखेर आयुष या रिसोर्ट पर्यंत पोहचलो आमचा रात्रीचा मुक्काम तिथेच होता तिथुन पुढे चिखलदरा बराच दुर होता. सकाळी उठलो खुपच सुंदर स्वप्न मय वातावरण दिसले रात्रीचा ताण क्षणार्धात कमी झाला. आंघोळी उरकून लगेच गाडीत बसलो आणी प्रभातसमयी प्रवास सुरू झाला. मिणमिणते दिवे, कारवीची घरे आता राहिली नव्हती आता बदल झाला होता जे अगोदर कुपोषित होते ते आता सदन झाले. येथे येणारे कवि लेखक सांगतात येथे आलो की रहायची सोय नसायची कोणाच्या तरी झोपडीचा आधार घ्यायचा ते ऐकल्यावर तुकडोजी बांबाच्या "या झोपडीत माझ्या" या कवितेची आठवण झाली. आता झोपडी जाऊन मोठमोठी रिसोर्ट झाली होती. पण निसर्गा पुढे हे सर्व झुठ वाटत होते. आता आम्ही पोहचलो होतो भिमकुंड पाॅईन्ट वर गाडीतुन खाली उतरतो तोच असंख्य फुलपाखरे आपल्याच स्वागता साठी भिरभिरत आहेत असे वाटत होते. अंगाला झोंबणारा गार वारा आपलेच राज्य आहे असे भासवत होता. निळया पांढ-या पिवळया लाल गवत फुलांनी डोंगर द-यांनवर आपला गालीच्या आच्छादलेला होता हे नयनरम्या स्थळ पाहुन मनाला खुप हर्ष होत होता. दुरून खाली खोल दरी मध्ये पाणतळी दिसत होती. त्यावर सुर्य किरण पडत होते. तसे ते पाणी चमकत होते. ते चमकणारे निळे पाणी चांदी सारखे चमकत होते. दिव्य काहीतरी दिसावे असे हे निसर्गाचे स्वरूप दिसत होते. हे ठिकाण पाहुन आम्ही निघालो "गावीलगड किल्ला" हे खरे आकर्षण व स्वाभिमान चिखलद-याचा. या किल्याचे मुळ बांधकाम येथील गवळी राजाने सर्वप्रथम 12 व्या शतकांत मातीच्या भिंतीत बांधला होता. इ.स.1680 मध्ये संभाजी महाराजांचे वास्तव्य इथे होते त्यानंतर इ.स 1718 मध्ये राजाराम महाराजांचे वास्तव्य होते अशा महापराक्रमी मराठा राज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडावर माझा ही जाण्याचा योग येत होता मी मला भाग्यवान समजत होतो. पहिल्या दरवाज्या जवळ पोहचलो आणी गडाची माहिती मिळाली दहा जिवंत पाण्याची तळी व दहा दरवाजे असणारा हा किल्ला. अत्यंत सुरक्षित चारी बाजुंनी डोळे गरगरतील अश्या खोल द-या होत्या. हे सर्व साम्राज्यापाहुन तो काळ कसा असेल किती किती कष्ट पडले असतील गड किल्ले निर्माण करायला हे सारे उभे करायला. किल्ला चढत असतानाच या चार ओळींची आठवण झाली छाती अभिमानाने फुलली.
भरून कड्या कपारी फिरूनी
एक एक सवंगडी शोधीला ।
अमोघ वाणीने त्यांच्यातील
मराठी बाणा जागविला ॥
शुन्यातूनी विश्व निर्मिले
दिली झुंजार कडवी झुंज ।
टक्कर देऊनी महासाम्राजांशी
उतरविला दुष्टांचा माज ॥
रयतेचा वाली गरिबांचा राजा
सज्जनांचा कैवारी ।
ऐसी ख्याती शिवशंभुची
दुमदुमते भूवरी ॥
पहिल्या दरवाज्या पर्यंत पोहोचलो तिथे डागडूजीचे काम सुरू होते. पहिला दरवाजा पार करून एका घळीतुन वाट काढीत आमचा प्रवास सुरू होता. आजुबाजुला मोठमोठी कडीपत्याची झाडे होती त्याच्या सुवासाने संपूर्ण परिसर दरवळून गेला होता.आमचा उत्साह वाढत होता. आजुबाजुला फक्त चिटपाखरे आणी आम्ही दोघेच चालत होतो. सहसा या किल्ल्याकडे कोणीच जास्त येत नाहीत. पहिल्या दरवाज्यापर्यंत पर्यटक येतात आणी तिथेच फोटो काढून माघारी फिरतात पण आम्ही संपूर्ण किल्ला पहायचा हा निश्चय केला होता.मोठा चढाव सुरू झाला होता पण हवा इतकी होती की उन्हाचा काहीच परिणाम आमच्या वर होत नव्हता.अखेर किल्ल्यावर पोहचलो, निसर्गाने अफाट देण दिलेला हा किल्ला जरी पडझड झाली असली तरी ताजातवाना भासत होता. एक छान तळे दृष्टीस पडले आणी चकित झालो इतक्या उंच भागात हा भरलेला तलाव पाहुन खरच खुप आनंद झाला. जुने बांधकाम असलेला तलाव अजुनही चांगल्या अवस्थेत होता. फिरता फिरता सहज तायनाथ यांची नजर जमिनीवर गेली आणि थोडा वेळ काळजात धस्स झाले. त्यांनी पाहिले होते बिबट्याच्या पायाचे ठसे इकडे तिकडे पाहिले तसेच उभे राहिलो, पुढे जाण्याचे धाडस होईना कारण पाणवठा म्हणजे सर्व वन्य प्राणी जवळ असणारच खात्री पटली. थोडी एखादी जाळी जरी वा-याने सळसळली तरी तिकडे लक्ष जाई मनात अनेक विचारांनी घर केले, भिती वाढली होती. आम्ही एकमेकांन कडे पाहुन हसत होतो. कारण दोघेही भिलेले होतो. तसाच अर्धवट किल्ला पाहुन परत निघायचे ठरले, पण अजुन एक सभा मंडप दृष्टीला पडला तिथे तरी जाऊ आपण, पुन्हा निर्णय बदलला. कसा तरी जीव मुठीत धरून सभामंडपा पर्यंत पोहचलो खुप सुंदर कोरिव काम असलेला सभामंडप पाहुन हर्ष वाटला आणी किल्ल्यावरून काढता पाय घेतला. या गडाची एक विशेषता अनुभवली गड चढताना अजिबात त्रास होत नाही पण खाली येताना मात्र त्रास होतो. हा वेगळा अनुभव घेऊन गाडी पाशी आलो आणी आता प्रवास सुरू झाला पंचबोल या पाॅईन्ट कडे वाटेत दोन आदिवासी आश्रम शाळांना भेट दिली. तिथल्या मुलांशी गप्पा मारल्या आश्रमात राहून सुद्धा निसर्ग सान्निध्यात असल्यामुळे फुला सारखे मुलांचे चेहरे टवटवीत वाटत होते. वाटेत महुआ तोडणारी बरीच मंडळी दिसली महुआ म्हणजे त्या फुलांपासुन मद्य बनविले जाते ते, स्वताःचा उदरनिर्वाह चालावा म्हणून येथील मंडळी हि फुले विकून पैसे मिळवित, असे अनेक अनुभव अनुभवत प्रवास पुढे सरकत होता. पंचबोल हे ठिकाण आले आणि माकडांची गर्दी जमु लागली प्रत्येकाचे लक्ष आमच्या हाता कडे होते, काही मिळते का शोधत होते. पाच कड्यांनी जोडलेला हा दरा खुपच भयानक दिसत होता.चारही बाजुंनी अंधार दिसत होता आणी मध्येच सुर्याची किरणे तेथील पिवळया फुलांच्या झाडावर पडून संपूर्ण डोंगराच्या कडा भंडारा उधळवा तश्या दिसत होत्या.मोठ्यानी माऊली असा आवाज दिला त्या आवाजाचे रूपांतर पंचध्वनीत झाले.असा पंचबोल पाॅईन्ट पाहुन डोळ्यांत साठवुन हदयापर्यत पोहोचवले आणी हृदयाची स्पंदने उत्साहित झाली. चिखलदराच्या पायथ्याशी आलो तेव्हा पं कल्याणजी गायवाड यांचा भैरवी रागातींल अभंग सुरू होता.आम्ही जातो तुम्ही कृपा असु द्यावी सकळा सांगावी विनंती माझी. भजन संपवताना ज्या प्रमाणे भैरवी गाऊन भजनाची सांगता होती तशीच आमच्या प्रवासाची हि सांगता भैरवी ने झाली.
ललित लेखन. संदिप राक्षे
भोसरी पुणे 26
Thursday, 14 December 2017
चिखलदरा(मेळघाट)
Subscribe to:
Post Comments (Atom)
पेडगावचा धर्मवीर गड
शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...

-
"परिक्रमा ब्रम्हगिरीची निवृत्तीरायाची" आळंदीत दर्शना साठी सिद्धबेटावर गेलो होतो. संध्याकाळची वेळ होती. गाडीवरून खाली उतरलो माऊलीं...
-
नको नको मना गुंतू मायाजाळी* तोरणमाळ मध्ये सकाळचा प्रहर होता पहाटेच सुर्य उगवतीचे दर्शन घेऊन, तलावाचे विहंगम दृश्य पहाण्यात मग्न होतो. रात्...
-
*---आठवण----* *बायको मिळाली जरी पोळी मधाची* *आठवण ठेवावी तु आईच्या दुधाची !* *कडेवर खांद्यावर तु खेळलास वेड्या* *दिनरात मांडीवर त्या लो...
No comments:
Post a Comment