नको नको मना गुंतू मायाजाळी*
तोरणमाळ मध्ये सकाळचा प्रहर होता पहाटेच सुर्य उगवतीचे दर्शन घेऊन, तलावाचे विहंगम दृश्य पहाण्यात मग्न होतो. रात्री तलावात टाकलेले जाळे आणण्यासाठी एक नाव निघाली होती. नावाडी नाव वल्हवीत होता. अचानक एकाने त्या नावाड्याला आवाज दिला. घरून अर्जंट फोन आला आहे लवकर ये. आवाज ऐकताच क्षणी त्याने नाव फिरवली व किना-याकडे आला. पुन्हा घरी फोन लावला तर एक वाईट घटना त्याच्या घरी घडली होती. ती ऐकून तो पटकन खाली बसला आणी रडू लागला. त्याचा जीव की प्राण असणारा मित्र हे जग सोडून गेला होता. मी सुद्धा थोडा पुढे गेलो तो पर्यंत अजुन एक दोघेजण तिथे आली होती. तो तिथे असणा-या नातेवाईकाला त्या मित्राची कहाणी सांगत होता..खुप श्रीमंत होता. पैसा जमीन जुमला नोकर चाकर भरभक्कम पण ऐन तारूण्यात गेला. सकाळी उठल्या पासुन ते रात्री झोपेपर्यंत नशेत असायचा. पहिला इतका गुणी होता की सुपारीचे व्यसन नव्हते. पैसा आला संगती वाढल्या पंगती वाढल्या सर्व सोडून स्वताच्या विश्वात रमायला लागला. खुप जणांनी समजावले पण कोणाचेच ऐकले नाही.. तरूण वयातच किडण्या खराब झाल्या. पैसा असल्याने नातेवाईक श्रीमंत असल्याने त्यांनी त्याला मोठ्या हाॅस्पीटल मध्ये भरती केले किडण्या बदलल्या,थोड्या दिवसात हिंडू फिरू लागला पण मन कुठे स्वस्थ बसुन देते पुन्हा रंगरंगेल पणा सुरू झाला आणी आज त्याचा शेवट झाला..हे त्या नावाड्याचे बोलणे ऐकून थोडा विचारत पडलो आणी तेथुन निघुन आलो..थोडा दुरवर आलो, एका झाडाच्या शेजारी टेकून उभा राहिलो व शांत पणे डोके त्या झाडाला टेकवले, आणी त्या माणसाचे प्रत्येक बोलणे आठवु लागलो. किती पैसा होता,किती जीवन सुंदर होते पण मन आणि विचारांवर संयम न ठेवल्याने, किती वाईट गोष्टींच्या आहारी जावुन तो माणुस संपला. संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेला व भजन सम्राट आदिनाथ सटले यांनी गायलेला अभंग त्याच क्षणी आठवला..
*नको नको मना गुंतू मायाजाळी*
*काळ आला जवळी ग्रासावया!*
*काळाची या उडी पडेल बा जेव्हा*
*सोडवीना तेव्हा मायबाप!*
*सोडवीना राजा देशीचा चौधरी*
*आणिक सोयरी भली भली!*
*सोडवीना भाऊ पाठीची भगिनी*
*शेजीची कामिनी दूरच्या दुरी!*
*तुका म्हणे तुला सोडवीना कोणी*
*एका चक्रपाणी वाचोनिया!*
किती बोधपर अभंग संत तुकाराम महाराजांनी लिहीला आहे. किती दूरदृष्टी होती संताची.
प्रत्येकाने या संत वचना प्रमाणे जीवन व्यथित केले तर ख-या अर्थाने जन्माला आल्याचे सार्थक होते..इथेच करायचे आणी इथेच फेडायचे हा निसर्ग नियम आता या कलयुगी आहे..चांगले कर्म केले तर चांगलेच फळ मिळणार आहे..मन हे मानवाला मिळालेला एक शाप आहे. त्याला जर आवरले तर ठिक नाहीतर भल्याभल्यांना याने आयुष्यातुन उठवले आहे. जितके आपण मनाच्या आहारी जावु तितके ते आपल्याला भलत्याच ठिकाणी रमवते. त्यातूनच वाईट कृत्य आपल्या हातुन घडत जातात. जीवन घडण्या पेक्षा ते बिघडले जाते. म्हणून मनाला चांगल्या कार्यात गुंतवुन ठेवले पाहिजे..आध्यात्मिक मार्गाकडे वळवले पाहिजे.मनाचे स्वास्थ्य चांगले असेल तरच शरीर निरोगी राहते. अन्यथा संपुर्ण व्याधींनी हे शरीर नाश पावते.माणसाचे मरण हि त्याची परीक्षा असते आयुष्यभर केलेल्या वर्तनाचा कर्माचा हिशोब असतो. अध्यात्मदृष्ट्या वरच्या पायरी वर जाण्याची संधी मरण काळी मिळते.परंतु जन्मभर जी उपासना घडली असेल तिचाच त्या वेळी उपयोग होतो. इतर साऱ्या गोष्टी जागच्या जागीच राहतात म्हणूनच *ठेवीले अनंते तैसेची रहावे* *चित्त(मन)असुदयावे समाधान.*
लेखन: -संदिप राक्षे✍🏻
Nice
ReplyDelete