Friday, 15 December 2017

मनुष्य जन्म मिळे एकदा

*मनुष्य जन्म मिळे एकदा*
*जगुन घे रे खुशाल माणसा*
*नको उगी तो घोर जीवाला*
*नको चिंता हसवा आणि हसा*

संपूर्ण आयुष्य कसे जगायचे याचा सारांश मधु यांनी आपल्या चारोळीतुन सांगितला आहे. ती चारोळी खरच प्रत्येक मानवासाठी एक अनमोल वचन आहे. सालाबाद प्रमाणे होळीचा सण निसर्गाच्या सान्निध्यात साजरा करायचा आणी सरलेल्या वाईट गोष्टी, झालेला मान अपमान, तिथेच होलीका मातेला अर्पण करून नविन उर्जा घेऊन नवीन वर्षांत पुन्हा नवीन ध्यास घेऊन सामाजिक जीवन जगायचे. कुठे जायचा हा प्रश्न मनात होता. विनोदभाऊंचा शुक्रवारी सकाळीच फोन आला आपण कुठेही दुर न जाता नाशिकलाच थांबुयात तुम्ही या. शुक्रवारी बँकेतून सुटलो आणी नाशिकचा रस्ता धरला. सोबत माझ्या साथीला माझे दोन परम स्नेही होते एक माझी होंडा अॅमेज गाडी आणी त्यामधील सीडी प्लेअर हे माझे सखेसोबती कधीच मला एकटे पणाची जाणीव करून देत नाही..कधीच रस्त्याने जंगलात अंधारात धोका देत नाहीत..या दोन मित्रांच्या साथीने नाशिकला रात्री बारा वाजता पोहचलो. तो पर्यंत विनोदभाऊ धुळेहुन आले होते.उद्याचे उद्या पाहु असे म्हणून आम्ही झोपी गेलो. सकाळी लवकरच उठलो तो पर्यंत अजिंक्यजी पवार, गिरीशजी रहाणे, अमितजी गायकवाड, हे फ्लॅट वर आले होते. त्यांच्या गप्पा सुरू होत्या मी आंघोळ उरकून त्यांच्यात सहभागी झालो. बोलता बोलता अमितजींचा फोन वाजला तो फोन होता प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) चे प्रमुख विलासजी चौधरी साहेबांचा, साहेब मुळचे अमळनेर जळगावचे पण नाशिक येथेच स्थाईक ते सध्या नवापूर येथे कार्यरत आहेत.  त्यांनी मोबाईवरून निरोप दिला आज सर्वांचा नास्ता माझ्याबरोबर तुम्ही थांबा मी आलोच पंधरा मिनिटात साहेब हजर झाले. RTO चे अधिकारी कडक शिस्तीचे, कडक स्वभावाचे, असा माझा समज होता. पण तो लगेचच खोटा ठरला आल्या आल्या साहेबांनी सेकहँण्ड केला आणी सर्वांना आलिंगन दिले मी भारावून गेलो.. चांगल्या चांगल्यांची बोबडी वळते ते समोर आल्यावर, पण साहेबांची तर वेगळीच झलक पहायला मिळाली.. भेट झाली विचारपूस झाली मनसोक्त गप्पा झाल्या मध्येच गप्पा थांबवत साहेबांनी नास्त्याची आठवण करून दिली.. आणी आम्ही फ्लॅट सोडला. विनोदभाऊंनी त्यांची मर्सिडीज बेंज ही गाडी काढली व बाॅम्बे नाक्याच्या आजुबाजुचा परिसरात पोहचलो. तिथे छान पैकी पोहे आणी जिलेबीचा आस्वाद घेतला..तेथुन आमची गाडी निघाली ती मुंबई च्या दिशेने मला दोन मिनट कुठे चाललो हे सुचेना मग चौधरी साहेबांनीच सांगितले, आपण आपल्या फार्महाऊस वर जात आहोत धारगावला, नाशिक मुंबई रस्ता सोडला आणी गि-हे बिऱ्हाड या गावाकडे टर्न घेतला रस्त्यांच्या दोन्ही बाजुला नुकतीच बहर आलेली फुल पान दिसत होती.. चौधरी साहेबांना शास्त्रीय गाण्यांची खुप आवड त्यांनी त्यांच्या मोबाईल मधुन पं अजयजी पोहनकर व हरिहरन यांनी गायलेले अभिजीत पोहनकरांनी तयार केलेले फ्युजन ऐकवले. विनोदभाऊंनी ते गाडीच्या सीडी प्लेअर शी कनेक्ट केले आणी ते बहारदार संगीत मोठ्या आवाजात ऐकु येऊ लागले, निसर्गाचे सानिध्य आणी संगीत याचा मनमुराद आनंद घेत आमचा प्रवास सुरू होता. होळीचा दिवस, बैलगाडीत आपला परिवार घेऊन वस्तीवर राहणारे शेतकरी नटून थटून गावातल्या घरी जात होते. बैलगाडीतली ती कुटुंब त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट जाणवत होता.. निसर्गाने यंदा भरभरून पीक दिल्याने बळीराजा सुखावला होता...गावच्या होळीसाठी लागणारी पांगीराची लाकड काही तरूण मुल आपल्या खांदयावर घेऊन जाताना दिसत होती..सफेद लाकूड जणु एखाद्या भल्या मोठ्या अजगरासारखे दिसत होते. कधीकाळी घनदाट जंगल असणारे डोंगर ओसाड काळाकुट्ट भासत होते.. मी अमितजी गायकवाड यांना विचारले तुमचा जन्म इथलाच मग तुम्हाला हे डोंगर आठवत असतील त्यांनी सांगितले मी जेव्हा शाळेत होतो घनदाट जंगल मी स्वता पाहिले आहे. आणी रामायणात ज्याचा उल्लेख आहे ते हे दंडकारण्य मग विचार करा, मी हे शब्द ऐकून शाॅक च झालो.. किती निसर्गाची हानी या मानवप्राण्यांनी केली हे पुन्हा दृष्य पहायला मिळाले..

*अरे अरे माणसा नको होऊस निष्ठूर*
*नको संपवु हा निसर्ग नको होऊस दृष्ट*

धारगाव जवळ येत होते दुरवरून वैतरणा धरणातील निळेशार पाणी दिसत होते डोळ्यांना शांत करीत होते. आजुबाजुला आंब्यांची झाडे, व त्याझाडावरील कै-या,  करवंदीच्या जाळी व त्यातील हिरवी कच्ची करवंदे मनाला आंबट करीत होती मुखात आपोआप आंबट पणाची जाणीव होत होती. मनाला संगीत गोडी देत होते. आंबट गोड अनुभव घेत घेत आम्ही चौधरी साहेबांच्या फार्महाऊसवर पोहचलो. पायथ्याशी दोन पाण्याने तुडुंब  भरलेले कॅनॉल वहात होते. रानावनतील पक्षी मनसोक्त या पाण्यात डुंबत होते कोणी आपली तहान क्षमवत होते..गाडी ठिकाणावर पोहचली आमचे स्वागत करण्यासाठी गुलाब फुलांची भली मोठी रांग उभी होती. वा-याच्या झुळके सोबत फुलांचा सुगंध नाकावर येऊन धडकत होता. एका एका श्वासातुन तो सुंगध हदयाला मिळत होता. हदयात चैतन्य स्फुरत होते...निसर्गरम्य परिसर पाहुन मन वेगळीच अनुभूती अनुभवत होते. वसंतऋतुच्या आगमनाने मोहोर फुलांनी संपूर्ण वातावरण गंधीत झाले होते.
तिथेच एका महान कवयित्री अर्चना वासेकर यांची कविता आठवली..

*ऋतू वसंत आला फुलून,*
*नवस्फूर्तीने लता हासली,*
*वृक्ष नटली नवपालवीने,*
*जीवनाची जणू दिशा उमगली।*

*पळस बहरला आनंदाने,*
*लावण्य धरेचे खुलले त्याने,*
*लाल-अबोली छटा रंगीत,*
*पसरवल्या ऋतू वसंताने।*

*आयुष्याच्या प्रत्येक क्षणी,*
*यावा असाच वसंत फुलूनी,*
*जीवनात नवे रंग भरावे,*
*आनंदाच्या रंग छटांनी।*

वनराईत नटलेला चौधरी साहेबांचा हा फार्म हाऊस(रिसोर्ट) पाहुन नेत्र तृप्त झाले. आम्ही सर्वांनी संपूर्ण रिसोर्ट चा फेरफटका मारला. चौधरी साहेबांनी संपुर्ण माहिती दिली. तोपर्यंत सरदारजींनी छान जेवण बनविले होते..छान जेवणाचा आस्वाद घेतला. मनसोक्त निसर्गाचा सहवास लाभल्याने होळीचा दिवस सार्थकी लागला होता. सायंकाळ कधी हे कळलेच नाही. आज होळी असल्याने अमितजी गायकवाड यांचे कडे पुरण पोळीचा बेत होता.   "अन्न हे पुर्णब्रम्ह" सहसा पोळी कधीच खात नाही. पण अमितजी व वहिनींच्या आग्रहाखातर दोन दोन पोळ्या विनोदभाऊंनी आणी मी संपवल्या. त्याबरोबर पोळ्यांची आमटी तर खरच खुप चविष्ट होती. भरपेट पेटपुजा झाली. शतपावली झाली आणी झोपायला गेलो. कालच्या सारखा आज पण उद्या काय करायचे हे ठरवले नाही.
सकाळी उठलो तर आम्ही उठण्या अगोदरच विलासजी चौधरी साहेब आम्हाला उठविण्यासाठी आले होते. मलाच आश्चर्य वाटले इतकी मोठी अधिकारी व्यक्ती, कायम बिझी शेड्युल पण आज पुन्हा आमच्या पाहुणचारासाठी हजर खरच अशीच माणसे कायम हदयात घर करून राहतात.आम्ही फ्रेश झालो काॅफी घेतली अन न विचारता साहेबांच्या गाडीत बसलो.आज फक्त अमितजी त्यांच्या कामामुळे आमच्या सोबत नव्हते, गाडी नाशिक सोडून मातोरी गावाकडे निघाली होती. वाटेत जाताना द्राक्षांच्या अनेक बागा बहरलेल्या होत्या, वृत्तपत्राच्या कागदात अनेक द्राक्षांचे घड बांधलेले दिसत होते. आज धुलवडीच्या दिवशी एक नवीन गाव पहाण्याचा योग येणार होता. गाव सोडून थोड्या अंतरावर साहेबांनी गाडी वळवली आणी गाडी थेट द्राक्षांच्या बागेत घातली..समोर एक व्यक्ती उभी होती साहेबांचे त्यांनी स्वागत केले नंतर साहेबांनीच सांगितले हे माझे चुलत सासरे आहेत. साहेबांनी सर्वांची ओळख करून दिली आदरातिथ्य झाले. समोरच  द्राक्षांचे मोठमोठे घड पाहुन माझे मन स्वस्थ बसेना कधी बागेत घुसतो आणी कधी द्राक्षांचा आस्वाद घेतो असे झाले. प्रत्येकाची स्कॅनिंग करणारे विनोदभाऊनीं हे ओळखले तसे चौधरी साहेबांच्या लक्षात आले. ते स्वता पुढे बागेत शिरले त्यांच्या मागे मी विनोदभाऊ गिरीशजी अजिंक्यजी पण आले. बागेत शिरलो जिथ पर्यंत नजर जाते तिथपर्यंत अनेक घड लटकताना दिसत होते. आंबड गोड द्राक्ष मनसोक्त खाल्ली. साक्षात तोडून खाण्याचा आनंद खरच वेगळा. पोटभरून द्राक्ष खाल्ली. तोपर्यंत पाहुण्यांनी सहा सात द्राक्षांच्या पेटी भरून गाडीत ठेवुन दिल्या. विहिरीतल्या थंडगार पाण्याने चुळ भरली, हातपाय तोंड धुतले, पाहुण्यांचा निरोप घेतला....

*आपल्या माणसांची जाणीव,*
*होते एकटे असल्यावर,*
*आठवतात व्यतीत केलेले क्षण,*
*त्यांची आठवण आल्यावर.*
मु
*मुक्तछंद लेखन:- संदिप राक्षे✍🏻*

No comments:

Post a Comment

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...