Friday, 5 July 2019

हरिश्चंद्र गड

इंद्रवज्राचा नैसर्गिक चमत्कार, चांगावटेश्वरांची चौदाशे वर्षांची तपश्चर्या असे अद्भुत महातिर्थ..
महाराष्ट्राचे केदारनाथ "हरिश्चंद्र गड"


निसर्गरम्य खेड तालुका, मोहिमांची ख्याती भारी! 
गड किल्ले, अन मंदिरांची असते सदा भ्रमंती!
घेऊन सवे साथी सवंगडी, चारी दिशा दौडती!
जपून ऋणानुबंध, वाढवतात निसर्गाप्रती प्रीती!
                       निसर्गरम्य खेड तालुका यांच्या माध्यमातून अनेक मोहिमा सतत पार पडत असतात, गेली अनेक वर्षे अनेक गड किल्ले यांनी सहज सर केले आहेत. प्रत्येक मोहीम यशस्वी करण्यासाठी मुख्य आयोजक किशोर राक्षे, योगेंद्र बुरूडे आयोजक योगेंद्र आंबवणे, अक्षय भोगाडे, सागर थोरात, मयुर गोपाळे, ऋषीकेश गोरे, ज्योती राक्षे हे आघाडीवर असतात. गुड माॅर्निग चित्रपटाच्या निमित्ताने कांचनजी लांघी यांनी मिटींग आयोजित केली होती ती मिटींग संपल्यावर त्यांनी सहज विषय काढला सर आपली भटकंती खुप असते आपल्याला मंदिर गड किल्ले पहायला खूप आवडते आमच्या निसर्गरम्य खेड तालुका यांच्या वतीने "हरिश्चंद्र गड मोहिम" आयोजित केली आहे आपण सहभागी व्हाल का?  मी लगेच होकार दिला. कारण हरिश्चंद्र गडाविषयी ऐकले होते पण पाहिला नव्हता.. योगायोगाने शनिवार होता आणि दुस-या दिवशी माझ्या सुट्टीचा वार रविवार होता. शनिवारी रात्री 9 वाजता भोसरीतून गाडी होती. एखादे नविन ठिकाण पहायचे म्हटले की उत्सुकता लागून राहते व ती वेळ कधी येते असे होते..
खरतर अशा मोहीमेला जाण्याची माझी पहिलीच वेळ होती. त्यामुळे तयारी अजिबात नव्हती, रात्री नऊ वाजता तळेगावहून लक्झरी बस भोसरी चौकात आली आणि पुढचा प्रवास सुरू झाला. भोसरी ते राजगुरू नगर पर्यंतचे सर्व सदस्य घेत घेत प्रवास सुरू होता. मध्यरात्रीला अकोले शहर सोडून जंगल रस्ता सुरू झाला होता. पाऊसाचा जोर होता त्यामुळे ड्रायव्हरला गाडी चालविण्यास अडढळा येत होता. दोन्ही बाजूने घनदाट झाडी, त्यात रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडलेले, क्लच दाबून दाबून ड्रायव्हरचे पाय बहुतेक दुखत असतील कारण पुढची चाकं हळूच उतरवित असे आणि मागची चाके जोरात आदळत असे. मध्यभागी बसणारे फूट फूट उडत होते. पण प्रवास छान सुरू होता. कोतुळ गावाच्या पुढे घाट सुरू झाला होता गाडी मोठी असल्याने टर्नला त्रास होत होता ट्रेकिंग गृपचे सदस्य उतरून गाडीला पाठीमागून दगडाची उटी लावीत होते, कारण गाडी कुठे ही फसू नये म्हणून, घाट संपून गाडी सरळ रस्त्यावर चालली होती. अचानक गाडी समोर एक नागाचे लहान पिल्लू आले ड्रायव्हर ने गाडी थांबवली त्या पिल्लाच्या मागे अजून दोन नाग होते गाडी थांबविल्यावर एका नागाने रस्ता क्राॅस केला व दोन नाग तसेच रस्त्याच्या कडेला थांबले , ड्रायव्हरने गाडी पुढे काढून घेतली.. ड्रायव्हर जागेवर थांबल्याने त्या तीन नागाच्या पिलांना जीवदान मिळाले होते. खरतर निसर्गाच्या ठिकाणी आपण फिरतो आणि प्राणी, पक्षी, किटक यांच्यावर अतिक्रमण करीत असतो खरच आपण त्यांना त्रास होऊ नये याचे भान सर्वांनीच ठेवायला हवे.     
                  सकाळी सहाला आम्ही हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याला पोहचलो होतो. अंधाराचे साम्राज्य संपून उजेडाने ताबा घेतला होता. पक्ष्यांची किलबिलाट जल्लोषात सुरू होती त्याच जल्लोषात पाऊस पण पडत होता. धुक्यांनी आजूबाजूची गावं घर डोंगर वेढलेली होती. जसं जसा दिवस उगवत होता तसे धुक्यांच पांघरून बाजूला होत होते. पाऊस पाहून तर मला थंडीच भरली होती हरिश्चंद्र गडा कडे पाहून तर अवसानच गळाले होते. कारण पावसा पासून बचावासाठी ना रेनकोट ना जर्किंग आणले होते. गाडीतील प्रत्येक जण तयारीत आले होते. प्रत्येक जण फ्रेश झाले, चहा नास्ता घेतला. मोहिमेच्या तयारीत सर्वजण सज्ज झाले वाट पहात होते ती किशोर सरांच्या परवानगीची, पण माझे मन गडावर चढण्यासाठी तयार होईना कारण रस्ता अवघड त्यात पाऊस भिजत भिजत जावे लागेल अन भिजत भिजत उतरावे लागेल, गाडीतून उतरून एका घरा जवळ जावून थांबलो, अनेक पर्यटक या मोहिमेसाठी आले होते..कोणी गाणी म्हणत तर कोणी एकमेकांच्या हाताला धरून चालत होते. मुंबईची एक टीम छत्रपतींचा पोवाडा गात पुढे चालत होती. तो पोवाडा अलिकडेच सोशल मिडीयावर खूप गाजला होता. लोकल मधे प्रवास करताना तो पोवाडा शूट झाला आणि प्रचंड व्हायरल झाला होता.. त्या पोवाड्याची चाल व शब्द मनावर पहिलेच गारूड करून होते तेच इथे पण ऐकले...

महाराष्ट्राचा भगवा झेंडा ऽऽऽऽऽऽ
रायगड किल्यावर....
हाती तलवार होती जयजयकार
हर हर महादेव हर महादेव

जिजामातेच्या पोटी जन्मली महाराष्ट्राची शान
हिंदवी स्वराज्यसाठी केला मोलाचा तो पण
आठवू आपण त्यांचा प्रताप करूया जयजयकार
हाती तलवार होती जयजयकार
हर हर महादेव हर महादेव

हे शब्द आणि चाल कानावर पडली अन अंगावर सरसर काटा उभा राहिला. आपोआप अंगात उर्जा संचारली, अन गड चढायला बळ मिळाले..
                  मोहीमेचे आयोजक किशोर राक्षे यांनी सर्वांना जवळ बोलवले व संपूर्ण गडाची माहिती दिली. स्वत:ची काळजी कशी घ्यायची या टीप्स दिल्या तसेच गडावर जाताना किंवा उतरताना कसलाच कचरा करायचा नाही. बिसलरची बाटली जरी सोबत घेतलीत तर ती सुद्धा कुठेही फेकून न देता परत आपल्या सोबत आणून गावातील कचरा कुंडीत टाकायची, गड चढताना सर्वांनी सोबतच चालायचे, गडबड गोंधळ करायचा नाही. या टीप्स सर्वांनी शांत पणे ऐकून घेतल्या. समुहाचा एक फोटो काढला जेणे करून या आठवणी कायम स्वरूपी स्मरणात राहतील...
                   आज धुकं आणि पाऊस जास्त होता. ओढे नाले तुडूंब भरले होते खळखळणारा आवाज निरव शांततेला भेदत होता. अशातच आम्ही सकाळी सात वाजता सर्वजण गडाकडे मार्गस्थ झालो. चालणा-या पायीवाटेवर चिखल चिखल साचला होता. त्यामुळे घसरडे झाले होते. चालतानाच पाय सटकत होते प्रत्येक जण एकमेकांना आधार देत होता. काही ठिकाणी सरळ उंच पाय-या होत्या पण बरेचसे दगड निसटल्याने त्यावरून चालणे पण कठीण झाले होते. वरूणराजा बरसत होता त्यामुळे चालताना कितीही दम लागला तरी अंगातून घाम काही केल्या निघत नव्हता त्यामुळे गड चढायला काहीच वाटत नव्हते. थोडे चढत, थोडे थांबत, थोडा आराम करीत आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेत शिववारी सुरू होती. अंगावरचे संपूर्ण कपडे आता भिजले होते. काही अंतर चढून गेलो पुढे कपारिच्या कडेने छोटासा रस्ता लागला होता तो पार करताना खूप काळजी घ्यावी लागत होती कारण एका बाजूला मोठे कातळाचे दगड आणि दुस-या बाजूला खोल दरी होती. कपारीत काही गुहा होत्या प्रत्येक जण त्या गुहेचा आरामासाठी वापर करीत होता. इतका कठीण रस्ता यापूर्वी केदारनाथलाच पाहिला होता. जस जसे अंतर कापीत होतो तसतसे उंचावर जात होतो.. खाली पाहिले तर निसर्गाचे विहंगम दृष्य दिसत होते. खाचर पाण्याने भरून वहात होती.. जिकडे पहावी तिकडे हिरवाईचा शालू नेसलेली धरतीमाता अतिशय सुंदर दिसत होती. काही क्षणाला तर असे वाटायचे की आपण महाराष्ट्रात नसून देवभुमी उत्तराखंडलाच आहोत. कपारीचा अवघड रस्ता पार करून पुढे आलो होतो. असंख्य धबधबे आजूबाजूला दिसत होते वा-याने काही पुन्हा उलट्या दिशेने वहाताना दिसत होते. ठिकठिकाणी कारवीची झाडं एक सारख्या उंचीत दिसत होती त्यामुळे जंगलाच्या आत मधे काहीच दिसत नव्हते, काही गोलाकार वनस्पती झुपकेदार डुलत होती जणू काही संपूर्ण डोंगराईवर चहाचे मळेच फुलले आहेत असे दिसत होते. मंदीर अजूनही खुप उंचावर होते. अजून बराच पल्ला चढायचा होता. आजूबाजूला निसर्गाचे देखणे रूप पाहून मन हर्ष उल्हासित होत होते. इतके उंचावर आलो पण तरी अजिबात थकवा जाणवला नाही की इतके भिजूनही साधी शिंकही आली नाही. हा सारा इथल्या आयुर्वेदिक वातावरणाचा परिणाम होता. आजूबाजूला जंगली आयुर्वेदिक झाडं फुलं वेली दिसत होत्या खरच इथे आयुर्वेदाचे भांडारच फुललेले दिसत होते. आता वारा सुरू झाला होता, ढगांनी तर इथे आपला ठियाच मांडला होता. वा-यामुळे काहीवेळ विसावा घेत असलेले पांढरे शुभ्र ढग सैरवैर झाले होते. जसे ढग दूर झाले तेव्हा हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराचा कळस दिसू लागला होता. वातावरणात प्रचंड आध्यात्मिक ऊर्जा भासत होती. जसजसे मंदिर परिसराच्या जवळ जात होतो तसतशी वारा आणि पावसाने एकत्रित हजेरी लावली होती. हिरवाईच्या नगरी मध्ये कातळाच्या दगडातील मंदिर चमकताना दिसत होती. जणू काही हिरे माणिक मोत्यांनी सजवलेली असावीत, पाऊसाच्या सरी त्या दगडावर पडून त्याचे रुपांतर थेंबात होत असे काही काळ त्या दगडावर स्थिरावत, काही वेळाने वातावरण बदलत सुर्याची किरणं त्या थेंबावर पडत असत त्यामुळे थेंब सप्तरंगात चमकताना दिसत होते. खरच अद्भुत नजारा दिसत होता. काही क्षण जागेवर स्तब्ध उभा राहून या देवाजीची करणी पहात होतो. उभ्या आयुष्यात असे दृश्य कधीच पाहिले नव्हते. जमीनीपासून ४८५० फुटांवर असलेले तारामतीचे शिखर त्या शिखरावरून वाहत येणारी मंगळगंगा नदी जणू काही मुळ गंगानदीच दिसत होती पण पुढे वाहत आल्यावर हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराच्या गर्भगृहाखालून भगवान महादेवांच्या चरणकमळांना स्पर्श करून गोमुखावाटे पुढे उगम पावत आहे. जे जे पहात होतो ते चमत्कारिक होते हे नक्कीच! आता हरिश्चंद्रेश्वराच्या मुख्यव्दाराजवळ आलो होतो.
उभा राहतो ना राहतो तोच एक अनोळखी व्यक्ती माझ्या समोरच येऊन उभा राहिला, त्याने माझ्या हाताला धरले आणि मला मंदिरात घेऊन गेला. त्याने मंदिरावरील एका शिल्पाकडे बोट करून दाखवले आणि म्हणाला ही मुर्ती सायकलवर बसलेली आहे म्हणजे त्या काळात सुद्धा सायकल होती हे मला त्या अनोळखी व्यक्तीला सांगायचे होते. मी निरखुन त्या शिल्पाकडे पहात राहिलो तर खरच सायकलवर बसलेल्या एका ऋषीचे शिल्प होते. निसर्ग शिल्पाने भारावलेली ही पवित्र भूमी संत चांगदेवांनाही भावली. त्यांनीही त्यांच्या चौदा वर्षाच्या तपश्चर्येसाठी हेच पुण्यस्थान (हरिश्चंद्रगड) का निवडले असेल याची प्रचिती मलाही आली. या पवित्र ठिकाणाची अजून माहिती जाणून घेण्याची प्रचंड इच्छा जागृत झाली. त्या अनोळखी व्यक्तीकडून अजून माहीती विचारण्याचा प्रयत्न करू लागलो..
              त्यांनी पण माहिती सांगायला सुरवात केली. हरिश्चंद्रेश्वराच्या या मंदिरात सहा, तर शेजारच्याच केदारेश्वराच्या लेण्यात दोन असे आठ लेख चांगदेवांच्या येथील वास्तव्याचे पुरावे देतात त्यांनी ते मला दाखवले, मंदिरात आत मधोमध अवकाशात उंच शिखर असलेले हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर दिसते. या मंदिराच्या भोवतीने दक्षिण आणि पश्चिम दिशांना काही कोरीव लेण्यांची दालने आणि पाण्याच्या टाक्या दिसतात, मुख्य मंदिरास पूर्व आणि पश्चिम असे दोन्ही बाजूस दरवाजे आहेत. गाभाऱ्यात मधोमध शिवलिंग आणि त्याच्या पुढय़ात नंदी विराजमान आहे. अशा या मंदिराच्या शिखर, भिंती, खांब आणि प्रवेशद्वार सर्वत्र मुक्तहस्ते शिल्पकाम केलेले आहे. देव-देवता, प्राणी, रत्न, निसर्ग या साऱ्यांची एक विलक्षण वीण या भरजरी कामात गुंफलेली आहे. हे वर्णन ऐकून मीच मनातल्या मनात या रचनेची तुलना उत्तराखंडातील केदारनाथांच्या मंदिराशी केली. हरिश्चंद्रेश्वराचे हे सौंदर्य पाहणाऱ्यांची मती काही क्षण गुंग करून टाकते.
मंदिराजवळच संत चांगदेवाने जिथे ‘तत्त्वसार’ हा ग्रंथ कार्यसिद्धीस नेला त्या ठिकाणी गेलो. याच ग्रंथात १०२८ ते ३३ दरम्यानच्या ओव्यांमध्ये या गडाचा उल्लेख आलेला आहे, तो पुढील प्रमाणे

हरिश्चंद्र नाम पर्वतु! तेथ महादेओ भवतु!!
सुरसिद्ध गणी विख्यातु! सेविजे जो!!१०२९
रिश्चंद्र देवता! मंगळगंगा सरिता!!
सर्वतीर्थ पुरविता! स्थान!! १०३०।।’
तत्त्वसारप्रमाणेच स्कंद, पद्म, अग्नी, मत्स्य पुराणांतही या हरिश्चंद्र गडाची,  पर्वताची माहिती येते. हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराशेजारीच ओढय़ालगत कातळात खोदलेले केदारेश्वराचे लेणे आहे. औरस-चौरस असलेल्या या लेण्यात कमरेएवढे पाणी असून त्याच्या मधोमध एका मोठय़ा ओटय़ावर शिवलिंग आहे. या शिवलिंगाभोवती चार सालंकृत खांबांची रचना केली आहे. यातील एक पूर्णपणे, तर दोन अर्ध्या पर्यंत पडलेले आहेत. मंदिराच्या पूर्वेला हेमाडपंथी सप्ततीर्थ आहे. त्या प्रशस्त तीर्थकुंडाच्या दक्षिणेला चौदा देवळ्यांमध्ये चौदा विष्णुमूर्ती विराजमान होत्या. देवालयाची व या बांधीव तीर्थकुंडाची मोठी पडझड झाली. तेथील काही विष्णुमूर्ती गायब झाल्या तर उर्वरित विष्णुमूर्ती मंदिरामागील गुहेत आहेत. तीर्थकुंडासमोर छोटेखानी मंदिर असून, ते काशीतीर्थ नावाने ओळखले जाते. तारामती शिखराच्या पायथ्याशी नऊ लेण्यांचा समूह आहे. त्या लेण्यांच्या दर्शनी बाजूच्या चौकटीवर गणेशमूर्ती कोरलेल्या आहेत. या लेणी अकराव्या शतकातील आहेत. समूहातील दुसरे लेणी आकाराने सर्वात मोठे आहे. तिसरी गुंफा अपूर्ण अवस्थेत आहे पण त्या गुंफेचे वैशिष्ट्ये म्हणजे तेथे सहा फुट उंचीची भव्य गणेशमूर्ती आहे. मूर्तीचे बारकाईने निरीक्षण केल्यास ती दिगंबर अवस्थेत असल्याचे दिसते. दिगंबरावस्थेतील गणेशमूर्ती अतिशय दुर्मीळ असते. तुम्ही बाहेरून मंदिराच्या कळसाचा खालील भाग पहाल तर चहुबाजूने कोंदण केलेले दिसेल त्या कोंदणात पुर्वी हिरे माणके बसवलेली होती. हे ऐकूनच मी मनात त्यावेळी मंदीर कसे दिसत असेल याचे चित्र मनात रंगवू लागलो. इतकी माहिती मिळाल्यावर पुन्हा पुन्हा मी त्याच त्याच ठिकाणी फिरू लागलो. प्रत्येक ठिकाण मी तीन तीन वेळा पाहिले कारण गृप मधील मी एकटाच तिथे होतो बाकीचे कोकणकडा व तारामती शिखराकडे गेले होते. खरतर माझे पाऊलच या ठिकाणावरून दुसरी कडे जाण्यासाठी निघत नव्हते. इतकी आकर्षण शक्ती आध्यात्मिक शक्ती या परिसरात होती. पण वाईट होते ते येथे येणा-या पर्यटकांचे या उर्जात्मक स्थळा बद्दल माहिती नसल्याने ते फक्त इथे फिरायला व निसर्गाचा आनंद घ्यायला आले होते. कुठल्याही मंदीरावर चढून ते फोटो काढीत होते एके काळी ज्या मंदिरात विष्णू मुर्ती होत्या त्या मधे बसून फोटो काढीत होते तर काही जण त्याच मंदीरावर चढून फोटो काढीत होते. मनाला खरच वेदना होत होत्या. पण काय करणार इतक्या वर्षाचा पुरातन ठेवा आपणच आपल्या हाताने नष्ट करीत आहोत. काही वर्षांपूर्वी इथे आलेल्या इंग्रज अधिका-याने इथला भव्य दिव्य असणारा मंदीराचा परिसर तोडून फोडून टाकला होता. पण त्याची मंदीराला हात लावण्याची ताकद झाली नाही. किती तरी शतका नंतरही हे मंदीर इथला सर्व अमूल्य असा ठेवा सुस्थितीत आहे. हाच आध्यात्मिक ठेवा आपल्या पण जपून ठेवायचा आहे. यासाठी खरच राज्य सरकारने या गोष्टी गांभिर्याने घेतल्या पाहिजेत.
                मी हरिश्चंद्रेश्वराच्या मंदीर परिसरातच खिळून राहिल्याने कोकण कडा बघणे झाले नाही. तिथे इंद्रव्रजा सारखा अद्भूत नैसर्गिक चमत्कार या आध्यात्मिक वातावरणा मुळे घडत असणार म्हणूनच मला हा हरिश्चंद्र गड केदारनाथ मंदीराची आठवण करून गेला. नवनाथांच्या पासून ते संत ज्ञानेश्वर महाराज, चांगावटेश्वरांच्या शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या प्रती केदारनाथला वंदन केले. दुपारचे तीन वाजले असल्याने परतीच्या प्रवासाला निघालो. सोबत कोणीच नसल्याने मनसोक्त निसर्गाचा आनंद घेत भरपूर ऑक्सीजन नसानसात साठवित हरिश्चंद्र गड उतरू लागलो. वाटेत जाताना काही ट्रेकिंग गृप सोबत होते. विशेष करून त्या गृपच्या मुली धरती आणि रोहीणी  गडावरील प्लॅस्टिक बाटल्या पासून ते सर्व कचरा गोळा करून आपल्या सोबत खाली घेऊन जात असताना दिसल्या खरच त्यांचे खूप कौतुक वाटले जिथे एकट्याला चालायला दमछाक होते तर या मुली इतके मोठे ओझे घेऊन चालत आहेत. खरतर पर्यटनाला कुठेही जाताना कोणत्त्याही पवित्र ठिकाणी निसर्ग रम्य ठिकाणी कुठलाच प्लॅस्टिक कचरा किंवा अन्य कचरा करू नका हाच संदेश या मुली देत असाव्यात.
मनाला दिव्यत्वाचा स्पर्श झाला की, सगळीकडे ईश्वराचा साक्षात्कार होतो, असा दिव्यत्वाचा स्पर्श इथल्या निसर्गातूनही झाला होता. निसर्गाची आणि आध्यात्माची विविध रूपं  आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जात असतात.
कवी मंगेश पाडगावकर आपल्या काव्यात म्हणतात,
मोर केशराचे झुलती पहाटेस दारी,
झऱ्यातुनी दिडता दिडता वाजती सतारी
त्यापुढे ते म्हणतात एक एक नक्षत्रांचा दिवा लागताना
आणि फुले होण्यासाठी कळ्या जगताना, असाचं निसर्गाचा आविष्कार पाहताना सर्व जण आनंदाने भरून या पुण्यभुमीचा निरोप घेऊन जात असे पण हे सारं सारखं अनुभवायला मिळावं म्हणून पुन्हा असचं म्हणावं लागेल..
या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती,
अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे…
या जन्मावर या जगण्यावर शतदा: प्रेम करावे.. आपल्या स्वता: बरोबरच या निसर्गावर आपल्या ऐतिहासिक शिल्पांच्यावर गड किल्यावर प्रेम करावं म्हणजे त्या लोप पावणार नाहीत..

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
 ८६५७४२१४२१

No comments:

Post a Comment

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...