Friday, 6 December 2019

मांडवगड

राजा भोज यांनी उभारलेली,
रानी रूपमती व बाज बहाद्दूर यांच्या अमरप्रेमाने सुप्रसिद्ध असलेली विंध्यांचल पर्वताच्या कुशीतील स्वप्नवत नगरी मांडवगड(मांण्डू)

भटकंतीने मन आणि शरीर सुदृढ होते, हा माझा कायमचा अनुभव म्हणून मी भटकायची एकही संधी सोडत नाही.
विनोदभाऊंनी नविन गाडी घेतली म्हणून आम्ही तोरमाळला दर्शनासाठी गेलो होतो. गुरू गोरक्षनाथांचे दर्शन घेतले, योगी संजुनाथ महाराज यांना भेटलो बोलण्याच्या ओघात संजुनाथ महाराजांनी मांडवगडचा विषय काढला "बहोत किल्ले है एक जगह, मैने तो मेरे जीवन मे पहिली बार इतने किल्ले देखे है, इतना ऐतिहासिक स्थल जो बार बार देखनो को मन करता है" हे योगीजी बोलले आणि माझी उत्सुकता लागली मांडवगड विषयी ऐकण्याची मी राहून राहून त्यांना मांडवगडची माहिती विचारू लागलो, आणि तिथेच निश्चय केला मांडवगडला जाण्याचा...

दि. १३/२/२०१९ हा दिवस निश्चित झाला पण सोबत कोण हा प्रश्न डोक्यात होता. तेवढ्यात युवा दिग्दर्शक करण तांदळे यांचे नाव समोर आले मी त्यांना फोन लावला. त्यांना म्हणालो ? एक नविन ठिकाण तुमच्यासाठी लोकेशन व माझ्या साठी भटकंती असे मध्यप्रदेश मधील मांडवगड येथे जायचे आहे. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता लगेच होकार दिला ते म्हणाले मी तयार आहे तुम्ही या. मी पण तयार होतो लगेच निघालो. आम्ही १२ तारखेलाच दुपार नंतर निघालो होतो. वाटेतच शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेतले आमचे मित्र बाळासाहेब महाडिक यांना भेटलो आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. करणदादांनी दिग्दर्शन केलेला परफ्युम हा चित्रपट १ मार्च ला रिलीज होणार होता. मग गाडीत आमचा तोच विषय रंगला होता. आलेले कडू वाईट अनुभव करणदादा सांगत होते. असा आमचा प्रवास सुरू होता. येवला सोडून भरपूर पुढे आलो होतो. गाडीच्या काचेवर पाण्याचे थेंब पडत होते, थोडा वेळ वाटले हे पाणी पुढच्या गाडीतून सांडत असेल, कारण फेब्रुवारी महिन्यात पाऊस कसा येईल हा विचार करतो ना करतो तोच जोरदार सोसाट्याचा वारा वाहू लागला अन पाऊस सुरू झाला. भले मोठे पावसाचे थेंब भर पावसळ्यातही दिसले नाहीत इतके मोठे थेंब काचेवर आदळत होते. पुढचे काहीच दिसत नव्हते. मनमाड पर्यंत हा पाऊस पडत होता. मनात भितीचे काहूर माजले होते. वीस तीस च्या स्पीडने मी फोरव्हिलर चालवित होतो. रस्त्यावर तर तुडूंब पाणी साठलेले. मनमाडला आलो आणि पावसाचा जोर कमी झाला. मनमाड सोडले तर पुढे पाऊसच नाही. निरभ्र आभाळ चांदण्या स्पष्ट दिसत होत्या. काही अंतर मागे पावसाचे रौद्र रूप अनुभवले अन इथे काहीच नाही. निसर्गच तो त्याचा काहीच नेम नाही.

रात्रीचे साडे दहा वाजले होते भूक पण छान लागली होती. मालेगावच्या पुढे पाच किलोमीटर वर साईकार ढाबा लागतो तिथे आम्ही थांबलो. छान चविष्ट अशा पाटोड्याची भाजी अन बाजरीची भाकरी सोबत मटक्यातले दही मनसोक्त खाल्ले. सुंदर पोट पूजा झाली. उशीर झाल्याने धुळ्यातच मुक्काम केला.

सकाळी नऊ वाजता उठलो, दरवेळी प्रमाणे धुळ्यात विनोदभाऊ चौधरी यांच्या कडे नास्त्याचे निमंत्रण होतेच कारण त्यांची भेट घेतल्या शिवाय पुढे जाणंच अशक्य असते. विनोदभाऊ कायम सेवेसाठी तत्पर असतात त्यांच्या सारखा दिलदार आणि प्रेमळ मित्र मिळाला हे माझे भाग्यचं समजतो. चहापाणी झाले नास्ता झाला. त्यांचे थोरले चिरंजीव निखिल याने विचारले काका कुठे निघालात फिरायला मी सांगितले मध्यप्रदेश, मी त्याला विचारले यायचे का? त्याने पटकन होकार दिला. मी विनोदभाऊंची परवानगी घेतली अन निखीलला पण सोबत घेतला. आता आमच्या तिघांचा प्रवास मध्यप्रदेशच्या दिशेने सुरू झाला. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर बीजासनी मातेचे मंदीर लागते तिथे आम्ही तिघांनी पण मनोभावे दर्शन घेतले पुढील सुखकर प्रवासाठी आर्शीवाद घेतला..

गुगल मॅपवर करण दादांनी मांडवगडचे लोकेशन टाकले होते त्याप्रमाणे आमचा प्रवास सुरू होता. सरळ हायवे सोडून आता गुगल बाबाने डावीकडे वळण्याचा संदेश दिला त्याप्रमाणे गाडी डाव्या बाजूने ओळवली, एकेरी रस्ता सुरू झाला. थोडे अंतरावर गेलो तर डांबरी संपून बांधाचा कच्चा रोड सुरू झाला. मनात पुन्हा पुन्हा शंका यायची पण गुगल बाबा वरचा आमचा विश्वास अतिदांडगा एक सात आठ किलोमीटर गेलो बांधाचा रोड संपून बैलगाडीचा रस्ता सुरू झाला. आता मात्र बी पी हाय झाला, गुगलबाबाने वेगळाच अस्तित्वात नसलेला रस्ता पकडला होता पण आता पर्याय नव्हता. थोडे दूर गेल्यावर एक छोटे खेडे गाव लागले तिथे काही लोकांना आम्ही मांडवगड कैसे जाने का हे विचारले? ते आमच्या तोंडाकडे पाहून हसत होते. ते म्हणाले अरे भैय्या तुम्हे ये रस्ता किसने दिखाया आम्ही काहीच न बोलता एकमेकांकडे बघून हसत होतो. काय सांगणार आम्ही या गुगल मॅप मुळे फसलो, काहीच बोललो नाही. त्यातल्या एकाने सांगितले आप गलत रस्ते से लेफ्ट मारे है. अब आप आठ किलोमीटर सीधे जाओ आपको चौराया लगेगा सीधे जायो फीर आपको मांडवगड जाने के लिये सही रस्ता मिलेगा, समोरचा रस्ता पाहून गाडीच्या अगोदर मीच गळून गेलो. अजून आठ किलोमीटर बापरे !

कच्चा रस्ता संपून डांबरी रस्ता लागला होता, समोरच विदयंचल पर्वतांची रांग दिसत होती. त्या पर्वतामध्ये मांडवगड कोणता याचा शोध घेत होतो, निरीक्षण करीत होतो पण काहीच सुगावा लागला नाही. ओसाड पडलेले पर्वत वणव्यांच्या मुळे काळे ठिक्कूर दिसत होते. घाटाचा रस्ता सुरू झाला होता. घाट चढून भरपूर उंचावर आलो होतो. आमचे स्वागत एका भल्या मोठ्या भव्य दिव्य अशा महाव्दाराने केले. पण हा दरवाजा मांडवगडच्या विरूद्ध दिशेला होता. खुप प्रश्न पडले हा महा दरवाजा पाहताना ब-याच अंशी सुस्थितीत होता. तेथून मांडवगड तीन ते चार किलोमीटरवर होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने छोटे छोटे घुमट आकार महल दिसत होते. आम्ही एव्हाना मांडव शहरातील बाजारपेठेत पोहचलो होतो. जातानाच उजवीकडे जामी मस्जिद आणि डावीकडे अशर्फी महाल या दोन भव्य वास्तूंनी आमचे लक्ष वेधून घेतले. पण या वास्तू नुसत्या पाहून उपयोग नाही या वास्तुंची पुरेपूर माहीती गाईडच देवू शकतो म्हणून आम्ही सोबत बिशन नावाचा गाईड घेतला तो पुढे मांडवगड ची माहीती कथन करू लागला मी निखिलला ही सर्व माहिती रेकाॅर्डिग करायला सांगितली.

मांडवगड (मांण्डू) येथे तेराव्या शतकापर्यंत असलेली परमारांची सत्ता सुल्तानांनी हस्तगत केली. दोनशे वर्षानंतर मुघलांनी बळकावलेली सत्ता इ.स.१६९७ मध्ये मराठ्यांनी मिळविली व सतराव्या शतकापासून इ.स. १९४८ पर्यंत पवारांच्या अधिपत्याखाली असलेला भाग भारतात समाविष्ट करण्यात आला. यातील राजा भोजचा इ. स. १०१० ते १०५५ पर्यंतचा काळ मांडवडगच्या वैभवाचा सर्वोच्च काळ होता. त्यावेळी धार-मांडव भारताचे सांस्कृतिक केंद्र होते. आता आपण जे पहाणार आहोत ती जामी मशिद व अशर्फी महल...
भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असलेल्या या वास्तूंच्या प्रवेशासाठी आम्ही तिकीट घेऊन आत प्रवेश केला. प्रवेश करता क्षणीच जामी मस्जिदची वास्तू बाह्यदर्शनी दिसते, एका घुमटाकार दालनातून पुढे जाताच अनेक सुबक कमानी, उंच खांब आणि त्यावर अनेक लहान-मोठे घुमट अशी ‘पश्तुन’ वास्तुकला म्हणजेच अफगाणी वास्तुकलेचे प्रतिनिधित्व करणारी अप्रतिम वास्तू पाहून आम्ही आश्चर्य चकित झालो. या वास्तुकलेचे खास वैशिष्टय म्हणजे अतिशय साधी परंतु आखीव-रेखीव अशी मांडणी. नजरेच्या एका टप्प्यात आणि कॅमे-याच्या लेन्सच्या एका फ्रेममध्ये सहज मावणार नाही एवढा रुंद विस्तार. बिशन सांगू लागला ही वास्तू साधारण इ. स. १४०५ मध्ये होशांग शहा राजाने ही मस्जिद बांधून घेतली. दमास्कस येथील भव्य मशिदीच्या रचनेवर आधारित या मशिदीची रचना आहे. राजेशाही थाटात उभ्या असलेल्या या जामी मस्जिदीच्या पश्चिमेकडील भिंतीवर १७ लहान कमानी आहेत. इस्लामिक पद्धतीच्या इतर कमानींपेक्षा या कमानी वेगळ्या दिसतात. कातीव दगडाच्या या कमानींवरील नक्षी हिंदू पद्धतीची आहे. भरपूर उजेड येईल अशी या मशिदीची रचना केलेली आहे. आम्ही तिथे पोहोचलो ती दुपारची वेळ असल्यामुळे सूर्यप्रकाशात उंच कमानींच्या सावल्या सुंदर परिणाम साधत होत्या. बिशन पुढे सांगत होता मी व निखील त्याला विविध प्रश्न विचारीत होतो. या जामी मशिदीच्या मागील बाजूस होशांग शहाची कबर असलेली मोठी घुमटाकार वास्तू आहे. होशांग शहाने त्याच्या कारकिर्दीतच स्वत:ची कबर बांधून घेतली अशी चमत्कारिक माहिती गाईड ने दिली. अशा नवलाईची ही कबर भारतातील पहिली संगमरवरी वास्तू म्हणून ओळखली जाते. असे म्हटले जाते की, ताजमहाल बांधण्यापूर्वी सहा महिने आधी तिथल्या वास्तुरचानाकारांनी या वास्तूच्या रचनेचा अभ्यास केला होता. मोबाईल मधे त्या भव्य अशा वास्तूचे फोटो निघत नव्हते आम्ही पॅनोरमा वापरून फोटो काढले. जामी मशिद पाहिल्या नंतर आम्ही अशर्फी महलाकडे निघालो. या महालाच्या रचनेवरून आणि आजही तिथे असणा-या नीरव शांततेवरून इथे पूर्वी मदरसा (college) होता, हे लक्षात येते. साधारण १०० चौ. फूट क्षेत्रफळाची अनेक छोटी दालने एका रांगेत पाहायला मिळतात. त्या दालनांसमोरचा लांबलचक व्हरांडा अनेक कमानींनी साकारला आहे. प्रत्येक छोटय़ा दालनात अभ्यास करता येईल अशी प्रकाशयोजना केलेली दिसते. भोज राजाच्या काळात या अशर्फी महालाचा उपयोग महाराण्यांच्या साठी केला जायचा. एखादी राणी तब्येतीने जाड झाली की याच अशर्फी महालाच्या पाय-यावर मोहरा मोहरा टाकायच्या आणी त्या मोहरा राणीने वेचायच्या. दिवसभर असे कष्टाचे काम करून राण्यांचा व्यायाम व्हायचा त्यामुळे राण्या आपोआप बारिक व्हायच्या हा गाईडने सांगितलेला किस्सा ऐकून मी करणदादा व निखील जोरजोरात पोट धरून हसतं होतो.

सुर्यदेव आपली दिवसाची हजेरी लावून मावळतीकडे निघाले होते, आम्हाला अजून खुप काही पहायचे होते पण लवकरच सुर्यास्त होणार होता, सात वाजल्याने ऐतिहासिक वास्तुंचे दरवाजे बंद झाले त्यामुळे आम्ही राहण्यासाठी हाॅटेल शोधू लागलो. जवळच एक रिसोर्ट होते पण तिथे राहण्याची सोय होती जेवणाची सुविधा नव्हती. तिथेच थांबण्याचा आम्ही निर्णय घेतला. दिवसभराच्या प्रवासाने, पायी चालण्याने पोटात कावळे काव काव करू लागले. तोपर्यंत निखिल जेवणासाठी छान हाॅटेल शोधून आला. आम्ही फ्रेश झालो व जेवणांसाठी हाॅटेल मधे आलो. मस्त दालबाटीची आॅर्डर मी दिली. थोड्या वेळातच भल्या मोठ्या कटो-यात बाटी आली वरणा सोबत ओल्या वाटण्याची भाजी आणी जिलेबी पण दिली. मस्त गावरान तुपात भिजवलेली बाटी वरणात कुस्करली आणि मनसोक्त दालबाटी तिघांनी पण खाल्ली.

आजची सकाळ थोडी वेगळी होती भटकंती दरम्यान पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग यायची पण आज जाग आली ती गाढवांच्या ओरडण्याने. अशी दुर्मिळ सकाळ पहिल्यांदा अनुभवली होती. बाहेर येवून पहातो तर शेजारीच पुरातत्व खात्याच्या एका मंदिरात दगडी काम सुरू होते. आणि दगडी वाहण्याचे काम ही गाढव करीत होती. जरा सकाळचा फेरफटका मारला व करणदादा आणि निखिलला उठवले. आम्ही तिघांनी पण आवरले, ओढ लागली होती ती जहाज महल पहाण्याची, जहाल महल पहाण्यासाठी तेथील नगरपालिकेने तिकीट ठेवले आहे. ते आम्ही घेतले पुन्हा दुसरा गाईड सोबत घेतला आणि जहाज महाल परिसरात प्रवेश केला..

‘जहाजमहाल (रोमॅटिंक ब्युटी) म्हणून जग प्रसिद्ध आहे. १२० फूट लांब आणि दोन मजले उंच आहे. या महालाच्या दोन्ही बाजूंना कापूर आणि मुंज तलाव पाण्याने भरलेला दिसला, पण याच तलावातील पाणी नळ्यांव्दारे संपूर्ण महालांच्या भिंतीतून फिरवले आहे जेणे करून उन्हाळ्यात हा महल थंड राहावा म्हणून, खरच एखाद्या समुद्राच्या पाण्यात एखादे जहाज तरंगताना दिसते तसा हा जहाज महल दिसत होता. जहाज महालाच्या परिसरात सुंदर अशी बाग बहरली होती. जहाज महालात येणारे पाणी शुद्ध होऊन यावे म्हणून पाणी आणणा-या पन्हाळींच्या मार्गात चक्राकार रचना केलेली पाहीली. जहाज महालाची बारचना मनाला भुरळ घालणारी दिसत होती. एखादे सुंदर स्वप्न पहात आहोत असा हा महाल दिसत होता. लहान मोठय़ा कमानी, घुमट, जिने आणि पुष्करिणी अशा वास्तुशिल्पाला चार चांद लावणा-या रचनांमुळे जहाज महालाचे अस्तित्व खुलून दिसत होते. जहाज महाल पाहण्याचा खरा आनंद पावसाळ्यात किंवा चांदण्या रात्री घेता येतो असे आमच्या गाइडने सांगितले. पावसाळ्यात महालाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या पाण्यात महालाचे प्रतिबिंब पडलेले दृश्य विहंगम असते. आम्ही जहाज महलाच्या आत मध्ये शिरलो तिथे पहिला हिंदोळा महाल लागतो तो पण पाहण्या सारखा आहे. उंच घुमट आणि कमानी मिळून बनलेला या महालाचा पूर्वी प्रेक्षागृह म्हणून उपयोग होत असे. विशिष्ट संरचनेमुळे पुन्हा परावर्तित होणा-या ध्वनी लहरींद्वारे एका टोकाचा अतिशय सूक्ष्म आवाज प्रेक्षागृहाच्या दुस-या टोकापर्यंत ऐकू येईल अशी रचना केलेली आहे. त्यामुळे प्रेक्षागृहात अतिशय शिस्तीचे आणि पारदर्शी वातावरण असे. खरच हा हिंदोळा महाल पहाताना ज्याने ही वास्तू घडविली त्याला हजार वेळा धन्यवाद द्यावेत असे वाटत होते. हिंदोळा महाल पहात पहात पुढे आम्ही नहर झरोका पाहिला, दिलावरखानाची मशीद पाहिली, आंघोळीसाठी एक हमाम खाना होता तिथे गाईड आम्हाला घेऊन गेला राज्याचे आंघोळीचे ठिकाण व जे शाही पाहुणे आहेत त्यांचे आंघोळीचे ठिकाण दाखविले ते पहात असताना भिंतीत असणा-या पाण्याच्या नळ्या दाखविल्या, त्याकाळी लाईट विना पाणी गरम करण्याची पद्धत दाखविली ती पाहून तर तोंडातच बोट घातले कुठल्याच धातूचा किंवा वस्तूचा उपयोग न करता सरळ गरम पाणी बाथरूम मधे जात होते, बाथरूम च्या खाली एक रूम होती त्या रूम मधे सोने जाळायचे त्यातून होणारी वाफ नळी व्दारे बाथरूम मधे यायची तिथे राजे महाराजे सोन्याचा स्टीम बाथ घ्यायची खरच या राजेशाही थाटाला सलाम केला अन त्यावेळची टेक्नाॅलाॅजी पाहून थक्कच झालो. त्या हमाम खान्याचा पॅनोरमा घेतला इतका जबरदस्त आला ना की आम्ही अजूनही पहात राहतो. तो परिसर फिरताना सारखेच वाटत होते हे दृश्य हा परिसर आपण कुठे तरी पहायलेला दिसतो पण काही केल्या आठवेना, मेंदूला भयंकर ताण दिला पण स्मृतीपटलावर काहीच उमटेना, त्यावेळी गाईड म्हणाला आपको पता है यहा बहोत सारी हिंदी पिक्चर की शूटिंग हुई है. मी त्याला विचारले कोणते चित्रपट पण त्याला नाव आठवेना तो फक्त म्हणायचा हेमामालीनी और धर्मेंद्र की पिक्चर थी मग मी मेंदूला अजून ताण देऊ लागलो प्रत्येक फ्रेम पाहू लागलो, एखाद्या ऐतिहासिक वास्तूवर अनेकांनी आपली व आपल्या प्रेमिकेची नाव लिहीलेली असतात तसेच तिथे एका घुमटावर नाम गुम जायेगा असे लिहीले होते. मी सहज तेच युट्युब वर सर्च केले तर किनारा या चित्रपटातील नाम गुम जायेगा चेहरा ये बदल जायेगा हे जितेंद्र धर्मेंद्र व हेमामालीनी यांच्यावर चित्रीत केलेले हे गाणे सुरू झाले. आणि मला माझे उत्तर मिळाले. ते गाणे आणि साक्षात तिथल्या फ्रेम जुळू लागल्या, मनाला खुप आनंद झाला, मोठा शोध लावला याचा माझा मलाच अभिमान वाटला..

आता गाईड घाई करू लागला होता त्याने आम्हाला चंपा बावडी नावाची एक विहीर आहे तिथे घेऊन गेला. त्याचा आकार कमळच्या पानांचा होता. तीन टप्पे असणारी ही विहीर व तिच्या सारखी रचना जगात कुठेच दिसणार नाही. या विहीरीचे वैशिष्ट्य गाईड सांगू लागला. जर कोणी या मांडवगडवर हल्ला केला तर सर्व राजे आणि राण्या त्या विहीरीत उड्या मारत. पहाणा-याला वाटायचे यांनी जीव दिला पण हे सारे तिस-या थराला जाऊन चोर रस्त्याने बाहेर पडायचे. आम्हाला पहिला विश्वास बसला नाही काहीतरीच बरळतो हा असे वाटले मग आम्हाला त्याने तीन मजले उतरून खाली घेऊन गेला आणि तिथे तो चोर दरवाजा दाखविला सध्या तो पुरातत्व खात्याने बंद केला आहे. एक एक चमत्कारीक व कधी न पाहिलेले अनुभवलेली एक एक गोष्ट इथे साक्षात पाहून खरच थक्क झालो होतो. त्या वेळी विहिरीच्या पाण्याला चाफ्याच्या फुलांचा सुगंध येत असे पण गाईडने जाता जाता सांगितले.
पृथ्वीवरचा स्वर्गच असे एका वाक्यात मी करणदादांना उत्तर दिले अन राणी रूपमती आणी बाज बहाद्दूर यांच्या महालाकडे निघालो. जाताना प्रत्येक ठिकाणी एक बोर्ड दिसायचा (एक अधुरी प्रेम कहाणी) तो वाचला अन आवर्जून या गाण्याची आठवण झाली.

आ लौट के आजा मेरे मीत तुझे मेरे गीत बुलाते हैं
मेरा सूना पड़ा रे संगीत तुझे मेरे गीत बुलाते हैं

बरसे गगन मेरे बरसे नयन देखो तरसे है मन अब तो आजा
शीतल पवन ये लगाए अगन ओ सजन अब तो मुखड़ा दिखा जा
तूने भली रे निभाई प्रीत तूने भली रे निभाई प्रीत
तुझे मेरे गीत बुलाते हैं आ लौट...
एक पल है हँसना एक पल है रोना कैसा है जीवन का खेला
एक पल है मिलना एक पल बिछड़ना दुनिया है दो दिन का मेला
ये घड़ी न जाए बीत ये घड़ी न जाए बीत तुझे मेरे गीत बुलाते हैं आ लौट...

गाडीतील पॅनड्राईव्ह मधे हे गाणं होतं ते प्ले केल, अन ऐकता ऐकता या प्रेमनगरी च्या दिशेने निघालो. वाटेत अनेक छोटे मोठे महल पडक्या अवस्थेत दिसते होते. उंच डोंगरावर एक किल्याची प्रतिकृती दिसत होती नक्कीच जवळ आलो याची खात्री पटली. इतक्या वेळ शांत असलेला गाईड दादा आता बोलू लागला.

मांडूचा राजा बाझ बहाद्दर एकदा शिकारीसाठी नर्मदेकाठी जंगलात गेला असताना त्याला स्वर्गिय आवाजातील गाण ऐकू आल. कवी मनाचा राजा आवाजाचा वेध घेत गेला असता त्याला रुपमतीचे दर्शन झाले. तिच्या रुपाने आणि आवाजाने घायाळ झालेल्या राजाने इतर राजांसारख अपहरण न करता तीला लग्नाची मागणी घातली आणि तीला मांडूला चलण्याची विनंती केली. रुपमतीने राजाला आपली अडचण सांगितली की, ती रोज नर्मदेच दर्शन केल्याशिवाय अन्नग्रहण करत नाही. राजाने तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मांडु गडाच्या दक्षिण टोकावर रुपमती महालाची आणि त्याला पाणीपुरवठा करण्यासाठी रेवाकुंडाची निर्मिती केली. रुपमती महालाच्या अगोदर त्या ठिकाणी टेहळणी करणार्‍या सैनिकांसाठी वास्तू बांधलेली होती. त्यावर दोन मजली रुपमती महाल बांधण्यात आले. या महालाच्या गच्चीवर दोन घुमट आहेत त्यांच्या कमानदार सज्जातून दुरवरचा प्रदेश दिसतो. येथूनच राणी रुपमती नर्मदेचे दर्शन घेत असे. राणी रुपमती चांगली कवियत्री होती, गायिका होती तर राजा बाज बहाद्दुर चांगला वादक संगितकार होता. संगिताच्या साथीने दोघांच प्रेम बहरल पण त्याचवेळी त्याच राज्याकडे दुर्लक्ष झाला. याचा फ़ायदा मोगलांनी घेतला. अकबरा पर्यंत राणी रुपमतीच्या सौंदर्याची वार्ता़ पोहोचली होती. त्याने आपला सावत्र भाऊ आदम खानाला मांडवगड वर हल्ला करण्यास सांगितले. १५६१ मध्ये आदम खान मांडवगड मधे पोहोचला. हे वृत्त कळताच बाझ बहाद्दर छोट्या फ़ौजेनिशी मोगलांच्या अफ़ाट सैन्याला सामोर गेला. त्याचा दारूण पराभव झाला आणि रणांगणातून पळून गेला. आदम खानाने मांडवगडावर कब्जा केला. हे वॄत्त कळताच राणी रुपमतीने विष प्राशन केले व आपले जीवन संपविले. एका प्रेमकहाणीचा करुण अंत झाला. बाझ बहाद्दरने परत काही काळ मांडव गडचा ताबा घेतला पण नंतर तो अकबराला शरण आला आणि त्याचा मनसबदार झाला. त्यानंतर बाज बहाद्दूर याने राणी रूपमतीची समाधी बांधली, आजही दोघेही त्या समाधी जवळ राणी रूपमती व बाज बहाद्दूर भेटतात अशी आख्यायिका आहे. गाईड दादाची ही स्टोरी ऐकता ऐकता आम्ही रानी रूपमतीचा दर्शन मंडप चढून वरती आलो. आम्ही तिघांनीपण मनसोक्त फोटो काढले, खुप उंचावर आल्याने आजूबाजूचै देखणे रूप डोळ्यात भरत होते. जेथून राणी रूपमती नर्मदामातेचे दर्शन घ्यायची त्या घुमटा मधे उभे राहिलो, तेथूनच दूरवर वहात असलेल्या नर्मदामातेचे अंधूकसे दर्शन घेतले, खरच एक वेगळाच अनुभव मनाला येत होता. संपूर्ण महल पाहून झाला. अन बाज बहाद्दूर यांच्या महालाकडे निघालो. दुपार झाल्याने अंगात घामाच्या धारा वहात होत्या, महालात शिरतानाच अंगात एक चैतन्य संचारले होते. अजूनही येथे इतिहासाच्या खुणा साक्ष देत होत्या. अजूनही इथे पूर्वजांचा वास आहे हे जाणवत होते. आम्ही तिघेच या महालात असल्यामुळे मन सुद्धा आमच्या सोबत खेळत होते. राजेशाही थाट आणि त्याचा अनुभव प्रत्यक्षात घेत होतो. एक घर बांधायची पंचाईत पण एका व्यक्तीसाठी इतके मोठे महल यावरून नक्कीच लक्षात येते भारत सोने की चिडीया होता. भारतात सोन्याचा धूर निघत होता यावरून स्पष्ट होते. राणी रूपमती यांचे समाधीस्थळ पाहिले. आणि निळकंठेश्वर महादेवाकडे आमचा प्रवास सुरू झाला...

संमार्जिली अंगणे, पान्हावली गोधने
आसावला आसमंत अमृताने चिंब नाहवा, हे शिवा
तू आपदा वारणारा, तू दुःखिता तारणारा
होई कृपावंत विश्वातले आर्त अभयंकरा शांतवा, हे शिवा

सोनपूर दरवाजाकडे जाताना म्हणजेच मांडवगड ची सहल संपवताना, डोंगरांच्या मधोमध, टेकड्यांनी घेरलेले निसर्गरम्य ठिकाणावर नीलकंण्ठ महादेव मंदिर आहे. त्यासाठी खोल दरीत उतरावे लागते तिथे हे मंदीर दिसते, उर्दू भाषेत मंदिराची माहीती लिहीलेली आढळते. दुसरे बाजीराव पेशवे यांनी या शिवलिंगाची स्थापना केली आहे. एका खोल गुहेत हे शिवलिंग स्थापन केलेले असून तिथे सारखा जलअभिषेक होत असतो. हा एक चमत्कारच आहे. मनोभावे दर्शन घेतले, पुन्हा पावसळ्यातही येण्याचा निश्चय तिथेच केला. तेथील पुजारी सांगत होते. पावसाळ्यात मांडवगडचे अलौकिक वातावरण व निसर्ग सौंदर्य काश्मीरच्या सौंदर्याचेच प्रतीक मानले जाते. नैसर्गिक सौंदर्य तसेच वास्तुकलेची परिसिमा गाठलेला मांडवगड आपण कितीही न्याहाळला तरी पूर्णतेची तृप्ती होतच नाही आणि आपली तृप्ती न होणं, हेच मांडवगडच्या सौंदर्याच्या रहस्य आहे. जसे पुजा-याने सांगितले तशीच अवस्था माझी होती.

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

No comments:

Post a Comment

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...