Tuesday, 3 December 2019

रौद्र अवतारी, महादूर्ग हरिहरगड

रौद्र अवतारी, महादूर्ग, हरिहरगड
संदीप राक्षे.....

निसर्गरम्य खेड तालुका गड- किल्ले ट्रेकिंग गृप आयोजित किल्ले हरिहर गड दुर्ग भ्रमंती मोहीम दि. ३०/११ व १/१२/२०१९ रोजी किशोर राक्षे व रोहित बोरूडे यांनी आयोजित केली होती. मला किशोरदादाचा मेसेज आला तुम्ही या मोहिमेसाठी याल का? अगोदरच गृपवर हरिहर गडाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. तो व्हिडिओ पाहूनच माझे डोळे फिरले होते. पण आयुष्यात एकदातरी साहसी मोहिम करायचीच या विचाराने मी होकार दिला. मी शनिवारी रात्री ९:३० वा भोसरीहून निघालो पुढे अनेक जण या मोहिमेत सहभागी झाले त्यामधे अविनाश चव्हाण, अजित आरूडे, अशोक कोरडे, ज्योती राक्षे, सुनिता आरूडे, सुप्रिया म्हसे, दिपाली जीवना, किरण म्हसे, योगेश उभे, अक्षय भोगाडे, मयुर गोपाळे, दुर्योधन लवटे, किरण टिंगरे, गुंडाजी जीवना, दिगंबर शिंदे, शिव बो-हाडे, सुरज नाळगुने, अविनाश चव्हाण, एम अभिषेक, प्रगती गोपाळ, गौरी राऊत, अभिनव आरूडे, आदित्य कोरडे ..
भल्या पहाटेच त्रिंबकेश्वरला पोहचलो तिथे त्रिंबकेश्वर ज्योर्तिलिंगाचे दर्शन घेतले अन पुढे हरिहर गडाकडे निघालो..
पहाटेची वेळ संपली होती सुर्यादेवाने आपल्या सुवर्णकलांनी संपूर्ण सृष्टी कवेत घेतली होती सकाळचे कोवळे उन आजूबाजूच्या वाड्या वस्तीतील महिलांची विहिरीवर पाणी शेंदण्याची लगभग काहीजणींच्या डोक्यावर पाणी भरलेले माठ त्यातून पाझरणारे पाणी त्यावर कोवळी किरणे असे भासायचे की जणूकाही सुवर्ण जलाने संपूर्ण माठ भरलेला आहे. काही अंतरावर पोहचल्यावर जंगल सुरू होते. तेथील असंख्य पक्ष्यांचा चिवचिवाट वातावरणात चैतन्य निर्माण करीत होते. सुईरीची पाने झडून आता त्याची जागा असंख्य फुलांनी घेतली होती अनेक पक्षी त्या झाडावरी फुलांचा मकरंद खाण्यासाठी  धडपड करीत होते. सुईरीच्या झाडावर कावळ्यांची गर्दी विशेष होती बहुधा फुलांवर असलेल्या किटकांचा फडशा पाडण्यासाठी ही गर्दी दिसत होती..
फुल आणि पक्षी एकच दिसत होते.

पाखरांच्या संग
आनंदल झाड
सर्वागाने आता
बहरलेलं!
पाखरांची शीळ
रानी दरवळे
झाड परिमळे
फुललेलं!

रस्त्याच्या कडेला गवता मधे उगविणा-या तणांना रंगीबेरंगी फुल आलेली होती. पिवळ्या रंगाच्या बटणांच्या सारख्या फुलांनी आजूबाजूची संपूर्ण कुरणं बहरलेली होती. झाडांच्या पायथ्याशी, शेताच्या बांधावर, दगडांच्या खाचखळग्यात पिवळ्या पांढ-या जांभळ्या जंगली फुलांचे पेवच फुटलेले दिसत होते. एकटीच डुलणारी, गुच्छात अडकणारी काहींच्या डोक्यावर तुरे व कोबंडे असणारी गर्द शेंदरी रंगाची फुले लक्ष वेधून घेत होती. असा नयनरम्य देखावा पहात पहात हरिहर गडाच्या पायथ्याशी पोहचलो.
सर्वजण गाडीतून खाली उतरले आजूबाजूला पाच चहा घरांच गाव होतं, समोर गगनाला भिडणारे गगनचुंबी कडे, डोंगर दिसत होते. नुकताच पावसाळा संपल्याने हिरवाईला उधान आले होते.
किशोर राक्षे यांनी सर्वांना आवाज देऊन जवळ बोलावून घेतले, त्यांनी सर्वांना हरिहर गडाची माहिती व सुचना देण्यास सुरवात केली. हरिहर गड हा नाशिक जिल्हयात येतो. ब्रह्मगिरीच्या पश्‍चिमेस सुमारे २० किलोमीटर अंतरावर हरिहरगड उर्फ हर्षगड बांधलेला आहे. हा गड नगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. १६३६ मध्ये शहाजीराजे भोसले यांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हा पण किल्ला जिंकला होता. त्यानंतर या गडाचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे १६७० साली मोरोपंत पिंगळे यांनी हा गड मोठ्या पराक्रमाने जिंकून (मराठेशाही) स्वराज्यात आणला होता. ८ जानेवारी १६८९ रोजी मोगल सरदार मातब्बर खान याने हा किल्ला जिंकला त्यामुळे पुन्हा हा किल्ला मोगलांच्याकडे गेला.  इ स १८१८ मध्ये हा गड मराठ्यांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. इतकी सारी मालकी अनुभवणारा हा हरिहर गड. आजही या गडाच्या पायथ्याच्या वाड्यांना टाकेहर्ष, आखली हर्ष या नावाने ओळखले जाते. त्रिकोणी आकाराचा हरिहरगड, सरळसोट भुयारी मार्ग दगडात खोदलेल्या खड्या जिन्याच्या मार्गामुळे हरिहर गड जगप्रसिद्ध आहे. समुद्रसपाटीपासून ११७० मीटर उंचीवर असलेला हा त्रिकोणी आकाराचा गड आहे.
१८१८ मध्ये मराठेशाही संपविण्यासाठी इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी हरिहरगड येथे आला होता, त्याच्या पायऱ्या पाहून आश्‍चर्यचकित झाला होता. सुमारे २७५ फूट सरळ व ९० अंश कोनाच्या पाय-यांनी या अधिका-याला अशीकाही भुरळ घातली की त्यावेळी इंग्रजांचे धोरण गड किल्ल्यांच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उध्वस्त करायचे, कारण होते भारतातील क्रांतीकारक विशेष करून या किल्यांचा आधार घेऊन इथेच आपली स्वातंत्र्य चळवळ चालवीत होते, इथेच लपून बसत होते. त्या धोरणास अनुसरून इंग्रजांनी अनेक गडांचे मार्ग उध्वस्त केले पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पायऱ्यांनी आपल्या राकट सौंदर्याची मोहिनी अशी काही त्या कॅप्टन ब्रिग्जवर घातली की त्याने हरिहरगड जिंकून घेतालच पण त्याच्या सुंदर पायऱ्यांच्या मार्गाला मात्र हात लावला नाही. किशोरदादा मार्गदर्शन व माहिती सांगत होते पण मध्येच माझं लक्ष गगनचुंबी हरिहर गडाकडे जात होते न पोहचता ही त्या पाय-या डोळ्या समोर दिसत होत्या अनेक निगेटिव्ह विचारांनी मनात थैमान सुरू होते पण मागे सरायचे नाही आज हा गड सर करायचाच हा मनात ठाम निश्चय केला. त्या निश्चयाला साथ होती ती सोबत असलेल्या सहका-यांची. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजीराय अशा घोषणा देऊन सकाळी आठ वाजता हरिहर गडाच्या चढाईला सुरुवात केली.
शेतीचा सपाट भाग संपून आता पांधीचा रस्ता सुरू झाला होता. खाच, खळगे, दगड, तुडवित ठेचाळत मधेच मातीवर घसरत वाकडा तिकडा रस्ता पार करण्याची कसोटी सुरू झाली होती. पहिला चढाईचा टप्पा पार करता करता इतका दम लागलेला की पुढे जायचे की नाही हा प्रश्न पडायचा. सोबत असलेले बरेच जण आता पुढे गेले होते, आमच्यातले अंतर पण वाढले होते. माझ्या सोबत आता आरूडे फॅमिली, जीवना फॅमिली आणि त्यांचे पाहुणे होते. सहा सात जण आम्ही मागे राहिलो होतो. एकमेकांना आधार देत एक एक कडा आम्ही चढून पुढे सरसावत होतो. दोन तीन जीवघेणे टप्पे पार करीत आम्ही मुख्य गडाच्या पाय-या जवळ येऊन पोहचलो, अंग घामाने भिजून गेले होते, छातीची धडधड स्पष्ट पणे ऐकू येत होती त्यात कातळ कोरीव पाय-यांची नाळ पाहिली त्यावर चढणा-या पर्यटकांची रांग पाहिली, ते चढत असताना असे वाटत होते की एखादी घोरपड आपल्या नख्या दगडात रोवून पुढे वाटचाल करीत आहे. दृश्य पाहून तर छातीची धडधड खूपच वाढली तो अंगावर येणारा कडा पाहून अंगातले बळच निघून गेले होते. आजूबाजूला खोल दरी त्या पाय-या चढून गेल्यावर मुख्य दरवाजा लागणार होता..

हिरव्या पिवळ्या माळावरून
हिरवी पिवळी शाल घ्यावी,
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.

गडाला मनोभावे साष्टांग दंडवत घातला, मनाला प्रार्थना केली..
मन चंगा तो किसीसे भी लेंगे पंगा मनाने उभारी घेतली अन पाय-या चढायला सुरवात केली. पहिली पायरी चढलो, दुसरी पण चढलो, सात आठ पाय-या चढल्या नंतर हात पाय थरथर करायला लागले होते कारण एका हाताने वरच्या पायरीच्या घडीव खोबणीत हात ठेवायचा मग दुसरा हात सोडून वरच्या पायरीच्या खोबणीचा आधार घेऊन चढायचे होते. संपूर्ण शरीराला आता काम लागले होते, ८३ किलोचा शरीराचा बोजा एका हातावर व पायावर पडत होता त्यात हाताला घाम सुटायला लागला होता. जर पायरीच्या खोबणीतला हात निसटला तर पुन्हा मनाने खेळ सुरू केला त्यात थोडे मागे वळून पाहिले तर "पाचावर धारणच बसली" पुढे जाण्या शिवाय पर्याय नव्हता. कातळात कोरलेल्या पाय-या त्यात आधारासाठी कोरलेल्या खोबण्या त्या खोबण्यात माती जावून बसली होती. हाताला आलेला घाम आणि ती माती ओली होऊन हात निसटत होते ते हात पुन्हा घातलेल्या कपड्यांना पुसायचे अन पुढे घसरत चढायचे खरच अग्निपरीक्षाच होती.
शेवटच्या तीन पाय-या राहिल्या होत्या मुख्य दरवाजा समोर दिसत होता. एखादा icu मधला आजारी पेशंट जनरल वार्डात शिफ्ट होतो त्यावेळी त्याला आनंद होतो ना अगदी तसाच आनंद मला झाला होता.
मुख्य दरवाज्यातून खालच्या पायरीकडे पाहिले तर चढणारी माणसं डाॅलरच्या आकारा इतकी लहान दिसत होती. मुख्य दरवाज्यातून पुढे जाण्याचा रस्ता गडाच्या कडेने कातळ कापून तयार केला होता. अगदी कडेकडेने तयार केलेला हा रस्ता एका बाजूला खोल दरी, थोडा जरी धक्का बसला तरी डायरेक्ट यम दरबारीच, वाकून वाकून हा रस्ता पार करावा लागत होता, उभे पण राहता येत नव्हते. पहिली रांगत केलेली चढाई आता ही वाकून चालण्याची कसरत त्यामुळे अंगात आता त्राणच उरले नव्हते. कातळ कापलेल्या घळीच्या कडेने चालाताना खरच खुप त्रास होत होता. चालताना जर हा त्रास होत होता तर ज्यांनी हे निर्माण केले त्यांना किती काय काय सहन करावे लागले असेल या विचारातंच भुयारी मार्गाजवळ येवून पोहचलो. उभा कडा कापून दगडी बोगदा तयार करून त्यात सरळ उभ्या पाय-या कोरून पुढे जाण्याचा मार्ग तयार केला होता. या दरवाजाज्यातून प्रवेश करताना साक्षात यमाला सुद्धा नक्कीच भिती वाटणार पण मी खरच आश्चर्य चकित झालो ही स्थापत्यकला पाहून, ही कलाकृती खरच डोळे दिपवणारी होती. या भुयारी मार्गामुळे पाच सहा मावळे सुद्धा सहज हा किल्ला अबाधित ठेवू शकतील अशी ही वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती खरच मनाला भावली पण त्यातून पुढे जायचे होते, पाय-या होत्या पण धरायला खोबणी दिसत नव्हती चाचपडत खोबणीत हाताचा पंजा रोवायचा अन पुढे सरकायचे, असंख्य पाय-यांचा हा भुयारी मार्ग त्यावरून सरळ पुढे रांगत चालणे म्हणजे तारेवरची कसरतच ही कसरत पूर्ण करून आता गडावर पोहचलो होतो.
हरिहरच्या सर्वोच्च माथ्यावर पोहचल्यावर आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर, शेते, कुरणे, वाड्या वस्त्या पहाताना काही तरी जिंकल्याचा आनंद वाटत होता. गड चढताना घेतलेले कष्ट सार्थकी लागल्याची भावना दाटून येत होती, गडावरील तलावा जवळच मारूतीच्या मंदिरा जवळ खूप गर्दी होती आम्ही तिथे गेलो तर महाराष्ट्रातील पोलीस अधिका-यांची एक तुकडी गिर्यारोहणासाठी आली होती. त्यांनी मारूती मंदिरात दिवा उदबत्ती करून मारूतीरायची आरती म्हणत होते आम्ही पण त्यामधे सहभागी झालो. एक आरती झाली अन त्यांनी छत्रपती शिवरायांची आरती म्हणायला सुरवात केली पहिली ओळ उच्चारली अन संपूर्ण अंगावर शहारे उभे राहिले. बाहु स्फुरलें, संपूर्ण शरीर उर्जात्मक बनले, एक नवा उत्साह संपूर्ण शरीरात संचारला अनपेक्षित अशा या घटनेने मनाला चैतन्य प्राप्त झाले होते, छ. शिवाजी महाराजांचा जयघोष करीतच आम्ही दारूगोळा कोठारा कडे आलो, त्याच्या कडेने असलेली पाण्याचे टाके लक्ष वेधून घेत होती. दारू गोळ्याच्या कोठारा जवळच आम्ही सर्वांनी बैठक मारली, पोटात भुकेने कावळे काव काव करीत होते, आरूडे, म्हसे व जीवना परिवाराने आणलेल्या शेंगदाण्याच्या चटणी भाकरीवर ताव मारला, पोट पूजा झाल्याने अजून ताजेतवाने वाटले, गडावरील शिवमंदीर उंच टेकडी पाहिली. तलावाच्या कडेने फेरफटका मारला त्या काळात बांधलेला हा पाण्याचा तलाव सुस्थितीत होता. उत्कृष्ट दगडी बांधकाम केलेला हा तलाव इतिहासाची साक्ष देत होता.
हा गड फिरताना एक मात्र जाणवले कितीही अपप्रवृत्तीनीं हे महाराष्ट्राचे वैभव नष्ट करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तरीही भक्कम पणे पाय रोवून उभ्या आहेत इतिहासाच्या पाउलखुणा...
संपूर्ण गडाला फेरफटका मारून झाला इतिहासाच्या पाउलखुणा डोळ्यात साठवल्या अन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली..
कोणताही गड चढताना खुप त्रास होतो पण उतरताना मात्र जीव भांड्यात पडलेला असतो, पण आमच्या सर्वांचा तो आनंद क्षणातच विरणार आहे हे कोणाच्या लक्षात पण आले नाही. ज्या उमेदीने गड चढलो ती उमेद थोड्या अवधीतच संपणार होती हा लवलेशही मनाला शिवला नाही.
आम्ही सर्वजण भुयारी दरवाज्या जवळ पोहचलो होतो एक एक जण भुयाराच्या तोंडाशी जात अन पुन्हा माघारी फिरत असे कारण एक पायरी उतरायला पाऊल टाकले की समोर खोलवर दरी दिसायची उजेडातही डोळ्यासमोर चांदण चमकायची, खाली उतरावे तर लागणारच अजित आरूडे यांनी त्या पाय-या उतरण्याचा श्रीगणेशा केला. जसे चढलो त्याच पाऊली पुन्हा पाय-या उतरायच्या होत्या हे सर्वात मोठे कठीण काम होते, एक एक करीत पुढे सरसावले त्यानंतर माझा नंबर आला, पाठ फिरवली अन एक पायरी उतरलो तर ढांगे खालून खालून खोल दरी दिसली ती खोल भयानक दरी पाहूनच हाता पायाला कंप सुटला,

खाली खोल दरी
वर उंच कडा
भला मोठा नाग
जणू वर काढून फणा...

दोन्ही हात वरच्या पायरीच्या खोबणीला घट्ट पकडले, थोडा वेळ थांबलो मन स्थिर केले, काही झाले तरी गड तर उतरावा लागेल, अन वरती सुद्धा खूप जण उतरायचे बाकी होते. हळूच उजवा पाय उचलून खालची पायरी चाचपडू लागलो कशी तरी पायाला पायरी लागली पण हे सर्व अंदाज घेऊन सुरू होते. आता डावा पाय उचलला आणि खालच्या पायरीच्या खोबणीत पंजे रूतवले बोटांना वेदना झाल्या खोबणीतला पाय उचलला अन सपाटीवर ठेवला. उजव्या हाताचे पंचे वरच्या पायरीतून सोडून खालच्या पायरीच्या खोबणीला रूतवले घामाने हात पण सटकत होते.
शरीराचा संपूर्ण बोजा कधी हाताच्या बोटावर तर कधी पायाच्या पंजावर घेऊन एक एक पायरी उतरताना अक्षरशः जीव जायला व्हायचा...
आयुष्यातली सर्वांत अवघड उतराई उतरताना मधेच एक पायरी तुटलेली होती त्यामुळे ठाव घेता येईना, पायला पायरी लागेना, थोडावेळ लोंबकळत राहिलो तेव्हा मात्र गर्भ गळीत होऊन गेलो होतो.

लक्ष्य तुम्हें जो पाना है उस लक्ष्य पर नज़र गडाओ,
पीछे मुडकर कभी ना देखो, आगे बढते जाओ
कर्म ही पूजा समझ के साथी कर्म को करते जाना,
फल तो ऊपर वाले देंगे, जो भी होगा देना...

गड असो वा किल्ला किंवा उंच डोंगर पठार चढताना घाम येणं स्वाभाविकच आहे पण इथे मात्र उतरताना संपूर्ण अंग घामाने डबडबून गेले होते. सर्व अंगातून घामाच्या धारा ओसंडून वहात होत्या त्यावरून अंदाज येतो की हा भुयारी मार्ग उतरताना शरीराला मनाला किती वेदना होत असतील..
शेवटची पायरी उतरलो अन सुटकेचा निःश्वास सोडला. उतरणा-या इतरांचे चेहरे पाहिले तर पूर्ण काळवंडलेले दिसत होते, जणू काही अग्निपरीक्षाच देऊन आले आहेत.
भुयारी मार्ग संपून अजून एक टप्पा तसाच २०० पाय-यांचा उतरायचा होता. शरीरातले पाणी कमी झाले होते थकवा आला होता, मांड्या पोट-या खांदे दुखायला लागले होते. पायतर अजिबात वाकडे होत नव्हते, शरीराची नस ना नस वेदना देत होती. पुढचा टप्पा रडत कढत कसातरी उतरलो..
संपूर्ण पायरी मार्ग उतरून गडाच्या मध्यावर आलो, जणू काही माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा आनंद माझ्या सहित प्रत्येकाच्या चेह-यावरून ओसंडून वहात होता.
सकाळचे आठ ते दुपारचे साडेतीन असा साडेसहा तासांचा थरारक व रोमहर्षक प्रवासाचा साक्षात अनुभव घेऊन गडाच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीवर जेवणं केले अन पुढे सिन्नर येथील गोंदेश्वराचे दर्शन घेऊन मोहीमेची समाप्ती केली..

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

No comments:

Post a Comment

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...