Wednesday, 22 January 2020

भामचंद्र डोंगर

तुकोबांच्या अभंगाचे प्रेरणाक्षेत्र भामगिरी पर्वत (भामचंद्र डोंगर)

ज्ञान स्वरूपाची सांगड मिळाली!
अंतरी पाहिली ज्ञानज्योती!!
तुका म्हणे चित्त स्वरूपी राहिले!
देह विसावले तुझे पायी!!
अंतरी ज्ञानज्योती पाहिल्याची, विठ्ठलाचे सगुण रूप दिसले अन विठ्ठलापायी चित्त विसावले ही अनुभूती जगदगुरू संत तुकाराम महाराजांना ज्या ठिकाणी झाली ते ठिकाण म्हणजे पवित्र भामचंद्र डोंगर, देहू आळंदीच्या परिसरातील माझा जन्म परंतु या भामचंद्र डोंगरावर येण्याचे भाग्य व योग आज आला. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले! म्हणुनी विठ्ठले कृपा केली!! या अभंगाच्या ओवी प्रमाणेच घडले काहीतरी पुण्य असणार म्हणूनच या भामचंद्र डोंगरावर जाण्याची सदबुद्धी मिळाली. यावेळी माझा धाकटा चिरंजीव संकेत सोबत होता. पहिले भंडारा डोंगरावर जाऊन आम्ही दर्शन घेतले अन तिथेच दृष्टीस पडला तो पवित्र भामचंद्र डोंगर मन राहवेना मनात इच्छा प्रकट झाली अन आम्ही दोघेही भामचंद्र डोंगराच्या दिशेने निघालो. सुदुंबरे गाव पार करून आम्ही शिंदे वासोली गावात आलो, आता गाव पण जाऊन प्रत्येक गावांचे शहरीकरण झाले होते. मोठ मोठ्या इंडस्ट्रीज इथे उभ्या राहिलेल्या दिसत होत्या. मराठी माणसाची जागा आता भैयांनी घेतली होती. थोडा वेळ मलाच कळेना आपण महाराष्ट्रात आहोत की उत्तर प्रदेश, बिहार मधे आहोत. एक काॅलेज पार करून डोंगराच्या पायथ्याशी एक मंदिर आहे तिथे आम्ही पोहचलो, आजूबाजूला नविन कंपनी उभारणीचे काम सुरू असल्याने जीसीपी वाहतूक गाड्यांनी त्यात दूरवरून ऐकू येणा-या लग्नातील डी जे नी इथली शांतता तर कधीच नष्ट झाली होती.
पायथ्याच्या मंदिराच्या देवळात जाऊन दर्शन घेतले अन दक्षिण दिशेकडून आम्ही भामचंद्र डोंगर चढायला सुरवात केली. हिरवे गवत आता वाळलेले दिसत होते. वृक्षतोडीने झाडांची संख्या बरीच कमी दिसत होती. पायी पाऊल वाटेने चालताना मातीत पाय घसरत होते त्यात बूट जो घातला होता तो निसरडा होता तो गवतावरून मातीवरून चालताना निसटत होता. दोन ते तीन वेळा घसरलो पण सावरलो, शेवटी बूट काढून हातात घेतले अन अनवाणी पायांनी चालू लागलो, अनवाणी पायांनी चालण्याचा आनंद वेगळाच होता पण दगड गोट्यातून चालताना पायाला वेदना होत होत्या पण मनात भाव वेगळाच होता ज्या अनवाणी पायांनी तुकोबाराय याच रस्त्यांनी गेले असतील त्यांच्या पायांचा स्पर्श कित्येक वेळा या मातीला या दगडांना झाला असेल अशा पवित्र पर्वतावर आपण त्याच पाऊलवाटेने चालतो आहोत..

बळीयाचा अंग संग झाला आता!
नाही भय चिंता तुका म्हणे!!

पर्वतावर मी आणि संकेत दोघेच चालत होतो पण कुठेही भितीचा लवलेश जाणवला नाही. जगदगुरू संत तुकाराम महाराजांचा लता मंगेशकर यांनी गायलेला एक एक अभंग मनपटलावर आवाजा सहित उमटत होता..

गर्भाचे आवडी मातेचा डोहळा!
तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे!!
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा!
अनुभव सरिसा मुखा आला !!

एका एका अभंगाचा अर्थ असा की त्यांचे निरूपण करायचे ठरवले तर एक एक अभ्यासू व्यक्ती एका ओवीवर महिनाभर आपले चिंतन सादर करील. गरूडाच्या पंखावर नाहीतर शब्दांच्या पंखावर बसून घारी सारख्या नजरेने समाज जीवनाचा वेध घेऊन समाज व्यवस्थेवर प्रहार करणारे साहित्यसृष्टीचे जनक म्हणजे जगदगुरू संत तुकाराम महाराज, युक्ती, मुक्ती, शक्ती, भक्ती, बुद्धी, आचार, विचार, विहार, क्रिया, ज्ञान, ध्यान, मान, अभिमान, सदाचार, दुराचार, शांती, सदभावना, माया ममता, प्रेम, दु:ख, वेदना, जाणीव, उणीव, अशा अनेक विषयांवरी तुकोबारायांचे अभंग जिवंत झ-या प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राच्या मुखातून आजही झिरपत आहेत.
अशा विचारानेच निम्मा डोंगर चढून वरती आलो. आता भरपूर ट्रेक झाल्याने दम थोडा कमीच लागला तरी डोंगराच्या निम्यावर असणा-या चौथ-या जवळ घटकाभर विसावा घेतला, सुंदर निळे निळे आभाळ कधीतरी दिसणारा ढगांचा पुंजका विविध आकृतींचा खेळ करीत होता, पर्वतावरून हे नयनरम्य दृष्य अगदी स्पष्ट दिसत होते. आराम करून शेवटचा एक टप्पा गाठण्यासाठी पुन्हा पर्वत चढायला सुरुवात केली. जिथे लेण्या आहेत तिथे पोहचलो आता एका बाजूला खोल दरी अन एका बाजुला काळ्या पाषाणाचा कडा, त्याच कड्याच्या पायथ्याला बरेचसे दगडी टाके दिसले, ते स्वच्छ निळेशार पाण्याने भरले होते.
ते पहातच आम्ही कोरीव लेणीच्या जवळ पोहचलो ही लेणी दक्षिण पश्चिम मुखी होती. बाहेरील चौकटीवर गणपती, कीर्तिमुख, द्वारपाल आणि इतर आकृत्या कोरलेल्या दिसत होत्या, दोन बाजूला दोन देवकोष्ट आहेत कोरलेले अंधुकसे दिसत होते आम्ही दोघेही जिथे पिंड आहे त्या गर्भगृहात प्रवेश केला. संपूर्ण अंधार होता मोबाईलची लाईट लावली अन समोरच भगवान शंकराची पिंड दिसली मनोभावे आम्ही नमस्कार केला अन तिथेच आसन लावले, थोडावेळ शांत बसलो हळूहळू परिसरातील शांतता मनात असलेल्या विचारांना पण शांत करू लागली. आता प्रकृतीमधे असणारे अनेक आवाज सहज कानावर पडू लागले, मन त्या आवाजा कडे केद्रिंत केले. तर एक दयाळ हा गाणारा पक्ष्यांने मधुर आणि लांबलचक शीळ घातल्याचे ऐकले, सकाळी व तिसर्‍या प्रहरी एखाद्या झाडावर उंच ठिकाणी बसून हा दयाळ पक्षी गात असतो व मधूनमधून शेपटी उभारीत असतो. इतर पक्ष्यांच्या आवाजाचीही हा नक्कल करीत असतो. आता त्याच्या गाण्याचा आवाज अधिक स्पष्ट येत होता. तुकोबारायांचा याच ठिकाणी लिहीलेला अभंग सहजच ओठावर आला.
वृक्ष वल्ली आम्ही सोयरे वनचरे!
पक्षी ही सुस्वरे आळवती!!
पुन्हा पिंडीचे दर्शन घेऊन बाहेर आलो त्याच लेणीच्या पुढे एक गुहा दिसली
त्यामधे वारकरी संप्रदायाचे साधक राहतात. येथे पूर्वी एक लहान कोरलेली गुहा होती. आता तेथे मोठी गुहा बनविण्यात आली आहे. अंदाजे १० मीटर लांब आणि ८ मीटर रुंद अशी हि आधुनिक गुहा वारकरी संप्रदायाचे साधक आपली साधना करण्यासाठी वापरतात. ते पाहून आम्ही मुख्य लेणीकडे निघालो तिथ पर्यंत पोहचण्यासाठी खड्या दगडी पाय-या चढून जायचे होते. सत्तर एक पाय-या चढून आम्ही आता उंच अशा मुख्य गुहेकडे आलो. भल्या मोठ्या कड्याच्या कुशीत ही लेणी आहे एक माणूस जावू शकतो इतकीच जागा आहे. एका बाजूला खोल दरी, पाय-या चढून मुख्य लेणीत प्रवेश केला. शिंदे गावाच्या उत्तरेला असलेल्या डोंगरावर कड्यात भामचंद्र लेणीसमूहातील लेणी क्रमांक ३ कोरले आहे. ही पण लेणी दक्षिण-पूर्व मुखी आहे. आत मध्ये वारकरी संप्रदायाचे दैवत विठ्ठल रखुमाईचे मंदीर आहे. तसेच संत तुकारामांचे साधे पण प्रभावी भित्ती शिल्प येथे आहे. भामचंद्र डोंगरावराचा तुकारामांच्या अनुभूतीचा उल्लेल्ख असलेला त्यांचा अभंग येथे वाचावयास मिळतो.

भामगिरी पाठारी वस्ती जाण केली! वृत्ती स्थिरावली परब्रह्मी!!
सर्प, विंचू, व्याघ्र अंगाशी झोंबले! पिडू जे लागले सकळीक!!
पंधरा दिवसामाजी साक्षात्कार झाला! विठोबा भेटला निराकार!!

इथेच तुकोबारायांना विठ्ठल परमात्म्याचे दर्शन झाले, अशा या पवित्र पावन लेणीत बराच वेळ बसून राहीलो. त्याच लेणीत एक साधक गेली पंधरा वर्षे झाली मौन अवस्थेत राहतात. शिजवलेलं अन्न न खाता कच्चे जे असेल ते खाऊन आपली साधना करीत आहेत.

ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी! धरोनी श्रीहरी जपे सदा!!

महाराजांचे दर्शन घेतले त्या लेणीतून बाहेर पडलो त्याच लेणीच्या खाली एका झाडाखाली एक युवा साधक ध्यान अवस्थेत बसलेले मी पाहिले खाली उतरून आम्ही त्यांच्या जवळ गेलो. बराच वेळाने ध्यानातून बाहेर आले. मी नमस्कार केला अन त्यांच्या शेजारी जावून बसलो कुठले महाराज ? मी प्रश्न केला मी यवतमाळचा आहे गेली तीन वर्षापासून इथे वारकरी संप्रदायाचा अभ्यास करतो आहे. भामचंद्र डोंगराची अनेक वैशिष्ट्ये अनेक अनुभव त्यांनी सांगितले पण एक खंत व्यक्त केली. इथे साक्षात पंढरीच्या पांडूरंगाचे दर्शन संत तुकाराम महाराजांना झाले इथल्या सारखी पवित्र भुमी दुर्मिळ आहे. पण अलिकडे याचे पावित्र्य राखले जात नाही. अनेक महाभाग इथे व्यसन करण्यासाठी येतात. पर्यटनाच्या नावाखाली नको ते प्रकार इथे सुरू असतात. अनेक प्रेमी युगलांचा हा अड्डाच बनत चालला आहे स्थानिकांचे दुर्लक्ष आहे. खरतर ही भुमी आध्यात्मिक दृष्टीने खुप अनुभूती देणारी आहे. असे प्रकार वाढत चालल्याने इथले पावित्र्य नष्ट होत चालले आहे. परप्रांतीयांचा वावर खुपच वाढला आहे. जसे अलिकडेच शिवप्रेमींनी अनेक गड किल्ल्यांवर अवैध्य प्रकार बंद केले आहे तसेच या भामचंद्र पर्वतावरील हे वाईट प्रकार थांबले पाहिजेत त्यामुळे इथे राहणा-या साधकांचे मन विचलित होत आहे. आपल्या संस्कृतीचा होत असलेला -हास कोणीतरी थांबवायला हवा हे प्रामाणिक मत त्या युवा साधकाने मांडले. मी पण साक्षात अनुभव घेतला होता मनाला कुठे तरी दु:ख होत होते. आजूबाजूला दारूच्या बाटल्या पडल्या होत्या खाली उतरताना बाटल्यांचा खच आम्ही खाली आणून पायथ्याला फेकून दिला.
                      जगदगुरू तुकोबाराय व भामचंद्र पर्वत या दोन्ही बद्दल वारकरी संप्रदाय आणि एकूणच मराठी जणांमध्ये नितांत आदर आहे. त्यांच्या अभंगवाणीतून सामान्यांना जीवनाचे सार समजते. संत साहित्यातून तुकाराम महाराजांचे जे चरित्र रंगविले आहे, ते त्यांच्या प्रत्यक्ष व्यक्तिमत्वाशी विसंगत आहे. असहाय्य भोळसट, व्यवहारशून्य, सदैव टाळ कुटीत असलेले त्यांचे चित्र नाही. उद्दाम, अहंकारी धर्मसत्तेला आव्हान देणारे लढवय्ये संत, असे त्यांचे खरे व्यक्तिमत्व आहे. तुकोबारायांना सामाजिक न्यायाचा साक्षात्कार याच भामचंद्र पर्वतावर झाला. त्यातून लोकांची कर्जखाती त्यांनी इंद्रायणीच्या डोहात बुडविली. शुद्ध भावना, शुद्ध आचरण, रंजल्या गांजलेल्यांना मदत करणे हीच ईश्वरभक्ती मानून त्यांनी सांगितले. समाजव्यवस्थेला न्यायचे अधिष्ठान देऊन अन्यायाविरुद्ध लढा उभारला.
    ज्ञानदेवांनी ज्याचा पाया रचला त्या भागवत धर्माच्या मंदिराचा कळस तुकोबाराय झाले. मंत्रगीता या नावाने गीतेचा सुबोध अभंगात्मक अनुवाद तुकोबारायांनी केला. त्यामुळे अभंग साहित्यातील सर्वश्रेष्ठ स्थान तुकोबारायांना देण्यात आले. वारकरी पंथाला आलेले तुकोबाराय हे अमृतमधुर फूल होय...

तुकोबाचा छंद लागला मनाशी!
ऐकता पदासी कथेमाजी!!
तुकोबाची भेटी होईल ते क्षण!
वैकुंठ समान होये मज!!
तुकोबाची ऐकेन कानी हरिकथा!
होय तैसे चित्ता समाधान!!
तुकोबाचे ध्यान करोनी अंतरी!
राहे त्याभीतरी देहामाजी!!
बहिणी म्हणे तुका सहोदर!
भेटता अपार सुख होय!!

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे
८६५७४२१४२१
१६/१/२०२०

No comments:

Post a Comment

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...