Wednesday, 22 January 2020

माझी परदेश सहल

माझी परदेश सहल...
《श्रीरामाचे वंशज व गौतम बुद्धांच्या
तत्वज्ञानाने बहरलेली सुवर्णभुमी "थायलंड"》

भारतीय संस्कृतीची जाण
आध्यात्माचा होतो बहुमान!
ब्रम्हा,विष्णू,महेश,राम,बुद्ध
हेच "थायलंड" मधे श्रद्धास्थान!

आयुष्यात कोणता क्षण कधी येईल सांगता येत नाही. काही स्वप्न विचार मनाला शिवत पण नाहीत. कारण अशक्य असतात जीवनील काही अनमोल क्षण पण मित्रांच्या साह्याने सहज शक्य होतात.
आठ आॅक्टोंबरला माझे प्रिय मित्र विनोदभाऊंचा फोन आला ते म्हणाले भाऊ आपल्याला एक चांगली संधी मिळते आहे थायलंड या देशात जाण्याची तुम्ही तयारी करा. मी पण त्यांचा शब्द खाली पडून दिला नाही कोणताच विचार केला नाही आणि होकार दिला. फोन ठेवल्यानंतर मात्र दरदरून घाम फुटला कारण परदेशात जायचे म्हटले की खर्च अवाढव्य कसे होईल. पण एक ना एक दिवस परदेशात विशेष करून थायलंड ला तरी जायचेच हा निश्चय मनात केला होताच. पण योगायोगाने संधी आली ती डावलायची नाही. एक दोन मित्रांना सांगितले थायलंड म्हटल्यावर ते माझ्या कडे खालून वरून पाहू लागले. मला क्षणभर कळले नाही. पण नक्कीच या देशाबद्दल गैरसमज असणार हे जाणविले कारण अनेक मित्र जाऊन आले होते त्यांची चर्चा त्या देशाबद्दल वेगळीच असायची. त्यानंतर भरपुर जणांना कळले मी पण मोठ्या अभिमानाने सांगायचो हो मी थायलंड ला चाललो आहे. बरेच जण या देशात जाताना वेगळ्याच देशाचे नाव सांगायचे हे जायचे थायलंड ला पण युरोप सिंगापूर अशी नाव सांगायचे हे कोडे मात्र उलगडेना. मला पण योगायोगाने पहिला देश थायलंड फिरण्याचा योग आला म्हणून उत्सुकता होतीच. तसे पाहिले तर संपूर्ण जगात रेड लाईट एरिया असतातच मग या देशाला का वेगळ्याच दृष्टीने बघतात हे प्रश्न सारखे पडत होते. आपल्याला त्या गावालाच जायचे नाही तर मी कशाला थायलंडचे नाव लपवू, मी बिनधास्त सांगत होतो. फेसबुक वर तर पोस्ट सुद्धा टाकली. कारण मला पहायचा होता तो देश तिथली संस्कृती, डोळे भरून पहायचा होता तो नयनरम्य निसर्ग. निळाशार तो समुद्र, तिथली अद्भुत बेट, तिथली कला, आणि प्रदूषण मुक्त धुळ मुक्त ती स्वच्छ सुंदर शहर, श्रीरामांचे वंशज, बुद्धांची प्रेरणादायी विचारांवर आपले बहुमुल्य जीवन व्यथित करणारी ती शांत स्वभावी माणस.

थायलंडला जाण्याची २० ऑक्टोबर २०१८ ही तारीख फायनल झाली. विनोदभाऊंनी व्हिसा, विमानाची बुकिंग तेथील हाॅटेल व कार्यक्रम फायनल केले. वीस तारीख कधी उजाडते असे मला झाले होते. विदेशात जाण्याचा पहिलाच योग त्यामुळेच आनंदाला भरती आली होती. सर्व जण आपापल्या परीने मुंबई इंटरनॅशनल विमान तळावर संध्याकाळी 8 वाजताच पोहचले होते. या मधे विनोदभाऊ चौधरी, नरेशशेठ गलानी, ललितजी आरूजा, राजेशजी महाले, रमेशजी दुसेजा, गुलाबजी जेठाणी, धुळे अमितजी गायकवाड नाशिक, असा सर्व मित्र परिवार एकमेकांना भेटला. विमानतळावरील सर्व चेकिंग पूर्ण करून जेथून विमानाचे उड्डाण होणार होते त्या ठिकाणी पोहोचलो, रात्री १ वाजताचे विमान होते. ते सकाळी ७ ला बँकाॅक ला पोहचणार होते. तेथून दुसरे विमान बदलून आम्ही सर्व जण फुकेत जाणार होतो. सर्व वेळेनुसार आम्ही थायलंडमधील फुकेत विमानतळावर पोहोचलो होतो. विमानतळाच्या बाहेर नरेशशेठ गलानी यांच्या नावाचा बोर्ड धरून हाॅटेलचा माणूस उभा होता. त्यानी प्रथमता आमचे सर्वांचे एकत्रितपणे फोटो काढले. अलिशान टोयोटोच्या मिनी बस मधून आम्ही पटोंग येथील विंधम रामादा हाॅटेलवर पोहचलो. फाईव्ह स्टार हाॅटेल तेथील सुविधा सुद्धा फाईव्ह स्टार होत्या इतके भव्य दिव्य हाॅटेल पाहून मी तर चकितच झालो होतो. फुकेत पासूनच वीस किलोमीटरच्या अंतरावर पंतोंग या शहरात हे हाॅटेल भव्य डोंगराच्या पायथ्याशी उभे होते. एक दोन तास आराम करून फ्रेश होऊन तयार राहायला सांगितले. आज सहलीचा पहिला दिवस रात्री आठ वाजता फंतासिया शो साठी जायचे होते. सर्वांनी सर्व विधी उरकले आणि ताजेतवाने होऊन हाॅटेलच्या बाहेर पडलो. अलिशान मिनीबस आमची वाट पहात होती. सायंकाळचे सहा वाजले होते. फुकेत येथे फंतासिया शो च्या पार्किंग मधे पोहोचलो दुरूनच लाईटिंगचा झगमगाट दिसत होता. एक जादूई नगरी उभारावी तशी ही नगरी भासत होती. गेट जवळच पंधरा ते वीस मुली प्रत्येकाच्या स्वागतासाठी उभ्या होत्या पारंपारिक वेषातल्या या मुली प्रत्येकाला वाकून नमस्ते नमस्ते करीत होत्या. आम्ही सर्वांनी त्यांना ही नमस्ते केला. प्रवेश करताच तेथील राज्याचा फोटो व त्यावर केलेले डेकोरेशन मनभावन होते. अनेक नेत्रदीपक सजावटी पाहून मन अगदी आनंदी झाले होते. फिरून फिरून आता पोटात कावळे आवाज देत होते. आम्ही लगेच पोहचलो जिथे आम्हाला जेवण होते त्या हाॅल मधे, जणू काही या देशाच्या राजाचे जेवणाचे निमंत्रण आहे असे भासत होते. त्या हाॅलची प्रतिकृती राजवाड्या सारखी होती छतावर असंख्य झुंबर राजवाड्याची साक्ष देत होते. भिंतीवर थायलंड संस्कृतीचे दर्शन घडविणारी शिल्प होती. एका वेळेस चार हजार लोक बुफे पद्धतीने जेवतील असा हा रंग महाल पाहूनच अर्धे पोट भरले. वेगवेगळ्या पदार्थांचे स्टाॅल आम्हाला खुणावत होते. जणू काही शाही मेजवानीचा आस्वाद घेत आहोत. ग्रीन सलाड पासून ते गुलाबजाम, थाई पदार्थ गोड तिखटाचा बेत त्यामुळेच मनमुराद खाण्याचा आस्वाद घेतला. पोट भरले तरी अनेक पदार्थ सारखे खुणावत होते. शंभर च्या वर वेगवेगळे पदार्थ काय खाऊ आणि काय नको असे झाले होते, पण पोटाचा विचार केला अन भोजन थांबविले. शो टाईमची वेळ झाली होती. आम्ही सर्वजण लाईन मधे जाऊन थांबलो, रांगेत शिस्तीत अॅडोटोरिएम मधे पोहचलो चार हजाराच्या वर आसन व्यवस्था असलेले हे भव्य रंगमंदिर पहातच राहिलो. जशी जशी कार्यक्रमाची वेळ जवळ येत होती तस तशी उत्सुकता वाढत होती. निवेदकाने इंग्लीस मधे या शो ची माहिती देण्यास सुरवात केली अन थोड्याच अवधीत साक्षात स्वर्गच अवतरले असे वाटत होते.
अलिकडच्या तंत्रज्ञानाचा विशेष वापर करून प्राचीन थाई परंपरा दाखविण्याचा प्रयत्न मनाला एक ऊर्जा देत होता. यात अॅक्रोबॅटिक्स, भ्रम, पायरोटेक्निक, स्टंट, हवाई प्रदर्शन आणि बरेच काही समाविष्ट करून हा शो यशस्वी करीत होते. ४०० हून अधिक मुल आणि मुली, ४४ हत्ती, तीन वाघ, ४० शेळ्या, ४० कोंबड्या आणि ४०० कबूतरांचा समावेश या कार्यक्रमात होता. थाई संस्कृती आणि पौराणिक कथा दर्शविणारी ७०-मिनिटांचा असाधारण कार्यक्रम पाहून मन प्रफुल्लित झाले होते. रात्रीचे दहा वाजले फिरून फिरून पाय दुखायला लागले होते पण हा कार्यक्रम पाहून सर्वांनाच आनंद झाला होता. हाॅटेलची गाडी आम्हाला घेऊन जाण्यासाठी सज्ज होती.

कालचा दिवस तर खुपच छान गेला आजचा दिवस होता बेटावर जाण्याचा, फुकेत मधील phi phi island जग प्रसिद्ध आहे. सकाळीच उठून सर्व नास्ता करायला गेलो. मनसोक्त नास्त्याचा आनंद घेतला. आज दिवसाची सफर अनुभवायची होती. आज मुद्दामहून गाडीच्या खिडकी जवळ बसलो होतो. गाडी हाॅटेल सोडून काही अंतरावर पोहचली होती, समोर एक भला मोठा फ्लेक्स बोर्ड दिसला त्यावर गौतम बुद्धांचा फोटो होता पण गाडी फास्ट असल्याने त्यावर लिहीलेले शब्द दिसले नाहीत. एक दोन किलोमीटर वर आलो पुन्हा तिथे तोच फ्लेक्स लावलेला दिसला तो पर्यंत सिग्नल पडल्याने गाडी थांबली आणि मी ते शब्द वाचले ते असे होते. Budh is not decoration, Respect is common sense. हे शब्द वाचून मी थक्कच झालो प्रत्येक चार पाच किलोमीटर वर जागोजागी असे फ्लेक्स लावले होते. मी अर्थ जाणण्याचा प्रयत्न केला. बुद्ध हे फक्त डेकोरेशन साठी वापरायचे नसून गौतम बुद्धांच्या विचाराचा सन्मान करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. हे विचार खुप काही सांगून गेले. भारतात जर फ्लेक्स पाहिले तर राजकारणांनी परिपूर्ण भरलेले, कोणाचा वाढदिवस तर कोणाच्या जाहिराती यावर लक्ष केंद्रित करून काय साध्य होणार तर विचार आला शून्य. या देशातील लोक हाच मेसेज दररोज वाचतात त्यांच्यात किती बदल असेल याचा प्रत्यय लगेच आला. गाडीतून जाताना अनेक घर दिसत होती. प्रत्येक घरच्या उजव्या बाजूस दोन छोटी आकर्षक मंदिर दिसायची एका मंदिरात ब्रम्हा विष्णू महेश व राम यांची चर्तुमुख मुर्ती दिसायची तर दुस-या मंदिरात तेथील पंतप्रधान म्हणजेच राजाची मुर्ती दिसायची. किती अफाट ही श्रद्धा होती. दरवाज्यात मंदिर आल्याने आजूबाजूचा परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर दिसायचा. जिथपर्यत नजर जाईल तिकडे फक्त स्वच्छता दिसत होती, कुठे कचरा नाही की साधा कागद ही नाही. गाड्यांची गर्दी इतकी पण कुठेही हॉर्न चा आवाज येत नव्हता की गाड्यांचा धुर दिसत नव्हता. जो तो आपापल्या रांगेतच ओव्हरटेक करण्याचे धाडस कोणिच करीत नव्हते, दोन गाड्यांच्या मधे एक गाडी बसेल इतके अंतर, इतक्या गाड्या पाहिल्या पण कुठेच डॅमेज किंवा ओरखडा ओढलेली गाडी दिसली नाही. लांबच लांब रांग पण सगळेच आपल्या लेन मधे कोणीच ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नही करीत नव्हते. किती ही शिस्त खरच बुद्धांच्या विचाराने शांत आणि संयमी नागरिक हेच देशाचे खरे प्रतिक. विशेष म्हणजे रोडवर एकही पोलीस किंवा ट्रॅफिक पोलीस दिसत नव्हता. जणू काही कायदा व्यवस्था नागरीकांच्या हाती, असे दृष्य आयुष्यात पहिल्यांदा पहात होतो. बरेच किलोमीटर दूर आलो पण कुठे हदयरोग तज्ञ, नाक घसा तज्ञ, त्वचा तज्ञ, किंवा हाॅस्पीटल चा बोर्ड सुद्धा कुठे दिसला नाही. खरोखर किती निरोगी जीवन जगत असतील इथली माणसं, ना धूळ प्रदूषण ना धूर प्रदूषण प्रत्येक जण मोकळा श्वास घेत होते. माणस सोडा पण झाडांच्या पानावर पण कुठे धूळ दिसली नाही. पर्यावरणाचा प्रंचड वसाच या देशाने घेतलेला दिसत होता. आता शहर जावून जंगल सुरू झाले होते. आजूबाजूला घनदाट जंगल मधेच खजुराची शेती दिसायची रस्त्याच्या दोन्ही बाजूला खजूराची झाडं पाहून हर्ष व्हायचा. दोन दिवस अगोदरच पाऊस पडल्याने छोटे छोटे धबधबे दिसत होते. वातावरणात एक ताजगी होती. आता आम्ही जेथून बेटावर जाण्यासाठी क्रूझ जहाज जिथे थांबते तिथे पोहचलो.

एक एक करीत सर्वजण क्रूझ मधे बसलो भरपूर प्रवासी बसतील अशी सिस्टिम होती. आमचा बॅडलक आम्हाला तळाला बसायला जागा मिळाली. पहिल्या आणि दुस-या मजलावरून संपूर्ण समुद्र डोळ्यात साठवता येत होता. क्रूझ जहाज सुरू झाले आणि आमची सवारी पाच बेटे असलेल्या फाई फी बेटाकडे निघाली. आजूबाजूला काहीच दिसत नव्हते ऐखादया अंधा-या गोडावून मधे बसावे तसे वाटत होते. तगमग होती ती क्रूझ मधून समुद्राचे विशाल रूप पहाण्याची. ४१ किलोमीटरच्या समुद्र मार्गाने आम्हाला जेम्स बाॅड्ण बेटावर पोहचायचे होते. भरपूर अंतर कापले आणि आमच्या त्या गोडाऊन मधून सुटका झाली. पहिल्या मजल्यावर आलो अन पहातो ते काय निळाशार समुद्र जणू काही शाईच या समुद्रात ओतलेली. जिकडे पहावे तिकडे समुद्रच, पहिला मजला सोडून दुस-या मजल्यावर आलो आणि भान हरपूनच गेलो. सुर्य आता डोक्यावर होता त्याचे प्रतिबिंब समुद्रात खोलवर दिसत होते. त्या समुद्रातील प्रतिबिंबाच्या आजूबाजूला प्रकाशाचे गोल खळे निर्माण झाले होते. ते निलम च्या खड्या सारखे चमकत होते. सागराच्या पाण्याची वाफ सूर्यामुळेच होते. त्या वाफेतूनच पाऊस पडतो आणि सृष्टीचे चक्र चालते म्हणजेच सागर आणि सूर्य हे पूर्ण आहेत आणि या पूर्णातून पूर्ण जन्माला येऊन हे दोघेही पूर्णच राहतात. सुर्य आणि समुद्राच्या मिलनाचा हा खेळ बराच वेळ डोळ्यात साठवत होतो. मनात अनेक कल्पना जन्म घेत होत्या. दूरवर धुरकट अशी बेट दिसू लागली त्या बेटावर ढगांचे आवरण जणू काही कापसांचे पुतळेच भासत होते. हळूहळू बेट जवळ येऊ लागली होती अथांग सागरात ही मध्यभागी बेट कशी तयार झाली असतील याच विचारात होतो. निळा निळा समुद्र, निळ्या पाण्यातून बाहेर आलेली उत्तुंग, शुभ्र बेट, त्या बेटांवर, कपारीत जागा मिळेल तेथे वाढलेली बेटासारखीच उंच उंच हिरवी हिरवी झाडे, त्यांवर घिरट्या घालणारे पांढरेशुभ्र समुद्रपक्षी, बेटांच्या कडेने जाणाऱ्या वळणावळणांच्या आखीव वाटा, खरतर समुद्रातील हा एकांत असाच कायम रहावा. जीवनातील आठवणी, चांगले वाईट अनुभव जीवनरूपी खोल समुद्रातुन लाटांच्या प्रमाणे बाहेर यावेत मनरूपी कड्यावर आदळून डोळ्यांचे किनारे अलगद ओलावून जावेत समुद्राची लाट जाताना नविन स्वच्छ वाळू किना-यावर सोडून जाते तशी वैचारिक लाट जाताना मनातली सल काढून स्वच्छ भावना मनात सोडून जावी मन शांत व्हावे, नवीन उमेद मिळावी, समाधान वाटाव आणि या अथांग सागराने जीवनाच्या प्रत्येक टप्यावर अशीच साद घालावी आणि पुन्हा पुन्हा या बेटावर येण्याचा महायोग यावा असे वाटत होते. आमचे क्रूझ त्या बेटांच्या कडेने जाताना अगदीच छोटे दिसत होते. महाकाय रूप धारण केलेली ही बेटे त्या मधील गुहा समुद्र जीवांची साक्ष देत होते. अनेक छोट्या बोटी त्या बेटांच्या आतमधे जात एक वेगळीच अनुभूती त्या लोकांना येत असणार हे नक्कीच एक एक बेट पार करीत आम्ही आता किना-याला लागलो होतो. फाई फी हे बेट जगविख्यात बेट त्याच बेटाच्या बाजूला जेम्स बाॅण्ड बेट, कोरल बेट, क्रबी बेट, खेई बेट अशी पाच बेटे दिसत होती. ४१ किलोमीटरचा प्रवास केल्याने भुक लागली होती. एका हाॅटेल मधे जेवणाची सोय केली होती. कधी जेवतो आणि कधी जेम्स बाॅण्ड बेटाकडे जातो असे झाले होते. कारण की असंख्य हाॅलीवूड बाॅलीवूड चित्रपटांची निर्मिती याच बेटाच्या आजूबाजूला झाली होती. किना-या पासून समुद्रात पाच किलोमीटर आत मध्ये तीन वेगवेगळी बेट दोन पायावर उभी असलेली दिसतात. निळ्याशार पाण्यात हिरवीगार बेट एक चमत्कारच वाटतो. जेवण केल्यावर जेम्स बाॅण्ड बेटाकडे निघालो. असंख्य देशी विदेशी पर्यटक या समुद्राच्या पाण्यात मनसोक्त डुंबंत होती. पाणी इतके स्वच्छ की पाण्यात उभे राहिले की संपूर्ण पाय क्लेअर दिसत होता. मी पण पाण्यात जावून उभा राहिलो. माझ्या समोर दिसत होते ते जेम्स बाॅण्ड बेट, त्या बेटाकडे पाहून सुखावलो, निसर्गाच्या या देणगीला नमस्कार केला. किती विहंगम दृष्य दिसत होते. अनेक जण छोट्या बोटी घेऊन आत समुद्रात जावून त्या बेटाचे फोटो काढीत होते. मी पण खुप फोटो काढले. आजूबाजूचा परिसर फिरलो, या निळ्याशार बेटावर खुपच रमलो तेथून जाऊच नये असे वाटत होते. पण पुढे क्रूझ जहाज आमची वाट पहात होते. पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला होता. खुप दमल्याने मस्त झोपून गेलो. बरोबर सहा वाजता आम्ही किना-यावर पोहचलो तेथे हाॅटेलची गाडी आम्हाला घेण्यासाठी उभी होती. हाॅटेलवर जाऊन फ्रेश झालो जेवणं करून झोपी गेलो.

सकाळी सहा वाजता तयार झालो अन एअरपोर्ट ला निघालो तेथून पुन्हा बँकाॅक ला उतरलो. तिथेही अवनी हाॅटेलची गाडी आम्हाला घेण्यासाठी आली होती. टोयोटोच्या मिनी बसमधून बँकाॅक च्या दिशेने निघालो. हाॅटेलवर उतरलो आपआपल्या रूमच्या चाव्या घेतल्या ३४२ नंबरची रूम मिळाली. रूम मधे गेलो खिडक्या पडदे उघडले सातव्या मजल्यावर आम्ही होतो तेथून बँकाॅक शहर दिसत होते. मोठ मोठी उंचच्या उंच टाॅवर आकाशाला गवसणी घालीत होती. रूम मधले विहंगम दृष्य पाहून आराम करण्याची गरज वाटली नाही. टँक्सी केली अन सोनेरी बुध्दविहार पाहायला गेलो. या विहारातील बुध्दाची मुर्ती ७०० वर्षापूर्वीची जगात सर्वात मोठी बसलेली सोनेरी मुर्ती आहे. तिची उंची ५ मीटर, चवडी ४ मीटर आणि वजन ५.५ टन आहे. ही मुर्ती सुकोथाय या काळातील असून खुपच सुंदर आहे. सुरुवातीला ब्रम्हदेशाच्या आक्रमनापासून संरक्षण करण्यासाठी प्लॅस्टरने झाकून ठेवली होती. ४० वर्षानंतर या मुर्तीचा शोध लागला बाजूलाच दुसरं बुध्दविहार असून तेथे बुध्दाची निर्वांणपदाची मूर्ती आहे. येथे ९५ पगोडे असून बँकॉकमध्ये सर्वात ऊंच आहे. ह्या विहाराचं आकर्षण म्हणजे यातील मूर्ती १५ मीटर ऊंच, ४६ मीटर लांब आहे. या विहारात अग्रभागी राजाचे तैलचित्र होते. या देशात राजाला फार मानतात तेथील राजा हा प्रभू रामचंद्राचा अवतार समजतात. लव कुश या दोन मुलांच्या पैकी कुश यांचे वंशज आजचे तेथील राजे मानले जातात. बॅकाँक मधील सर्वात उंच इमारत बाययोक स्काय हॉटेल आहे. या हॉटेलला ८८ मजले आहेत. ८४ व्या मजल्यावर फ़िरता मजला आहे. तेथून बॅकाँक शहर पूर्णपणे दिसते. तेथून एकावर एक असलेले अनेक उड्डानपुल (ओव्हरब्रिज) दिसत होते. बॅंकॉक शहरात जिकडे-तिकडे उड्डानपुल असल्याने या शहराला उड्डानपुलचे शहर म्हणून ओळखल्या जाते. एक पूल ५८ किलो मीटरचा असल्याचे कळले. जगाला शांततेचा संदेश देणा-या गौतम बुद्धांना साक्षात दंडवत घातला. खरी शांतता मिळवायची असेल तर थायलंडला कायम यायचे असा मनाचा निश्चय केला.
विचार गौतम बुद्धांचा आणि वंशज प्रभू रामचंद्राचे हे आध्यात्मिक मिश्रण तसेच राष्ट्रीय ग्रंथ म्हणून रामायणाला फार महत्त्व आहे. तसे या देशाचे चिन्हात्मक प्रतिक गरूड पक्षी, हिंदू संस्कृतीचे आचरण इथला प्रत्येक नागरिक करीत आहे. गौतम बुद्धांच्या अनेक विचारांच्या पैकी
(जीवनात तुम्ही कितीही चांगल्या पुस्तकांचं वाचन करा, कितीही चांगले शब्द ऐका. मात्र जोपर्यंत हे सर्व काही तुम्ही आचरणात आणत नाही तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग होत नाही.) हा विचार या देशातील प्रत्येक नागरिकांने अंगिकारला आहे. या देशात दिसते फक्त निरव शांतता, शिस्तता, पारंपारिकता आणि निसर्गाचा अनमोल खजिना. हे सर्व पाहून झाल्यावर दुस-या दिवशी इन्द्रा मार्केट येथे आलो. तेथे आम्ही शॉपींग केले. चाॅकलेट, घड्याळ, टी शर्ट घेतले. या देशात महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत पान दुकाना पासून ते हाॅटेलच्या वेटर पर्यंत महिला कार्यरत आहेत हे विशेष आहे.
खरेदी संपवून हाॅटेल कडे परतलो बॅगा आवरल्या रात्री आठ वाजता सुवर्णभुमी विमानतळावर पोहचायचे होते. रस्त्याने खुप गर्दी तरी पण वेळेवर पोहोचलो. सुवर्णभुमी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चेकिंग झाली आणि आत मध्ये प्रवेश मिळवला. विमानतळाच्या मध्यभागी भव्य समुद्र मंथनाचा अप्रतिम देखावा पाहून थोडा वेळ स्तब्ध उभा राहिलो. गहिवरून आले खरच थायलंड या देशाविषयी अजून आदरभाव तयार झाला. प्रत्येक ठिकाणी भारतीय संस्कृतीचे दर्शन होत होते. त्यामुळेच भारत हमको जान से प्यारा है. आपल्या मातृभूमीची ओढ तर प्रत्येकाला लागलेली असतेच, मनापासून थायलंड देशाला आणि संस्कृतीला अभिवादन केले आणि भारतात येण्यासाठी विमानात जाऊन बसलो.

एक काळ होता प्रभु रामचंद्राचा देश, गौतमबुद्धाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा देश, संत परंपराचा देश म्हणून आपली भारतीयांची एक वेगळीच ओळख होती, आदर होता. पण थायलंड मधे ब-याच वेळा वेगळेच चित्र दिसायचे, भारतीय व्यक्ती दिसला की त्यांना तेथील साधा ड्रायव्हर सुध्दा विचारायचा "बुम बुम" हा कोड वर्ड शब्द पण तो इतक्या खालच्या धराचा पण यात धन्यता मानणारे आपले भारतीय हे चित्र बदलतील का? तेथील शिस्त, तेथील शांतता, नियमबद्ध जीवन अंगिकारतील का?
थायलंडला जावून वाहनांची शिस्त व स्वच्छतेची शिस्त जरी आपल्या देशात येवून आचरणात आणली तरी आपला भारत देश खरा बुद्धाचा देश म्हणून ओळखला जाईल.
थायलंड हा देश फिरून आलो आपल्या भारतीय संस्कृतीला किती मान सन्मान आहे हे डोळ्याने पाहिले अनुभवले. थायलंडचे राजे "वाजीरालाॅग्कोर्न" हे शून्य प्रदुषण, शिस्त व शांतता या तीन बीज मंत्राच्या आधारावर आपला देश अतिशय व्यवस्थित पणे सांभाळत आहेत. जनतेवर अफाट प्रेम तसेच जनतेची सुद्धा आपल्या राजावर अफाट श्रद्धा यामुळेच हा देश प्रगती पथावर आहे....

नैसर्गिक सौंदर्याने नटलेला,
शांत-सुंदर थायलंड देश,
भारतीय संस्कृतीची इथेच,
ओळख मनांस भावते थेट!

संदीप राक्षे ✍🏻
८६५७४२१४२१

1 comment:

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...