भारताच्या सुवर्ण काळाच्या राजवर्खी खुणा "अजिंठा" बौद्ध लेणी, संदीप राक्षे ✍🏻
सुवर्ण युगाचा वारसा सांगणारा आपला महाराष्ट्र देश, आपल्या या महाराष्ट्र देशात अनेक गूढ व अलौकिक शक्ती लपलेली आहे. जिर्ण झालेले गड किल्ले अजूनही सकारात्मकतेचा उर्जास्त्रोत्र भासतात. या गड किल्यांच्या सहवासातील प्रत्येक क्षण आंतरिक प्रेरणा देऊन जातो. याच महाराष्ट्र देशात काळ्या काताळातील वैभव तर साक्षात पिवळ सोनचं भासते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लेण्या मोठ्या प्रमाणात आढळतात त्यातलीच एक अजिंठा लेणी. औरंगाबाद पासून ९९ किलोमीटर वर असलेली अजिंठा ही लेणी महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारी अप्रतिम अशी शिल्पकला व भित्ती चित्रांची अनोखी कलाकृती होय. मी व माझे मित्र सिनेमॅटोग्राफर मारूती तायनाथ जळगावला एका कामानिमित्त गेलो असताना पुन्हा एकदा अजिंठा लेणी डोळे भरून पहायची अशी इच्छा झाली. मग काय संपूर्ण नादुरुस्त असलेल्या रस्त्यावरून आमचा प्रवास सुरू झाला. वीस तीस च्या स्पीडने रात्री दहा वाजता आम्ही अजिंठ्याला पोहचलो, रूम केली तिथे मुक्काम केला. सकाळी नऊ वाजता आमचा दिवस सुरू झाला.
कोरीव शिल्पकलेचा व चित्रकलेचा अद्भुत नमुना या अजिंठा लेण्यात पहायला मिळतो..
आज ही अद्भुत कला आम्ही आमच्या डोळ्यांनी पुन्हा एकदा पाहणार होतो. औरंगाबाद जळगाव रोडच्या कडेलाच लेण्यांकडे जाणारा मार्ग लागतो. शासनाच्या वतीने इथे वाहनांची सोय केलेली आहे. अजिंठा लेणीकडे आपल्या स्वताची वाहने घेऊन जाण्यास मनाई आहे म्हणून आम्ही पाच किलोमीटर दूरच गाडी पार्क केली आणि जिथे बस सुविधा उपलब्ध केलेली आहे तिथे गेलो.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तसेच औरंगाबाद कडून येणा-या खराब रस्त्यामुळे पर्यटकांची संख्या नगण्य होती. पाच सहा जण वातानुकूलित बस मधे बसून आम्ही अजिंठ्याकडे निघालो. आजूबाजूला घनदाट जंगल, पाखरांचा किलबिलाट, उंच उंच कातळ कडे मनाला सुखावत होते. वेडी वाकडी वळणे घेत बस अजिंठ्याच्या पायथ्याशी आली. गाडीतून उतरून आम्ही लेणीच्या प्रवेशद्वाराजवळ आलो थर्मामीटरने आम्हाला चेक केले त्यानंतर आम्हाला प्रवेश दिला. सत्तर ऐंशी खड्या पाय-या चढून आम्ही अजिंठा लेणीच्या प्रथम क्रमांकाच्या लेणीजवळ पोहचलो..
राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा
प्रणाम माझा हा श्री महाराष्ट्र देशा..
अजिंठा लेणीचे कातळ शिल्प पाहिल्यावर सहजच कवी गोविंदग्रजांच्या या ओळी आठवल्या..
"वाकाटक नृपती आणि त्यांचा काल" या ग्रंथात असे वाचनास येते की वाकाटकांचे साम्राज्य नर्मदेपासून ते तुंगभद्रे पर्यंत तर इकडे अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत होते. सातवाहनानंतर इ.स २५० मध्ये वाकाटकांचा उदय झाला त्यांनी इ स ५५० पर्यंत या प्रदेशावर राज्य केले. वाकाटक घराण्याची सुवर्णयुग म्हणून ख्याती होती. धर्म संस्कती कला शिल्प कला स्थापत्य कला चित्रकला यांना सुकाळ होता. वाकाटक हे घराणे बौद्धउपासक, शिवोपासक आणि विष्णुउपासक होते. भारतीय संस्कृतीचा प्रसार इतर देशात झाला, भारताची किर्ती दिगतांत गेली याचा आधार म्हणजे वाकाटकांनी कोरलेली अजिंठा लेणी..
स्वातंत्र्य पूर्व काळात या लेण्या दुर्लक्षित होत्या त्या १८३९ साली इंग्रज अधिकारी जाॅन स्मिथ यांनी प्रथम अजिंठा लेणीचा शोध लावला. कोरीव कामांचा व चित्रकलेचा अद्भुत नमुना या अजिंठा लेण्यात पहायला मिळतो. आज ही अद्भुत कला आम्ही आमच्या डोळ्यांनी पुन्हा एकदा पाहणार होतो.
पहिल्या लेणीत प्रवेश केल्यावर वीस खांबावर आधारित एक दालन दिसले प्रत्येक खांबावर सुंदर नक्षीकाम केले होते. तसेच गौतम बुद्धांच्या जन्माचे चित्रदर्शन साकारले होते. मध्यभागी गौतम बुद्धांची विशालकाय तपस्या अवस्थेतील कमलपुष्प हातात असलेली मुर्ती होती. राजा नागराज, दरबार, गौतम बुद्धाच्या विविध पेटींग मन आकर्षून घेत होत्या. छतावर मनमोहक डिझाईन दिसत होत्या त्या आता पैठणी साडीवर तसेच हिमरू शालीवर आपल्याला दिसतात. इथेच अवालोकितेश्वराची सुवर्ण मुर्ती पहायला मिळाली अशा अनेक अद्भुत चित्रकला पाहून आम्ही दुस-या क्रमांकाच्या लेणीत शिरलो. समोरच बुद्धांच्या मुर्तीचे शिल्प व हंस जन्म कथा बुद्धांचे स्वप्न कथा, बुद्धांच्या माता पित्यावरील कथा चित्रीत केलेल्या पाहिल्या. ही सर्व चित्रांची पेटिंग धातुमिश्रीत माती घेऊन त्यात डोंगरातील दगडाचे बारीक कण, वनस्पती पदार्थाचे तंतू, तांदळाचा भुसा, गवत व वाळुचा भिंतींवर किंवा छतावर लेप दिला जायचा त्यानंतर लिंबू पाण्याने धुतल्यानंतर पेंटींग करायचे विविध रंग असेच तयार करीत, प्रत्येक लेणीचे निरिक्षण परिक्षण करीत एक एक लेणी पहात होतो. अद्भुत शिल्प कलेचा व विविध मुर्तीशिल्पाचा अविष्कार पहात होतो. बौद्ध धर्मातील हिनयान व माहियान हे दोन पंथ, हिनयान पंथात अस्थिकलश पुजा करण्याची पद्धत आहे व माहियान पंथात मुर्ती पुजा करण्याची पद्धत आहे त्या प्रमाणे या बौद्ध लेण्या पहाताना हा फरक स्पष्टपणे जानवतो, या लेण्यांच्या मधे बुद्ध भिक्षुकांची साधना करण्याची पद्धत पण वेगळी होती कोणी जमिनीवर बसून तर कोणी कातळात कोरलेल्या दगडावर बसून साधना करीत असतं. ३,४,५,६,७,८,९, अशा लेण्या पाहून झाल्यानंतर १० व्या लेणी मधे हिनयान मंदीर होते. ज्यात जवळपास ४० खांब त्यावरील दर्जेदार कोरीव काम आकर्षित करते, तिथे एक स्तूप आहे त्यावर पाली भाषेतले लेख दिसतात ११ ते १५ या लेण्यांच्या मधे अर्धवट शिल्पकाम दिसते ते पाहून आम्ही सोळाव्या लेणी जवळ पोहचलो या लेणीत बुद्धांच्या जीवनातील अनेक घटनांची भित्तीचित्र दिसतात. मध्य भागी बुद्धांची मुर्ती परलम्बां मुद्रेत ध्यानस्त दिसते. हत्ती घोडे मगर तसेच छतावर सुंदर चित्रकला दिसते. याच लेणीतील एक थ्री डी चित्र लक्ष वेधून घेते त्यात बुद्धांची आई आपल्या पतीस स्वप्न सांगत आहे व ज्योतीषी त्याचा अर्थ सांगत आहे. या तिघांच्या सोबतच स्वप्नांचे चित्रिकरण, त्याची रंगसंगती मंद उजेडात उठून दिसत होती.
ते पाहून आम्ही १७ व्या लेणीत शिरलो या लेणीत अनेक जातक कथा कोरलेल्या दिसल्या पुजा स्थानात वेगळ्याच मुद्रेत गौतम बुद्धांची मुर्ती बाजूला वाकाटक वंशातील राजा हरिसेनची सुंदर पेंटींग त्यांच्या सोबत मंत्री वरहादेव यांच्या हातात दिवा ते गौतम बुद्धांना ओवाळत आहेत असे चित्र हे चित्राचा भावार्थ असा की अखंड जगास गौतम बुद्धांचे विचार प्रकाशमान करतील. येथील छत तर खुपच सुंदर पेंटींग केलेले दिसते. जणू काही लग्न मंडपाच्या वरती झालर व कपडा लावलेला. छतावरून आठवण झाली. बहुतेक लेण्यांच्या छतावर नक्षीदार पेटींग केलेली दिसते त्यामुळे छताकडे सहजच लक्ष जाते पण काही छतांकडे काहीच नसल्याने लक्ष जात नाही पण तिथेही काही ना काही असते हे आपल्या लक्षात येत नाही अशाच एका लेणीत शिरलो वर छताकडे पाहिले तर तर छतावर समुद्र किनारा कोरलेला दिसला असंख्य लाटा समुद्र किनाऱ्यावरील वाळू समुद्रातच एक खडक व एक डाॅल्फीन माशाचा आकार कोरलेला दिसला अन आश्चर्यचकित झालो आजूबाजूला सहज कोरता येते पण चक्क छतावर कोरलेले ही समुद्र शिल्प दर्शन खरच मनाला भावले. प्रत्येक लेणीची अप्रतिम वेगवेगळी शिल्पकृती, चित्रकृती पाहून आम्ही २६ व्या लेणीत शिरलो या लेणीत गौतम बुद्धांची चोहोबाजूंनी मुर्ती कोरलेल्या अन एका कोपर्यात गौतम बुद्धांचे महापरी निर्वाण झालेली भव्य मुर्ती पाहिली अन मन हेलावून गेले. मुर्तीच्या खाली शोकाकुल बसलेला जनसमुदाय तर मुर्तीच्या वर्ती देवलोक हार पुष्प घेऊन आनंदी मुद्रेतील ही शिल्प खुपच बोलकी वाटली मनोभावे या मुर्तीचे दर्शन घेतले, आज या अजिंठा लेणीत जिकडे तिकडे गौतम बुद्धच दिसत होते त्यामुळे काही काळ का होईना बुद्ध काळात असल्याचे समाधान आनंद सुख- शांती मिळाली होती. खरतर भारतात गौतम बुद्धाचे विचारांचे आचरण करायला हवं. मी थायलंड गेलो होतो तेव्हा खरच गौतम बुद्धांची विश्वख्याती त्यांच्या विचारांची महती उमगली, तुज आहे तुज पाशी परी जागा चुकलासी अशीगत आपल्या भारतीयांची आहे. अजिंठा लेणीच्या प्रवासाचा सुखद अनुभव तनामनात साठवला आणि पुढच्या प्रवासाचा मार्ग शोधला..
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१
७/१/२००२१
अभ्यासपूर्ण प्रवास वर्णन
ReplyDelete