इतिहासाच्या पाऊलखुणा असलेलं मावळातील बऊर गाव, संदीप राक्षे✍🏻
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बारा मावळ प्रांत होते त्यात मावळ तालुक्यातील तीन प्रांत होते १) पवन मावळ २) अंदर मावळ आणि ३) नाणे मावळ, याच पवन मावळातील बऊर हे गाव, मुंबई पुणे एक्स्प्रेसवे च्या शेजारी वसलेलं, कामशेत, पवना धरणाच्या रस्त्यावर, चिखलसे खिडींतून अवघ्या अंतरावर निसर्गाच्या कुशीत असलेलं ऐतिहासिक गाव म्हणजे बऊर हे गाव, फेसबुकवर आशुतोष बापट यांची या गावाविषयी लिहीलेली पोस्ट वाचली अन माझी पाऊले आपोआप या ऐतिहासिक गावातील ऐतिहासिक वास्तू पहाण्यासाठी आपोआपच वळाली..
रविवारची सुट्टी, लोणावळ्यातील थोडेसे काम उरकून मी आणि माझा धाकटा चिरंजीव संकेत, आम्ही दोघेही बऊर गावच्या ऐतिहासिक वास्तू पहाण्यासाठी निघालो. चिखलसे खिंडीतून थोडासा घाट उतरून, घाटाच्या पायथ्याला डावीकडून बऊर गावच्या रस्त्याकडे वळालो, एक ते दिड किलोमीटर गेल्यावर गावातील विष्णू मंदिराच्या जवळ पोहचलो, गाडी पार्क केली मंदिरात जाऊन विष्णू लक्ष्मीचे दर्शन घेतले त्याच मंदिराच्या मागे चौकीनी आकाराची ऐतिहासिक विहीर होती ती पहाण्यासाठी आम्ही निघालो खाचरांच्या बांधावरून चालत या विहिरी जवळ पोहोचलो विहिरीतील हिरवे पाणी व त्या विहीरीची दूरवस्था पाहून वाईट वाटले, कारण ऐतिहासिक स्थापत्याचा अद्भुत नमुना साक्षात पहात होतो. या विहिरीत उतरायला पाय-या होत्या, चारी बाजूंनी कोनाडे दिसत होती, समोर मोटेने पाणी काढता यावे यासाठी दगडात उत्कृष्ट बांधकाम केलेले, आज गड किल्ल्यावरील काही ऐतिहासिक वास्तू आपल्याला भग्न अवस्थेत पहायला मिळतात कुठेही अशा चांगल्या अवस्थेतील ऐतिहासिक वास्तू दिसत नाही. परंतू या बऊर गावाती सुअवस्थेतील ही ऐतिहासिक विहीर पाहून आनंदून गेलो होतो. परंतु तिची दूरअवस्था पाहून खरच दु:खी झालो. आजूबाजूला पूर्ण गवतांनी वेढलेली, झाडा झुडपांनी झाकलेली, विहिरीतील पाणी हिरवे केमिकल सारखे दिसत होते. त्यापाण्यात कचरा प्लॅस्टिक खच्चून भरलेले होते. गावचे या वास्तूकडे पूर्ण दुर्लक्ष असल्या सारखे दिसत होते. याच गावात गद्देगळ आहेत, वीरगळ आहेत, ते पण पाहून आम्ही गावच्या मध्यभागी असणा-या चौकोनी तलावा जवळ पोहचलो, भला मोठा तलाव पाहून कोल्हापूरच्या रंकाळा तलावाची आठवण झाली, रंकाळा खूप मोठा तलाव आहे परंतु हा तलाव छोटा आहे. अष्ट आकाराचा हा तलाव पाहून खरच॔च आश्चर्यचकित झालो. चोहोबांजूनी आठ फुटाच्या भिंती तसेच एका बाजूला तलावात उतरायला पाय-या, तर दुस-या बाजूला भले मोठे जुने बांधकाम त्यावर मोटेची व्यवस्था, तेच बांधकाम दहा ते बारा फूट रुंद व शंभर फूट लांब त्या मधून एक छोटासा दरवाजा तेथून आम्ही तलावाच्या दुस-या बाजूला आलो त्याच बांधकामात एक छोटेसे मंदिर त्यात भगवान शंकराची पिंड, सत्तर ऐंशी फूट उंच दगडी बांधकाम अजून जसच्या तस उभ आहे. तलावाच्या चारी बाजूंनी फेरफटका मारत असताना तलावाच्या एका कडेला एक शिलालेख दिसतो त्यावर बाळाजी कृष्णा ठोसर शके १७१२ हे कोरलेले दिसते, डोळे भरून ही दुर्मिळ वास्तु पाहिली. या तलावाला बामणाचे तळे असे गावकरी म्हणतात. येथील गावकरी या ऐतिहासिक वास्तुबद्दल अनभिज्ञ आहेत हे जाणवले, पहिले या तलावातील पाण्याचा वापर पिण्यासाठी करीत असत परंतु दोन तीन माणसांचे बळी गेल्यामुळे या तलावातील पाणी भांडी घासणे, गायी गुरं धुण्यासाठी, शेतीसाठी या पाण्याचा वापर केला जातो. हा तलाव पण इतर वास्तू प्रमाणे दुर्लक्षित आहे. तलाव पाहून याच गावातील अजून दुर्मिळ विहीर पहाण्यासाठी निघालो, तलावा पासून थोड्याच अंतरावर ही विहीर आहे. तिकडे जाताना वाटेतच गावातील एका व्यक्तीने हटकलेच त्याने प्रश्न केला कोणाकडे पाहुणे आलात? मी म्हणालो आम्ही कोणाकडे पाहुणे म्हणून आलो नाही. गावातील या ऐतिहासिक वास्तू पहायला आलो आहे. ते मला म्हणाले विहीरी पहायला आलात होय, मनातल्या मनात हसले अन पुढे निघून गेले. माझ्या मनात पटकन विचार चमकून गेला, नक्कीच तो माणूस आम्हाला वेडे समजला असणार. मी पण मनातल्या मनात हसलो अन पुढे चालू लागलो कच्या रस्त्याच्या कडेलाच झाडा झुडपात झाकलेली दुसरी विहीर दिसली, ही विहीर पण चौकोनी आकाराची परंतु या विहीरीत उतरायला अतिशय सुंदर मार्ग बनविला आहे, थोड्या पाय-या उतरून गेल्यावर एक सुंदर कमान केलेली त्या कमानीवर पण तोच शिलालेख लिहीलेला साक्षात पाहिला. ही विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्याने आम्हाला जास्त पहाता आली नाही. जेवढी ही वास्तू पहाता आली ते सुद्धा काही कमी नव्हते ३०० वर्षापूर्वी बांधलेल्या या दुर्मिळ वास्तू जशाच्या तशा आज पण पहायला मिळतात हे आपले भाग्य आहे. आजच्या स्थापत्य विभागाने केलेली कामं वर्ष सहा महिने सुध्दा टिकू शकत नाहीत, आपल्या पूर्वजांनी केलेली स्थापत्याची कामं शेकडो वर्षे झाली तरी जशीच्या तशी आपल्याला दिसतात. असा ऐतिहासिक वारसा आपण जतन करायला हवा, गावातील पुढारांनी त्याचं संगोपन करायला हवं तेव्हा कुठं आपल्या पुढच्या पिढीला हा अलौकिक ठेवा पहावयास मिळेल.
मरणासन्न अवस्थेत बऊर गावचा हा ऐतिहासिक ठेवा आज खरच अखेरचा श्वास घेत आहे. तरी मावळातील स्थानिक पुढारी व वृत्तपत्रांना माझी नम्र विनंती आहे हा अनमोल वारसा जतन करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा, आपल्या मावळच्या या अलौकिक वैभवासाठी दुर्गप्रेमी, सामाजिक संस्थांनी, युवकांनी आवाज उठवून स्थानिक पुढा-यांना व सरकारी यंत्रणेला जागे करा ही नम्र विनंती आहे..
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२४२१
१७/०१/२०२१
No comments:
Post a Comment