Tuesday, 26 January 2021

श्री विठ्ठल मंदिर हंपी

 भारताच्या सुवर्ण वैभवाच्या पाऊलखुणा..

"विजय श्री विठ्ठल मंदिर" हंम्पी कर्नाटक 

संदीप राक्षे ✍🏻


हरिहर आणि बुक्क या दोन महापराक्रमी भावांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना तुंगभद्रा नदीच्या काठी १४ व्या शतकात आपली भव्य दिव्य अशी राजधानीचे निर्माण केले. (विजयनगर म्हणजेच कर्नाटक राज्यातील बेलारी जिल्ह्यातील होस्पेट तालुक्यातील "हंम्पी") त्यानंतर कृष्णदेवराय यांनी अतिशय सुंदर रस्ते, भव्य मंदिरे, धर्मशाळा, किल्ले, कालवे, हस्तीशाळा, घोड्यांचे बाजार, कोरीव कामांची भव्य नगरीचे निर्माण केले. पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या सर्व वस्तू या विजयनगरीत मिळत असत, कस्तुरी हिरे मोती माणकं हत्ती घोडे अशा अनेक वस्तूचीं खरेदी विक्री या साम्राज्यात चालत होती. अजिंक्य असणा-या विजयनगर वैभवाचा विद्ध्वंस कुतुबशाह, आदिलशाह, निजामशाह व बरीदशाह यांनी एकत्रित हल्ला करून केला, आज जर पाहिले तर इथे फक्त भग्न अवस्थेतील अवशेष पहायला मिळतात त्यापैकी हे विजय विठ्ठल मंदिर अजून सुअवस्थेत इतिहासाची साक्ष देत आज ते जागतिक वारसा स्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहे.


कानडाऊ विठ्ठलु कर्नाटकु येणे मज लावियेला वेधु! 


या अभंगात संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्री विठ्ठलाच्या उत्पतीचा मागोवा घेतला आहे अभंग तर अर्थपुर्ण सुंदर आहेच पण आशयाच्या दृष्टीने ही बहुअर्थसूचक, शब्दांच्या पलीकडे जाऊन येणाऱ्या अनुभुती चं आकलन करुन देणारा आहे. विजयनगरचे सम्राट कृष्णदेवराय हे सुद्धा सावळ्या, साजिऱ्या श्री विठ्ठलाचे परम भक्त होते. त्यांनीच अद्भुत असे विठ्ठल मंदिर बांधले होते. एके दिवशी कृष्णदेवराय यांना स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला की मला इतके वैभव नको आहे. मी निर्गुण, निराकार, निर्मोही आहे साध्या भाजी भाकरीवर राजी असणारा, साधी धोटी, चिंधोटी लपेटणाऱ्या भक्तांचा आहे. तू मला पंढरपूरला स्थापन कर, तेव्हापासून कर्नाटक मधील विजय श्री विठ्ठल मंदिरात कोणतीही मुर्ती स्थापन केली नाही अशी आख्यायिका आहे.

                     माझा चिरंजीव संकेत व मित्र सुरज नळगुणे आम्ही तिघेजण ५७१ किलोमीटरचा प्रवास करून रविवार दि २४/१/२०२१ रोजी हंम्पीत पोहचलो रात्री मुक्काम करून सकाळीच सुर्य देवाचे दर्शन घेऊन ही अद्भुत नगरी पहाण्यास निघालो सोबत नेहमी प्रमाणे गाईड घेतला आम्ही सर्व प्रथम विजय विठ्ठल मंदिर पहाण्यास निघालो. मुख्य रस्त्यावरच गाडी पार्क केली तेथून एक किलोमीटर पायी चालत विठ्ठल मंदिराजवळ पोहचलो..

भव्य अशी कमान आजूबाजूला दगडी शिल्प कलेची कमाल दिसत होती. मंदिराच्या बाहेरच उजव्या बाजूला एक पुष्करणी आहे त्यात निळेशार पाणी आणि मधोमध कृष्ण मंदीर होते ते पाहून आम्ही मुख्यव्दारा जवळ पोहचलो, भव्य असे व्दार त्यावर सुंदर दगडावर नक्षीकाम केलेले अनेक देव देवतांची शिल्प कोरलेली. तेथून पुढे गेल्यावर श्री विठ्ठल मंदिराच्या समोरच ३० ते ३६  फुट उंचीचा कोरीव काम केलेला, अतिभव्य दगडी रथ उभा केलेला, एकाच दगडातून हा रथ तयार केलेला दिसत होता. बारीक पाहिले तर तो व्यवस्थित सांधलेला दिसत होता. रथाची अजस्त्र दगडी चाक त्यावरील अवर्णनीय कोरीव नक्षीकाम, रथाच्या दोन बाजूस दगडी हत्ती, 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल यांचे मुळ मंदिर हंम्पी येथील विजय विठ्ठल मंदिरच, कारण गरूड रथावरील श्री विठ्ठलाचे कोरीव शिल्प याची साक्ष देते आज तोच दगडी रथ ऐतिहासिक वारसा म्हणून जगप्रसिद्ध आहे. तेथून आम्ही मुख्य मंदिरात शिरलो भव्य मंदिर पाहून डोळे दिपून गेले, सारच अवर्णनीय होते. यासाठी खरच शब्दच नाहीत. आज संपूर्ण महाराष्ट्रात श्री विठ्ठलाची संगीताच्या माध्यमातून भक्ती व आराधना केली जाते तसेच, चौदाव्या शतकातील हंम्पी येथील श्री विठ्ठल मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे या मंदिरात ५६ खांब आहेत ते संगीतस्तंभ म्हणून ओळखले जातात, या स्तंभांना हातांनी वाजविल्या नंतर घट पखवाज या सारख्या तालवाद्यांचा आवाज येतो तसेच समधुर असे सप्तसुर ही या संगीतस्तंभातून वाजतात. प्रत्येक संगीत स्तंभास न वाजवता फक्त हात फिरवला त्यावरील नक्षीकाम डोळ्यांत साठवले व गर्भ मंदिरात गेलो तेथील दृष्य मन सुन्न करणारे होते कारण मुर्ती विना मंदिर अडगळ वाटत होते. गर्भ मंदिराच्या डाव्या बाजुला एक भुयारी बंदिस्त मार्ग दिसला तो प्रदक्षिणा मार्ग होता. संपूर्ण अंधारात मोबाईलच्या लाईनवर चालत राहीलो, प्रचंड गारवा जाणवत होता. खरच आध्यात्माची अनुभूती प्रदक्षिणा घालताना येत होती. उजव्या बाजुला दुसरा भुयारी मार्ग तेथून बाहेर पडलो. सभा मंडपातील कोरीव काम पाहून मंदिराच्या बाहेर पडलो. संपूर्ण मंदिर परिसर पाहिला.. आजूबाजूलाच अतिसुंदर मंदिर पाहिली..

मंदिराला लागूनच कल्याण मंडप आहे ज्याच्या खांबाची गणती करणे कठीण आहे प्रत्येक खांबावर विविध देवता व प्राण्यांची कोरीव अप्रतिम शिल्प, याच मंडपात राजघराण्यातील विवाह संप्पन्न होत असत..

मंदिराच्या मागील बाजूस मोडलेल्या खांबाचा तुटलेल्या मुर्तीचा ढिगारा होता तेथूनच कमलापूर गावाकडे जाण्याचा व्यापारी मार्ग दिसतो, तेथून आम्ही तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर गेलो नदीचे दर्शन घेऊन नदीच्या पाण्याने तोंड हातपाय धुतले उत्साह वर्धक असा निसर्ग पाहून दुस-या स्थळाकडे निघालो...


बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल!

करावा विठ्ठल जीवभाव!!

तुका ह्मणे देह भरिला विठ्ठलें!

कामक्रोधें केलें घर रीतें!!


संदीप राक्षे ✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१


No comments:

Post a Comment

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...