भारताच्या सुवर्ण वैभवाच्या पाऊलखुणा..
"महानवमी दिब्बा" हंम्पी कर्नाटक
संदीप राक्षे ✍🏻
हंम्पी हे नाव ऐकले वाचले की अस वाटत की एखाद पर्यटन निसर्गरम्य स्थळ असाव. परंतू आध्यात्म व इतिहासाचा अनोखा संगम असलेलं हंम्पी हजारो एकर मधे तांबूस अजस्त्र दगडांच्या मधे हे विजयनगर आताचे हंम्पी वसलेलं आहे. ५०० पेक्षा जास्त पुरातन वास्तुंचे अवशेष हे इथले विशेष आहे. आम्ही आधुनिक हाॅस्पेट शहरातून जेव्हा हंम्पी मधे प्रवेश केला तेव्हा मला १४ व्या शतकात आलो असल्याचा भास झाला. वास्तु पुरातन आणि माणसं फक्त आधुनिक दिसत होती इतकाच फरक होता. केळी व नारळाच्या झाडांनी आच्छादलेलं हंम्पी मनाला खूपच भावलं. एक एक रहस्यमयी स्थळ पहात आम्ही महानवमी दिब्बा या अतीभव्य प्रांगणात पोहचलो, हा दिब्बा (व्यासपीठ) ओरिसाच्या गजपती राज्यकर्त्यांच्या विजयाच्या स्मरणार्थ राजा कृष्णदेवराय यांनी बांधला होता. इथे शाही प्राण्यांचे कार्यक्रम, युद्ध खेळ, वाद्य प्रदर्शन, जलचर खेळ असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या महानवमी दिब्बा येथे चालत असत ते पहाण्यासाठी राज परिवार, शाही पाहुणे व विदेशी पर्यटकांना बसण्यासाठी २५ फूट उंच व ८० फुट लांबी व रूंदी असलेला भव्य व्यासपीठ होते दूरनच त्याची भव्यता दिसत होती. आम्ही त्या व्यासपीठाजवळ गेलो, दगडावर पशू पक्षी नृत्य अशा अनेक नक्षीकामांनी चोहोबांजूनी सजवलेले व्यासपीठ पाहिले. व्यासपीठाच्या मागच्या बाजूला राजपरिवारासाठी भव्य पाय-या बनविल्या होत्या, त्या पाय-यांचे कठडे त्यावर कोरीव कामांचा अद्भुत नमुना दिसत होता, हत्ती, घोडे, योद्धा, नर्तक, संगीतकार यांचे कोरीव काम फारच सुंदर दिसत होते. पाय-या चढून आम्ही व्यासपीठावर पोहचलो, उंचावरून आजूबाजूचा परिसर सहज दिसत होता, समोरील प्रांगणातील माणस अगदी लहान दिसत होती. मनसोक्त फोटो काढून आम्ही व्यासपीठाच्या शेजारीच असलेल्या ग्रॅनाईटच्या एका ब्लाॅक मधून १२.५ मीटर लांबीच्या कुंडा जवळ पोहचलो हा कुंड नुकताच उत्खनातून उदयास आला होता. त्यातील पाणी कार्यक्रमाला आलेल्या जनतेसाठी वापरत असे, दगडी पाईप लाईनने ते पाणी जिथे जेवणाच्या पंगती बसत असत तिथपर्यंत ही दगडी लाईन गेलेली होती. आम्ही त्या पाईप लाईन कडेने चालत जिथे जेवणाच्या पंगती बसत होत्या तिथपर्यंत पोहचलो. तिथे गेल्यावर दगडी पत्रावळी पाहून थक्कच झालो, हजारो माणस एकावेळेस जेवायला बसतील असे दगडात कोरीव काम केलेल्या ताट वाटीचा मोठा खांब दिसल्या त्याच्या समोरून या दगडी पाईप लाईनने पाणी वहात जाई, जेवताना पाणी पिण्याची ती सोय पाहून ती कल्पना पाहून खरच त्या इतिहासातील कलाकारांना सलाम करावा वाटला. व्यासपीठाच्या मागच्या बाजूला दगडांचा भलामोठा दरवाजा पाहिला, हजारो टन वजनाचा दरवाजा त्याचे नक्षीकाम नेत्रदीपक होते. अनेक अशी रहस्यमयी ठिकाण पाहून मी संकेत व सुरज नळगुणे पुढच्या रहस्यमयी ठिकाणाकडे निघालो..
संदीप राक्षे✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१
No comments:
Post a Comment