वज्रदेही रामसेज किल्ला नाशिक...
संदीप राक्षे✍🏻
नाशिक शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नियुक्तीचे पत्र दयायचे होते म्हणून प्रज्ञा तोरसकर यांच्या घरी मी जिल्हाध्यक्ष किरण सानप, व माझे मित्र सिनेमॅटोग्राफर मारूती तायनाथ असे आम्ही तिघेजण गेलो होतो. निवडीचे पत्र दिले त्यानंतर समीर तोरसकर सर आणि आम्ही तिघेजण गप्पा मारीत बसलो होतो. गप्पांच्या ओघांत मारूती तायनाथ आणि समीर तोरसकर यांचा गड किल्ले हा विषय सुरू होता. तोरसकर सर सांगत होते लाॅकडाऊनच्या काळात नाशिक पासून जवळच असलेला रामशेज किल्ला आमच्या बिल्डिंगच्या टेरेसहून अगदी स्पष्ट दिसायचा त्यांची किल्याच्या विषयीची माहिती ऐकूनच मी रामशेच्या पायथ्याशी पोहचलो असे वाटले, भास झाला होता, तोरसकर परिवाराचा निरोप घेतला..
तसाही आजचा दिवस सार्थकी लावायचा होता असं ठरवून नाशिकपासून जवळच असणा-या रामशेज गडावर चढाई करायचं ठरवले, मला चांदवडला जायचे होते परंतु गाडी रामशेजच्या दिशेने फिरवली. नाशिकहून पेठला जाणाऱ्या रोडने मी व मारूती तायनाथ रामशेजला निघालो. नाशिक ते रामशेज हे १५ कि. मी एवढं अंतर आहे. गडाच्या जवळ येताच रामशेज किल्ला रस्त्याच्या मधोमधच उभा आहे की काय असं वाटलं गडाखालच्या आशेवाडी गावात पोहोचलो तेव्हा दुपारचा एक वाजला होता. गडाच्या पायथ्याशी पोहचलो एका मोकळ्या जागी गाडी उभी करून आम्ही गडाकडे निघालो. गावातून निघून गडाला दूरवर अर्धगोलाकार वळसा घालून आम्ही गडाच्या पश्चिम दिशेला पायथ्याशी आलो. गड तसा फार उंच नव्हता पण रस्ता खूपच खराब होता. किल्यावर चढताना खूपच त्रास झाला पाऊण तासातच गड चढून आम्ही वर पोहोचलो. गडावर प्रवेश करण्या अगोदर उजव्या हाताला डोंगराच्या कडय़ात एक गुहा पाहायला मिळते. गुहेच्या खाली गडावर जाणाऱ्या वाटेला लागूनच रामाचं देऊळ आहे तिथे आम्ही शिरलो, मंदिरातील गारवा व तेथील उर्जेने आमचा शीण कुठच्या कुठ पळून गेला, त्या मंदिरातच एक विभूती बसलेली होती आम्हाला पाहिल्यावर त्यांच्या चेहर्यावरील भाव बदलले, बेटा पुना से आये हो असे त्यांनी विचारले ? मी होकार दिला रामाचे दर्शन घेऊन त्यांच्या आसना जवळच जाऊन बसलो, सत्तर वर्षाचे वय पण अजूनही मनाचे तारुण्य चेहर्यावरील आनंद योगपुरूषाची साक्ष देत होता. बाबांनी आमची विचारपूस केली. त्यांची ओळख सांगितली मै दिगंबर नागा आखाडे का साधू हू हनुमान बाबाजी, पंचवीस वर्षापासून येथे राहतो तसेच माझा नाशिकला हनुमान आश्रम आहे त्याचा मी महंत आहे. इतकी मोठी विभूती अन किल्ल्यावरील मंदिरात आम्ही थोडे विचारात पडलो तेव्हा ते म्हणाले इथे प्रभु रामचंद्र विश्रांती साठी येत असत, तसेच छ शिवाजी महाराज, छ संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा पवित्र पावन किल्ला आहे इथे साधना सहज होते. हनुमान बाबांनी स्कंद पुराणात कलयुगा विषयी लिहीलेल्या चार पाच ओळी आम्हाला ऐकवल्या त्या अशा होत्या लोक पैशाच्या मागे लागतील त्याच्या ताणताणवामुळे अनेक आजार जडून अल्प आयुशी बनतील, लोक भोगवादी बनतील, सत्ता संपत्ती साठी एकाच रक्ताचे भाऊ भावांचे खून करतील, पैशासाठी लोक भ्रष्टाचार करतील, सरकार लोकांकडून कर रूपाने जास्त टॅक्स वसुल करतील, अल्पआयुष्य होतील, कष्टाने संपत्ती मिळवण्यापेक्षा मागच्या दाराने पैसा कसा येईल त्यावर भर देतील, घरचे भोजन करण्यापेक्षा बाहेरील चमचमीत जेवणावर भर देतील, एकमेकांचे अहित कसे होईल असे लोक पाहतील, या कलियुगात योग साधना भक्ती दान धर्म करतील हेच लोक या कलियुगात टिकतील.. अशी अनेक वचनं बाबांनी आम्हाला मराठीत ऐकवली, बाबांच्या सानिध्यात थोडावेळ घालवून देवळातील मारुती, दत्तगुरू, दुर्गामाता यांचे दर्शन घेतले अन तेथून बाहेर पडलो, मंदिराच्या बाहेरच थंडगार पाण्याचं टाकं होत. ते पाणी चेहर्यावर मारले थोडे फ्रेश झालो, दहा पायऱ्या चढून तटबंदी फोडून केलेल्या वाटेने आम्ही गडप्रवेश केला. उजव्या हाताला दोन भूमिगत उद्ध्वस्त दालनं पाहण्यास मिळाली बहुतेक ही दारूकोठारं असावीत. एक सोंड गडाच्या उत्तर दिशेस पसरली आहे. या सोंडेच्या दोन्ही हाताला तासलेले कडे आहेत. याच दक्षिण दिशेला गडाचा महादरवाजा दिसतो. दरवाजा अखंड काळय़ा कातळात खोदलेला आहे. दरवाज्यासकट सर्व कातळ कडे तासून काढलेले होते. हा मार्ग सध्या वापरात नाही. कारण दरवाजा मोठमोठय़ा दगडांनी व मातीने गाडला गेला आहे. दरवाजा पाहून आम्ही गडाच्या सर्वोच्च माथ्यावर आलो. पूर्व दिशेच्या कडय़ावर दक्षिणमुखी महिषासूरमíदनीचे छोटे पण सुबक मंदिर आहे. देवळाबाहेर सिमेंटची गोलाकार दिपमाळ आहे. या देवळाच्या बरोबर खाली पूर्व दिशेच्या कडय़ावर गडाचा दुसरा दरवाजा आहे. हा दरवाजाही अप्रतिम आहे. पण याच्या पाय-या तोडून टाकल्या आहेत. तिथून खाली पाहताना भीतीच वाटते. पाय घसरला तर स्वर्गवास झालाच म्हणून समजायचे, या ठिकाणी भन्नाट वारा वाहतो. समोरचा निसर्ग पाहण्यात आणि दूरवर दक्षिणेला, रस्त्याच्या पलिकडून दिसणारा देहेरगड व त्याचे सुळके पाहण्यात गुंग झालो. सध्या देहेरगड भारतीय सैन्याच्या ताब्यात आहे. त्यावर रडार यंत्रणा बसवल्यामुळे सर्वसामान्यांना गडावर येण्यास बंदी आहे. रामशेज गडावर पाण्याचे टाकही भरपूर आहेत पण वापरात नसल्यामुळे काही टाक बुजून गेले आहेत. रामशेज गड तसा छोटा आहे. मूर्ती लहान पण किर्ती महान, या म्हणीला साजेसा हा किल्ला आहे. रामशेज किल्याची उंची समुद्रसपाटीपासून ३२०० फूट एवढी आहे. हिंदवी स्वराज्य बुडवण्यासाठी औरंगजेब दक्षिणेत उतरला तेव्हा त्याने प्रथम रामशेजला मोहरा केला. याचं कारण म्हणजे औरंगजेबचे वडील शहाजान दख्खन जिंकण्यासाठी दक्षिणेत आला होता तेव्हा त्यानेही पहिल्या झटक्यातच रामशेज जिंकून विजेत्याच्या दिमाखात दख्खनमध्ये प्रवेश केला होता. मात्र हिंदवी स्वराज्य गिळंकृत करण्याचं स्वप्न पहात आलेल्या औरंगजेबाला या रामशेज सारख्या सामान्य गडानं तब्बल साडे सहा वर्षे झुंजवल, छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत. रामशेजगड मोघलांच्या विरूद्ध सतत साडे सहा वर्षे लढत होता. रामसेज जिंकण्यासाठी औरंगजेबाने शहाबुद्दीन गाजीउद्दीन फिरोजजंग याला ३५ ते ४० हजार सैन्य व प्रचंड तोफखाना, दारूगोळयासह पाठवलं होतं. सोबत राजस्थानचा राजा राव बुंदेला, पीरगुलाम, कासीमखान, रामसिंह बुंदेला इत्यादी मातब्बर सरदार होते. रामसेजला मोगलांचा वेढा पडला. रामशेजवरील किल्लेदाराने लढाईची जय्यत तयारी केली होती. मोगलांचे सर्व प्रकारचे आक्रमण तो परतावून लावत होता. मराठे पराक्रमाची शिकस्त करत होते. मे १६८२ मध्ये संभाजी महाराजांनी रामशेजचा मोगलांचा वेढा फोडण्यासाठी रूपाजी भोसले व मानाजी मोरे यांना पाच ते सात हजार मराठे मावळे देऊन रामशेजवर पाठवले. मराठयांचे मावळे येत असलेले पाहून शहाबुद्दीन मराठय़ांना अडवण्यासाठी धावला. गडाजवळच्या गणेश गावापाशी मराठे-मोघल एकमेकांवर तुटून पडले. तुंबळ युद्व सुरू झालं. मराठय़ांसमोर मोघलांनी माघार घेतली. पण त्यांनी रामशेजच्या वेढयावर परिणाम होऊ दिला नाही. मराठयांनी हल्ला केल्याचे समजताच औरंगजेबाने बहादूरखानाला ताबडतोब रामशेजला शहाबुद्दीनच्या मदतीला पाठवलं. शहाबुद्दीनने व बहादूरखानने रामशेजवर जोरदार हल्ला चढवला. पण गडावरच्या मावळ्यांनी जोरदार प्रतिकार करत हल्ला परतवून लावला.
या हल्ल्यात मोघलांकडील राजा दलपतराय जबर जखमी झाला. हल्ला नाकाम झालेला पाहून निराश झालेला शहाबुद्दीन वेढा सोडून जुन्नरला निघून गेला. वेढय़ाची सारी जबाबदारी बहादूरखानावर येऊन पडली. रामशेज जिंकण्यासाठी बहादुरखानाने हर त-हेचे उपाय करून पाहिले. तंत्र मंत्र अघोरी उपाय करून पाहिले. पण रामशेजचा टवका उडत नव्हता. खानाने खूप परिश्रम घेतले पण यश आलं नाही. या अपयशाने रामशेजपुढे होत असलेली दुर्दशा पाहून औरंगजेब भयंकर संतापला. त्याने बहादुरखानाला वेढा उठवण्यास फर्मावलं. मोगलांचा तंबू गुंडाळला गेला. खान वेढा उठवून माघारी निघून गेला. बखरकार काफीखान म्हणतो, रामशेजवर मोगलांच्या अमाप संपत्तीचा चुराडा झाला होता. हजारो माणसे मारली गेली. प्रचंड दारूगोळा नष्ट झाला होता. तरीही औरंगजेब सहजासहजी रामशेजचा नाद सोडण्यास तयार नव्हता. औरंगजेबाने मोघल सैनिकातील शूर व तडफदार सरदार कासिमखान किरमाणी याला रामशेज जिंकण्यासाठी पाठवलं, पण त्यालाही यश आलं नाही.
शेवटी औरंगजेबाने वेढय़ाचे काम तहकूब करून कासिमखानाला दुस-या कामगिरीवर पाठवलं. रामशेजवरील मराठय़ांच्या पराक्रमावर खूश होऊन संभाजी महाराजांनी किल्लेदाराला चिलखती पोशाख, रत्नजडीत कडे व रोख नगद रक्कम पाठवून त्यांचा गौरव केला. रामशेजवरील मराठय़ांच्या पराक्रमाचे वर्णन आपल्याला परकीय साधनामध्येच मिळते. या वेढय़ाच्या वेळी ३० जुलै १६८२ ला कारवारकर इंग्रज सुरतकरांना कळवतात की मराठय़ांचे दहा हजार पायदळ घेऊन हंबीरराव वेढा घालून बसलेल्या सैन्यास पळवुन लावण्यासाठी गेल्याची व नंतर झालेल्या लढाईत जखमी झाल्याचे सांगतात. हंबीरराव व रूपाजी, मानाजीनी शहाबुद्दीनशी दिलेली लढाई एकच का वेगवेगळी हे साधनांच्या अभावी सांगणे कठीण आहे. शेवटी हा अजय गड सन १८१८ मध्ये इंग्रजांनी घेतला. त्रिंबकगड इंग्रजांनी घेतल्याचे पाहून रामशेजवरील लोकांनी हा गड इंग्रजांच्या स्वाधीन केला. यावेळी इंग्रजांना गडावर आठ मोठय़ा तोफा, नऊ लहान तोफा, जंबुरे, २५१ पौंड दारू, तसेच गंधक, चांदी, पितळ, शिसे, ताग, तांबू, गालीचे व एक चिलखत सापडलं. हे चिलखत शिवाजी महाराजांचं होतं, असं कॅप्टन ब्रिज यांनी २० जून १८१८ च्या रिपोर्टमध्ये लिहून ठेवलं आहे. खरतर मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा रामशेज किल्ला खूपच दुर्लक्षित आहे. इतके मोठे इतिहासाचे पान सांगणारा हा किल्ला जीर्ण अवस्थेत उभा आहे. खरतर हे गड किल्ले महाराष्ट्राची शान आहे. ही आपली खरी मंदिर आहेत, इथली उर्जा मंदीरा इतकीच उर्जावान आहे. इतिहासाची इतकी गहन साक्ष देणारा, साक्षात तो किल्ला डोळ्यांनी पहाताना आपण खूप भाग्यवान आहोत हे जाणवले कारण इथला सहवास अनुभवायला मिळाला.. इथे असणारी पराक्रमाची उर्जा आत्म्याला स्पर्श करून जायची कारण तू पण या मातीत जन्माला आलास खरच या जन्मांच सोनं झालं.. आयुष्यात धन संपत्ती पेक्षाही या गड किल्यांच्या सानिध्यातील दिवस खरच खूप श्रीमंत करून जातो.. रामशेज किल्याची माती भाळाला लावून, नतमस्तक झालो.. पुन्हा पुन्हा दर्शन घेऊन परतीचे वाटेला निघालो...
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६

No comments:
Post a Comment