भारताच्या सुवर्ण वैभवाच्या पाऊलखुणा..
"विरूपाक्ष मंदिर" हंम्पी कर्नाटक
संदीप राक्षे ✍🏻
सासिवेकालु आणि कडलेकालु ही दोन गणपतीची मंदिर पाहून आम्ही कर्नाटकचे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र विरूपाक्ष मंदिर पहाण्यासाठी निघालो. तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर विरूपाक्ष मंदिर आहे. विरूपाक्ष ही देवता भगवान शंकराचा अवतार मानला जातो. विरूपाक्ष म्हणजे तिरकस डोळ्यांचा देव, हे मंदिर विजयनगर (हंम्पी) च्या साम्राज्याचे मुख्य केंद्रस्थान होते. संपूर्ण विजयनगर राज्य उध्वस्त झाले परंतु हे विरूपाक्ष शिवमंदिर जस होत तसच आजही इतिहासाची साक्ष देत भक्कम पणे उभ आहे. चौदव्या शतकात पंपातीर्थ स्वामीस्थळ म्हणून जगप्रसिद्ध होते. या मंदिराचे प्रवेशद्वार १०८ फुट उंच आहे अतिशय बारीक कोरीव नक्षीकाम अजून सुस्थितीत असून द्रविड स्थापत्याचा अद्भुत नमुना आहे. या मंदिरात अनेक गोपुरे आहेत, गोपूर म्हणजे पिरॅमिड सारख शिखर, ग्रॅनाईट आणि विटावर प्लॅस्टर ने नक्षीकाम केलेले अतिशय सुंदर दिसते. सोनेरी कळस, सोनेरी मोर पीस खोवल्या सारखी दिसतात. हे सार पाहून आम्ही मुख्य मंदिरात शिरलो. भली मोठी रांग दर्शनासाठी होती. आम्ही तिघेही रांगेत उभे राहीलो, रांगेत जरी उभे असलो तरी नजर मंदिराच्या नक्षीकामाकडे होते. सिंह, हत्ती, घोडे, मगर अशी विविध शिल्प कोरलेली दिसत होती. प्रत्येक खांबावर प्राण्यांच्या आकाराचे शिल्प कोरलेले होते. गर्दी पुढे सरकत सरकत आम्ही गाभा-या जवळ येऊन पोहचलो. विरूपाक्ष देवाचे मनापासून दर्शन घेतले, गाभा-यातून बाहेर पडलो, शेजारीच कृष्णदेवराय राजाच्या काळातील राज्याभिषेक मंडप पाहिला. मंडपाला नक्षीकाम व अलंकाराने मढवलेले कित्येक खांब दृष्टीस पडत होते. खरतर हे वैभव पाहून आम्हाला आमचाच विसर पडला आपण आधुनिक काळातील आहोत. इतके या वास्तूपाहून मंत्रमुग्ध झालो होतो. खरतर चौदाव्या शतकातून आपण बाहेरच पडू नये असे सारखे वाटायचे, सुर्यदेव ही आपली दिनचर्या संपून मावळती कडे झुकत होते. संपूर्ण अवनीवर सव सांजेचा अंधूक प्रकाश पसरत चालला होता. आमच्या गाडीकडे जाताना पुन्हा पुन्हा या वास्तूकडे नजर जात होती. काळोखाचे साम्राज्य वाढून इथल्या वास्तू सुद्धा काळोखाच्या कचाट्यात सापडून दिसेनाशा झाल्या होत्या.. हंम्पीच्या वास्तूतले हे शेवटचे पवित्र स्थळ पाहून, आम्ही पुण्याकडे मार्गस्थ झालो..
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१
No comments:
Post a Comment