Sunday, 17 January 2021

मावळातील बऊर गाव

 इतिहासाच्या पाऊलखुणा असलेलं मावळातील बऊर गाव, संदीप राक्षे✍🏻


छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बारा मावळ प्रांत होते त्यात मावळ तालुक्यातील तीन प्रांत होते  १) पवन मावळ २) अंदर मावळ आणि ३) नाणे मावळ, याच पवन मावळातील बऊर हे गाव, मुंबई पुणे एक्स्प्रेसवे च्या शेजारी वसलेलं, कामशेत, पवना धरणाच्या रस्त्यावर, चिखलसे खिडींतून अवघ्या अंतरावर निसर्गाच्या कुशीत असलेलं ऐतिहासिक गाव म्हणजे बऊर हे गाव, फेसबुकवर आशुतोष बापट यांची या गावाविषयी लिहीलेली पोस्ट वाचली अन माझी पाऊले आपोआप या ऐतिहासिक गावातील ऐतिहासिक वास्तू पहाण्यासाठी आपोआपच वळाली.. 

रविवारची सुट्टी, लोणावळ्यातील थोडेसे काम उरकून मी आणि माझा धाकटा चिरंजीव संकेत, आम्ही दोघेही बऊर गावच्या ऐतिहासिक वास्तू पहाण्यासाठी निघालो. चिखलसे खिंडीतून थोडासा घाट उतरून, घाटाच्या पायथ्याला डावीकडून बऊर गावच्या रस्त्याकडे वळालो, एक ते दिड किलोमीटर गेल्यावर गावातील विष्णू मंदिराच्या जवळ पोहचलो, गाडी पार्क केली मंदिरात जाऊन विष्णू लक्ष्मीचे दर्शन घेतले त्याच मंदिराच्या मागे चौकीनी आकाराची ऐतिहासिक विहीर होती ती पहाण्यासाठी आम्ही निघालो खाचरांच्या बांधावरून चालत या विहिरी जवळ पोहोचलो विहिरीतील हिरवे पाणी व त्या विहीरीची दूरवस्था पाहून वाईट वाटले, कारण ऐतिहासिक स्थापत्याचा अद्भुत नमुना साक्षात पहात होतो. या विहिरीत उतरायला पाय-या होत्या, चारी बाजूंनी कोनाडे दिसत होती, समोर मोटेने पाणी काढता यावे यासाठी दगडात उत्कृष्ट बांधकाम केलेले, आज गड किल्ल्यावरील काही ऐतिहासिक वास्तू आपल्याला भग्न अवस्थेत पहायला मिळतात कुठेही अशा चांगल्या अवस्थेतील ऐतिहासिक वास्तू दिसत नाही. परंतू या बऊर गावाती सुअवस्थेतील ही ऐतिहासिक विहीर पाहून आनंदून गेलो होतो. परंतु तिची दूरअवस्था पाहून खरच दु:खी झालो. आजूबाजूला पूर्ण गवतांनी वेढलेली, झाडा झुडपांनी झाकलेली, विहिरीतील पाणी हिरवे केमिकल सारखे दिसत होते. त्यापाण्यात कचरा प्लॅस्टिक खच्चून भरलेले होते. गावचे या वास्तूकडे पूर्ण दुर्लक्ष असल्या सारखे दिसत होते. याच गावात गद्देगळ आहेत, वीरगळ आहेत, ते पण पाहून आम्ही गावच्या मध्यभागी असणा-या चौकोनी तलावा जवळ पोहचलो, भला मोठा तलाव पाहून कोल्हापूरच्या रंकाळा तलावाची आठवण झाली, रंकाळा खूप मोठा तलाव आहे परंतु हा तलाव छोटा  आहे. अष्ट आकाराचा हा तलाव पाहून खरच॔च आश्चर्यचकित झालो. चोहोबांजूनी आठ फुटाच्या भिंती तसेच एका बाजूला तलावात उतरायला पाय-या, तर दुस-या बाजूला भले मोठे जुने बांधकाम त्यावर मोटेची व्यवस्था, तेच बांधकाम दहा ते बारा फूट रुंद व शंभर फूट लांब त्या मधून एक छोटासा दरवाजा तेथून आम्ही तलावाच्या दुस-या बाजूला आलो त्याच बांधकामात एक छोटेसे मंदिर त्यात भगवान शंकराची पिंड, सत्तर ऐंशी फूट उंच दगडी बांधकाम अजून जसच्या तस उभ आहे. तलावाच्या चारी बाजूंनी फेरफटका मारत असताना तलावाच्या एका कडेला एक शिलालेख दिसतो त्यावर बाळाजी कृष्णा ठोसर शके १७१२ हे कोरलेले दिसते, डोळे भरून ही दुर्मिळ वास्तु पाहिली. या तलावाला बामणाचे तळे असे गावकरी म्हणतात. येथील गावकरी या ऐतिहासिक वास्तुबद्दल अनभिज्ञ आहेत हे जाणवले, पहिले या तलावातील पाण्याचा वापर पिण्यासाठी करीत असत परंतु दोन तीन माणसांचे बळी गेल्यामुळे या तलावातील पाणी भांडी घासणे, गायी गुरं धुण्यासाठी, शेतीसाठी या पाण्याचा वापर केला जातो. हा तलाव पण इतर वास्तू प्रमाणे दुर्लक्षित आहे. तलाव पाहून याच गावातील अजून दुर्मिळ विहीर पहाण्यासाठी निघालो, तलावा पासून थोड्याच अंतरावर ही विहीर आहे. तिकडे जाताना वाटेतच गावातील एका व्यक्तीने हटकलेच त्याने प्रश्न केला कोणाकडे पाहुणे आलात? मी म्हणालो आम्ही कोणाकडे पाहुणे म्हणून आलो नाही. गावातील या ऐतिहासिक वास्तू पहायला आलो आहे. ते मला म्हणाले विहीरी पहायला आलात होय, मनातल्या मनात हसले अन पुढे निघून गेले. माझ्या मनात पटकन विचार चमकून गेला, नक्कीच तो माणूस आम्हाला वेडे समजला असणार. मी पण मनातल्या मनात हसलो अन पुढे चालू लागलो कच्या रस्त्याच्या कडेलाच झाडा झुडपात झाकलेली दुसरी विहीर दिसली, ही विहीर पण चौकोनी आकाराची परंतु या विहीरीत उतरायला अतिशय सुंदर मार्ग बनविला आहे, थोड्या पाय-या उतरून गेल्यावर एक सुंदर कमान केलेली त्या कमानीवर पण तोच शिलालेख लिहीलेला साक्षात पाहिला.   ही विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्याने आम्हाला जास्त पहाता आली नाही. जेवढी ही वास्तू पहाता आली ते सुद्धा काही कमी नव्हते ३०० वर्षापूर्वी बांधलेल्या या दुर्मिळ वास्तू जशाच्या तशा आज पण पहायला मिळतात हे आपले भाग्य आहे. आजच्या स्थापत्य विभागाने केलेली कामं वर्ष सहा महिने सुध्दा टिकू शकत नाहीत, आपल्या पूर्वजांनी केलेली स्थापत्याची कामं शेकडो वर्षे झाली तरी जशीच्या तशी आपल्याला दिसतात. असा ऐतिहासिक वारसा आपण जतन करायला हवा, गावातील पुढारांनी त्याचं संगोपन करायला हवं तेव्हा कुठं आपल्या पुढच्या पिढीला हा अलौकिक ठेवा पहावयास मिळेल.

मरणासन्न अवस्थेत बऊर गावचा हा ऐतिहासिक ठेवा आज खरच अखेरचा श्वास घेत आहे. तरी मावळातील स्थानिक पुढारी व वृत्तपत्रांना माझी नम्र विनंती आहे हा अनमोल वारसा जतन करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा, आपल्या मावळच्या या अलौकिक वैभवासाठी दुर्गप्रेमी, सामाजिक संस्थांनी, युवकांनी आवाज उठवून स्थानिक पुढा-यांना व सरकारी यंत्रणेला जागे करा ही नम्र विनंती आहे..


संदीप राक्षे ✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२४२१

१७/०१/२०२१


Wednesday, 13 January 2021

रामशेज किल्ला, नाशिक

 वज्रदेही रामसेज किल्ला नाशिक...

संदीप राक्षे✍🏻


नाशिक शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नियुक्तीचे पत्र दयायचे होते म्हणून प्रज्ञा तोरसकर यांच्या घरी मी जिल्हाध्यक्ष किरण सानप, व माझे मित्र सिनेमॅटोग्राफर मारूती तायनाथ असे आम्ही तिघेजण गेलो होतो. निवडीचे पत्र दिले त्यानंतर समीर तोरसकर सर आणि आम्ही तिघेजण गप्पा मारीत बसलो होतो. गप्पांच्या ओघांत मारूती तायनाथ आणि समीर तोरसकर यांचा गड किल्ले हा विषय सुरू होता. तोरसकर सर सांगत होते लाॅकडाऊनच्या काळात नाशिक पासून जवळच असलेला रामशेज किल्ला आमच्या बिल्डिंगच्या टेरेसहून अगदी स्पष्ट दिसायचा त्यांची किल्याच्या विषयीची माहिती ऐकूनच मी रामशेच्या पायथ्याशी पोहचलो असे वाटले, भास झाला होता, तोरसकर परिवाराचा निरोप घेतला..

तसाही आजचा दिवस सार्थकी लावायचा होता असं ठरवून नाशिकपासून जवळच असणा-या रामशेज गडावर चढाई करायचं ठरवले, मला चांदवडला जायचे होते परंतु गाडी रामशेजच्या दिशेने फिरवली. नाशिकहून पेठला जाणाऱ्या रोडने मी व मारूती तायनाथ रामशेजला निघालो. नाशिक ते रामशेज हे १५ कि. मी एवढं अंतर आहे. गडाच्या जवळ येताच रामशेज किल्ला रस्त्याच्या मधोमधच उभा आहे की काय असं वाटलं गडाखालच्या आशेवाडी गावात पोहोचलो तेव्हा दुपारचा एक वाजला होता. गडाच्या पायथ्याशी पोहचलो एका मोकळ्या जागी गाडी उभी करून आम्ही गडाकडे निघालो. गावातून निघून गडाला दूरवर अर्धगोलाकार वळसा घालून आम्ही गडाच्या पश्चिम दिशेला पायथ्याशी आलो. गड तसा फार उंच नव्हता पण रस्ता खूपच खराब होता. किल्यावर चढताना खूपच त्रास झाला पाऊण तासातच गड चढून आम्ही वर पोहोचलो. गडावर प्रवेश करण्या अगोदर उजव्या हाताला डोंगराच्या कडय़ात एक गुहा पाहायला मिळते. गुहेच्या खाली गडावर जाणाऱ्या वाटेला लागूनच रामाचं देऊळ आहे तिथे आम्ही शिरलो, मंदिरातील गारवा व तेथील उर्जेने आमचा शीण कुठच्या कुठ पळून गेला, त्या मंदिरातच एक विभूती बसलेली होती आम्हाला पाहिल्यावर त्यांच्या चेहर्‍यावरील भाव बदलले, बेटा पुना से आये हो असे त्यांनी विचारले ? मी होकार दिला रामाचे दर्शन घेऊन त्यांच्या आसना जवळच जाऊन बसलो, सत्तर वर्षाचे वय पण अजूनही मनाचे तारुण्य चेहर्‍यावरील आनंद योगपुरूषाची साक्ष देत होता. बाबांनी आमची विचारपूस केली. त्यांची ओळख सांगितली मै दिगंबर नागा आखाडे का साधू हू हनुमान बाबाजी, पंचवीस वर्षापासून येथे राहतो तसेच माझा नाशिकला हनुमान आश्रम आहे त्याचा मी महंत आहे. इतकी मोठी विभूती अन किल्ल्यावरील मंदिरात आम्ही थोडे विचारात पडलो तेव्हा ते म्हणाले इथे प्रभु रामचंद्र विश्रांती साठी येत असत, तसेच छ शिवाजी महाराज, छ संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा पवित्र पावन किल्ला आहे इथे साधना सहज होते. हनुमान बाबांनी स्कंद पुराणात कलयुगा विषयी लिहीलेल्या चार पाच ओळी आम्हाला ऐकवल्या त्या अशा होत्या लोक पैशाच्या मागे लागतील त्याच्या ताणताणवामुळे अनेक आजार जडून अल्प आयुशी बनतील, लोक भोगवादी बनतील, सत्ता संपत्ती साठी एकाच रक्ताचे भाऊ भावांचे खून करतील, पैशासाठी लोक भ्रष्टाचार करतील, सरकार लोकांकडून कर रूपाने जास्त टॅक्स वसुल करतील, अल्पआयुष्य होतील, कष्टाने संपत्ती मिळवण्यापेक्षा मागच्या दाराने पैसा कसा येईल त्यावर भर देतील, घरचे भोजन करण्यापेक्षा बाहेरील चमचमीत जेवणावर भर देतील, एकमेकांचे अहित कसे होईल असे लोक पाहतील, या कलियुगात योग साधना भक्ती दान धर्म करतील हेच लोक या कलियुगात टिकतील.. अशी अनेक वचनं बाबांनी आम्हाला मराठीत ऐकवली, बाबांच्या सानिध्यात थोडावेळ घालवून देवळातील मारुती, दत्तगुरू, दुर्गामाता यांचे दर्शन घेतले अन तेथून बाहेर पडलो, मंदिराच्या बाहेरच थंडगार पाण्याचं टाकं होत. ते पाणी चेहर्‍यावर मारले थोडे फ्रेश झालो, दहा पायऱ्या चढून तटबंदी फोडून केलेल्या वाटेने आम्ही गडप्रवेश केला. उजव्या हाताला दोन भूमिगत उद्ध्वस्त दालनं पाहण्यास मिळाली बहुतेक ही दारूकोठारं असावीत. एक सोंड गडाच्या उत्तर दिशेस पसरली आहे. या सोंडेच्या दोन्ही हाताला तासलेले कडे आहेत. याच दक्षिण दिशेला गडाचा महादरवाजा दिसतो. दरवाजा अखंड काळय़ा कातळात खोदलेला आहे. दरवाज्यासकट सर्व कातळ कडे तासून काढलेले होते. हा मार्ग सध्या वापरात नाही. कारण दरवाजा मोठमोठय़ा दगडांनी व मातीने गाडला गेला आहे. दरवाजा पाहून आम्ही गडाच्या सर्वोच्च माथ्यावर आलो. पूर्व दिशेच्या कडय़ावर दक्षिणमुखी महिषासूरमíदनीचे छोटे पण सुबक मंदिर आहे. देवळाबाहेर सिमेंटची गोलाकार दिपमाळ आहे. या देवळाच्या बरोबर खाली पूर्व दिशेच्या कडय़ावर गडाचा दुसरा दरवाजा आहे. हा दरवाजाही अप्रतिम आहे. पण याच्या पाय-या तोडून टाकल्या आहेत. तिथून खाली पाहताना भीतीच वाटते. पाय घसरला तर स्वर्गवास झालाच म्हणून समजायचे, या ठिकाणी भन्नाट वारा वाहतो. समोरचा निसर्ग पाहण्यात आणि दूरवर दक्षिणेला, रस्त्याच्या पलिकडून दिसणारा देहेरगड व त्याचे सुळके पाहण्यात गुंग झालो. सध्या देहेरगड भारतीय सैन्याच्या ताब्यात आहे. त्यावर रडार यंत्रणा बसवल्यामुळे सर्वसामान्यांना गडावर येण्यास बंदी आहे. रामशेज गडावर पाण्याचे टाकही भरपूर आहेत पण वापरात नसल्यामुळे काही टाक बुजून गेले आहेत. रामशेज गड तसा छोटा आहे. मूर्ती लहान पण किर्ती महान, या म्हणीला साजेसा हा किल्ला आहे. रामशेज किल्याची उंची समुद्रसपाटीपासून ३२०० फूट एवढी आहे. हिंदवी स्वराज्य बुडवण्यासाठी औरंगजेब दक्षिणेत उतरला तेव्हा त्याने प्रथम रामशेजला मोहरा केला. याचं कारण म्हणजे औरंगजेबचे वडील शहाजान दख्खन जिंकण्यासाठी दक्षिणेत आला होता तेव्हा त्यानेही पहिल्या झटक्यातच रामशेज जिंकून विजेत्याच्या दिमाखात दख्खनमध्ये प्रवेश केला होता. मात्र हिंदवी स्वराज्य गिळंकृत करण्याचं स्वप्न पहात आलेल्या औरंगजेबाला या रामशेज सारख्या सामान्य गडानं तब्बल साडे सहा वर्षे झुंजवल, छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत. रामशेजगड मोघलांच्या विरूद्ध सतत साडे सहा वर्षे लढत होता. रामसेज जिंकण्यासाठी औरंगजेबाने शहाबुद्दीन गाजीउद्दीन फिरोजजंग याला ३५ ते ४० हजार सैन्य व प्रचंड तोफखाना, दारूगोळयासह पाठवलं होतं. सोबत राजस्थानचा राजा राव बुंदेला, पीरगुलाम, कासीमखान, रामसिंह बुंदेला इत्यादी मातब्बर सरदार होते. रामसेजला मोगलांचा वेढा पडला. रामशेजवरील किल्लेदाराने लढाईची जय्यत तयारी केली होती. मोगलांचे सर्व प्रकारचे आक्रमण तो परतावून लावत होता. मराठे पराक्रमाची शिकस्त करत होते. मे १६८२ मध्ये संभाजी महाराजांनी रामशेजचा मोगलांचा वेढा फोडण्यासाठी रूपाजी भोसले व मानाजी मोरे यांना पाच ते सात हजार मराठे मावळे देऊन रामशेजवर पाठवले. मराठयांचे मावळे येत असलेले पाहून शहाबुद्दीन मराठय़ांना अडवण्यासाठी धावला. गडाजवळच्या गणेश गावापाशी मराठे-मोघल एकमेकांवर तुटून पडले. तुंबळ युद्व सुरू झालं. मराठय़ांसमोर मोघलांनी माघार घेतली. पण त्यांनी रामशेजच्या वेढयावर परिणाम होऊ दिला नाही. मराठयांनी हल्ला केल्याचे समजताच औरंगजेबाने बहादूरखानाला ताबडतोब रामशेजला शहाबुद्दीनच्या मदतीला पाठवलं. शहाबुद्दीनने व बहादूरखानने रामशेजवर जोरदार हल्ला चढवला. पण गडावरच्या मावळ्यांनी जोरदार प्रतिकार करत हल्ला परतवून लावला.

या हल्ल्यात मोघलांकडील राजा दलपतराय जबर जखमी झाला. हल्ला नाकाम झालेला पाहून निराश झालेला शहाबुद्दीन वेढा सोडून जुन्नरला निघून गेला. वेढय़ाची सारी जबाबदारी बहादूरखानावर येऊन पडली. रामशेज जिंकण्यासाठी बहादुरखानाने हर त-हेचे उपाय करून पाहिले. तंत्र मंत्र अघोरी उपाय करून पाहिले. पण रामशेजचा टवका उडत नव्हता. खानाने खूप परिश्रम घेतले पण यश आलं नाही. या अपयशाने रामशेजपुढे होत असलेली दुर्दशा पाहून औरंगजेब भयंकर संतापला. त्याने बहादुरखानाला वेढा उठवण्यास फर्मावलं. मोगलांचा तंबू गुंडाळला गेला. खान वेढा उठवून माघारी निघून गेला. बखरकार काफीखान म्हणतो, रामशेजवर मोगलांच्या अमाप संपत्तीचा चुराडा झाला होता. हजारो माणसे मारली गेली. प्रचंड दारूगोळा नष्ट झाला होता. तरीही औरंगजेब सहजासहजी रामशेजचा नाद सोडण्यास तयार नव्हता. औरंगजेबाने मोघल सैनिकातील शूर व तडफदार सरदार कासिमखान किरमाणी याला रामशेज जिंकण्यासाठी पाठवलं, पण त्यालाही यश आलं नाही.

शेवटी औरंगजेबाने वेढय़ाचे काम तहकूब करून कासिमखानाला दुस-या कामगिरीवर पाठवलं. रामशेजवरील मराठय़ांच्या पराक्रमावर खूश होऊन संभाजी महाराजांनी किल्लेदाराला चिलखती पोशाख, रत्नजडीत कडे व रोख नगद रक्कम पाठवून त्यांचा गौरव केला. रामशेजवरील मराठय़ांच्या पराक्रमाचे वर्णन आपल्याला परकीय साधनामध्येच मिळते. या वेढय़ाच्या वेळी ३० जुलै १६८२ ला कारवारकर इंग्रज सुरतकरांना कळवतात की मराठय़ांचे दहा हजार पायदळ घेऊन हंबीरराव वेढा घालून बसलेल्या सैन्यास पळवुन लावण्यासाठी गेल्याची व नंतर झालेल्या लढाईत जखमी झाल्याचे सांगतात. हंबीरराव व रूपाजी, मानाजीनी शहाबुद्दीनशी दिलेली लढाई एकच का वेगवेगळी हे साधनांच्या अभावी सांगणे कठीण आहे. शेवटी हा अजय गड सन १८१८ मध्ये इंग्रजांनी घेतला. त्रिंबकगड इंग्रजांनी घेतल्याचे पाहून रामशेजवरील लोकांनी हा गड इंग्रजांच्या स्वाधीन केला. यावेळी इंग्रजांना गडावर आठ मोठय़ा तोफा, नऊ लहान तोफा, जंबुरे, २५१ पौंड दारू, तसेच गंधक, चांदी, पितळ, शिसे, ताग, तांबू, गालीचे व एक चिलखत सापडलं. हे चिलखत शिवाजी महाराजांचं होतं, असं कॅप्टन ब्रिज यांनी २० जून १८१८ च्या रिपोर्टमध्ये लिहून ठेवलं आहे. खरतर मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा रामशेज किल्ला खूपच दुर्लक्षित आहे. इतके मोठे इतिहासाचे पान सांगणारा हा किल्ला जीर्ण अवस्थेत उभा आहे. खरतर हे गड किल्ले महाराष्ट्राची शान आहे. ही आपली खरी मंदिर आहेत, इथली उर्जा मंदीरा इतकीच उर्जावान आहे. इतिहासाची इतकी गहन साक्ष देणारा, साक्षात तो किल्ला डोळ्यांनी पहाताना आपण खूप भाग्यवान आहोत हे जाणवले कारण इथला सहवास अनुभवायला मिळाला.. इथे असणारी पराक्रमाची उर्जा आत्म्याला स्पर्श करून जायची कारण तू पण या मातीत जन्माला आलास खरच या जन्मांच सोनं झालं.. आयुष्यात धन संपत्ती पेक्षाही या गड किल्यांच्या सानिध्यातील दिवस खरच खूप श्रीमंत करून जातो.. रामशेज किल्याची माती भाळाला लावून, नतमस्तक झालो.. पुन्हा पुन्हा दर्शन घेऊन परतीचे वाटेला निघालो...


संदीप राक्षे ✍🏻

भोसरी पुणे २६


Tuesday, 12 January 2021

अजिंठा लेणी


 भारताच्या सुवर्ण काळाच्या राजवर्खी खुणा "अजिंठा" बौद्ध लेणी, संदीप राक्षे ✍🏻


सुवर्ण युगाचा वारसा सांगणारा आपला महाराष्ट्र देश, आपल्या या महाराष्ट्र देशात अनेक गूढ व अलौकिक शक्ती लपलेली आहे. जिर्ण झालेले गड किल्ले अजूनही सकारात्मकतेचा उर्जास्त्रोत्र भासतात. या गड किल्यांच्या सहवासातील प्रत्येक क्षण आंतरिक प्रेरणा देऊन जातो. याच महाराष्ट्र देशात काळ्या काताळातील वैभव तर साक्षात पिवळ सोनचं भासते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लेण्या मोठ्या प्रमाणात आढळतात त्यातलीच एक अजिंठा लेणी. औरंगाबाद पासून ९९ किलोमीटर वर असलेली अजिंठा ही लेणी महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारी अप्रतिम अशी शिल्पकला व  भित्ती चित्रांची अनोखी कलाकृती होय. मी व माझे मित्र सिनेमॅटोग्राफर मारूती तायनाथ जळगावला एका कामानिमित्त गेलो असताना पुन्हा एकदा अजिंठा लेणी डोळे भरून पहायची अशी इच्छा झाली. मग काय संपूर्ण नादुरुस्त असलेल्या रस्त्यावरून आमचा प्रवास सुरू झाला. वीस तीस च्या स्पीडने रात्री दहा वाजता आम्ही अजिंठ्याला पोहचलो, रूम केली तिथे मुक्काम केला. सकाळी नऊ वाजता आमचा दिवस सुरू झाला.

कोरीव शिल्पकलेचा व चित्रकलेचा अद्भुत नमुना या अजिंठा लेण्यात पहायला मिळतो..

आज ही अद्भुत कला आम्ही आमच्या डोळ्यांनी पुन्हा एकदा पाहणार होतो. औरंगाबाद जळगाव रोडच्या कडेलाच लेण्यांकडे जाणारा मार्ग लागतो.  शासनाच्या वतीने इथे वाहनांची सोय केलेली आहे. अजिंठा लेणीकडे आपल्या स्वताची वाहने घेऊन जाण्यास मनाई आहे म्हणून आम्ही पाच किलोमीटर दूरच गाडी पार्क केली आणि जिथे बस सुविधा उपलब्ध केलेली आहे तिथे गेलो. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तसेच औरंगाबाद कडून येणा-या खराब रस्त्यामुळे पर्यटकांची संख्या नगण्य होती. पाच सहा जण वातानुकूलित बस मधे बसून आम्ही अजिंठ्याकडे निघालो. आजूबाजूला घनदाट जंगल, पाखरांचा किलबिलाट, उंच उंच कातळ कडे मनाला सुखावत होते. वेडी वाकडी वळणे घेत बस अजिंठ्याच्या पायथ्याशी आली. गाडीतून उतरून आम्ही लेणीच्या प्रवेशद्वाराजवळ आलो थर्मामीटरने आम्हाला चेक केले त्यानंतर आम्हाला प्रवेश दिला. सत्तर ऐंशी खड्या पाय-या चढून आम्ही अजिंठा लेणीच्या प्रथम क्रमांकाच्या लेणीजवळ पोहचलो..


राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा 

प्रणाम माझा हा श्री महाराष्ट्र देशा..

अजिंठा लेणीचे कातळ शिल्प पाहिल्यावर सहजच कवी गोविंदग्रजांच्या या ओळी आठवल्या..


             "वाकाटक नृपती आणि त्यांचा काल" या ग्रंथात असे वाचनास येते की वाकाटकांचे साम्राज्य नर्मदेपासून ते तुंगभद्रे पर्यंत तर इकडे अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत होते. सातवाहनानंतर इ.स २५० मध्ये वाकाटकांचा उदय झाला त्यांनी इ स ५५० पर्यंत या प्रदेशावर राज्य केले. वाकाटक घराण्याची सुवर्णयुग म्हणून ख्याती होती. धर्म संस्कती कला शिल्प कला स्थापत्य कला चित्रकला यांना सुकाळ होता. वाकाटक हे घराणे बौद्धउपासक, शिवोपासक आणि विष्णुउपासक होते. भारतीय संस्कृतीचा प्रसार इतर देशात झाला, भारताची किर्ती दिगतांत गेली याचा आधार म्हणजे वाकाटकांनी कोरलेली अजिंठा लेणी..

 स्वातंत्र्य पूर्व काळात या लेण्या दुर्लक्षित होत्या त्या १८३९ साली इंग्रज अधिकारी जाॅन स्मिथ यांनी प्रथम अजिंठा लेणीचा शोध लावला. कोरीव कामांचा व चित्रकलेचा अद्भुत नमुना या अजिंठा लेण्यात पहायला मिळतो. आज ही अद्भुत कला आम्ही आमच्या डोळ्यांनी पुन्हा एकदा पाहणार होतो.

                      पहिल्या लेणीत प्रवेश केल्यावर वीस खांबावर आधारित एक दालन दिसले प्रत्येक खांबावर सुंदर नक्षीकाम केले होते. तसेच गौतम बुद्धांच्या जन्माचे चित्रदर्शन साकारले होते. मध्यभागी गौतम बुद्धांची विशालकाय तपस्या अवस्थेतील कमलपुष्प हातात असलेली मुर्ती होती. राजा नागराज,  दरबार, गौतम बुद्धाच्या विविध पेटींग मन आकर्षून घेत होत्या. छतावर मनमोहक डिझाईन दिसत होत्या त्या आता पैठणी साडीवर तसेच हिमरू शालीवर आपल्याला दिसतात. इथेच अवालोकितेश्वराची सुवर्ण मुर्ती पहायला मिळाली अशा अनेक अद्भुत चित्रकला पाहून आम्ही दुस-या क्रमांकाच्या लेणीत शिरलो. समोरच बुद्धांच्या मुर्तीचे शिल्प व हंस जन्म कथा बुद्धांचे स्वप्न कथा, बुद्धांच्या माता पित्यावरील कथा चित्रीत केलेल्या पाहिल्या. ही सर्व चित्रांची पेटिंग धातुमिश्रीत माती घेऊन त्यात डोंगरातील दगडाचे बारीक कण, वनस्पती पदार्थाचे तंतू, तांदळाचा भुसा, गवत व वाळुचा भिंतींवर किंवा छतावर लेप दिला जायचा त्यानंतर लिंबू पाण्याने धुतल्यानंतर पेंटींग करायचे विविध रंग असेच तयार करीत, प्रत्येक लेणीचे निरिक्षण परिक्षण करीत एक एक लेणी पहात होतो. अद्भुत शिल्प कलेचा व विविध मुर्तीशिल्पाचा अविष्कार पहात होतो. बौद्ध धर्मातील हिनयान व माहियान हे दोन पंथ, हिनयान पंथात अस्थिकलश पुजा करण्याची पद्धत आहे व माहियान पंथात मुर्ती पुजा करण्याची पद्धत आहे त्या प्रमाणे या बौद्ध लेण्या पहाताना हा फरक स्पष्टपणे जानवतो, या लेण्यांच्या मधे बुद्ध भिक्षुकांची साधना करण्याची पद्धत पण वेगळी होती कोणी जमिनीवर बसून तर कोणी कातळात कोरलेल्या दगडावर बसून साधना करीत असतं. ३,४,५,६,७,८,९, अशा लेण्या पाहून झाल्यानंतर १० व्या लेणी मधे हिनयान मंदीर होते. ज्यात जवळपास ४० खांब  त्यावरील दर्जेदार कोरीव काम आकर्षित करते, तिथे एक स्तूप आहे त्यावर पाली भाषेतले लेख दिसतात ११ ते १५ या लेण्यांच्या मधे अर्धवट शिल्पकाम दिसते ते पाहून आम्ही सोळाव्या लेणी जवळ पोहचलो या लेणीत बुद्धांच्या जीवनातील अनेक घटनांची भित्तीचित्र दिसतात. मध्य भागी बुद्धांची मुर्ती परलम्बां मुद्रेत ध्यानस्त दिसते. हत्ती घोडे मगर तसेच छतावर सुंदर चित्रकला दिसते. याच लेणीतील एक थ्री डी चित्र लक्ष वेधून घेते त्यात बुद्धांची आई आपल्या पतीस स्वप्न सांगत आहे व ज्योतीषी त्याचा अर्थ सांगत आहे. या तिघांच्या सोबतच स्वप्नांचे चित्रिकरण, त्याची रंगसंगती मंद उजेडात उठून दिसत होती. 

ते पाहून आम्ही १७ व्या लेणीत शिरलो  या लेणीत अनेक जातक कथा कोरलेल्या दिसल्या पुजा स्थानात वेगळ्याच मुद्रेत गौतम बुद्धांची मुर्ती बाजूला वाकाटक वंशातील राजा हरिसेनची सुंदर पेंटींग त्यांच्या सोबत मंत्री वरहादेव यांच्या हातात दिवा ते गौतम बुद्धांना ओवाळत आहेत असे चित्र हे चित्राचा भावार्थ असा की अखंड जगास गौतम बुद्धांचे विचार प्रकाशमान करतील. येथील छत तर खुपच सुंदर पेंटींग केलेले दिसते. जणू काही लग्न मंडपाच्या वरती झालर व कपडा लावलेला. छतावरून आठवण झाली. बहुतेक लेण्यांच्या छतावर नक्षीदार पेटींग केलेली दिसते त्यामुळे छताकडे सहजच लक्ष जाते पण काही छतांकडे काहीच नसल्याने लक्ष जात नाही पण तिथेही काही ना काही असते हे आपल्या लक्षात येत नाही अशाच एका लेणीत शिरलो वर छताकडे पाहिले तर तर छतावर समुद्र किनारा कोरलेला दिसला असंख्य लाटा समुद्र किनाऱ्यावरील वाळू समुद्रातच एक खडक व एक डाॅल्फीन माशाचा आकार कोरलेला दिसला अन आश्चर्यचकित झालो आजूबाजूला सहज कोरता येते पण चक्क छतावर कोरलेले ही समुद्र शिल्प दर्शन खरच मनाला भावले. प्रत्येक लेणीची अप्रतिम वेगवेगळी शिल्पकृती, चित्रकृती पाहून आम्ही २६ व्या लेणीत शिरलो या लेणीत गौतम बुद्धांची चोहोबाजूंनी मुर्ती कोरलेल्या अन एका कोपर्‍यात गौतम बुद्धांचे महापरी निर्वाण झालेली भव्य मुर्ती पाहिली अन मन हेलावून गेले. मुर्तीच्या खाली शोकाकुल बसलेला जनसमुदाय तर मुर्तीच्या वर्ती देवलोक हार पुष्प घेऊन आनंदी मुद्रेतील ही शिल्प खुपच बोलकी वाटली मनोभावे या मुर्तीचे दर्शन घेतले, आज या अजिंठा लेणीत जिकडे तिकडे गौतम बुद्धच दिसत होते त्यामुळे काही काळ का होईना बुद्ध काळात असल्याचे समाधान आनंद सुख- शांती मिळाली होती. खरतर भारतात गौतम बुद्धाचे विचारांचे आचरण करायला हवं. मी थायलंड गेलो होतो तेव्हा खरच गौतम बुद्धांची विश्वख्याती त्यांच्या विचारांची महती उमगली, तुज आहे तुज पाशी परी जागा चुकलासी अशीगत आपल्या भारतीयांची आहे. अजिंठा लेणीच्या प्रवासाचा सुखद अनुभव तनामनात साठवला आणि पुढच्या प्रवासाचा मार्ग शोधला..


संदीप राक्षे ✍🏻 

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१

७/१/२००२१

Sunday, 27 December 2020

कातळाचे नंदनवन पितळखोरे लेणी


कातळांचे नंदनवन, बौद्धलेणी पितळखोरे...
संदीप राक्षे ✍🏻

महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठे जंगल असलेले आणि कन्नड तालुक्यात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले गौताळा अभयारण्य, इथे निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेली भूमी म्हणजे गौताळा अभयारण्य. गौताळा अभयारण्यात फेरफटका मारताना रस्त्याच्या बाजूने आपल्याला अंगत-पंगत घातलेल्या सह्याद्रीच्या उतुंग व अथांग पर्वतरांगा दिसतात. ढगांशी स्पर्धा करणारे उंच उंच वृक्ष दिसतात, पावसाळ्यात निखळ खळखळून वाहणारे पाण्याचे झरे, ओसंडून वाहणारे धबधबे आणि डोंगराने हिरवीगार दुलई पांघरावी असे नयनरम्य हिरवेगार जंगल नजरेस पडते. प्रत्येकाला या निसर्गाचे सौंदर्य भुरळ घालणारच यात शंकाच नाही. निसर्गा सोबत औरंगाबादचा इतिहासही तेवढाच विरश्रीने नटलेला, अद्भुत कलाकृतीने सुप्रसिद्ध असलेला.
        मागच्या वेळी मी या रांगेतील अंतुर हा किल्ला पाहिला होता वेळे अभावी मला पितळखोरे लेणी पहाता आली नाही. कामानिमित्त औरंगाबादला जायचे होते आज कोणतेही नवीन ऐतिहासिक ठिकाण पहायचेच हा मनाने बांधलेला चंग स्वस्थ बसून देत नव्हता. मला आमचे कवी मित्र ज्ञानेश्वर गायके यांनी पितळखोरा लेणीची आठवण करून दिली, मी व माझे मित्र सिनेमॅटोग्राफर मारूती तायनाथ पितळखोरा लेणी पहायला निघालो. लेणी म्हणजे डोंगर, टेकडी, पर्वत, खडक कोरून तयार केलेल्या गुहा होत. ज्यांच्या उपयोग संन्यासी भिक्खूंना तपस्या, साधना, विश्रांती करण्यासाठी केला जाई, निसर्गाच्या सान्निध्यात, घनदाट जंगलात द-या खो-यात अनेक लेणी आपल्याला पहायला मिळतात.
      कन्नड या तालुक्याच्या गावावरून पितळखोरा ही लेणी अठरा किलोमीटरवर आहे. कन्नडचा अवघड घाट चढून आम्ही कन्नड मधे पोहचलो चहा नास्ता केला. कालिका मातेचे दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आल्याची हिरवीगार शेती, पाण्याची शेततळी मनाला प्रसन्न करीत होती. पितळखो-या लेणीच्या प्रवेशद्वारा जवळ पोहचलो तेथून गौताळा अभयारण्य सुरू झाले तीन चार किलोमीटरचा प्रवास करून लेणीच्या कडेला आलो. गाडी पार्किंगला लावली, आमच्या दोघांच्या शिवाय तिथे रानाची पाखर व त्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. तेथून आम्हाला खोल दरीत उतरायचे होते. महाराष्ट्र शासनाने तिथपर्यंत जाण्यासाठी छान पाय-यांची सुविधा केलेली होती. एक एक पायरी आम्हाला दरीच्या खोल गर्भात घेऊन जात होती. मोकळा वारा आता काहीसा शांत झाला होता. शे दोनशे पाय-या उतरून आम्ही लेणी जवळ आलो होतो. सहज आकाशाकडे नजर गेली अन हबकलोच दोन्ही बाजूला घनदाट जंगल  उंच कातळकडे जणू काही आम्ही एखाद्या भेगेत अडकलो आहोत असे वाटत होते. पण लेणीचा परिसर पाहिला आणि भिती कुठच्या कुठ पळून गेली, कातळांचे हे नंदनवन याची देही याची डोळा अनुभवत होतो. वातावरण शांत नीरव मनाला अद्भुतेचा स्पर्श जाणवत होता. जगापासून किती तरी दूर मन शून्यावर येऊन पोहचले होते. आपला प्राचीन इतिहास बघितला तर लाखो वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून फेकल्या गेलेल्या लाव्हाचे एकावर एक थर पसरत गेले आणि त्यातून निर्मिती झाली दख्खनच्या पठाराची आणि सह्यद्रीची याच सह्याद्रीच्या उदरात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळणाऱ्या १५ ते ६० मीटर उंचीच्या कातळामुळे लेणीनिर्मितीला उत्तम पार्श्वभूमी लाभली. त्याचबरोबर सातवाहन, क्षत्रप, वाकाटक, राष्ट्रकूट अशा विविध राजवटींच्या काळात राजघराण्यातील व्यक्तींनी तसेच व्यापारी, भिक्षू, सामान्य नागरिकांनी दानं दिल्यामुळे महाराष्ट्रात बौद्ध, हिंदु व जैन धर्मीयांच्या लेणींची निर्मिती झाल्याचे पुराव्यांवरून दिसून येते. अशीच दुर्मिळ बौद्ध कालीन लेणी म्हणजे पितळखोरा लेणी, ही लेणी सहाव्या शतकातील म्हणजे अजिंठा वेरूळच्या अगोदरची असे असल्याचे मानले जाते. राजा सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजे पैठण ते नालासोपारा हा अतिप्राचीन रहदारीचा प्रमुख मार्ग पितळखोर्‍याहुन जातो. त्यामुळेच ह्या जागेची निवड बौध्दांनी लेणी कोरण्यासाठी केली होती. महामायुरी ह्या बौध्दधर्मीय ग्रंथामध्ये "शकरीन" हा यक्ष पितलिंगया येथे राहतो. असा उल्लेख आला आहे. वरील ग्रंथाचे संदर्भातुनच पितलिंगया म्हणजे आताचे पितळखोरे आहे. इ.स.पूर्व सहाव्या शतकात भारतात बौद्ध धम्माचा उदय झाला. बौद्ध धम्माच्या प्रचार व विकासासाठी बौद्ध भिक्खूंना गावापासून दूर पावसाळ्यात राहण्यासाठी डोंगरात लेणी खोदण्यास सम्राट अशोकाने सुरुवात केली. अशा लेणींचा उल्लेख बौद्ध ग्रंथात ‘वर्षावास’ या नावाने केला आहे. या लेण्यांना पुढे विहार ही संज्ञा प्राप्त झाली. कालांतराने विहाराबरोबर प्रार्थनागृहे खोदण्यात आली. पितळखोरे ही लेणी खोल अरुंद दरीच्या दोन्ही काठावर दगडात कोरलेली आहे. लेण्यांचे पाण्याच्या प्रवाहामुळे दोन भाग झाले आहेत. या लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे लेण्यातील काही गुहा दुमजली आहेत. वरच्या मजल्यावर जाण्यास भुयारातून पायऱ्या खोदलेल्या आहेत. मुख्य गुंफा म्हणजे एक मोठा चैत्य आहे. मधल्या भागात ३५ स्तंभ असून या स्तंभांवर धवल, कृष्ण, रक्त आणि तपकिरी वा पिंगट रंगात रंगवलेली बौद्ध संन्यास्यांची चित्रे अस्पष्ट दिसतात. ब-याच लेणीच्या प्रवेश द्वाराला अकरा पायर्‍या आहेत. मुख्य लेणीच्या खालीच हत्तींची शिल्प रांग आहे. शेजारीच ५ फुटाचे प्रवेशद्वार आहे. दरवाज्याचा वरती अर्धकमळ व त्रिरत्नांच्या नक्षी आहे. या दरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन द्वारपाल कोरलेले आहेत. भव्य शिल्पाकडे जाताना इतका छोटा भुयारी मार्ग पाहून आश्चर्यचकित झालो. त्याच दरवाजाच्या वर गजलक्ष्मीचे शिल्प होते. परंतु ते खाली पडले आहे. ब-याच शिल्पांची नासधूस झालेली आहे. उन वारा पाणी आणि उनाड माणसांच्या आक्रमणाने ही ऐतिहासिक वास्तू डौलात उभी आहे. खरतर आपली सर्वांची जबाबदारी आहे असा मौल्यवान ठेवा जीवापाड जतन करायचा आहे. संपूर्ण पितळखो-याचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.  

कातळाच्या नंदववनाचे 
रक्षण आपणच करणार 
मौल्यवान या वास्तूंचे 
महत्व जगाला सांगणार..

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६

Thursday, 22 October 2020

मांडवगड


राजा भोज यांनी उभारलेली,


रानी रूपमती व बाज बहाद्दूर यांच्या अमरप्रेमाने सुप्रसिद्ध असलेली विंध्यांचल पर्वताच्या कुशीतील स्वप्नवत नगरी मांडवगड(मांण्डू)

भटकंतीने मन आणि शरीर सुदृढ होते, हा माझा कायमचा अनुभव म्हणून मी भटकायची एकही संधी सोडत नाही.

       विनोदभाऊंनी नविन गाडी घेतली म्हणून आम्ही तोरमाळला दर्शनासाठी गेलो होतो. गुरू गोरक्षनाथांचे दर्शन घेतले, योगी संजुनाथ महाराज यांना भेटलो बोलण्याच्या ओघात संजुनाथ महाराजांनी मांडवगडचा विषय काढला "बहोत किल्ले है एक जगह, मैने तो मेरे जीवन मे पहिली बार इतने किल्ले देखे है, इतना ऐतिहासिक स्थल जो बार बार देखनो को मन करता है" हे योगीजी बोलले आणि माझी उत्सुकता लागली मांडवगड विषयी ऐकण्याची मी राहून राहून त्यांना मांडवगडची माहिती विचारू लागलो, आणि तिथेच निश्चय केला मांडवगडला जाण्याचा...

दि. १३/२/२०१९  हा दिवस निश्चित झाला पण सोबत कोण हा प्रश्न डोक्यात होता. तेवढ्यात युवा दिग्दर्शक करण तांदळे यांचे नाव समोर आले मी त्यांना फोन लावला. त्यांना म्हणालो ? एक नविन ठिकाण तुमच्यासाठी लोकेशन व माझ्या साठी  भटकंती असे मध्यप्रदेश मधील मांडवगड येथे जायचे आहे. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता लगेच होकार दिला ते म्हणाले मी तयार आहे तुम्ही या. मी पण तयार होतो लगेच निघालो. आम्ही १२ तारखेलाच दुपार नंतर निघालो होतो. वाटेतच शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेतले आमचे मित्र बाळासाहेब महाडिक यांना भेटलो आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. करणदादांनी दिग्दर्शन केलेला परफ्युम हा चित्रपट १ मार्च ला रिलीज होणार होता. मग गाडीत आमचा तोच विषय रंगला होता. आलेले कडू वाईट अनुभव करणदादा सांगत होते. असा आमचा प्रवास सुरू होता. येवला सोडून भरपूर पुढे आलो होतो. गाडीच्या काचेवर पाण्याचे थेंब पडत होते, थोडा वेळ वाटले हे पाणी पुढच्या  गाडीतून सांडत असेल, कारण फेब्रुवारी महिन्यात पाऊस कसा येईल हा विचार करतो ना करतो तोच  जोरदार सोसाट्याचा वारा वाहू लागला अन पाऊस सुरू झाला. भले मोठे पावसाचे थेंब भर पावसळ्यातही दिसले नाहीत इतके मोठे थेंब  काचेवर आदळत होते. पुढचे काहीच दिसत नव्हते. मनमाड पर्यंत हा पाऊस पडत होता. मनात भितीचे काहूर माजले होते. वीस तीस च्या स्पीडने मी फोरव्हिलर चालवित होतो. रस्त्यावर तर तुडूंब पाणी साठलेले. मनमाडला आलो आणि पावसाचा जोर कमी झाला. मनमाड सोडले तर पुढे पाऊसच नाही. निरभ्र आभाळ चांदण्या स्पष्ट दिसत होत्या. काही अंतर मागे पावसाचे रौद्र रूप अनुभवले अन इथे काहीच नाही. निसर्गच तो त्याचा काहीच नेम नाही.

रात्रीचे साडे दहा वाजले होते भूक पण छान लागली होती.  मालेगावच्या पुढे पाच किलोमीटर वर साईकार ढाबा लागतो तिथे आम्ही थांबलो. छान चविष्ट अशा पाटोड्याची भाजी अन बाजरीची भाकरी सोबत मटक्यातले दही मनसोक्त खाल्ले. सुंदर पोट पूजा झाली. उशीर झाल्याने धुळ्यातच मुक्काम केला.

सकाळी नऊ वाजता उठलो, दरवेळी प्रमाणे धुळ्यात विनोदभाऊ चौधरी यांच्या कडे नास्त्याचे निमंत्रण होतेच कारण त्यांची भेट घेतल्या शिवाय पुढे जाणंच अशक्य असते. विनोदभाऊ कायम सेवेसाठी तत्पर असतात त्यांच्या सारखा दिलदार आणि प्रेमळ मित्र मिळाला हे माझे भाग्यचं समजतो. चहापाणी झाले नास्ता झाला. त्यांचे थोरले चिरंजीव निखिल याने विचारले काका कुठे निघालात फिरायला मी सांगितले मध्यप्रदेश, मी त्याला विचारले यायचे का? त्याने पटकन होकार दिला. मी विनोदभाऊंची परवानगी घेतली अन निखीलला पण सोबत घेतला. आता आमच्या तिघांचा प्रवास मध्यप्रदेशच्या दिशेने सुरू झाला. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर बीजासनी मातेचे मंदीर लागते तिथे आम्ही तिघांनी पण मनोभावे दर्शन घेतले पुढील सुखकर प्रवासाठी आर्शीवाद घेतला..

गुगल मॅपवर करण दादांनी मांडवगडचे लोकेशन टाकले होते त्याप्रमाणे आमचा प्रवास सुरू होता. सरळ हायवे सोडून आता गुगल बाबाने  डावीकडे वळण्याचा संदेश दिला त्याप्रमाणे गाडी डाव्या बाजूने ओळवली, एकेरी रस्ता सुरू झाला. थोडे अंतरावर गेलो तर डांबरी संपून बांधाचा कच्चा रोड सुरू झाला. मनात पुन्हा पुन्हा शंका यायची पण गुगल बाबा वरचा आमचा विश्वास अतिदांडगा एक सात आठ किलोमीटर गेलो बांधाचा रोड संपून बैलगाडीचा रस्ता सुरू झाला. आता मात्र बी पी हाय झाला, गुगलबाबाने वेगळाच अस्तित्वात नसलेला रस्ता पकडला होता पण आता पर्याय नव्हता. थोडे दूर गेल्यावर एक छोटे खेडे गाव लागले तिथे काही लोकांना आम्ही मांडवगड कैसे जाने का हे विचारले? ते आमच्या तोंडाकडे पाहून हसत होते. ते म्हणाले अरे भैय्या तुम्हे ये रस्ता किसने दिखाया आम्ही काहीच न बोलता एकमेकांकडे बघून हसत होतो. काय सांगणार आम्ही या गुगल मॅप मुळे फसलो, काहीच बोललो नाही. त्यातल्या एकाने सांगितले आप गलत रस्ते से लेफ्ट मारे है. अब आप आठ किलोमीटर सीधे जाओ आपको चौराया लगेगा सीधे जायो फीर आपको मांडवगड जाने के लिये सही रस्ता मिलेगा, समोरचा रस्ता पाहून गाडीच्या अगोदर मीच गळून गेलो. अजून आठ किलोमीटर बापरे !

कच्चा रस्ता संपून डांबरी रस्ता लागला  होता, समोरच विदयंचल पर्वतांची रांग दिसत होती. त्या पर्वतामध्ये मांडवगड कोणता याचा शोध घेत होतो, निरीक्षण करीत होतो पण काहीच सुगावा लागला नाही. ओसाड पडलेले पर्वत वणव्यांच्या मुळे काळे ठिक्कूर दिसत होते. घाटाचा रस्ता सुरू झाला होता. घाट चढून भरपूर उंचावर आलो होतो. आमचे स्वागत एका भल्या मोठ्या भव्य दिव्य अशा महाव्दाराने केले. पण हा दरवाजा मांडवगडच्या विरूद्ध दिशेला होता. खुप प्रश्न पडले हा महा दरवाजा पाहताना ब-याच अंशी सुस्थितीत होता. तेथून मांडवगड तीन ते चार किलोमीटरवर होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने छोटे छोटे घुमट आकार महल दिसत होते. आम्ही एव्हाना मांडव शहरातील बाजारपेठेत पोहचलो होतो. जातानाच उजवीकडे जामी मस्जिद आणि डावीकडे अशर्फी महाल या दोन भव्य वास्तूंनी आमचे लक्ष वेधून घेतले. पण या वास्तू नुसत्या पाहून उपयोग नाही या वास्तुंची पुरेपूर माहीती गाईडच देवू शकतो म्हणून आम्ही सोबत बिशन नावाचा गाईड घेतला तो पुढे मांडवगड ची माहीती कथन करू लागला मी निखिलला ही सर्व माहिती रेकाॅर्डिग करायला सांगितली.

मांडवगड (मांण्डू) येथे तेराव्या शतकापर्यंत असलेली परमारांची सत्ता सुल्तानांनी हस्तगत केली. दोनशे वर्षानंतर मुघलांनी बळकावलेली सत्ता इ.स.१६९७ मध्ये मराठ्यांनी मिळविली व सतराव्या शतकापासून इ.स. १९४८ पर्यंत पवारांच्या अधिपत्याखाली असलेला भाग भारतात समाविष्ट करण्यात आला. यातील राजा भोजचा इ. स. १०१० ते १०५५ पर्यंतचा काळ मांडवडगच्या वैभवाचा सर्वोच्च काळ होता. त्यावेळी धार-मांडव भारताचे सांस्कृतिक केंद्र होते. आता आपण जे पहाणार आहोत ती जामी मशिद व अशर्फी महल...

भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असलेल्या या वास्तूंच्या प्रवेशासाठी आम्ही तिकीट घेऊन आत प्रवेश केला. प्रवेश करता क्षणीच जामी मस्जिदची वास्तू बाह्यदर्शनी दिसते, एका घुमटाकार दालनातून पुढे जाताच अनेक सुबक कमानी, उंच खांब आणि त्यावर अनेक लहान-मोठे घुमट अशी ‘पश्तुन’ वास्तुकला म्हणजेच अफगाणी वास्तुकलेचे प्रतिनिधित्व करणारी अप्रतिम वास्तू पाहून आम्ही आश्चर्य चकित झालो. या वास्तुकलेचे खास वैशिष्टय म्हणजे अतिशय साधी परंतु आखीव-रेखीव अशी मांडणी. नजरेच्या एका टप्प्यात आणि कॅमे-याच्या लेन्सच्या एका फ्रेममध्ये सहज मावणार नाही एवढा रुंद विस्तार. बिशन सांगू लागला ही वास्तू साधारण इ. स. १४०५ मध्ये होशांग शहा राजाने ही मस्जिद बांधून घेतली. दमास्कस येथील भव्य मशिदीच्या रचनेवर आधारित या मशिदीची रचना आहे. राजेशाही थाटात उभ्या असलेल्या या जामी मस्जिदीच्या पश्चिमेकडील भिंतीवर १७ लहान कमानी आहेत. इस्लामिक पद्धतीच्या इतर कमानींपेक्षा या कमानी वेगळ्या दिसतात. कातीव दगडाच्या या कमानींवरील नक्षी हिंदू पद्धतीची आहे. भरपूर उजेड येईल अशी या मशिदीची रचना केलेली आहे. आम्ही तिथे पोहोचलो ती दुपारची वेळ असल्यामुळे सूर्यप्रकाशात उंच कमानींच्या सावल्या सुंदर परिणाम साधत होत्या. बिशन पुढे सांगत होता मी व निखील त्याला विविध प्रश्न विचारीत होतो. या जामी मशिदीच्या मागील बाजूस होशांग शहाची कबर असलेली मोठी घुमटाकार वास्तू आहे. होशांग शहाने त्याच्या कारकिर्दीतच स्वत:ची कबर बांधून घेतली अशी चमत्कारिक माहिती गाईड ने दिली. अशा नवलाईची ही कबर भारतातील पहिली संगमरवरी वास्तू म्हणून ओळखली जाते. असे म्हटले जाते की, ताजमहाल बांधण्यापूर्वी सहा महिने आधी तिथल्या वास्तुरचानाकारांनी या वास्तूच्या रचनेचा अभ्यास केला होता. मोबाईल मधे त्या भव्य अशा वास्तूचे फोटो निघत नव्हते आम्ही पॅनोरमा वापरून फोटो काढले. जामी मशिद पाहिल्या नंतर आम्ही अशर्फी महलाकडे निघालो. या महालाच्या रचनेवरून आणि आजही तिथे असणा-या नीरव शांततेवरून इथे पूर्वी मदरसा (college) होता, हे लक्षात येते. साधारण १०० चौ. फूट क्षेत्रफळाची अनेक छोटी दालने एका रांगेत पाहायला मिळतात. त्या दालनांसमोरचा लांबलचक व्हरांडा अनेक कमानींनी साकारला आहे. प्रत्येक छोटय़ा दालनात अभ्यास करता येईल अशी प्रकाशयोजना केलेली दिसते. भोज राजाच्या काळात या अशर्फी महालाचा उपयोग महाराण्यांच्या साठी केला जायचा. एखादी राणी तब्येतीने जाड झाली की याच अशर्फी महालाच्या पाय-यावर मोहरा मोहरा टाकायच्या आणी त्या मोहरा राणीने वेचायच्या. दिवसभर असे कष्टाचे काम करून राण्यांचा व्यायाम व्हायचा त्यामुळे राण्या आपोआप बारिक व्हायच्या हा गाईडने सांगितलेला किस्सा ऐकून मी करणदादा व निखील जोरजोरात पोट धरून हसतं होतो.

सुर्यदेव आपली दिवसाची हजेरी लावून मावळतीकडे निघाले होते, आम्हाला अजून खुप काही पहायचे होते पण लवकरच सुर्यास्त होणार होता, सात वाजल्याने ऐतिहासिक वास्तुंचे दरवाजे बंद झाले त्यामुळे आम्ही राहण्यासाठी हाॅटेल शोधू लागलो. जवळच एक रिसोर्ट होते पण तिथे राहण्याची सोय होती जेवणाची सुविधा नव्हती. तिथेच थांबण्याचा आम्ही निर्णय घेतला. दिवसभराच्या प्रवासाने, पायी चालण्याने पोटात कावळे काव काव करू लागले. तोपर्यंत निखिल जेवणासाठी छान हाॅटेल शोधून आला. आम्ही फ्रेश झालो व जेवणांसाठी हाॅटेल मधे आलो. मस्त दालबाटीची आॅर्डर मी दिली. थोड्या वेळातच भल्या मोठ्या कटो-यात बाटी आली वरणा सोबत ओल्या वाटण्याची भाजी आणी जिलेबी पण दिली.  मस्त गावरान तुपात भिजवलेली बाटी वरणात कुस्करली आणि मनसोक्त दालबाटी तिघांनी पण खाल्ली.

आजची सकाळ थोडी वेगळी होती भटकंती दरम्यान पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग यायची पण आज जाग आली ती गाढवांच्या ओरडण्याने. अशी दुर्मिळ सकाळ पहिल्यांदा अनुभवली होती. बाहेर येवून पहातो तर शेजारीच पुरातत्व खात्याच्या एका मंदिरात दगडी काम सुरू होते. आणि दगडी वाहण्याचे काम ही गाढव करीत होती. जरा सकाळचा फेरफटका मारला व करणदादा आणि निखिलला उठवले. आम्ही तिघांनी पण आवरले, ओढ लागली होती ती जहाज महल पहाण्याची, जहाल महल पहाण्यासाठी तेथील नगरपालिकेने तिकीट ठेवले आहे. ते आम्ही घेतले पुन्हा दुसरा गाईड सोबत घेतला आणि जहाज महाल परिसरात प्रवेश केला..

‘जहाजमहाल (रोमॅटिंक ब्युटी) म्हणून जग प्रसिद्ध आहे. १२० फूट लांब आणि दोन मजले उंच आहे. या महालाच्या दोन्ही बाजूंना कापूर आणि मुंज तलाव पाण्याने भरलेला दिसला, पण याच तलावातील पाणी नळ्यांव्दारे संपूर्ण महालांच्या भिंतीतून फिरवले आहे जेणे करून उन्हाळ्यात हा महल थंड राहावा म्हणून, खरच एखाद्या समुद्राच्या पाण्यात एखादे जहाज तरंगताना दिसते तसा हा जहाज महल दिसत होता. जहाज महालाच्या परिसरात सुंदर अशी बाग बहरली होती. जहाज महालात येणारे पाणी शुद्ध होऊन यावे म्हणून पाणी आणणा-या पन्हाळींच्या मार्गात चक्राकार रचना केलेली पाहीली.  जहाज महालाची बारचना मनाला भुरळ घालणारी दिसत होती. एखादे सुंदर स्वप्न पहात आहोत असा हा महाल दिसत होता. लहान मोठय़ा कमानी, घुमट, जिने आणि पुष्करिणी अशा वास्तुशिल्पाला चार चांद लावणा-या रचनांमुळे जहाज महालाचे अस्तित्व खुलून दिसत होते. जहाज महाल पाहण्याचा खरा आनंद पावसाळ्यात किंवा चांदण्या रात्री घेता येतो असे आमच्या गाइडने सांगितले. पावसाळ्यात महालाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या पाण्यात महालाचे प्रतिबिंब पडलेले दृश्य विहंगम असते. आम्ही जहाज महलाच्या आत मध्ये शिरलो तिथे पहिला हिंदोळा महाल लागतो तो पण पाहण्या सारखा आहे. उंच घुमट आणि कमानी मिळून बनलेला या महालाचा पूर्वी प्रेक्षागृह म्हणून उपयोग होत असे. विशिष्ट संरचनेमुळे पुन्हा परावर्तित होणा-या ध्वनी लहरींद्वारे एका टोकाचा अतिशय सूक्ष्म आवाज प्रेक्षागृहाच्या दुस-या टोकापर्यंत ऐकू येईल अशी रचना केलेली आहे. त्यामुळे प्रेक्षागृहात अतिशय शिस्तीचे आणि पारदर्शी वातावरण असे. खरच हा हिंदोळा महाल पहाताना ज्याने ही वास्तू घडविली त्याला हजार वेळा धन्यवाद द्यावेत असे वाटत होते. हिंदोळा महाल पहात पहात पुढे आम्ही नहर झरोका पाहिला, दिलावरखानाची मशीद पाहिली, आंघोळीसाठी एक हमाम खाना होता तिथे गाईड आम्हाला घेऊन गेला राज्याचे आंघोळीचे ठिकाण व जे शाही पाहुणे आहेत त्यांचे आंघोळीचे ठिकाण दाखविले ते पहात असताना भिंतीत असणा-या पाण्याच्या नळ्या दाखविल्या, त्याकाळी लाईट विना पाणी गरम करण्याची पद्धत दाखविली ती पाहून तर तोंडातच बोट घातले कुठल्याच धातूचा किंवा वस्तूचा उपयोग न करता सरळ गरम पाणी बाथरूम मधे जात होते, बाथरूम च्या खाली एक रूम होती त्या रूम मधे सोने जाळायचे त्यातून होणारी वाफ नळी व्दारे बाथरूम मधे यायची तिथे राजे महाराजे सोन्याचा स्टीम बाथ घ्यायची खरच या राजेशाही थाटाला सलाम केला अन त्यावेळची टेक्नाॅलाॅजी पाहून थक्कच झालो. त्या हमाम खान्याचा पॅनोरमा घेतला इतका जबरदस्त आला ना की आम्ही अजूनही पहात राहतो. तो परिसर फिरताना सारखेच वाटत होते हे दृश्य हा परिसर आपण कुठे तरी पहायलेला दिसतो पण काही केल्या आठवेना, मेंदूला भयंकर ताण दिला पण स्मृतीपटलावर काहीच उमटेना, त्यावेळी गाईड म्हणाला आपको पता है यहा बहोत सारी हिंदी पिक्चर की शूटिंग हुई है. मी त्याला विचारले कोणते चित्रपट पण त्याला नाव आठवेना तो फक्त म्हणायचा हेमामालीनी और धर्मेंद्र की पिक्चर थी  मग मी मेंदूला अजून ताण देऊ लागलो प्रत्येक फ्रेम पाहू लागलो, एखाद्या ऐतिहासिक वास्तूवर अनेकांनी आपली व आपल्या प्रेमिकेची नाव लिहीलेली असतात तसेच तिथे एका घुमटावर नाम गुम जायेगा असे लिहीले होते. मी सहज तेच युट्युब वर सर्च केले तर किनारा या चित्रपटातील नाम गुम जायेगा चेहरा ये बदल जायेगा हे जितेंद्र धर्मेंद्र व हेमामालीनी यांच्यावर चित्रीत केलेले हे गाणे सुरू झाले. आणि मला माझे उत्तर मिळाले. ते गाणे आणि साक्षात तिथल्या फ्रेम जुळू लागल्या, मनाला खुप आनंद झाला, मोठा शोध लावला याचा माझा मलाच अभिमान वाटला..  

आता गाईड घाई करू लागला होता त्याने आम्हाला चंपा बावडी नावाची एक विहीर आहे तिथे घेऊन गेला. त्याचा आकार कमळच्या पानांचा होता. तीन टप्पे असणारी ही विहीर व तिच्या सारखी रचना जगात कुठेच दिसणार नाही. या विहीरीचे वैशिष्ट्य गाईड सांगू लागला. जर कोणी या मांडवगडवर हल्ला केला तर सर्व राजे आणि राण्या त्या विहीरीत उड्या मारत. पहाणा-याला वाटायचे यांनी जीव दिला पण हे सारे तिस-या थराला जाऊन चोर रस्त्याने बाहेर पडायचे. आम्हाला पहिला विश्वास बसला नाही काहीतरीच बरळतो हा असे वाटले मग आम्हाला त्याने तीन मजले उतरून खाली घेऊन गेला आणि तिथे तो चोर दरवाजा दाखविला सध्या तो पुरातत्व खात्याने बंद केला आहे. एक एक चमत्कारीक व कधी न पाहिलेले अनुभवलेली एक एक गोष्ट इथे साक्षात पाहून खरच थक्क झालो होतो. त्या वेळी विहिरीच्या पाण्याला चाफ्याच्या फुलांचा सुगंध येत असे पण गाईडने जाता जाता सांगितले.

पृथ्वीवरचा स्वर्गच असे एका वाक्यात मी करणदादांना उत्तर दिले अन राणी रूपमती आणी बाज बहाद्दूर यांच्या महालाकडे निघालो. जाताना प्रत्येक ठिकाणी एक बोर्ड दिसायचा (एक अधुरी प्रेम कहाणी) तो वाचला अन आवर्जून या गाण्याची आठवण झाली.

आ लौट के आजा मेरे मीत तुझे मेरे गीत बुलाते हैं

मेरा सूना पड़ा रे संगीत तुझे मेरे गीत बुलाते हैं

बरसे गगन मेरे बरसे नयन देखो तरसे है मन अब तो आजा

शीतल पवन ये लगाए अगन ओ सजन अब तो मुखड़ा दिखा जा

तूने भली रे निभाई प्रीत तूने भली रे निभाई प्रीत

तुझे मेरे गीत बुलाते हैं आ लौट...

एक पल है हँसना एक पल है रोना कैसा है जीवन का खेला

एक पल है मिलना एक पल बिछड़ना दुनिया है दो दिन का मेला

ये घड़ी न जाए बीत ये घड़ी न जाए बीत तुझे मेरे गीत बुलाते हैं आ लौट...

गाडीतील पॅनड्राईव्ह मधे हे गाणं होतं ते प्ले केल, अन ऐकता ऐकता या प्रेमनगरी च्या दिशेने निघालो. वाटेत अनेक छोटे मोठे महल पडक्या अवस्थेत दिसते होते. उंच डोंगरावर एक किल्याची प्रतिकृती दिसत होती नक्कीच जवळ आलो याची खात्री पटली. इतक्या वेळ शांत असलेला गाईड दादा आता बोलू लागला.

मांडूचा राजा बाझ बहाद्दर एकदा शिकारीसाठी नर्मदेकाठी जंगलात गेला असताना त्याला स्वर्गिय आवाजातील गाण ऐकू आल. कवी मनाचा राजा आवाजाचा वेध घेत गेला असता त्याला रुपमतीचे दर्शन झाले. तिच्या रुपाने आणि आवाजाने घायाळ झालेल्या राजाने इतर राजांसारख अपहरण न करता तीला लग्नाची मागणी घातली आणि तीला मांडूला चलण्याची विनंती केली. रुपमतीने राजाला आपली अडचण सांगितली की, ती रोज नर्मदेच दर्शन केल्याशिवाय अन्नग्रहण करत नाही. राजाने तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मांडु गडाच्या दक्षिण टोकावर रुपमती महालाची आणि त्याला पाणीपुरवठा करण्यासाठी रेवाकुंडाची निर्मिती केली. रुपमती महालाच्या अगोदर त्या ठिकाणी टेहळणी करणार्‍या सैनिकांसाठी वास्तू बांधलेली होती. त्यावर दोन मजली रुपमती महाल बांधण्यात आले. या महालाच्या गच्चीवर दोन घुमट आहेत त्यांच्या कमानदार सज्जातून दुरवरचा प्रदेश दिसतो. येथूनच राणी रुपमती नर्मदेचे दर्शन घेत असे. राणी रुपमती चांगली कवियत्री होती, गायिका होती तर राजा बाज बहाद्दुर चांगला वादक संगितकार होता. संगिताच्या साथीने दोघांच प्रेम बहरल पण त्याचवेळी त्याच राज्याकडे दुर्लक्ष झाला. याचा फ़ायदा मोगलांनी घेतला. अकबरा पर्यंत राणी रुपमतीच्या सौंदर्याची वार्ता़ पोहोचली होती. त्याने आपला सावत्र भाऊ आदम खानाला मांडवगड वर हल्ला करण्यास सांगितले. १५६१ मध्ये आदम खान मांडवगड मधे पोहोचला. हे वृत्त कळताच बाझ बहाद्दर छोट्या फ़ौजेनिशी मोगलांच्या अफ़ाट सैन्याला सामोर गेला. त्याचा दारूण पराभव झाला आणि रणांगणातून पळून गेला. आदम खानाने मांडवगडावर कब्जा केला. हे वॄत्त कळताच राणी रुपमतीने विष प्राशन केले व आपले जीवन संपविले. एका प्रेमकहाणीचा करुण अंत झाला. बाझ बहाद्दरने परत काही काळ मांडव गडचा ताबा घेतला पण नंतर तो अकबराला शरण आला आणि त्याचा मनसबदार झाला. त्यानंतर बाज बहाद्दूर याने राणी रूपमतीची समाधी बांधली, आजही दोघेही त्या समाधी जवळ राणी रूपमती व बाज बहाद्दूर भेटतात अशी आख्यायिका आहे. गाईड दादाची ही स्टोरी ऐकता ऐकता आम्ही रानी रूपमतीचा दर्शन मंडप चढून वरती आलो. आम्ही तिघांनीपण मनसोक्त फोटो काढले, खुप उंचावर आल्याने आजूबाजूचै देखणे रूप डोळ्यात भरत होते. जेथून राणी रूपमती नर्मदामातेचे दर्शन घ्यायची त्या घुमटा मधे उभे राहिलो, तेथूनच दूरवर वहात असलेल्या नर्मदामातेचे अंधूकसे दर्शन घेतले, खरच एक वेगळाच अनुभव मनाला येत होता. संपूर्ण महल पाहून झाला. अन बाज बहाद्दूर यांच्या महालाकडे निघालो. दुपार झाल्याने अंगात घामाच्या धारा वहात होत्या, महालात शिरतानाच अंगात एक चैतन्य संचारले होते. अजूनही येथे इतिहासाच्या खुणा साक्ष देत होत्या. अजूनही इथे पूर्वजांचा वास आहे हे जाणवत होते. आम्ही तिघेच या महालात असल्यामुळे मन सुद्धा आमच्या सोबत खेळत होते. राजेशाही थाट आणि त्याचा अनुभव प्रत्यक्षात घेत होतो. एक घर बांधायची पंचाईत पण एका व्यक्तीसाठी इतके मोठे महल यावरून नक्कीच लक्षात येते भारत सोने की चिडीया होता. भारतात सोन्याचा धूर निघत होता यावरून स्पष्ट होते. राणी रूपमती यांचे समाधीस्थळ पाहिले. आणि निळकंठेश्वर महादेवाकडे आमचा प्रवास सुरू झाला...

संमार्जिली अंगणे, पान्हावली गोधने

आसावला आसमंत अमृताने चिंब नाहवा, हे शिवा

तू आपदा वारणारा, तू दुःखिता तारणारा

होई कृपावंत विश्वातले आर्त अभयंकरा शांतवा, हे शिवा

सोनपूर दरवाजाकडे जाताना म्हणजेच मांडवगड ची सहल संपवताना, डोंगरांच्या मधोमध, टेकड्यांनी घेरलेले निसर्गरम्य ठिकाणावर नीलकंण्ठ महादेव मंदिर आहे. त्यासाठी खोल दरीत उतरावे लागते तिथे हे मंदीर दिसते, उर्दू भाषेत मंदिराची माहीती लिहीलेली आढळते. दुसरे बाजीराव पेशवे यांनी या शिवलिंगाची स्थापना केली आहे. एका खोल गुहेत हे शिवलिंग स्थापन केलेले असून तिथे सारखा जलअभिषेक होत असतो. हा एक चमत्कारच आहे. मनोभावे दर्शन घेतले, पुन्हा पावसळ्यातही येण्याचा निश्चय तिथेच केला. तेथील पुजारी सांगत होते. पावसाळ्यात मांडवगडचे अलौकिक वातावरण व निसर्ग सौंदर्य काश्मीरच्या सौंदर्याचेच प्रतीक मानले जाते. नैसर्गिक सौंदर्य तसेच वास्तुकलेची परिसिमा गाठलेला मांडवगड आपण कितीही न्याहाळला तरी पूर्णतेची तृप्ती होतच नाही आणि आपली तृप्ती न होणं, हेच मांडवगडच्या सौंदर्याच्या रहस्य आहे. जसे पुजा-याने सांगितले तशीच अवस्था माझी होती.

संदीप राक्षे ✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१

Sunday, 15 March 2020

काठीगावची होळी, संदीप राक्षे

अनुभूती अद्भुत संस्कृती दर्शनाची, परंपरा काठीगावच्या होळीची:-  संदीप राक्षे ✍🏻

महू, सावर, पळस
आंब्याला पण मोहर.
मोरखी, बुधा, बावा
पारंपारिकतेचा बहर.
काठीगावची होळी पेटते
असतो पहाटेचा प्रहर..

महाराष्ट्र म्हटलं की अनेक परंपरांच माहेरघर, दिवाळी पासून ते गणेशोत्सवापर्य॔तचे सर्व सणवार अति उत्साहात साजरे होत असतात यातूनच बंधूता एकता निर्माण करण्याचे मोठे सामाजिक कार्य केले जाते. प्रत्येक सण हा सामाजिकतेचे प्रतिक आहे. असाच एक सण सातपुडा पर्वत रांगेत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तो म्हणजे होळी, भारतातच या उत्सवाची महती, किर्ती नव्हे तर जगभरात महती आहे. मी फक्त या काठी गावच्या होळी संबंधी ऐकून होतो, पेपर मधे वाचलेले होते. साक्षात पहाण्याचा कधीच योग आला नाही. मनात दरवर्षी प्रचंड इच्छा निर्माण व्हायची, या वर्षी जावूयात, तयारी व्हायची, पण काही ना काही दुसरेच काम निघायचे अन जाणे रद्द व्हायचे. आज नुकताच आश्रमशाळेत फेरफटका मारून नुकताच घरी आलो होतो. तितक्यात आमचे परम मित्र विनोदभाऊ चौधरी यांचा ८/३/२०२० रोजी फोन आला. त्यांनी पहिलेच विचारले उदया कुठे फिरस्तीची योजना तर नाही ना? मी नाही म्हणालो. मग ते म्हणाले जळगाव जिल्हा प्रादेशिक वाहतूक विभागाचे प्रमुख विलासराव चौधरी साहेबांनी काठीगाव, नंदुरबार येथील होळी पहायला जाण्यासाठीचे दि. ९/३/२०२० रोजी योजिले आहे. त्या मधे मी स्वःता साहेब, मालेगाव जिल्हा प्रादेशिक विभागाचे प्रमुख अतुल सुर्यवंशी साहेब, नंदुरबार जिल्हा प्रादेशिक वाहतूक विभाग प्रमुख नितीनजी सुर्यवंशी साहेब, बापूसाहेब चौरै साहेब, उदयोजक अमितजी गायकवाड, गोरे साहेब इतके जण आहोत तुम्ही येणार का? मी कसलाच न विचार करता लगेच होकार दिला. विनोद भाऊंनी सांगितले उदया दहा वाजेपर्यंत नाशिकला पोहचून जा मी नाशिकलाच आहे.
पहाटेच उठलो अन दहा वाजेपर्यंत नाशिकला पोहचलो. तेथून आम्ही सहा जण सटाणा, साक्री मार्गे नंदुरबारला सात वाजता पोहचलो. नंदुरबार येथे चहा पाणी झाला तेथून आम्ही धडगावच्या रस्त्याला लागलो. जाताना गावा गावातील होळ्या पेटल्या होत्या, संपूर्ण गावकरी गावच्या वेशीवर जमून एकत्रित होळीचा आनंद घेत होते. लहान मुल डफडी वाजवून सणांचा आनंद लुटत होती. आकाशातून पांढरा शुभ्र चांदोमामा पण होळी उत्सवाचा आनंद घेत होता. त्याच्या दयेने अंधारावर मात होऊन दूरदुरचे अगदी स्पष्ट दिसत होते. कारण पौर्णिमेचा तो चांदवा होता. खरतर चंद्र हा कल्पना शक्तीचा कारक ग्रह आहे त्यामुळे सहजच जगदिश खेबुडकरांनी लिहीलेल्या काही ओळी आठवल्या.

उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा!
दाही दिशा कशा खुलल्या, वनीवनी कुमुदिनी फुलल्या,
नववधु अधिर मनी जाहल्या, प्रणयरस हा चहुकडे वितळला स्वर्गीचा!!

चंद्रोदयानंतर सारा निसर्गच आनंदमय होतो, आणि प्रणयरसाने भारला जातो त्यात अनेक झाडं, फुल, वेली मोहरून जातात तर प्रत्येक माणसाच्या हदयात प्रेमरसाच्या अनेक लाटां उसळू लागतात. असे काही वातावरण आकाशातील त्या चंद्राकडे पाहून झाले होते, कधी कधी ढगांच्या आड तर कधी कधी डोंगराच्या आड लपून जायचा, असा हा पाठ शिवणीचा खेळ खेळत आमचा प्रवास सुरू होता. आता आमची गाडी सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी आली होती. पुढे खूप मोठा घाट मार्ग चढून आम्हाला पुढे जायचे होते. विरळ झाडीतला सातपुडा पर्वत संपूर्णता उजाड दिसत होता. चंद्राच्या उजेडात पांढरा धक्क दिसत होता. अशातच हातात धारदार हत्यार घेऊन दहा बारा जण रंगीबेरंगी कपडे परिधान करून, चेह-यावर चित्र विचित्र रंगवलेले, काहीनीं चेह-यावर मुखवटे बसवलेले होते. गाडीला आडवे झाले अन मनातल्या भितीने कहरच केला. अचानक गाडी पुढे आलेली ही तरूण मुले काहीतरी मागत होती पण लक्षात येईना. ते नुसते फाग दो, फाग दो म्हणायची इतक्यात चौधरी साहेबांनी खिशातले दहा रू काढले अन त्यांना दिले. दहा रू मिळाले अन ती आदिवासी मुल गाडी पासून दूर गेली. पुढे गेल्यावर चौधरी साहेबांनी सांगितले की हे होळीच्या सणाला पैसे मागतात त्याला फाग म्हणतात. मला जरा हे चमत्कारिक वाटले, पण प्रथा आहे हे कळल्यावर बरं वाटलं, मग आम्ही सर्वानींच सुट्टे दहा दहा रू काढले अन जो गाडीला आडवा येईल त्याला दहा रू देत गेलो. संपूर्ण पर्वत रांगेतून ढोलाचे आवाज आता घुमत होते भयाण शांततेला छेद देत होते. रात्री अकरा वाजता आम्ही धडगाव सरकारी गेस्ट हाऊसला पोहचलो तिथे आमची जेवणाची व राहण्याची सोय केलेली होती. संपूर्ण अधिकारी वर्ग सोबत असल्याने, मनसोक्त सरकारी पाहुणचार घेतला. जेवणाचा बेत मस्त आदिवासी पद्धतीने केल्या मुळे एक वेगळीच चव चाखायला मिळाली. विलासराव चौधरी साहेबांनी आमची सर्व अधिकारी वर्गाशी ओळख करून दिली अन तेथून आम्ही काठीगावाकडे निघालो. धडगावहून पुढे काठीगाव ४० किलोमीटर होते. आमच्या गाडीच्या पुढे प्रादेशिक वाहतूक विभागाची पिवळ्या दिव्याची गाडी होती, आमची गाडी मधोमध आमच्या मागे अजून स्कॉर्पिओ त्यामुळे आमचा रूबाब तर डबल वाढला होता. आपणही कुणीतरी मोठी आसामी आहोत असा मनातल्या मनात भास करून घेत सरकारी थाटात प्रवास सुरू होता. आता दोन किलोमीटर काठीगाव राहिले होते, तिथून पुढे मोठ्या गाड्यांना प्रवेश निषिध्द होता. पण आमच्या पुढे दिव्याची गाडी असल्याने आम्ही थेट काठीगावात पोहचलो. मंगळुरी व जुन्या कौलारूंची घर मस्त लाईटिंग लावून सजवलेली होती. घरात मात्र कोणीच नव्हतं सारे जण होळी उत्सवात मग्न होते. गाडया एका घराच्या समोर उभ्या केल्या अन आम्ही पण पायी उतरून चालू लागलो. असंख्य आदिवासी बंधू समुहाने सजून धजून होळीच्या ठिकाणी निघाले होते. आजूबाजूला गळ्यातल्या रंगीबेरंगी माळा, पोत, डोरले, कुडक्या पिपाण्यांची दुकानं सजली होती. अनेक दुकानांवर झुंबड उडालेली होती. जिलेबीच्या परातीच्या पराती खाली होत होत्या, पिपांण्याच्या आवाजाने तर कानठाळ्या बसत होत्या, अशातच आम्ही होळीचा मुख्य सोहळा जिथे चालतो त्या ठिकाणी पोहचलो. डोक्यावर मोरपिसांचा मुकूट व कंबरेला भल्या मोठ्या घुंगरमाळा बांधलेल्या, आदिवासींचा मोठा समुह आपल्या पारंपरिक शैलीत ढोल, पिरी, पावा, मांदल या वाद्यांच्या तालावर एक विशिष्ट ठेका धरून नाचत होता. एक पाऊल पुढे एक पाऊल मागे घेत कंबरेला हळूच झटका देत होता. त्यामुळे एक प्रकारचा लयबद्ध आवाज ऐकू येत होता त्या आवाजाने आनंदाला उधाण येवून आजूबाजूचा प्रत्येक जण त्यांच्या सोबत ठेका धरीत होता. आम्ही सर्वांनी पण त्यांच्या तालावर थोडावेळ ठेका धरला अन पुढच्या समुहाकडे गेलो, त्यांनी बांबूच्या झाडापासून मुकूट तयार करून त्याला रंगीबेरंगी कागदांनी सजवलेले होते व तो डोक्यावर परीधान केला होता. अन कंबरेला भले मोठे वाळलेल्या भोपळ्यांची माळ बांधलेली होती. ते पण ढोलाच्या तालावर नाचत होते. त्यांच्या मधोमध अस्वल, डाकीण, वाघ्या यांचे मुखवटे घातलेले अनेक आदिवासी नाचताना दिसत होते. अनेक पुरूषांनी स्त्री पात्र साकारली होती ते पण साडी चोळी घालून नाचत होते. या होळीचे वैशिष्ट्य म्हणजे यामधे कुठेही महिलां नाचताना दिसत नव्हत्या. एका टेकडीवर असंख्य महिलांचा समुह हा अविस्मरणीय सोहळा बसून पहात होत्या. वरील प्रमाणे सजलेले असंख्य समुह या होळी उत्सवात दिसत होते. आम्ही संपूर्ण गावाला फेरफटका मारला सगळीकडे तोच उत्साह भरलेला दिसत होता. एकही आदिवासी बांधव थकत नव्हता की बसत नव्हता एक सारखे त्याचे हे पारंपरिक नृत्य सुरूच होते. गावच्या मध्यभागी एका लिंबाच्या झाडाला दिडशे फूट मोठी बांबुची सरळ काठी उभी केलेले होती प्रत्येक जण येवून ती काठी उचलत होता व काहीतरी मागणं मागत होता. आम्ही पण त्या काठीचे दर्शन घेतले थोडी वर उचलली. काही वाद्यांचा समुह बाजूला बोलवून घेतला अन तिथे आम्ही सर्वांनी या पारंपरिक नृत्याचा आनंद लुटला. सगळे जण नाचून घामांत भिजून गेले होते. पहाटेचे चार कधी वाजले हे आम्हाला कळलेच नाही. मुख्य चौकात आता होळी पेटविण्याची तयारी सुरू झाली होती.

पावित्र्याने भरते वर्षानुवर्षं
उभ्या मानवतेची होळी
संस्कृती जपत पेटते
काठीगावची होळी..

१२४६ साली या होळीची परंपरा सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे. आदिवासींचे देवता राजा पाणठा व गांडा ठाकूर यांनी सुरू केलेली ही काठी गावची होळी त्यामुळे या होळीला विशेष महत्त्व आहे. आता सूर्योदयची वेळ झाली होती. गावच्या पाटलाच्या हस्ते होळीची पुजा करण्यात आली. जो लिंबाच्या झाडाला उभा केलेला बांबू आणून होळीच्या मधोमध रोवला गेला. प्रत्येक आदिवासी बंधूनी घरातून लाकडाचा एक एक ओंडका आणलेला होता. ते सर्व ओंडके उभ्या केलेल्या बांबूच्या सभोवती रचन्यात आले. आणि गावच्या पाटलाच्या शुभहस्ते होळी पेटविण्यात आली. होळी पेटली आणि थोड्यावेळातच भला मोठा बांबू आडवा झाला. तेथे असलेल्या मान्यवरांच्या हस्ते त्या बांबुचे तुकडे करण्यात आले अन आलेल्या प्रत्येक आदिवासी बांधवाला ते वाटण्यात आले. मानवी संस्कृतीची मुल्ये जपणारी ही होळी आदिवासींच्या जीवनात महत्वाची आहे. या वर्षी कोरोना या व्हायरस मुळे बाहेर देशातील पर्यटक या होळी उत्सवासाठी उपस्थित नव्हते. महाराष्ट्रातील प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी काठी गावची होळी अनुभवावी याचि देही याचि डोळा पहावी, आपल्या या महाराष्ट्रातील अनमोल अशी संस्कृती जतन करण्याची आदिवासी बांधवांना प्रेरणा दयावी..
महाराष्ट्रामध्ये रूढी परंपरेनुसार त्या त्या भागातील सांस्कृतिक जडण घडण होत असताना इथल्या मातीतला  रांगडेपणा, लोककला संस्कृतीचे वैविध्यपूर्ण वेगळेपण पाहिले की या महाराष्ट्रात जन्माला आलो आहे याचा सार्थ अभिमान वाटतो. काठीगावचा हा नयनरम्य सोहळा पाहून सारेच जण भारावून गेलो होतो. रात्रभरच्या जागरणाने डोळ्यांच्यावर झापड येत होती. शरीर थकले होते पण मन ताजेतवाने होते अशातच काठी गावचा निरोप घेतला अन नाशिककडे प्रस्थान केले...

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Friday, 6 March 2020

गिरीदुर्ग अंतुर किल्ला:- संदीप राक्षे

गौताळा अभयारण्यातील, इतिहासाचे सुवर्णपान असणारा गिरीदुर्ग अंतुर किल्ला. संदीप राक्षे ✍🏻

सकाळी सकाळीच एका किल्याची पोस्ट निसर्गरम्य खेड तालुका या व्हाटसअप गृपवर औरंगाबादचे सुरज नालगुणे यांनी शेअर केली होती. त्या फोटोतला किल्ला ही नविन दिसत होता अन त्या किल्याचे नाव पण ऐकण्यातील नव्हते त्यामुळे उत्सुकता लागून राहिली. अशातच मी सुरज नालगुणे यांना फोन केला व किल्याच्या विषयी माहिती विचारली त्यांनी अतिशय सुंदर किल्याचे वर्णन सांगितले व कसे जायचे ते पण सांगितले. एकदा मनात एखादी गोष्ट भरली तर ती करायचीच हा नियमच माझा, त्यामुळे मनात चक्र फिरू लागली. विचार करता करता शनिवार उजाडला तरी अजून काहीच ठरेना मन अस्वस्थ झाले अन किल्ला काही नजरे समोरून जाईना. एखाद्याला देवभक्तीचा नाद लागतो अन तो कोणत्या ना कोणत्या तीर्थक्षेत्राला, देवाला खेट्या मारत असतो अर्थात त्यामागे मागे काही तरी स्वार्थ असतो. असेच काहीसे या गड किल्यांच्या बाबतीत माझे झाले होते. एक तरी किल्ला अनुभवावा एखादा दिवस तरी त्या गड किल्यांच्या सानिध्यात घालवावा. निसर्गाशी एकरूप व्हावं अस वाटतं अन कधी कधी वाटते या बहुचर्चित तीर्थक्षेत्रांच्या पेक्षा हेच गड किल्ले आपले तीर्थक्षेत्र आहेत. त्यामुळेच या किल्याच्या सानिध्यात जाण्यासाठी त्याला डोळे भरुन पहाण्याची उत्कंठा लागून राहीली. इतक्या दुर ते पण अभयारण्यात किल्याची काही माहिती नाही सोबत कोणी तरी असले पाहिजे म्हणून खुप विचार केला कोणाला सोबत घेऊन जावं तितक्यातच खेडचे रोहीत दादा बोरूडे यांचे नाव आठवले क्षणाचाही विलंब न लावता रोहीत दादाला फोन लावला त्यांना विचारले आपल्याला औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील व जळगाव जिल्ह्याच्या किना-यावर असणारा अंतोरी हा किल्ला पहायला जायचे आहे. रोहितदादाने लगेच जाऊ म्हणून होकार दिला. शनिवार दि २९/२/२०२० रोजी रात्री नऊ वाजता मी भोसरीहून खेडला गेलो, तेथून रोहीत बोरूडे यांना घेतले अन पाबळ मार्गे शिरूर, नगर, औरंगाबाद असे मार्गक्रमण करीत पहाटे तीन वाजता वेरूळला पोहचलो. तेथील वृंदावन रिसोर्ट मधे एक रूम घेतली, दोन तास मस्त आराम केला. सकाळी  प्रातःविधी उरकून आम्ही कन्नडच्या गौताळा अभयारण्याच्या दिशेने निघालो...

क्षितिजा राऊळी प्रकट दिसु लागे निलउषा!
करी जागे झोपी असती तया दावि सूरउषा!

क्षितिजावरून सुर्याचे लालबुंद बिंब हळुहळु वर सरकु लागले होते. जंगलातील सकाळ हलकेच हिरव्या रंगातून सोनेरी रंगाला परिधान करतानाचे हे नयन रम्य दृश्य दिसत होते. बहारदार निसर्ग मनाला आल्हाददायक अनुभूती देत होता. उगवत्या सूर्याच्या स्वागताची गाणी गात पक्ष्यांचे मधुर संगीत श्रवणी पडत होते. गौताळा अभयारण्यातील ती सकाळ खरच मनाला एक वेगळीच अनुभूती देत होती.
गौताळा अभयारण्यात जायचे हा विचार पण आमच्या मनात नव्हता हे क्षेत्र बोनस मधे आम्हाला मिळाले होते. मग आम्ही गौताळा अभयारण्याचा पण आनंद घ्यायचा ठरवला. वाटेत जाताना इतिहासकालीन एक वास्तू दृष्टीस पडली आम्ही आवर्जून थांबलो मंदीराच्या आकाराचे दगडात बांधकाम केलेली ही वास्तू  सीतामाईची न्हानी म्हणून प्रचलित आहे. तिथे सध्या वानरांचे वास्तव्य आहे. ती वास्तू पाहून आम्ही नागद फाट्यावर पोहचलो तिथे मॅप बाबाने अंतुर किल्ल्यावर जाण्यासाठी आम्हाला डावीकडे वळायला सांगितले आम्ही कोणताच विचार न करता घाट उतरून नागोदला पोहचलो. नास्ता केला नव्हता त्यामुळे कडाक्याची भुक लागली होती वीस किलोमीटरचे अंतर कापून आम्ही नागोदला पोहचलो तिथे हाॅटेल दिसले तिथे थांबलो. मस्त गरमागरम भजी घेतली चहा घेतला तो पर्यंत रोहीतदादा हाॅटेल वाल्याला किल्याची माहिती विचारू लागले अंतुरी किल्ला म्हणताच हाॅटेलवाल्याच्या चेह-यावर वेगळाच भाव दिसला हाॅटेलवाल्याने विचारले कुठून आलात? मग रोहीतदादाने रूट सांगितला, हाॅटेलवाला म्हणाला इकडून गेलात तर   बेलखेडा- गोपेवाडी- दस्तापूरला जाऊन गाडी तेथेच लावून तुम्हाला पायी किल्ला २७०० मीटर चढावा लागेल अडीच तासांचा पायी प्रवास अन आता तर उन वाढले आहे तुम्ही एक करा पुन्हा आले त्या मार्गाने जा. तेथून तुम्हाला डायरेक्ट किल्यावर पोहचता येईल. नास्ता उरकला अन हाॅटेलवाल्याकडून सुर्यफुलाच्या भाजलेल्या बिया घेतल्या त्या बियांच्या आतील मगज खायला खुप चविष्ट आणि शरीराला पोषक असतो. गाडी पुन्हा मागे घेतली अन सुर्यफुलाच्या बिया खात खात आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला. घाट चढत असतानाच एक भेकर गाडी समोरून गेलं बहुदा ते चुकलेलं असावं खूप भेदरलेलं वाट फुटेल तिकडे धावत होते. आम्ही मनोमन आनंदी झालो अभयारण्यात आलो आणि एका तरी प्राण्याचे दर्शन झाले अन सहजच चारोळी सुचली...

नको सैरवैर होऊ नको तू भिऊ
थकलेल्या रानातल्या रानजीवा
मानवी वस्तीतून वाचलास खरा
पण आता पोहचशील आपल्या घरा.

आता घाटचा रस्ता संपून आम्ही नागापूरच्या रस्त्याने पुढे जावू लागलो अगोदरच उशीर झाला होता अजून बराच दूरचा प्रवास करायचा होता दहा बारा किलोमीटर पुढे आलो असेल तेव्हा आम्हाला सीताखोरी कडे असा बोर्ड दिसला अन आपोआप ब्रेक दाबला गेला, चला एक शेवटचा पाॅईन्ट पाहूयात म्हणून दोघेही गाडी खाली उतरलो अन सीताखोरी च्या दिशेने चालू लागलो. थोडे अंतरावर चालून गेलो तर भली मोठी दरी दिसली तिला पाहून तर डोळे गरगर फिरू लागले. त्या दरीच्या एका कडेला सशा सारखे कान असलेल्या आकाराची एक सरळ कातळ पाहून आश्चर्य वाटले, इतके वर्ष होऊनही ही कातळ सरळ उभी कशी काय? हा मनात प्रश्न पडला. कारण तिला अनेक ठिकाणी भगदाड पडलेली होते अनेक तडे, चिरा पडल्या होत्या, तरी ती कातळ प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होती. खरच निसर्गाचे हे चमत्कारीक रूप डोळ्यात साठवून पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो आलो. आता अभयारण्याचा भाग संपून शेतीपट्टा सुरू झाला होता. उन्हाळ्यात हिरवीगार शेती पाहून मनाला गारवा मिळत होता. मका गहू अशा अनेक पिकांनी शेती बहरली होती ती पहात पहात नागापूरला पोहचलो एक अरूंद कच्चा रस्ता अन तेथून पुढे सहा किलोमीटरवर अंतुरी किल्ला होता. अतिशय खडकाळ रस्ता त्यात आमच्या कडे नाजूक फोरव्हिलर ती म्हणजे होंडा अमेझ, बिचा-याच्या चाशीवर अनेक दगडधोंडे आदळत होते कधी कधी इंजिनला पण घासत होते. वेग मंदावला होता. दहा वीस च्या स्पीडने गाडी सुरू होती. एका शेताजवळ बटाट्याच्या आकाराचे पीक काढताना काही माणसं दिसली कारण दूरून बटाटा तर दिसत नव्हता. परंतू काय आहे पहावे म्हणून जवळ जावून पाहिले तर आठ दहा एकरात आल्याचे पीक काढण्याचे काम सुरू होते. आयुष्यात पहिल्यांदाच आल्याचे पीक काढताना पहात होतो. तेथील शेतक-याला थोडी आल्या विषयी माहिती विचारली व कधी लागवड केली होती हे पण विचारले?, त्यांनी सांगितले मागच्या जून मधे लागवड केली होती. आता फेब्रुवारी सुरू आहे तब्बल नऊ महिन्यानंतर हे पीक काढायला आले होते. संपूर्ण गौताळा परिसरात आल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ते पीक काढल्यावर गुजरात, राजस्थान, मुंबई, पुण्याला विक्रीसाठी जाते. असे शेतकरी सांगत असतानाच त्यांने दोन्ही हातात मावतील इतके आले माझ्या हातावर ठेवले, इतका अमुल्य वानवळा मिळाला होता. शेतक-याचे आभार मानले अन पुढे निघालो. कच्चा रस्ता पुढे जास्तच खराब होता. दूर पर्यंत एकही माणूस दिसत नव्हता. पुढे गेल्यावर एक छोटे तळे व ओपन चौथा-यावर हनुमंतरायाचे मंदिर होते ते पाहून किल्ला दिसतो का हे बारीक न्याहाळू लागलो पण किल्याचा काही माघमूसही दिसेना, पुढे चलण्याशिवाय पर्याय नव्हता माळरान जाऊन जंगल सुरू झाले होते अन या विराण आणि वन्यजीव असणा-या जंगलात फक्त हम दो शेर होतो.
इतका रोड खराब असूनही गाडी कशी तरी किल्या पर्यंत घेऊन आलो होतो. कारण जंगलात व किल्याच्या आजूबाजूला जंगली प्राणी व पाखरांच्या शिवाय कोणीच नव्हते काहीतरी संरक्षण असावे म्हणून गाडी किल्यापर्य॔त घेऊन आलो होतो. भोसरी पासून हा किल्ला ३१७ किलोमीटरवर होता, औरंगाबाद पासून ९० किलोमीटरवर व कन्नड पासून ३० किलोमीटर होता.
किल्याजवळ आलो खरा पण रस्ता सापडेना मग मी अन रोहीत बोरूडे किल्याच्या मोठ्या बुरूंजा कडून निघालो पुढे आलो तर किल्याच्या आणि जमिनीच्या मधे कातळ खोदून खुप मोठा खंदक खोदला होता. इथून उतरून जायचे का? हा प्रश्न मनात आला अन काळजाची धडधड वाढली. अशातच रोहितदादा हळूहळू त्या खंदकात उतरायला लागले. पण त्यांना पण जमेना निम्या पर्यंत गेलेले पुन्हा वरती पण येता येईना त्यांचे हे हाल पाहून माझे धाडस होईना मी बराच वेळ तसाच उभा राहिलो. तोपर्यंत रोहितदादा पूर्ण खंदकात उतरले पण पुर्ण घामाघूम झाले होते पुढे काय त्यांना पण प्रश्न पडला होता. ते खूप वेळ मला आवाज देत होते पण मला त्यांचा आवाज ऐकू येईना त्यामुळे रोहितदादा खुपच घाबरले होते. मी पण उंचावर एकटाच राहिलो होतो काही करावे सुचेना. तेवढ्यात रोहित दादांचा आवाज आला सर खुपच सोपा रस्ता दिसतो आहे तुम्ही तिकडून या; फक्त जरा चालावे लागेल. मी हो म्हणालो. जिथे गाडी लावली होती तिथे मी एकटाच परत आलो. अन रस्त्याची शोधा शोध केली, पहातो तर काय एक दगडी रस्ता सरळ किल्याच्या मुख्य दरवाजाकडे जात होता. मग मी त्या रस्त्याने निघालो, आजूबाजूला घनदाट जंगल, पाणगळी मुळे दूरचे पण सहज दिसत होते. बहिरी ससाण्याच्या ऐवजी आकाशात व झाडांझुडूपांच्यावर चिट पाखरू पण दिसेना. भयान शांतता त्यामुळे नको त्या विचांराची गर्दी मनात दाटू लागली. दगडी रस्त्यावर झाडांची पाणगळ झाल्याने पूर्ण रस्ता पानांनी झाकोळून  गेला होता. मधेच कुठून तरी सळसळ ऐकू यायची, पाणगळीतल्या त्या सळसळीने तर छातीत धस्स होत होते, आपोआप हदयाचे ठोके वाढत होते.
तोपर्यंत रोहितदादा संपूर्ण खंदक उतरून माझ्याच रस्त्याला येवून थांबले होते ते सुद्धा खुप घाबरलेले दिसत होते ते मला म्हणाले मी खुप वेळा तुम्हाला आवाज दिला पण तुमच्या पर्यंत आवाज पोहचतच नव्हता. दोघांची पण एकत्र भेट झाल्याने एकमेकांना धीर आला होता. समोरच कपारीच्या अगदी कडेला अंतुरी किल्याचा दक्षिणमुखी महादरवाजा दिसत होता. अजूनही  सुस्थितीत होता अलिकडेच त्याला भव्य असा लाकडी दरवाजा बसविण्यात आल्याने मुख्य दरवाचा अतिशय सुंदर दिसत होता. बाहेरच पहारेक-यांच्या उभे रहाण्याच्या ठिकाणावर शरभशिल्प दिसत होते. छोट्या दरवाजातून आम्ही किल्यात शिरलो. दोन्ही बाजूला उंच तटबंदी होती. तट व दरवाज्यावर जाण्यासाठी पाय-या बांधल्या होत्या.  पुढे पहिल्या दरवाज्याच्या नव्वद अंशाच्या कोनातच दुसरा मुख्य पुर्वाभिमुख दरवाजा होता. दरवाजाच्या वरील दोन्ही बाजूंचे बुरूंज चौकोनी आकारात बांधलेले होते. दरवाजाच्या आतील बाजूस घुमट व कमानी दिसत होत्या त्यावर कोरीव शिल्प व कमळपुष्प कोरलेली होती. जणू काही गडाची मुख्य कचेरी असावी. पुढे आम्ही तिस-या दक्षिणमुखी दरवाज्या जवळ पोहचलो त्या भल्या मोठ्या दरवाजाच्या कमानीवर निजामशाह यांच्या काळातील मलिक अंबर यांचा या किल्याच्या बांधकामाविषयी पार्शियन भाषेत शिलालेख होता. तिसरा दरवाजा पार करून आम्ही किल्यावर पोहचलो हा किल्ला  समुद्र सपाटी पासून २७५७ फूट उंचीवर असून ३२ एकरात हा किल्ला पसरला आहे. बत्तीस एकराच्या चोहोबाजुंनी तटबंदीने हा किल्ला वेढलेला आहे. चोहोबाजुंनी खोल द-या आणि मधोमध हा किल्ला अंडाकृती आहे. १७ व्या शतकातील हा किल्ला यादवकाळात बांधला होता. अनेक साम्राज्य या किल्यावर राज्य करून गेली होती. अल्लाद्दीन खिलजी व मराठ्यांच्या मधे घनघोर असे युद्ध याच किल्यावर झालेले आहे. फोटो काढीत काढीत आम्ही किल्यावरील तलावा जवळ येवून पोहचलो, हिरव्या पाण्याने तुडूंब भरलेल्या तलावात असंख्य जलपर्णी दिसत होत्या. तलावाच्या उजव्या बाजूला मज्जिद तर डाव्या बाजूला अतिशय सुंदर राजवाड्याचे अवशेष दिसत होते. लोहचुंबकाने लोखंडाला खेचावे तसे मला या अंतूर किल्याने खिळवून ठेवले होते. मला हा तलाव व तेथील बाजूचे बांधकाम पाहून चिखलद-यातील गवळी राजाने बांधलेल्या गाविलगडाची आठवण झाली होती. गडावरील अंबरखाना, धान्यकोठारे, शस्त्रागार अनेक मोठ्या इमारती पाहून मी आणि रोहित दादा मोठ्या टेहळणी बुरूंजा कडे निघालो. इतका मोठा किल्ला पण आमच्या दोघांच्या शिवाय या किल्यावर तिसरे कोणीच नव्हते, अन जरी असले तरी लपून बसलेले जंगली जनावरं असणार असे मनोमनी वाटत होते. तीन कमांनीच्या दरवाजातून टेहळणी बुरूंजाच्या आवारात एक पिराचा दर्गाह होता. मी त्या दर्ग्यात जावून दर्शन घेतले बाहेर आलो तितक्यात एक विचित्र आवाज तिथे येवू लागला बिबट्याच्या लहान पिलांचा हा आवाज असावा किंवा एखादया पक्ष्यांचा आवाज असावा असा तर्क आम्ही दोघांनी पण लावला. खुप वेळच्या आवाजाने आमची मात्र पाचावर धारण बसली होती. क्षणभरातच आम्ही तो बुरूंज सोडला, आता अशी मनात भीती बसली की कधी किल्यातून बाहेर पडतो असे झाले होते. मी आणि रोहितदादा एकमेकांना धीर देत होतो काहीच झाले नाही अशा आविर्भावात होतो. पण दोघांची मनातली अवस्था खुप भितीदायक बनली होती. किल्याच्या पश्चिम बाजूस काही लेण्या दिसल्या तिथे जाण्याचे पण धाडस होईना. पाऊलांची गती वाढलेली होती. एका टेकडावरील धान्याच्या अंधा-या कोठारात डोकावले तर तिथे पण वेगळाच आवाज ऐकू आला, आता मात्र धीर सुटत चालला होता. पण किल्यावर इतक्या सुंदर वास्तू होत्या त्या पाहिल्या शिवाय पाऊल पुढे सरकेना. वास्तू जरी सुंदर होती तरी किल्यावर येणा-या महाभागांनी पत्रावळ्या, दारूच्या बाटल्या, बिसलरी बाटल्यांनी अन प्लॅस्टिकच्या इतर वस्तूंचा जागोजागी खच पडलेला दिसत होता. प्रत्येक ऐतिहासिक वास्तूच्या दगडांच्यावर फलताड प्रेमींनी नाव कोरून वास्तूला दुषीत केलेले दिसत होते. महाराष्ट्राचे गड किल्ले हे तिर्थक्षेत्रापेक्षाही श्रेष्ठ आहेत हे जरी प्रत्येकाला समजले तरी त्याचे पावित्र्य राखले जाईल अन्यथा अशाच या ऐतिहासिक वास्तू नष्ट होतील यात शंकाच नाही. आपल्या या वैभवशाली महाराष्ट्राच्या गड किल्यांचे, पवित्र पावन स्थळांचे रक्षण करण्याचे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. आज अनेक आक्रमण निमूटपणे सहन करतो, शरीर पोलादा सारखे बनवू शकतो, कोणताही ऋतू यांच्यावर कसलाच परिणाम करीत नाही, वेदनेचे नाव ही उरत नाही तो योगी त्याच प्रमाणे हा अंतुर किल्ला मला एखाद्या योगी सारखा वाटला..

या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची,
दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची,
पहाड़ डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची,
जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदा शिरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी!

कुसुमाग्रजांच्या या काव्यपंक्तीना आठवतच अंतुर किल्ल्याचे दर्शन घेतले अन जड अंतःकरणाने निरोप दिला. तशी या किल्याची फारशी माहिती उपलब्ध नाही, किंवा येथे कुठल्याही प्रकारचे गाईड किंवा मार्गदर्शिका नसल्यामुळे किल्याची माहिती नसूनही चुकीचा विषय मांडणे मनाला पटत नाही. जितकी माहिती मला मिळाली मी स्वतः पाहिली तीच माहिती मी या लेखात नमूद केलेली आहे. माझी महाराष्ट्रातील तमाम गड किल्ले प्रेमींना विनंती आहे एकदा तरी या अंतुर किल्ल्याला नक्कीच भेट दया ...

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

सत्य संकल्पाचा दाता! आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा!

सत्य संकल्पाचा दाता! आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा.. संदीप राक्षे✍🏻 संत तोचि जाणा!  जो देही उदार!! म्हणजे खरा संत तोच ...