Tuesday, 23 February 2021

धवल हिमाचल

 माझी सहल "हिमाचल"

संदीप राक्षे✍🏻


हिमाचल म्हणजे बर्फाळ प्रदेशाचे राज्य, शिवशंकरांची सासुरवाडी अशी ही देवभुमी, अशा या धवल निसर्ग यात्रेसाठी आम्ही पंचकुला, पिंजौर, कालका, जबली ही गाव मागे टाकीत पंजाबची सीमारेषा संपून हिमाचल प्रदेशच्या हद्दीत प्रवेश केला. हिमाचल प्रदेश सुरू झाला, हे कळले आम्हाला डोंगराच्या कडेला एकावर एक घरांचा थर पाहिल्यावर, कधी एकावर एक घरांचा थर तर कधी पाईन्स या झाडांचे जंगल असा प्रवास करीत आम्ही हिमाचल मधील सोलन या शहरात पोहचलो. फ्रेश होण्यासाठी व पाय मोकळे करण्यासाठी सोलन शहराच्या अलिकडेच थांबलो. तिथे काही स्थानिक व्यक्ती उभ्या होत्या, त्यांच्या कडून काही माहिती मिळेल जेणेकरून पुढचा प्रवास सुखकर होईल.. आम्ही सर्वजण फ्रेश झालो, इन्होव्हा गाडीत बसून बसून जड झालेले पाय मोकळे केले. त्या व्यक्तींच्या जवळ गेलो नमस्कार घातला. ते जरा आश्चर्य चकित झाले, त्यांनी पटकन ओळखले, महाराष्ट्र से हो ? आम्ही हो म्हणालो ते कुतूहलाने इकडे तिकडे पाहू लागले. हे चौघेच लक्झरी बस तर कुठे दिसेना मग आम्हीच सांगितले आम्ही आमचीच गाडी घेऊन आलो आहोत.. ते हैराण झाले कस शक्य आहे इतक्या दूरवरून तुम्ही गाडी घेऊन आलात त्यातला एकजण बोलला? मान गये उस्ताद, बराच वेळ गप्पा झाल्यावर कळले की हे दोघेही फाॅरेस्ट अधिकारी आहेत. त्यातल्या एकाने नाव सांगितले "मै प्रेम कुंअर हूँ" मग ते सांगू लागले, तुम्ही डिसेंबर जानेवारी या महिन्यात हिमाचलला यायला हव होतं, आता बर्फ कमी झाला आहे. कुलू मनाली मै हनिमून के लिए आनेवालोंकी भीड ज्यादा बड गयी है. तुम्हाला जर निवांत व गर्दी नसलेल्या ठिकाणी जायचे असेल तर आम्ही सांगतो, तुम्ही चायल या ठिकाणी जा, तेथून तुम्हाला सिमला जवळ पडेल, जास्त त्रास होणार नाही. त्या दोन अधिका-यांनी जो मार्ग दिला, तोच मार्ग आम्ही सर्वांनी स्विकारला व त्याच मार्गाने आम्ही निघालो. निसर्गाचे अद्वितीय रूप पहायला मिळाले ते सोलन शहरा कडून चायल इथे जात असताना. संपूर्ण चार दिवसांचा थकवा निसर्गाचे हे अद्भुत रूप पाहताना कुठल्या कुठे पळून गेला होता. दूरवर जाणारा घाट, नागमोडी वळणं, गुलाबी थंडी व आजूबाजूला पडलेला बर्फ, आयुष्यात पहिल्यांदाच साक्षात बर्फाळ प्रदेशात आलो होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ मोठ्या दगडाच्या आकाराचे बर्फ दिसत होते. गाडी थांबवून त्या बर्फाच्यावरून हात फिरवीत होतो, डोळे भरून हा निसर्गाचा चमत्कार पहात होतो. दुपारची दोनची वेळ होती तरी सकाळचे आठ वाजले असे वातावरण होते, सूर्य होता पण त्याच्या उन्हाची ताप नव्हती. ऊन असूनही बर्फ विरघळत नव्हता हे विशेष होते. जर कधी पाऊस पडला तरच हा बर्फ विरघळून जातो. म्हणजे लोहा लोहे को काटता है, ही म्हण तिथे खरी झाली. आमच्या जवळच्या बिसलरीचे पाणी त्या बर्फावर ओतून पाहिले तर खरच पूर्ण बर्फ विरघळून गेला होता. वाटेने प्रवास करताना अनेक ठिकाणी थांबून या निसर्गरम्य परिसराचे हे सुवर्णस्वरूप डोळ्यात साठवत होतो. कुठेही जरासाही सपाट भाग दिसेना जिकडे तिकडे अफाट पर्वत रांगा व त्यावर पांघरलेला बर्फ, बर्फावर सुर्याची किरणं पडली की सोन्या सारख चमकणारे रूप मंदिराच्या कळसा प्रमाणे वाटत होते. अनेक पर्वत रांगा पार करीत आम्ही साधूपूल येथे पोहचलो, साधूपूल हे हिमाचल मधील आसन नदीवरील पुलाचे नाव व याच नावाने नदीच्या किनारी हे गाव वसलेलं. गाडीतून वरती पाहिले तर असंख्य पर्वत शेषनागा प्रमाणे फणा काढून उभे असलेले, घोंगवणारा वारा जणू काही शेषनागा प्रमाणे हे पर्वत फुत्सकारात आहेत. गाडीतून उतरलो नदीकाठावर पोहचलो, पाण्यात हात भिजवला संपूर्ण हात बधीर झाला होता, इतके थंड पाणी की अजून टेंपरेचर कमी झाले तर ही नदीचं गोठून जाईल. पुन्हा पाण्यात हात घालण्याचे धाडस होईना. नदीचा रोमहर्षक परिसर पाहून आम्ही गाडीत बसलो, आता आम्हाला साडेतीन हजार फुट उंच चायल या शहराकडे जायचे होते. जाताना पर्वत रांगांच्या कुशीत अनेक महात्मे आपआपल्या मंदिरात ध्यानस्त बसलेली दिसत होती. इतकी शांती की टाचणी पडली तरी सहज आवाज येईल. कदाचित वादळापूर्वीची ही शांतता असेल. असाच प्रवास करताना दूर पर्वतावर असणारे सुंदर मंदिर आम्हाला खुणावत होते. आम्ही सर्वांनी ते पहाण्याचा निश्चय केला. त्या मंदिराकडे जाणार रस्ता शोधला..पर्वताच्या कपारीतून हा गाडी रस्ता बनविला होता. छाती धडधड करीत होती. आजूबाजूला खोल खोल दरी आणि त्यामधून आमची गाडी चाललेली सात आठ किलोमीटरचा प्रवास करून आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारात पोहचलो, बाॅर्डरवर जशी सुरक्षा असते तशी सुरक्षा या मंदिराच्या आजूबाजूला होती. आम्हाला जरा नवल वाटले. सुरक्षा रक्षकाने आम्हाला आधार कार्ड विचारले ते सर्वांनी दाखवले, वहीत त्याने नोंद केली, आमची तपासणी करून आम्हाला मंदिरात प्रवेश दिला. लाखो रू खर्च करून या मंदिराची उभारणी स्वामी अमरदेवजी महाराज यांनी केली आहे.   या मंदिरात राधा कृष्ण, राम सीता, शंकर पार्वती, गणपती, पंचमुखी हनुमान, अकरा मुखी हनुमान तसेच नवग्रहांच्या भव्य मुर्तींची स्थापना केलेली. पंचतारांकित असे मंदिर पाहून परमानंद झाला. आम्ही सुरक्षा रक्षकाकडे स्वामीजींना भेटण्याची इच्छा प्रकट केली. तर त्या रक्षकाने सांगितले स्वामीजी आपल्या कुटीमधे गेली महिनाभर साधना अवस्थेत आहेत. ते कोणालाही भेटत नाहीत. बोलत नाहीत, काही खात पण नाहीत. दूरूनच आम्ही त्या कुटीचे मनोभावे दर्शन घेतले. आजूबाजूला कसलीच लोकवस्ती नाही तरी हे भव्य मंदिर, ते महात्मे करीत असलेली निर्गुण साधना, उपासना वातावरणात चैतन्य निर्माण करीत होती. तसेच त्या मंदिरातील प्रत्येक मुर्तीच्या चेहर्‍यावरील सात्विक छटा पाहून सर्व इंद्रिये अंतर्मुख होऊन, चित्त स्थिर होऊन अंतरंगातील भक्तिरस वाढीस लागला होता. नुसत्या निर्जिव मुर्त्यांच्या सहवासाने अमृतापेक्षाही गोड असा अमृतरस चाखावयास मिळाला होता. खरच हिमाचल ही देवभूमी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले होते. आता चायल गावाशिवाय कुठेही थांबायचे नाही असे ठरले कारण प्रत्येक अंतरावर काही ना काही भव्य दिव्य असे दिसत होते टाईमपास होत होता, अन वेळ सहज पुढे जात होती. सायंकाळचे पाच कधी वाजले हे कळले पण नाही. पस्तीस किलोमीटरचे अंतर पार करून आम्ही चायल गावच्या पायथ्याशी पोहचलो होतो. रात्रीचे आठ वाजले होते. गडद अंधार, नागमोडी वाट आजूबाजूला चीट पाखरू पण नाही असा प्रवास सुरू होता. मस्त जुन्या गाण्यांचे फोल्डर सुरू झाले होते. घाट सुरू झाला होता. पहिल्या गियर शिवाय गाडी पण पुढे धावत नव्हती. अचानक गाडीच्या हेडलाईटचा कलर निळसर झाला. आमचे सर्वांचे लक्ष त्या निळसर लाईटकडे आकर्षित झाले. गाडी साईटला घेतली, गाडीची लाईट तशीच सुरू ठेवली. कारण हे चमत्कारापेक्षा कमी नव्हते, समोरचे दृश्य पाहून आम्ही सर्वजण थक्कच झालो होतो. एका विशिष्ट वळणावर, एका विशिष्ट रेषेत गाडीचा प्रकाश बर्फाच्छादित पहाडीवर पडला होता, पहाडीच्या वरती आकाश निळेशार दिसत होते, लाईटचा व आकाशातील निळ्या प्रकाशाचा संगम होऊन तो निळा प्रकाश पूर्ण बर्फावर पसरला होता. त्यामुळे संपूर्ण बर्फाच्छादित पहाडी निळीशार झाली होती. मनसोक्त फोटो काढले, हे विहंगम दृष्य पाहिल्यावर कवी ग्रेस यांची निळाई ही कविता सहजच आठवली..


असे रंग आणि ढगांच्या किनारी

निळे ऊन लागे मला साजणी!

निळे घाटमाथे निळ्या राउळांचे

निळाईत माझी भिजे पापणी!


चायल हे हिमाचल प्रदेशातील एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. सोलन जिल्ह्य़ातील हे गाव सोलन पासून ४५ किलोमीटर अंतरावर आहे. इथे काली टिब्बा, क्रिकेट मैदान व पोलो मैदान प्रसिद्ध आहे. समुद्र सपाटीपासून हे गाव तीन हजार पाचशे फूट उंचीवर आहे. रात्री आम्ही चायल मुक्काम केला. सकाळीच उरकून आम्ही काली का टिब्बा हे मंदिर पहाण्यासाठी निघालो हे मंदिर चायल गावापासून १३०० फूट उंचीवर आहे. नागमोडी रस्ताने मार्ग काढीत आम्ही मंदिरात पोहचलो, काली माता या मंदिरात पिंडीच्या स्वरूपात स्थित आहे. इथे विविध धातूंच्या पाच पिंडी आहेत. अतिशय सुबक आकाराचे हे मंदिर, मंदिराच्या बाहेरील बाजूला एक धुनी अनेक वर्षांपासून पेटलेली आहे ती कधीच विझत नाही. उंचावरून हिमाचल प्रदेशाचा प्रत्येक जिल्हा चोहोबाजूंनी दिसत आहे. जिकडे पहावे तिकडे पर्वतच पर्वत दिसत होते. हिमालयाच्या कुशीतील हे हिमाचल प्रदेश हिमालयाचाच एक भाग आहे. अतिशय सुंदर निसर्गरम्य रूप, असंख्य पर्वतांचे टोकदार सुळके, त्यावर असलेला बर्फ आणि पडलेला सूर्यप्रकाश सोनेरी स्वर्गाची आठवण करून देत होते. आता ओढ लागली होती ती पर्वतांची राणी शिमला शहर पहाण्याची, शिमला शहरातील पर्वतावरील बर्फाच्छादित चादर पहाण्याची. शिमल्याला जाताना अर्की गावात दुपारचे जेवण केले अन शिमल्याच्या दिशेने इन्होव्हा गाडीची चाकं धावू लागली. गाणी गुणगुणत, रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या, आभाळाला टेकणा-या देवदार वृक्षांचे जंगल पहात देवदार वृक्षांवर पडलेला बर्फाचा सडा पहात प्रवास सुरू होता. जस जसे शिमला शहर जवळ येत होते. तसे बर्फाचे साम्राज्य अधिक दिसत होते. रस्त्याच्या कडेला दगडाच्या आकाराचे बर्फाच्या तुकड्यावर आतापर्यंत समाधान मानीत आलो, पण आता पर्वत, झाड, घर, हाॅटेल पूर्ण बर्फाने झाकोळलेली पाहून मन अधिक आनंदीत होत होते. इतर वेळेस आग ओकणारे डोळे सुखावत होते. बर्फाचे पर्वत पाहून तर अक्षरशः थंड पडले होते. शिमला दहा किलोमीटर दूर होता, एका पहाडाला पूर्ण तारेचे कंपाऊंड केले होते, त्या पहाडावर बर्फ पडत होता, असे भासत होते शिवशंकराचा भस्मच पडतो आहे. जाव आणि हा भस्म भाळाला लावून पवित्र पावन व्हावं. थोडं पुढे गेल्यावर बर्फावर खेळण्याचा, चालण्याचा मोह आवरेना. आपल्या मुळे या सफेद संजीवनीला कुठेही डाग लागू नये याची खबरदारी घेऊन मनसोक्त बर्फातून हुंदडलो, झोपलो, बर्फ अंगावर घेतला, एकमेकांच्या अंगावर फेकला..


धवल निसर्गाची किमया 

पाहिली आज मी डोळा,

विसरलो देहभान, हरपलं मन,

काय वर्णू मी अद्भुत सुखसोहळा.


धवल निसर्गाचा आनंद घेत आम्ही शिमल्यात पोहचलो, हिमाचल प्रदेशच्या राजधानीचे हे शहर अतिशय गजबजलेलं होतो प्रचंड गर्दी, त्यातून पर्वतावर वसलेलं शहर एकमेकांच्या उरावर असलेली हाॅटेल, तेथील स्थानिकांची घर सुबक पणे सजवलेली होती, परंतु प्रत्येक घराला अंगण हे नव्हते, आपल्याकडे अंगण या विषयावर अनेक गाणी रचली गेली पण शिमला हे शहर अतिशय वेगळं होत. अंगणापासून वंचित होतं, कपारीच्या कडेला घर, बाहेर येवून पहायचं म्हटलं तर अंगणाच्या ऐवजी प्रचंड खोल दरी. वरून पडला की सरळ स्वर्गलोकचं. कुठेही सपाट जागा नसणार शहर पण अतिशय नियोजन बद्ध होते. अनेक सुखसोई युक्त अस हे शहर अनेक पर्यटकांचे आवडणारे शहर, नुकताच बर्फ पडून गेल्याने रस्त्याच्या दोन्ही कडेला बर्फाचा खच पडलेल्या त्याच सोबत अनेक टूव्हिलर, फोर व्हिलर कच-या सारख्या त्या बर्फाच्या विळख्यात अडकलेल्या होत्या. काही गाड्यातर दोनच दिवसांत सडून गेल्या होत्या. हे भयानक विद्रूप रूप पाहून आम्हाला पण खूप भिती वाटली कारण आम्ही पण गाडी घेऊन आलो होतो. जर कधी बर्फवृष्टी झाली अन गाडी जर अडकली तर भंगार मधे विकण्याशिवाय पर्यायच नव्हता.. आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळ पाहून शिमल्यातून आम्ही लगेचच पळ काढला. कारण पुढे पण आम्हाला ज्वालादेवीच्या दर्शनाला जायचे होते. माझ्या सोबत या धवल निसर्ग सहलीत संजय जाधव, मारूती तायनाथ, राजेश क्षीरसागर हे सहकारी होते..


संदीप राक्षे ✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१


Tuesday, 2 February 2021

विरूपाक्ष मंदिर

 भारताच्या सुवर्ण वैभवाच्या पाऊलखुणा..

"विरूपाक्ष मंदिर" हंम्पी कर्नाटक 

संदीप राक्षे ✍🏻


सासिवेकालु आणि कडलेकालु ही दोन गणपतीची मंदिर पाहून आम्ही कर्नाटकचे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र विरूपाक्ष मंदिर पहाण्यासाठी निघालो. तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर विरूपाक्ष मंदिर आहे. विरूपाक्ष ही देवता भगवान शंकराचा अवतार मानला जातो. विरूपाक्ष म्हणजे तिरकस डोळ्यांचा देव, हे मंदिर विजयनगर (हंम्पी) च्या साम्राज्याचे मुख्य केंद्रस्थान होते. संपूर्ण विजयनगर राज्य उध्वस्त झाले परंतु हे विरूपाक्ष शिवमंदिर जस होत तसच आजही इतिहासाची साक्ष देत भक्कम पणे उभ आहे. चौदव्या शतकात पंपातीर्थ स्वामीस्थळ म्हणून जगप्रसिद्ध होते. या मंदिराचे प्रवेशद्वार १०८ फुट उंच आहे  अतिशय बारीक कोरीव नक्षीकाम अजून सुस्थितीत असून द्रविड स्थापत्याचा अद्भुत नमुना आहे. या मंदिरात अनेक गोपुरे आहेत, गोपूर म्हणजे पिरॅमिड सारख शिखर, ग्रॅनाईट आणि विटावर प्लॅस्टर ने नक्षीकाम केलेले अतिशय सुंदर दिसते. सोनेरी कळस, सोनेरी मोर पीस खोवल्या सारखी दिसतात. हे सार पाहून आम्ही मुख्य मंदिरात शिरलो. भली मोठी रांग दर्शनासाठी होती. आम्ही तिघेही रांगेत उभे राहीलो,  रांगेत जरी उभे असलो तरी नजर मंदिराच्या नक्षीकामाकडे होते. सिंह, हत्ती, घोडे, मगर अशी विविध शिल्प कोरलेली दिसत होती. प्रत्येक खांबावर प्राण्यांच्या आकाराचे शिल्प कोरलेले होते. गर्दी पुढे सरकत सरकत आम्ही गाभा-या जवळ येऊन पोहचलो. विरूपाक्ष देवाचे मनापासून दर्शन घेतले, गाभा-यातून बाहेर पडलो, शेजारीच कृष्णदेवराय राजाच्या काळातील राज्याभिषेक मंडप पाहिला. मंडपाला नक्षीकाम व अलंकाराने मढवलेले कित्येक खांब दृष्टीस पडत होते. खरतर हे वैभव पाहून आम्हाला आमचाच विसर पडला आपण आधुनिक काळातील आहोत. इतके या वास्तूपाहून मंत्रमुग्ध झालो होतो. खरतर चौदाव्या शतकातून आपण बाहेरच पडू नये असे सारखे वाटायचे, सुर्यदेव ही आपली दिनचर्या संपून मावळती कडे झुकत होते. संपूर्ण अवनीवर सव सांजेचा अंधूक प्रकाश पसरत चालला होता. आमच्या गाडीकडे जाताना पुन्हा पुन्हा या वास्तूकडे नजर जात होती. काळोखाचे साम्राज्य वाढून इथल्या वास्तू सुद्धा काळोखाच्या कचाट्यात सापडून दिसेनाशा झाल्या होत्या.. हंम्पीच्या वास्तूतले हे शेवटचे पवित्र स्थळ पाहून, आम्ही पुण्याकडे मार्गस्थ झालो..


संदीप राक्षे ✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१


Saturday, 30 January 2021

लक्ष्मी नृसिंह हंम्पी..

 भारताच्या सुवर्ण वैभवाच्या पाऊलखुणा..

"लक्ष्मी नृसिंह, कडलेकालु, सासिवेकालु गणेश मंदिर" हंम्पी कर्नाटक 

संदीप राक्षे ✍🏻


माधव रंगा मंदिर पाहून आम्ही लक्ष्मी नृसिंहाची भव्य मुर्ती पहायला निघालो, आमच्या सोबत गाईड व त्याचीच रिक्षा होती त्यामुळे मनसोक्त या ऐतिहासिक वास्तुं पहाण्याचा आनंद घेत होतो. प्रत्येक वास्तू ही एक, दोन, पाच, सहा, दहा किलोमीटर अंतरावरील आहेत. पुर्वीच्या काळात जगातील सर्वात श्रीमंत शहर आम्ही पहात होतो. हंम्पी इतके नेत्रदीपक शहर इथला इतिहास इथल्या वास्तू सारख्या वास्तू कुठेच नाहीत. अशा विचारातच मी संकेत व सुरज नळगुणे नृसिंह शिल्पा जवळ पोहचलो भव्य कमानीतून आत शिरलो, दूरनच महाकाय नृसिंह भगवंताचे रूद्र दर्शन झाले होते. २२ फुट उंचीचे भव्य शिल्प  मुर्तीकलेचा अद्भुत नमुना दिसत होता. किती आक्रमण, उन, वारा, पाणी झेलत नृसिंहाची ही मुर्ती उघड्यावरच आपले स्थान टिकवून होती. प्रभू नृसिंह हे विष्णूचा अवतार अर्धसिंहाचे तोंड विक्राळ दिसत होते. ही मुर्ती सात तोंडी शेष नागावर विराजमान झालेली आहे. एक मांडीवर देवी लक्ष्मी बसलेल्या दिसत आहेत. नृसिंह मुर्तीची बरीच तोडफोड झालेली आहे काही अवशेष नष्ट करण्यात आलेले आहेत. इतक्या भल्या आक्रमणातून सुद्धा ही मुर्ती सुअवस्थेत दिसत होती. नृसिंह भगवंताचे दर्शन घेऊन आम्ही शेजारीच असलेल्या शंकराची पिंड असलेल्या मंदिरा कडे आलो. मंदिर छोटो होते पण पिंड मात्र खूप मोठी होती. अखंड दगडातील या शिवलिंगाचा तळ कायम पाण्यात असतो. हे पाणी कुठून येते हे एक आश्चर्यच आहे. लक्ष्मी नृसिंह व शंकराची पिंड पाहून आम्ही पंधरा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सासिवेकालु गणपती मंदिराकडे निघालो. हे मंदिर थोडे उंचावर होते, दिवसभर चालण्याने थकवा आला होता. पण वातावरणातील चैतन्य व या उर्जादायी वास्तू पाहून मन व शरीरात उत्साह निर्माण होत होता. सासिवेकालु गणपती मंदिराच्या चारी बाजूला खांब व फक्त छत होते, चारी बाजू ओपन होत्या. १९ फुटाची गणेशाची मुर्ती मोहरीच्या दाण्या सारख्या दगडाची बनवलेली आहे. याच मुर्तीच्या मागे एका नटलेल्या स्त्रीची प्रतिमा दगडात कोरलेली आहे. ती मुर्ती शारदेची असावी असे मला वाटते. मंदिराला प्रदक्षिणा घातली, गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले व आम्ही कडलेकालु गणपती मंदिराकडे निघालो. भव्य सभा मंडप अत्यंत सुंदर गाभारा त्याच सफेद दगडात कोरलेली  गणपती बाप्पाची २२ फुटी मुर्ती पहातानाच भक्ती भाव प्रकट होतो व आपोआप हात जोडले जातात. हात जोडले जातात त्या कलेला, त्या कलाकारांना, इतके सुंदर शहर निर्माण केले त्या राज्याला. दोन वेगवेगळ्या भव्य अशा गणेशाचे दर्शन झाले होते. कडेलकालु गणपतीच्या पायथ्यालाच खाली विजयनगर बाजाराची जागा व दगडात बांधलेली बाजारपेठ दिसत होती. हे विहंगम दृष्य डोळ्यांनी पहातच आम्ही टेकडी उतरलो आणि पुढच्या स्थळाकडे जाण्यासाठी मार्गस्थ झालो..


संदीप राक्षे ✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१


Friday, 29 January 2021

हत्ती महल, कमल महल, रंगा मंदिर

 भारताच्या सुवर्ण वैभवाच्या पाऊलखुणा..

"हत्तीमहल, कमल महल, माधव रंगा मंदिर" हंम्पी कर्नाटक 

संदीप राक्षे ✍🏻


हजार राम मंदिर पाहून आम्ही हत्ती अस्ताबल, कमल महाल व माधव रंगा मंदिर पहावयास आलो होतो. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर प्रथम दिसते ते भव्य हत्ती अस्ताबल, हत्तींना ठेवण्याकरता १२०० फूट लांब उत्तम दगडी महाल, ज्याला ११ मोठी दालने होती. प्रत्येक दालनाचा घुमट वेगळ्या आकाराचा दिसत आहे. नक्षीकामाची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे. घुमटाच्या आतील बाजूने लटकवलेले अजस्र लोखंडी हूक, ज्याच्या आधाराने जाड दोरखंडाने हत्तींना बांधून ठेवत. या वस्तू समोरच भव्य दालनात माहूत व पहारेकरी रहात होते. राणी महाला इतकेच हत्ती महालाचे महत्त्व होते. इथूनच राजघराण्यातील महिलां हत्ती वरील अंबारीत बसून कार्यक्रमाला जात असायच्या. हत्ती महालाच्या समोरच प्रशस्त प्रांगण या प्रांगणात हत्तीना शिक्षण दिले जायचे. इतके फिरलो पण प्राण्यांच्या साठी महाल प्रथमच पाहिला होता. या वरून विजयनगरच्या वैभवाची महती साक्षांकित होते. हत्ती महाल पाहून आम्ही चालतच कमल महाल पहाण्यास निघालो. राजघराण्यातील स्त्रियांना एकत्रित दिवस घालविण्याचा महाल म्हणजे कमल महाल, उंचावरून पाहिले तर पूर्ण कमळाच्या फुलांचा आकार दिसतो. या महालातील १४ कमानी इतक्या सरळ रेषेत आहेत की शेवटच्या कमानीतून दिसणारा उजेड  अवर्णनीय आहे. कमल महाल हा कमळाच्या फुलाच्या आकाराचा म्हणून त्याला कमल महाल हे नाव पडले आहे. एक एक वास्तू पाहून मन थक्क होत होते. संकेत प्रत्येक वास्तूची माहिती गाईडला तंतोतंत विचारीत होता त्यामुळे माझ्या पण ज्ञानात भर पडत होती. कमल महाल पाहून आम्ही टेहळणी बुरूजा जवळ पोहचलो, त्या बुरूजावरून चोहोबाजूंवर कडक नजर ठेवता येईल व कमल महालातील राज घराण्यातील महिलांची हालचाल सेवकांच्या दृष्टीस पडू नये अशी सुविधा केलेली दिसत होती. एक एक वास्तू पहात होतो तिची नवलाई वेग वेगळीच होती. टेहळणी बुरूजाला वळसा घालून आम्ही माधव रंगा मंदिराकडे निघालो..

माधव रंगा मंदिर हे १५४५ साली नृत्य, गायन, वादन या साठी बांधलेले होते. या मंदिरातील प्रत्येक खांबावर गरूड, श्री विठ्ठल, सूर्य, कृष्ण, हनुमान अशा विविध देवतांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. शेजारी देवी मंदिर गर्भ गृह रिकामे पण मंदिराच्या बाहेरच बारा फुटाची हनुमानाची कोरीव मुर्ती प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते, त्या मुर्तीचे दर्शन घेण्याचा व तिच्या सोबत फोटो काढण्याचा मोह अजिबात आवरत नाही. प्रत्येक मंदिर निरिक्षण पूर्वक पाहून त्याची खासियत समजून घेताना साक्षात चौदाव्या शतकात असल्याचा भास वेळोवेळी होत होता. किती परंपरा, संस्कृती कला, अनमोल, अप्रतिम, अद्भुत, चैतन्यदायी, चमत्कारिक अशा वास्तू हा आपल्या पुर्वजांचा हा ठेवा पाहून आपला भारतदेश हाच खरा स्वर्ग असा साक्षात्कार होतो..


संदीप राक्षे✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१


Thursday, 28 January 2021

हजार राम मंदिर हंपी

 भारताच्या सुवर्ण वैभवाच्या पाऊलखुणा..

"हजार राम मंदिर" हंम्पी कर्नाटक 

संदीप राक्षे ✍🏻


महानवमी दिब्बा पाहून पूर्ण शरीरात वेगळीच शक्ती संचारली होती. गाडी प्रत्येक ऐतिहासिक स्थळावर दूरच लावावी लागत होती आणि पायी जाव लागत असे त्यामुळे चालण्याचा व्यायाम पण होत होता. गाईड आम्हाला हजार राम मंदिराकडे घेऊन आला. 

हंम्पी हे प्राचीन काळातील किष्किंदा क्षेत्र म्हणूनही सुपरिचित होते. रामायणातील वाली आणि सुग्रीव यांची किष्किंदा नगरी ही हम्पीच्या जवळच आहे. या मंदिरातील अभिलेखात कृष्णदेवराय या मंदिराचा निर्माण केल्याचा उल्लेख आहे. या अभिलेखात अन्नलादेवी किंवा अम्नोलादेवी या राणीने दान दिल्याचाही उल्लेख आहे. या मंदिराची निर्मिती इ.स. १५१३ झाली. हजार राम म्हणजे इथे श्री रामाच्या हजार शिल्पांचे दर्शन होते म्हणून या मंदिराला हजार राम मंदिर म्हणतात. आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत शिरलो, प्रवेश व्दारावरील अभिषेक लक्ष्मीचे दर्शन घेतले. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर पाच थरांमधली शिल्प पाहतच राहीलो तिथे फोटो काढण्याचा मोह आवरेना. या सर्वांत खाली हत्ती आणि त्यावर स्वार त्यांचे माहूत यांची शिल्प कोरलेली होती, दुसऱ्या थरामध्ये घोडे आणि त्यांचे स्वार, तर तिसऱ्या थरामध्ये सैन्य कोरलेल आहे. सोबतच उंटाची शिल्पही दिसतात याच थरामध्ये वाद्य वाजवणाऱ्या लोकांची शिल्पे आहेत. चौथ्या आणि पाचव्या थरामध्ये स्त्रिया नर्तन करताना शिल्पांकित केलेल्या दिसतात. तसेच कृष्णलीलेतील काही प्रसंग या थरा मधे कोरलेली दिसतात..

मंदिर परिसरात प्रवेश केला. राम मंदिर हे पूर्वाभिमुख असून गर्भगृह, अंतराळ, मुखमंडप, दक्षिण आणि उत्तर दिशेला दोन अर्धमंडप अशी एकूण रचना केलेली दिसली. मंदिराच्या पूर्व दिशेला महामंडप तो खास विजयनगर शैलीतील स्तंभांनी सुशोभित केलेला आहे. या मंदिरांसाठी ग्रॅनाईट या दगडाचा वापर केला असून असून मंदिराचे शिखर विटामधे बांधलेले आहे. मंदिराच्या आतून बाहेरून प्रत्येक ठिकाणी रामायणातील प्रत्येक प्रसंग कोरलेला आहे. ही शिल्प पहाताना रामायण आपल्या डोळ्यासमोर उभे राहते..

या प्रसंगातील मला समजलेली काही शिल्प चित्र, दशरथ आपल्या चार पुत्रांसोबत म्हणजेच राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या समवेत बसलेले दाखवले आहे. सीता माता लक्ष्मणाला हरिण दाखवत आहे. रामाला वनवासाला पाठवून भरताचा राज्याभिषेक करावा यावर दोघी भाष्य करताना शिल्पांकित आहे. भरत भावाच्या वियोगाने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेऊन हात जोडून त्यांची पूजा करीत आहे. सीता माता अशोकवनात बसलेली आहे, सीतामाता हनुमानाला तिच्या बोटातील अंगठी देताना. भरतभेट, राम रावण युद्ध, शबरीची बोरे, राम हनुमान भेट, सीता स्वयंवर, असे अनेक प्रसंग सुंदर शिल्पांकित केलेले आहेत. प्रत्येक प्रसंग मी, संकेत व सुरज नळगुणे डोळे भरून पहात होतो. मंदिराच्या गर्भगृहात मुर्ती नसली तरी हजार राम शिल्पांनी मंदिर चैतन्यमयी दिसत होते. मंदिरातील खांब चिकन्या काळ्या रंगातील होते त्यावरही अनेक शिल्प कोरलेली दिसत होती. संपूर्ण मंदिर पहाताना रामायणातील प्रत्येक प्रसंग नजरेसमोर दिसत होता. लहानपणी दूरदर्शन वरील रामायण पहाताना जो भाव निर्माण व्हायचा आज तोच भाव प्रकट झाला होता. मंदिरातून बाहेर पडताना तुकोबारायांचा एक अभंग डोक्यात चमकून गेला..


राम म्हणे ग्रासोग्रासी! तोची जेविला उपवासी!!

धन्य धन्य ते शरीर! तीर्थाव्रंताचे माहेर!! 


राम म्हणे करिता धंदा! सुख समाधी त्या सदा!!

धन्य धन्य ते शरीर! तीर्थाव्रंताचे माहेर!! 


ऐसा राम जपे नित्य! तुका म्हणे जीवन्मुक्त!!

धन्य धन्य ते शरीर! तीर्थाव्रताचे माहेर!!


संदीप राक्षे✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१


Wednesday, 27 January 2021

महानवमी दिब्बा हंम्पी

 भारताच्या सुवर्ण वैभवाच्या पाऊलखुणा..

"महानवमी दिब्बा" हंम्पी कर्नाटक 

संदीप राक्षे ✍🏻


हंम्पी हे नाव ऐकले वाचले की अस वाटत की एखाद पर्यटन निसर्गरम्य स्थळ असाव. परंतू आध्यात्म व इतिहासाचा अनोखा संगम असलेलं हंम्पी हजारो एकर मधे तांबूस अजस्त्र दगडांच्या मधे हे विजयनगर आताचे हंम्पी वसलेलं आहे. ५०० पेक्षा जास्त पुरातन वास्तुंचे अवशेष हे इथले विशेष आहे. आम्ही आधुनिक हाॅस्पेट शहरातून जेव्हा हंम्पी मधे प्रवेश केला तेव्हा मला १४ व्या शतकात आलो असल्याचा भास झाला. वास्तु पुरातन आणि माणसं फक्त आधुनिक दिसत होती इतकाच फरक होता. केळी व नारळाच्या झाडांनी आच्छादलेलं हंम्पी मनाला खूपच भावलं. एक एक रहस्यमयी स्थळ पहात आम्ही महानवमी दिब्बा या अतीभव्य प्रांगणात पोहचलो, हा दिब्बा (व्यासपीठ) ओरिसाच्या गजपती राज्यकर्त्यांच्या विजयाच्या स्मरणार्थ राजा कृष्णदेवराय यांनी बांधला होता. इथे शाही प्राण्यांचे कार्यक्रम, युद्ध खेळ, वाद्य प्रदर्शन, जलचर खेळ असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या महानवमी दिब्बा येथे चालत असत ते पहाण्यासाठी राज परिवार, शाही पाहुणे व विदेशी पर्यटकांना बसण्यासाठी २५ फूट उंच व ८० फुट लांबी व रूंदी असलेला भव्य व्यासपीठ होते दूरनच त्याची भव्यता दिसत होती. आम्ही त्या व्यासपीठाजवळ गेलो, दगडावर पशू पक्षी नृत्य अशा अनेक नक्षीकामांनी चोहोबांजूनी सजवलेले व्यासपीठ पाहिले. व्यासपीठाच्या मागच्या बाजूला राजपरिवारासाठी भव्य पाय-या बनविल्या होत्या, त्या पाय-यांचे कठडे त्यावर कोरीव कामांचा अद्भुत नमुना दिसत होता, हत्ती, घोडे, योद्धा, नर्तक, संगीतकार यांचे कोरीव काम फारच सुंदर दिसत होते. पाय-या चढून आम्ही व्यासपीठावर पोहचलो, उंचावरून आजूबाजूचा परिसर सहज दिसत होता, समोरील प्रांगणातील माणस अगदी लहान दिसत होती. मनसोक्त फोटो काढून आम्ही व्यासपीठाच्या शेजारीच असलेल्या ग्रॅनाईटच्या एका ब्लाॅक मधून १२.५ मीटर लांबीच्या कुंडा जवळ पोहचलो हा कुंड नुकताच उत्खनातून उदयास आला होता. त्यातील पाणी कार्यक्रमाला आलेल्या जनतेसाठी वापरत असे, दगडी पाईप लाईनने ते पाणी जिथे जेवणाच्या पंगती बसत असत तिथपर्यंत ही दगडी लाईन गेलेली होती. आम्ही त्या पाईप लाईन कडेने चालत जिथे जेवणाच्या पंगती बसत होत्या तिथपर्यंत पोहचलो. तिथे गेल्यावर दगडी पत्रावळी पाहून थक्कच झालो, हजारो माणस एकावेळेस जेवायला बसतील असे दगडात कोरीव काम केलेल्या ताट वाटीचा मोठा खांब दिसल्या त्याच्या समोरून या दगडी पाईप लाईनने पाणी वहात जाई, जेवताना पाणी पिण्याची ती सोय पाहून ती कल्पना पाहून खरच त्या इतिहासातील कलाकारांना सलाम करावा वाटला. व्यासपीठाच्या मागच्या बाजूला दगडांचा भलामोठा दरवाजा पाहिला, हजारो टन वजनाचा दरवाजा   त्याचे नक्षीकाम नेत्रदीपक होते. अनेक अशी रहस्यमयी ठिकाण पाहून मी संकेत व सुरज नळगुणे पुढच्या रहस्यमयी ठिकाणाकडे निघालो..


संदीप राक्षे✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१


Tuesday, 26 January 2021

श्री विठ्ठल मंदिर हंपी

 भारताच्या सुवर्ण वैभवाच्या पाऊलखुणा..

"विजय श्री विठ्ठल मंदिर" हंम्पी कर्नाटक 

संदीप राक्षे ✍🏻


हरिहर आणि बुक्क या दोन महापराक्रमी भावांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना तुंगभद्रा नदीच्या काठी १४ व्या शतकात आपली भव्य दिव्य अशी राजधानीचे निर्माण केले. (विजयनगर म्हणजेच कर्नाटक राज्यातील बेलारी जिल्ह्यातील होस्पेट तालुक्यातील "हंम्पी") त्यानंतर कृष्णदेवराय यांनी अतिशय सुंदर रस्ते, भव्य मंदिरे, धर्मशाळा, किल्ले, कालवे, हस्तीशाळा, घोड्यांचे बाजार, कोरीव कामांची भव्य नगरीचे निर्माण केले. पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या सर्व वस्तू या विजयनगरीत मिळत असत, कस्तुरी हिरे मोती माणकं हत्ती घोडे अशा अनेक वस्तूचीं खरेदी विक्री या साम्राज्यात चालत होती. अजिंक्य असणा-या विजयनगर वैभवाचा विद्ध्वंस कुतुबशाह, आदिलशाह, निजामशाह व बरीदशाह यांनी एकत्रित हल्ला करून केला, आज जर पाहिले तर इथे फक्त भग्न अवस्थेतील अवशेष पहायला मिळतात त्यापैकी हे विजय विठ्ठल मंदिर अजून सुअवस्थेत इतिहासाची साक्ष देत आज ते जागतिक वारसा स्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहे.


कानडाऊ विठ्ठलु कर्नाटकु येणे मज लावियेला वेधु! 


या अभंगात संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्री विठ्ठलाच्या उत्पतीचा मागोवा घेतला आहे अभंग तर अर्थपुर्ण सुंदर आहेच पण आशयाच्या दृष्टीने ही बहुअर्थसूचक, शब्दांच्या पलीकडे जाऊन येणाऱ्या अनुभुती चं आकलन करुन देणारा आहे. विजयनगरचे सम्राट कृष्णदेवराय हे सुद्धा सावळ्या, साजिऱ्या श्री विठ्ठलाचे परम भक्त होते. त्यांनीच अद्भुत असे विठ्ठल मंदिर बांधले होते. एके दिवशी कृष्णदेवराय यांना स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला की मला इतके वैभव नको आहे. मी निर्गुण, निराकार, निर्मोही आहे साध्या भाजी भाकरीवर राजी असणारा, साधी धोटी, चिंधोटी लपेटणाऱ्या भक्तांचा आहे. तू मला पंढरपूरला स्थापन कर, तेव्हापासून कर्नाटक मधील विजय श्री विठ्ठल मंदिरात कोणतीही मुर्ती स्थापन केली नाही अशी आख्यायिका आहे.

                     माझा चिरंजीव संकेत व मित्र सुरज नळगुणे आम्ही तिघेजण ५७१ किलोमीटरचा प्रवास करून रविवार दि २४/१/२०२१ रोजी हंम्पीत पोहचलो रात्री मुक्काम करून सकाळीच सुर्य देवाचे दर्शन घेऊन ही अद्भुत नगरी पहाण्यास निघालो सोबत नेहमी प्रमाणे गाईड घेतला आम्ही सर्व प्रथम विजय विठ्ठल मंदिर पहाण्यास निघालो. मुख्य रस्त्यावरच गाडी पार्क केली तेथून एक किलोमीटर पायी चालत विठ्ठल मंदिराजवळ पोहचलो..

भव्य अशी कमान आजूबाजूला दगडी शिल्प कलेची कमाल दिसत होती. मंदिराच्या बाहेरच उजव्या बाजूला एक पुष्करणी आहे त्यात निळेशार पाणी आणि मधोमध कृष्ण मंदीर होते ते पाहून आम्ही मुख्यव्दारा जवळ पोहचलो, भव्य असे व्दार त्यावर सुंदर दगडावर नक्षीकाम केलेले अनेक देव देवतांची शिल्प कोरलेली. तेथून पुढे गेल्यावर श्री विठ्ठल मंदिराच्या समोरच ३० ते ३६  फुट उंचीचा कोरीव काम केलेला, अतिभव्य दगडी रथ उभा केलेला, एकाच दगडातून हा रथ तयार केलेला दिसत होता. बारीक पाहिले तर तो व्यवस्थित सांधलेला दिसत होता. रथाची अजस्त्र दगडी चाक त्यावरील अवर्णनीय कोरीव नक्षीकाम, रथाच्या दोन बाजूस दगडी हत्ती, 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल यांचे मुळ मंदिर हंम्पी येथील विजय विठ्ठल मंदिरच, कारण गरूड रथावरील श्री विठ्ठलाचे कोरीव शिल्प याची साक्ष देते आज तोच दगडी रथ ऐतिहासिक वारसा म्हणून जगप्रसिद्ध आहे. तेथून आम्ही मुख्य मंदिरात शिरलो भव्य मंदिर पाहून डोळे दिपून गेले, सारच अवर्णनीय होते. यासाठी खरच शब्दच नाहीत. आज संपूर्ण महाराष्ट्रात श्री विठ्ठलाची संगीताच्या माध्यमातून भक्ती व आराधना केली जाते तसेच, चौदाव्या शतकातील हंम्पी येथील श्री विठ्ठल मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे या मंदिरात ५६ खांब आहेत ते संगीतस्तंभ म्हणून ओळखले जातात, या स्तंभांना हातांनी वाजविल्या नंतर घट पखवाज या सारख्या तालवाद्यांचा आवाज येतो तसेच समधुर असे सप्तसुर ही या संगीतस्तंभातून वाजतात. प्रत्येक संगीत स्तंभास न वाजवता फक्त हात फिरवला त्यावरील नक्षीकाम डोळ्यांत साठवले व गर्भ मंदिरात गेलो तेथील दृष्य मन सुन्न करणारे होते कारण मुर्ती विना मंदिर अडगळ वाटत होते. गर्भ मंदिराच्या डाव्या बाजुला एक भुयारी बंदिस्त मार्ग दिसला तो प्रदक्षिणा मार्ग होता. संपूर्ण अंधारात मोबाईलच्या लाईनवर चालत राहीलो, प्रचंड गारवा जाणवत होता. खरच आध्यात्माची अनुभूती प्रदक्षिणा घालताना येत होती. उजव्या बाजुला दुसरा भुयारी मार्ग तेथून बाहेर पडलो. सभा मंडपातील कोरीव काम पाहून मंदिराच्या बाहेर पडलो. संपूर्ण मंदिर परिसर पाहिला.. आजूबाजूलाच अतिसुंदर मंदिर पाहिली..

मंदिराला लागूनच कल्याण मंडप आहे ज्याच्या खांबाची गणती करणे कठीण आहे प्रत्येक खांबावर विविध देवता व प्राण्यांची कोरीव अप्रतिम शिल्प, याच मंडपात राजघराण्यातील विवाह संप्पन्न होत असत..

मंदिराच्या मागील बाजूस मोडलेल्या खांबाचा तुटलेल्या मुर्तीचा ढिगारा होता तेथूनच कमलापूर गावाकडे जाण्याचा व्यापारी मार्ग दिसतो, तेथून आम्ही तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर गेलो नदीचे दर्शन घेऊन नदीच्या पाण्याने तोंड हातपाय धुतले उत्साह वर्धक असा निसर्ग पाहून दुस-या स्थळाकडे निघालो...


बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल!

करावा विठ्ठल जीवभाव!!

तुका ह्मणे देह भरिला विठ्ठलें!

कामक्रोधें केलें घर रीतें!!


संदीप राक्षे ✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१


सत्य संकल्पाचा दाता! आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा!

सत्य संकल्पाचा दाता! आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा.. संदीप राक्षे✍🏻 संत तोचि जाणा!  जो देही उदार!! म्हणजे खरा संत तोच ...