Saturday, 8 May 2021

नरनाळा अभयारण्य

 वन्यजीवांचे माहेरघर "नरनाळा अभयारण्य" 

संदीप राक्षे. ✍🏻


              चैत्र पाडव्याचा साडेतीन मुहूर्ताचा दिवस, माझ्यासाठी एक पर्वणीच घेऊन आला होता. नरनाळा किल्ला पाहून मी अभयारण्य पहाण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी शून्य होती. मी एकटाच पर्यटक व सोबत गाईड आणि फाॅरेस्ट शिपाई असे तिघेच जण नरनाळा अभयारण्याच्या परिसरात होतो. हीच संधी होती मनसोक्त हुंदडायची, जंगलाच्या निसर्गरम्य वातावरणात रमण्याची. पाय मोकळे करण्यासाठी थोडा गाडीच्या खाली उतरलो आणि गवतावर चालू लागलो. चालत असताना कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या कवितेच्या चार ओळी आठवल्या..


तरूवरची हसतात त्यास पाने 

हसे मूठभर ते गवतही मजेने 

वाटसरू वाट तुडवीत त्यास जात 

परी पाचोळा दिसे नित्य शांत..


असाच काहीसा भास मला येथील वातावरणात आल्यावर झाला. चैत्राची नवी पालवी फुटल्याने झाडावरची लुसलुशीत छोटी पानेही आज हसताना दिसत होती. आज वाराही मंद असल्याने पाचोळाही शांत होता. आवाज न करता. सुकलेले गवतही आनंदाने डूलत होते, बदललेल्या ऋतूंचे स्वागत करीत ताठ मानेने डोलत होते. या विचारात मग्न असतानाच सागाच्या वाळलेल्या पानांचा कर-कर आवाज येऊ लागला. मी आजुबाजूला पाहिले. तो पर्यंत गाईडने आवाज दिला, साहेब" ते पाहा सांबर. माझी नजर गाईडच्या बोटाच्या दिशेने वळली. भले मोठे मादी जातीचे सांबर उभे होते. गाईडने मला गाडीत बसण्यासाठी नजरेनेच खुणावले. मी क्षणाचाही विलंब न करता गाडीत बसलो. गाडीत बसून मी त्या सांबराचे मनसोक्त फोटो काढले. मला गाईड आणि शिपाई यांनी सक्त ताकीद दिली, या पुढे आपण गाडीतून उतरायचे नाही. कारण अशा प्राण्यांच्या मागावर हिंस्त्रप्राणी असतात. जंगल सफारीच्या सुरवातीलाच सांबराच्या दर्शनाने सुखावलो होतो. अरुंद रस्त्याने आम्ही धारगडच्या दिशेने निघालो होतो. वाटेत जाताना फुलपाखरं, विविध पक्षी न्याहाळत होतो. मोर-लांडोर तर क्षणाक्षणाला दिसत होते, पण ते आमच्या वा-यालाही थांबत नव्हते. कितीतरी वेळा फोटो काढण्यासाठी मोबाईल हातात घेतला की गायब. सतत निराशा व्हायची, पण नेत्रसुख मिळायचे हे महत्वाचे. एका कड्याच्या ठिकाणी, गाईडने गाडी उभी करायला सांगितली. गाडीतून आम्ही खाली उतरलो. कड्याच्या काठावरून गाईडने खाली पहायला सांगितले. इतका सुंदर देखावा पाहून मी थक्कच झालो. एका पाणवठ्यावर हरणांची जोडी आपल्या पाडसा समवेत पाणी पीत होती. आमची जास्त हालचाल चटकन त्यांच्या लक्षात आली. ते पाणी प्यायचे सोडून तिघेही आमच्याकडे पाहू लागले. बराच वेळ आमची नजरानजर झाली. त्यातले एक हरीण ओरडायला लागले. आम्ही आल्याचा संदेश कदाचित ते इतर प्राण्यांना देत असावेत. आम्ही गेल्याशिवाय ते पाणी पिणार नाहीत हे मलाही जाणवले. पुन्हा एकदा मन भरून त्या हरणाचे कुटुंब पाहिले आणि मागे सरलो. पुन्हा गाडीत येऊन बसलो आणि नलदमयंती तलावाच्या जवळ पोहचलो. तिथेही सांबरांच्या दहा-बारा जोड्या मस्त लुसलुशीत हिरवे गवत खाताना नजरेस पडल्या. ते मनोहारी दृष्य पाहून पुढे निघालो. जरा दाट जंगल लागले होते आणि वाट जरा अरुंदच होती, अचानक झाडीतून चार रानडुक्करांची झुंड गाडीला आपले शरीर घासून पुढे निघून गेली, खरंतर मला तो एक प्रकारचा दमदाटीचा प्रकारच वाटला. "जानेवालो जरा होशियार यहा के हम है राजकुमार" अशा तो-यात जाणारी ती झुंड दिसेनाशी होईपर्यंत गाडी बंद ठेवून पहात होतो. ते जाई पर्यंत मनात खूप भिती होती. त्यांचे सुळे दात पहातानाच माझी दातखिळी बसली होती. तशातही एकाचा फोटो मी टिपलाच. तेथून थोडे अंतर कापल्यानंतर रस्त्यावरच भले मोठे सांबर उभे होते, जोरात ब्रेक दाबून गाडी थांबवली. दहा ते पंधरा मिनिटं ते रस्त्यावरून हललेच नाही. ते आमच्याकडे पाहात आणि आम्ही त्यांच्याकडे पाहात राहिलो. बराच वेळ ते रस्ता अडवून उभे होते. काही वेळाने ते बाजूच्या झाडीत गेले आणि आमचा रस्ता मोकळा झाला. त्यानंतर गुलरघाटाकडे चला असे गाईडने सांगितले. गाडी वळवली आणि गुलरघाटाकडे निघालो. जिथे वाघांचे साम्राज्य आहे. दुपारच्या वेळेस ते तेथील तलावात भिजण्याचा आनंद घेत असतात. असे फाॅरेस्ट शिपायाने सांगितले. ते ऐकून जरा मनातून चरकलोच. गुलरघाटाच्या मुख्य गेटवर गाडी थांबवली आणि "तलावाकडे लक्ष दया" असे गाईडने सांगितले. तोपर्यंत तलावातून एक प्राणी जमिनीकडे झेपावून दिसेनासा झाला होता. खूप दूरचे अंतर असल्याने नेमके काय होते हे सांगता येणार नाही, पण नक्कीच वाघ किंवा बिबट्या असणार याची खात्री दोघांनी पण दिली. अभयारण्यात फिरताना ससा, कोल्हा, रान कोंबडा, अस्वलांच्या पायांचे ठसे पहायला मिळाले. 

                   एकदा केरळच्या जंगल सफारी साठी गेलो असताना अनुभवास आले, तिथे सफारीसाठी एका माणसाचे प्रत्येकी तीन हजार आकारले जातात.  दिवसभर फिरूनही त्या जंगलात साधी खारूताई पण दिसत नाही. त्याउलट महाराष्ट्रातील ही अभयारण्ये म्हणजे वेगवेगळ्या जातींच्या पक्षी व प्राण्यांचा मेळाच. ख-या अर्थाने आजची सफर सफल झाली होती.        

            अशावेळी निसर्गकवी राजकिशोर सुनानी, ओरिसा, यांच्या कवितेची आठवण झाली. निसर्गाला भगवान मानणारे हे कवी आपल्या कवितेत सांगतात. भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, वा म्हणजे वायू,  न म्हणजे नीर. असा हा भगवान आपणही पुजायला हवा. त्याचे रक्षण करायला हवे.


(त्यांची ही भाषांतरीत कविता)


ही माती आम्हाला देते हिरवाई, 

झाडं आणि कंद आणि फळं...

या नभातून मिळतो पाऊस आणि झऱ्यांचं पाणी...

पाणी जणू काही आईचा पान्हा

हा पान्हाच आमची भागवतो तहान..

मित्रांनो, डोंगर, झरे, जंगल आणि जमीन आमचा हा भगवान...!


संदीप राक्षे✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१


रायगड एक विद्यापीठ

 *रायगड*....

*एक मोहीम*...

*शिव विद्यापीठाची*....

*संदीप राक्षे* ✍🏻


रायगड हे *वैश्विक* महातिर्थ आहे.

स्वातंत्र्य सैनिकांची काशी, गया, वाराणशी आहे...

महाराष्ट्राच्या संस्कृतीची ती *गंगोत्री* आहे.

पुरूषार्थ आणि पराक्रम यांचे ते *प्रेरणास्थान* आहे..

गो.नि दांडेकर.


निसर्गरम्य खेड तालुका, या  व्हाटसअप गृपवर खलिता मिळाला की, दि. ४/१/२०२० रोजी *रायगड मोहीम* राबवायची आहे. असा अध्यादेश या मोहिमचे सेनापती किशोर राक्षे, रोहीत बोरूडे, वर्षा चासकर यांनी काढललेला दिसला. त्या आदेशाला भरपूर प्रतिसाद मिळाला. अनेक मावळ्यांनी हिरिरीने सहभाग घेतला. त्यामध्ये अजित आरूडे, अशोक कोरडे, गुंडाजी जीवना, संतोष भोसले, कांचन  लांघी, सुप्रिया म्हसे, दिपाली जीवना, प्रतिक्षा शिंदे, दिगंबर शिंदे, विकी हुरसळे, सुप्रिया पिंगळे, उषा होले, बबन होले, अंकिता कहाने, सायली कहाने, गौरी राऊत, काजल दौडकर, नाजुका शेडगे, मयुर गोपाळे, पुजा सावंत, अक्षय भोगाडे, योगेंद्र आंबवणे, रविंद्र भोगाडे, रेश्मा भोसले, वैशाली भोसले, ॠषी गोरे, सुरज नालगुणे, दुर्योधन लवटे, प्रगती गोपाळे, योगेश उभे, अभिनव आरूडे, आदित्य कोरडे, शौर्य पिंगळे या सर्वांनी मोहिमेवर जाण्याचे ठरविले.           

ठरलेल्या वेळेवर सर्व मावळे जमले आणि गाडी सुसाट रायगडाच्या दिशेने मार्गस्थ झाली.

                  भल्या पहाटेच श्रीमान रायगडाच्या पायथ्याशी पोहचलो. निरव शांतता होती. कडक थंडीच्या गारठ्याने अंगात हुडहुडी भरत होती. सुर्यदेवाने संपूर्ण डोंगराईवर सुवर्ण प्रकाशाचा पदर पसरला होता. संपूर्ण  परिसर राजमाता जिजाऊ, छ. शिवराय, व छ. संभाजी महाराजांच्या नावाच्या जयजयकाराने दुमदुमून गेला होता. तो जयघोष अंगावर शहारे निर्माण करीत होता, कारण जगाच्या इतिहासात मराठ्यांचा इतिहास अद्वितीय असा आहे. मराठ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्ययुगीन भारताच्या इतिहासात नवे पर्व सुरू केले होते. स्वराज्याचेच नंतरच्या काळात विशाल साम्राज्यात रुपांतर होऊन हिंदुपदपादशाही असे नाव त्यास प्राप्त झाले होते. भारतातील सर्वांत शक्तिशाली सत्ता म्हणून मराठ्यांचे साम्राज्य ओळखले जात होते. संपूर्ण जगातील सेनानायकाच्या क्रमांकात छ. शिवाजी महाराजांचे स्थान प्रथम दर्जाचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्षातून स्वराज्याचे सुराज्य घडवून रयतेला स्वातंत्र्य सुख मिळवून दिले होते. जीवाची पर्वा न करता अनेक मोहिमा फत्ते केल्या. या सर्व गोष्टींना रायगड साक्षी होता. याच रायगडावर राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने इथली भूमी पवित्र झालेली आहे. इथल्या मातीत पसरलेल्या शौर्याच्या गंधानेही देह पवित्र होतो. हीच सदभावना रायगड चढताना मनाला उभारी देत होती. 

        रायगडाचे प्राचीन नाव रायरी असे होते. हा गड समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर म्हणजे अंदाजे २७०० फूट उंचीवर आहे. गडावर पोहोचण्यासाठी १४०० पायऱ्या चढून जावे लागते. छत्रपतींनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायगडास वेढा घालून रायगड ताब्यात घेतला. कल्याणच्या सुभेदार मुल्ला अहमद याला चारीमुंड्या चीत करून लढाईत काबीज केलेल्या खजिन्याचा गडाच्या पुनःर्उद्धाराच्या कामी लावला. रायगडाची जागा अवघड ठिकाणी असल्यामुळे तसेच ते सागरी दळणवळण व सुरक्षिततेच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे छत्रपतींनी गडाची राजधानी म्हणून निवड करून गडाची रचना हिरोजी इंदुलकरांकरवी त्या दृष्टीने करवून घेतली. गडावर राजसभा, राजनिवास, न्यायसभा, कल्याणसभा, विवेक सभा, दारु कोठारे, अंबरखाने, मंत्र्यांची निवासस्थाने, कचेऱ्या, नगरपेठ, किर्तीस्तंभ, तलाव, मंदिरे, खलबतखाना, हत्तीशाळा, अश्वशाळा, वस्त्रागार, रत्नागार, जगदीश्वर मंदीर, या सुविधांबरोबरच गडाच्या संरक्षण व्यवस्थेतील कडे तासणे, तटबंदी बांधणे, महाद्वार आणि बुरुज, चोरवाटा उभारणे यासाठी आपले कसब पणाला लावले होते.

                चित्त दरवाजाची पहिली पायरी दिसताच नतमस्तक झालो. क्षणभर डोळे मिटले. निरव शांततेत जगदंब, जगदंबचा मंत्रोच्चार कानातून मनात साठवू लागलो. आपसूकच स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांची अविस्मरणीय भुमिका साकारणारे शंतनु मोघे यांची शिवराय साकारणारी मुर्ती डोळ्यासमोर उभी राहीली. या मालिकेतील छ. संभाजींची भूमिका साकारणारे डाॅ. अमोलजी कोल्हे यांच्या सह प्रत्येक भुमिकेतील पात्रे इतिहास डोळ्यासमोर जिवंत साकारतात. या सा-यांचे आभार मानावे तितके थोडेच.

                आता आम्ही सर्वजण मुख्य दरवाजा जवळ पोहचलो. मुख्य दरवाज्याच्या बाहेरील दोन्ही बाजूस हत्ती आणि कमळाच्या सुंदर शिल्पाकृती कोरलेल्या दिसल्या. तसेच दोन्ही बाजूस भव्य बुरूज, पहारेकऱ्यांसाठी आणि संरक्षकांसाठी देवड्या आणि टकमक टोकापासून ते हिरकणी बुरूजापर्यंत भक्कम तटबंदी बांधलेली रांग दिसली. गजशाळेतून येणा-या हत्तींच्या पिण्याच्या पाणाच्या सोईकरिता मुख्य दरवाज्यापासून थोडे  वर चढून गेल्यावर हत्ती तलावाची बांधणी केलेली दिसली. हत्ती तलावापासून गंगासागर तलाव नजरेस पडला. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर आणि नद्यांची आणलेली तीर्थे याच तलावात विसर्जित केलेली होती. त्यामुळेच या तलावाचे नाव गंगासागर असे रूढ झाले. गडावर आजही या पाण्याचा उपयोग केला जातो. संपूर्ण तलावाला वेढा घालून आम्ही शिरकाई देवीचे दर्शन घेऊन होळीच्या माळावर पोहचलो आणि शिवकालिन शिमग्याचा सण डोळ्यासमोर उभा राहिला. शिमग्याला धगधगत्या होळीतून नारळ बाहेर काढणा-या शूरवीर मावळ्याला छत्रपतींच्या हस्ते सोन्याचे कडे भेट म्हणून दिले जाई. होळीतून नारळ काढण्याच्या प्रयत्नात अनेकांना अपयश आले. शंभूराजांनी मात्र सोन्याचे कडे मिळविण्याचा मान मिळवला. हे हृदयस्पर्शी चित्र आठवताना मन भरून आले. होळीच्या माळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनास्थ मुर्तीचे मनोभावे दर्शन घेतले. फोटो काढले आणि पुढे राणीवसा, सदर, राजभवन, राजसभेच्या ठिकाणाकडे प्रस्थान केले. आत शिरताच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्याठिकाणी झाला त्या सभामंडपाच्या मध्यभागी पोहोचलो. समोरच २२० फुट लांब व १२४ फुट रूंद अशी पूर्वगामी सिंहासनाची जागा दिसत होती. ६ जून १६७४ शिवराज्याभिषेकाचा तो दिवस, बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन, साक्षात छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झालेले, शेजारी शंभूराजे आणि राजमाता जिजाऊ, सिंहासनाच्या सभोवार हातांत सुवर्णकलश घेतलेले प्रधान आठ दिशांना उभे राहिलेले, पूर्वेला मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे हाती सुवर्णकलश घेऊन, दक्षिणेस सेनापती हंबीरराव मोहिते दुधाचा रौप्यकलश घेऊन, पश्चिमेस रामचंद्र नीलकंठ पंडित अमात्य दही दुधाने पूर्ण भरलेला तांब्याचा कलश घेऊन, उत्तरेस छंदोगामात्य प्रधान रघुनाथ पंडितराव मधु सुवर्णकलश घेऊन, तसेच आजूबाजूला मातीच्या कुंभात सप्तसागर आणि महानदयांचे पाणी भरून ठेवलेले, हातात छत्री धरून सचिव अण्णाजी दत्तो पंडित, पक्वान्‍नांची थाळी हाती घेतलेले सुमंत जनार्दन पंडित, न्यायाधीश बाळाजी, पंडीत मंत्री, महामंत्री, पाहुणे आसनस्थ झालेले, एकीकडे गागा भट्टांचा मंत्रोच्चार सुरू असे अगम्य सोहळ्याचे क्षणचित्र काही क्षण मनपटलावर राज्याभिषेकाच्या यज्ञकुंडातील ज्वांलांसारखे धगधगत असल्याचा भास झाला आणि मंत्रोच्चार पूर्ण होताच कवी भुषणांचे छत्रपतींचे अंगावर शहारे आणणारे गुण गौरवास्पद काव्य कानावर आले.


इन्द्र जिमि जंभ पर, बाडब सुअंभ पर

रावन सदंभ पर, रघुकुल राज हैं!

पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर

ज्यौं सहस्रबाह पर राम द्विजराज हैं!!

दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर

भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं!

तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर

त्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज है!!

जय भवानी जय शिवाजी!!


सभामंडपाचे प्रत्येक दालन कधी हाताने, कधी नजरेने स्पर्शून प्रत्येकाच मन भारावून गेले आणि जय भवानी जय शिवाजीचा गजर कानावर आला आणि मी भानावर आलो. सभामंडपातून बाहेर जावे असे वाटत नव्हते जड अंतःकरणाने सभामंडप सोडला. सभामंडप सोडून मागच्या बाजूने धान्याचे कोठार, खलबतखाना व टाकसाळ यांना वळसा घालून खाली उतरलो. बाजारपेठ लागली सूर्य माथ्यावरून खाली सरकू लागला होता. लांबून येणा-या व्यापा-यांच्यासाठी भोजनाची बैठक व्यवस्था याच ठिकाणी केलेली असावी असे उद्गार समुहातील कोणीतरी काढताच सर्वांनाच भुकेची जाणीव झाली आणि भोजन आटपून घेतले आणि पुढे बाजारपेठेकडे निघालो. बाजारपेठेचा विस्तार भव्य असून रुंद रस्ते, दुर्तफा दुकाने, प्रत्येक दुकानास माल साठवण्याकरीता मागे दोन खोल्या आणि खाली तळघर. सारे कसे एका दोरीत दिसत होते. दुकानांची उंची इतकी होती की घोड्यावर बसल्या बसल्या सहज माल खरेदी करता आला पाहिजे अशी रचना केलेली. बाजारपेठ पाहून झाल्यावर आम्ही सर्वजण टकमक टोकाकडे निघालो. बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरलो, जाताना मध्येच एका दारूच्या कोठाराचे अवशेष नजरेस पडले, ते पहात पहात जसजसे टोकाकडे जावे तसतसा रस्ता निमुळता झाला. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा दिसला. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगून सर्वांना फोटोत टिपले. टकमक टोकावरती कडेलोट करणा-या गुन्हेगारांना शिक्षा जरी सुनावली तरी त्यांची अवस्था किती भयानक होत असेल हे टकमक टोक पाहिल्यावर कळले. टकमक टोकाकडून आम्ही आता जगदिश्वराचे दर्शन घेऊन मंदिराच्या मागच्या बाजूला येवून छत्रपतींच्या समाधी स्थळाकडे वळलो. महाराजांचा मृत्यू ३ एप्रिल १६८० रोजी झाला. समोरच समाधीच्या अष्टकोनी आकारातील चौथ-यावर घुमटकार बांधणी केलेल्या समाधीचा जिर्णोद्धार १९२६ साली केल्याची नोंद पाहीली. सर्वांनी आपल्या छत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेतले. कितीतरी उन, वादळे, पाऊस अशा नैसर्गिक संकटांना झुंज देऊन ही समाधी निर्धास्त पणे आजही उभी आहे. एका मानवी नितीमुल्यांची मुर्तिमंत खाण याच ठिकाणी गुप्त झाली होती. भावनाविवश झालेले मन सावरले आणि हा रायगड किल्ला ज्यांनी बांधला ते हिरोजी इंदलकरांच्या पायरीचे दर्शन घेतले. दर्शन घेऊन आता परतीचा प्रवास जवळ आल्याची जाणीव झाली.


जो जो या महाराष्ट्र भूमीत जन्मला,

शिवशंभूच्या विचारांचा पाईक झाला.

एकदा तरी याचि डोळा याचि देही

महातिर्थ, महाविद्यापीठ रायगड पहावा..


राजमाता जिजाऊंची महती सर्वश्रुत आहेच. त्यांच्या कीर्तीचा सुगंध अखंड भारतवर्षात तसेच संपूर्ण जगतात सदैव दरवळत आहे. तो तसाच दरवळत राहील. तेजस्वी व अफाट बुद्धीमत्ता असलेल्या जिजाऊंचे पाचाड येथील समाधी स्थळावर जाऊन दर्शन घेतले आणि निसर्गरम्य खेड तालुका आयोजित रायगड मोहिमेची सांगता करण्यात आली...

मोहीमेची जरी सांगता झाली तरी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याच पराक्रमाच्या शौर्याच्या चर्चा सुरू होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वगुणसंपन्नता, विचार आचारांचे अधिष्ठान, देदीप्यमान कार्यकर्तृत्व, ध्येयाबद्दल आसक्ती, दूरदृष्टी, समाजसंघटित ठेवण्यासाठी संघटन कौशल्य, अशा कैक रत्नांचे भांडार म्हणजे शिवरायांचे व्यक्तीमत्व. हे व्यक्तिमत्व ज्याला उमजले, समजले, उलगडले, त्याचे समाजातील स्थान कोणीच हलवू शकत नाही. त्याला हरवू शकत नाही. किती किती थोरवी वर्णावी, किती गुणगान गावं आपल्या या शिवबांचं..! आजही पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंग्लंड, अमेरिका, जपान, मॉरिशससारख्या राष्ट्रांमध्ये राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात संदर्भासाठी छत्रपती शिवाजी महाराज शिकविले जातात. कुणाही राष्ट्राभिमानी माणसाला प्रभावीत करणारे असे हे आमचे महाराजे, छ. शिवरायांचे कर्तृत्व एवढे अफाट आणि उंच आहे की, त्यापर्यंत पोहोचणे अशक्यच आहे. तरीही त्यांच्या सावलीत राहून स्वतःचा उद्धार करवून घेणे सहज शक्य आहे. म्हणूनच आजच्या घडीलाच नव्हे तर येणा-या पिढय़ांनाही छ. शिवाजी महाराज कळायला हवेत. कारण छ. शिवाजी महाराज ही केवळ एक व्यक्ती नसून तो विचार आहे, सिद्धांत आहे, आणि सिद्धांत हा कधीही कालवश होत नाही. शिवाजी महाराज आजही अजरामर आहेत आणि जोपर्यंत ही पृथ्वी, हे सुर्य-चंद्र, तारे आहेत तो पर्यंत अजरामर राहतील. 


शिवरायांचे आठवावे स्वरुप!

शिवरायांचा आठवावा साक्षेप!

शिवरायांचा आठवावा प्रताप!

भूमंडळी!!


जय भवानी जय शिवाजी...


संदीप राक्षे ✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१


Wednesday, 21 April 2021

होळकर वाडा काठापूर

 सातबा-याच्या काटेरी कचाट्यात अडकलेली मल्हारराव होळकरांची "दुर्लक्षित" ऐतिहासिक वास्तू, काठापूरचा वाघवाडा. 

संदीप राक्षे✍🏻


सुंदर कलाकृती पाहूनी

आज मी धन्य झालो

दगडाच्या काळजाचे 

गाव मी पाहूनी आलो..


तीन चार दिवसापूर्वी फेसबुकला काठापूर ता. आंबेगाव जि पुणे येथील मल्हारराव होळकर यांनी बांधलेला वाघ वाडा ही पोस्ट व फोटो पाहिले, त्या पोस्ट मधील ऐतिहासिक वास्तूंचे फोटो पाहिले अन तीच वास्तू पहाण्याचा मोहच जडला, तीव्र इच्छा झाली. दिवस, रात्र, ध्यानी, मनी तीच वास्तु आठवू लागली. नजरेसमोर वारंवार दिसू लागली. आता ती वास्तू साक्षात पाहिल्याशिवाय काहीच गत्यंतर नव्हते. इकडे सारखा भटकतो म्हणून प्रत्येक जण मला लेक्चर देत होता. आता महिना दोन महिने तरी कुठे फिरायचे नाही, असा निर्धार केला होता. पण आठ दिवसही नीट गेले नाही. माझा निर्धार मीच मागे घेतला, अन सोबत मारूती तायनाथ यांना आळंदीतून घेऊन आंबेगावचा रस्ता धरला. शेल पिंपळगाव मार्गे कन्हेरसर, पाबळ, खडकवाडीहून आम्ही काठापूरला पोहचलो. आंबेगाव तालुका शेती उत्पन्नाच्या बाबतीत अग्रेसर असणारा तालुका, त्यामुळे इथले सर्व शेतकरी बंधू भरपूर श्रीमंत, कॅनलचे पाणी आणि घोडनदीच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पाटाला पाणीच पाणी दिसत होते. हिरव्यागार शेतीमुळे वातावरण प्रफुल्लित दिसत होते. काठापूरच्या वेशीत पोहचलो भव्य अशा कमानींने आमचे स्वागत केले. दगडातील भव्य प्रवेशद्वार त्याला लाकडी दरवाजे परंतु प्रवेशद्वाराचा मधला भाग पडून गेल्याने दोन बाजूला विभक्त अशी कमान पाहून आम्ही मारूती मंदिराजवळ आलो तिथे गाडी लावली. अन पायी पायी भुईकोट गडाकडे निघालो. वाड्याच्या जवळ आलो तर प्रवेशद्वारात आक्राळ विक्राळ सुबाभळीने संपूर्ण प्रवेशद्वार अडवलेले, एका बुरूंजाच्या कडेकडेने येड्या बाभळीच्या फांदया चुकवत चुकवत कसा तरी वाड्यात प्रवेश मिळवला, वाडाच्या आतले दृष्य पाहून तर खालीच बसलो, संपूर्ण वाड्यात येड्या बाभळी व टणटणीची झुडप थोडी सुद्धा जमीन दिसत नव्हती. बुट असूनही काटे टोचत होते. हळुहळू पाय टाकीत वाड्याच्या मध्यभागी आलो. काही ठिकाणी अरुंद असे खंदक होते त्यातून डोकावल्यावर तळघर व त्यांचे नक्षीकाम दिसत होते. छोटी छोटी भुयार दिसत होती तळघरात जाण्याचा मार्ग दिसायचा, नक्कीच अद्भुत असे काहीतरी खाली पण असणार याची खात्री होती. वरचे वातावरण पाहूनच पुढे जाण्याचे धाडस होईना. मनात सारखा एकच प्रश्न उद्भवत होता. इतकी अद्भुत ऐतिहासिक वास्तू अन तिची ही दूरवस्था कशामुळे झाली असेल. गाव इतके जवळ असूनही वाड्यात जायला रस्ता सुद्धा नाही. गावातले चिटपाखरू पण या वाड्यात फिरकत नसावे याची जाणीव हे सारं दृष्य पाहून झाली. चारीबाजूनी भव्य बुरूंज ते सुस्थितीत होते. वाड्याच्या प्रवेशद्वारावरील घडीव दगडांचे काम व्यवस्थित होते. हिंदवी स्वराज्याचे सरदार मल्हारराव होळकर यांनी हा वाडा १७५० साली बांधला होता. पानीपतच्या युद्धात सरदार संताजी वाघ हे मरण पावले त्यानंतर हा वाडा मल्हारराव होळकर यांनी १७६५ साली सरदार संताजी वाघ यांच्या वंशजांना दिला. त्यानंतर ते आजपर्यंत हा वाडा वाघ वाडा म्हणुन प्रसिद्ध झाला. इतक्या मोठ्या वैभवाची साक्ष सांगणारा हा वाडा आज ख-या अर्थाने धारातीर्थ पडला आहे. अखेरचा श्वास घेत आहे. आज अशा वास्तू खूप दुर्मिळ आहेत हेच आपल्या लक्षात येत नाही हे खरच दुर्दैव आहे. वाड्याची ती दयनीय अवस्था पाहून दु:खद अंतःकरणाने वाड्याच्या बाहेर पडलो.  काही अंतरावर एक समाधी मंदिर आहे ते पाहिले तेथून आम्ही विष्णू व रुक्मिणी अशी दोन वेगवेगळी मंदिर आहेत तिथे आलो. ती दोन्ही मंदिर अशीच झाड झुडपांनी वेढलेली नजरेस पडली. समोरच्या बाजूला जाई पर्यंत आम्ही मंदिराकडे लक्ष दिले नाही. मंदिराच्या समोर आलो अन मंदिर पाहून अवाकचं झालो. पृथ्वीवरही स्वर्गातली मंदीर आहेत याची जाणीव झाली. नेत्रदीपक अशी कलाकुसर पाहीली अन माझा माझ्याच डोळ्यावर विश्वास बसेना, मंदिराच्या पाय-या चढून प्रवेशद्वारात आलो, अन क्षणभर डोक्याला हात लावून खालीच बसलो. किती सुंदर मंदिर किती अप्रतिम कलाकुसर, तरी पण या मंदिरांच्याकडे त्या वास्तुकडे येथील स्थानिकांचे इतके दूर्लक्ष, या ऐतिहासिक वास्तुंची इतकी भयानक विटंबना पाहून डोळे पाणावले, तिथेच मुटक मारून त्या दगडावरील कोरीव कलाकुसरीकडे पहात शांत बसलो. भावनांना आवर घातला, पुन्हा उठलो त्या प्रत्येक नक्षीकामांवर कोळ्यांच्या जाळ्यांनी वेढा घातला होता. शक्य तेवढ्या जाळ्या काढल्या. पाषाणावरील कोरीव काम लाकडांवर कोरल्या सारखे दिसत होते. अनेक फुलांची नक्षीकाम त्या मंदिरावर कोरले होते, मंदिराच्या चारी बाजूंनी कोरलेले खांब मंदिराचे सौंदर्य वाढवित होते.  मंदिराच्या गाभाऱ्यात भग्न अवस्थेत काही मुर्ती पडल्या होत्या. दोन्ही मंदिरात मुख्य मुर्ती नव्हत्या, रुक्मिणी मातेच्या मंदिरात अलिकडच्या काळात दत्त महाराजांची मुर्ती बसवलेली दिसत होती. मंदिराच्या कळसावरील काही भाग जीर्ण झाल्याने काही पडलेला आहे. साक्षात विश्वकर्माने ही मंदिर साकारली असावीत याचा वेळोवेळी प्रत्यय ही मंदिर पहाताना येत होता. मंदिर पहात असताना तेथून काही गावकरी चालले होते त्यांना थोडे हटकवले अन मंदिराच्या विषयी विचारले पण प्रत्येकाने तिरस्कार भावनेने उत्तर दिले. आमच्या काहीच लक्षात येईना. याच वास्तु दुसरीकडे असत्या तर जागतिक ऐतिहासिक स्थळ म्हणून जगप्रसिद्ध झाले असते. इथल्या स्थानिकांची या स्थळांबद्दल ही प्रतिक्रिया म्हणजे कुठेतरी सातबा-यात ही ऐतिहासिक वास्तु अडकल्याचे लक्षात येते. एखादयाच्या नावावर हा सातबारा असणार आणि तो या वास्तुवर हक्क सांगत असणार. जोपर्यंत या वास्तू जमीनदोस्त होत नाही तोपर्यंत हा मालक वाट पहाणार एकदा जमीनदोस्त झाल्या की फुकायला मोकळा, नक्कीच ही मानसिकता असणार, नाहीतर इतक्या भव्य वास्तु दुर्लक्षित राहूच शकत नाही. खरतर स्थानिक पुढारी व युवा कार्यकर्त्यांनी या पवित्र वास्तु जतन करायला हव्यात, यासाठी सरकार दरबारी आंदोलन करायला हव, अशा दुर्लक्षित वास्तुंच्या मालकी हक्क सांगणा-यांना कुठेतरी फुटकळ जागा देऊन या ऐतिहासिक वास्तू सोडवायला हव्यात. याच परिसरात एक श्रीमंत साखर कारखाना आहे, त्यांनी ही ऐतिहासिक वास्तु दत्तक घेऊन जागतिक ऐतिहासिक व पर्यटन स्थळ निर्माण करायला पाहिजे. घोडनदीच्या किनाऱ्यावरील ही ऐतिहासिक वास्तू पर्यटनास चालना देणारी आहे. त्याच बरोबर हा ऐतिहासिक ठेवा पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शन करणारा ठरायला हवा. आज अब्जो रूपये घालविले तरी अशा वास्तू तयार होणार नाहीत. आज आपण पहातो करौडो रू खर्च करून सिमेंटची मंदीर आपण उभी करीत आहोत. दगडावरची कलाकुसर करणारा आज कोणीच मायका लाल या पृथ्वीतलावर जिवंत नाही. म्हणून या वास्तुतरी जिवंत ठेवायला हव्यात. महाराष्ट्रातील अशा दुर्लक्षित पुरातन वास्तूंचे महाराष्ट्रातील प्रत्येक जण वारसदार आहे. आपण स्वतः वारसदार समजूनच या ऐतिहासिक वास्तूंचे जतन, संगोपन करायला हवं.

माझी कळकळीची विनंती आहे आंबेगावकरांना आपल्या भागातील हे वैभव, हा ऐतिहासिक ठेवा वाचवा त्याचे जतन करा...


संदीप राक्षे ✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१


Thursday, 4 March 2021

बगलामुखी देवी

 माझी सहल "हिमाचल" 

भक्तांचे संकट निवारण करणारी माता "बगलामुखी देवी". संदीप राक्षे✍🏻


ज्वालादेवीचे दर्शन घेऊन आम्ही माता बगलामुखी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी निघालो. हे मंदिर ज्वालादेवी पासून २५ किलोमीटर अंतरावर पठाणकोट रस्त्यावर  घनदाट जंगलात कौटला पर्वताच्या पायथ्याशी आहे..

हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्हय़ातील वनखंडी गावातील माता बगलामुखी मंदिर हे ऋषी मुनींच्या तपश्चर्येची पवित्र भूमी आहे.

आपल्या सृष्टीचे निर्माते ब्रम्हदेवांचा ग्रंथ एका राक्षसाने चोरला व तो पाताळात जाऊन लपून बसला, त्या राक्षसाला एक वरदान होते ते असे की त्या राक्षसाला पाण्यात देव किंवा मानव पाण्यात त्याला मारू शकत नव्हते. त्यामुळे ब्रम्हदेवाने माता भगवती यांची आराधना केली त्यामुळे भगवती देवी बगळ्याच्या रूपात प्रकट झाली. व तिने त्या पाताळात लपलेल्या राक्षसाचा वध करून ब्रम्हदेवांना तो ग्रंथ पुन्हा मिळवून दिला. त्यानंतर पांडवानी सुद्धा या बगलामुखी देवीची खूप आराधना केली आहे. लढाईत जिंकण्यासाठी व शक्ती प्राप्त करून घेण्यासाठी विशेष पुजा केल्याचा उल्लेखही येथील दगडावर कोरलेल्या शीलालेखावरून समजतो. अज्ञात वासात असताना पांडवांनी माता बगलामुखीचे हे मंदिर एका रात्री बांधलेले आहे.

बगलामुखी देवीला माता पिंताबरी या नावाने सुद्धा ओळखले जाते, कारण देवी हळदीच्या पाण्यात प्रकट झाली होती. त्यावेळेस त्या संपूर्ण पितरंगाच्या म्हणजे पिवळ्या रंगाच्या दिसत होत्या म्हणून देवीला पिवळा रंग खूप पसंत आहे. पिवळी कपडे, पिवळी फुल हे देवीला विशेष करून आवडतात.  या देवीच्या दर्शनाला इंदिराजी गांधी, प्रणव मुखर्जी, प्रल्हाद मोदी, अमर सिंह, राज बब्बर, गुरुदास मान, गोविंदा असे अनेक सेलेब्रिटीज या मंदिराला भेट देऊन गेले आहेत. अनेक विधी करून संकट नाश, धन दौलत पैसा यासाठी अनेक भाविक येथे देवीला येवून साकडं घालतात त्यांची मनोकामना पूर्ण होते. आम्ही पण मनोभावे दर्शन घेऊन पठाणकोट कडे रवाना झालो...


संदीप राक्षे ✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१

११/०२/२०२१


Tuesday, 23 February 2021

ज्वालादेवी..हिमाचल

 माझी सहल "हिमाचल" 

मनोकामना पूर्ण करणारी "ज्वालादेवी"

संदीप राक्षे ✍🏻


गेली कित्येक वर्ष ज्वालादेवीला जाण्याची इच्छा होती, अनेक दिवसांचे स्वप्न होते ते स्वप्न फेब्रुवारी २०२१ मधे पुर्णत्वास आले होते. सिमला ते ज्वालादेवी हे अंतर १७३ किलोमीटर होते. सलग दोन दिवसांची धरती आणि आकाशाच्या मध्यभागाची, धवल निसर्गाची सहल संपवून, आम्ही सपाट भाग असणा-या कांगडा जिल्ह्य़ात जमीनीवर पोहचलो होतो. ज्वालादेवीला जाताना रस्त्यात अर्कीचा खाजगी किल्ला आहे. तो पण  आम्ही पाहिला, शाही पाहुणे आल्याने आम्हाला तो किल्ला दूरूनच पहावा लागला. त्या किल्ल्यात बाॅलिवूडच्या अनेक चित्रपटांची शूटिंग झाली आहे असे तेथील सुरक्षा रक्षकाने सांगितले. बाहेरूनच त्या किल्याचा आनंद घेऊन आम्ही ज्वाला देवीचा रस्ता धरला. ज्वालादेवीची आख्यायिका खूप वर्षांच्यापासून माझ्या मनावर कोरलेली होती. प्रवास करताना आणि आज साक्षात मातेच्या दर्शनाला जाताना ती कथा मन पटलावर पुन्हा आठवू लागली. गाडीचे सारथ्य संजय जाधव हे करीत असल्याने निसर्गाचा आनंद घेत या कथेचा उलगडा करीतच प्रवास आनंदात सुरू होता. शिवपुराणात कथेनुसार माता सतीचे पिता दक्ष यांनी महायज्ञाचे आयोजन केले होते. त्या महायज्ञाला देव देवता ऋषीं मुनींना आमंत्रित करण्यात आले होते. फक्त भगवान शंकरांना निमंत्रण दिले नव्हते, त्यामुळे माता सती म्हणजे पार्वती देवींना राग आला होता. कारण विचारण्यासाठी त्या रागानेच आपल्या पित्याकडे आल्या, भगवान भोलेनाथांनी पार्वतीमातेला न जाण्यासाठी बरीच विनवणी केली तरी सती मातेने त्यांचेही ऐकले नाही. पित्याला जाब विचारीत असतानाच पित्याकडूनच सती मातेला अपमानित व्हावं लागलं, मातेला खूप राग आला आणि त्यांनी यज्ञातच उडी मारून आपले प्राण दिले, यज्ञात भस्म होताच त्यातून एक ज्योतीपूंज तयार झाले व ते ज्योतीपूंज आकाशात जात असताना कसेटी पर्वतावर ते ज्योतीपूंज पडले, तेव्हापासून कांगडा जिल्हय़ातील कसेटी गावातील पर्वतावर ती ज्योती अजूनही तेवत आहे. कालांतराने या दिव्यत्वाचे ज्वालादेवी असे नामकरण झाले तसेच एक्कावन्न शक्तीपीठांच्यात ज्वालादेवी शक्तीपीठ म्हणून गणले जाऊ लागले. ही मनात चालणारी कथा संपली ती ढाब्यावर गाडी थांबल्यावर कारण पेटपूजा ही महत्वाची होती. गाडीतही भक्ती गीतांचे फोल्डर सुरू असल्याने वातावरणही भक्तिमय झाले होते. जेवण उरकले, पुन्हा प्रवास सुरू झाला मध्यरात्री दिडच्या सुमारास आम्ही. कसेटी गावात पोहचलो, मारूती तायनाथ यांनी फोनवरूनच एक धर्मशाळा मुक्कामासाठी बुकिंग करून ठेवली होती. पडल्या पडल्या शांत झोप लागली. पहाटेच उठलो साक्षात ज्योतावाली मातेच्या दरबारात पोहचल्याचा आनंद होताच. प्रात:विधी उरकला, मस्त ताजेतवाने होऊन मंदिराचा रस्ता धरला. मनातल्या मनात मला येत असलेले कनकधारा स्त्रोत्र सुरू होते...


अंगम हरे पुलकभूषणमाश्रयंन्ती! 

भृंगांगनेव मुकुलाभरणं तमालमं!

अंगीकृताखिलविभूतिरपांगलीला!

मांगल्यदास्तु मम मंगलदेवताया!


कोणत्याही शक्तीपीठा जवळ गेलो की हे कनकधारा स्त्रोत्र आवर्जून आठवते, पहिले हे स्त्रोत्र पाठ होते, आता यातील काही ओळीच आठवतात मग त्याच मनातल्या मनात गुणगुणतो. धर्मशाळावाल्याने देवीला जाणारा मधला मार्ग सांगितला होता. त्याच पायवाटेने मी संजय जाधव, मारूती तायनाथ, राजेश क्षीरसागर चालत होतो. पर्वताच्या पायथ्याशी हे मंदिर असल्याने थोडे चालावे लागले, मनात आनंदाला उधाण आले होते, जे स्वप्नी दिसत होते, ते आज डोळे भरून साक्षात पहाणार होतो. ज्वालादेवीच्या मंदिराच्या पाय-या सुरू झाल्या अन कंठ दाटून आला. भक्ती आणि भाव जिथे उत्पन्न होतो तिथे आपोआपच कंठ दाटून येतो. डोळ्यात आनंदाश्रूनी दाटी केली होती. क्षणाचाही विलंब न करता देवीच्या दर्शनाच्या रांगेत उभे राहीलो. हात जोडलेले, डोळे मिटलेले ज्वालादेवीच्या तेजोमय रूपात लीन होऊन गेलो. एक एक माणूस पुढे सरकत होता, तस तसे माझ्या डोळ्यांची पापणी ताणली जात होती. कारण ज्वालादेवीचे ज्योतीपुंज डोळ्यात साठवून हदयात बंदिस्त करायचे होते. कोरोनाचे संकट असल्याने दूरवरूनच माता ज्वालादेवीचे दर्शन झाले. युगेनयुगे तेजाळत असलेले हे दिव्यस्वरूप पहाताना पूर्ण लीन झालो होतो. अखंड तेजाळत असलेल्या दिव्यस्वरूप सती मातेचे मनभरून दर्शन घेतले. मंदिराच्या बाहेर आलो, कळसाचे दर्शन घेतले.. आजवर मुर्ती स्वरूपात असणा-या देवी देवतांचे दर्शन घेत होतो आज ख-या अर्थाने दिव्यस्वरूप व अद्भुतेचे दर्शन झाले होते. ज्वालादेवीचे दर्शन घेऊन गोरक्षनाथ मंदिराचे दर्शन घेतले तिथे पण असाच एक चमत्कार आहे, एक खोल खड्डा आहे त्या खड्याच्या वरती एक ज्वाला आहे ती पण सतत पेटलेली असते. त्या खड्यातील पाणी सतत उकळत असते. अशा दैवी शक्तीचे दर्शन घेऊन खाली आलो. ज्वालादेवीच्या मंदिराच्या बाजूला बादशाह अकबराने अर्पण केलेले सोन्याचे छत्र एका पेटीत ठेवलेले दिसते. त्याविषयी जरा कुतुहल होते कारण त्यावेळेसच्या मुस्लीम आक्रमकांनी भारतातील मंदिर संपूर्ण उध्वस्त केलेली आज आपल्याला संपूर्ण भारतात पहावयास मिळतात.. अशाच प्रकारे या मंदिरावर पण बादशाह अकबराने अतिक्रमण केले होते या दिव्य ज्योतीला विझविण्याचा वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केला. कधी संपूर्ण नदीच या ज्योतीच्या बाजूने फिरवली परंतु ही ज्वाला विझली नाही. सैनिकांच्या व्दारे तिला गाडण्याचा प्रयत्न केला तरी ती विझली नाही.. नानाप्रकारे प्रयत्न करूनही ज्वालामाता विझली नाही. तेथील मधमाशांनी मोगली सैन्यावर हल्ला चढवून सैन्याला नामोहराम केले. अखेर अकबर बादशाह ज्वालादेवीला शरण आला व त्याने हे सोन्याचे छत्र देवीला अर्पण केले. अशा अनेक कहाण्या या ज्वालादेवीशी निगडित आहेत. विज्ञानच काय पण पुर्वीच्या काळातील महासत्तेला सुद्धा गुडघे टेकायला लावणारी माता "ज्वालादेवी".. खरतर माझे खूप दिवसांचे स्वप्न पूर्ण झाले होते. ज्वालादेवीला समस्त जनांच्या कल्याणाचे दान मागितले, पुन्हा एकदा कळसाचे दर्शन घेतले, योग आलातर पुन्हा दर्शनास येईल अशी इच्छा प्रकट केली अन जड अंतःकरणाने मंदिराच्या पाय-या उतरू लागलो..


जगी तुझ्या लेकराला तुच सुखी ठेव!

जगी तुझा महिमा तुझी किर्ती मोठी! 

दु:खामध्ये हाक मारीता तुच रक्षणा धाव!


संदीप राक्षे ✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१

११/०२/२०२१


धवल हिमाचल

 माझी सहल "हिमाचल"

संदीप राक्षे✍🏻


हिमाचल म्हणजे बर्फाळ प्रदेशाचे राज्य, शिवशंकरांची सासुरवाडी अशी ही देवभुमी, अशा या धवल निसर्ग यात्रेसाठी आम्ही पंचकुला, पिंजौर, कालका, जबली ही गाव मागे टाकीत पंजाबची सीमारेषा संपून हिमाचल प्रदेशच्या हद्दीत प्रवेश केला. हिमाचल प्रदेश सुरू झाला, हे कळले आम्हाला डोंगराच्या कडेला एकावर एक घरांचा थर पाहिल्यावर, कधी एकावर एक घरांचा थर तर कधी पाईन्स या झाडांचे जंगल असा प्रवास करीत आम्ही हिमाचल मधील सोलन या शहरात पोहचलो. फ्रेश होण्यासाठी व पाय मोकळे करण्यासाठी सोलन शहराच्या अलिकडेच थांबलो. तिथे काही स्थानिक व्यक्ती उभ्या होत्या, त्यांच्या कडून काही माहिती मिळेल जेणेकरून पुढचा प्रवास सुखकर होईल.. आम्ही सर्वजण फ्रेश झालो, इन्होव्हा गाडीत बसून बसून जड झालेले पाय मोकळे केले. त्या व्यक्तींच्या जवळ गेलो नमस्कार घातला. ते जरा आश्चर्य चकित झाले, त्यांनी पटकन ओळखले, महाराष्ट्र से हो ? आम्ही हो म्हणालो ते कुतूहलाने इकडे तिकडे पाहू लागले. हे चौघेच लक्झरी बस तर कुठे दिसेना मग आम्हीच सांगितले आम्ही आमचीच गाडी घेऊन आलो आहोत.. ते हैराण झाले कस शक्य आहे इतक्या दूरवरून तुम्ही गाडी घेऊन आलात त्यातला एकजण बोलला? मान गये उस्ताद, बराच वेळ गप्पा झाल्यावर कळले की हे दोघेही फाॅरेस्ट अधिकारी आहेत. त्यातल्या एकाने नाव सांगितले "मै प्रेम कुंअर हूँ" मग ते सांगू लागले, तुम्ही डिसेंबर जानेवारी या महिन्यात हिमाचलला यायला हव होतं, आता बर्फ कमी झाला आहे. कुलू मनाली मै हनिमून के लिए आनेवालोंकी भीड ज्यादा बड गयी है. तुम्हाला जर निवांत व गर्दी नसलेल्या ठिकाणी जायचे असेल तर आम्ही सांगतो, तुम्ही चायल या ठिकाणी जा, तेथून तुम्हाला सिमला जवळ पडेल, जास्त त्रास होणार नाही. त्या दोन अधिका-यांनी जो मार्ग दिला, तोच मार्ग आम्ही सर्वांनी स्विकारला व त्याच मार्गाने आम्ही निघालो. निसर्गाचे अद्वितीय रूप पहायला मिळाले ते सोलन शहरा कडून चायल इथे जात असताना. संपूर्ण चार दिवसांचा थकवा निसर्गाचे हे अद्भुत रूप पाहताना कुठल्या कुठे पळून गेला होता. दूरवर जाणारा घाट, नागमोडी वळणं, गुलाबी थंडी व आजूबाजूला पडलेला बर्फ, आयुष्यात पहिल्यांदाच साक्षात बर्फाळ प्रदेशात आलो होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ मोठ्या दगडाच्या आकाराचे बर्फ दिसत होते. गाडी थांबवून त्या बर्फाच्यावरून हात फिरवीत होतो, डोळे भरून हा निसर्गाचा चमत्कार पहात होतो. दुपारची दोनची वेळ होती तरी सकाळचे आठ वाजले असे वातावरण होते, सूर्य होता पण त्याच्या उन्हाची ताप नव्हती. ऊन असूनही बर्फ विरघळत नव्हता हे विशेष होते. जर कधी पाऊस पडला तरच हा बर्फ विरघळून जातो. म्हणजे लोहा लोहे को काटता है, ही म्हण तिथे खरी झाली. आमच्या जवळच्या बिसलरीचे पाणी त्या बर्फावर ओतून पाहिले तर खरच पूर्ण बर्फ विरघळून गेला होता. वाटेने प्रवास करताना अनेक ठिकाणी थांबून या निसर्गरम्य परिसराचे हे सुवर्णस्वरूप डोळ्यात साठवत होतो. कुठेही जरासाही सपाट भाग दिसेना जिकडे तिकडे अफाट पर्वत रांगा व त्यावर पांघरलेला बर्फ, बर्फावर सुर्याची किरणं पडली की सोन्या सारख चमकणारे रूप मंदिराच्या कळसा प्रमाणे वाटत होते. अनेक पर्वत रांगा पार करीत आम्ही साधूपूल येथे पोहचलो, साधूपूल हे हिमाचल मधील आसन नदीवरील पुलाचे नाव व याच नावाने नदीच्या किनारी हे गाव वसलेलं. गाडीतून वरती पाहिले तर असंख्य पर्वत शेषनागा प्रमाणे फणा काढून उभे असलेले, घोंगवणारा वारा जणू काही शेषनागा प्रमाणे हे पर्वत फुत्सकारात आहेत. गाडीतून उतरलो नदीकाठावर पोहचलो, पाण्यात हात भिजवला संपूर्ण हात बधीर झाला होता, इतके थंड पाणी की अजून टेंपरेचर कमी झाले तर ही नदीचं गोठून जाईल. पुन्हा पाण्यात हात घालण्याचे धाडस होईना. नदीचा रोमहर्षक परिसर पाहून आम्ही गाडीत बसलो, आता आम्हाला साडेतीन हजार फुट उंच चायल या शहराकडे जायचे होते. जाताना पर्वत रांगांच्या कुशीत अनेक महात्मे आपआपल्या मंदिरात ध्यानस्त बसलेली दिसत होती. इतकी शांती की टाचणी पडली तरी सहज आवाज येईल. कदाचित वादळापूर्वीची ही शांतता असेल. असाच प्रवास करताना दूर पर्वतावर असणारे सुंदर मंदिर आम्हाला खुणावत होते. आम्ही सर्वांनी ते पहाण्याचा निश्चय केला. त्या मंदिराकडे जाणार रस्ता शोधला..पर्वताच्या कपारीतून हा गाडी रस्ता बनविला होता. छाती धडधड करीत होती. आजूबाजूला खोल खोल दरी आणि त्यामधून आमची गाडी चाललेली सात आठ किलोमीटरचा प्रवास करून आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारात पोहचलो, बाॅर्डरवर जशी सुरक्षा असते तशी सुरक्षा या मंदिराच्या आजूबाजूला होती. आम्हाला जरा नवल वाटले. सुरक्षा रक्षकाने आम्हाला आधार कार्ड विचारले ते सर्वांनी दाखवले, वहीत त्याने नोंद केली, आमची तपासणी करून आम्हाला मंदिरात प्रवेश दिला. लाखो रू खर्च करून या मंदिराची उभारणी स्वामी अमरदेवजी महाराज यांनी केली आहे.   या मंदिरात राधा कृष्ण, राम सीता, शंकर पार्वती, गणपती, पंचमुखी हनुमान, अकरा मुखी हनुमान तसेच नवग्रहांच्या भव्य मुर्तींची स्थापना केलेली. पंचतारांकित असे मंदिर पाहून परमानंद झाला. आम्ही सुरक्षा रक्षकाकडे स्वामीजींना भेटण्याची इच्छा प्रकट केली. तर त्या रक्षकाने सांगितले स्वामीजी आपल्या कुटीमधे गेली महिनाभर साधना अवस्थेत आहेत. ते कोणालाही भेटत नाहीत. बोलत नाहीत, काही खात पण नाहीत. दूरूनच आम्ही त्या कुटीचे मनोभावे दर्शन घेतले. आजूबाजूला कसलीच लोकवस्ती नाही तरी हे भव्य मंदिर, ते महात्मे करीत असलेली निर्गुण साधना, उपासना वातावरणात चैतन्य निर्माण करीत होती. तसेच त्या मंदिरातील प्रत्येक मुर्तीच्या चेहर्‍यावरील सात्विक छटा पाहून सर्व इंद्रिये अंतर्मुख होऊन, चित्त स्थिर होऊन अंतरंगातील भक्तिरस वाढीस लागला होता. नुसत्या निर्जिव मुर्त्यांच्या सहवासाने अमृतापेक्षाही गोड असा अमृतरस चाखावयास मिळाला होता. खरच हिमाचल ही देवभूमी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले होते. आता चायल गावाशिवाय कुठेही थांबायचे नाही असे ठरले कारण प्रत्येक अंतरावर काही ना काही भव्य दिव्य असे दिसत होते टाईमपास होत होता, अन वेळ सहज पुढे जात होती. सायंकाळचे पाच कधी वाजले हे कळले पण नाही. पस्तीस किलोमीटरचे अंतर पार करून आम्ही चायल गावच्या पायथ्याशी पोहचलो होतो. रात्रीचे आठ वाजले होते. गडद अंधार, नागमोडी वाट आजूबाजूला चीट पाखरू पण नाही असा प्रवास सुरू होता. मस्त जुन्या गाण्यांचे फोल्डर सुरू झाले होते. घाट सुरू झाला होता. पहिल्या गियर शिवाय गाडी पण पुढे धावत नव्हती. अचानक गाडीच्या हेडलाईटचा कलर निळसर झाला. आमचे सर्वांचे लक्ष त्या निळसर लाईटकडे आकर्षित झाले. गाडी साईटला घेतली, गाडीची लाईट तशीच सुरू ठेवली. कारण हे चमत्कारापेक्षा कमी नव्हते, समोरचे दृश्य पाहून आम्ही सर्वजण थक्कच झालो होतो. एका विशिष्ट वळणावर, एका विशिष्ट रेषेत गाडीचा प्रकाश बर्फाच्छादित पहाडीवर पडला होता, पहाडीच्या वरती आकाश निळेशार दिसत होते, लाईटचा व आकाशातील निळ्या प्रकाशाचा संगम होऊन तो निळा प्रकाश पूर्ण बर्फावर पसरला होता. त्यामुळे संपूर्ण बर्फाच्छादित पहाडी निळीशार झाली होती. मनसोक्त फोटो काढले, हे विहंगम दृष्य पाहिल्यावर कवी ग्रेस यांची निळाई ही कविता सहजच आठवली..


असे रंग आणि ढगांच्या किनारी

निळे ऊन लागे मला साजणी!

निळे घाटमाथे निळ्या राउळांचे

निळाईत माझी भिजे पापणी!


चायल हे हिमाचल प्रदेशातील एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. सोलन जिल्ह्य़ातील हे गाव सोलन पासून ४५ किलोमीटर अंतरावर आहे. इथे काली टिब्बा, क्रिकेट मैदान व पोलो मैदान प्रसिद्ध आहे. समुद्र सपाटीपासून हे गाव तीन हजार पाचशे फूट उंचीवर आहे. रात्री आम्ही चायल मुक्काम केला. सकाळीच उरकून आम्ही काली का टिब्बा हे मंदिर पहाण्यासाठी निघालो हे मंदिर चायल गावापासून १३०० फूट उंचीवर आहे. नागमोडी रस्ताने मार्ग काढीत आम्ही मंदिरात पोहचलो, काली माता या मंदिरात पिंडीच्या स्वरूपात स्थित आहे. इथे विविध धातूंच्या पाच पिंडी आहेत. अतिशय सुबक आकाराचे हे मंदिर, मंदिराच्या बाहेरील बाजूला एक धुनी अनेक वर्षांपासून पेटलेली आहे ती कधीच विझत नाही. उंचावरून हिमाचल प्रदेशाचा प्रत्येक जिल्हा चोहोबाजूंनी दिसत आहे. जिकडे पहावे तिकडे पर्वतच पर्वत दिसत होते. हिमालयाच्या कुशीतील हे हिमाचल प्रदेश हिमालयाचाच एक भाग आहे. अतिशय सुंदर निसर्गरम्य रूप, असंख्य पर्वतांचे टोकदार सुळके, त्यावर असलेला बर्फ आणि पडलेला सूर्यप्रकाश सोनेरी स्वर्गाची आठवण करून देत होते. आता ओढ लागली होती ती पर्वतांची राणी शिमला शहर पहाण्याची, शिमला शहरातील पर्वतावरील बर्फाच्छादित चादर पहाण्याची. शिमल्याला जाताना अर्की गावात दुपारचे जेवण केले अन शिमल्याच्या दिशेने इन्होव्हा गाडीची चाकं धावू लागली. गाणी गुणगुणत, रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या, आभाळाला टेकणा-या देवदार वृक्षांचे जंगल पहात देवदार वृक्षांवर पडलेला बर्फाचा सडा पहात प्रवास सुरू होता. जस जसे शिमला शहर जवळ येत होते. तसे बर्फाचे साम्राज्य अधिक दिसत होते. रस्त्याच्या कडेला दगडाच्या आकाराचे बर्फाच्या तुकड्यावर आतापर्यंत समाधान मानीत आलो, पण आता पर्वत, झाड, घर, हाॅटेल पूर्ण बर्फाने झाकोळलेली पाहून मन अधिक आनंदीत होत होते. इतर वेळेस आग ओकणारे डोळे सुखावत होते. बर्फाचे पर्वत पाहून तर अक्षरशः थंड पडले होते. शिमला दहा किलोमीटर दूर होता, एका पहाडाला पूर्ण तारेचे कंपाऊंड केले होते, त्या पहाडावर बर्फ पडत होता, असे भासत होते शिवशंकराचा भस्मच पडतो आहे. जाव आणि हा भस्म भाळाला लावून पवित्र पावन व्हावं. थोडं पुढे गेल्यावर बर्फावर खेळण्याचा, चालण्याचा मोह आवरेना. आपल्या मुळे या सफेद संजीवनीला कुठेही डाग लागू नये याची खबरदारी घेऊन मनसोक्त बर्फातून हुंदडलो, झोपलो, बर्फ अंगावर घेतला, एकमेकांच्या अंगावर फेकला..


धवल निसर्गाची किमया 

पाहिली आज मी डोळा,

विसरलो देहभान, हरपलं मन,

काय वर्णू मी अद्भुत सुखसोहळा.


धवल निसर्गाचा आनंद घेत आम्ही शिमल्यात पोहचलो, हिमाचल प्रदेशच्या राजधानीचे हे शहर अतिशय गजबजलेलं होतो प्रचंड गर्दी, त्यातून पर्वतावर वसलेलं शहर एकमेकांच्या उरावर असलेली हाॅटेल, तेथील स्थानिकांची घर सुबक पणे सजवलेली होती, परंतु प्रत्येक घराला अंगण हे नव्हते, आपल्याकडे अंगण या विषयावर अनेक गाणी रचली गेली पण शिमला हे शहर अतिशय वेगळं होत. अंगणापासून वंचित होतं, कपारीच्या कडेला घर, बाहेर येवून पहायचं म्हटलं तर अंगणाच्या ऐवजी प्रचंड खोल दरी. वरून पडला की सरळ स्वर्गलोकचं. कुठेही सपाट जागा नसणार शहर पण अतिशय नियोजन बद्ध होते. अनेक सुखसोई युक्त अस हे शहर अनेक पर्यटकांचे आवडणारे शहर, नुकताच बर्फ पडून गेल्याने रस्त्याच्या दोन्ही कडेला बर्फाचा खच पडलेल्या त्याच सोबत अनेक टूव्हिलर, फोर व्हिलर कच-या सारख्या त्या बर्फाच्या विळख्यात अडकलेल्या होत्या. काही गाड्यातर दोनच दिवसांत सडून गेल्या होत्या. हे भयानक विद्रूप रूप पाहून आम्हाला पण खूप भिती वाटली कारण आम्ही पण गाडी घेऊन आलो होतो. जर कधी बर्फवृष्टी झाली अन गाडी जर अडकली तर भंगार मधे विकण्याशिवाय पर्यायच नव्हता.. आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळ पाहून शिमल्यातून आम्ही लगेचच पळ काढला. कारण पुढे पण आम्हाला ज्वालादेवीच्या दर्शनाला जायचे होते. माझ्या सोबत या धवल निसर्ग सहलीत संजय जाधव, मारूती तायनाथ, राजेश क्षीरसागर हे सहकारी होते..


संदीप राक्षे ✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१


Tuesday, 2 February 2021

विरूपाक्ष मंदिर

 भारताच्या सुवर्ण वैभवाच्या पाऊलखुणा..

"विरूपाक्ष मंदिर" हंम्पी कर्नाटक 

संदीप राक्षे ✍🏻


सासिवेकालु आणि कडलेकालु ही दोन गणपतीची मंदिर पाहून आम्ही कर्नाटकचे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र विरूपाक्ष मंदिर पहाण्यासाठी निघालो. तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर विरूपाक्ष मंदिर आहे. विरूपाक्ष ही देवता भगवान शंकराचा अवतार मानला जातो. विरूपाक्ष म्हणजे तिरकस डोळ्यांचा देव, हे मंदिर विजयनगर (हंम्पी) च्या साम्राज्याचे मुख्य केंद्रस्थान होते. संपूर्ण विजयनगर राज्य उध्वस्त झाले परंतु हे विरूपाक्ष शिवमंदिर जस होत तसच आजही इतिहासाची साक्ष देत भक्कम पणे उभ आहे. चौदव्या शतकात पंपातीर्थ स्वामीस्थळ म्हणून जगप्रसिद्ध होते. या मंदिराचे प्रवेशद्वार १०८ फुट उंच आहे  अतिशय बारीक कोरीव नक्षीकाम अजून सुस्थितीत असून द्रविड स्थापत्याचा अद्भुत नमुना आहे. या मंदिरात अनेक गोपुरे आहेत, गोपूर म्हणजे पिरॅमिड सारख शिखर, ग्रॅनाईट आणि विटावर प्लॅस्टर ने नक्षीकाम केलेले अतिशय सुंदर दिसते. सोनेरी कळस, सोनेरी मोर पीस खोवल्या सारखी दिसतात. हे सार पाहून आम्ही मुख्य मंदिरात शिरलो. भली मोठी रांग दर्शनासाठी होती. आम्ही तिघेही रांगेत उभे राहीलो,  रांगेत जरी उभे असलो तरी नजर मंदिराच्या नक्षीकामाकडे होते. सिंह, हत्ती, घोडे, मगर अशी विविध शिल्प कोरलेली दिसत होती. प्रत्येक खांबावर प्राण्यांच्या आकाराचे शिल्प कोरलेले होते. गर्दी पुढे सरकत सरकत आम्ही गाभा-या जवळ येऊन पोहचलो. विरूपाक्ष देवाचे मनापासून दर्शन घेतले, गाभा-यातून बाहेर पडलो, शेजारीच कृष्णदेवराय राजाच्या काळातील राज्याभिषेक मंडप पाहिला. मंडपाला नक्षीकाम व अलंकाराने मढवलेले कित्येक खांब दृष्टीस पडत होते. खरतर हे वैभव पाहून आम्हाला आमचाच विसर पडला आपण आधुनिक काळातील आहोत. इतके या वास्तूपाहून मंत्रमुग्ध झालो होतो. खरतर चौदाव्या शतकातून आपण बाहेरच पडू नये असे सारखे वाटायचे, सुर्यदेव ही आपली दिनचर्या संपून मावळती कडे झुकत होते. संपूर्ण अवनीवर सव सांजेचा अंधूक प्रकाश पसरत चालला होता. आमच्या गाडीकडे जाताना पुन्हा पुन्हा या वास्तूकडे नजर जात होती. काळोखाचे साम्राज्य वाढून इथल्या वास्तू सुद्धा काळोखाच्या कचाट्यात सापडून दिसेनाशा झाल्या होत्या.. हंम्पीच्या वास्तूतले हे शेवटचे पवित्र स्थळ पाहून, आम्ही पुण्याकडे मार्गस्थ झालो..


संदीप राक्षे ✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१


सत्य संकल्पाचा दाता! आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा!

सत्य संकल्पाचा दाता! आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा.. संदीप राक्षे✍🏻 संत तोचि जाणा!  जो देही उदार!! म्हणजे खरा संत तोच ...