Friday, 29 December 2017

पिकलेली तोरण सखे (कविता)

सखे पिकलेत तोरण!

लई जोरात पिकलेत तोरण
मी चव घेऊन बघतोय थांब
या दैवाराच्या सुपीक राना
भासशिल तू ग ओला खांब !

या वनात उनाड बांबू
माझ्या परड्याला देतोय टेकू
या मोहळाचा रसाळ मध
मिळून जोडीने दोघेही चाखू !

हा वावडूंगीचा लाल लाल घड
चवीला लागतोय तुरट छान
पाहून हा रानमेवा डोळ्यांनी
झालोय सखे मी ग बेभान !

निसर्गाची किमयाच न्यारी
दालचिनीच्या खातात साली
चिंचा बोरही गाभोळलेली
गुंजांनी बहरली सखे वेली !

ही झाडं फुलं अन् पानं
वाराही जरासा होतो धुंद,
हिरवळीचं ग लेणं लेवून,
सखे,मातीत दाटलाय सुगंध !

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Thursday, 28 December 2017

शाप धरेचा! (कविता)

शाप धरेचा !

सजीवांचा या धरेला ताप आहे
सोसण्याचे ते विषारी घाव आहे
खोदतो आहे विनाशांच्या रोज वाटा
वर्म हे त्या माणसांची चूक आहे !

या नव्या युगात ही असतो धुंद मी
वृक्ष तोडीचा गुन्हा करतो पुन्हा मी
मी वेदनेची करवत चालविताना
ते म्हणाले तोड येथे पाप आहे !

सृष्टीचा वा वृष्टीचा मेळ येथे
वसुंधरेशी रोज होतो खेळ येथे
माणसांच्या धुंदीस पाहून घेता
सुर्य ही बोले कसा हा शाप आहे !

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Tuesday, 26 December 2017

मंतरलेली रात्र (कविता)

मंतरलेली रात्र!

धुंद झाला सांजवेळी शिशीर वारा
गुलाबी थंडीचा आज दिसे पहारा !

चंद्रबिंब अधीर भासते पाणवठ्यात
चांदणी हलकेच होती लाजत नभात !

मिलनाच्या आवेशात होते धरणी-आकाश
निसर्ग पुष्पांनी जणू टाकले ते  पाश !

दवबिंदूंचा सडा होता पडला धरतीवरी,
निसर्गराणी भाळली त्यावर प्रियसीपरी !

मंतरलेली रात्र ही संपता संपेना
अधिरता मिलनाची मिटता मिटेना !

पुन्हा नव्याने रविकराची लागता चाहूल,
धरती वाटते नववधू देते गगनांस भूल !

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

मंतरलेली रात्र जेव्हा होते थरथरती

मंतरलेली रात्र जेव्हा होते थरथरती (बामणोली जंगल)

निश्चयाचा महामेरू बहुत
जनांसी आधारू
अखंडस्थितीचा निर्धारू
श्रीमंतयोगी...

सातारा म्हटले की इतिहास, इतिहास म्हटले की आठवते फक्त एकच नाव माझा राजा "शिव छत्रपती" नाव उच्चारले तरी बाहु आपोआप स्फुरण पावतात, नसानसात रक्त प्रवाह तेज होतात, हातांच्या मुठी आवळल्या जातात, त्याच प्रमाणे इथली माणस सुद्धा तशीच रांगडी, शूर तितकीच मायाळू, लढवैयांचा जिल्हा, देशासाठी प्राणांचे बलिदान देण्या-या शूर सैनिकांची भूमी, लागोपाठ सुट्टी आल्याने या तीन दिवसात सातारा जिल्ह्यातील काही भाग फिरायचा असा निश्चय केला.. या वेळेस पण बँकेचे सहकारी दादू डोळस साहेब सोबतीला होतो, त्यांची इच्छा होती एक दिवस एक रात्र तरी आपण जंगलात टेंट मधे राहायचे ते थरारक जीवन अनुभवायचे. मला थोडे टेन्शन आले घनदाट जंगलात एका साध्या टेंट मधे कसे राहायचे..विचारातच अजिंक्यतारा गडाच्या पायथ्याशी येवुन पोहचलो, दुरूनच गडाचे दर्शन घेतले शिव छत्रपतींचे स्मरण केले. पहिले कोणत्या ठिकाणावर जायचे असा गाडीतच आमच्या दोघांचा विचार सुरू झाला.. माझे भेदरलेले मन मलाच साथ देईना व्दिधा मनस्थितीत होतो तोच पुढे सज्जनगडा कडे अशी पाटी दिसली. आणी मनातल्या मनात असलो.. कारण होते सज्जनगड म्हटले की मानसशास्त्रांचे गाढे अभ्यासक, समर्थ रामदास स्वामींचे समाधी स्थान.. मन या विषयावर कितीतरी ओव्या आणी काव्य करून मनाला चांगल्या सवयी, मन आपल्या ताब्यात कसे राहील यावर असंख्य उपाय सांगितले आहेत.. आणी मलाही तीच गरज होती, म्हणून मला हसु आले... कोणताच विचार न करता गाडी सज्जनगडाकडे ओळवली...

धरी रे मना संगती सज्जनांची !
जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनांची !
बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे !
महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे !

"जय जय रघुवीर समर्थ" रामदास स्वामींचा जप करीतच सज्जनगडाच्या पायथ्याशी पोहचलो,सुट्यांच्या मुळे असंख्य भाविकांची मांदियाळीच येथे जमली होती.. गडावर गाडी जात नसल्याने,गाडी पायथ्याला पार्क करून गड चढायचा निर्णय घेतला. अर्ध्या पर्यंत डोळस गड चढले,आणी थांबले मला नाही चढवणार पुढे, गडावर तूच एकटा जा मी त्यांना हो म्हणालो आणी एकटाच गड चढू लागलो.. प्रचंड उन होते सुर्य डोक्यावर होता.. थंडीचे दिवस असून सुद्धा अंग घामाने डबडबले होते. दम लागत होता. थोडे थांबायचे आणी पुन्हा चालायचे असे करीत करीत सज्जनगडाच्या मुख्य दरवाज्या जवळ पोहचलो. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव होते त्या भल्यामोठ्या प्रवेशद्वारावर, तिथेच एक सेल्फी घेतला, पुढे लोकमान्य टिळक प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलो तिथेच एक भला मोठा पाण्याचा चौकोनी तलाव दिसला इतिहासकालीन हा तलाव इतिहासाची साक्ष देत होता..

राया शिवछत्रपती! समर्थाशी अतिप्रती !!
सज्जनगडी त्यांची वस्ती! तेणे करविली!!

काही जुन्या वास्तु पहात पहात छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना भव्य निवासस्थान बांधून दिले होते त्या ठिकाणी पोहचलो,धन्य ती वास्तू धन्य तो इतिहास आज ही ती वास्तू समर्थ रामदास स्वामींचा मठ म्हणून ओळखली जाते..मी त्या निवास्थानात प्रवेश केला आपल्या राज्याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या वास्तूत अफाट चैतन्य होते... एका खोलीत छत्रपतींनी रामदास स्वामींना एक पलंग भेट दिला होता तो आजही तसाच आहे...तेथून पुढे एक शेजघर आहे तिथे समर्थ रामदास स्वामींच्या वापरात असलेल्या वस्तु अजूनही जतन करून ठेवल्या आहेत..त्यामधे शिवाजी महारांजानी दिलेल्या कुबड्या, श्री दत्त महाराजांनी दिलेली कुबडी, वेताची काठी, सोटा, समर्थांना शिवाजी महाराजांनी दिलेली कुबडी मोठी रहस्यमय आहे. या कुबडीमध्ये तलवार आहे. त्याला गुप्ती असे म्हणतात. कुबडीचा वापर समर्थ उभ्याने जप करताना बगलेत अडणी म्हणून करीत होते. भारतभ्रमण करीत असताना समर्थ हिमालयात गेले होते तेथे त्यांना थंडीचा त्रास जाणवु लागला त्यावेळेस मारूतीराया प्रकट झाले व समर्थांना शरीराच्या रक्षणासाठी वल्कले दिली ती वल्कले अजूनही शेजघरात आहेत...शेजघरात प्रवेश करताना दारावरच एक फोटो फ्रेम दिसली त्यामधे शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी हे चर्चा करतानाचा फोटो आहे तो मी खुप वेळ पहात होतो.. साधू संताना जातीपातीच्या चौकटीत अडकविणा-यांना ती एक मोठी चपराक होती.. संपूर्ण शेजघर पाहून त्या संपूर्ण अमल्य वस्तु डोळ्यात साठवून, मनोभावे वंदन केले आणी समर्थांच्या समाधी मंदिरा कडे आलो..समाधी स्थानाच्या वरती राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन उजव्या हाताच्या जिन्याने भुयारात उतरलो समर्थांच्या समाधीचे दर्शन घेतले, आयाताकृत समाधी ही आपोआप   जमिनीतून वरती आलेली आहे.    समर्थांनी शेवटच्या क्षणी दोन काव्य केली होती त्याचे स्मरण केले, आणी सज्जनगडचा निरोप घेतला.. 

रघुकूळटिळकाचा वेध सन्नीध आला!
तदुपरी भजनाचा पाहिजे सांग केला!

समर्थांच्या दर्शनाने आणी तेथील वातावरणाने मनाला एक उभारी मिळाली होती.. वा-यापेक्षा वेगाने धावणारे मन समर्थांच्या जपा मधे मग्न स्थिर झाले होते. समर्थांनी मनावर केलेले एक एक काव्य आठवु लागले होते. गडाच्या पायथ्याशी पोहचलो फ्रेश झालो तिथेच ठोसेघर धबधब्याकडे जाण्याचा मार्ग दिसला खुप दिवस हे नाव ऐकून होतो पण जाण्याचा योग येत नव्हता.. आलो आहोत जवळ तर जाऊयात का? डोळस साहेबांना विचारले त्यांनी होकार दिला. पाऊस संपून आता खुप दिवस झाले धबधबा सुरू असेल का हा मनात विचार होता. पण नंतर समजले ठोसेघरचा धबधबा अविरत कोसळत असतो. एक नाविन्यपूर्ण निसर्गाचा हा चमत्कार पहाण्यासाठी ठोसेघरला निघालो. ठोसेघर धबधबा समुद्र सपाटी पासुन १२०० किलोमीटर उंचीवर आहे.

भरभर धारा बरसत येती
डोंगर कडा कपारीतूनी
क्षणभर वाटे मजला
दुग्ध सांडीले रंग पाहुनी !

कोण अडवी धबधब्यास
अविरत तांडव नृत्य करी
खोल दरीतील विक्राळरूप
रोमांच भरी अंगावरी!

ठोसेघरचा धबधबा पाहुनच या काव्याची निर्मिती तिथेच झाली.. निसर्गाने किती भरभरून दिले आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. छोटा आणी मोठा असे दोन धबधबे येथे आहेत, हे धबधबे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असला तरी हे मात्र कधीच थांबत नाहीत. पाणी थोडेफार कमी होते, पण हे अविरत कोसळत असतात. येणाऱ्या पर्यटकांचे डोळ्यांचे पारणे फेडणारा, नयनविभोर दृष्य सोहळा पाहून आम्ही बामणोली जंगलाकडे प्रस्थान केले. कास पठाराच्या डोंगर रांगेतून आमचा प्रवास सुरू होता. कास पठार लागलेल्या वणव्यामुळे काळे ठिक्कूर पडले होते. पठार सोडून आता घनदाट जंगल सुरू झाले होते.. एक वाहन जाईल इतका नागमोडी रस्ता, बाजुला दाट झाडी गुलाबी थंडी प्रमाणेच गुलाबी फुलांचा जथ्था जागोजागी दिसत होता.. हे दृश्य सुखद वाटत होते .. शिशीराचा गार वारा म्हणजे गुलाबी थंडी आणी गुलाबी फुल हा योग दुर्मिळच पाहावयास मिळाला. अनेक वेगवेगळ्या जातींची पुष्ष फुले निसर्ग देवतेची साक्षात पुजाच करताना दिसत होती. त्या मधे विघ्नहर्ता पुष्प, कुमुदिनी पुष्प, झुंबर पुष्प, कंदील पुष्प, कावळा पुष्प, कळलावी पुष्प, या मधे असे एक पुष्प पहायला मिळाले ते म्हणजे किटकभक्षी त्या फुलावर जर एखादा किडा बसला की तो आपोआप गायब होऊन जायचा ते पुष्प हे किटक भक्ष्य करून टाकायचे, निसर्गाची करनी आणी नारळात पाणी, निसर्गाच्या कुशीत शिरल्या शिवाय असले चमत्कार बघायला मिळणारच नाहीत. विविध पक्ष्यांचे आवाज वातावरणाला सूरमयी बनवीत होते. ताला सुरात गाणारे पक्षी निसर्ग आणी संगीताचे ऋणानुबंध किती जवळचे, हेच सांगत आहेत असे वाटायचे. सुर्य आता मावळतीला लागला होता..आम्हाला बामणोलीच्या जंगलात कोयनेच्या बॅकवॉटर च्या परिसरात पोहोचायचे होते. आता गाडीचे थोडे स्पीड वाढवले अंधार झाला तर ज्या ठिकाणी मुक्कामाची सोय केली ते ठिकाण सापडले नसते.. एकदा जंगलात घुसले की होकायंत्रा शिवाय बाहेर पडणेच अशक्य. पुष्पवल्ली पहाण्याचा मोह आवरता घेतला. वेडी वाकडी वळणे, डोंगर द-या पार करीत अखेर बामणोली गावात येवून पोहचलो शंभर दिडशे उंबरा असलेले गाव तेथूनच बोटीने तापोळा व वासोटा किल्यावर जाता येते. आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणाचा पत्ता विचारला अजून पाच किलोमीटर जावे लागेल असे तेथील ग्रामस्थाने सांगितले, हे ठिकाण आहे. मनात भिती प्रचंड वाढत चालली होती कारण होते आज मुक्कामाचे ठिकाण कोणते लाॅजिंग किंवा रिसोर्ट नव्हते, आजचा मुक्काम घनदाट जंगलात  उघड्यावर एका टेंट (कुपी) मधे होता. आता अंधार पडला होता, निर्मनुष्य रस्ता होता, कुठेही उजेड नव्हता, चित्र विचित्र आवाजाने मन खूपच भेदरले होते..कुठून बुद्धी दिली अन सुखाची ठिकाण सोडून या अडचणीच्या ठिकाणावर का आलो हा माझा मलाच प्रश्न पडला. समर्थांची आठवण झाल्यावर मन जरा शांत झाले. मुक्कामाच्या ठिकाणावर पोहचलो होतो.. डांबरी सोडून गाडी कच्च्या रस्त्याने चालू लागली.. एक किलोमीटर अंतरापर्यंत गेल्यावर एक वाटाड्या उभा होता तो आमचीच वाट पहात उभा होता. त्याने विचारले तुमचे नाव काय? कुठून आलात? मी म्हणालो मी संदीप राक्षे भोसरी पुणे येथून आलो.  गेल्या गेल्या त्याने आम्हाला चहा दिला. दोन तीन ठिकाण आम्हाला त्याने दाखवली, कुठे टेंट लावायचे ते काही ठिकाण पाहूनच भितीने गाळण उडाली होती. मी त्यालाच सांगितले तुला जिथे चांगले वाटेल आम्ही  सुरक्षित राहू अशा ठिकाणी व्यवस्था कर, कारण इथला अनुभव तुला आहे. त्याने गर्द झाडीत, नुकतेच भात कापणी झाली होती, त्या छोट्याश्या खाचरात टेंट लावला. मी आजु बाजुला पाहिले तर असंख्य जंगली प्राण्यांच्या पायाचे ठसे सहज दिसत होते. त्याच्या कडून कसलीच माहीती घेतली नाही. विचारले की मनाचा खेळ सुरू होईल नको नको त्या विचारांचे थैमान डोक्यात दाटेल, त्यामुळे काहीच विचारले नाही. आता जिकडे पहावा तिकडे अंधाराचे साम्राज्य होते. आज चंद्र सुद्धा अर्ध आकार असल्याने त्याचा प्रकाशही जास्त पडणार नव्हता. रात्री नऊ वाजता जेवण उरकले छान पिठले भाकरीवर ताव मारला. टेंट जवळच शेकोटी पेटवली आणी मस्त बैठक मारली. डोळस साहेब आणी मी आम्ही दोघेच असल्याने आमच्याच गप्पा सुरू झाल्या. दूरवर अजून काही ट्रेकअर आले होते त्यांचे टेंट होतेच त्यामुळे थोडासा आधार आला होता. झाडावर चढून धरणाचे पाणी चंद्र असल्याने दिसते का, पहावे मनात विचार आला. एक एक फांदी चढत मध्यापर्यंत गेलो काळ्याकुट्ट अंधारा पलीकडे काहीच दिसले नाही.मी झाडावर चढल्याने झाडावरील पक्ष्यांचा किलबिलाट अचानक सुरू झाला. पटकन खाली उतरलो, शेकोटी जवळ जाऊन शेकत बसलो; शेकोटीतील अग्नी निरनिराळी रूपे धारण करीत होता, ती मी मोबाईल मधे टिपीत होतो.. अक्राळ विक्राळ आकार त्या अग्नीतून प्रकट होत होते. मनाचा खेळ सुरू होण्या अगोदरच स्वताला सावरले, मोबाईल मधे जुनी गाणी मंद आवाजात सुरू केली मन गाण्यात रमले होते. तितक्यात कोल्हेकुई सुरू झाली, आणी वातावरण धीर गंभीर झाले. वा-याने हलणा-या करवंदीच्या जाळ्यांच्याकडे लक्ष वेधू लागले. शेकोटीला आणलेले सरपण पण संपून गेले..आता उरला होता फक्त निखारा, इकडे चंद्र डोक्यावर आला होता. घड्याळात पाहिले तर मध्यरात्रीचे  बारा वाजले होते. इकडे माझ्या छातीत धस्स झाले, रात्री बाराचे किस्से खुप ऐकल्याने एक एक ओपन होऊ लागला, आठवु लागला. डोळस साहेब झोप आल्याने टेंट मधे गेले दिवसभराच्या प्रवासाने थकले होते. पडल्या पडल्याच झोपी गेले. आता उरलो मी एकटाच आणी मनातले भूत दोघेच जागे होते. प्रचंड थंडीत सुद्धा घामाने डबबलो होतो. विचार काही थांबेनात. चंद्रप्रकाश थोडा प्रखर झाला होता. झाडांच्या आकृत्या जिवंत माणसा सारख्या भासू लागल्या तसा तसा भितीचा प्रकोप वाढू लागला. सळसळ स्पष्ट ऐकू येऊ लागली. कोल्हेकुईत आता अनेक आवाजांची भर पडली.. इतक्या वेळ निरव शांत असलेले जंगल अशांत झाले होते. पाणवठा आमच्या पासुन जवळपास होता. कसलाच विचार न करता मी पटकन टेंट मधे घुसलो, सर्व पॅकबंद केले दोन रजई अंगावर घेतल्या, पण काही केल्या झोप येईना. शांत पडून राहिलो आवाजाचे निरीक्षण करीत करीत रात्रीचा हा थरार डोळ्याने न पहाता कानाने अनुभवत होतो. कधी पहाट होते या विचारत पडलो पण काही केल्या वेळ पुढे जाईना. दवांच्या पाण्याने संपूर्ण टेंट ओला चिंब झाला होता. ते टिपकणारे थेंब सुद्धा स्पष्ट ऐकू येत होते. अचानक टेंटवर काहीतरी पडल्याचा आवाज झाला. आता हातापायची गाळण झाली होती. काय करावे सुचेना पण थोडासा कानोसा घेतला तर दोन वटवाघुळ चिर्र चिर्र करीत टेंट वर पडली होती. थोडा जीवात जीव आला..पुढे काय काय वाढून ठेवले आहे, याचा विचार करीतच पहाटेचे चार वाजले होते. आता थंडीत प्रचंड वाढ झाली होती येणारे आवाज बंद झाले होते. अशातच निद्रादेवी माझ्यावर प्रसन्न झाली आणी मला झोप लागली..

मंतरलेली रात्र थरारक,
धुंद गुलाबी ही थंडीची,
रातकिडयांचे चित्कार ते,
घंटा भासते जणू धोक्याची !

पाणवठयाच्या काठी वसते,
वसाहत तृष्णीत प्राण्यांची,
भेदरलेल्या मध्य रात्रीस या,
प्रतिक्षा मला सकाळची !

सकाळी जाग आली ती सुर्यदेवाच्या आगमनानेच, उठून टेंटची चैन उघडली बाहेर डोकावले तर मस्त कोवळ उन पडलेल, टेंट मधून बाहेर पडलो. सुर्यदेवाचे दर्शन घेतले प्रातर्विधी उरकला. सरळ आंघोळी साठी धरणाकडे निघालो गाडीत ठेवलेली पाण्याची बाटली बर्फा पेक्षाही गार होती.. मी विचार केला हे पाणी इतके थंड तर धरणातील पाणी किती थंड असेल कशी आंघोळ करायची. धरणा जवळ गेलो पाण्यात हात घातला तर पाणी कोमट होते. मस्त पाण्यात उडी मारली मनसोक्त पोहण्याचा आनंद घेतला, इतर आलेले ट्रेकर माझ्या कडे पहातच होते. इतक्या थंडीत धरणात कसे काय पोहतात म्हणून कुतूहलाने पहात होते. पोहण्याचा आनंद खरच वेगळाच होता स्वच्छ आणी निर्मळ पाणी अंगाला गरम भासत होते.. थंडी कुठेच्या कुठे पळून गेली होती.. सर्व साहित्य पॅक केले कपडे बदलले, आणी या थरारक बामणोली जंगलाचा निरोप घेतला, पंचवीस डिसेंबर ख्रिसमस ची ही रात्र माझ्या आयुष्यभर  स्मरणात राहील....

लेखन: -संदीप राक्षे
भोसरी पुणे २६

Monday, 25 December 2017

जगण्याचे बळ (कविता)

जगण्याचे बळ!

कोणाचीच कोणाला
नाही कळ कळ
स्वतःचीच पोळी
भाजतात सकळ !

पैसेवाला पैसेवाल्यालाच
देतो आहे बळ
गरीब बिचारा हाल अपेष्टा
भोगतो आहे वेळोवेळ !

लुटारूंच्याच घरी
पैशांची खळ खळ
संत बिचारा दररोज
एक पैशासाठी जळ !

कधी जाईल काळ
कधी येईल वेळ
कोण देईल आम्हास
जगण्याचे बळ !

कोण असेल वाली,
सावरणारा दाता,
करुण कहाणी आमची,
ऐकून घेणारा कर्ता !

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Friday, 22 December 2017

हदयसम्राज्ञी (कविता)

हदयसम्राज्ञी!

हदयाच्या बदामी कप्यात
मनाच्या अंतर्मनात
रुतून बसतेस खोलवरी !

स्वप्नांच्या चंदेरी दुनियेत
गुलाब कळीतली
भासतेस परी तुच खरी !

सुरांच्या या मैफिलीत
तालाच्याही लयीतली
असतेस तूच सूरसरी !

मोहूनी मन माझ जात
अश्रु नयनातून वाहता
दाटून कंठ येतो अंतरी !

धीर अधीर वारा ही होतो
तन मन शहारते तेव्हा,
तुझ्याच प्रीतीत ग सावरी !

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Thursday, 21 December 2017

भटकंती(भंडारदरा)

*भटकंती महाराष्ट्राचे "स्वित्झर्लंड"भंडारद-याची*

*निसर्गाच्या संगतीत फिटतो संदेह*
*वितळतो क्षोभ माया मोह*
*त्याच्या संकीर्तनी मुरविता देह*
*भेटतो उजेड अंतर्बाह्य*

शनिवार रविवार आला की निसर्गाच्या सान्निध्यात मनसोक्त भटकंती करायची हा नित्य नेम,खुप दिवसांपासुन भंडारद-याला जायचा विचार होता.पण योग येत नव्हता,पण ठरवल जायचंच माझ्या सोबत आमच्या बँकेचे माझे जुने सहकारी दादु डोळस साहेब तयार झाले. खूप अडचणी आणी खराब रस्ते सगळं काही मला निश्चयापासून दूर करणारे होते,पण दृढ निश्चयापुढे कोणतीच समस्या टिकत नाही. दुपारी १२ वाजता निघून रात्री ८ वाजले यश रिसोर्ट(शेंडीला)पोहचायला रात्री सगळेच भेसूर वाटत होते. पण सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने सकाळी सहा वाजता जाग आली, पडदे बाजूला सरकवले तेव्हा निसर्ग देवताच साक्षात उभी होती. रात्रीच ओळख झालेला शुभम काळे अठरा वर्षाचा युवक यश रिसोर्ट च्या दारात गाडी घेऊन उभा होता,मी व डोळस साहेब गाडीत बसलो आणी शुभम काळे याने माहीती देण्यास सुरवात केली आज आपण बावन्न किलोमीटरचा प्रवास करणार आहोत,साक्षात निसर्गाचा चमत्कार अनुभवणार आहोत. भंडारदरा हे महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात.भंडारदरा-शेंडी हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले एक आदिवासी कोळी महादेव जमातीचे गाव.या भंडारदरा धरण परिसरात दहा किल्ले,शिखर आणी द-या व असंख्य जल साठे आहेत. रंधा धबधबा प्रसिद्ध आहे. तसेच कळसुबाई मंदिर,पांजरे बेट,अलंग, मलंग,कुलंगगड,उंबरदारा व्ह्युव पॉइंट, कोकणकडा,घाटनदेवी व्ह्युव पॉइंट,सांदन दरी,रिव्हर्स वॉटर फॉल,अमृतेश्वर मंदिर, नान्ही वॉटर फॉल,कळसुबाई शिखर,रतनगड,रंधा फॉल,घाटघर अशी निसर्ग रम्य ठिकाणे आहेत. शुभम सांगत होता.. माझे कान त्याच्या कडे पण नजर मात्र रस्त्याच्या कडेने दिसणा-य हिरडा,बेहडा,सादडा,जांभुळ,आंबा,उंबर या झाडांकडे होती. त्या झाडांवरून येणाऱ्या पक्ष्यांच्या आवाजाने कान तृप्त होत होते. नीरव शांततेत ते आवाज स्पष्ट ऐकू येत, घनदाट जंगलाचा भाग सोडून आम्ही धरणाच्या एका सपाट जागेवर येवुन थांबलो गाडीतून खाली उतरताच वा-याची एक मंद झुळूक धरणाच्या पाण्यावरून आली, ती झुळूक चैत्यन्य घेऊन आलेली,अंगावर रोमांच उभे राहिले,निळ्या स्वच्छ आकाशाचे प्रतिबिंब धरणाच्या जलाशयात एकरूप झाल्याने निळे पाणी आणी निसर्गाची हिरवाई यांच्या मिलनाने तयार झालेला देखावा जणू चित्रकाराच्या कुंचल्यातून चितारलेला भासत होता.सह्याद्रीच्या हिरव्या पर्वत रांगावर पिवळी फुले जणू काही धरणी मातेने हिरव्या रंगाचा शालूच ल्यायला होता.त्यावर सोनेरी बुट्टे होते. सोनकीच्या इटुकल्या पिटुकल्या फुलांचा फुललेल्या पुष्पमाळांनी पर्वत पठारे पीतवर्णी दिसत होती. रानतेरडा, रान गांजा, श्वेतांबरा, फांगळा, आभाळी, नभाळी, सोनटिकली, लाजाळू, जांभळी, मंजिरी, गोपाळी, रानतूर, सोनसरी, पांढरी, कोरांटी, उंदरी, कुसुंबी, अशा कितीतरी फुलांचा सडाच पडला होता. एक कणही प्रदूषणाचा नसल्याने दूरदूरचे अगदी स्पष्ट दिसत होते. आॅक्सिजनच्या निळाईने एक निळसर झालरच पसरावी असा डोंगराच्या व आभाळाच्या मध्यभागी एक पट्टाच दिसत होता. सकाळची दवं फुलांच्यावर मोत्यासारखी दिसत होती. सकाळची दवं फुलांच्यावर मोत्यासारखी दिसत होती. त्या दवांवर सुर्यकिरण पडले की इंद्रधनुष्याचे रंग प्रकट होत होते.
*कोणी सांडले दवबिंदू इथे*
*जशी मोती माळून धरती सजली*
*सूर्याने ही घातली भरतिथे*
*भाळी टिळा लावून धरती सजली*
हा सगळा चमत्कार जणू मी स्वर्गातच होतो. पण चालताना पृथ्वीवर स्वर्ग उतरल्याची जाणीव होत होती. एका अद्भुत झ-याजवळ की जो कधीच आटत नाही, की जो खोल दरीत होता. प्रत्येकाची तृष्णा शमवत होता. मी  आणी डोळस साहेब त्या दरीत उतरलो, एक इंची नळ लावावा जसे पाणी त्या झ-यातून पडत होते. हातांची ओंजळ करून भरपूर पाणी प्यायलो, हिमालयातील गंगेच्या पाण्याची चव, पाणी इतके थंड की उदर शांत झाले. कोकणकडा बघून आम्ही रांधन घळी कडे निघालो. अनेक ठिकाणी पाण्याचे मोठे मोठे कालवे होते, त्यामध्ये हजारो झाडे, त्या झाडांवर बसलेले पांढरे बगळे असे भासवत होते की पाण्यातच सफेद रंगाचे फूल उमलेले आहे. आता उन्हाचा पारा चढला होता, हवेत गारवा होता. बाजुला सज्जनगड दिसत होता. त्याच्या पायथ्याशी अमृतेश्वराचे प्राचीन (पांडवकालीन) मंदिर शतकोत्तर त्याच अवस्थेत होते. मंदिराच्या समोरच पांडवांनी बांधलेला षठकोनी तलाव होता. दगडी बांधकाम व त्यावरील नक्षीकाम पुरातन संस्कृतीचे दर्शन घडवित होते.
*म्हणतो मलाही सांब*
*मी खेळ तव मनाचा*
*असतो निसर्ग सारा*
*कधी देव का कुणाचा*
*तुमच्या खुळया स्वभावी*
*मज देव जन्म आहे*
*कुणी देव का म्हणाना*
*अंती निसर्ग आहे.*
हे मंदिर पाहिल्यावर वरील आठवल्या, त्यातून भगवान शंकराचे आणि निसर्गाचे नाते उलगडले. इतक्या घनदाट जंगलात इतके सुंदर शिल्प संपूर्ण काळ्या पाषाणात इतके कोरीव काम खरच चमत्कारच. मंदिरातील गाभाऱ्याचा सुखद गारवा अंगावर साठवून, प्रदक्षिणा घालताना काही पर्यटक झाडाखाली बसलेले दिसले, एक जण कसली तरी माहिती देत होते, कुतूहल म्हणून त्यांच्यात सहभागी झालो, ते भंडारद-यातील काजवा महोत्सवाबद्दल बोलत होते. ते होते अकोले तालुक्यातील L.I.C चे डेव्हलपमेंट ऑफिसर श्री.वाणी साहेब, त्यांनी सांगायला सुरूवात केली, मी ही तिथेच ठाण मांडून बसलो. काजव्यांचा हा काही दिवसांचा अद्भुत खेळ जून महिन्यांच्या अगोदर सुरू होतो. ज्या झाडावर काजव्यांची वस्ती असते ती झाडे ख्रिसमस ट्री सारखी दिसतात. झाडांच्या खोडावर फांद्यांवर पानांवर लक्ष लक्ष काजवे बसलेले असतात. लुकलुकणारी ही काजव्यांची प्रकाशफुले आपल्या डोळ्यांना सुखावून जातात. कुतूहलमिश्रीत आणि भाव मुद्रेने निसर्ग वैभव आपण पहातच राहतो, आणी भान हरपून जातो. भोवतीच्या विराट पसा-यात रात्रीच्या प्रकाशाचा अदभुत खेळ खेळत स्वताला आपण हरवून बसतो. कुठ शेकोटीतल्या निखा-यावरून ठिणग्या उसळाव्यात तसे काजवे उसळत होते. रात्र चढता चढता रस्त्यातील वाहतूक कमी होत गेली, आणि कालजव्यांच्या झुळकावर झुळका येवु लागल्या, मिठ्ठ काळोख ओथंबलेल आभाळ गार वारा; हळू हळू नीरव शांततेन आसमंताला घेरून टाकल, आणी आतिषबाजी रंगात आली. रात्र चढत गेलेली कळलही नाही. काजव्यांनी मन वेड-पिस करून सोडल होत, रस्त्यालगत १५-२० फुटांच्या परिघात तीन उंच झाडांनी गोलाकार फेर धरलेला होता. माथ्यावर त्यांच्या फांद्या पानांचा पसारा आणि मध्ये आकाशाचा तुकडा या तीनही झाडांना पानांऐवजी काजवेच आले होते. झाड पेटूनच उठली होती. कधी हे झाड, तर कधी ते आणी अचानक आकाशातला काळोख दूर झाला. झाडांमधून दिसणारा आकाशाचा चतकोर चांदण्यांनी लखलखला नजरबंदी झाली. इथ आकाश नव्हते पण चांदण भरले होते, आकाश वरती की खाली हा संभ्रम नक्कीच होता. आता धुक्यांचा पडदा कळत न कळत जाणवत होता. मन उगीचच हुरहुरल, आता उजाडेल सुर्य प्रकाशापुढे काजव्यांची प्रभा ती काय, हा सर्व अनुभव मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. प्रत्येक क्षणांचे चित्र डोळ्यासमोर तरळत होते. इतका रोमांचकारी अनुभव ऐकून मन तृप्त झाले होते. त्याच वेळी निश्चय केला की पुढच्या वेळी नक्कीच यायचे काजवा महोत्सवाला. वाणी सरांचे आभार मानून पुढच्या प्रवासाला सुरूवात केली. पावसाळा संपल्याने बहुतेक धबधबे बंद झाले होते. कुठे तरी एखादी धार नजरेस पडत होती. आमच्या बरोबर जो मंगेश काळे होता तो तिथला स्थानिक असल्याने त्याला संपूर्ण माहीती होती. त्याने विचारले एक धबधबा सुरू असणार पण जाण्यास खुप अडचणी आहेत,  तुम्ही धबधबा पाहिलात की खुष होणार हे नक्कीच. आम्ही मंडाळा धबधब्याकडे जाण्यासाठी निघालो. गाडी जिथपर्यंत जात होती. तिथ पर्यंत गाडीने गेलो पुढची पाच किलोमीटरची चढण चढून जायचे होते. गाडी लावली आणि आम्ही तिघेजण चालु लागलो...भात खाचरांची शेती इंद्रायणी तांदळाचा सुमधूर वास वातावरणात दरवळत होता. पुढे टेकडी चढायची होती. झाडांच्या मुळांच्या आधाराने चढत होतो. चढण खूपच सरळ होती दम लागत होता, थोडा आराम करून पुन्हा टेकडी चढायला सुरवात केली. सोबत आणलेले पाणी संपले, तहान लागली होती, संपूर्ण जंगल असल्याने आजू बाजूला कोणीच नव्हते...थोडे चालून गेल्यावर एक झोपडी दिसली बरे वाटले. झोपडीत कुणीच नसल्याने तडकी लावलेली तिला कपड्याने बांधले होते. कुलपाच्या जागेवर चिरगुटाचा वापर केला होता. तुकडोजी महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे *या झोपडीत माझ्या*तशी ती होती. तहान लागल्याने मंगेशने तडकीचे चिरगुट सोडले, झोपडीत शिरला, टांगलेली शिकई दिसली, त्यात ताक होते, मंगेशने आतूनच विचारले पाण्याऐवजी ताक चालेल का? आम्ही आनंदाने हो म्हणालो, गाडगे तसेच तोंडाला लावले, घटाघटा सगळे ताक संपवले, ताकाची चवच वेगळी होती. पोटात वाढलेली उष्णता क्षणात कमी झाली. आता टेकडी चढायला थोडासा जोश आला होता. वेडी वाकडी वळणे चढत धबधब्याच्या जवळ पोहचलो, उंच  कड्यावरून खाली पडणाऱ्या पाण्याचे तुषार अंगावर उडत होते, धबधब्याचे विलोभनीय दृष्य पाहून हरवूनच गेलो. दुधाच्या धारा बरसाव्यात तश्या पाण्याच्या पांढऱ्या शुभ्र धारा उंचावरून कोसळत होत्या. धबधब्या खाली थोडे भिजलो तनासवे मन ही ताजे तवाने झाले होते. आता टेकडी उतरायची होती, चढाई करणे सोपे पण उतरणे खुपच अवघड, एकमेकांच्या सहाय्याने टेकडी उतरलो. हाताला गुडघ्याला खरचटले होते थोडा दगडी पाल्याचा रस लावल्याने जळजळ थांबली. मंडाळा धबधब्याचा थरारक अनुभव घेऊन पुढे कळसूबाई शिखराकडे निघालो पण वेळ कमी असल्याने कळसूबाई देवीच्या पायथ्याचे दर्शन घेतले. पुढच्या वेळी शिखरावर जायचे हे मनात ठाम केले. द-या, कडे, कालवे, किल्ले, शिखरे, फुल, वेली, पशु पक्ष्यांचा आवाज पुरातन वास्तू यांच्या सानिध्यात व्यतीत केलेला आनंदी  दिवस हदयात बंद करून, परतीच्या प्रवासास सुरवात केली.
*कंठी येती गाणी कुठली*
*पाखरांसही भूल पडे*
*निसर्ग सारा गातो गाणे*
*रोमांचित होऊनी मन बागडे*

*संदीप राक्षे*✍🏻
*भोसरी पुणे २६*
*८६५७४२१४२१*

सत्य संकल्पाचा दाता! आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा!

सत्य संकल्पाचा दाता! आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा.. संदीप राक्षे✍🏻 संत तोचि जाणा!  जो देही उदार!! म्हणजे खरा संत तोच ...