Wednesday, 21 February 2018

माझा प्रथमच हवाई प्रवास

*माझा प्रथमच हवाई प्रवास*
*देवभुमीच्या व्दारात...*

पुण्यात कामानिमित्त माझे हदयबंध मित्र मोहनशेठ लबडे यांच्या सोबत गेलो होतो. महत्वाची काम उरकून आम्ही परतीच्या मार्गावर होतो तेव्हाच मोहनशेठला एक फोन आला आणि तुम्ही ऋषीकेशला येवू शकता का? क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी त्यांना होकार दिला. लगेच मोहनशेठने त्यांच्या मॅनेजरला फोन लावला आणी देहरादूनची तीन विमानाची तिकटे बुक करायला सांगितली.थोड्याच वेळात विमानाची तीन तिकीट त्यांच्या ईमेलवर आली. त्यांनी मला व्हाटसअपवर मेसेज पाठविला, मला म्हणाले व्हाटसअप चेक करा, मी व्हाटसअप उघडले आणी मेसेज पाहिला तर त्या तिकीटावर माझे पण नाव होते.. मी बसलेल्या जागेवरून फुटभर उंच उडालो.. थोडावेळ मी स्वप्नात तर नाही ना असे वाटले. कारण होते आयुष्यतला पहिला विमान प्रवास  म्हणून मनाला खुपच आनंद झाला होता. खुप दिवसाचे स्वप्न साकार होणार होते. थोडावेळ मोहनशेठ कडे पाहिले मनात विचार आला, कसे इतके ऋणानुबंध जुळले, ही सर्व माऊलींची कृपा होती कारण त्यांनीच आमची भेट घडवून आणली होती. माझ्या स्वप्नाची  पूर्तता माझ्या मित्रानी केली. आयुष्यात पहिले दोन मित्र लाभले ते म्हणजे पं कल्याणजी गायकवाड, दुसरे विनोदभाऊ चौधरी आणी आता मोहनशेठ लबडे हे खरोखरच माझ्या साठी त्रिमूर्ती आहेत. मी जरी जगाचा विचार करीत असलो तरी हे तिघेजण माझाच विचार करतात.

*नहीं तोल सकता जिसे कोई धन!*
*सच्ची दोस्ती जिसके पास है!*
*उसके पास दौलत की भरमार है!*
*न ही जीत न ही कोई हार है!*
*दोस्त के दिल में तो बस प्यार ही प्यार है!*

ऋषीकेशला जाण्यासाठी दोन दिवस उरले होते १४/२/१८ रोजी  दुपारी दोन वाजताचे विमान होते..कधी तो दिवस उजाडतो असे झाले होते. प्रथमच विमान प्रवास मनात धाकधुकी होती. अखेर १४ तारखेचा दिवस उजाडला, सकाळी सात वाजताच  घर सोडले आळंदीतून आचार्य हरिदासजी पालवे शास्त्री यांना घेतले व खानावले पनवेल येथे मोहनशेठच्या घरी गेलो, तेथून त्यांच्या मर्सिडीज मधून छ शिवाजी महाराज इंटरनॅशनल विमानतळावर पोहचलो, चेकिंग झाली. जस जशी विमान उड्डाणाची वेळ जवळ येत होती तसे छातीचे ठोके वाढत होते. हाता पायाला घाम सुटला होता. मनाला धीर देत होतो. पण मन ते विमानाच्या वेगापुढेही धावत होते. निरनिराळी चित्र मेंदू पटलावर उमटत होती. अशातच विमानाची अनाऊसमेंट झाली. पुन्हा चेकिंग करून विमानाची पहिली पायरी चढलो, मनात असलेली भिती थोडी कमी झाली..अखेर विमानाच्या शीटवर जावून बसलो.. इतर प्रवाशांच्या चेहऱ्या कडे पाहिले एकदम रिलॅक्स होते. मनाला समजावले इतका मोठा आनंदाचा क्षण आणी तू काय नव नविन विचार मनात घेऊन येतोस, आता मी पण रिलॅक्स झालो होतो.. हवाई सुंदरी आल्या त्यांनी उपयुक्त माहिती दिली बेल्ट बांधायला सांगितले आणी लगेचच विमान सुरू झाले. हळू हळू विमान चालु लागले थोड्या अंतरावर गेल्यावर स्पीड वाढले तशातच विमानाने आकाशाकडे झेप घेतली.. खिडकीतून बाहेरचे चित्र पहात होतो.. मोठ मोठ्या दिसणा-या बिल्डींग माचीसच्या आकाराच्या दिसत होत्या..काही उंचीवर गेल्यावर विमान सरळ झाले..आता खिडकीतून फक्त विशाल असे आकाश आणी ढग दिसत होते. आजुबाजुला पांढरी फुल उमलावी तसे ढग दिसत होते, कधी तरी सुर्यदेवाचे दर्शन व्हायचे, कधी निळे निरभ्र आभाळ स्पष्ट दिसायचे. मधेच धरतीचे दर्शन व्हायचे डोंगर द-या इतक्या उंचावरून मनमोहक दिसायच्या, एखाद्या शिल्पकाराने शिल्प कोरावे तशी धरतीमाता दिसत होती. दोन तास कधी झाले हे कळलेच नाही... विमान देहरादूनच्या विमानतळावर घिरट्या घालत होते. अजून विमानाला उतरायचा सिग्नल मिळत नव्हता. अखेर परवानगी मिळाली. आणी हळू हळू विमान खाली उतरू लागले...हिमालयाचे भले मोठे पर्वत स्पष्ट दिसत होते. कुठेतरी बर्फाच्या डोंगरावर सुर्यदेवाची किरण पडून सुवर्णमयी पर्वत दिसत होते. 
थोड्याच वेळात आपले विमान देहरादून विमानतळावर उतरवणार आहे असा संकेत कॅप्टन ने दिला. खुप वेळचा दबावात असणारा मी आता सुटकेचा निश्वास सोडला होता. विमानतळावरून टॅक्सी केली आणी टॅक्सी देवभूमी ऋषीकेशला निघाली.. विमानतळावरून तीस किलोमीटर ऋषीकेश होते. आता हवेत बदल झाला होता. वातावरण चैतन्यमयी भासत होते..अनेक डोंगर झाडी पार करीत होतो. पावसाळ्यात वाहणाऱ्या नद्या कोरड्या पडल्या होत्या. नदीच्या पात्रात वाळूचे भले मोठे खच पडलेले दिसत होते. हवेत झाडात पानात एक नविनच चैतन्य दिसत होते. प्रत्येक पान फूल साक्षात देवरूपी दिसत होते. आमची गाडी ऋषीकेशला पोहचली, गाडीतून खाली उतरलो आणि गंगेच्या दिशेने चालू लागलो. दूरवरूनच गंगेचा काठ दिसत होता. कधी एकदा गंगेचे दर्शन घेतो असे झाले होते. आता आतुरता संपली होती, आम्ही तिघेजण गंगेच्या काठावर पोहचलो होतो..पायऱ्या उतरून गंगेत पोहचलो पाण्याचा प्रवाह तेज होता. पाण्यात हात घातल्या बरोबर बर्फाचेच पाणी ते भयंकर गार लागले. थोडावेळ तसेच हात पाण्यात ठेवले काय चमत्कार साक्षात थंड असलेले पाणी गरम वाटू लागले. खरच गंगा ही सर्वश्रेष्ठ आईस्वरूप का मानतात हे मला कळले,हातात पाणी घेऊन डोळ्यांना लावले, डोक्यावर हात फिरवला जन्मोजन्मीचा शीण गेल्याचा भास झाला. गंगा ही अमृततुल्यच वाटत होती...

*गंगा तेरा पानी अमृत, झर-झर बहता जाए*
*युग-युग से इस देश की धरती तुझसे जीवन पाए!*

*कितने सूरज उभरे डूबे गंगा तेरे द्वारे*
*युगों-युगों की कथा सुनाएं तेरे बहते धारे*
*तुझको छोड़ के भारत का इतिहास लिखा न जाए!*

*हर हर गंगे कह के दुनिया तेरे आगे झुकती*
*तुझी से हम सब जीवन पाएं, तुझी से पाएं मुक्ति*
*तेरी शरण मिले तो मईय्या, जनम सफल जो जाए!*

गंगेचे दर्शन घेऊन तिच्याच किनार्‍यावरून होडीत बसून मुक्कामाच्या ठिकाणी निघालो होतो..मध्यभागी आल्यावर गंगेच रौद्ररूप पहायला मिळाले. हवा, गारवा आणी पाणी या त्रिवेणी संगमाने आम्हाला थंडी भरू लागली होती. अंतर थोडे राहिले होते..हिमालयाच्या भल्यामोठ्या पर्वत रांगातून वाट काढीत धरतीवर स्थिरावते ते ठिकाण म्हणजे ऋषीकेश!
ऋषीकेश हे केदारनाथ,बद्रिनाथ, गंगोत्री,यमुनोत्री यांचे मुख्य प्रवेशद्वार येथे ध्यान धारणा केल्याने मोक्ष प्राप्ती होते असे नावाडी सांगत होता.. अखेर आमची होडी  दुसऱ्या किनार्‍यावर आली पुन्हा एकदा गंगेच दर्शन घेतले आणि मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो...

*शंभो शंकरा करूणाकरा जग जागवा*

आज भल्या पहाटेच जाग आली, पण रूमच्या बाहेर पडण्याची हिंमत होईना, प्रचंड गारवा होता. सोबत जे आचार्य हरिदासजी पालवे शास्त्री होते त्यांनी निर्धार केला होता काही झाले तरी स्नान गंगेतच करायचे. आम्ही पण थोडा विचार केला, साक्षात गंगा जिथे धरतीवर प्रकट होते ते पवित्र स्थान, असा दुर्मिळ योग पुन्हा नाही. मग मी आणी मोहनशेठ यांनी पण निर्णय घेतला आपणही गंगेत स्नान करायचे. तिघेही गंगेजवळ पोहचलो कपडे काढले, अगोदरच थंडीने संपूर्ण अंग लटलट काफत होते. आता साक्षात बर्फाच्या पाण्यात उतरायचे होते. एक पाऊल पाण्यात टाकले, पायाला कळा आली पटकन पाय बाहेर काढला. आता धाडस होईना पाण्यात उतरायचे, तो पर्यंत पालवे शास्त्री पाण्यात उतरून डूपकी मारून काठावर आले होते. मी पण पाण्यात उतरलो एक एक पायरी खाली उतरून गुडघ्या इतक्या पाण्यात उभा राहिलो.. मनपूर्वक साष्टांग नमस्कार गंगामातेला केला. एका जागेवर पाण्यात उभा राहिलो, पाय बर्फयुक्त पाण्याने बधिर झाले होते. दहा मिनिट पाण्यात तसाच उभा राहिलो, आता पायाचा बधिरपणा कमी होऊन पाय गरम पडले होते. हा चमत्कार मी स्वता अनुभवत होतो. प्रवाह इतका होता की थोडे विरूद्ध दिशेने पाण्यात खाली बसलो तर पाणी ओढून घेत होतो. तशातच शांत उभा राहिलो. माऊलींचा जप केला, थोडे संस्कृत मंत्र पाठ होते ते म्हणालो. पसायदान म्हणताना एक नविन उर्जा त्या गंगेच्या पाण्यात मिळत होती. आता गंगेच्या बाहेर जाण्यास मन तयार होत नव्हते, असेच तासनतास उभे राहून या पवित्र अमृतमयी गंगेत हा विकाररूपी देह पवित्र करून घ्यावा असे वाटत होते.. किती आध्यात्मिक ताकद या वातावरणात होती, याचे मोजमाप कशानेच करू शकत नाही. शांत डोळे मिटले पुन्हा शिवोहम हे नाम जपण्यास सुरवात केली, नीरव शांतता तिथे कसलाच भंग नव्हता, विजेच्या प्रवाहात वाहत जाणारे गंगाजल ते ही शिवनाम गर्जत आहे असे वाटत होते. तना मनाने आता गंगा मैयाशी एकरूप झालो होतो. बराच वेळ आईच्या सानिध्यात असल्या सारखे वाटले. गंगेच्या बाहेर आलो ओल्या अंगानेच आश्रमात परतलो, कपडे बदलून चहापाणी उरकून निळकंठेश्वराच्या दर्शनासाठी निघालो. हे मंदिर पण भरपूर उंचावर असल्याने पायरीचे दर्शन घेतले. समुद्र मंथनातून निघालेले विष भगवान शंकराने याच ऋषीकेश मधे प्राशन केले तेथे त्या वेळेस भगवान शंकराचा गळा निळा झाला, तेव्हा पासून शंकराचे नाव नीळकंठ पडले त्याचे प्रतिक म्हणून हे नीळकंठ मंदीर स्थापन केलेले आहे. एका एका दिव्य अनुभूतींची माहिती घेत आम्ही कैलास आश्रमा कडे आलो. १३३ वर्ष जुना असलेला हा आश्रम गुरूकूलाची साक्ष देत होता..या आश्रमताच स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ आणी स्वामी शिवानंद यांनी आश्रमात राहूनच ज्ञान साधना,योग साधना, प्राप्त केली. अशा चैतन्यमयी आश्रमाचे दर्शन घेतले.. मनाला एक नविन उर्जा मिळाली. स्वताला धन्य समजत होतो ज्यांनी संपूर्ण जगात ज्ञान योग आध्यात्म भक्ती दिली त्या या महापुरुषांच्या सहवासाने गंधीत असलेल्या क्षेत्रात आम्ही होतो..आम्हाला मसुरीला जायचे असल्याने पुन्हा गीता भवन कडे आलो गीता भवन पाहिले, गंगेच्या काठाने रामझुल्या कडे निघालो, पण एक विशेष बाब नजरेत भरत होती ती म्हणजे या सर्व ठिकाणी आम्हाला फक्त विदेशी पर्यटक दिसत होते, कोणी ध्यानात मग्न तर कोणी भजनात दंग कोणी गंगेत उभे तर कोणी गंगा काठावर जप म्हणताना दिसत होते. ठिक ठिकाणी भले मोठे होल्डिंग दिसत होते त्या होल्डिंग वर सुद्धा परदेशी योगींचे फोटो दिसत होते. आपल्या पेक्षा या भुमीचे आकर्षण त्यांना होते. मला अभिमान वाटला आपल्या या भारतभूमीचा खरच "देवभूमी" का म्हणतात याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. आम्ही सर्वजण या भूमीत येवून पवित्र पावन झालो...

*जाता ऋषीकेशी मिळे मोक्ष प्राप्ती!*
*होती मन बुद्धी देह शुद्धी सकळांची!*

ऋषीकेशचा उर्जात्मक व आध्यात्मिक प्रवास संपवून मसुरी उत्तराखंड येथे आमचे स्नेही आंतरराष्ट्रीय तबला वादक शिवाजीराव गायकवाड यांच्या आग्रहास्तव मसुरी या निसर्गरम्य बर्फाच्छादित अशा पर्यटन स्थळाला भेट देण्याचे ठरले, ज्यांच्या मुळे या सहलीचा योग आला असे आमचे हदयबंध परममित्र उद्योगपती मोहनजी लबडे, आचार्य पालवे शास्त्री हे सोबत होते... समुद्र सपाटी पासून ७००० हजार फुटावर हिमालयाच्या कुशीत वसलेले मसुरी हे शहर डोंगर कपारीत वसलेले आहे. दुपारी दोन वाजता आम्ही मसुरीला पोहचलो शिवाजीरावांनी मनपूर्वक आमचे स्वागत केले, शिवाजीरावांनी त्यांच्या सर्व मित्रांना आमची ओळख करून दिली.. त्या मधे प्रसिद्ध सितार वादक सुरमणी अग्नी शर्माजी होते त्यांनी संध्याकाळी घरी येण्याचा आग्रह केला. त्यांच्या आग्रहाखातीर आम्ही सर्व जण त्यांच्या घरी गेलो घरात शिरल्या शिरल्या साक्षात सरस्वती मातेचे दर्शन झाले.. आज संगीताची मेजवानी मिळणार हे जाणले.. शर्मा भाभीजींनी छान पोह्यांचा बेत केला होता चहापाणी झाले. आणी संगीत सभेला सुरवात झाली.. मनसोक्त गप्पा मारल्या अग्नीजींनी सितार विषयी माहिती देण्यास सुरवात केली..१४ व्या शतकात अल्लाउद्दीन खिलजी यांच्या दरबारात अमीर खुसरो यांनी मध्यमादि विणेला तीन तार चढवून सतहार या वादयाची निर्मिती केली. काही कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन सितार हे वाद्य जगप्रसिद्ध झाले...आपल्या भारतात पंडीत रविशंकर या वादयाचे गॉडफादर मानले जातात...त्यांचाच आदर्श घेऊन अग्नीजी या सितारचे सुप्रसिद्ध वादक बनले..सितार वादनाचे अनेक कार्यक्रम  परराष्ट्रात जाऊन केले, तसेच अनेक वर्ष ते भारताचे संगीत क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत आहेत. सितार वादनातून अनेक दुर्धर आजार बरे व्हावेत हा अग्नीजी शर्मा यांचा मानस आहे. त्यावर त्यांचे कार्य सुरू आहे..
सितार विषयी खुप छान माहिती दिली...त्यानंतर अग्नीजी व शिवाजीरावांची छोटीशी संगीतसभा झाली..अनेक चित्रपटातील मुखडे अगदी सहज वाजवून दाखविले; तीव्र थंडी त्यात सितार व तबल्याचा गोडवा वातावरणात थोडीशी उब निर्माण करीत होते.. मनमुराद संगीताचा आनंद घेऊन आम्ही सर्वजण मंत्रमुग्ध झालो...
सुरमणी अग्नीजी शर्मा यांनी त्यांच्या सितार वादनाची Dvd भेट देवून आम्हा सर्वांचा सन्मान केला.....

*सुर और संगीत बिना जीवन सुना*

संगीताचा मनसोक्त आनंद घेऊन मसुरीची ती रात्र सूरमयी झाली होती..रात्रीचे बारा वाजले होते, थंडीने तर निचांक गाठला होता. हिटर जवळ बसून कशी तरी थंडी कमी करायचा प्रयत्न करायचो पण थोडे बाजूला गेले की पुन्हा थंडी वाजायची आयुष्यात पहिल्यांदाच या थंडीचा अनुभव घेत होतो..झोपताना तीन टी शर्ट जर्किंग व अंगावर दोन रजई घेतल्या तरी थंडी वाजत होती..मुटकूळा घालून कशी तरी झोप लागली..सकाळी उठलो सकाळचे सर्व विधी उरकले आणी आज शिवाजी सरांची इंन्टरनॅशनल स्कूल व कँम्पटी फाॅल पहायचा होता..

*भारतीय संस्कृतीचे जतन करणारी मी पाहिलेली इंग्रजी इंन्टरनॅशनल स्कूल*

आज भारतीय संस्कृतीचे अनुकरण भारतीयांच्या पेक्षा परदेशी करीत आहेत हे चित्र मला ऋषीकेशला पहावयास मिळाले. मसूरीला आलो असताना आंतरराष्ट्रीय तबला वादक शिवाजीराव गायकवाड ज्या स्कूल मधे संगीत टीचर म्हणून कार्यरत आहेत ती मसूरी इंन्टरनॅशनल स्कूल पहाण्याचा दुर्मिळ योग शिवाजीरावांच्या मुळे आला. तसा या शाळेत इतरांना प्रवेश निषिद्ध आहे. इंग्रजी माध्यमाची शाळा पण तिथे भारतीय संस्कृतीला प्राधान्य हे पाहून मनाला आनंद वाटला. शाळेच्या प्रत्येक भिंतीवर संस्कृत मधून श्लोक लिहीलेले ते वाचता वाचता असे वाटत होते आपण कुठे तरी काही शतक मागे जावून ऋषी मुनींचा गुरूकूलात आलो असे भासत होत. विशेष म्हणजे स्कूलची सकाळची सुरवात संस्कृत मंत्राने होते. दर आठवड्याला होम हवन होतो त्या मधे विद्यार्थ्यांची पॉझिटीव्हीटी वाढविण्याचे कार्य होते..यामुळेच वातावरणात चैतन्य रहाते. निगेटिव्ह विचार दूर होऊन मनशक्ती स्ट्राँग बनते, इंग्रजी सोबत संस्कृत संगीत साहित्य चौसष्ट कला या इंटरनॅशनल स्कूल मधे शिकवले जातात. या स्कूल मधे विविध देशातील परदेशी मुली शिक्षण घेतात. शिवाजीरावांनी अजून एक आश्चर्याची गोष्ट सांगितली ती म्हणजे या स्कूल मधे भरपूर अशा मुस्लीम मुली सुद्धा शिक्षण घेत आहेत... आपल्या कडे इंग्रजी शाळा पाहिल्यातर भारतीय संस्कृतीचे वावडे असणाऱ्या शाळा पहायला मिळतात,आणी येथे आपली संस्कृती शिकण्यासाठी बाहेरून मुली या स्कूल मधे अ‍ॅडमिशन घेतात खरच आपलेच दुर्दैव म्हणावे लागेल...आमच्या बरोबर आचार्य पालवे शास्त्री होते त्यांनी मधेच एक विषय सांगितला आज आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ आपल्या संस्कृत भाषेचा अभ्यास करीत आहेत..तसेच अंतराळात पाठविलेले यान यांचे प्रोग्राम ते संस्कृत भाषेत करीत आहेत... पुढचे सर्व आयटी क्षेत्र हे संस्कृत भाषेतून चालणार आहेत.. कारण संस्कृत ही देवभाषा आहे त्या भाषेला एक आध्यात्मिक दृष्टिकोन आहे.हे ऐकून आम्ही सर्व जण आश्चर्यचकित झालो. हे ऐकता ऐकता आम्ही शिवाजीरावांच्या संगीत क्लास मधे येवून पोहचलो. भारतीय संगीतातील प्रत्येक वाद्य इथे पहावयास मिळाले.. प्रत्येक वाद्य शिवाजी सरांनी लिलया वाजवून दाखविले, आम्ही सुद्धा ही वाद्य वाजविण्याचा मनसोक्त आनंद घेतला. या स्कूल मधे शिकणारी प्रत्येक मुलगी हे वाद्य सहज वाजवते. भारतीय संस्कृतीने परिपूर्ण असणारी ही स्कूल मनाला खुप भावली. असे स्कूल जर भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी झाले तरच आपली हि भारतीय संस्कृती टिकणार आहे. अन्यथा आपल्या कडे कॉन्व्हेंट स्कूल आहेतच संस्कृतीचा -हास करायला...

*संदीप राक्षे ✍🏻*
*भोसरी पुणे २६*

No comments:

Post a Comment

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...