Wednesday, 22 January 2020

जैन मंदिर डिंबे धरण

शंभर वर्षांपूर्वीचे जैन मंदीर, वीस वर्षे पाण्यात राहूनही सुस्थितीत, वास्तुशास्त्राचा अद्भुत चमत्कार,,

डिंभे धरणात गेली वीस वर्षापासून पाण्यात असणारे मंदीर, धरणातील पाणी कमी झाल्याने ते मंदीर दिसू लागले अशी फेसबुकला या मंदिराच्या विषयी पोस्ट वाचली त्या मंदिराचे फोटो पाहिले व त्या मंदिराच्या विषयी आकर्षण वाटू लागले कधी एकदा हे मंदिर स्वता:च्या डोळ्यांनी पहातो असे झाले होते.
शुक्रवारी रात्री झोपण्याचा प्रयत्न करीत होतो पण काही केल्या झोप काही लागेना, सतत त्या मंदीराचा विषय मनात यायचा उशिरा पर्यंत तेच मंदीर नजरे समोर दिसायचे, रात्रीच निश्चिय केला, पहिले हे डिंभे धरणातील मंदिर पहायचे व पुढे भिमाशंकरला पण दर्शनासाठी जायचे या विचारातच झोपी गेलो...
शनिवार दि ११/५/२०१९ रोजी सकाळी १० वाजता माझा चिरंजीव संकेत व पुतण्या रितेश यांना सोबत घेतले व प्रवासासाठी निघालो. सकाळचे दहा वाजल्याने रस्त्यावर गर्दी होती. चाकण पास केले व खेडच्या पुलाजवळ आलो पुलावरच ट्रॅफिक जॅम झालेली दिसली, गाडी वळवली व चासकमान, वाडा मार्ग धरला, नागमोडी रस्ते डोंगराच्या कडेने ओसाड पडलेल्या डोंगर रांगा पहात पहात प्रवास सुरू होता. भोरगिरी डोंगराचा घाट सुरू झाला होता. इतका वेळ मागेच गाडीत डिझेल भरायचे लक्षात आले नाही पिवळी लाईट लागून फक्त एकच कांडी डिझेलची दिसत होती. मनात धडकी भरली इकडे तर पेट्रोल पंप पण नाही अचानक बंद पडली तर या विचाराने गोंधळून गेलो. भिमाशंकर जवळील तळेघर पर्यंत आलो घोडेगाव वरून येणारा रस्ता त्या रस्याला मिळत होता भिमाशंकर तेथून फक्त सतरा किलोमीटर होते व घोडेगाव अठरा किलोमीटर होते. गाडीत डिझेल फारच कमी होते. भिमाशंकर ला जावं तर गाडीतले डिझेल संपणार मग पुन्हा घाट उतरून घोडेगाव गाठले तिथे गाडीत डिझेल भरले दुपारचा एक वाजला होता. तिघांना पण प्रंचंड भूक लागली होती मस्त घरगुती पद्धतीच्या जेवणाचे हाॅटेल दिसले. मासवडी, शेंगुळी, पिठलं भाकरी, लसणाचा ठेचा, लाल मिरचीचा ठेचा, अशा पंचपक्वांनावर ताव मारला,
घोडेगाव पासून डिंभे धरण जवळच होते पहिले जैन मंदीर पाहून मग भिमाशंकर दर्शनाला जायचे ठरले, मग आदल्या रात्री मी ठरवलेला रस्ता आठवला मंचर मार्गे घोडेगाव व तेथून डिंभे धरण मग भिमाशंकर महादेवाचे दर्शन असे ठरवले होते. भिमाशंकर मंदिराच्या इतक्या जवळ जावूनही आपण भिमाशंकराला का जावू शकलो नाही कारण होते डिझेल व रात्री ठरवलेले पहिले दर्शन जैन मंदिराचे व मग भिमाशंकराचे. गर्दी मुळे दुस-या रस्त्याने आलो तेथून भिमाशंकर जवळ होते, तरी जसे रात्री ठरवले तसेच माझ्या कडे ये हीच इच्छा भगवान महादेवाची होती..
भोसरी, चाकण, खेड, मंचर, घोडेगाव, डिंभे असा ८० कि.मी प्रवास करत आपण आंबेगावात पोहचतो. आंबेगाव तालुक्यातील आंबेगाव हे २० वर्षांपूर्वी सर्व संपन्न गाव होतं. उत्तम बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेल्या या गावात तालुक्यातील अनेक गावची मंडळी कामा साठी येत होती. कारण आंबेगाव म्हणजे हेच तालुक्याचे एकमेव उत्तम ठिकाण होते. जुन्या पध्दतीच्या विटांमध्ये बांधलेल्या इमारती, विविध मंदिरे व चारही दिशांना पसरलेल्या सह्याद्रीच्या सुंदर रांगानी हे गाव अजुनच वैभवसंपन्न दिसत होते. त्यात भर घातली होती ती गाव किना-यावरून खळखळ वाहणा-या घोडनदीने.
डिंभे धरणाचे बांधकाम इ.स.१९७८ मध्ये सुरु झाले व इ.स. २००० मध्ये पूर्ण झाले. तेव्हा पासून हे धरण कायम भरलेले असायचे पण पुरेसा पाऊस न झाल्याने धरणातील पाणी साठा संपलेला होता कधीकाळी तुडूंब भरलेले धरण कोरडे पडले होते, धरणाच्या बंधा-या जवळच पाणीसाठा दिसत होता. धरणातील जैन मंदीर कुठे दिसते का पहात होतो पण मंदिर कुठेच दिसत नव्हते, धरणावरच दोन महिला एस टी ची वाट पहात बसल्या होत्या त्यांना मी विचारले? धरणात एक जैन मंदीर आहे ते पाणी कमी झाल्याने दिसत आहे. दोघींनी पण एकावेळेस उत्तर दिशेला हात केला तिकडे ते मंदीर आहे..मंदिराची काळी आकृती दिसत होती. संपूर्ण डिंभे धरणाला गोल वेढा घालून त्या मंदिराकडे जायचे होते..

भोरगिरी पर्वताची नैसर्गिक वनराई,
आयुर्वेदाची, रानमेव्यांची, प्राण्यांची
काळ बदलला, वणवा, जंगलतोडीने
डोंगराई भासते जणू दगड खाच खळग्यांची..

मन हेलावून टाकणारे दृष्य दिसत होते, डिंभे धरण कायम पाण्याने भरलेले असायचे तेच आता भेगाळलेल्या स्वरूपात दिसत होते, डोंगर काळे ठिक्कूर पडलेले दिसत होते. आज ही अवस्था तर भविष्यात काय परस्थिती असणार आहे. खरच माणसांचे निसर्गाच्या प्रति असणारे प्रेम, सत्ताधिशांचे दुर्लक्ष या बाबी भविष्यात जीवघेण्या नक्कीच ठरणार आहेत. या विचारातचं जुन्या व धरण बाधित आंबेगावच्या हद्दीत पोहचलो, डांबरी रस्ता सोडून कच्या रस्त्याने, पाणी आटल्याने जैन मंदीरा पर्यंत फोरव्हिलर गाडी सहज जात होती.
डिंभे धरणाच्या बंधा-याहून ठळक दिसणारे मंदिर जवळ आल्यावर पुसटसे दिसत होते खरच हा एक चमत्कारच होता. मंदिराकडे जाताना असंख्य विटांचे, दगडांचे ढिगारे पडले होते, कोरलेले दगड भग्न अवस्थेत पडलेले दिसत होते. मंदिराच्या जवळ गेलो तर विश्वासच बसेना शंभर वर्षांपूर्वीचे हे मंदिर वीस वर्षे पाण्यात राहूनही सुस्थितीत दिसत होते,
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती एकच मुर्ती सरस्वती मातेची दिसत होती, त्या खाली गज लक्ष्मीचे कोरलेले शिल्प डोळ्यांचे पारणे फेडते तर मुख्य प्रवेशद्वाराच्या उंच माथ्यावरील माता सरस्वतीची मूर्ती पाहताच या परीसरात माता सरस्वती अवतरल्याचा भास होतो. खांबावरील कोरीव नक्षी, छताचे गोलाकार सुरेख वर्तुळे, विविध कोरीवकाम व नक्षीकाम पाहण्यासारखे आहे. गाभा-याच्या प्रवेशद्वारावर माता सरस्वती सोबत दोन मोरांना घेऊन विराजमान झाल्या असून जनू त्या सांगत आहे की भक्तांनो पक्षी प्राण्यांवर प्रेम करा असेच सांगत असल्याचा भास होतो. मंदिराच्या काही भागावर पेंटींग केली होती. त्या पेटिंगचे कलर वेरूळ च्या पेंटींगच्या कलरची आठवण करून देणारे होते. कारण वीस वर्षे पाणी सुद्धा त्या कलरला पुसू शकले नाही. या मंदिरातील श्री कल्याण पार्श्वनाथ, श्री विमलनाथ तथा वासुपूज्य स्वामी आदि भगदंतोनी मुर्तिओ नेमज यक्ष यक्षणी आदि मुर्तिंची प्राणप्रतिष्ठा पू. आचार्यदेव श्रीमद विजय लब्धिसूरीश्वरजी यांच्या शुभहस्ते वीर संवत २४८८ विक्रम संवत २०१८ वैशाख शुद्ध ९/५/६२ रोजी करण्यात आली होती. ज्या मुर्तींची प्राणप्रतिष्ठा झाली त्या मुर्ती गाभा-यात नव्हत्या, तरी पण मंदिरातील चैतन्य कमी झाले नव्हते, अजूनही त्या देव देविकांचे अस्तित्व तिथे जाणवत होते. गाभा-यात मुर्ती नव्हती तरी दर्शन घेण्याचा भाव मनी प्रकट झाला. दर्शन घेऊन आजूबाजूचा परिसर पहात होतो. जिथे हे जुने आंबेगाव वसले होते तिथे एक मोठा पार असावा कारण एक वडाचे भले मोठे खोड अजूनही आपली मुळ खोल जमिनीत रूतवून समर्थ पणे उभे आहे. त्या खोडावर फोटो काढण्याचा आनंद काही वेगळाच होता. पण दु:ख होते ते इतके सुंदर मंदिर पाण्याखाली असते म्हणून..
संपूर्ण परिसर डोळ्यांत साठविला, दूरून मंदिराचे पुन्हा दर्शन घेतले आणि भिमाशंकर कडे निघालो....

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

No comments:

Post a Comment

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...