भारताच्या सुवर्ण वैभवाच्या पाऊलखुणा..
"हजार राम मंदिर" हंम्पी कर्नाटक
संदीप राक्षे ✍🏻
महानवमी दिब्बा पाहून पूर्ण शरीरात वेगळीच शक्ती संचारली होती. गाडी प्रत्येक ऐतिहासिक स्थळावर दूरच लावावी लागत होती आणि पायी जाव लागत असे त्यामुळे चालण्याचा व्यायाम पण होत होता. गाईड आम्हाला हजार राम मंदिराकडे घेऊन आला.
हंम्पी हे प्राचीन काळातील किष्किंदा क्षेत्र म्हणूनही सुपरिचित होते. रामायणातील वाली आणि सुग्रीव यांची किष्किंदा नगरी ही हम्पीच्या जवळच आहे. या मंदिरातील अभिलेखात कृष्णदेवराय या मंदिराचा निर्माण केल्याचा उल्लेख आहे. या अभिलेखात अन्नलादेवी किंवा अम्नोलादेवी या राणीने दान दिल्याचाही उल्लेख आहे. या मंदिराची निर्मिती इ.स. १५१३ झाली. हजार राम म्हणजे इथे श्री रामाच्या हजार शिल्पांचे दर्शन होते म्हणून या मंदिराला हजार राम मंदिर म्हणतात. आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत शिरलो, प्रवेश व्दारावरील अभिषेक लक्ष्मीचे दर्शन घेतले. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर पाच थरांमधली शिल्प पाहतच राहीलो तिथे फोटो काढण्याचा मोह आवरेना. या सर्वांत खाली हत्ती आणि त्यावर स्वार त्यांचे माहूत यांची शिल्प कोरलेली होती, दुसऱ्या थरामध्ये घोडे आणि त्यांचे स्वार, तर तिसऱ्या थरामध्ये सैन्य कोरलेल आहे. सोबतच उंटाची शिल्पही दिसतात याच थरामध्ये वाद्य वाजवणाऱ्या लोकांची शिल्पे आहेत. चौथ्या आणि पाचव्या थरामध्ये स्त्रिया नर्तन करताना शिल्पांकित केलेल्या दिसतात. तसेच कृष्णलीलेतील काही प्रसंग या थरा मधे कोरलेली दिसतात..
मंदिर परिसरात प्रवेश केला. राम मंदिर हे पूर्वाभिमुख असून गर्भगृह, अंतराळ, मुखमंडप, दक्षिण आणि उत्तर दिशेला दोन अर्धमंडप अशी एकूण रचना केलेली दिसली. मंदिराच्या पूर्व दिशेला महामंडप तो खास विजयनगर शैलीतील स्तंभांनी सुशोभित केलेला आहे. या मंदिरांसाठी ग्रॅनाईट या दगडाचा वापर केला असून असून मंदिराचे शिखर विटामधे बांधलेले आहे. मंदिराच्या आतून बाहेरून प्रत्येक ठिकाणी रामायणातील प्रत्येक प्रसंग कोरलेला आहे. ही शिल्प पहाताना रामायण आपल्या डोळ्यासमोर उभे राहते..
या प्रसंगातील मला समजलेली काही शिल्प चित्र, दशरथ आपल्या चार पुत्रांसोबत म्हणजेच राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या समवेत बसलेले दाखवले आहे. सीता माता लक्ष्मणाला हरिण दाखवत आहे. रामाला वनवासाला पाठवून भरताचा राज्याभिषेक करावा यावर दोघी भाष्य करताना शिल्पांकित आहे. भरत भावाच्या वियोगाने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेऊन हात जोडून त्यांची पूजा करीत आहे. सीता माता अशोकवनात बसलेली आहे, सीतामाता हनुमानाला तिच्या बोटातील अंगठी देताना. भरतभेट, राम रावण युद्ध, शबरीची बोरे, राम हनुमान भेट, सीता स्वयंवर, असे अनेक प्रसंग सुंदर शिल्पांकित केलेले आहेत. प्रत्येक प्रसंग मी, संकेत व सुरज नळगुणे डोळे भरून पहात होतो. मंदिराच्या गर्भगृहात मुर्ती नसली तरी हजार राम शिल्पांनी मंदिर चैतन्यमयी दिसत होते. मंदिरातील खांब चिकन्या काळ्या रंगातील होते त्यावरही अनेक शिल्प कोरलेली दिसत होती. संपूर्ण मंदिर पहाताना रामायणातील प्रत्येक प्रसंग नजरेसमोर दिसत होता. लहानपणी दूरदर्शन वरील रामायण पहाताना जो भाव निर्माण व्हायचा आज तोच भाव प्रकट झाला होता. मंदिरातून बाहेर पडताना तुकोबारायांचा एक अभंग डोक्यात चमकून गेला..
राम म्हणे ग्रासोग्रासी! तोची जेविला उपवासी!!
धन्य धन्य ते शरीर! तीर्थाव्रंताचे माहेर!!
राम म्हणे करिता धंदा! सुख समाधी त्या सदा!!
धन्य धन्य ते शरीर! तीर्थाव्रंताचे माहेर!!
ऐसा राम जपे नित्य! तुका म्हणे जीवन्मुक्त!!
धन्य धन्य ते शरीर! तीर्थाव्रताचे माहेर!!
संदीप राक्षे✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१
अतिशय सुंदर लेखवृंत्तांत...!
ReplyDeleteअतिशय सुंदर लेखवृंत्तांत...!
ReplyDelete