भारताच्या सुवर्ण वैभवाच्या पाऊलखुणा..
"लक्ष्मी नृसिंह, कडलेकालु, सासिवेकालु गणेश मंदिर" हंम्पी कर्नाटक
संदीप राक्षे ✍🏻
माधव रंगा मंदिर पाहून आम्ही लक्ष्मी नृसिंहाची भव्य मुर्ती पहायला निघालो, आमच्या सोबत गाईड व त्याचीच रिक्षा होती त्यामुळे मनसोक्त या ऐतिहासिक वास्तुं पहाण्याचा आनंद घेत होतो. प्रत्येक वास्तू ही एक, दोन, पाच, सहा, दहा किलोमीटर अंतरावरील आहेत. पुर्वीच्या काळात जगातील सर्वात श्रीमंत शहर आम्ही पहात होतो. हंम्पी इतके नेत्रदीपक शहर इथला इतिहास इथल्या वास्तू सारख्या वास्तू कुठेच नाहीत. अशा विचारातच मी संकेत व सुरज नळगुणे नृसिंह शिल्पा जवळ पोहचलो भव्य कमानीतून आत शिरलो, दूरनच महाकाय नृसिंह भगवंताचे रूद्र दर्शन झाले होते. २२ फुट उंचीचे भव्य शिल्प मुर्तीकलेचा अद्भुत नमुना दिसत होता. किती आक्रमण, उन, वारा, पाणी झेलत नृसिंहाची ही मुर्ती उघड्यावरच आपले स्थान टिकवून होती. प्रभू नृसिंह हे विष्णूचा अवतार अर्धसिंहाचे तोंड विक्राळ दिसत होते. ही मुर्ती सात तोंडी शेष नागावर विराजमान झालेली आहे. एक मांडीवर देवी लक्ष्मी बसलेल्या दिसत आहेत. नृसिंह मुर्तीची बरीच तोडफोड झालेली आहे काही अवशेष नष्ट करण्यात आलेले आहेत. इतक्या भल्या आक्रमणातून सुद्धा ही मुर्ती सुअवस्थेत दिसत होती. नृसिंह भगवंताचे दर्शन घेऊन आम्ही शेजारीच असलेल्या शंकराची पिंड असलेल्या मंदिरा कडे आलो. मंदिर छोटो होते पण पिंड मात्र खूप मोठी होती. अखंड दगडातील या शिवलिंगाचा तळ कायम पाण्यात असतो. हे पाणी कुठून येते हे एक आश्चर्यच आहे. लक्ष्मी नृसिंह व शंकराची पिंड पाहून आम्ही पंधरा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सासिवेकालु गणपती मंदिराकडे निघालो. हे मंदिर थोडे उंचावर होते, दिवसभर चालण्याने थकवा आला होता. पण वातावरणातील चैतन्य व या उर्जादायी वास्तू पाहून मन व शरीरात उत्साह निर्माण होत होता. सासिवेकालु गणपती मंदिराच्या चारी बाजूला खांब व फक्त छत होते, चारी बाजू ओपन होत्या. १९ फुटाची गणेशाची मुर्ती मोहरीच्या दाण्या सारख्या दगडाची बनवलेली आहे. याच मुर्तीच्या मागे एका नटलेल्या स्त्रीची प्रतिमा दगडात कोरलेली आहे. ती मुर्ती शारदेची असावी असे मला वाटते. मंदिराला प्रदक्षिणा घातली, गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले व आम्ही कडलेकालु गणपती मंदिराकडे निघालो. भव्य सभा मंडप अत्यंत सुंदर गाभारा त्याच सफेद दगडात कोरलेली गणपती बाप्पाची २२ फुटी मुर्ती पहातानाच भक्ती भाव प्रकट होतो व आपोआप हात जोडले जातात. हात जोडले जातात त्या कलेला, त्या कलाकारांना, इतके सुंदर शहर निर्माण केले त्या राज्याला. दोन वेगवेगळ्या भव्य अशा गणेशाचे दर्शन झाले होते. कडेलकालु गणपतीच्या पायथ्यालाच खाली विजयनगर बाजाराची जागा व दगडात बांधलेली बाजारपेठ दिसत होती. हे विहंगम दृष्य डोळ्यांनी पहातच आम्ही टेकडी उतरलो आणि पुढच्या स्थळाकडे जाण्यासाठी मार्गस्थ झालो..
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१