Friday, 29 December 2017

पिकलेली तोरण सखे (कविता)

सखे पिकलेत तोरण!

लई जोरात पिकलेत तोरण
मी चव घेऊन बघतोय थांब
या दैवाराच्या सुपीक राना
भासशिल तू ग ओला खांब !

या वनात उनाड बांबू
माझ्या परड्याला देतोय टेकू
या मोहळाचा रसाळ मध
मिळून जोडीने दोघेही चाखू !

हा वावडूंगीचा लाल लाल घड
चवीला लागतोय तुरट छान
पाहून हा रानमेवा डोळ्यांनी
झालोय सखे मी ग बेभान !

निसर्गाची किमयाच न्यारी
दालचिनीच्या खातात साली
चिंचा बोरही गाभोळलेली
गुंजांनी बहरली सखे वेली !

ही झाडं फुलं अन् पानं
वाराही जरासा होतो धुंद,
हिरवळीचं ग लेणं लेवून,
सखे,मातीत दाटलाय सुगंध !

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Thursday, 28 December 2017

शाप धरेचा! (कविता)

शाप धरेचा !

सजीवांचा या धरेला ताप आहे
सोसण्याचे ते विषारी घाव आहे
खोदतो आहे विनाशांच्या रोज वाटा
वर्म हे त्या माणसांची चूक आहे !

या नव्या युगात ही असतो धुंद मी
वृक्ष तोडीचा गुन्हा करतो पुन्हा मी
मी वेदनेची करवत चालविताना
ते म्हणाले तोड येथे पाप आहे !

सृष्टीचा वा वृष्टीचा मेळ येथे
वसुंधरेशी रोज होतो खेळ येथे
माणसांच्या धुंदीस पाहून घेता
सुर्य ही बोले कसा हा शाप आहे !

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Tuesday, 26 December 2017

मंतरलेली रात्र (कविता)

मंतरलेली रात्र!

धुंद झाला सांजवेळी शिशीर वारा
गुलाबी थंडीचा आज दिसे पहारा !

चंद्रबिंब अधीर भासते पाणवठ्यात
चांदणी हलकेच होती लाजत नभात !

मिलनाच्या आवेशात होते धरणी-आकाश
निसर्ग पुष्पांनी जणू टाकले ते  पाश !

दवबिंदूंचा सडा होता पडला धरतीवरी,
निसर्गराणी भाळली त्यावर प्रियसीपरी !

मंतरलेली रात्र ही संपता संपेना
अधिरता मिलनाची मिटता मिटेना !

पुन्हा नव्याने रविकराची लागता चाहूल,
धरती वाटते नववधू देते गगनांस भूल !

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

मंतरलेली रात्र जेव्हा होते थरथरती

मंतरलेली रात्र जेव्हा होते थरथरती (बामणोली जंगल)

निश्चयाचा महामेरू बहुत
जनांसी आधारू
अखंडस्थितीचा निर्धारू
श्रीमंतयोगी...

सातारा म्हटले की इतिहास, इतिहास म्हटले की आठवते फक्त एकच नाव माझा राजा "शिव छत्रपती" नाव उच्चारले तरी बाहु आपोआप स्फुरण पावतात, नसानसात रक्त प्रवाह तेज होतात, हातांच्या मुठी आवळल्या जातात, त्याच प्रमाणे इथली माणस सुद्धा तशीच रांगडी, शूर तितकीच मायाळू, लढवैयांचा जिल्हा, देशासाठी प्राणांचे बलिदान देण्या-या शूर सैनिकांची भूमी, लागोपाठ सुट्टी आल्याने या तीन दिवसात सातारा जिल्ह्यातील काही भाग फिरायचा असा निश्चय केला.. या वेळेस पण बँकेचे सहकारी दादू डोळस साहेब सोबतीला होतो, त्यांची इच्छा होती एक दिवस एक रात्र तरी आपण जंगलात टेंट मधे राहायचे ते थरारक जीवन अनुभवायचे. मला थोडे टेन्शन आले घनदाट जंगलात एका साध्या टेंट मधे कसे राहायचे..विचारातच अजिंक्यतारा गडाच्या पायथ्याशी येवुन पोहचलो, दुरूनच गडाचे दर्शन घेतले शिव छत्रपतींचे स्मरण केले. पहिले कोणत्या ठिकाणावर जायचे असा गाडीतच आमच्या दोघांचा विचार सुरू झाला.. माझे भेदरलेले मन मलाच साथ देईना व्दिधा मनस्थितीत होतो तोच पुढे सज्जनगडा कडे अशी पाटी दिसली. आणी मनातल्या मनात असलो.. कारण होते सज्जनगड म्हटले की मानसशास्त्रांचे गाढे अभ्यासक, समर्थ रामदास स्वामींचे समाधी स्थान.. मन या विषयावर कितीतरी ओव्या आणी काव्य करून मनाला चांगल्या सवयी, मन आपल्या ताब्यात कसे राहील यावर असंख्य उपाय सांगितले आहेत.. आणी मलाही तीच गरज होती, म्हणून मला हसु आले... कोणताच विचार न करता गाडी सज्जनगडाकडे ओळवली...

धरी रे मना संगती सज्जनांची !
जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनांची !
बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे !
महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे !

"जय जय रघुवीर समर्थ" रामदास स्वामींचा जप करीतच सज्जनगडाच्या पायथ्याशी पोहचलो,सुट्यांच्या मुळे असंख्य भाविकांची मांदियाळीच येथे जमली होती.. गडावर गाडी जात नसल्याने,गाडी पायथ्याला पार्क करून गड चढायचा निर्णय घेतला. अर्ध्या पर्यंत डोळस गड चढले,आणी थांबले मला नाही चढवणार पुढे, गडावर तूच एकटा जा मी त्यांना हो म्हणालो आणी एकटाच गड चढू लागलो.. प्रचंड उन होते सुर्य डोक्यावर होता.. थंडीचे दिवस असून सुद्धा अंग घामाने डबडबले होते. दम लागत होता. थोडे थांबायचे आणी पुन्हा चालायचे असे करीत करीत सज्जनगडाच्या मुख्य दरवाज्या जवळ पोहचलो. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव होते त्या भल्यामोठ्या प्रवेशद्वारावर, तिथेच एक सेल्फी घेतला, पुढे लोकमान्य टिळक प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलो तिथेच एक भला मोठा पाण्याचा चौकोनी तलाव दिसला इतिहासकालीन हा तलाव इतिहासाची साक्ष देत होता..

राया शिवछत्रपती! समर्थाशी अतिप्रती !!
सज्जनगडी त्यांची वस्ती! तेणे करविली!!

काही जुन्या वास्तु पहात पहात छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना भव्य निवासस्थान बांधून दिले होते त्या ठिकाणी पोहचलो,धन्य ती वास्तू धन्य तो इतिहास आज ही ती वास्तू समर्थ रामदास स्वामींचा मठ म्हणून ओळखली जाते..मी त्या निवास्थानात प्रवेश केला आपल्या राज्याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या वास्तूत अफाट चैतन्य होते... एका खोलीत छत्रपतींनी रामदास स्वामींना एक पलंग भेट दिला होता तो आजही तसाच आहे...तेथून पुढे एक शेजघर आहे तिथे समर्थ रामदास स्वामींच्या वापरात असलेल्या वस्तु अजूनही जतन करून ठेवल्या आहेत..त्यामधे शिवाजी महारांजानी दिलेल्या कुबड्या, श्री दत्त महाराजांनी दिलेली कुबडी, वेताची काठी, सोटा, समर्थांना शिवाजी महाराजांनी दिलेली कुबडी मोठी रहस्यमय आहे. या कुबडीमध्ये तलवार आहे. त्याला गुप्ती असे म्हणतात. कुबडीचा वापर समर्थ उभ्याने जप करताना बगलेत अडणी म्हणून करीत होते. भारतभ्रमण करीत असताना समर्थ हिमालयात गेले होते तेथे त्यांना थंडीचा त्रास जाणवु लागला त्यावेळेस मारूतीराया प्रकट झाले व समर्थांना शरीराच्या रक्षणासाठी वल्कले दिली ती वल्कले अजूनही शेजघरात आहेत...शेजघरात प्रवेश करताना दारावरच एक फोटो फ्रेम दिसली त्यामधे शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी हे चर्चा करतानाचा फोटो आहे तो मी खुप वेळ पहात होतो.. साधू संताना जातीपातीच्या चौकटीत अडकविणा-यांना ती एक मोठी चपराक होती.. संपूर्ण शेजघर पाहून त्या संपूर्ण अमल्य वस्तु डोळ्यात साठवून, मनोभावे वंदन केले आणी समर्थांच्या समाधी मंदिरा कडे आलो..समाधी स्थानाच्या वरती राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन उजव्या हाताच्या जिन्याने भुयारात उतरलो समर्थांच्या समाधीचे दर्शन घेतले, आयाताकृत समाधी ही आपोआप   जमिनीतून वरती आलेली आहे.    समर्थांनी शेवटच्या क्षणी दोन काव्य केली होती त्याचे स्मरण केले, आणी सज्जनगडचा निरोप घेतला.. 

रघुकूळटिळकाचा वेध सन्नीध आला!
तदुपरी भजनाचा पाहिजे सांग केला!

समर्थांच्या दर्शनाने आणी तेथील वातावरणाने मनाला एक उभारी मिळाली होती.. वा-यापेक्षा वेगाने धावणारे मन समर्थांच्या जपा मधे मग्न स्थिर झाले होते. समर्थांनी मनावर केलेले एक एक काव्य आठवु लागले होते. गडाच्या पायथ्याशी पोहचलो फ्रेश झालो तिथेच ठोसेघर धबधब्याकडे जाण्याचा मार्ग दिसला खुप दिवस हे नाव ऐकून होतो पण जाण्याचा योग येत नव्हता.. आलो आहोत जवळ तर जाऊयात का? डोळस साहेबांना विचारले त्यांनी होकार दिला. पाऊस संपून आता खुप दिवस झाले धबधबा सुरू असेल का हा मनात विचार होता. पण नंतर समजले ठोसेघरचा धबधबा अविरत कोसळत असतो. एक नाविन्यपूर्ण निसर्गाचा हा चमत्कार पहाण्यासाठी ठोसेघरला निघालो. ठोसेघर धबधबा समुद्र सपाटी पासुन १२०० किलोमीटर उंचीवर आहे.

भरभर धारा बरसत येती
डोंगर कडा कपारीतूनी
क्षणभर वाटे मजला
दुग्ध सांडीले रंग पाहुनी !

कोण अडवी धबधब्यास
अविरत तांडव नृत्य करी
खोल दरीतील विक्राळरूप
रोमांच भरी अंगावरी!

ठोसेघरचा धबधबा पाहुनच या काव्याची निर्मिती तिथेच झाली.. निसर्गाने किती भरभरून दिले आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. छोटा आणी मोठा असे दोन धबधबे येथे आहेत, हे धबधबे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असला तरी हे मात्र कधीच थांबत नाहीत. पाणी थोडेफार कमी होते, पण हे अविरत कोसळत असतात. येणाऱ्या पर्यटकांचे डोळ्यांचे पारणे फेडणारा, नयनविभोर दृष्य सोहळा पाहून आम्ही बामणोली जंगलाकडे प्रस्थान केले. कास पठाराच्या डोंगर रांगेतून आमचा प्रवास सुरू होता. कास पठार लागलेल्या वणव्यामुळे काळे ठिक्कूर पडले होते. पठार सोडून आता घनदाट जंगल सुरू झाले होते.. एक वाहन जाईल इतका नागमोडी रस्ता, बाजुला दाट झाडी गुलाबी थंडी प्रमाणेच गुलाबी फुलांचा जथ्था जागोजागी दिसत होता.. हे दृश्य सुखद वाटत होते .. शिशीराचा गार वारा म्हणजे गुलाबी थंडी आणी गुलाबी फुल हा योग दुर्मिळच पाहावयास मिळाला. अनेक वेगवेगळ्या जातींची पुष्ष फुले निसर्ग देवतेची साक्षात पुजाच करताना दिसत होती. त्या मधे विघ्नहर्ता पुष्प, कुमुदिनी पुष्प, झुंबर पुष्प, कंदील पुष्प, कावळा पुष्प, कळलावी पुष्प, या मधे असे एक पुष्प पहायला मिळाले ते म्हणजे किटकभक्षी त्या फुलावर जर एखादा किडा बसला की तो आपोआप गायब होऊन जायचा ते पुष्प हे किटक भक्ष्य करून टाकायचे, निसर्गाची करनी आणी नारळात पाणी, निसर्गाच्या कुशीत शिरल्या शिवाय असले चमत्कार बघायला मिळणारच नाहीत. विविध पक्ष्यांचे आवाज वातावरणाला सूरमयी बनवीत होते. ताला सुरात गाणारे पक्षी निसर्ग आणी संगीताचे ऋणानुबंध किती जवळचे, हेच सांगत आहेत असे वाटायचे. सुर्य आता मावळतीला लागला होता..आम्हाला बामणोलीच्या जंगलात कोयनेच्या बॅकवॉटर च्या परिसरात पोहोचायचे होते. आता गाडीचे थोडे स्पीड वाढवले अंधार झाला तर ज्या ठिकाणी मुक्कामाची सोय केली ते ठिकाण सापडले नसते.. एकदा जंगलात घुसले की होकायंत्रा शिवाय बाहेर पडणेच अशक्य. पुष्पवल्ली पहाण्याचा मोह आवरता घेतला. वेडी वाकडी वळणे, डोंगर द-या पार करीत अखेर बामणोली गावात येवून पोहचलो शंभर दिडशे उंबरा असलेले गाव तेथूनच बोटीने तापोळा व वासोटा किल्यावर जाता येते. आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणाचा पत्ता विचारला अजून पाच किलोमीटर जावे लागेल असे तेथील ग्रामस्थाने सांगितले, हे ठिकाण आहे. मनात भिती प्रचंड वाढत चालली होती कारण होते आज मुक्कामाचे ठिकाण कोणते लाॅजिंग किंवा रिसोर्ट नव्हते, आजचा मुक्काम घनदाट जंगलात  उघड्यावर एका टेंट (कुपी) मधे होता. आता अंधार पडला होता, निर्मनुष्य रस्ता होता, कुठेही उजेड नव्हता, चित्र विचित्र आवाजाने मन खूपच भेदरले होते..कुठून बुद्धी दिली अन सुखाची ठिकाण सोडून या अडचणीच्या ठिकाणावर का आलो हा माझा मलाच प्रश्न पडला. समर्थांची आठवण झाल्यावर मन जरा शांत झाले. मुक्कामाच्या ठिकाणावर पोहचलो होतो.. डांबरी सोडून गाडी कच्च्या रस्त्याने चालू लागली.. एक किलोमीटर अंतरापर्यंत गेल्यावर एक वाटाड्या उभा होता तो आमचीच वाट पहात उभा होता. त्याने विचारले तुमचे नाव काय? कुठून आलात? मी म्हणालो मी संदीप राक्षे भोसरी पुणे येथून आलो.  गेल्या गेल्या त्याने आम्हाला चहा दिला. दोन तीन ठिकाण आम्हाला त्याने दाखवली, कुठे टेंट लावायचे ते काही ठिकाण पाहूनच भितीने गाळण उडाली होती. मी त्यालाच सांगितले तुला जिथे चांगले वाटेल आम्ही  सुरक्षित राहू अशा ठिकाणी व्यवस्था कर, कारण इथला अनुभव तुला आहे. त्याने गर्द झाडीत, नुकतेच भात कापणी झाली होती, त्या छोट्याश्या खाचरात टेंट लावला. मी आजु बाजुला पाहिले तर असंख्य जंगली प्राण्यांच्या पायाचे ठसे सहज दिसत होते. त्याच्या कडून कसलीच माहीती घेतली नाही. विचारले की मनाचा खेळ सुरू होईल नको नको त्या विचारांचे थैमान डोक्यात दाटेल, त्यामुळे काहीच विचारले नाही. आता जिकडे पहावा तिकडे अंधाराचे साम्राज्य होते. आज चंद्र सुद्धा अर्ध आकार असल्याने त्याचा प्रकाशही जास्त पडणार नव्हता. रात्री नऊ वाजता जेवण उरकले छान पिठले भाकरीवर ताव मारला. टेंट जवळच शेकोटी पेटवली आणी मस्त बैठक मारली. डोळस साहेब आणी मी आम्ही दोघेच असल्याने आमच्याच गप्पा सुरू झाल्या. दूरवर अजून काही ट्रेकअर आले होते त्यांचे टेंट होतेच त्यामुळे थोडासा आधार आला होता. झाडावर चढून धरणाचे पाणी चंद्र असल्याने दिसते का, पहावे मनात विचार आला. एक एक फांदी चढत मध्यापर्यंत गेलो काळ्याकुट्ट अंधारा पलीकडे काहीच दिसले नाही.मी झाडावर चढल्याने झाडावरील पक्ष्यांचा किलबिलाट अचानक सुरू झाला. पटकन खाली उतरलो, शेकोटी जवळ जाऊन शेकत बसलो; शेकोटीतील अग्नी निरनिराळी रूपे धारण करीत होता, ती मी मोबाईल मधे टिपीत होतो.. अक्राळ विक्राळ आकार त्या अग्नीतून प्रकट होत होते. मनाचा खेळ सुरू होण्या अगोदरच स्वताला सावरले, मोबाईल मधे जुनी गाणी मंद आवाजात सुरू केली मन गाण्यात रमले होते. तितक्यात कोल्हेकुई सुरू झाली, आणी वातावरण धीर गंभीर झाले. वा-याने हलणा-या करवंदीच्या जाळ्यांच्याकडे लक्ष वेधू लागले. शेकोटीला आणलेले सरपण पण संपून गेले..आता उरला होता फक्त निखारा, इकडे चंद्र डोक्यावर आला होता. घड्याळात पाहिले तर मध्यरात्रीचे  बारा वाजले होते. इकडे माझ्या छातीत धस्स झाले, रात्री बाराचे किस्से खुप ऐकल्याने एक एक ओपन होऊ लागला, आठवु लागला. डोळस साहेब झोप आल्याने टेंट मधे गेले दिवसभराच्या प्रवासाने थकले होते. पडल्या पडल्याच झोपी गेले. आता उरलो मी एकटाच आणी मनातले भूत दोघेच जागे होते. प्रचंड थंडीत सुद्धा घामाने डबबलो होतो. विचार काही थांबेनात. चंद्रप्रकाश थोडा प्रखर झाला होता. झाडांच्या आकृत्या जिवंत माणसा सारख्या भासू लागल्या तसा तसा भितीचा प्रकोप वाढू लागला. सळसळ स्पष्ट ऐकू येऊ लागली. कोल्हेकुईत आता अनेक आवाजांची भर पडली.. इतक्या वेळ निरव शांत असलेले जंगल अशांत झाले होते. पाणवठा आमच्या पासुन जवळपास होता. कसलाच विचार न करता मी पटकन टेंट मधे घुसलो, सर्व पॅकबंद केले दोन रजई अंगावर घेतल्या, पण काही केल्या झोप येईना. शांत पडून राहिलो आवाजाचे निरीक्षण करीत करीत रात्रीचा हा थरार डोळ्याने न पहाता कानाने अनुभवत होतो. कधी पहाट होते या विचारत पडलो पण काही केल्या वेळ पुढे जाईना. दवांच्या पाण्याने संपूर्ण टेंट ओला चिंब झाला होता. ते टिपकणारे थेंब सुद्धा स्पष्ट ऐकू येत होते. अचानक टेंटवर काहीतरी पडल्याचा आवाज झाला. आता हातापायची गाळण झाली होती. काय करावे सुचेना पण थोडासा कानोसा घेतला तर दोन वटवाघुळ चिर्र चिर्र करीत टेंट वर पडली होती. थोडा जीवात जीव आला..पुढे काय काय वाढून ठेवले आहे, याचा विचार करीतच पहाटेचे चार वाजले होते. आता थंडीत प्रचंड वाढ झाली होती येणारे आवाज बंद झाले होते. अशातच निद्रादेवी माझ्यावर प्रसन्न झाली आणी मला झोप लागली..

मंतरलेली रात्र थरारक,
धुंद गुलाबी ही थंडीची,
रातकिडयांचे चित्कार ते,
घंटा भासते जणू धोक्याची !

पाणवठयाच्या काठी वसते,
वसाहत तृष्णीत प्राण्यांची,
भेदरलेल्या मध्य रात्रीस या,
प्रतिक्षा मला सकाळची !

सकाळी जाग आली ती सुर्यदेवाच्या आगमनानेच, उठून टेंटची चैन उघडली बाहेर डोकावले तर मस्त कोवळ उन पडलेल, टेंट मधून बाहेर पडलो. सुर्यदेवाचे दर्शन घेतले प्रातर्विधी उरकला. सरळ आंघोळी साठी धरणाकडे निघालो गाडीत ठेवलेली पाण्याची बाटली बर्फा पेक्षाही गार होती.. मी विचार केला हे पाणी इतके थंड तर धरणातील पाणी किती थंड असेल कशी आंघोळ करायची. धरणा जवळ गेलो पाण्यात हात घातला तर पाणी कोमट होते. मस्त पाण्यात उडी मारली मनसोक्त पोहण्याचा आनंद घेतला, इतर आलेले ट्रेकर माझ्या कडे पहातच होते. इतक्या थंडीत धरणात कसे काय पोहतात म्हणून कुतूहलाने पहात होते. पोहण्याचा आनंद खरच वेगळाच होता स्वच्छ आणी निर्मळ पाणी अंगाला गरम भासत होते.. थंडी कुठेच्या कुठे पळून गेली होती.. सर्व साहित्य पॅक केले कपडे बदलले, आणी या थरारक बामणोली जंगलाचा निरोप घेतला, पंचवीस डिसेंबर ख्रिसमस ची ही रात्र माझ्या आयुष्यभर  स्मरणात राहील....

लेखन: -संदीप राक्षे
भोसरी पुणे २६

Monday, 25 December 2017

जगण्याचे बळ (कविता)

जगण्याचे बळ!

कोणाचीच कोणाला
नाही कळ कळ
स्वतःचीच पोळी
भाजतात सकळ !

पैसेवाला पैसेवाल्यालाच
देतो आहे बळ
गरीब बिचारा हाल अपेष्टा
भोगतो आहे वेळोवेळ !

लुटारूंच्याच घरी
पैशांची खळ खळ
संत बिचारा दररोज
एक पैशासाठी जळ !

कधी जाईल काळ
कधी येईल वेळ
कोण देईल आम्हास
जगण्याचे बळ !

कोण असेल वाली,
सावरणारा दाता,
करुण कहाणी आमची,
ऐकून घेणारा कर्ता !

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Friday, 22 December 2017

हदयसम्राज्ञी (कविता)

हदयसम्राज्ञी!

हदयाच्या बदामी कप्यात
मनाच्या अंतर्मनात
रुतून बसतेस खोलवरी !

स्वप्नांच्या चंदेरी दुनियेत
गुलाब कळीतली
भासतेस परी तुच खरी !

सुरांच्या या मैफिलीत
तालाच्याही लयीतली
असतेस तूच सूरसरी !

मोहूनी मन माझ जात
अश्रु नयनातून वाहता
दाटून कंठ येतो अंतरी !

धीर अधीर वारा ही होतो
तन मन शहारते तेव्हा,
तुझ्याच प्रीतीत ग सावरी !

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Thursday, 21 December 2017

भटकंती(भंडारदरा)

*भटकंती महाराष्ट्राचे "स्वित्झर्लंड"भंडारद-याची*

*निसर्गाच्या संगतीत फिटतो संदेह*
*वितळतो क्षोभ माया मोह*
*त्याच्या संकीर्तनी मुरविता देह*
*भेटतो उजेड अंतर्बाह्य*

शनिवार रविवार आला की निसर्गाच्या सान्निध्यात मनसोक्त भटकंती करायची हा नित्य नेम,खुप दिवसांपासुन भंडारद-याला जायचा विचार होता.पण योग येत नव्हता,पण ठरवल जायचंच माझ्या सोबत आमच्या बँकेचे माझे जुने सहकारी दादु डोळस साहेब तयार झाले. खूप अडचणी आणी खराब रस्ते सगळं काही मला निश्चयापासून दूर करणारे होते,पण दृढ निश्चयापुढे कोणतीच समस्या टिकत नाही. दुपारी १२ वाजता निघून रात्री ८ वाजले यश रिसोर्ट(शेंडीला)पोहचायला रात्री सगळेच भेसूर वाटत होते. पण सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने सकाळी सहा वाजता जाग आली, पडदे बाजूला सरकवले तेव्हा निसर्ग देवताच साक्षात उभी होती. रात्रीच ओळख झालेला शुभम काळे अठरा वर्षाचा युवक यश रिसोर्ट च्या दारात गाडी घेऊन उभा होता,मी व डोळस साहेब गाडीत बसलो आणी शुभम काळे याने माहीती देण्यास सुरवात केली आज आपण बावन्न किलोमीटरचा प्रवास करणार आहोत,साक्षात निसर्गाचा चमत्कार अनुभवणार आहोत. भंडारदरा हे महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात.भंडारदरा-शेंडी हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले एक आदिवासी कोळी महादेव जमातीचे गाव.या भंडारदरा धरण परिसरात दहा किल्ले,शिखर आणी द-या व असंख्य जल साठे आहेत. रंधा धबधबा प्रसिद्ध आहे. तसेच कळसुबाई मंदिर,पांजरे बेट,अलंग, मलंग,कुलंगगड,उंबरदारा व्ह्युव पॉइंट, कोकणकडा,घाटनदेवी व्ह्युव पॉइंट,सांदन दरी,रिव्हर्स वॉटर फॉल,अमृतेश्वर मंदिर, नान्ही वॉटर फॉल,कळसुबाई शिखर,रतनगड,रंधा फॉल,घाटघर अशी निसर्ग रम्य ठिकाणे आहेत. शुभम सांगत होता.. माझे कान त्याच्या कडे पण नजर मात्र रस्त्याच्या कडेने दिसणा-य हिरडा,बेहडा,सादडा,जांभुळ,आंबा,उंबर या झाडांकडे होती. त्या झाडांवरून येणाऱ्या पक्ष्यांच्या आवाजाने कान तृप्त होत होते. नीरव शांततेत ते आवाज स्पष्ट ऐकू येत, घनदाट जंगलाचा भाग सोडून आम्ही धरणाच्या एका सपाट जागेवर येवुन थांबलो गाडीतून खाली उतरताच वा-याची एक मंद झुळूक धरणाच्या पाण्यावरून आली, ती झुळूक चैत्यन्य घेऊन आलेली,अंगावर रोमांच उभे राहिले,निळ्या स्वच्छ आकाशाचे प्रतिबिंब धरणाच्या जलाशयात एकरूप झाल्याने निळे पाणी आणी निसर्गाची हिरवाई यांच्या मिलनाने तयार झालेला देखावा जणू चित्रकाराच्या कुंचल्यातून चितारलेला भासत होता.सह्याद्रीच्या हिरव्या पर्वत रांगावर पिवळी फुले जणू काही धरणी मातेने हिरव्या रंगाचा शालूच ल्यायला होता.त्यावर सोनेरी बुट्टे होते. सोनकीच्या इटुकल्या पिटुकल्या फुलांचा फुललेल्या पुष्पमाळांनी पर्वत पठारे पीतवर्णी दिसत होती. रानतेरडा, रान गांजा, श्वेतांबरा, फांगळा, आभाळी, नभाळी, सोनटिकली, लाजाळू, जांभळी, मंजिरी, गोपाळी, रानतूर, सोनसरी, पांढरी, कोरांटी, उंदरी, कुसुंबी, अशा कितीतरी फुलांचा सडाच पडला होता. एक कणही प्रदूषणाचा नसल्याने दूरदूरचे अगदी स्पष्ट दिसत होते. आॅक्सिजनच्या निळाईने एक निळसर झालरच पसरावी असा डोंगराच्या व आभाळाच्या मध्यभागी एक पट्टाच दिसत होता. सकाळची दवं फुलांच्यावर मोत्यासारखी दिसत होती. सकाळची दवं फुलांच्यावर मोत्यासारखी दिसत होती. त्या दवांवर सुर्यकिरण पडले की इंद्रधनुष्याचे रंग प्रकट होत होते.
*कोणी सांडले दवबिंदू इथे*
*जशी मोती माळून धरती सजली*
*सूर्याने ही घातली भरतिथे*
*भाळी टिळा लावून धरती सजली*
हा सगळा चमत्कार जणू मी स्वर्गातच होतो. पण चालताना पृथ्वीवर स्वर्ग उतरल्याची जाणीव होत होती. एका अद्भुत झ-याजवळ की जो कधीच आटत नाही, की जो खोल दरीत होता. प्रत्येकाची तृष्णा शमवत होता. मी  आणी डोळस साहेब त्या दरीत उतरलो, एक इंची नळ लावावा जसे पाणी त्या झ-यातून पडत होते. हातांची ओंजळ करून भरपूर पाणी प्यायलो, हिमालयातील गंगेच्या पाण्याची चव, पाणी इतके थंड की उदर शांत झाले. कोकणकडा बघून आम्ही रांधन घळी कडे निघालो. अनेक ठिकाणी पाण्याचे मोठे मोठे कालवे होते, त्यामध्ये हजारो झाडे, त्या झाडांवर बसलेले पांढरे बगळे असे भासवत होते की पाण्यातच सफेद रंगाचे फूल उमलेले आहे. आता उन्हाचा पारा चढला होता, हवेत गारवा होता. बाजुला सज्जनगड दिसत होता. त्याच्या पायथ्याशी अमृतेश्वराचे प्राचीन (पांडवकालीन) मंदिर शतकोत्तर त्याच अवस्थेत होते. मंदिराच्या समोरच पांडवांनी बांधलेला षठकोनी तलाव होता. दगडी बांधकाम व त्यावरील नक्षीकाम पुरातन संस्कृतीचे दर्शन घडवित होते.
*म्हणतो मलाही सांब*
*मी खेळ तव मनाचा*
*असतो निसर्ग सारा*
*कधी देव का कुणाचा*
*तुमच्या खुळया स्वभावी*
*मज देव जन्म आहे*
*कुणी देव का म्हणाना*
*अंती निसर्ग आहे.*
हे मंदिर पाहिल्यावर वरील आठवल्या, त्यातून भगवान शंकराचे आणि निसर्गाचे नाते उलगडले. इतक्या घनदाट जंगलात इतके सुंदर शिल्प संपूर्ण काळ्या पाषाणात इतके कोरीव काम खरच चमत्कारच. मंदिरातील गाभाऱ्याचा सुखद गारवा अंगावर साठवून, प्रदक्षिणा घालताना काही पर्यटक झाडाखाली बसलेले दिसले, एक जण कसली तरी माहिती देत होते, कुतूहल म्हणून त्यांच्यात सहभागी झालो, ते भंडारद-यातील काजवा महोत्सवाबद्दल बोलत होते. ते होते अकोले तालुक्यातील L.I.C चे डेव्हलपमेंट ऑफिसर श्री.वाणी साहेब, त्यांनी सांगायला सुरूवात केली, मी ही तिथेच ठाण मांडून बसलो. काजव्यांचा हा काही दिवसांचा अद्भुत खेळ जून महिन्यांच्या अगोदर सुरू होतो. ज्या झाडावर काजव्यांची वस्ती असते ती झाडे ख्रिसमस ट्री सारखी दिसतात. झाडांच्या खोडावर फांद्यांवर पानांवर लक्ष लक्ष काजवे बसलेले असतात. लुकलुकणारी ही काजव्यांची प्रकाशफुले आपल्या डोळ्यांना सुखावून जातात. कुतूहलमिश्रीत आणि भाव मुद्रेने निसर्ग वैभव आपण पहातच राहतो, आणी भान हरपून जातो. भोवतीच्या विराट पसा-यात रात्रीच्या प्रकाशाचा अदभुत खेळ खेळत स्वताला आपण हरवून बसतो. कुठ शेकोटीतल्या निखा-यावरून ठिणग्या उसळाव्यात तसे काजवे उसळत होते. रात्र चढता चढता रस्त्यातील वाहतूक कमी होत गेली, आणि कालजव्यांच्या झुळकावर झुळका येवु लागल्या, मिठ्ठ काळोख ओथंबलेल आभाळ गार वारा; हळू हळू नीरव शांततेन आसमंताला घेरून टाकल, आणी आतिषबाजी रंगात आली. रात्र चढत गेलेली कळलही नाही. काजव्यांनी मन वेड-पिस करून सोडल होत, रस्त्यालगत १५-२० फुटांच्या परिघात तीन उंच झाडांनी गोलाकार फेर धरलेला होता. माथ्यावर त्यांच्या फांद्या पानांचा पसारा आणि मध्ये आकाशाचा तुकडा या तीनही झाडांना पानांऐवजी काजवेच आले होते. झाड पेटूनच उठली होती. कधी हे झाड, तर कधी ते आणी अचानक आकाशातला काळोख दूर झाला. झाडांमधून दिसणारा आकाशाचा चतकोर चांदण्यांनी लखलखला नजरबंदी झाली. इथ आकाश नव्हते पण चांदण भरले होते, आकाश वरती की खाली हा संभ्रम नक्कीच होता. आता धुक्यांचा पडदा कळत न कळत जाणवत होता. मन उगीचच हुरहुरल, आता उजाडेल सुर्य प्रकाशापुढे काजव्यांची प्रभा ती काय, हा सर्व अनुभव मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. प्रत्येक क्षणांचे चित्र डोळ्यासमोर तरळत होते. इतका रोमांचकारी अनुभव ऐकून मन तृप्त झाले होते. त्याच वेळी निश्चय केला की पुढच्या वेळी नक्कीच यायचे काजवा महोत्सवाला. वाणी सरांचे आभार मानून पुढच्या प्रवासाला सुरूवात केली. पावसाळा संपल्याने बहुतेक धबधबे बंद झाले होते. कुठे तरी एखादी धार नजरेस पडत होती. आमच्या बरोबर जो मंगेश काळे होता तो तिथला स्थानिक असल्याने त्याला संपूर्ण माहीती होती. त्याने विचारले एक धबधबा सुरू असणार पण जाण्यास खुप अडचणी आहेत,  तुम्ही धबधबा पाहिलात की खुष होणार हे नक्कीच. आम्ही मंडाळा धबधब्याकडे जाण्यासाठी निघालो. गाडी जिथपर्यंत जात होती. तिथ पर्यंत गाडीने गेलो पुढची पाच किलोमीटरची चढण चढून जायचे होते. गाडी लावली आणि आम्ही तिघेजण चालु लागलो...भात खाचरांची शेती इंद्रायणी तांदळाचा सुमधूर वास वातावरणात दरवळत होता. पुढे टेकडी चढायची होती. झाडांच्या मुळांच्या आधाराने चढत होतो. चढण खूपच सरळ होती दम लागत होता, थोडा आराम करून पुन्हा टेकडी चढायला सुरवात केली. सोबत आणलेले पाणी संपले, तहान लागली होती, संपूर्ण जंगल असल्याने आजू बाजूला कोणीच नव्हते...थोडे चालून गेल्यावर एक झोपडी दिसली बरे वाटले. झोपडीत कुणीच नसल्याने तडकी लावलेली तिला कपड्याने बांधले होते. कुलपाच्या जागेवर चिरगुटाचा वापर केला होता. तुकडोजी महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे *या झोपडीत माझ्या*तशी ती होती. तहान लागल्याने मंगेशने तडकीचे चिरगुट सोडले, झोपडीत शिरला, टांगलेली शिकई दिसली, त्यात ताक होते, मंगेशने आतूनच विचारले पाण्याऐवजी ताक चालेल का? आम्ही आनंदाने हो म्हणालो, गाडगे तसेच तोंडाला लावले, घटाघटा सगळे ताक संपवले, ताकाची चवच वेगळी होती. पोटात वाढलेली उष्णता क्षणात कमी झाली. आता टेकडी चढायला थोडासा जोश आला होता. वेडी वाकडी वळणे चढत धबधब्याच्या जवळ पोहचलो, उंच  कड्यावरून खाली पडणाऱ्या पाण्याचे तुषार अंगावर उडत होते, धबधब्याचे विलोभनीय दृष्य पाहून हरवूनच गेलो. दुधाच्या धारा बरसाव्यात तश्या पाण्याच्या पांढऱ्या शुभ्र धारा उंचावरून कोसळत होत्या. धबधब्या खाली थोडे भिजलो तनासवे मन ही ताजे तवाने झाले होते. आता टेकडी उतरायची होती, चढाई करणे सोपे पण उतरणे खुपच अवघड, एकमेकांच्या सहाय्याने टेकडी उतरलो. हाताला गुडघ्याला खरचटले होते थोडा दगडी पाल्याचा रस लावल्याने जळजळ थांबली. मंडाळा धबधब्याचा थरारक अनुभव घेऊन पुढे कळसूबाई शिखराकडे निघालो पण वेळ कमी असल्याने कळसूबाई देवीच्या पायथ्याचे दर्शन घेतले. पुढच्या वेळी शिखरावर जायचे हे मनात ठाम केले. द-या, कडे, कालवे, किल्ले, शिखरे, फुल, वेली, पशु पक्ष्यांचा आवाज पुरातन वास्तू यांच्या सानिध्यात व्यतीत केलेला आनंदी  दिवस हदयात बंद करून, परतीच्या प्रवासास सुरवात केली.
*कंठी येती गाणी कुठली*
*पाखरांसही भूल पडे*
*निसर्ग सारा गातो गाणे*
*रोमांचित होऊनी मन बागडे*

*संदीप राक्षे*✍🏻
*भोसरी पुणे २६*
*८६५७४२१४२१*

निसर्गाचा राजा! (कविता)

निसर्गाचा राजा !

ढोल घुमे शिवारात
झिंग न्यारीच चढे
रात सरता सरता
विसर देहाचाही पडे

सुंदर स्वच्छंदी जीवन
रानचा तु चौकीदार
निसर्गाच्या सानिध्यात
तुझ कुडाच रं घर

देव निसर्ग हिरवा
जन्मापासून पुजीला
नांगराचा तूच राजा,
स्वत: च  बैल रं झाला

शेला डोक्याला बांधला
पानांचा लंगोट केला
उघडा संसार परी
नेटका तू सावरला

अफाट कल्पना शक्तीने
फुलविला निसर्गमळा
सर्वाआधी जन्म तुझा
मागे कसा तू राहीला?

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Wednesday, 20 December 2017

व्यथा देवदासींची (कविता)

व्यथा देवदासींची,,,

मनाला अपरूप वाटला,
नाद ढोल-ताशांचा घुमला
फुलहार तो कसला,,,?
फास गळ्यास बांधला!

नाती गोती होती संपली
हाती रिती परडी आली
गावा-गावातून तिला
अपप्रवृतींनी विकली !

कुल्टा-कुल्टा म्हणून आज
सार गाव ह़ो हिनवते
भिक देईना कुणी तिला
दारं सारीच बंद होते

नाही कळल हो तिला
काही इपरीत घडले
गाव गुंडांचे पाप कसे
तिच्या कुशीत वाढले!

भुकेच्याच आकांताने
शरीर जीर्ण हो झाले
पोर पडली धरणीवर
किती आघात ते झाले !

श्वास अखेरचा चाले
गर्भ आईस झाला बोलका
जन्म माझा ग उपरा
नको करूस ग पोरका!

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

साई कृपा न्यारी

जैसा भाव रहा जिस जन का, वैसा रूप हुआ मेरे मन का
साईबाबा..

साईबाबा एक शक्ती एक भक्ती एक दृष्टी आहे. याच भक्तितुन सौ वृषाली सानप काळे यांनी साईबाबा यांच्या व्यक्तीमत्वावर आधारित ब्रम्हसत्य हा हिंदी अनुवादित ग्रंथ लिहीला. मराठी भाषेचा प्रभाव असल्याने वृषालीताईंना हिंदीतील काही अवघड शब्दांचा अर्थ कळत नव्हता, पण साक्षात स्वप्नात येऊन साईबाबांनी आज्ञा केली होती, आणी मग काय जे अवघड ते सोपे झाले.. रात्रंदिवस जागरण करून ब्रम्हसत्य हा ग्रंथ साकार झाला.  त्याला पुजाताई बागुल यांनी साथ दिली. या दरम्यान साईबाबांचे अनेक चमत्कार वृषालीताईंनी अनुभवले कारण त्या काळात अखंड चिंतन साईंबाबांचे सुरू होते. ब्रम्हसत्य या अनुवादीत ग्रंथाचे प्रकाशन करण्याचे भाग्य मला लाभले, अर्थात हा योग जुळून आला कुसुमाग्रज साहित्यिक मंच नाशिक संजय गोराडे सर व विलास पंचभाई यांच्यामुळे, धन्य आम्ही जन्मा आलो दास साईबाबांचे झालो..
*साईकृपा न्यारी पड गयी सायन्सपर भी भारी*
मला सुद्धा असाच साईंबाबांचा चमत्कार अनुभवायला मिळाला गणेशोत्सवाचे दिवस,आमच्या लांडगे लिंबाची तालीम मंडळाचे डेकोरेशनचे काम सुरू होते. पेटींगसाठी काँम्प्रेसर आणायचा होता. स्टेज समोरच विश्वनाथ  आण्णांची जीप गाडी उभी होती. ती गाडी घेऊन काँम्प्रेसर आणायला जायचे होते. गाडीच्या अवती भवती खुप लहान मुल खेळत होती. मी सर्व मुलांना बाजुला केले आणी गाडीत बसलो. गाडी स्टार्ट केली. पहिला गियर टाकला आणी हळू हळू क्लच सोडला गाडीच्या चाकाला थोडीशी उटी लागल्या सारखे जाणवले, दगड असेल म्हणून मी जास्त लक्ष दिले नाही. समोरच्या लिंबाच्या ओट्यावर माझा मित्र लालासाहेब गाडे बसले होते. ते ओरडत होते पण माझे लक्ष त्यांच्याकडे नव्हते, गाडी हळू हळू पुढे जात होती. तो मित्र पळत गाडीजवळ आला आणी त्याने सांगितले गाडी खाली एक लहान मुलगा आहे. त्याच्या डोक्यावरून चाक गेले आहे. मला दरदरून घाम फुटला गाडीतून खाली उतरलो तर गाडी खाली एक लहान मुलगा निचपित पडला होता. तो पर्यंत गडबडी मुळे संपुर्ण गल्ली जमा झाली होती. त्या  मुलाची आई पण बाहेर आली एकुलत्या एक मुलाला गाडी खाली पाहुन तिने दारातुनच हंबरडा फोडला त्या आईचे ओरडणे सर्वांचे काळीज धडधडायला लावीत होते. त्या मुलाला ती आई जवळ घेऊन रस्त्यावरच गडबड लोळत होती. भयानक दृष्य होते ते.काय करावे सुचेना, तो पर्यंत ही बातमी समजल्यावर राजाराम तात्या तिथे आले थोडा धीर आला.  गावातील एका हाॅस्पीटल मध्ये त्या मुलाला घेऊन गेलो, डाॅक्टरांनी मुलाला तपासले, त्यांनी सांगितले या मुलाच्या डोक्यातील अवयव संपुर्ण बंद पडले आहेत, काहीच सुरू नाही. संपला आहे तो, माझे पाय थरथरू लागले हातापायाचा गळाटा झाला होता. पुढे होणाऱ्या घटनांचा विचार मनात थैमान घालीत होता. पोलीस स्टेशन डोळ्यासमोर दिसत होते या विचाराने ढेकर सुरू झाले होते. बीपी वरखाली होत होता. राजाराम तात्यांनी शेवटचा इलाज म्हणून मुलाला रूबी हाॅल पुणे या दवाखान्यात घेऊन जाऊ असा निर्णय घेतला.. आम्ही सर्वजण गाडीत बसलो, काय करावे, कोण वाचवेल, कोणाचा धावा करू, अचानक साईबाबांचे नाव आठवले आणी भोसरी ते पुणे साई नामाचा चा जप सुरू ठेवला..रूबी हाॅस्पीटल आले त्या मुलाला हाॅस्पीटल मध्ये घेऊन गेले, मी बाहेर थांबलो मुखात नाम जप सुरू होता. डोळे अश्रूंनी भरले होते. आयुष्यातील सर्वात मोठा गुन्हा घडला होता. पंचवीस ते तीस  मिनिटांनी दवाखान्यातुन सर्वजण बाहेर आले, सर्वांचे जरा वेगळेच वाटत होते त्यांच्या चेहऱ्यावरील तणाव दुर झाल्याचे दिसत होते.  सर्वांच्या पाठी मागे त्या मुलाची आई होती. पण मुलगा कडेवर होता तो फक्त डोक्याला पट्टी बांधली होती. त्या मुलाला त्याची आई चक्क कडेवर घेऊन आलेली पाहिली, ती रडत होती पण आनंदाश्रु होते ते, मला विश्वास बसत नव्हता हा चमत्कार कसा घडला.. मला बाहेर आल्यावर सुनिलदादाने सांगितले? डाॅक्टरांनी  मुलाला चेक केले पण फक्त खरचटले आहे असे सांगितले, बाकी सर्व व्यवस्थित आहे. थोडा वेळ सर्वजण शाॅक झाले एक डाॅक्टर म्हणाला हा मुलगा संपला आहे. आणी दुसरे डाॅक्टर सांगतात किरकोळ जखम आहे. सर्वांनाच मोठा धक्का होता..पण मला जाणवले होते हा चमत्कार फक्त साईबाबांचा होता.  तसे माझ्यावर गणपती, संत ज्ञानेश्वर महाराज, साईबांबाची कृपा दृष्टी आहे पण ती माझ्यासाठी नाही समाजाच्या भल्यासाठी आहे. कधीही शिर्डीला दर्शनासाठी गेलो तरी व्ही आय पी दर्शन होते. ती सुद्धा कृपा अर्थात साईबांबाची याला निमित्त मात्र विनोदभाऊ चौधरी, बाळाभाऊ महाडिक, संतोषभाऊ खुळे हे..
अशीच कृपा साईबाबांची वृषालीताई सानप काळे यांच्यावर सुद्धा झाली. कविता लिहीता लिहीता त्यांनी बाबांचा ब्रम्हसत्य हा अनुवादित ग्रंथ लिहिला हा सुद्धा एक चमत्कारच आहे..
कृपादृष्टी असेल तर कुठूनही योग जुळून येतात,अनेक जण या कार्यात मदत करण्यासाठी आपोआप सहभागी होतात.. वृषालीताईंना खुप मोठी मदत पुजाताई बागुल यांनी केली कारण पुजाताई सुद्धा आध्यात्मिक मार्गावर आपले जीवन आनंदाने लोकांच्या सुख दु:खात सामील होऊन उपभोगत आहेत...साईंची लीला अफाट आहे..म्हणून आज शिर्डी जगात सुप्रसिद्ध आहे...

लेखन :- संदीप राक्षे
           भोसरी पुणे २६

नयनमनोहरी निसर्ग (कविता)

नयनमनोहरी निसर्ग!

सगुण निर्गुण
निसर्ग स्व स्वरूप
भासते बघा निसर्ग रूप
नयनमनोहरी...

निर्मळ झरे
रम्य रमले सरोवर
अथांग बघा इथले सागर
धरतीवरी

उत्तुंग पर्वत
बर्फाच्छादित ही शिखरे
अगाध द-या अन् खोरे
चित्रकारी

वसंत ग्रीष्म
वर्षा शरद शिशिर
हेमंत होतो चक्र आकार
ऋतुचकरी

पुष्प फळ
वृक्ष वेली साकार
हिरवी शेती गालीचा आकार
निसर्गापरी

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Tuesday, 19 December 2017

विनोदभाऊ एक दिलदार मित्र!

"विनोदभाऊ एक दिलदार मित्र "

*वि*- विश्वातील अंकुर मी,
*नो*- नोटांपरी मौल्यवान असे,
*द*- दडपणविरहीत जीवन माझे,
     जगात उमटवितो हास्याचे ठसे।

सामाजिक व धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असणारे बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणजे विनोदभाऊ चौधरी. प्रसिद्ध कांदा व्यापारी विश्वासाचे एक नाव विनोदभाऊ चौधरी हे प्रत्येक राज्यात सुप्रसिद्ध आहेत. माझे भाग्य असे की अशा थोर मित्राची भेटही योगायोगानेच झाली, आणी कधी एकमेकांचे सख्खे बनुन गेलो आणी प्रेम जिव्हाळा जपत गेलो. जीवनाच्या सुख दु:खाच्या क्षणात आवर्जुन मायेची थाप टाकून मदत करणे हा त्यांचा स्वभाव, याचा प्रत्येकालाच अनुभव येतो.. धुळे आणी भोसरी कितीतरी दुर अंतर पण प्रत्येक दुखाच्या क्षणी भाऊंची उपस्थिती आल्हाददायक सुख देवुन जाते..कसलेही काम असले तरी भाऊ कधीच मागे हटत नाही. एकदा निर्णय घेतला की तो कोणत्याच परिस्थितीत माघारी घ्यायचा नाही. अशा स्वभावामुळे मैत्रीची एक फौजच तयार झाली आहे..
कर्तृत्वाने व मनाने मोठे असुनही कधीच मनात मोठेपणाचा आव नाही. समाजात वावरताना त्यांची एक वेगळीच छाप असते,शांत स्वभाव,करारी बाणा आणी स्पष्ट बोलणे या मुळेच भाऊ सर्वांचेच आदराचे स्थान आहेत, सहज माणुस आपलासा करण्याची कसब सहसा कोणालाच जमत नाही, पण भाऊ सहज माणसांची चैन जोडतात. प्रत्येकाच्या दुखात सामील होऊन दिलासा देण्याचे अतिउत्तम कार्य भाऊ करतात. देवावर अतिप्रमाणात श्रद्धा त्यामुळेच कुठेही अडीअडचणींवर सहज मात करतात. कलाकारांची उत्तम जाण त्यांना मदत करणे हे त्यांचे कार्य वाखाणण्या जोगे आहे..मालेगावचे एक रांगोळी आर्टिस्ट यांचे स्वप्न होते मला एकदातरी सिनेअभिनेते अशोक सराफ यांना भेटायचे आहे. त्यांचे ते स्वप्न विनोदभाऊंनी शिर्डी येथील कार्यक्रमात पुर्ण केले.. मी भरपूर वेळा धुळेला अनेक कलाकार घेऊन गेलो विनोदभाऊंनी दरवेळेस या कलाकारांचा मान सन्मान केला, त्यांना प्रसिद्धी मिळवुन देण्याचे महान कार्य सतत सुरू असते..प्रत्येक माणसाचा आधार विनोदभाऊ बनतात त्यांच्यासाठी काहीही करण्याची त्यांची मनाची तयारी असते. कधीही प्रसिद्धीच्या मागे न लागता सतत आपल्या कार्यात मग्न असतात.कुटुंब, व्यवसाय,आणी कार्य सांभाळून प्रत्येकाचे मन जपण्याचे त्यांचे कसब अप्रतिमच..एक दिवस आठवतो भाऊ बरोबर तिरूपती बालाजीला गेलो होतो.दर्शन घेऊन  परतीच्या प्रवासाला निघालो होतो. बेंगलोर पासुन पन्नास किलोमीटरवर वाटेत त्यांच्या मर्सिडीज बेंझ गाडीत डिझेल भरायला थांबलो होतो.पण आमच्या हातुन गाडीची चावी मागच्या डिक्कीत राहिली व गाडी अॅटोमॅटिक लाॅक झाली.भाऊ बिसलरी आणण्यासाठी शाॅप मध्ये गेले होते.त्यांना झालेला प्रकार सांगितला थोडे टेन्शन आले,पण लगेच सावरले हसत हसत आमच्या कडे पाहु लागले. बघुयात काहीतरी मार्ग काढुयात विचार करू नका,इतकी महागाची गाडी इतक्या आडरानात लाॅक झाली आमचे सर्व कपडे पैसे आत मध्येच राहिले. पुढे काय करायचे या विचारानेच माझे हातपाय थरथर कापु लागले. कारण त्या घटनेला आम्ही जबाबदार होतो.भाऊंनी दोन शब्द सांगितले शांत रहा. मर्सिडीज बेंज च्या शोरूमला फोन लावला पण काही उपयोग झाला नाही.एका ठिकाणी फोन लावला ते म्हणाले गाडीची मागची छोटीशी काच तोडावी लागेल तिचा खर्च ऐंशी हजार रूपये सांगितला तो ऐकून मी खुपच टेन्शन ला आलो. जर काच फोडलीतर पावसाळ्याचे दिवस इतकी महागडी गाडी खराब होईल तसे करायचे आम्ही टाळले, भाऊंची स्वताची गाडी इतका खर्च आणि होणारा मनस्ताप पण त्यांच्या चेहर्यावर हसु होते. मी पण त्यांच्या या गुणाकडे पहात होतो. चावी पाहिजे त्याशिवाय गाडी उघडणार नाही.. भाऊंनी निर्णय घेतला आपण दुसरी चावी धुळेहुन आणायची,बेंगलोरहुन विमानाने मुंबई ला जायचे गाडीची दुसरी चावी धुळेहुन मुंबईला मागावुन घ्यायची असे ठरले त्यांनी पटापट सगळी कडे फोन लावले..आमच्या पासुन मागे पन्नास किलोमीटर बेंगलोर होते.
भाऊंनी कसलाच विचार न करता एअरपोर्ट गाठले. नाशिकचे मित्र अमितजी गिरीशजी अजिंक्यजी यांच्यावर मुंबई एअरपोर्ट ला चावी आणण्याची जबाबदारी सोपवली.. आम्ही गाडीच्या जवळच थांबुन राहिलो..रात्र होत होती तशी वर्दळ कमी होऊ लागली आता गाडी जवळ आम्ही तिघेच होतो. रात्र काढायची होती. पण त्यापेक्षा विनोदभाऊंना झालेला त्रास खुप मोठा होता.ते मध्यरात्री बेंगलोर हुन मुंबईला पोहचले तो पर्यंत अमितजी गिरीशजी अजिंक्यजी मुंबई एअरपोर्ट ला दुसरी गाडीची चावी घेऊन हजर होते.पहाटे पर्यंत त्या सर्वांनी रात्र एअरपोर्ट ला काढली सकाळच्या पहिल्या विमानाने विनोदभाऊ बेंगलोर ला आले,आणी आमच्या पर्यंत दुस-या दिवशी दहा वाजता चावी घेऊन आले..झोप नसल्यामुळे आमचे चेहरे पहाण्यासारखे झाले होते पण भाऊंचा चेहरा आनंदी होता... इतका त्रास सहन करूनही आनंदी अशासाठी होते ते फक्त आम्हाला अजून दु:ख नको वाटायला,इतके नुकसान होऊन त्रास होऊन सुद्धा मैत्रीसाठी झालेला राग तिथेच दाबुन टाकला,काहीच झाले नाही या आनंदात पुन्हा प्रवास सुरू केला हा गुण किती मोठा. खरच दिलदार मित्राची ही अनुभूती वारंवार अनुभवास येते.मी तर पहिल्यापासूनच निस्सीम प्रेम करायचो पण या घटनेनंतर अजुन त्यांचा फॅन झालो. मी खरच स्वताला भाग्यवंत समजतो असा माझा मित्र असाच प्रत्येक जन्मात सोबत असुदे हेच साकडे माऊलींना कायम घालतो.
विनोदभाऊंच्या खुप सा-या शुभेच्छा देतो, त्यांचे भावी आयुष्य सुख समृद्धी आणी भरभराटीचे जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो ...

संदीप राक्षे
भोसरी पुणे २६

निष्फळ प्रयत्न माझे! (कविता)

निष्फळ प्रयत्न माझे!

नशिबात नसल्यावर
काय काय होतय
प्रयत्न करुनही सर्व
सार निष्फळ ठरतय..!

माझ्या सुवर्णाच्या वस्तूला
माती सम भाव मिळतोय
लोकांच्या मातीलाही
सुवर्णाचा भाव येतोय..!

जीवनात काय करावे
सुचत काही नाही.
सुचले तरी स्व:ताचे
काहीच होत नाही..!

पराधीन जीवन आपुले
हेच खर मानलय
स्वप्न सारी स्वतःचीच
खुंटीला बांधलीयं..!

समाधान आनंद मिळतो
दुस-यांच्याच सुखात
हाच मूलमंत्र मी आता
ठेवला आहे ध्यानात..!

नशिबात नसल्यावर
काय काय होतय
प्रयत्न करूनही सर्व
सार निष्फळ ठरतय..!

संदीप राक्षे  ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Monday, 18 December 2017

परिक्रमा ब्रम्हगिरीची!

"परिक्रमा ब्रम्हगिरीची निवृत्तीरायाची"
आळंदीत दर्शना साठी सिद्धबेटावर गेलो होतो. संध्याकाळची वेळ होती. गाडीवरून खाली उतरलो माऊलींची असणारी कुटी कडे चालु लागलो. त्याच वेळी माझे बॅकेचे सहकारी मित्र ह.भ.प मनोहर महाराज सुभेकर यांचा फोन आला, त्यांनी विचारले त्रिंबकेश्वरला येता का? थोडा शांत झालो मन भरून आले कसलाच विचार न करता हो म्हणालो..
वाचे म्हणता गंगा गंगा!
सकळ पापे जाती भंगा!!
दृष्टी पडता ब्रम्हगिरी!
त्यासी नाही यमपुरी!!
कुशावर्ता करिता स्नान!
त्याचे वैकुंठी रहाणे!!
नामा म्हणे प्रदक्षीणा!
त्यांच्या पुण्या नाही गणना!!
दिनांक 15/1/15 रोजी सांयकाळी 7 वाजता आम्ही त्रिंबकेश्वर ला जाण्यासाठी पिंपरी हुन निघालो. सोबत पिंपरीतील तुकाराम महाराज पालखी सोहळयातील जोग महाराज पायी दिंडीतले अनेक  जण होते. त्यामुळे जाताना भक्तीमय वातावरणातच आम्ही मध्यरात्री 2 वाजता त्रिंबकेश्वर ला पोहोचलो. षौष कृ. षटतिला एकादशी व निवृत्तीनाथांच्या समाधी सोहळादिन या ब्रम्ह मुहूर्तावर आम्ही कुशावर्ता मध्ये स्नान केले. त्रिंबकेश्वराचे दर्शन घेऊन पहाटे तीन वाजता परिक्रमेसाठी प्रारंभ केला,  विणा मृदुंग टाळाच्या गजरात पायी परिक्रमेला सुरवात केली. सर्वांच्या मुखात निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, हा मंत्र सुरू होता. अशा मंत्र मुग्ध वातावरणात पाउले चालु लागली. आजुबाजुला घनदाट जंगल पुसटसे दिसत होते. पायाकडे पाहिले तर अंधार दिसत होता, पुढे चालणार-याच्या पावलावर पाऊल ठेवुन वयोवृद्ध मंडळी व आम्ही चालत होतो. आकाशा कडे पाहिले तर सर्वत्र चांदण्यांचे विलोभनिय दृष्य दिसत होते. माऊलींच्या नाम स्मरणाने डोंगरातील झाडात सुद्धा माऊलींची प्रतिकृति दिसत होती असा भास होत होता. मध्येच डोंगरा आडुन चंद्राचे अर्धदर्शन होत होते. म्हातारी माणसे हातात काठी घेऊन मुखात नाम घेत वृदधपणावर सुद्धा मात करीत होती डोळ्यांना दिसत नव्हते तरी एकमेकांच्या आधाराने मार्गाक्रमण करीत होती, त्यांना पाहुन उत्साह वाढत होता. पुढे पुढे चालता चालता ब्रम्हगिरी पर्वत जवळ जवळ दिसत होता, ब्रम्हगिरीच्या दोन सुळक्यांच्या मधोमध एक चांदणी तीव्र चमकत होती प्रत्येकाने दृष्य पाहिले मनात क्षणभर आले साक्षात निवृत्ती नाथांनीच या चांदणी च्या रूपात दर्शन दिले सर्वांचे हात आपोआप जोडले गेले. सर्वजण आनंदी मनाने या दृष्याची चर्चा करीत होती. पाऊल चालत होती मन नामस्मरणात गुंतले होते. पहाटेचा गार वारा आता अंगाला झोंबत होता. दुरवरून कोंबड्याची बांग ऐकु येत होती पण मुखात चालल्या नामघोषाणे ती त्यामध्येच विरत होती. तांबड फुटल होत अंधार दुर होत होता. पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू झाला होता. आमच्या समोर गौतम ऋषींचा आश्रम दुर वर डोंगरात दिसत होता तो डोंगर पार करायचा होता. झपाझप पाऊले टाकित डोंगराच्या पायरी पर्यंत पोहचलो होतो हळूहळु डोंगर चढु लागलो. मध्येच खाच खळगे पायांना ठेचा लागत होत्या. मध्येच मोठ मोठे दगड पार करून अखेर गौतम ऋषींच्या मंदिरात पोहचलो एकीकडे सुर्यनारायण प्रकट झाले होते हे अविस्मरणीय दृष्य पाहुन सगळा शीण दुर झाला होता. दर्शन घेऊन पुढे निघालो आता गारव्याची जागा उन्हाने घेतली होती. अंगातुन घामाच्या धारा निघत होत्या. गळा सुकला होता, पण परिक्रमा पुर्ण होई पर्यंत बसायचे नाही व पाणी सुद्धा प्यायचे नाही हा संकल्प मनात केला होता, बरेच ठिकाणी भावीक थांबले होते कुणी नास्ता करीत होते. कुणी आराम करीत होते मलाही वाटायचे पण मन मानत नव्हते. पुढे चालत होतो आता माझा चालण्याचा वेग कमी झाला होता माझ्या बरोबरचे सर्वजण पुढे गेले होते मी एकटाच चालत होतो मुखात ॐ नमो ज्ञानेश्वराय हा जप सुरू होता. पायांच्या तळव्याला आग होत होती जाणवत होती पण नामाने ती सुद्धा शांत होत होती. आता शरीरात ताकद नव्हती पाय वाकडे पडु लागले होते. बरोबर कुणीच नव्हते बरोबर होती अनोळखी पण माणुसकीचा झरा असणारी माणसे  ती शब्दांनी आधार द्यायची आता थोडे राहिले आहे लवकर च पोहचाल थोडा आराम करा. पण नाही पाऊले थांबत नव्हती तळव्यांना आता फोड आले हे जाणवत होते. ते खुप दुखत होते. वेदना वाढत होत्या मनात येत होते हा कशासाठी इतका त्रास पण पुन्हा मनी परिक्रमा पुर्ण करण्याची आस. अंगातुन घामाच्या धारा सुरू झाल्या होत्या एखादी वा-याची झुळूक आली की चैतन्य संचारल्या सारखे चालु लागलो झपाझपा पाऊले पडत होती, अखेर त्रिंबकेश्वराचा कळस दुरवरून दिसला आणी सर्व वेदना शांत झाल्या पण अजुनही खूप चालायचे होते. मन खचत होते नाम प्रेरणा देत होते. पाय अडखळत होते घशाला कोरड पडली होती पण थांबायचे नाही हा संकल्प स्फुर्ति देत होता. आता  जिथे आमच्या गाड्या होत्या तिथ पर्यंत पोहोचलो होतो पाय खुप दुखत होते मनात आले आता गाडीत जाऊन आराम करावा. पण परिक्रमा अर्धवट राहिल संकल्प अपुर्ण राहिल तसाच चालत राहिलो. मंदिर जवळ दिसत होते पण पाय उचलत नव्हता. तरीही हळुहळु मंदिरा पर्यंत पोहचलो. त्रिंबकेश्वराला प्रदक्षीणा घातली कळसाचे दर्शन घेतले व परिक्रमा पुर्ण केली सर्व अंगात शक्ती आली होती सगळा शीण निघून गेला होता. पाय थंड पडले होते. पायांची आग शांत झाली होती  क्षणभर मंदिरात बसलो नवचैतन्य आता सर्व अंगात संचारले होते. परिक्रमा पुर्ण झाल्याने खुपच आनंद झाला होता.सकाळचे दहा वाजले होते 39 किलोमीटरची ब्रम्हगिरीची परिक्रमा करण्याचे भाग्य लाभले होते.
(शब्द अनुभवाचे-संदिप राक्षे.भोसरी)

कधी कधी! आयुष्य कविता..

कधी कधी !

कधी विरघळणा-या
मऊ माती सारखे व्हावे
पाण्यासवे देहावर थोडे
विरघळून पहावे..!

हात स्वतःचा पाठीवरती
चटके नंतर सोसावे
आयुष्याच्या मडक्याला जरा
आकार देऊन बघावे..!

झूलणा-या नभात कधी,
उडणा-या खगासम विहरावे
चंद्रालाही वाटेल हेवा
आल्हाद असे तरंगावे..!

कधी रण-रणणारा
धगधगता सुर्यमणी व्हावे
रोखून नजर करडी
डोळ्यात स्वत:चे तेज दाखवावे..!

वादळात अडकलेल्या
ढगांनी दुर दुर बरसावे
अन पळभरात दाटून
आयुष्य ओलाव्यात भिजवावे..!

भल्यास दाखवूनी वाट
दुष्टाला जागीच छेद द्यावे
कोणा कडून जळण्या आधी
स्वत:च जळूनी खाक व्हावे..!

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Sunday, 17 December 2017

बळीराजा!

बळीराजा!

भोळा भाबडा बळीराजा
भोळी भाबडीच भक्ती..
तुका ज्ञानीयांचा वसा
मनोमनी सांभाळती..!

नाही घेतले शिक्षण
शब्द ओठातले वेचती..
पिढ्यां पिढ्यांचा वारसा
युगे युगे सांभाळती..!

मर्द मराठीचा सूर
मर्द मराठीच गाती..
मायबोलीचे ते शब्द
ठाव अंतरीचा घेती..!

काळ्या आईतला जीव
उब मायेची हो देती..
उशी करून धोंड्याची
वर आभाळ पांघरती..!

सुख- दु:ख हो गिळून
स्वप्न उद्याची ते पाहती..
दुःख खुंटीला टांगून,
सुख इतरांस वाटती.!

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Saturday, 16 December 2017

नवचैतन्य! (कविता)

नवचैतन्य!

दिवसा मागुन दिवस
अलगद जाती सरत,
घर करुन राहती,
आठवांचे ठसे मनात!

एक क्षण आपला अन्,
दुसराच मात्र परका.
हिशोब असा आयुष्याचा,
कधी कुणा लागतो का,?

जुन्याच रोपट्यांच्या कळ्या
अत्तर नवे देवू लागतात,
क्षितिजावर रंग कोवळे
हळूच ठेवून जातात..!

हळवे रंग मंद गंध
डाव अंबरात मांडती,
रंगीतसा इंद्रधनुही एक,
ठसा आपला तिथे सोडती!

सूर नवे लयही नवी
गीत नवेच उमटले,
अर्थ खुळे भाव ओले
शब्दातून धगधगले!

होऊन वाऱ्याने सैरभैर
लाटा हळूवार रेंगाळल्या,
सागरावरती त्याच पुन्हा,
नव्या उमेदीने फेसाळल्या!

हदय जुने,चैतन्य थेंब नवे
नसानसात सळसळले,
देह जुना जल्लोष नवा
पुन्हा तारुण्य जणू उमलले !

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी,पुणे २६
८६५७४२१४२१

निसर्गात रमणारा मुक्त पंछी

नको पैसा नको बंगला गाडी
निसर्गाच्या सान्निध्यात रमण हिच जीवाला गोडी.

रघुदादा तोरणमाळच्या जंगलात निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त विहार करणारा आझाद पंछी.

*निसर्गासारखा नाही रे सोयरा*
*गुरू सखा बंधू मायबाप*
*त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप*
*मिटती क्षणात आपोआप*

आम्ही तोरणमाळला मच्छिंद्रनाथ गुहे कडे जात असताना रघुदादांची भेट झाली. उन्हात फिरून त्वचा राकट झालेली थंडी पासुन वाचण्यासाठी अंगात स्वेटर,आणी लंगोटी असा वेष परिधान केलेले, साधारण पंच्याऐंशी वय असलेले हे गृहस्थ. आम्ही त्यांच्या जवळ गेलो त्यांनी गाठी सकट नमस्कार केला. आम्ही पण नमस्कार केला. कोणत गाव बाबांनी विचारले? मी पुणे सांगितले थोरात सरांनी झोडगे नाशिक सांगितले आणी गजाननदादांनी आळंदी सांगितले. या गावा मधील एकही गाव त्यांच्या परिचयाचे नव्हते कारण जन्मापासूनच या पर्वतावर या डोंगर द-यातच आयुष्य गेलेले. बाबा बोलु लागले एक एक आयुष्याचा पैलू ते सांगु लागले.. शाळे ऐवजी लहानपणापासूनच हातात काठी आली, ती आज पर्यंत तशीच आहे. कारण लहानपणी गुरांच्या मागे, आणी म्हातारपणी मलाच आधार, ही गाठी माझ्याबरोबरच जाणार.

*त्याच्या संगतीत फिटतो संदेह*
*वितळतो क्षोभ माया मोह*
*त्याच्या संकीर्तनी मुरविता देह*
*भेटतो उजेड अंतर्बाह्य*

गाठी कडे पाहुन थोडे भावनिक झाले होते. मी विचारले बाबा का हो? ते म्हणाले माझी कारभारीण पण देवाघरी गेली आहे. एक मुलगा कामानिमित्त गुजरात मध्ये आहे. मी एकटाच असतो ही काठी सोबत असते. म्हणून हिलाच सर्व सुख दु:ख सांगतो. तसे आयुष्य जगताना कधीच दु:ख झाले नाही. कितीही संकट आली तरी हे रान इथले पशु पक्षी जगायला बळ देतात, यांच्या सहवासात जीवन आनंदी असते. मी सहज विचारले बाबा आजारी पडल्यावर काय त्यांनी एका झाडपाल्या कडे बोट दाखविले हे झाडच आमचा डाॅक्टर आणी उपचार सुद्धा. बाबा म्हणाले मी आजारी कधीच पडत नाही. इतके वय झाले तरी एक दात सुद्धा हलला नाही..की तुमचा बी पी डायबेटिस आम्हाला शिवला नाही. आता आमच्या गावात टीव्ही आले त्यामुळे आम्हाला कळते शहरात काय होते, काय चालते. तुमच्या सारखी माणस आली की  विचारतात सांगा झाड पाल्याचे औषध, या आजारावर त्या आजारावर, आजार ऐकूनच हसायला येते. इतके जीवनात सुख उपभोगणारे तुम्ही इतके आजार शरीराला लावुन घेता. मग आम्ही  तुमच्या पेक्षा बरे निरोगी आयुष्य जगतो या निसर्ग देवतेच्या सानिध्यात. हे तोरणमाळ खुप चमत्कारिक आहे..आम्ही रात्री अपरात्री या जंगलात फिरतो पण कधीच भीती वाटली नाही. झाडाच्या मुळाची कंदमुळ खाऊन आमची मुल मोठी होतात..कसलाच आजार होत नाही..इथे ना धावपळ ना पळापळ  आलेला दिवस आनंदात घालवायचा दोन वख्ताची जेवणाची सोय झाली म्हणजे दिवस सरला. रानफळ रानफुल खाऊन हे शरीर अजुनही भक्कम आहे अजुनही तुमच्या सारख्या तीन चार जणांना लोळविण्याची ताकद मनगटात आहे. आता बाबांच्या चेहरा एखाद्या विजेत्या सारखा भासत होता..पाय जमिनीला घासतच बोलत होते. किती आत्मविश्वास होता किती बळ अजुनही अंगात होते याचे कारण फक्त एकच "निसर्गसानिध्य" निघताना बाबांचा  निरोप घेतला बाबांना एक बिस्किटचा पुडा दिला. शंभर रू दिले आणी तेथुन मच्छिंद्र गुहे कडे निघुन गेलो....

*त्याच्या स्मरणाने प्रकाशते मन*
*उजळते जग क्षणकाली*
*स्थिरावते पुन्हा चळलेले चित्त*
*पुन्हा मूळ वाट पायाखाली*

*लेखन: -संदिप राक्षे* ✍🏻

Friday, 15 December 2017

पाऊलखुणा (कविता)

पाऊलखुणा

मी पापण्यांना काही
गुज नवे सांगितले,,.
कवितेत भाव मनीचे,
हलकेच तु जागवले...

तुझ्या मिठीत काळे-सावळे,
आभाळ जणू ओले होते...
चिंब भिजलेल्या मनास
अजून थोडे भिजवते...

जसा केतकीचा वारा ,
दारी आला उधाणलेला,...
ओल्या विरहात तुझ्या ग,
माझाच ओलाचिंब शेला.....

दिर्घ वेदनांच्या काही
उसवल्या होत्या खुणा..
आठवांच्या सुरात तुझ्या,
पुन्हा भासती पाऊलखुणा।

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी,पुणे २६
८६५७४२१४२१

मनुष्य जन्म मिळे एकदा

*मनुष्य जन्म मिळे एकदा*
*जगुन घे रे खुशाल माणसा*
*नको उगी तो घोर जीवाला*
*नको चिंता हसवा आणि हसा*

संपूर्ण आयुष्य कसे जगायचे याचा सारांश मधु यांनी आपल्या चारोळीतुन सांगितला आहे. ती चारोळी खरच प्रत्येक मानवासाठी एक अनमोल वचन आहे. सालाबाद प्रमाणे होळीचा सण निसर्गाच्या सान्निध्यात साजरा करायचा आणी सरलेल्या वाईट गोष्टी, झालेला मान अपमान, तिथेच होलीका मातेला अर्पण करून नविन उर्जा घेऊन नवीन वर्षांत पुन्हा नवीन ध्यास घेऊन सामाजिक जीवन जगायचे. कुठे जायचा हा प्रश्न मनात होता. विनोदभाऊंचा शुक्रवारी सकाळीच फोन आला आपण कुठेही दुर न जाता नाशिकलाच थांबुयात तुम्ही या. शुक्रवारी बँकेतून सुटलो आणी नाशिकचा रस्ता धरला. सोबत माझ्या साथीला माझे दोन परम स्नेही होते एक माझी होंडा अॅमेज गाडी आणी त्यामधील सीडी प्लेअर हे माझे सखेसोबती कधीच मला एकटे पणाची जाणीव करून देत नाही..कधीच रस्त्याने जंगलात अंधारात धोका देत नाहीत..या दोन मित्रांच्या साथीने नाशिकला रात्री बारा वाजता पोहचलो. तो पर्यंत विनोदभाऊ धुळेहुन आले होते.उद्याचे उद्या पाहु असे म्हणून आम्ही झोपी गेलो. सकाळी लवकरच उठलो तो पर्यंत अजिंक्यजी पवार, गिरीशजी रहाणे, अमितजी गायकवाड, हे फ्लॅट वर आले होते. त्यांच्या गप्पा सुरू होत्या मी आंघोळ उरकून त्यांच्यात सहभागी झालो. बोलता बोलता अमितजींचा फोन वाजला तो फोन होता प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) चे प्रमुख विलासजी चौधरी साहेबांचा, साहेब मुळचे अमळनेर जळगावचे पण नाशिक येथेच स्थाईक ते सध्या नवापूर येथे कार्यरत आहेत.  त्यांनी मोबाईवरून निरोप दिला आज सर्वांचा नास्ता माझ्याबरोबर तुम्ही थांबा मी आलोच पंधरा मिनिटात साहेब हजर झाले. RTO चे अधिकारी कडक शिस्तीचे, कडक स्वभावाचे, असा माझा समज होता. पण तो लगेचच खोटा ठरला आल्या आल्या साहेबांनी सेकहँण्ड केला आणी सर्वांना आलिंगन दिले मी भारावून गेलो.. चांगल्या चांगल्यांची बोबडी वळते ते समोर आल्यावर, पण साहेबांची तर वेगळीच झलक पहायला मिळाली.. भेट झाली विचारपूस झाली मनसोक्त गप्पा झाल्या मध्येच गप्पा थांबवत साहेबांनी नास्त्याची आठवण करून दिली.. आणी आम्ही फ्लॅट सोडला. विनोदभाऊंनी त्यांची मर्सिडीज बेंज ही गाडी काढली व बाॅम्बे नाक्याच्या आजुबाजुचा परिसरात पोहचलो. तिथे छान पैकी पोहे आणी जिलेबीचा आस्वाद घेतला..तेथुन आमची गाडी निघाली ती मुंबई च्या दिशेने मला दोन मिनट कुठे चाललो हे सुचेना मग चौधरी साहेबांनीच सांगितले, आपण आपल्या फार्महाऊस वर जात आहोत धारगावला, नाशिक मुंबई रस्ता सोडला आणी गि-हे बिऱ्हाड या गावाकडे टर्न घेतला रस्त्यांच्या दोन्ही बाजुला नुकतीच बहर आलेली फुल पान दिसत होती.. चौधरी साहेबांना शास्त्रीय गाण्यांची खुप आवड त्यांनी त्यांच्या मोबाईल मधुन पं अजयजी पोहनकर व हरिहरन यांनी गायलेले अभिजीत पोहनकरांनी तयार केलेले फ्युजन ऐकवले. विनोदभाऊंनी ते गाडीच्या सीडी प्लेअर शी कनेक्ट केले आणी ते बहारदार संगीत मोठ्या आवाजात ऐकु येऊ लागले, निसर्गाचे सानिध्य आणी संगीत याचा मनमुराद आनंद घेत आमचा प्रवास सुरू होता. होळीचा दिवस, बैलगाडीत आपला परिवार घेऊन वस्तीवर राहणारे शेतकरी नटून थटून गावातल्या घरी जात होते. बैलगाडीतली ती कुटुंब त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट जाणवत होता.. निसर्गाने यंदा भरभरून पीक दिल्याने बळीराजा सुखावला होता...गावच्या होळीसाठी लागणारी पांगीराची लाकड काही तरूण मुल आपल्या खांदयावर घेऊन जाताना दिसत होती..सफेद लाकूड जणु एखाद्या भल्या मोठ्या अजगरासारखे दिसत होते. कधीकाळी घनदाट जंगल असणारे डोंगर ओसाड काळाकुट्ट भासत होते.. मी अमितजी गायकवाड यांना विचारले तुमचा जन्म इथलाच मग तुम्हाला हे डोंगर आठवत असतील त्यांनी सांगितले मी जेव्हा शाळेत होतो घनदाट जंगल मी स्वता पाहिले आहे. आणी रामायणात ज्याचा उल्लेख आहे ते हे दंडकारण्य मग विचार करा, मी हे शब्द ऐकून शाॅक च झालो.. किती निसर्गाची हानी या मानवप्राण्यांनी केली हे पुन्हा दृष्य पहायला मिळाले..

*अरे अरे माणसा नको होऊस निष्ठूर*
*नको संपवु हा निसर्ग नको होऊस दृष्ट*

धारगाव जवळ येत होते दुरवरून वैतरणा धरणातील निळेशार पाणी दिसत होते डोळ्यांना शांत करीत होते. आजुबाजुला आंब्यांची झाडे, व त्याझाडावरील कै-या,  करवंदीच्या जाळी व त्यातील हिरवी कच्ची करवंदे मनाला आंबट करीत होती मुखात आपोआप आंबट पणाची जाणीव होत होती. मनाला संगीत गोडी देत होते. आंबट गोड अनुभव घेत घेत आम्ही चौधरी साहेबांच्या फार्महाऊसवर पोहचलो. पायथ्याशी दोन पाण्याने तुडुंब  भरलेले कॅनॉल वहात होते. रानावनतील पक्षी मनसोक्त या पाण्यात डुंबत होते कोणी आपली तहान क्षमवत होते..गाडी ठिकाणावर पोहचली आमचे स्वागत करण्यासाठी गुलाब फुलांची भली मोठी रांग उभी होती. वा-याच्या झुळके सोबत फुलांचा सुगंध नाकावर येऊन धडकत होता. एका एका श्वासातुन तो सुंगध हदयाला मिळत होता. हदयात चैतन्य स्फुरत होते...निसर्गरम्य परिसर पाहुन मन वेगळीच अनुभूती अनुभवत होते. वसंतऋतुच्या आगमनाने मोहोर फुलांनी संपूर्ण वातावरण गंधीत झाले होते.
तिथेच एका महान कवयित्री अर्चना वासेकर यांची कविता आठवली..

*ऋतू वसंत आला फुलून,*
*नवस्फूर्तीने लता हासली,*
*वृक्ष नटली नवपालवीने,*
*जीवनाची जणू दिशा उमगली।*

*पळस बहरला आनंदाने,*
*लावण्य धरेचे खुलले त्याने,*
*लाल-अबोली छटा रंगीत,*
*पसरवल्या ऋतू वसंताने।*

*आयुष्याच्या प्रत्येक क्षणी,*
*यावा असाच वसंत फुलूनी,*
*जीवनात नवे रंग भरावे,*
*आनंदाच्या रंग छटांनी।*

वनराईत नटलेला चौधरी साहेबांचा हा फार्म हाऊस(रिसोर्ट) पाहुन नेत्र तृप्त झाले. आम्ही सर्वांनी संपूर्ण रिसोर्ट चा फेरफटका मारला. चौधरी साहेबांनी संपुर्ण माहिती दिली. तोपर्यंत सरदारजींनी छान जेवण बनविले होते..छान जेवणाचा आस्वाद घेतला. मनसोक्त निसर्गाचा सहवास लाभल्याने होळीचा दिवस सार्थकी लागला होता. सायंकाळ कधी हे कळलेच नाही. आज होळी असल्याने अमितजी गायकवाड यांचे कडे पुरण पोळीचा बेत होता.   "अन्न हे पुर्णब्रम्ह" सहसा पोळी कधीच खात नाही. पण अमितजी व वहिनींच्या आग्रहाखातर दोन दोन पोळ्या विनोदभाऊंनी आणी मी संपवल्या. त्याबरोबर पोळ्यांची आमटी तर खरच खुप चविष्ट होती. भरपेट पेटपुजा झाली. शतपावली झाली आणी झोपायला गेलो. कालच्या सारखा आज पण उद्या काय करायचे हे ठरवले नाही.
सकाळी उठलो तर आम्ही उठण्या अगोदरच विलासजी चौधरी साहेब आम्हाला उठविण्यासाठी आले होते. मलाच आश्चर्य वाटले इतकी मोठी अधिकारी व्यक्ती, कायम बिझी शेड्युल पण आज पुन्हा आमच्या पाहुणचारासाठी हजर खरच अशीच माणसे कायम हदयात घर करून राहतात.आम्ही फ्रेश झालो काॅफी घेतली अन न विचारता साहेबांच्या गाडीत बसलो.आज फक्त अमितजी त्यांच्या कामामुळे आमच्या सोबत नव्हते, गाडी नाशिक सोडून मातोरी गावाकडे निघाली होती. वाटेत जाताना द्राक्षांच्या अनेक बागा बहरलेल्या होत्या, वृत्तपत्राच्या कागदात अनेक द्राक्षांचे घड बांधलेले दिसत होते. आज धुलवडीच्या दिवशी एक नवीन गाव पहाण्याचा योग येणार होता. गाव सोडून थोड्या अंतरावर साहेबांनी गाडी वळवली आणी गाडी थेट द्राक्षांच्या बागेत घातली..समोर एक व्यक्ती उभी होती साहेबांचे त्यांनी स्वागत केले नंतर साहेबांनीच सांगितले हे माझे चुलत सासरे आहेत. साहेबांनी सर्वांची ओळख करून दिली आदरातिथ्य झाले. समोरच  द्राक्षांचे मोठमोठे घड पाहुन माझे मन स्वस्थ बसेना कधी बागेत घुसतो आणी कधी द्राक्षांचा आस्वाद घेतो असे झाले. प्रत्येकाची स्कॅनिंग करणारे विनोदभाऊनीं हे ओळखले तसे चौधरी साहेबांच्या लक्षात आले. ते स्वता पुढे बागेत शिरले त्यांच्या मागे मी विनोदभाऊ गिरीशजी अजिंक्यजी पण आले. बागेत शिरलो जिथ पर्यंत नजर जाते तिथपर्यंत अनेक घड लटकताना दिसत होते. आंबड गोड द्राक्ष मनसोक्त खाल्ली. साक्षात तोडून खाण्याचा आनंद खरच वेगळा. पोटभरून द्राक्ष खाल्ली. तोपर्यंत पाहुण्यांनी सहा सात द्राक्षांच्या पेटी भरून गाडीत ठेवुन दिल्या. विहिरीतल्या थंडगार पाण्याने चुळ भरली, हातपाय तोंड धुतले, पाहुण्यांचा निरोप घेतला....

*आपल्या माणसांची जाणीव,*
*होते एकटे असल्यावर,*
*आठवतात व्यतीत केलेले क्षण,*
*त्यांची आठवण आल्यावर.*
मु
*मुक्तछंद लेखन:- संदिप राक्षे✍🏻*

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...